Thursday, April 24, 2008

मानसीचा चित्रकार तो.....

पेन्सील स्केच काढणे मला आवडते. सुदैवाने माझे आजी-आजोबा, माझ्या दोन्ही आत्या, आई, मोठी बहिण ह्यांच्या हातात हि कला असल्याने बेसिक मार्गदर्शनाची पायरी मी घरीच ओलांडली. शिवाय ८वीत असताना एलिमेंट्री परीक्षा देखिल B ग्रेड ने का होईना पास झालोय. पुढे इंटरमिजीएट नाहि करता आली Bad luck, पण मग रंगाचा ब्रश सुटला तो सुटलाच(आता मी फक्त MS PAINT पुरता कंप्युटरवरती तो पेंटब्रश वापरतो). पण त्या जागी पेन्सील आली. पेन्सीलने देखिल कागदाला हसवता-रडवता येतं हे समजलं, खरं तर थोडा उशीरच झाला होता पण चित्रकला अगदिच अनोळखी नव्हती. काहि दिवस मान खाली घालुन चित्र काढल्यावर कोणाचे चित्र आहे? हा प्रश्न पडणे कमी होत गेलं. निदान घोडा आहे कि कुत्रा, हा प्रश्न तरी नक्कि पडत नाहि.

रंगांपेक्षाहि पेन्सील शेडिंग जास्त कठिण असतं असं मला वाटतं कारण कागदाचा पांढरा रंग हा एक आणि पेन्सीलचा रंग दुसरा हे दोनच रंग वापरुन चित्र सजवायचं असतं. त्यातहि सगळी किमया हि पेन्सीलची असते. हवी तिथे हवी ती पेन्सील वापरायची. हवी ती म्हणजे हवी त्या ग्रेड्ची खरं म्हणजे त्यात चढ उतार असतो - उतरत्या क्रमाने(Darker to Softer) ग्रेड बघायच्या झाल्याच तर - (Dark)9B, 8B, 7B, 6B, 5B, 4B, 3B, 2B, B, HB, F, H, 2H, 3H, 4H, 5H, 6H, 7H, 8H, आणि 9H(soft) असा क्रम असतो. पण साधारणत: HB पासुन 6B पर्यंत चित्रकलेसाठी वापरल्या जातात, त्या पुढील ग्रेड या बहुतकरुन drafting and engineering साठी वापरतात. ही ग्रेड करण्याची पध्दत युरोपियन आहे. अमेरीकन पध्दतीत #1, #2, #2.5 असे प्रमाण वापरतात. पेन्सील हा शब्द pencillus या लॅटिन शब्दावरुन आलाय त्याचा अर्थ "little tail." असा होतो. पेन्सील जितकी डार्क तितकी ती लवकर झिजते ती जास्त मऊ असते. या उलट पेन्सीलची शेड जितकी सॉफ्ट तितकी ति झिजण्यासाठि hard असते. HB मधला H हा "हार्डनेससाठि" तर B "ब्लॅकनेससाठि" वापरतात.
आपण ज्या पेन्सील वापरतो त्या Graphite pencils असतात, या शिवाय Charcoal pencils, Crayon pencils, Grease pencils, Watercolour pencils, Carpenter's pencils, Copying pencils, Erasable colour pencils, Stenographer's pencil आणि Golf pencil असे इतर प्रकार आहेत. अर्थात चित्रकलेसाठी शेवटच्या २ पेन्सील नाहि वापरल्या जात, किंवा कार्पेंटर्स पेन्सील देखिल वापरत नाहित. आता रंगीत पेन्सील्स असतात पण पेन्सील स्केच म्हंटलं कि "ब्लॅक & व्हाईट" हेच डोळ्या समोर येतं. या शिवाय अजुन माहिती इथे मिळेल.

मधे कधीतरी माणसाच्या शरीराची ठेवण, उभं राहण्याची, बसण्याची पध्दत याची प्रॅक्टिस करण्यासाठि Nude Sketches देखिल काढतो, बहुदा जे सगळेच चित्रकार काढतात. पण घरच्यांनी विशेषत: आईने बघितले तर पोरगं वाया गेलं असं तिला वाटु नये म्हणुन लगेच खोडुनहि टाकतो, उगीच त्यांच्या बालमनावर परीणाम नको व्हायला. खरंतर TITANIC मला यासाठिच जास्त आवडला होता. चित्रकार जॅक(लिओनार्दो डिकॅप्रिओ)चा मला "तेव्हा" भयानक हेवा वाटला होता.[;p].

पुढिल काहि चित्रे माझ्या अल्पमतीने काढली आहेत. मला माहित आहे कि माझ्या चित्रांना अजुन प्रोफेशनल/आर्टिस्टिक टच वगैरे नाहिये.पण हि चित्रे मी माझ्यासाठि काढली आहेत. मी कधी नर्व्हस असेन, मुड खराब झाला असेल तर जुनी गाणी तरी ऐकतो किंवा सरळ चित्र काढायला बसतो. कधी कधी जितका मुड खराब तितकं चित्र चांगलं येतं. कदाचित Frustration बाहेर निघत असेल. अर्थात नेहमीच असं असतं असं नाहि.

चित्र मोठे करुन बघण्यासाठि त्या चित्रावर टिचकी मारा - बोले तो क्लिक करना यार!!



जो १४ विद्या आणि ६४ कलांचा अधिपती आहे, त्याच्या पासुनच श्रीगणेशा.



ज्यांनी आम्हाला ताठ मानेने जगायला शिकवले - छत्रपती शिवराय.
(महाराजांच्या चेहर्‍यावर अगदि आश्चर्योत्सुक भाव आहेत, पण महाराजांनी कधीतरी ते भाव दाखवले असतीलच ना??? मग तेव्हाचे भाव दाखवले आहेत!)



प्रत्येक मराठि माणसाचा मानबिंदु - स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर.



हिंदुहृदयसम्राट - वीर सावरकर.
(चष्म्याची सावली काढणे हा यातला कढिण भाग होता!)




गुरुदेव!
("रविंद्रनाथ:तीन व्याख्याने" - पु.ल. , या पुस्तकावरील चित्र आहे, सुभाष अवचटांनी ब्रशच्या सहाय्याने काढलेले चित्र मी पेन्सीलने काढले आहे.)



नादब्रह्म - पं.भीमसेन जोशी.



सच्चिन!सच्चिन!! आपला तेंडल्या.
(सचिनचे दात काढल्यावर(म्हणजे कागदावर) मी माझ्यावरच बेहद्द खुष झालो होतो. कारण बर्‍याचदा हसणार्‍याचे पेन्सील स्केच काढले कि दात किडल्यासारखे येतात, कदाचित सचिन कोलगेट वापरतो म्हणुन इथेहि त्याचे दात चकाचक आले आहेत.)




खेळणी विकणारी बाई - कल्पनाचित्र.



हं! क्या कहे? - कोणा अनामिकेचे कल्पनाचित्र.
(बाकि काहि म्हणा हिची सडक बोटे सुंदर आली आहेत. शिवाय ओठांच्या बाह्य रेषा काढताना डार्क रेषा वापरली नाहिये. म्हणुन सलग ओठ आले आहेत नाहितर ओठांभोवती गडद रेषा येउन चित्राची मजा जाते.)





Innocence - सहज सुलभ भाव.



- सौरभ वैशंपायन.

Monday, April 21, 2008

आठवतयं का बघ चुकुन......

आठवतयं का बघ चुकुन......
कदाचित पटेल ओळख माझी, कदाचित माझा आवाज - माझा स्पर्ष नाहितर माझे अश्रु तरी ओळखिचे वाटतिल.
त्या एका वळणावर सोडुन गेलीस, आणि मी कोसळलो. आधाराचा हात तु झटकुन निघु गेलिस, एकदाहि मागे वळुन बघावसं वाटलं नाहि तुला?
चाचपडतोय अजुन आपल्या आठवणींचे विखुरलेले मणी, माझ्या भोवती कधीकाळी गुंफलेल्या तुझ्या मीठीतले मणी .... ती मीठी जी तू हिसडा मारुन तोडलिस.
मी सुद्धा ठरवलयं, नाहि मागे फिरुन बघायचं, नाहि उगाळत बसायचे ते क्षण, पण......पण मग कोणीतरी म्हणतं.... बघ कसा शांत-समजुतदार-शहाणा असल्यासारखा वागतो हल्ली, त्यांना काय माहित त्यांच्या या शांत समजुतदार मुलाला "वेडा कुठचा?" म्हणाणारं त्याला दुर लोटुन निघुन गेलयं.
आजहि मी रात्र-रात्र चांदण्यांना सोबत करत जागतो. आजहि जागताना तुझ्याच आठवणी असतात उशाला, कुशी फक्त बदलत राहतो. फरक इतकाच आहे, तेव्हा तु असायचीस, आज तु नाहियेस. पण म्हणुन चंद्र तुझी आठवण करुन द्यायला थोडिच विसरलाय? रोज न चुकता तुझ्या आठवणींच्या जंगलात मला नेतो. आणि अगदि अमावस्येला सुद्धा चंद्राशिवायचं आकाश तु गेल्यावर माझ्या आयुष्याचं जे झालं ते दाखवतो..........अंधार.

Friday, April 18, 2008

वाचु आनंदे!

वाचन, माझ्या सर्वात आवडिच्या छंदांपैकी एक. तसे म्हणाल तर ट्रेकिंग, पेन्सिल स्केचेस, लिखाण हे माझे सर्वात आवडते छंद आहेत, खालोखाल टपाल तिकीटे गोळा करणे, संगीत ऐकणे, फोटोग्राफि, नाणी-नोटा जमवणे हे आणि असे अनेक छंद मला आहेत.

एकेका छंदा बाबत थोडं थोडं लिहिन म्हणतोय.
तर वाचन माझा आवडता छंद! किती वाचले या पेक्षा काय वाचले हे जास्त महत्वाचं असतं असं मला वाटतं. मुळात आपल्याला वाचता येतं हि भावनाच किती छान आहे?? मराठी-हिंदि-इंग्रजी तर आहेच पण तोडकं-मोडंक गुजराती पण मला वाचता येतं. कदाचित तुम्हाला वाटेल, वाचता येतं! यात काय विशेष? तर मग जे निरक्षर आहेत त्यांचा विचार करा. आणि मग त्यांनी कधी पु.ल. वाचले नसतील, कधी सावरकर वाचले नसतील, कुसुमाग्रज, बोरकर, हरीवंशराय बच्चन, चर्चिल, बर्नाड शॉ, पी,जी. वुडहाऊस - हेहि वाचले नसतील. त्यांनी काय गमावलय हे आता समजलं? ज्यांना वाचनाचा ’तिटकारा’ आहे अशीहि काहि "साक्षर" म्हणवणारी माणसं मी बघितली आहेत. त्यांची किव करुन विषय सोडुन देणं हे मी शिकलोय आता.

वाचन-वाचन असं काय मोठं आहे त्यात? असहि कोणाला वाटेल तर तसहि नाहिये. "वाचणं" कठिण असतं. कारण ते नुसतं डोळ्यांपुरतं थांबत नसुन मेंदु-मन-हृदय आणि झालच तर रक्तापर्यंत जायला पाहिजे. उदाहरण द्यायचं झालच तर "वेडात मराठे वीर दौडले सात..." हे वाचताना असे रोमांच उभे राहतात अंगावर, तर याला रक्तात पोहोचणे असे म्हणतात. उत्तम लिहिणं जितकं कठिण असतं कदाचित त्याहुन उत्तम वाचणं कठिण असतं, कारण लिहिणार्‍याच्या भावना वाचणार्‍याला समजाव्यात यासाठी लिहिणार्‍याच्या लेखणी इतकचं वाचणारं मनं देखिल संवेदनशील असावं लागत. अर्थात वाचली जाणारी गोष्ट काय आहे त्यावर सगळं अवलंबुन आहे, कारण अर्थशास्त्राच्या पुस्तकात दिलेले पानभर आकडे, त्यांच्यातले बदल आणि बदलांची कारणं हे अगदी, "मला हे दत्तगुरु दिसले" या आनंदाने वाचणारी मंडळी या जगात आहेत. पण सगळ्यांनाच ते आवडेल असं नाहि ना?
म्हणजे व्यक्ती तितक्या प्रकृती तसेच व्यक्ती तितक्या वाचनाच्या आवडि असु शकतात.

मी काय वाचतो? हे इतरांना कळुन त्यांना काय फरक पडणार आहे ते मला माहित नाहि पण कदाचित माझ्या सारखाच चुकला फकिर मी जातो त्याच मशिदित आपला सजदा अदा करत असेल तर? म्हणजे माझ्या आवडि-निवडिचा किमान एक माणुस या जगात असावा अशी अपेक्षा धरुन जगताना "अरे? माझ्या बरोबर जर चुकल्या फकिरांचा जथ्थाच आहे!" हे समजलं. तर अजुन असे चुकलेले फकिर भेटावेत या आशेने हे सगळं लिहिणं.

तसं म्हणाल तर मला वाचनाचं व्यसन आहे. पण काय आहे दारुड्याला देखिल काहि ठराविकच ब्रॅंड आवडतात, तर मलाहि तसेच ठराविक वाचनाचे प्रकार आवडतात. सर्वात आवडता प्रकार - इतिहास. म्हणजे तो इतिहास कोणाचा आणि कसला आहे ह्याला तितकंस बंधन नाहिये, हं, अर्थात अगदिच दहाव्या शतकातिल शेती आणि पशुपालनाच्या इतिहास वगैरे नाहि, पण सर्व साधारणपणे "इतिहास" या गोष्टिच्या चौकडित नीट बसतिल अश्या गोष्टी मला आवडतात. खरं बघता प्रत्येक घडुन गेलेली गोष्ट हि इतिहासच असते. मग ते युद्ध असो, एखादा शोध असो किंवा थोड्यावेळापूर्वी तुम्ही केलेली एखादि गोष्ट असो. पण त्याचे परीणाम जेव्हा एका राष्ट्राला किंवा संपूर्ण मानव जातीला भोगावे लागतात त्याचे वर्णन इतिहास म्हणुन करणे जास्त योग्य ठरते. मात्र इतिहासात ब‍र्‍याचदा चरित्रे समविष्ट असतात.

ऐतिहासिक पुस्तकांबाबत म्हणाल तर तसे बरेच काहि वाचुन झालेय पण "अजुन-अजुन" किंवा "परत-परत" चा सोस काहि सुटत नाहि उलट वाढतच जातो. श्रीकृष्ण, चाणक्य, चंद्रगुप्त, छत्रपती शिवराय, बाजीप्रभु, मुरारबाजी, तानाजी, येसाजी, नेताजी पालकर, राणाप्रताप, छत्रपती संभाजीराजे, बाळाजी विश्वनाथ, बाजीराव, चिमाजी अप्पा, सदाशिवराव भाऊ, राघोबादादा, माधवराव, सवाई माधवराव, नाना फडणविस, महदजी शिंदे, औरंगजेब, शहाजीराजे, अकबर, विवेकानंद, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, भगतसिंग, मदनलाल धिंग्रा, अंनंत कान्हेरे, विनायक देशपांडे, सुखदेव, राजगुरु, नेताजी, गांधीजी, नेहरु, जीना, सरदार पटेल, माऊंटबॅटन, लिनलिथगो, हो-ची-मिन्ह, फिडेल कॅस्ट्रो, चे, हिटलर, मुसोलिनी, चर्चिल, रुझवेल्ट, स्टॅलिन, दलॅंदिआ, द गॉल, मोल्टोवो, मार्शल झुकोव्ह, गोबेल्स, रोमेल, चेंबर्लेन, जनरल पोलस, रीबेन्ट्रॉप, रुड्स्टेंड, हिंडेन्बुर्ग, गोअरींग, लुडेन्डॉर्फ, फ्रॅन्को, जनरल कावाबे, जनरल मुगुताची, माओ,चॅंग-कै-शेक, चंगेजखान, बाबर, सातवाहन, नेपोलिअन, सिकंदर, मॅझिनी, गॅरीबाल्डी, मोशे दायान, गोल्डा मायर, नासर, गडाफि, इदि-आमेन, डेव्हिड बेनगुरियान, सादात, यासर अराफात, होस्नी मुबारक, एरीय शेरॉन, वाईझमन, मि. बाल्फोर, या आणि अश्या अजुन शेकडो जणांचा मी देणेकरी आहे. यात काहि औरंगजेब, चंगेजखान, गडाफि, स्टॅलिन अश्या राक्षसतुल्य माणसांची नावे आहेत मला माहित आहे. पण तरी इतिहासप्रेमी म्हणुन यांचा मी देणेकरी निश्चित आहे. या व्यक्तीं बरोबरच अर्थात भारत, पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान, चीन, रशिया, जपान, कोरीया, म्यानमार, व्हिएतनाम, श्रीलंका, नेपाळ, इराण, इराक, लेबनॉन, इस्त्राएल, गाझा, इजिप्त, ऑस्ट्रिया, झेकोस्लोवाकिया(आता झेक आणि स्लोवाकिया), इंग्लंड, जर्मनी, फ्रांस, स्पेन, पोर्तुगाल, इटली, अमेरीका, क्युबा, नेदरलॅंड, फिनलॅंड, पोलंड, या देशांचाहि त्या बाबतीत मी अतिशय ऋणी आहे.

शिवराय-संभाजीराजे-राम-कृष्ण-विवेकानंद या कथा अगदि आजीच्या मांडिवर बसुन वाचल्या-ऐकल्या आहेत. पण वाचनाची आवड म्हणा किंवा चांगलं-वाईट कळण्याची "अक्कल" आल्यानंतरचं वाचणं असेल कदाचित पण या इतिहास प्रेमाला सर्वात पहिला हातभार लागला तो गोविलकरांचा, विशेषत: भगतसिंग व मदनलाल धिंग्रा यांच्या वरची त्यांची पुस्तके छानच आहेत. मग "जाणता" म्हणण्या सारखा झालो तेव्हा वीर सावरकर आणि वि.ग. कानिटकर या दोघांनी तर माझ्या वर "वत्सा तुजप्रत कल्याण असो!" असे म्हणत अनेक उत्तमोत्तम पुस्तकांची लुट केली. सावरकरांच्या सहा सोनेरी पाने, १८५७ चे स्वातंत्र्यसमर, काळेपाणी, हिंदुपदपातशाही बरोबरच वि.ग. कानिटकरांच्या नाझी भस्मासुराचा उदयास्त, इस्त्राएल:युध्द युध्द आणि युध्दच, माओ:क्रांतीचे चित्र आणि चरीत्र, धर्म:गांधींचा आणि सावरकरांचा, या पुस्तकांची अक्षरश: पारायणे झाली आहेत. आणि प्रत्येक वेळी पुस्तक वाचुन झालं कि, "अरे? हे मागच्यावेळी लक्षातच आलं नव्हतं कि" असंच वाटतं. या पुस्तकां बरोबरच बाबासाहेब पुरंदरे यांच्या "राजा शिवछत्रपतीची" किमान १०-१२ पारायणे केली आहेत. किती जणांची नावे सांगु? किती पुस्तकांची नावे सांगु?
त्यांच्या बद्दल लिहित बसलो तर बहुदा हा सगळा ब्लॉगच भरुन जाईल. तरी इतिहास वाचायचा असेल तर वरील ३ नावां बरोबर इतिहासाचार्य वि.का. राजवाडे, वि.स.वाळिंबे, अरुण साधु, सच्चिदानंद शेवडे, विश्वास दांडेकर, डॉ. म.अ.मेहेंदळे, पु.ग.सहस्त्रबुध्दे, रविंद्र गोडबोले, विन्स्टन चर्चिल, विल्यम शिरर, हिटलर, विश्वास पाटिल, पु. ना. ओक, शेजवलकर, आनंद हर्डिकर, सदानंद मोरे, य.दि.फडके, नरहर कुरुंदकर, सेतुमाधवराव पगडि, जदुनाथ सरकार, प्रतिभा रानडे, शेषराव मोरे, गो.नी.दांडेकर, भा. द. खेर हि काहि प्रमुख लेखकांची नावे मला चटकन आठवतात. विन्स्टन चर्चिल यांची Greate War speeches, My life, World Crisis, हि अगदि डौलदार शैलीतील पुस्तके आहेत. "वक्ता" म्हणजे काय ते हिटलर, चर्चिल, सावरकर यांच्याकडे बघुन समजते. आनी त्याची छाप त्यांच्या लिखाणावर सहज दिसते.

बाकि कोणा बाबत काहि सांगत नाहि मात्र वि.ग.कानिटकरांबाबत एक गोष्ट सांगाविशी वाटते, त्यांच्या लिहिण्याची शैली मला खुप आवडते. म्हणजे एखाद्या महत्वाच्या घटनेपासुन ते सुरुवात करतात आणि मग अलगद त्या घटनेच्या मुळ कारणापासुन सुरुवात करतात. २ उदाहरणे देतो - माओ:क्रांतीचे चित्र आणि चरीत्र या पुस्तकाची सुरुवात ते अशी करतात - "शहराच्या वेशीबाहेर धुपाच्या धुरात आणि छाती पिटणार्‍या भिख्खुंच्या घोळक्यात एक प्रेतयात्रा स्मशानाकडे जात होती. ती राजाची प्रेतयात्रा होती, आणि त्या प्रेता बरोबरच अख्खि राजवटच मसणवटीकडे निघाली होती." आणि इथुन मग ते तो राजा कोण होता? राजवट कोणाची होती, ती सत्तेवर कशी आली? मग त्यावेळी चीनचे सामाजिक जिवन कसे होते हे सांगत अलगद आपल्याला ४ हजार वर्ष मागे नेतात. दुसरे उदाहरण - नाझी भस्मासुराचा उदयास्त या पुस्तकातुन - "२६ फेब्रुवारी १९२४ रोजी म्युनिच येथे, बव्हेरीयातील सत्ता उलटुन लावण्याचा कट केल्या बद्दल ३ जणांवर खटला भरला होता. न्यायालयाच्या कामाला सुरुवात होताच हिटलरले सांगितले - झालेल्या घटनेची संपूर्ण जबाबदारी माझ्या एकट्याची आहे, पण १९१८ साली ज्यांनी देशाशी हरामखोरी केली त्यांच्या विरुध्द उठावणी करणे देशद्रोह कसा असु शकेल?" अशी सुरुवात करुन तो उठाव कसा झाला हे सांगतात, हिटलरला काय शिक्षा झाली तेहि सांगतात आणि मग हा हिटलर होता तरी कोण? पहिल्या महायुद्धाच्या राखेतुन बलशाली जर्मनी त्याने कसा उभा केला हे जाणुन घेणे महत्वाचे आहे असे म्हणतत आणि इथुन सुरु होते हिटलरच्या जन्मापासुनची कहाणी ते थेट जपानवर अणुबॉंब पडेपर्यंत.


दुसरा आवडता प्रकार आहे विज्ञानकथा अथवा शोधांच्या कथा वा वैज्ञानिकांच्या कथा. यात शोध, शोधाची गरज, शोधाचा दिवस, त्याचे परिणाम या सगळ्या बरोबर शोध लावणार्‍यांचे चरित्र देखिल उलगडत असते. अश्या कथा लिहिणार्‍यां मध्ये पहिलेच पुस्तक हातात आले ते - ’प्रेषित’ - डॉ. जयंत नारळीकर, मग त्यांचीच ’आकाशाशी जडले नाते’ आणि ’वामन परत न’ आला हि पुस्तकेहि वाचनात आली. पाठोपाठ निरंजन घाटें बरोबर मैत्री झाली लहान मुलांना अगदि झाडांच्या पानाचा रंग हिरवा का असतो इथ पासुन ते अगदि अणुबॉंबपर्यंत सहज सोप्प्या शब्दात हा माणुस काहिहि समजावु शकतो. आणि इतकेच नाहि यांचेच "शस्त्रागार" पुस्तक वाचले आणि मी रणगाडे व विमानांचा तुफान चाहता बनलो. मी चुकत नसेन तर बाळ फोंडके हे लेखक सुद्धा विज्ञानाशी संबधित गोष्टिंवर खुप काहि लिहितात. त्यांचे लिखाणहि खुप अप्रतिम असते. यांच्या पाठोपाठ हातात आले "एक होता कार्व्हर" वीणा गवाणकरांनी लिहिलेले A1 पुस्तक. आणि मग एक जादुचा दिवा हाताला लागला - श्री मोहन आपटे. त्यांचे "अग्निनृत्य" हे पुस्तक मी किमान ३ वेळा वाचलेय. अणुबॉंब कसा बनला याची साद्यांत माहिती त्यांनी दिलीये. म्हणजे सर रदरफोर्ड यांनी अणु दिशा बदलतो, आणि केंद्रकात देखिल कसा फरक पाडतो हे सिध्द केल्यापासुन सुरुवात करुन आईनस्टाईन यांच्या E=mc(square) सुत्राने काय भुकंप घडवले तिथपर्यंत आणि जर्मनीच्या "ग्योटेन्गेज" विद्यापिठा पासुन ते जपानवर अणुबॉंब पडेपर्यंत व्हाया "मिशन लॉस-अलमॉस आणि मिशन अलसॉस" त्यांनी सगळं सविस्तर उलगडलय. किमान २२५ पानांच पुस्तक आहे. मराठीत तरि इतकि सुंदर-सहज-ओघवति भाषा घेउन अणुबॉंब बद्दल माहिती देणार पुस्तक माझ्या तरी वाचनात नाहि. पण बॅड न्युज अशी आहे कि सध्या ते आउट ऑफ प्रिंट असल्याने बाजारात ते मिळत नाहिये. सुदैवाने मला सरांचे "अणुबॉंबची कथा" हे लेक्चर ऐकायला मिळाले, स्वत: आपटे सर बोलायला उभे राहिले कि वा!वा!! काय सांगाव? आपण किती "दगड" आहोत हे समजतं. तो माणुस जगातल्या कुठल्याहि विषयावर बोलु शकतो हे आता मला त्यांच्या ८-१० लेक्चर्स मधुन समजलय. शिवाय सरांचे "आक्रमिले नभ" हे विमानांच्या शोधा विषयी असलेलं अप्रतिम पुस्तक देखिल वाचलयं. आपटे सरांचीच "मला उत्तर हवय!" अश्या नावाची पुस्तकांची एक मालिकाच आहे लहान मुलांसाठी. आवर्जुन वाचावित, वाचायला द्यावित अशी हि पुस्तके आहेत.


आता सुरु होतो तो कादंबर्‍यांचा प्रदेश. इथेहि बर्‍याच कादंबर्‍या आणि कादंबरीकारांची नावे सांगता येतील. कादंबर्‍यांमधे स्वामी, श्रीमान योगी, राधेय या रणजित देसाईंच्या, आणि मृत्यंजय, युगंधर व छावा या शिवाजी सावंतांच्या कादंबर्‍या खुपच सुंदर आहेत. विश्वास पाटिलांची देखिल संभाजी छान जमुन आलिये. त्यांचीच नेताजींवरील महानायक उत्तम आहे. म्हणजे महानायकची जवळपास ६-७ भाषेत भाषांतरे झाली आहेत. पानिपतहि चांगली आहे. रविंद्र गुर्जरांच्या अनुवादित कादंबर्‍या वाचनिय असतात, सर्वात चांगले उदाहरण - सत्तर दिवस आणि पॅपिलॉन, पण पॅपिलॉनचा दुसरा भाग बॅंको मात्र मला नाहि आवडला. या शिवाय सेकंड लेडि, एअरपोर्ट ७७ या देखिल त्यांच्या उल्लेखनिय अनुवादित कादंबर्‍या आहेत. विजय देवधरांच्या कादंबर्‍या देखिल बर्‍याचदा अनुवादित असतात. त्यांची सर्वात जबरदस्त कादंबरी म्हणजे - डेझर्टर. जगण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती काय असते हे सत्तर दिवस आणि डेझर्टर या दोन्हि कादंबर्‍या दाखवतात. प्रत्येकाने किमान एक वेळ वाचाव्या इतक्या सुंदर कादंबर्‍या आहेत या. गोनिदांच्या कादंबर्‍या खुप हळुवार असतात. ’कुणा एकाची भ्रमणगाथा’ उगीच चुटपुट लावुन जाते. त्यांच्या दास डोंगरी राहतो, मृण्मयी, मोगरा फुलला या जराश्या अध्यात्मिकतेकडे झुकणार्‍या कादंबर्‍या आहेत, कदाचित काहिंना त्या कंटाळवाण्या वाटतिलहि. तर गोनिदांच्या ’कादंबरीमय शिवकाल’ मध्ये ५ कादंबर्‍याचा संच केलाय. आणि या पाचहि कादंबर्‍या क्रमश: आहेत. म्हणजे पहिल्या कादंबरीचा संदर्भ पाचव्या कादंबरीच्या शेवटच्या ओळीतहि आहे. आता पाच कादंबर्‍या काय आणि कश्या आहेत हे मी कसे सांगणार? पण वाचुन बघाच. इतर म्हणाल तर सच्चिदानंद शेवड्यांच्या पुनरुथ्थान आणि रक्तलांछन, मारीयो पुझोची गॉड-फादर, पेंढारकरांची "रारंगढांग" तर जब्ब्ब्ब्बदस्त आहे. ना.सं.इनामदारांच्या कादंबर्‍या या ऐतिहासिक पात्रांच्या असतात औरंगजेबा वरची शहेनशहा, पळपुट्या बाजीरावावरची मंत्रावेगळा, थोरल्या बाजीरावांवरिल राऊ या चांगल्या कादंबर्‍या आहेत. सध्या अजय झणकर(बहुदा हेच नाव आहे)यांची द्रोहपर्व, हि कादंबरी गाजतेय, ती वाचायची बाकि आहे. अपर्णा वेलणकर यांनी डेबोरा एलिस यांच्या ब्रेडविनर,परवाना, परवानाज जर्नी, मड सिटी या छोट्या कादंबर्‍यांची मराठित सुंदर भाषांतरे केली आहेत. ह्या कादंबर्‍या अफगाणिस्थानच्या सद्य परीस्थितीवर आहेत, विषेशत: तिथल्या स्त्रीया आणि मुलिंचे काय हाल होतात हे त्यात दाखवले आहे. नॉट विदाऊट माय डॉटर हि देखिल त्याच वळणाची अशीच खिळवुन ठेवणारी कादंबरी. Paulo Coelhoच्या The Alchemist, Veronika decides to die या कादंबर्‍या वाचाव्याच वाचाव्या. व्यंकटेश माडगुळकरांची बनगरवडि देखिल झकास. अरे हो! शिरीष देशपांडे यांची राजा शिवाजी सध्या दुसर्‍यांदा वाचायला घेतली आहे. मनन करण्याजोगी कादंबरी आहे. जाता-जाता अजुन एक - चार्ली चॅप्लिन वरची हसरे दु:ख. चरचरीत चटका लावुन जाणारी कादंबरी आहे. आधीच आवडिचा असलेला चार्ली मग अजुनच आपला वाटायला लागतो, मग पु.लं.ना जसं नंदा प्रधानच्या डोक्यावरुन उगीच प्रेमाने हात फिरवावा असे वाटले, तसेच काहिसे आपल्याला चार्ली बाबत वाटते. तश्या शेकडो कथा-कादंबर्‍या वाचायच्या बाकि आहेत. बघु किती वाचुन होतात ते.

निसर्गाशी नाळ जोडणार्‍या कथा-लेख मला मनापासुन आवडतात. अर्थात त्यात व्यंकटेश माडगुळकर आणि मारुती चित्तमपल्ली यांच्या बरोबर Jim Corbett हा कथालेखकहि आपल्याला त्यांच्या बरोबर तिथे जंगलात घेऊन जातो leopard of Rudraprayag, आणि कुमाउंचे नरभक्षक हि उल्लेखनिय पुस्तके आहेत. व्यंकटेश माडगुळकरांच्या जंगलातील दिवस, वाघाच्या मागावर आणि सत्तांतर या छान कथा आहेत. सत्तांतर हि जंगलातील माकडांच्या टोळ्यांवर उभी केलेली कथा आहे. त्या माकडांना काल्पनिक नावे आहेत. जंगलातील माकडांच्या टोळ्या कश्या वाढतात? त्यांच्यावर टोळिचा नायक कसा नियंत्रण ठेवतो? टोळिचा नायक कसा बदलतो? जर टोळित नर पिल्लु असेल तर त्याला आपला जीव का गमवावा लागतो? किंवा टोळितुन हाकलवलेली तरुण वानरे दुसर्‍या टोळ्यांना कसा त्रास देतात? या सगळ्यावर अतिशय ओघवत्या शिलित त्यांनी सगळं लिहिलय. उदाहरणा दाखल - "चार वर्षांमागं मुडानं, मोगा ज्या वानरांच्या टोळितला, त्या टोळीवर हल्ला केला होता. वयानं उताराला लागलेल्या प्रमुख नराशी हाणामारी करुन त्याचा डावा खांदा फाडला होता. पराभव पत्करुन आपला जनाना, लहान पोरंबाळं सोडुन तो पळुन गेला होता. तो पळताच मुडानं मोगासकट ती पाचहि नरं पोरं हाकलवुन लावली होती. आज पाचहि पोरं वयात आली होती, कधीकाळी दुसर्‍याने बळकावलेली आपली वडिलोपार्जित सत्ता घेण्यासाठी मोगा संधी बघत होता. त्यांना माद्या हव्या होत्या, फळझाडं हवी होती, टोळीवर सत्ता हवी होती. काळाप्रमाणे संघर्षहि सतत वाहतच असतो. त्याला खंड असा नसतोच, असली तर भरतीच असते, पूर असतो. जेव्हा जेव्हा खाणारी तोंड भरमसाठ वाढतात, गर्दि होते तेव्हा तेव्हा संघर्ष बळावतो, ज्यांना बोलता येतं ते हा राग, उद्दामपणा, संघर्ष शब्दांतुन दाखवतात. ज्यांना बोलता येत नाहि, त्यांचे राग-लोभ प्रेम हावभावांतून, स्पर्षातूनच सांगितले जातात. संघर्ष पेटला, कि शस्त्रास्त्र वापरली जातात ज्यांना शस्त्रात्र माहितच नसतात ते सुळे, नखं वापरतात." एका बैठकित वाचुन व्हावी अशी हि धावती कथा आहे.
मारुती चित्तमपल्लींची - पक्षी जाय दिगंतरा, जंगलाचं देणं,रानवाटा, जंगलाची दुनिया, पक्षीकोश, केशराचा पाऊस हि चांगली पुस्तके आहेत.



इतर पुस्तकं म्हणाल तर पु.ल.,व.पु., व्यंकटेश माडगुळकर, इरावति कर्वे, यांच्या शिवाय हा लेखा पूर्णच होऊ शकत नाहि. आणि यांच्या बाबत म्या पामराने काय सांगावे? यांच्या बरोबरच सुहास शिरवळकर, श्री सिकंदर, मीना प्रभू, शिरीष कणेकर, अच्युत गोडबोले, श्रीकांत सिनकर, डॉ. आनंद नाडकर्णी, अनिल अवचट, आशा बगे, महेश एलकुंचवार. हि नावं महत्वाची आहे. तसं बघता "एलकुंचवार" या आडनावाची व्यक्ती(खरंच किती "आड" गेलेलं नाव आहे)या जगात असेल असे कधी वाटले नव्हते. तसे वाटण्याचं काहि कारणहि नव्हतं. पण माधवी पुरंदरे यांनी ’वाचु आनंदे’ हे २ भागांचे पुस्तक संपादित केले आहे, त्यात महेश एलकुंचवार यांचा वाड्याविषयी एक छोटा उतारा घेतला होता. मला खुप आवडला होता तो. त्यांचा बालपणीचा वाडा अगदि डोळ्यासमोर उभा केला होता त्यांनी. सुहास शिरवळकर यांची ’दुनियादारी’ हि कादंबरी एकदा वाचण्यासारखि आहे, या पुस्तकात शिरवळकरांची भाषा शिवराळ आहे. पण ती कादंबरीच कॉलेज-कट्ट्याची आहे. त्यामुळे पहिल्या २ प्रकरणांनंतर त्या भाषेची सवय होऊन जाते. गुढ किंवा भयकथा म्हणाव्या अशी पुस्तके मी फारच कमी वाचली आहेत फारशी आवडत नाहित मला, तरीहि नारायण धारप आणि रत्नाकर मतकरी चांगले लेखक आहेत गुढकथांचे. मतकरींची ’कोहम’ मला जास्त आवडली. थोडी अध्यात्मिक पुस्तके पाहिजे असतील तर विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर, व डॉ. वर्तकांची पुस्तके चांगली आहेत, समर्थ संप्रदायाचे सुनिलदादा चिंचोलकर देखिल छान लिहितात, वामनराव पै किंवा आठवले गुरुजींचं लिखाणहि उत्तम आहे. ओशो सगळ्यांनाच पचेल-रुचेल असा नाहिये कारण ’संभोगातुन समाधीकडे’ म्हंटल्यावर बर्च जण त्या पुस्तकाला हात लावत नाहित, मात्र त्या पुस्तका सकट किमान एकदा वाचावित अशी बरीच पुस्तके त्यांनी लिहिली आहेत, त्यातुन आपण काय घ्यावं हा आपला प्रश्न आहे. असो, ’साद देती हिमशिखरे’ नावाचे चांगले पुस्तक मध्ये वाचनात आले होते पण लेखकाचे नावच लक्षात येत नाहिये. शिवाय माझ्या मित्राने ’Left side of god' म्हणजेच कालीमाता म्हणजेच तांत्रिक विधीवरचे एक पुस्तक सुचवले आहे, बघु कधी वाचता येईल ते? साहस कथांमध्ये परत विजय देवधरांनी अनुवादित केलेल्या कथा चांगल्या असतात. त्यांच झुंज मृत्युशी नावचं एक पुस्तक अनेक वर्षांपूर्वी वाचलं होत, त्यातली - खंडणी करीता ३ दिवस जमिनीखाली एका शवपेटीत जिवंत डांबलेल्या मुलाची कथा मला अजुन आठवतेय. शिवाय कोणा एका लेखकाची ’आणखी एक पलायन’ फारच थरारक सत्यकथा आहे. K.G.B. चे अंतरंग देखिल चक्रावुन टाकणारी कथांची मालिका आहे.


बाकि म्हणाल तर इतर छोट्या-मोठ्या कथा वाचत असतोच अधुन मधुन. कवितांच म्हणाल तर वीर सावरकर, कुसुमाग्रज, बोरकर, पाडगावकर, बालकवी, गदिमा, वसंत बापट, भाऊसाहेब पाटणकर, सुरेश भट, शांता शेळके, बहिणाबाई, हरीवंशराय बच्चन, सौमित्र, संदिप खरे, ह्या कवींनी जगणं आनंदि केलय माझं. आणि संदिप खरे तर आजकाल चिकन-गुनिया सारखा भराभर पसरत चाललाय. बाकि वि. दा. सावरकर, गदिमा, कुसुमग्रज, वसंत बापट, शांता शेळके या सिध्दहस्त कवीं-कवियत्रींबद्दल काय वर्णावे? समर्थांनी सांगितलेली कवीत्वाची लक्षणे यांच्यात पुरेपुर आहेत. अजुन काय आणि किती लिहावे?


तर असा आहे माझा वाचन-प्रपंच.
समर्थांनी म्हंटले आहे - दिसामाजी काहितरी ते लिहावे, प्रसंगी अखंडित वाचत जावे॥
आता समर्थांनी सांगितले ते शिरसावंद्य मानलेच पाहिजे ना?


- सौरभ वैशंपायन.

Thursday, April 17, 2008

जाने तू.........

तसं याला काय नाव द्यावं ते सुचत नव्हतं. हि २ जणांची पत्र आहेत. दुसरं पत्र उत्तर म्हणुन लिहिलय. काय आहे ते वाचुनच बघा आवडतं का ते!

-------------------------------------------------------------
-------------------------------------------------------------

१.

Hi Dear!!!!!!

कशी आहेस? काय चालु आहे सध्या? अभ्यास कसा चालंलाय? नीट अभ्यास कर! सहा महिन्यांनी M.B.A. ची परीक्षा असेल ना? आणि मग जॉब पण चांगला मिळायला हवा! बाकी काय चाललय नविन? मुंबईला कधी येते आहेस? कळव मग फोन करुन.

Actually, सुरुवात काय करावी हे कळत नव्हंत म्हणुन ही वरची सगळी प्रस्तावना. असं हे पत्र मधेच आणि ’विनाकारण’ लिहायला २ कारणं आहेत. म्हंटलं फोन पेक्षा पत्र लिहिण एकदम मजेदार होईल. शिवाय या दोन-तीन दिवसात कॉलेजची बरीच आठवण येते आहे.

आज संध्याकाळी ऑफिस मधुन परत आलो आणि सोसायटीचे मेन-गेट उघडणार तोच पारीजाताचा सुगंध आला. पहिल्यांदा तुझीच आठवण आली. आठवतं? तुला फुलं आवडतात म्हणुन एके दिवशी तुझ्या ओंजळीत भरपुर पारीजाताची फुलं ठेवली होती. केव्हढी खुश झाली होतीस तु? खांदे उडवुन चार-चारदा मला Thanx म्हणत होतीस. त्यानंतर बराचवेळ आपण कट्ट्यावर बसुन होतो, तेव्हाही फुले ओंजळीत घेऊन बसली होतीस. म्हंटल "अगं टाक पिशवीत!" तर म्हणलीस "नको! कोमेजुन जातील!"

किती मजा केली ना आपण कॉलेज मध्ये? कॉलेजची शेवटची २ वर्षे तर आपल्या ग्रुपने मनापासुन एन्जॉय केली. कॉलेज इव्हेंटमध्ये आपल्या ग्रुपनेच खरी ’जान’ आणली होती. कॉलेजमध्ये मी सगळे उद्योग केले फक्त आपल्याला Dance काहि जमला नाहि. कॉलेज इव्हेंटच्या शेवटच्या दिवशी सगळं कॉलेज नाचत होतं. आपला ग्रुप अर्थात स्टेज वर जाउन धमाल करत होता. तु सुध्दा तीन-तीनदा मला ’अरे ये!’ म्हणुन बोलावलसही, पण साले आपले पायच उचलत नाहित ना. गणपती विसर्जनाच्या दिवशी चौपाटीकडच्या रस्त्यावर आम्ही ’जे काहि’ करतो त्यालाच आम्ही नाच म्हणतो. आता तसा नाच इथे कसा करणार?

आणि हो! कॉलेज मध्ये मारामारी सुध्दा केली. त्या माकडाने तुला मुद्दामहुन धक्का मारला होता म्हणुन कसा वाजवला होता त्याला त्यावेळी? पण तू उगाच मधे पडलीस, नाहितर त्याच्या गुढघ्याच्या वाट्या त्याला भीक मागण्यासाठी काढुन देणार होतो.
मात्र त्या नंतर अर्ध्या तासात सगळं कॉलेज आपलं "काहितरी" आहे असं कुजबुजत होतं. सगळ्यांना तेव्हा सांगुन थकलो कि बाबांनो खरंच तसं काहि नाहिये! काय लोकं असतात? मैत्रीचं नात त्यांना पटतच नाहि.

अरे हो! आता मोठ्ठ्ठ्ठ्ठ्ठा किस्सा! खंरतर पत्र लिहायचं दुसरं कारण. - कालच दुपारी चहा पिण्यासाठी आईने हाक मारली. मला चहा देऊन शेजारच्या खुर्चीवर भाजी निवडत होती. मधेच आईने तुझ्या बद्दल विचारलं -

आई:काय करते रे ती सध्या?
मी:M.B.A.
आई:आहे कुठे मग सध्या ती?
मी:पुण्याला सिंबॉयसिस मध्ये.
आई:अच्छा तरीच म्हंटलं बरेच दिवस आली नाहि!(मला चहाचा चटका लागला यावेळी) उंची किती आहे रे तीची? काहि अंदाज?(मला हसु फुटलं)
मी:आई! अगं असं पुस्तकाचं मधलं पान सुटल्या सारखे का प्रश्न विचारते आहेस? तिच्या घरी न येण्याचा आणि तिच्या उंचीचा काय संबध?
आई:वेड पांघरुन पेड गावला जाऊ नकोस! तुला चांगलच कळतय मी का विचारते आहे ते!(मला उगीच ’अपघाती वळण’ अशी पाटी दिसली, आणि मी परत मान हलवुन हसलो! तर आई उखडलीच!). दात काढायला काय झालं? काहि चुकलं का माझं ते सांग!
मी:अगं आई! मी अजुन २५चाच आहे, काय घाई आहे? बघु २-३ वर्षांनी. आणि तिच्याबाबत म्हणशील तर आमचं तस काहि नाहिये!
(पण त्या भाजीच्या देठा बरोबरच, तीने माझे मुद्दे सुध्दा खुडुन काढले)
आई:अरे मग काय म्हातारा झालास कि मग लग्न करणार आहेस का? अश्शी निघुन जातील २ वर्षं. तुला चांगली ३०-३५ हजाराची नोकरी आहे. सगळं व्यवस्थित आहे. आणि हो! ती सुद्धा तुझ्याच वयाची ना? फार-फार तर चार-सहा महिने इकडे तिकडे. तिचे आई-वडिल तिच्यासाठी मुलगा बघायला देखिल लागले असतील! अरे २५ म्हंटजे मुलीसाठी खुपच झालं!
(मी विषय बदलायचा म्हणुन घड्याळाकडे बघुन म्हणालो -)
मी:अगं ती सिरीयल नाहि बघायची का तुला?
आई:विषय बदलु नकोस! मला उत्तर दे!
(मला कळ्लं, आई दुपारची सिरीअल चुकवतेय म्हणजे ती जरा जास्तच सिरीअस आहे!)
मी: आ‍ऽऽऽऽऽई! अगं का माझ्या आणि तिच्या मागे लागली आहेस?
आई: आई काय आई? मुलगी चांगली आहे! सुंदर आहे! चांगले संस्कार आहेत, शिवाय म्हणशील तर आपल्याच जातीतील आहे. सांग ना काय वाईट आहे?(तीने तुला इव्हेंटमध्ये नाचताना बघितलं नव्हतं म्हणुन हे सगळं म्हणत होती!! ही!ही!just kidding!)
मी:मातामाय(आई अशी चिवित्र वागायला लागली की कि मी "मातामाय! ल्येकराचं काय बी चुकलं-माकलं असेल तर पोटात घे! येत्या आवसेला गावच्या वेशीवर कोंबड उतरविन!!!!" या चालित सुरवात करतो)अगं खरच आमचं तस काहि नाहिये! काहितरी डोक्यात घेऊ नकोस!
आई:हं! मला नको सांगुस! आई आहे मी तुझी! अरे मांजराने डोळे मिटुन दुध प्यायलं तरी बाकीचे बघत असतात(मी त्या चहात बुडवलेल्या बिस्कीटा सारखा मऊ झालो होतो!)
मी:तुला कशा वरुन वाटंल असं? तु कितीवेळा भेटली आहेस तिला? ८वेऽऽळा १० वेळा? आणि माझ्या वाढदिवसानंतर कुठे आलिये ती? त्यालाहि ६-७ महिने झाले!तेव्हा सुट्टित आली होती ती!)
(पण ऐकेल ती आई कसली?)
आई:हांऽऽऽ!!! तेव्हांचच म्हणतेय मी! ती स्वत:हुन आत येउन मला मदत करत होती. आज काय मेनु? कसा करायचा? तुला अजुन काय काय आवडंत? सगळं विचारत होती!! बाकीच्या तिघी, बाहेर बसल्या होत्या नुसत्या खिदळत नी दात काढत!
(तिला सांगुन काहिच फायदा नव्हता, चटकन चहा संपवला आणि उठलो, तर म्हणाली - )
आई:अरे, तुमचं लग्न झालं, तुम्हाला मुलं-बाळं झाली की आम्ही सुटलो!!!(आईने आता "Body-line" बॉलिंग करायला सुरुवात केली होती!) नाहितरी आम्हा म्हातारा-म्हातारीला दुसरा काय उद्योग आहे?
मी:म्हंटजे?? तुम्हाला काहितरी काम मिळावं म्हणुन आम्ही लग्न करायचं?? या हिशोबाने तर भारतातील बेकारी केव्हाच संपायला हवी होती!!(आणि परत मोठ्ठ्ठ्याने हसलो)
आई:हं! कराऽऽ!थट्टा करा! पण सांगुन ठेवत्येय, पुढल्या वर्षभरात तुझं लग्न झालचं पाहिजे! तिच्याशी झालं तर आनंदच आहे! नहितर दुसरी बघु!!(मी चटकन t-Shirt बदलुन घरा बाहेर निघालो.

तसा रात्री जेवायलाच उगवलो. आत पाणी पिण्यासाठी गेलो, तर मला बघुन आईने जोरात भांडे आपटले. त्या दिवशी अनेक भांड्यांवर बरेच ’कोचे’ आले होते. हॉल मध्ये आलो तर बाबांनी विचारलं - "काय रे? काय झालयं? दुपारपासुन असेच आवाज येत आहेत, आणि आज T.V. चक्क बंद आहे!" मी म्हणलो "माहित नाहि बुआ! भाजीवाल्याशी हुज्जत घालुन आली असेल!!" बाबांनाहि ते खरं वाटलं असावं त्यांनी परत पेपर मध्य तोंड खुपसलं.
रात्री जेवताना सुद्धा पोळी, भाजी, भात, आमटी, लोणचं या शब्दांमागचे प्रश्नचिन्ह कोणते आणि उद्गारचिन्ह कोणते हे ओळखुन हो-नाहि म्हणावे लागत होते. शक्यतो नाहिच म्हणत होतो, नाहितर म्हणायची - "तू जेवताना लग्नाला हो म्हणलास!" म्हणुन.

कश्श्या असतात ना या "आया". मुला-मुलीत फक्त मैत्री होऊ शकते यावर विश्वासच नसतो यांचा. असो, पुढले ७-८ दिवस तरी जेवताना ’नाहि’ म्हणणेच योग्य राहिल असं दिसतय. या आयांचं काहि खरं नाहि.
हे सगळं मी तुला मोकळेपणाने सांगु शकतो कारण तु हे समजुन घेऊ शकतेस. आणि तसं तुलाहि हे नविन नाहि.

बर, तर हे सोडुन बाकी सगळं उत्तम. सध्या ’गधा-मझदुरी’ करतोय. ऑफिसमध्येच रात्री ११:०० वाजतात. गेल्या २ आठवड्यात आज पहिल्यांदा ९-९:१५ ला घरी आलोय(आणि तेहि चक्क सोमवारी). म्हंटलं झोपण्या आधी पत्र लिहुया - फोन पेक्षा जास्त चांगलं!

असो, तु इथे कधी येते आहेस? पुढच्या महिन्यात वाढदिवस आहे तुझा, तेव्हा जमणार आहे का? आणि हो तब्येतीची काळजी घे. उगीच अबर-चबर खाउ नकोस, आणि आपल्याला जागरणं झेपत नाहित हे जग जाहिर आहे, so please जागरण करुन अभ्यास करु नका.


तुझा,
बुद्धुराम उर्फ जोकर.



ता.क. - आईचं बोलणं मनावर घेऊ नकोस. वागते ती अशी कधी कधी!



-------------------------------------------------------------
-------------------------------------------------------------



Hiiiiiiii!!!!!!

खुप बरं वाटलं तुझ पत्र बघुन. बरं झालं पत्र लिहिलस ते. इथे सगळंच इंग्लिशमध्ये वाचांव लागतं-बोलावं लागतं. जाम कंटाळा आलाय! खुप दिवसांनी असं मराठी वाचतेय, त्यातहि तुझं पत्र मिळालं म्हणुन बरं वाटलं.

माझा अभ्यास चालु आहे. सध्या प्रोजेक्ट चालु आहे. त्या गडबडितुन वेळ काढुन तुला उत्तर पाठवते आहे.
खरचं कित्ती धमाल केली आपण कॉलेज मध्ये? ग्रॅजुएट होऊन बाहेर पडलो तर कोणालाच माहित नव्हतं कोण कुठे जाणार? काय करणार? आता प्रत्येक जण कुठेतरी जॉब करतोय किंवा शिकतोय. तुला चांगली नोकरी लागली, मी M.B.A. करतेय. सगळे कसे पांगलो ना आठहि दिशांना? तरी एकमेकांच्या contact मध्ये असतो आपण.

कित्ती आठवणी आहेत कॉलेजच्या. बरं झालं तुच आठवण करुन दिलीस. तु दिलेली ती ओंजळभर पारीजाताची फुलं आजही आठवतात मला. खरच खुप आनंद झाला होता मला तेव्हा. आपण कट्ट्यावर जाऊन बसलो होतो. आपण खुप tension मध्ये किंवा खुप आनंदात असलो कि तिथे न बोलतच बसुन रहायचो तसे! बराच वेळ बसलो होतो. मी खुष झाले म्हणुन तू आनंदात होतास आणि मी माझ्या सर्वात आवडत्या गोष्टी माझ्याजवळ होत्या म्हणुन खुष होते, ती पारीजाताची नाजुक फुल आणि...........’तू’. होय, तु मला आवडतोस. त्या दिवशी सुद्धा त्या फुलांना हुंगत असताना अनावधानानं तुझ्या खांद्यावर डोकं टेकवलं, तुला वाटलं मी नेहमीप्रमाणे अल्लड्पणा करतेय. मग मी स्वत:ला आवरलं तुझ्यापासुन थोडी दुर सरकुन बसले. त्यावेळी ३-४ फुल खाली पडली, अजुन पडु नयेत म्हणुन मी अलगद ओंजळ मिटली. तु म्हणालास "अगं टाक पिशवीत!" मी म्हणाले "नको! कोमेजतील!" पण मी परत ओंजळ उघडली, खरचं ती फुलं कोमेजली होती. पण ते तुला समजलचं नाहि.

त्या दिवशी कॉलेज इव्हेंटमध्ये मी तुला नाचायला बोलावलं वाटलं तु येशील, जमेल तसा नाचशील, किमान..२ स्टेप नाचशील माझ्या बरोबर. पण तु तिथेच उभा राहिलास, तुझा एक बुट मात्र ठेका धरुन हलत होता हे मी पाहिलं. पण त्या गर्दित "दोघांनीच" नाचण्याची मजा आणी कारण तुला समजलचं नाहि.

आणि हो! माझी छेड काढणार्‍याला तु मारत होतास, मारत कसला ’तुडवत’ होतास. तेव्हा मी मध्ये पडले, मुद्दामच. कारण तु त्याचे हात-पाय तोडणार हे समजत होतंच पण मला तुझी काळजी वाटत होती. तुला काहि झालं असतं तर? म्हणुन मी तुला सोडवुन दुर घेउन गेले. त्या गडबडित मलाहि तुझे २-४ फटके लागले, पण तुला ते कळलच नाहि. आणि खरंच अर्ध्या तासात सगळ्या कॉलेजमध्ये पसरलं की आपलं ’काहितरी’ आहे. तू सगळ्यांना रागाने-लोभाने तसं काहिहि नाहि हे समजावत होतास, मी मात्र गप्पच होते. पण माझ्या गप्प बसण्याचे कारण तुला समजलेच नाहि.

अरे हो, कॉलेज इव्हेंटमध्ये नाचताना माझा पाय मुरगळला होता, आठवतयं तुला? तुच घरी सोडायला आला होतास. वाटलं कॉलेज तसं जवळच आहे माझा हात धरुन चालत नेशील पण तु टॅक्सी बोलावलीस. एरवी हे टॅक्सीवाले दुरचं भाडं सांगितलं तरी येत नाहित आणी तो मेला ’एका चाकावर’ तयार झाला. आत बसवुन तु मला क्रिकेट खेळताना पाय मुरगळला की काय करतोस ते सांगत होतास! माझी अश्श्शी चिड-चिड झाली होती. शेवटी मला रडु फुटलं, तुला वाटलं माझा पाय दुखतोय म्हणुन मी रडतेय. मला म्हणालास "खुप दुखतयं का? पाय टेकवत नाहिये का? चल नाहितर घरी जाण्या आधी डॉक्टरकडे जाउन x-ray काढायचा का?" या - या तुझ्या या अश्या प्रश्नांनी माझं रडणं वाढलं. वाटलं की तुझेच ८-१० x-ray काढावेत आणि तुला हृदय नावाची गोष्ट आहे की नाहि ते बघावं. पण माझ्या रडण्याचं कारण तुला समजलच नाहि.

एके दिवशी बाबांना हॉस्पिटलमध्ये Admit केलं. त्यांच्या छातीत दुखतं होतं म्हणुन. तुला कॉल केल्यावर धावत आलास. डॉक्टरनी ज्या गोळ्या-औषधे सांगितली होती ती लगेच आणुन दिलीस. दादासुध्दा २ तासांनी आला त्यानंतर. तु आलास तसा खुप धीर वाटला. तु आलास म्हणुन किमान मी माझं रडु दाबुन ठेवु शकले. दुसर्‍या बाजुला आईला धीर देत होते. दोन दिवसातच बाबांना डिस्चार्ज मिळाला. त्याच संध्याकाळी आपण भेटलो. तु विचारलस - "बाबांना बरं वाटतय ना आता?" यावर मी तुला मीठी मारुन रडले होते, कारण बाबांना बरं वाट्लं या बरोबर ’तू’ त्यावेळी ’माझ्यासाठी’ तिथे होतास या कारणामुळे. ते आनंदाश्रु होतेच, पण तुझ्यावरचा विश्वास आणि प्रेम देखिल होते. तुला वाटलं मी ’बाबांना काहि झालं असतं तर?’ या कारणासाठी रडतेय. तु नंतर उगीच मला समजवत राहिलास, कारण माझ्या रडण्याचं कारण तुला समजलच नाहि.

असेच एकदा आपण रस्त्याने जात होतो. पावसाळा होता, दोघेही छत्री विसरलो होतो. आणि आलाच...पाऊस आलाच. तू चटकन समोरच्या झाडाच्या आडोश्याला गेलास. मी मात्र भिजत राहिले. मला तु म्हणालास "इथे ये!" पण मीच तुला पावसात भिजायला बोलवत होते. मला वाट्त होतं कि तु असचं पुढे यावस, आणि त्या कोसळणार्‍या पावसात मला अलगद मीठित घ्यावस. आणि..... तु जवळ आलासहि, माझा हात घट्ट्ट्ट पकडलास. उगीच माझे श्वास दुणावले. पण तु मला जवळपास फरपटत त्या झाडाखाली नेलं आणि वर वस्सकन माझ्यावर ओरडलास - "ताप येऊन आडवी होशील ना!". पाऊसहि पुढल्या क्षणी थांबला. कदाचित तोही हिरमुसला असावा. मला तुझा इतका राग आला होता कि नकळत डोळ्यातुन २ थेंब गालांवर ओघळले. तुला वाटलं ते पावसाचं पाणी असावं. आपण परत चालायला सुरुवात केली. माझं घर येई पर्यंत तू मला अगम्य भाषेत काहितरी सांगत होतास. कदाचित कुठल्यातरी देशाचा इतिहास किंवा तसचं काहितरी. माझं लक्षच नव्हतं तिथे. उभ्या आयुष्यात तो एकच प्रसंग असावा जेव्हा तु अखंड बोलत होतास आणि मी मात्र पूर्णवेळ गप्प होते. पण तुला ते का? हे समजलच नाहि.

तुला आवडतात म्हणुन मी स्वत: घाट घालुन मागे एकदा ’तळणीचे मोदक’ करुन आणले होते. डबा उघडल्यावर तु आनंदाने ओरडलास "आयला!!!पॅटिस?" माझ्या तळपायाची आग मस्तकात गेली. पण तुझी आयुष्य रेषा मोठी होती म्हणुन चव घेउन म्हणालास "ओह! सॉरी! मोदक आहेत!! अरे वा!! छान झालेत!" दुसराहि मोदक उचलुन म्हणालस - "तुझ्या आईने केले वाटतं! काकुंच्या हाताला चवच छान आहे!!" त्यावर मी फक्त हसले. पण माझ्या हसण्याचे कारणच तुला समजले नाहि.

तु एकदा क्रिकेट खेळत होतास. मी पण ग्राउंड बाहेर उभे होते ’तुला’ बघत. अचानक catch पकडायला धावलास आणि अडखळुन पडलास. दोन्ही कोपरं आणि गुढघे सोलवटुन निघाले होते. उजव्या कोपराचं तर भजच झालं होतं. मी धावत येउन माझा रुमाल त्या जखमेवर दाबुन धरला. रक्त थांबल्यावर म्हणालास "अरे-अरे! तुझा रुमाल उगीच खराब झाला.!" पण तो रुमाल आजहि आहे माझ्याकडे. का? ते तुला कदाचित समजणार नाहि.

६ महिन्यांपूर्वी तुझ्या वाढदिवसाला घरी आले होते. तुला gift म्हणुन मी छोटासा ताजमहाल दिला. म्हणालास "छान आहे! पण इतका खर्च कशाला केलास?" मी मनातल्या मनात कपाळावर हात मारला. मी तशीच स्वयंपाकघरात गेले आणि तुझ्या आईला मदत करायला लागले. तुला काय आवडतं, काय आवडत नाहि हे वळसे घालुन घालुन विचारत होते. पण हो!!! तुझ्या आईला मात्र ते लगेच समजलं.

आता please इतके वाचुन "म्हणजे काय?" असे विचारु नकोस. मला तु आवडतोस. त्या घरात सुन म्हणुन यायला मला आवडेल. तुझा निर्णय काय ते सांग. आणि हो! घाई करु नकोस. पुढच्या महिन्यात माझ्या वाढदिवसाला मी तिथे येते आहे २ दिवस. तेव्हा सांग. अजुन १५-२० दिवस आहेत.

हे पत्र मुद्दाम तुझ्या ऑफिसच्या पत्त्यावर पाठवते आहे. म्हणजे थेट तुझ्याकडे येईल. घरी कोणाच्या हातात पडावं हे मला नकोय. का ते तरी समज!



’फक्त तुझीच’
रडुबाई.



ता.क. - मी नेहमी म्हणते तसा तु खरचं बुध्दुराम आहेस. वर लिहायला विसरले होते!!!


-------------------------------------------------------------
-------------------------------------------------------------

-सौरभ वैशंपायन.

Saturday, April 12, 2008

अभिमन्यु!

औक्षहिण अठरा जमले, संगर करण्या रणी,
शंख ध्वनी-टण्कारांनी कल्लोळ उसळला क्षणी. - १

चतुरंगाच्या सेना उत्सुक झाल्या करण्या तांडव,
नभी ग्रह-गोलांचीच टक्कर तैसे कौरव-पांडव. - २

व्युह रचुनि सुसज्ज द्रोण कौरव सेनापती,
कसा करावा भेद तयाचा कुंठीत झाली मती. - ३

कसे करावे प्रत्युत्तर ते पार्थ येथे नसता?
तोच एक भेदिल व्युह हा सहजी हसता-हसता. - ४

तोच उठला बालक जैसा मृगेंद्र-शावक वनी,
बालक कैचा? पार्थपुत्र तडतडती सौदामिनी. - ५

द्यावी आज्ञा बालक वदला नमवुनि कोवळे शीर,
रुकार मिळता विंधीत व्युह बेभान दौडला वीर. - ६

सुटु लागले तीर सरसर, नयन पापणी लवता,
वर्षाव करीतसे कोण? अर्जुन तो येथे नव्हता! - ७

कोण असा हा वीर? उत्सुक कौरव सेना अशी,
उभा सुकुमार ठाकला सुर्य-शलाका जशी. - ८

शतकर्णी ध्वज उंच तयाचा, सुमित्र सारथी,
सुवर्णांकित चिलखतासवे, ऊभा महाभारती - ९


मातेच्या गर्भात शिकले ते मनी आठवे आज,
अभिमन्यु वीर धुरंधर, धावुन वाचवी लाज. - १०

-सौरभ वैशंपायन.

Friday, April 11, 2008

या चिमण्यांनो परत फिरा रे........

मोजुन ७-८ महिन्यांपुर्वी माझ्या मित्रा बरोबर बोलणे चालु होते.... आत्ता स्टार माझा या मराठी न्युज चॅनेल पण तोच विषय घेउन "बातमी" देतयं. आज-काल ’चिमणी’ दिसत नाहिये. चिमणी न दिसणं ही काय न्युज होऊ शकते????????? तर हो! आपल्या दुर्दैवाने हो!!! ही "बातमी" व्हावी इतकी वाईट अवस्था आज आलीये.

जरा आपल्या आजुबाजुला बघा! चिमणी दिसतेय का ते? बघा - बघा! नाहि ना? मोठ्या तोर्‍याने मी "आमची मुंबई" म्हणतो! पण आज आमच्या मुंबईत एका हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्या चिमण्या देखिल दिसत नाहित हो!!!
माझ्याच गॅलरीने शेवटचा ’चिवचीवाट’ कधी ’ऐकला’ होता??? छे आठवतचं नाहि! बहुदा गेल्या वर्षी ८-१० चिमण्या "भांडत" होत्या. चार इकडे - चार तिकडे. तो इवलासा जीव अगदी जीव खाऊन भांडत होता, बहुदा "एरीया" वरुन ती "चीऊगीरी" चालु असावी. त्या आठ-दहा चिमण्यांनी अगदी कान किटेपर्यंत चीवचीवाट केला. मिनीटभरासाठी तर माझं टाळकं सरकलं होत. पण पुढल्याच क्षणी त्या सगळ्या भुर्रर्रर्रर्र उडुन गेल्या. त्या तश्या गेल्या नसत्या तर मीच त्यांना हुसकवणार होतो, शेवटी तो माझा "एरीया" होता यार! आपली पण काहि आहे की नाही? पण तेव्हा काय ठाऊक होतं? की वर्ष भरात मला "या चिमण्यांनो परत फिरा रे!" असं म्हणावं लागेल.

माझ्या लहानपणी मी एक घास चीऊ चा! एक घास काऊ चा! असं करत मम-मम केली होती. गोष्टितली चीऊ माझ्या डोक्यावरुन कित्येकदा भुर्रर्रर्रकन उडुन गेलीये. आपल्या बाळाला न्हाऊ-माखु घालणारी, तिट लावणारी मेणाच्या घरातली गरीब चीऊ आणि शेणाच्या घरातला लबाड काऊ माझं बालपण आनंदाचं बनवुन गेले आहेत. आणि आज शेजारच्या छोट्याश्या श्रावणीला चीऊ म्हणजे काय? काऊ कोण? हे फक्त पुस्तकात दाखवावं लागतंय. आई-बाबांचे मम्मा-पप्पा झाले आणि आमच्या "काऊ" ची "cow" झाली. डिस्कव्हरीने आम्हाला व्हेनेझुएला मधल्या कुठल्याश्या जंगलात काय चालतं हे घर बसल्या बघायची सोय केली पण समोरच्या झाडावर बसलेला कावळा आम्हाला दिसलाच नाहि. त्यात काय बघायचेय? रोजच तर दिसतो. पण आता तसं नाहिये. हल्ली पितृपक्षात आमचे पितर देखिल कावळ्यांची वाट बघतात म्हणे.

अहो पिंडाला शिवायला देखिल कावळा नसतो! आणि हे माझे नाहि "व्यंकटेश माडगुळकर" या रानवेड्या माणसाचे अनुभवाचे बोल आहेत. त्यांच्या आईच्या पिंडाला शिवायला कावळा आलाच नाहि, शेवटी एका गाई ने त्याला तोंड लावले. त्यांच्या आईचा आत्मा मुक्त झाला, पण एक कावळा नसावा? म्हणुन माझा आत्मा ते वाचताना तडफडत होता. आणि हा अनुभव गावातला आहे तो सुद्धा काहि दशकांपुर्वीचा आहे. तेव्हा जर हि अवस्था होती तर आता काय झालं असेल?

चिमण्या नाहिश्या का झाल्या? या प्रश्नाचं उत्तर शोधुन काढायला मी काहि पक्षीतज्ञ वगैरे नाहिये. पण कॉमन-सेन्स वापरला तर "अमर्याद शहरीकरण" हे आणि हे एकच मुळ कारण आहे. आम्ही बिबटे वस्तीत शिरले अशी बातमी वाचतो. पण मोजुन १० वर्षांपुर्वी ते घर त्यांचच होतं हे खुशाल विसरतो. बंगाल मधल्या सुंदरबनातले वाघ नामशेष होण्याच्या वाटेवर आहेत. फुलंपाखरं शोधुन सापडत नाहियेत. जिथे ट्रेक करताना नेहमी सोबत करणारे पिवळ्याधमक रंगाचे "कॉमन ग्रास" फुलपाखरु देखिल आजकाल दिसत नाहि, तेथे मग "कॉमन जेझेबलची" काय कथा? आणि "कॉमन" फुलपाखरांची हि कथा तर अनकॉमन फुलपाखंरानी काय करावं? माझं लहानपण कर्जत सारख्या छोट्याश्या गावात गेल्याने माझ्या लहानपणी मी फुलपाखरांच्या मागे धावलोय. कुठलं फुलपाखरु पकडु असा प्रश्न पडावा इतकी फुलपाखरं मी बघितली आहेत. एकदा बाबांनी समजावलं होतं - "बेटा फुलपाखराला असं पकडु नये! त्याचे पंख नाजुक असतात, पकडंलं की त्याच्या पंखातला जोर जातो मग ते मरुन जातं! उद्या कोणी तुझी हातपाय बांधुन तुला एखाद्या डब्यात बंद केले तर चालेल?" आणि मी फुलपाखरं पकडण सोडुन दिलं.

मी फुलपाखरं पकडणं बंद केलं पण आज जगभर काय चाललय? आम्हा माणसाच्या हलकट जातीनं सगळी वाट लावलीये. ओरबाडणार - ओरबाडणार म्हणजे किती?? देवाच्या काठीला आवाज नसतो म्हणतात. पण १५ दिवसांपुर्वी युनो ने जो अहवाल सादर केला त्यात त्या काठीची चाहुल लागली आहे. "ग्लोबल वॉर्मिंग". सगळ्यांच्या पायाखालची जमिन सरकलीये. NatGeo वर "अर्थ डे!" साजरा केला जातोय. गो ग्रीन, सेव्ह वॉटर, सेव्ह मदर अर्थ, Recycling असले बोर्ड सगळीकडे झळकु लागले आहेत.

हे लिहिताना उगीच आतुन अपराधी असल्याचं वाटतयं. या सगळ्या सत्यानाशाला मी कुठे कारणीभुत आहे का? मी चुकुन किंवा कदाचित चलता है! असं म्हणुन कुठे प्लॅस्टिकची पिशवी फेकली नाहि ना? किंवा चुकुन फुलपाखराचा कोश असलेली फांदी ओरबाडली नाहि ना? आणि हा विचार सगळ्यांनी करायची वेळ आलिये आता. किंवा कदाचित ती टळुनहि गेली असेल! आता तरी जागे व्हा! आपल्या पुढच्या पिढ्यांना असं नको वाटायला कि माझ्या पणजी-पणजोबांनी तेव्हाचं थांबवलं असतं सगळ तर? आत्ता सगळीकडे हिरवंगार असतं. मुंबई नावचं शहर पाण्यात गेलं नसतं. अकाळी दुष्काळ पडला नसता. पाण्यावरुन शेजारच्या देशाशी युद्ध करावं लागलं नसतं. ओझोन-फ्रेंडली डि-ओडरंट, ए.सी, फ्रीज वापरले असते तर कदाचित ओझोनला भगदाडं पडली नसती आणि UV किरणांनी मला आज कॅन्सर झाला नसता.

आपल्या पुढच्या पिढ्यांच भवितव्य आपल्या हातात आहे. डोक्यावरुन पाणी कधीच निघुन गेलय! आमच्याच धुंदीत जगताना आम्ही विसरलो होतो - निसर्ग कधीच माफ करत नाहि. तुम्ही त्याला दहा वेळा खिजवलत तर तो फक्त एकदाच सुनामीची छोट्टीशी छालक दाखवतो. आता निसर्गाला शरण जाणं हा अखेरचा पर्याय वाचलाय! Now this is race against Time. wake up! go mad! make diffrence!


-सौरभ वैशंपायन.

Wednesday, April 9, 2008

कवडसे!

गुलमोहोरच्या फांद्यांतुन उतरावे जसे,
भिरभिरणार्‍या डोळ्यांचे बिलोरी कवडसे. - १

बिलोरी कवडश्यांना दाट काजळ रेषा,
तुझ्या डोळ्यात खोलवर माझ्या हरवलेल्या दिशा. - २

हरवलेल्या दिशांमध्ये सापडलेली वाट,
बकुळ-नाजुक देहाचा कमनिय घाट. - ३

घाटदार देहाला शैशवाचं कुंपण,
जागणार्‍या रात्रींना चांदण्यांचं शिंपण. - ४

चांदण्यांचं शिंपण नव्हे तुझे मंद स्मीत,
तुझ्या ओठी विरघळणारे सायंकाळचे गीत. - ५

सायंकाळच्या गीताला जगावेगळी हौस,
त्याच वेळी असा सुरु व्हावा पाऊस. - ६

पाऊस असा वेडापिसा भिजवी या देहा,
अंतरात जागलेली अनिवार स्पृहा. - ७

अशी स्पृहा जागावी तुझियाही दिठी,
अलगद गुंफाविस माझ्या भोवती मिठी. - ८

-सौरभ वैशंपायन.

Monday, April 7, 2008

काहि हरवलेली पाने.......

सुरज बनकर जग पर चमके, भारत नाम सुभागा।


२१ ऑक्टोबर १९४४ रोजी नेताजींनी सिंगापुरातल्या ’कॅथे’ चित्रपटगृहात अस्थायी किंवा हंगामी "आझाद हिंद सरकार" स्थापन झाल्याच जाहीर केलं. नेताजी राष्ट्रप्रमुख व पंतप्रधान होते शिवाय युध्दखातं व परराष्ट्रखातं त्यांनी आपल्याकडेश ठेवले होते. राष्ट्रप्रमुख आणि पंतप्रधान म्हणुन भारताशी एकनिष्ठ राहण्याची शपथ नेताजींनी घेतली. त्या दिवशीच्या सोहळ्याची सांगता "आझाद हिंद सरकारच्या" नव्या राष्ट्रगीताने झाली -


"सब सुख की चैन की बरखा बरसे, भारत भाग है जागा,
पंजाब-सिंधु-गुजरात-मराठा-द्राविड-उत्कल-बंगा,
चंचल सागर विध हिमाला, नीला जमुना गंगा,
सुरज बनकर जगपर चमके भारत नाम सुभागा,
जय हो! जय हो! जय हो! -


सबके दिल में प्रीत बसाये तेरी मीठी बानी,
हर सुबेके रहनेवाले हर मजहब के प्राणी,
सब भेद-औ-फरक मिटाके,
सब गोद में तेरी आके, गुंदे प्रेम की माला
सुरज बनकर जगपर चमके भारत नाम सुभागा,
जय हो! जय हो! जय हो! -

सुबह सवेरे पंख पखेरु तेरेहि गुन गाये,
बासभरी भरपुर हवाये, जीवन में रुत लाये,
सब मिलकर हिंद पुकारे, जय आझाद हिंद के नारे,
सुरज बनकर जगपर चमके भारत नाम सुभागा,
जय हो! जय हो! जय हो! -


५० वर्षांनंतर हे राष्ट्रगीत कुठे ऐकायला देखिल मिळणार नाहि असं त्या क्षणी नेताजींना वाटले देखिल नसेल.

आझाद हिंद सेनेचे एक "राष्ट्रीयगीत" होते -

"कौमी तिरंगे झण्डे- ऊंचे रहो जहां में।
हो तेरी सर बुलन्दी- ज्यों चाँद आसमां में॥

तू मान है हमारा- तू शान है हमारी।
तेरे मुरीद हैं हम- तू जान है हमारी॥
दिखती हमें शहीदों- की आन इस निशां में॥

आकाश जमीं पर- हो तेरा बोलबाला।
झुक जाये तेरे आगे- हर तख्तताज़ वाला॥
नफरत को भूल जायें- आ तेरे आशियां में॥

आजाद हिन्द सारा- खुश होके गा रहा है।
सर पर तिरंगा झण्डा- जलवा दिखा रहा है॥
इंसानियत की खुशबू- भर जाय इस फिजां में॥

इंसानियत का कर दे- तू हर चिराग रोशन।
ईमान प्यार फैले- सबको सिखा दे यह फ़न॥
खिल जायें फूल से मन- दुनियाँ के गुलशितां में॥
मुक्तक-
तिरंगा ध्वज, हमारी कौम की ही शान का झण्डा।
तिरंगा ध्वज, शहीदों के अमर बलिदान का झण्डा॥
तिरंगा ध्वज, अनय से जूझ जाने की कहानी है।
तिरंगा ध्वज, अहिंसा, सत्य, हिन्दुस्तान का झण्डा॥ "


-  सौरभ वैशंपायन.
=========================
संदर्भ - कहाणी नेताजींची(य.दि.फडके)