Tuesday, January 29, 2013

दुर्ग भांडार
सहा - सात महिन्यांपूर्वी माझ्या ओळखीच्या व्यक्तीच्या अल्बममध्ये मी दुर्ग भांडारचे फोटो बघितले होते. त्यादिवशीपासून दुर्ग भांडारला जायची संधी शोधत होतो. माझ्या ओळखीचे जे काही २-३ ट्रेकिंग ग्रुप आहेत त्यातल्या सगळ्यांची डोकी या प्लानवरुन खाऊन झाली होती. अखेर परवा २६ जानेवारीच्या मुहुर्तावरती पोदार कॉलेजच्या ग्रुप बरोबर जायची संधी मिळाली.

दुर्ग भांडार हा नाशिक जवळील ब्रह्मगिरीच्या डोंगराचाच एक भाग आहे. दररोज शेकडो व शनिवार - रविवारी हजारो लोकं ब्रह्मगिरी व जटा मंदिरात दर्शनासाठी येतात पण फारच कमी लोकांना पुढे एखादा दुर्ग आहे ह्याची कल्पना असते. माझ्या आजवरच्या अविस्मरणिय ट्रेक्सपैकी दुर्ग भांडार पहिल्या पाचांत ठेवायला हरकत नाही. जटामंदिरवरुनच पुढे अक्षरश: १५-२० मिनिटांच्या अंतरावरती हा दुर्ग सह्याद्रिच्या काळ्याकभिन्न कातळात "खोदून" काढलेला आहे. अर्थात जटामंदिर ते गड मधली वाट ही रेताड, भुसभुशीत, ढिसाळ, वगैरे शब्दांना आपल्यात सामावणारी व जेमतेम ’एक पाय नाचू रे गोविंदा’ करत पार करावी लागत असल्याने त्या दिशेला कोणी फिरकत नाही. चूक झाली तर डाव्या बाजूला २०-२५ फुटांचा अतिशय तीव्र उतार व मग थेट दरी आहे. ज्यांना ट्रेकची फार सवय नाही त्यांच्यासाठी कींवा आयुष्यातल्या पहिल्याच ट्रेकसाठी हा गड नक्किच नाही.


मी वर म्हणालो तसा कातळात "खोदून" काढलेला हा माझ्या पाहण्यातला पहिलाच गड आहे. मुळात तिथे गडाची मुख्य डोंगराहुन वेगळी अशी बांधणी दिसतच नसल्याने गडाच्या प्रवेशद्वारापर्यंत पोहोचल्या शिवाय खात्रीच होत नाही की इथे कुठलाही दुर्ग असेल. जवळ गेल्यावर ५-६० फुटांवरुनही प्रथमदर्शनी त्याचे प्रवेशद्वार हे सुरुवातीला पाण्याचे खोदलेले टाकेच असावे असे वाटते. कारण या वाटेच्या आधीच्या ट्प्यावर खरंच एक पाण्याचे टाके आहे. वापरात नसल्याने पाणी अस्वच्छ आहे. मात्र एकदा का त्या चिंचोळ्या वाटेपाशी पोहोचलो की मती गुंग करणारे, अफाट मेहनत व सुरक्षिततेच्या दृष्टिने जबर शक्कल लढवलेले बांधकाम ..... नपेक्षा "खोदकाम" दिसते. उजव्या हाताच्या भिंतीत इतर गडांप्रमाणेच शिवकालिन असणारे हनुमानाचे शिल्प दिसते. आणि मग थोड्या सरळसोट उतरणार्‍या साधारण फुटभर उंचीच्या ५०-५५ पायर्‍या एखाद्या गुढ भुयारात उतराव्यात तश्या खाली घेऊन जातात. एका वेळि एकच माणूस जाऊ शकेल इतपतच जागा. हा कातळ पहारींनी, छिन्नी-हातोड्याने तब्बल ६० फूट तरी सरळसोट खोदला आहे. वरती बघितलं की आकाशाची भगभगीत पट्टी तेव्हढी दिसत रहाते. 

खाली पोहोचलो की अजुन एक अनपेक्षित गोष्ट आपली वाट बघत असते. ते म्हणजे गडाचे केवळ दोन - अडिच फुटि उंचीचे व फक्त तीन फुट लांबीचे पहिले प्रवेशद्वार. गडात शिरणार्‍या माणसाला आधी इथेच गुडघे टेकावे लागतात. लहान मुलाप्रमाणे रांगतच तिथून बाहेर पडावे लागते. हे तंत्र इतके जबरदस्त आहे की आतल्या बाजूला एक - दोन पहारेकरी जरी तलवार घेऊन बसले तरी ह्या गडाचे अगदी आरामात रक्षण करु शकतात. दरवाज्यातून प्रवेश करताना आधी डोके आत घालावे लागते दोन्ही हात जमीनीवरती टेकले असतात, गुडघे टेकल्याने कुठल्याही दिशेला सरकायचा वेग उरला नसतो आणि त्यातून चिंचोळी जागा. आत शिरु पाहणार्‍याचे डोके धडापासून विनासायास वेगळे होण्याची संपूर्ण खात्री.

हा पहिला रांगता प्रवेश झाला की उजवीकडे वळायचं,  दुसरी गंमत वाट बघत असते - दोन्ही बाजूला दरी आणि मध्ये जेमतेम ८-१० फुटाचा कातळ ज्यावरुन चालत दुसर्‍या टोकाला जायचं असतं. भणाण वारा असला तर दरीत फेकले जाण्याचे शक्यता असतेच. सुदैवाने वारा नव्हता पण इथे दुसरा त्रास वानरांचा होतो. आम्ही आत प्रवेश करताच उजव्या हाताच्या एका शिळेवरती अतिशय स्वस्थ चित्ताने तो बसला होता. यांना माणसांची इतकी सवय झाली आहे की अगदि एकट्या वानरालाही हाकलवून लावायचे प्रयत्न जवळपास निष्फळ असतात. फार फार तर आपल्यावरती उपकार केल्यागत फुटभर जागा बदलतात. हा टप्पा पार करुन पलिकडच्या कातळकड्याकडे पोहोचलं की डाव्या हाताला पुन्हा नवीन "लोटांगण" असतच. गडाचे दुसरे प्रवेशद्वारही अगदी तसेच. शिवाय यातुन आत गेलं की आधीच्या प्रवेशद्वारासारखं थेट वरपर्यंत पायर्‍या दिसत नाहित जवळपास ९० अंशात वळत जाणार्‍या फुटभर उंचीच्या पायर्‍या आहेत.

वरती कुठलंलही इमारतीचं बांधकाम दिसत नाही, कींवा तसे कुठलेही पुरावे दिसत नाहित. सरळ नाकासमोर चालत गेलं की उजव्या बाजूला थोडं खाली पाण्याची दोन टाकी खोदली आहेत. पैकी एक टाकं त्यातल्या त्यात स्वच्छ आहे असं मानता येतं, दुसरं टाकं मात्र हिरवट पाण्याने भरलेलं आहे. तिथुनच पुढे दोन मिनिटांवरती कातळ फोडून तयार केलेला बुरुज आहे. वास्तविक बुरुजापेक्षाही तो एखादा सज्जा असल्यागत फोडून काढला आहे तोफा अथवा बंदूंकांचा मारा करायला कुठलीही सोय, जंग्या नहियेत. मला पाणी वाहून जायलाही काही व्यवस्था दिसली नाही, पण ती असावी अन्यथा पावसाळ्याच्या दिवसात इथे छातीभर पाणी साठेल. या बुरुजात उतरताना काळजी घ्यावी लागते डाव्या बाजूला दरी आहे, अजिबात चूक न करता इथून बुरुजात उतरावं लागतं. बुरुजात उतरलं की खाली त्र्यंबकेश्वर दिसतं. अजून उजवीकडे बघितलं की खाली गंगाद्वारकडे जाणारा रस्ता व समोर ब्रह्मगिरीचा डोंगर दिसतो. परत संपूर्ण मागे वळलं व बुरुजात जिथून उतरलं तिथे जाऊन उभं राहीलं की समोर थोडंस डाव्या हाताला हरीहर गड व बसगड दिसतो. बास संपला गड. या गडात पहाण्यासारखं म्हणाल तर जवळपास काही नाही पण अनुभवण्यासारखं खूप काही आहे. माझ्या अंदाजाप्रमाणे व आधीच्या प्रवेशद्वाराजवळ जे मारुतीचे शिल्प कोरलेले दिसते त्यावरुन हा शिवकालीन गड असावा. जो नावाप्रमाणेच खजिना अथवा परचक्र आल्यास महत्वाच्या व्यक्तींना लपायला देखिल वापरता येऊ शकेल असा असावा, मात्र परत सांगतो वरती कुणाला रहता येईल, अन्न, दारुगोळा, खजिना साठवता येईल असं काही बांधकाम अथवा अवशेष दिसत नाहीत. त्यामूळे हा नक्कि कधी व का बांधला हे समजायला काही मार्ग नाहिये. मी आजवर वाचलेल्या इतिहासातही याचा उल्लेख मला मिळालेला नाही.

बुरुजातच फतकल मांडून आम्ही पोटपूजा सुरु केली. तासभर आराम - गप्पा झाल्यावरती परत निघालो. तोच रस्ता, तीच लोटांगणं मग त्या लोटांगणासहित फेसबुकच्या प्रोफाईलला डकवता येईल असा फोटो काढण्याची प्रत्येकाची धडपड सुरु झाली. आम्हा ६ जणांचा ग्रुप थोडा मागे पडला. आम्ही कातळकड्याच्या ८ फुटी चिंचोळ्या पट्टिवरती आलो आणि  समोरुन ५-७ वानरांचं टोळकं उभं राहीलं, डाव्या दरीतून  अजून दोघं वर आली, मागे वळलो तर एक जण आधीच येऊन उभा होता. त्यांनी फार हुशारीने जागा निवडली होती. पुढे - मागे माकडं डावी-उजवीकडे दरी. धीट तर इतके होते कि घाबरवायला पाण्याची रिकामी बाटली वाजवली तर ३ लहान पिल्लं पुढे येऊन तीच बाटली धरायचा प्रयत्न करु लागली. एक जण पुढे झाला व त्याने सरळ एका मुलीच्या ट्रॅकपॅन्टचा कोपरा चिमटीत पकडला. आता कुठलीही आक्रस्ताळी हालचाल जीवावरती बेतू शकत होती किंवा त्यांचा हल्ला ओढावून घ्यायला कारणीभूत ठरु शकत होती. गपगुमान एकमेकांची बॅग पकडून झुकझुक गाडि बनवली. त्यांच्याशी नजर न मिळवता मधला ५० फुटांचा पट्टा शब्दश: जीव मुठीत धरुन पार केला. त्यांच्या सरावल्या नजरांनाही आमच्या हातात खाण्यासारखं काही दिसलं नाही त्यामू्ळे त्यांनीही मग काही आडकाठी केली नाही. हे दिव्य पार करुन पुन्हा त्याच ढेकळांच्या घसरड्या वाटेवरुन तोल सावरत अखेर जटा मंदिर गाठलं. दुर्ग भांडारचा ट्रेक पूर्ण झाला होता. सगळे  जण या अनुभवाने "cloud 9" वरती पोहोचले होते.

परत येताना डोक्यात एकच विचार आला - ताजमहाल किंवा राजस्थानातले सुंदर राजवाडे बांधणे हे अर्थात फार मोठे व कलेच्या दृष्टिने अजोड आहे. मात्र त्याचवेळी सह्याद्रिच्या कातळकड्यातून अशी सर्वथा अजिंक्य वाटावी अशी जागा कोरुन काढणं जास्त कठीण आहे. त्या दोन्ही दरवाज्यांत घालावी लागणारी लोटांगणं हि त्या कारागिरांना, मजूरांना व ज्याच्या डोक्यात ही कल्पना आली त्यालाच घातली असं मी अजूनही समजतोय. थोडक्यात किमान एकदा घ्यावा असा हा अनुभव आहे. 

 - सौरभ वैशंपायन.