Thursday, December 1, 2016

क्रांति: पूर्वार्ध आणि उत्तरार्ध



२५ तारखेला फिडेल कॅस्ट्रो वारल्याची बातमी आली आणि जगभर श्रद्धांजलीचे लाल सलाम झडू लागले. तर काही ठिकाणी एक हूकूमशहा गेला अशीही प्रतिक्रिया आली. बर्‍याच जणांना हा इसम कोण हे माहीत नव्हते आणि जो उठतोय तो ह्याला सलाम का ठोकतोय म्हणूनही गोंधळले होते. एव्हाना कॅस्ट्रो आणि पर्यायाने चे गव्हेराबाबत बर्‍याच जणांचे जुजबी ज्ञान मिळवून झाले असेलही. लोकसत्ताने देखिल २८ तारखेला फिडेल कॅस्ट्रोंवरती अग्रलेख लिहीला. अग्रलेख काहीसा नकारात्मक अंगाने जाणारा होता. काही वर्षांपूर्वी मी फिडेल आणि चे बाबत अर्धवट लिहीलेलं काही मी फेसबुकवरती शेअर केलं. एका परीचिताच्या टिपण्णी नंतर क्रांती आणि क्रांतिकारकांबाबत लिहावसं वाटू लागलं.

कॅस्ट्रोंच्या निमित्ताने होणार्‍या चर्चांमधून फेसबुकवरही एकंदरच क्रांती यशस्वी होऊन सत्ता मिळाली की क्रांतिकारी सत्ताधिशाचे रुपांतर हुकूमशहात होते हाच सुर दिसत होता. व तो बहुतांशी बरोबरच आहे. कुठल्याही क्रांतीचा पूर्वार्ध हा नेहमी भारावून टाकणाराच असतो. कारण एखाद्या प्रस्थापित व्यवस्था, विचारसरणी अथवा व्यक्तीच्या दडपशाहीला वैतागुन कुणी एक अथवा काही लोकांचा गट क्रांतिची स्वप्ने पाहू लागतो. काहीवेळा २-३ पिढ्या ही क्रांती केवळ कागदावरतीच रहाते तर कधी सगळे इतक्या झटपट घडते की ते लिखाणच भडका उडवायला कारणीभूत ठरते. ही कागदावरची क्रांतीच पुढे त्या त्या क्षेत्रांतील - देशातील लोकांची गीता-बायबल-कुराण बनते. ह्या लिखाणाची गोची अशी असू शकते की ज्या लोकांना ते लिखाण - ती विचारसरणी हेच सर्वस्व वाटू लागते व त्यासाठी ते जीवही द्यायला तयार होतात ती लोकं त्या पुस्तकाच्या अथवा विचारसरणीच्या बाहेर बघूच शकत नाहीत अथवा जाणूनबुजून बघत नाहीत .... कारणे काहीही असोत. अश्याने त्या विचारसरणीचे डबके बनते. मग ती विचारसरणी राजकीय असो, आर्थिक असो अथवा धार्मिक. हे लोक इतरांनाही त्यात खेचतात. कुठल्याही क्रांतीची परीणीती २ गोष्टीत होते; म्हणजे क्रांती आपल्याच पिलांना खाते हे एक आणि दुसरे म्हणजे एक क्रांती कालांतराने दुसर्‍या क्रांतीला जन्म देते. कुठल्याही क्रांतीच्या पूर्वार्धात क्रांती करु पाहणारे नेहमी वजाबाकीत असतात. खायची-प्यायची भ्रांत, डोक्यावर छप्पर नाही आणि जीवाची शाश्वती नाही असेच असतात. त्यांच्या क्रांतीवरच्या आणि नवीन स्वप्नांवरच्या स्वत:च्या निष्ठा इतक्या प्रबळ असतात की त्यांना मृत्यूचेही भय वाटत नसते. ह्या अफाट निष्ठेमुळे त्यांना त्यांच्यावरती जीवापाड निष्ठा ठेवणारे साथीदार मिळतात. ही गंमत खचित नव्हे. त्या क्रांतीची परीणीती कशातही होवो पण जगातील कुठल्याही क्रांतीचा पूर्वार्ध हा नेहमीच भारावणारा व रोमांचित करणाराच असतो ह्यात वाद नाही.

यशस्वी क्रांतींचा पूर्वार्ध हा वादळी वगैरे असतो. उत्तरार्ध मात्र अजगरासारखा संथ, थंड व क्रूर असतो. कारण एकदा का क्रांती यशस्वी होऊन सत्ता क्रांतिकारकांच्या हातात आली की त्या क्रांतीच्या मंथनातून चौदाच काय पण अनेक रत्ने बाहेर पडतात. काही अमृत घेउन येतात काही हलाहल. क्रांती यशस्वी झाली की २ गोष्टी कल्पनातीत वेगाने घडतात. पहीले - विरोधकांचे शिरकाण. ह्यात क्रांतीला विरोध केलेले आधीच्या व्यवस्थेला पाठींबा दिलेले बळी जातातच पण क्रांती घडवू पाहणारा जो म्होरक्या असतो त्याला नको असलेले अनेक स्वकीय आणि परकीय क्रांती विरोधी किंवा द्रोही ठरवून तुरुंगात डांबले जातात किंवा फासावरती लटकवले जातात. दुसरे म्हणजे अनेकदा क्रांतीकारी म्हणून जो सर्वात पुढे असतो त्याला बाजूला सारुन दुसर्‍या किंवा तिसर्‍या फळीतील खरे खेळाडू जे पडद्या मागून हालचाली करत असतात व ह्याचा चेहरा वापरत असतात ते पुढे येतात.


साधारण क्रांती ही लष्करशहांकडून होते असा एक सार्वत्रिक समज आहे. मात्र अहींसक क्रांतिंची उदाहरणे कमी तरीही ठळक आहे. गांधी - मार्टीन ल्युथर किंग - नेल्सन मंडेला. ही प्रातिनिधीक उदाहरणे. अशांचेही हट्टी अहिंसक हुकूमशहा बनू शकतात. असो, तो विषय अजून वेगळा. अर्थात ज्यांच्या विरुद्ध चळवळ करायची असते ते किती क्रूर आहेत ह्यावर चळवळ हींसक की अहींसक हे सगळे ठरते. क्रांती यशस्वी होईतोवर सर्वात जास्त कुणी भरडले जात असेल तरे ती जनता. तरी क्रांति झाली की नव्याने सत्तेवरती आलेल्यांचे झेंडे आनंदाने किंवा नाईलाजाने खांद्यावर घ्यावेच लागतात. सुरुवातीचा क्रांतीचा बहर ओसरला की "पुन्हा तेच ते" च्या चक्रात अडकलेल्या जनतेचा भ्रमनिरास होण्याचीच शक्यता जास्त असते. शिवाय आधीची दडपशाही हटवून सत्ता हातात घेतलेले स्वत:च हुकूमशाहीकडे आपसूक ढकलले जातात. त्यात त्यांच्यावर मुख्य पगडा असतो तो "आपण जीवावर उदार होऊन केलेली क्रांती व बघितलेले स्वप्न धुळीस मिळेल काय" ही भीती आणि लागलेली सत्तेची चटक. ह्या गोष्टी पकड अजून घट्ट करायला भाग पाडतात. साधारणत: लष्करशहाने क्रांती घडवून आणली असेल तर तो हयात असेतो किंवा त्याला दुसर्‍यांनी पदच्युत करेपर्यंत सत्तेवरील पकड सोडत नाही. किंवा लष्करातील चार डोकी एकत्र येऊन झालेल्या क्रांतीत लष्करशहा बदलतात पण सत्ता लष्कराचीच रहाते. दुसर्‍या देशाकडून त्या देशाला सारखे अपमानित केले जात असेल अथवा बाहेरचा देश येऊन तिथली साधनसंप्पत्ती लुटत असेल अश्या ठिकाणी त्या अपमानाने निर्माण झालेली चीड लष्करशहांच्या देशाभिमानाला डिवचून क्रांतीप्रणव बनवते. गडाफी, सद्दाम ही काही उदाहरणे.


क्रांती झाली की सर्वात मोठा फटका बसतो तो त्या समाजाच्या अथवा देशाच्या अर्थव्यवस्थेला. क्रांतीनंतर देशाची अर्थव्यवस्था नीट बसवणे हे सर्वात जोखमीचे काम असते. त्यातच अपयश आले तर क्रांती फसायची किंवा अख्खा समाज आर्थिक, वैचारीक व नीतीमत्तेबाबत डळमळीत होण्याची शक्यता निर्माण होते. आर्थिक कारणांनी समाजाची नीतीमत्ता काळवंडली तर क्रांतीचा पायाच उध्वस्त होतो. हा भाग समाजाचा झाला. क्रांती झाल्यावर सत्तेत आलेला नेता अथवा त्याचा गट याच कारणाने भ्रष्टाचारी झाला तरी क्रांती बोंबलते. मुख्य उद्देश बाजूला रहातो व हे डोक्यावर बसलेले मलई खातात. जनता उघड्यावरती येते. जर ही क्रांती बाहेरच्या बलाढ्य देशाची मदत घेऊन पार पाडली असेल पुढे दिर्घकाळ त्या देशाच्या ताटाखालचं मांजर होऊन रहावं लागतं. त्यांना आवडतात ते सत्ताधिश बसवावे लागतात. त्यांचे शत्रू ते आपले शत्रू मानावे लागतात. तो बलाढ्य देश देखिल आपल्याला हवे ते घडवून आणायला सढळ हाताने पैसा ओतत रहातो. सत्तेत असलेले गबर होत जातात. स्वबळावर केलेल्या क्रांतीत मात्र बहुतकरुन असे नसते. उलट अश्या क्रांतीत ज्याच्या विरुद्ध उठाव केला जातो त्याला बलाढ्य शक्तींचा पाठींबा असतो आणि उठाव करणार्‍यांना दडपण्यासाठी तो बलाढ्य देश सत्ताधार्‍यांना सहाय्य करतो. अश्यावेळी जनता कुणाच्या बाजूने ऊभी रहाते त्यावर त्या देशाचं भवितव्य अवलंबून असतं.

काही क्रांतीकारक आणि त्यांनी घडवलेली क्रांती हा जगभरात कुतुहलाचा विषय होतो. क्रांतीसाठी मृत्यू पत्करलेला कुणी एखादा चे गव्हेरा जगभरतील पोरांच्या टि-शर्टवरती "डिझाइन" म्हणून जाऊन बसतो. तो कोण? त्याने काय केलं हे त्यांच्या गावीही नसतं. फक्त ते "COOL" दिसतं म्हणून त्यांना हवं असतं. चे सिगार ओढायचा म्हणून तो तथाकथित Hi-class चरसी लोकांचा "आदर्श" बनतो. ड्रग्स घेऊन जगाला फाट्यावर मारुन जगायची स्वप्ने कुठल्याही क्रांतीकडे घेऊन जात नाहीत अणि अखेरीस खरोखर जगाचा चेहरा मोहरा बदलू इच्छिणारी काही भव्य दिव्य स्वप्न ही स्वप्नच रहातात अगदी चे गव्हेराच्या क्रांतीसारखी.

 - सौरभ वैशंपायन