अफू बाई अफू
भारतातील अफूच्या या पिकाचा पहिल्यांदा सर्वात जास्त फायदा उठवला तो पोर्तुगिजांनी. माळवा प्रांतातील अफू ते चीनमध्ये नेऊन विकत. तसेही पोर्तुगिज ब्राझिल मधली तंबाखू चीनपर्यंत वाहून नेत असत. व त्याबदल्यात चीन मधले रेशीम विकत घेत. पण त्याला अडसर होता तो चीनच्या स्वत:च्या तंबाखूच्या उत्पादनाचा. मग अफू तंबाखू मध्ये मिसळून ती जाळायची व नळीतून तिचा धूर ओढायचा. ही कला पोर्तुगिजांनी भारतीय व चिन्यांना शिकवली. मग काय बारीक डोळे असलेले चीनी ती अफू मिश्रीत तंबाखू ओढल्यावर डोळे अजून बारीक करत व रंगीत दुनियेत हरवून जात. बघता बघता मिचमिच्या डोळ्यांवर नशेची झापडं कधी चढली हे त्यांनाच समजलं नाही. अखेर १७२३ साली क्विंग घराण्याच्या युंग चेंग या राजानी चीनमध्ये अफू व तंबाखूवर बंदी आणली. काही काळ ही बंदी कायम राहिली. स्वत:ला कोंडून घ्यायचे, जगाला कुतुहल वाटेल इतकी झाकपाक करुन टाकायची चीनची सवय आजची नाही, तशी जुनीच आहे. क्विंग घराणं तसं काही प्रजाहितदक्ष होतं वगैरे समजण्याचे कारण नाही. बाई, बाटली आणि काळा पैसा यांनी राजापासून ते सरदारांपर्यंत सगळ्यांना पोखरलं होतं. प्रजेचे हाल कुत्रं खाणार नाही असे होते. त्यातून जपान्यांनी चीनशी अगदी सहाव्या शतकापासून उभा दावा मांडला होता.
थोडक्यात चीनला सांभाळू शकेल असा कोणीही नव्हता. पाच हजार वर्षांचा इतिहास वगैरे केवळ बुजगावण्यागत नाचवण्यासाठी उरला होता. अफू व तंबाखूवरती बंदी असताना ती विकायचे प्रयत्न सुरु केले ब्रिटिशांनी. ईस्ट इंडिया कंपनीला भारतात १७६१ साली अफूची लागवड करायची खुली सूट मिळाली. साहेब व्यापारात तसा हुशार आणि चिकट. मुश्किलीने का होईना ब्रिटिशांनी चीनच्या ग्वांगझोऊ म्हणजेच कॅंटॉन बंदरात व्यापारासाठी परवानगी मिळवलीच. ब्रिटिशांना बोट धरायला दिले कि ते हळू हळू हातच पकडत व नंतर गळा. चीनमध्ये ब्रिटिशांनी वेगळं केलं नाही. १७७३ च्या डिसेंबरमध्ये तसेही ’बोस्टन टि पार्टी’ मुळे उत्तर अमेरीकेतुन ब्रिटनचा बाजार उठायला नुकतीच सुरुवात झाली होतीच. या चहाने तोंड चांगलेच पोळले होते. म्हणून मग आता त्यांनी चीनमधला चहा फुंकून प्यायला सुरुवात केली. ते चहा विकत घेत व चीनला त्याबदल्यात चांदी व अफू देत. अफूसाठी ते भारतावर अवलंबुन होते. १७६७ मध्ये भारतातून जवळपास २ टन अफू चीनला रवाना झाला. याखेरीज चीनशी चांदी मध्ये व्यापार करता यावा म्हणून ब्रिटन हि चांदी युरोप व मेक्सिको मधून मिळवत असे. बघता बघता ब्रिटनचीच यात चांदी होऊ लागली. पण अमेरिकेने व युरोपिअन देशांनी विशेषत: जर्मनीने चांदीला आपल्या अर्थकारणातून बाजूला काढले. अमेरिकन याला "Panic of 1873" म्हणतात तर युरोपमध्ये याला “Long Depression” म्हणतात. या काळात सर्व व्यवहार सोन्याच्या पायावर व्हावा असे ठरले. या सगळ्या प्रकारात ब्रिटनची चीनमध्ये देखील पंचाईत होऊ लागली. मग यावर ब्रिटिशांनी जालीम उपाय शोधला – अफू!
पण सगळं सहज घडलं नाही, त्या आधी ब्रिटिश व क्विंग घराण्याची कॅंटॉन बंदरात पहिली सलामी झडली. साल होतं १८३९. सुमारे चार वर्ष हा झगडा सुरु होता. झालं असं की चीन सरकारच्या लक्षात येऊ लागलं कि ब्रिटन आपल्याला चहाच्या बदल्यात चांदी देतं आणि अफूच्या बदल्यात परत चांदीच घेतं. हे कळेपर्यंत बराच उशीर झाला होता. आता गंगा उलटी वाहु लागली. म्हणजे आजवर चहाच्या बदल्यात ब्रिटन चीनला चांदी देत होतं. पण त्याच्याहुन जवळपास दीड व दोन पट चांदी अफूसाठी चीनबाहेर जाऊ लागली. म्हणजे १७९३ साली चीनमध्ये जवळपास २६ लाख टन चांदीचे साठे होते. जे १८२० साल उजाडताना ८ लाख टनांवर घसरलं होतं. शिवाय हादरवणारी गोष्ट अशी होती की चीनमध्ये जवळपास २० लाख गर्दुल्ले तयार झाले होते. क्विंग घराण्याने हा व्यापार बंद करायचे ठरवले. या कामगिरीसाठी त्यांनी कॅंटॉन बंदरात लिन झेक्सू याची नेमणूक केली. त्याने १० मार्च १८३९ रोजी लगोलग अफू विकण्यावर बंदी घातली. त्याने ब्रिटिशांसकट सर्व परदेशी व्यापार्यांना अफूचे साठे त्याच्या हवाली करण्यास सांगितले. व नियम मोडणार्यांना देहदंडाची शिक्षा जाहीर केली. ब्रिटिशांना त्याने कॅंटॉन बंदरात व्यापार करण्यास बंदी घातली. अखेर ठराविक नुकसान भरपाई मिळेल या बोलीवरती त्यावेळचा ब्रिटिश सुप्रिटेंडन्ट चार्ल्स एलिऑट ने ३ जुन १८३९ या दिवशी प्रत्येकी ५५ kg चे जवळपास २०,००० खोके झेक्सूच्या ताब्यात दिले. झेक्सूने ताबडतोब त्याची विल्हेवाट लावायला सुरुवात केली.
पहिलं अफू युध्द.
इथपर्यंतही सगळं ठीकठाक होतं. पुढे दारुच्या नशेत एका ब्रिटिश सैनिकाने चीनी कामगाराला गोळी घातली आणि नवाच बखेडा उभा राहीला. लिनने ब्रिटिश सैनिकाला ताब्यात देण्याची मागणी केली पण इंग्रजांनी ती नाकारली. लिनने इंग्रज बराकिचा मकाऊ मधून होणारा अन्नपुरवठा अडवला, पिण्याच्या पाण्यात विष कालवलं. इंग्रजांना तेथून माघार घ्यावी लागली. कॅंटॉन तात्पुरते सोडून ते हॉंगकॉंगला आले व तिथे इंग्रजांनी सैन्याची जमवाजमव सुरु झाली. एकमेकांची खुसपटं काढण्यात काही महिने गेले व अखेर जून १८४० मध्ये इंग्रजांनी ग्वांगडॉंग इथे जबरदस्त दणका दिला. इतके दिवस आपल्या तोफा व नाविक दलाचा नको इतका आत्मविश्वास असलेले चीनी या दणक्याने पार झोपले. १५ लष्करी बोटी, ४ वाफेवर चालणार्या बोटी, २५ लहान बोटी व ४००० होडगी सिंगापूरवरुन ग्वांगडॉंगला येऊन थडकली. त्यांनी पर्ल नदीचं मुख ताब्यात घेतलं. हबकलेल्या चीनने त्यांना व्यापारात आलेली खोट भरुन द्यायचे कबूल केले. पण युध्द थांबलं नाही. ते पुढली दोन वर्ष अगदी सवडीनं चालू राहिलं. इंग्रजांनाही घाई नव्हती. त्यांची छोटि होडगी या काळातही कॅंन्टॉन व आसपासच्या गावांत चोरुन मारुन अफू पोहोचवतच होती. चीनी आता अफू शिवाय जगू शकत नाही हे इंग्रजांनी ओळखलं होतं. अखेर ब्रिटिशांनी १८४२ मध्ये निंग्बो जिंकलं, लष्करी दृष्ट्या महत्वाचं शहर चिन्यांनी गमावलं. आणि १८४२ च्या मध्यावर त्यांनी यांगत्से नदीच्या मुखावर वर्चस्व निर्माण केल्यावर यांगत्से नदीवर चालणार्या व्यापारावर अवलंबून असलेल्या शांघायला शरण यावच लागलं.
पहिलं अफूचं युध्द ब्रिटिशांनी जिंकलं. आणि झालेल्या तहात कलमे ठरवली गेली – १) ब्रिटिशांना कॅन्टॉन, अमॉय, फूचौ, निंगपो, व अगदी शांघाय मध्येही व्यापार करायची सूट मिळावी. २) चिनी सरकार सांगेल ती जकात भरु, परंतु अधिक खंडणी बंद. ३) चिनी भूमीवरील ब्रिटिश वसाहतींना चीनी कायदे लागू होणार नाहीत. ४) हॉंगकॉंग वरती ब्रिटिशांचे नियंत्रण राहिल. म्हणजे आता तर इंग्रजांना काही धरबंधच उरला नाही. राजसत्तेला इंग्रजांकडून काय मिळालं? तर “अफू विकणार नाही!” असं तोंडी आश्वासन. बास! याच दरम्यान चीनमध्ये तैपिंग बंडखोरांनी निष्क्रिय, भ्रष्ट व इंग्रजांसमोर पत घालवलेल्या राजसत्तेविरुध्द बंड पुकारलं. ब्रिटिशांना दुसर्या देशातील अशी प्रकरणे पोसायला फार आवडत. त्यांनी दोन्ही बाजुंचे गालगुच्चे घेणे सूरु ठेवले. त्यातच ख्रिस्ती धर्मोपदेशकांचा नुसता सुळसुळाट झाला होता. त्यांनी या बंडखोरांना अजूनच फितवले. बंडखोरांचा जोर इतका होता कि पेकिंग राजवट डळमळू लागली. त्यांना परत ब्रिटिशांचा आधार गरजेचा वाटला. आणि इथे ब्रिटिशांचा चीनच्या राजकारणात प्रवेश झाला. पण हा मधुचंद्र फार रंगला नाही, झालं असं की ८ ऑक्टोबर १८५६ ला ब्रिटिश निशाण फडकणार्या एका बोटीला “येह” या चिनी सरदाराने अडवले व त्यात अफू सापडला ह्या आरोपाखाली त्याने बोटीवरील १२ ब्रिटिश व्यापार्यांना अटक करुन त्यांचा छळ करायला सुरुवात केली. हॅरी पार्कस या इंग्रजी अधिकार्याने “त्या व्यापार्यांना सोडा अथवा हॉंगकॉंगहुन ब्रिटिश लष्कर मागवावे लागेल!” अश्या आशयाचे पत्र धाडले. येह ने त्याला भीक घातली नाही. झालं प्रकरण पेटलं.
क्रमश:
5 comments:
नमस्कार मी अभय शेजवळ मी नुकताच मराठीनेटभेटब्लॉगकट्टा बनविला आहे. तिथे आपला छानसा ब्लॉग जोडण्यात आला आहे, जर आपणाला आपला ब्लॉग तेथून हटवायचा असल्यास
संपर्क या पर्याय वापरून आपण आपला ब्लॉग ब्लॉगकट्ट्यातून हटवू शकता.
धन्यवाद
भारी लेखन करताय राजे, बहोत खुब ऐसेही आगे बढें..., तु रेफ़्रंस कुठला वापरतो आहेस? जो पण आहे बेस्ट आहे अफ़ु युद्धे म्हणजे ओपियम वॉर ह्या जागतिक इतिहासातल्या महत्वाच्या आहेतच पण समकालीन टेरर गृप्स अन त्यांचे फ़ंडीग ह्याच्याशी संलग्न आहेच, अधिक माहिती करीता Wizard publications "Modern World - K.Krishna reddy" नक्की वाचा,वाचनिय पुस्तक आहे जागतिक इतिहासाबद्दल बरीच जिज्ञासा शमन करणारे पुस्तक, सध्यपरिस्थितीत अरब इतिहास हवा असल्यास देखील उत्तम रेफ़्रंस आहे
@ Guru
अरे शेकडो साइट्स, ४-५ पुस्तके पालथी घातली आहेत एका प्रकरणासाठी. अजुन अफगाणिस्तान, बर्मा, कोलंबियाचा पाबलो एस्कोबार, मेक्सिको मधलं ड्रग्स ट्रॅफिक ही पुढली प्रकरण आहेत. सध्या केवळ पहिलं प्रकरण झालय ते शेअर करतोय. बघू ठरवल्या पैकि किती लिहून होतात ते.
नविन संदर्भासाठी धन्यवाद.
पाबलो एस्कोबार एपिसोड साठी कुठुन ऍक्सेस मिळाला तर तु हिस्ट्री चॅनल चे आर्काईव्ह्स बघ, एक पुर्ण सिरिज होती त्यांची "Terrorism after 1945" म्हणुन उपयोगी ठरेलच, बहुदा यु ट्युब वर मिळेल पण कॉपीराईटेड कंटेंट असतील तर अवघड आहे, त्याच्या सोबतच जर यु.एस.ए चा दार्नेल गार्सिया वर काही मिळाले तर बघ, एक ऍंटी नार्कोटीक्स ऑफ़िसर कसा डबल गेम करतो ही स्टोरी आहे ती (अर्थात सत्यकथा!!!!)
अरे नविन संदर्भ दिलेस त्याबाबत धन्यवाद. बहुदा तू म्हणालास ती टेररीजम आफ्टर ४५ ही सीरीज बघितली आहे. पण फक्त पाबलो एस्कोबार वरतीच एक अख्खी सीरीज डिस्कव्हरीने केली आहे. शिवाय मार्क बाऊडेन चं "किलिंग पाबलो" म्हणून एक पुस्तक आहे पण सध्या मला मिळालं नाहिये. ते मिळालं तर चांगलाच फायदा होईल पुढल्या आर्टिकल्स साठी.
Post a Comment