Saturday, December 25, 2010

"नाताळाचे" माथी हाणू काठी ?


काल रात्री सांता घरी आला होता ..... पोतड्यातुन गिफ्ट काढून देत होता .... म्हणालो असली फालतु गिफ्ट्स नकोत ...... महिनाभर पुरतील इतके कांदे, भेंडी आणि टॉमेटो दे!! ...... आयला, मागणी ऐकुन झिट येऊन पडला ..... त्याच्या अगडबंब देहाला शुध्दिवर आणायला घराततल्या ६ कांद्यांपैकि २ कांदे त्याच्या नाकाला लावावे लागले!!! दुसरं काहितरी माग म्हणाला - म्हणालो "बरं मग निदान राहुल गांधीला थोडि अक्कल दे!" ..... या मागणीमुळे परत त्याच्या नाकाल उरलेले ४ कांदे लावावे लागले. ..... सांता बहुदा रीटायर होतोय  ..... इतक्या महागाईत पिचलेल्या लोकांना "मेरी ख्रिसमस आणि "हॅप्पी" न्य़ू इयर!!!" कसं म्हणायचं? हे त्याला समजत नाहिये.

Thursday, December 23, 2010

गारवा

काल पूनवेचा चांद,
तुझ्या डोळ्यात वाचला,
अंगभर मोरापिसा परि,
गारवा नाचला. - १


थवा चांदण्यांचा तिथे,
दूर नभात साचला,
सूर तुझ्या मनातला,
माझ्या मनात पोचला - २

- सौरभ वैशंपायन.

Wednesday, December 8, 2010

दबंग

समाधी भोवतीची तटबंदि व प्रवेशद्वार.


इंदोरला जायचे नक्कि झाले तेव्हाच ठरवले होते कि काहिही करुन रावेरखेडि येथील थोरल्या बाजीरावांच्या समाधीचे दर्शन घेऊन यायचे.  सध्या वीज निर्मितीसाठी नर्मदेवर अजून एक धरण बांधणार आहेत, त्यामुळे नदि काठच्या मोठ्या प्रदेशा बरोबर ही समाधी देखिल पाण्याखाली जायची भीती आहे. समाधी पाण्याखाली जाण्याआधी एकदा दर्शन घ्यायचेच होते. कुठुनतरी सुरुवात करायची म्हणून गुगल मॅप वरुन रावेरखेडिला शोधले. इंदोरपासून साधारण ७५-७८ किमी वरती आहे इतपतच माहीती मिळाली. पुढे काही दिवसात Bajirao.org हि साईट मिळाली त्या साईट वरुन श्री श्रीपाद कुलकर्णी यांचा नंबर मिळाला. इंदोरला पोहचूनच त्यांच्याशी बोलायचे नक्कि केले.

इंदोर मधले पहीले ३ दिवस तर इंदोर, माहेश्वर फिरण्यात गेले. या मधल्या दिवसात श्री. श्रीपाद कुलकर्णी यांच्याशी फोनवर बोलणॆ झाले. त्यांनी तिथे जाण्याचे २ मार्ग सांगितले १) इंदोर – बडवाह – सनावत- बेडिया – रावेरखेडि किंवा २) सनावत मार्गे खरगोणला जाणारी बस मिळाल्यास ती थेट बेडियापर्यंत पोहोचवते. बेडियाला पोहचले कि रावेरखेडिपर्यंतचा रस्ता १२ किमीचा आहे. बेडियावरुन पुढे त्रास होऊ नये म्हणुन  त्यांनी तिथल्या २ जणांचे मोबाईल नंबर देखिल दिले. “बेडियाला पोहोचलात कि यांपैकि कोणालाही फोन करा पुढची व्यवस्था ते करतील!” असे सांगुन श्रीपादजींनी काम बरेच सोपे केले. त्यांनी दिलेल्या नंबर वरती फोन केले, तिथे चेतन रावशिंदे या मुला बरोबर बोलणे झाले. “अजी आप बस यहॉं आ जाईये, कुछ चिंता मत किजिये. समाधीके दर्शन करवाने का जिम्मा मेरा!” चेतनच्या आवाजातील उत्साह जाणवत होता.

दुसर्‍या दिवशी आत्या व आत्येबहिणींना सगळे रस्ते सगळे ऑप्शन दोन – दोन वेळा नीट विचारुन घेतले. इंदोरला भवरकुऑ इथुन या बसेस मिळतात ५० रुपयात सनावतपर्यंत सोडतात. या प्रायव्हेट असतात पण यात ढिगाने स्थानिक प्रायव्हेट गाडिवाले असल्याने त्यांच्यात बरीच चढाओढ असते, म्हणजे पुढल्या प्रवाश्यांना आधी आपल्या बस मध्ये घेण्याकरता ओव्हरटेकचे प्रकार भरपूर असतात. आणि एकंदरच संपूर्ण प्रवासात खरच सरकारी बसेस फारच कमी दिसल्या.

बस मध्ये बसलो, दहा मिनीटांनी खात्री करुन घ्यायला शेजारच्या माणासाला विचारले “ये बस सनावत तक जाती है ना?” त्याने मानेनीच होकार भरला. मग त्याला काय वाटले माहीत नाही त्याने विचारले “कहॉ जाना है आपको?” म्हणालो “जी, पहले बेडिया और बाद में वहॉ से रावेरखेडी।“ बेडियापर्यंत ठिक होतं रावेरखेडिचं नाव ऐकुन त्याला आश्चर्य वाटलं. “रावेरखेडि? वहॉ क्यो जाना है आपको? बहुत छोटा गॉव है। बस भी ८ किलोमीटर दूर से गुजर जाती है।“ तसं उत्तरलो “वहॉ बाजीराव पेशवा कि समाधी है! उसे देखने जा रहॉ हुं।“ हि माहीती त्यासाठी बहुदा नविन होती. तो शेजारच्या त्याच्या बरोबरच्या माणसाशी बोलु लागला. मग माझ्याकडे वळुन म्हणाला – “आप कहॉ से आये हो?” मुंबईवरुन आल्याचे सांगताच “अरे? वहॉ बैठके यहॉं पे समाधी है ये आपको कैसे पता चला?” असा प्रश्न त्याला पडला. “जी वो पढा था एक किताब में!” इतकच बोलुन मी परत हातातल्या पुस्तकात तोंड खुपसलं.

तसे रस्ते चांगले होते. मध्ये एक घाट देखिल लागला. आजूबाजूला दुरवर ४-५ डोंगर होते. मागच्या सीटवरती एक छोटि मुलगी आश्चर्याने ओरडली – “हाऽऽऽ मॉ वो देखो कितनाऽऽ बडाऽ पहाड है, ना?” सह्याद्रिची सगळ्या ऋतुतली रौद्र मात्र तितकिच लोभस रुपं बघितली असल्याने मला त्या पहाडात फारसं काही वाटलं नाहि, पण त्या मुलीचे वय आणि एकंदरच त्यांच्या आजूबाजूचा सपाट प्रदेश बघता तिला तो विशेष वाटला होता. पण त्या मुलीच्या त्या वाक्याने हातातल्या पुस्तकातुन लक्ष उडाले, डोक्यात सह्याद्रिचे विचार घोळु लागले. नेपोलियनच्या रशिया स्वारीत नेपोलियनला परास्त केले ते जनरल विंटरने. रशियातील हाडं गोठवणार्‍या थंडिने त्याचे लाखो सैनिक न लढताच नुसते काकडुन मेले होते. तीच अवस्था जनरल सह्याद्रिने मुघल – आइलशाही सैन्याची केली होती. शहाजीराजांनी स्वातंत्र्याचे ३ प्रयत्न केले ते सह्याद्रिच्याच जोरावर. म्हणुन तर तिसरा प्रयत्न फसल्यावर त्यांना बंगरुळात - महाराष्ट्रापासून व पर्यायाने सह्याद्रिपासून दूर ठेवले. पण शहाजीराजे पट्टिचे राजकारणी होते, त्यांनी बंगरुळात तर आपले बळ वाढवलेच पण आपल्या मुलाला मात्र सह्याद्रित वाढवायची दूरदृष्टि त्यांनी दाखवली. या एका निर्णयाने पुढचा इतिहासच बदलला.

त्याच इतिहासातील एका अद्वितीय योध्याची समाधी बघायला मी उत्सुक झालो होतो. आजूबाजूला बघताना सारखे वाटत होते कि  ऋषीमुनींप्रमाणे हजारो वर्ष ध्यानस्थ बसलेल्या या डोंगरांनी भीमाथडिच्या घोड्यांची बेगुमान उधळलेली हजारभरांची तुकडि व त्या तुकडिच्या सर्वात पुढे मुर्तीमंत पौरुष राऊंच्या रुपाने दौडत असताना नक्किच बघितलं असेल. केवळ “पेशवा पंडीत” म्हणताच  भारतभरातली उन्मत्त सिंहासनं डळमळायला लागायची, इतकि जरब राऊंकडे होती पर्यायाने मराठ्यांकडे होती. पानिपताचा इतिहास खर्‍या अर्थी चालू होतो १७०७ मध्ये, औरंगजेबाच्या मृत्युपासूनच. बाळाजी विश्वनाथांच्या रुपाने दिल्लीच्या राजकारणात मराठ्यांचा शिरकाव झाला होताच, पण मराठ्यांकडे दिल्लीच्या रक्षणाची जबाबदारी आली ती राऊंच्या काळात. श्रीमंत, पेशवा, राऊ, पंडित, शामतपन्हा अशी बिरुदं ते उगीच मिरवत नसत.

साधारण पाऊणे दोन तासांनी बस एके ठिकाणी थांबली तसा कंडक्टर किंवा जो पैसे गोळा करत होता तो सनावत सनावत म्हणुन कोकलू लागला, विचारांची तंद्रिं  भंगली तसा मी चटकन खाली उतरलो. तो एका ६ सीटर रिक्षाकडे बोट दाखवुन म्हणाला – “इसमें बैठ जाओ, यह आपको सनावत छोडेगी, पैसा मत देना, अपनीही है।“ माझ्या बरोबरची माणसे देखिल त्याच रिक्षा मध्ये होती आणि बरोबर कुटुंब होते. सगळि रिक्षा त्या कुटुंबाने भरली लहान मुले असल्याने ६ सीटर मध्ये आम्हि एकुण ९ जण कोंबलो गेलो, फारसा त्रास जाणवला नाही आता तो खरच झाला नाही कि ट्रेकिंगच्या सवयीमुळे अश्या कोंबाकोंबीची सवय झालीये हे समजलं नाही. थोडक्यात बस बडवाह इथे थांबली होती व नेहमीच्या बांधल्या गेलेल्या एका रिक्षावाल्याला त्यांनी आमचे बोचके सनावतला टाकायची जबाबदारी दिली होती हे लक्षात आले. आता बडवाहवरुन सनावतकडे प्रवास सुरु झाला. अर्धातास प्रवास करुन रीक्षा सनावतला थांबली. तिथे चौकशी करुन आता बेडियासाठी गाडि घ्यायची होती.

सगळिकडे प्रायव्हेट बसेसचीच चलती होती. इथे एका मिनी बसमध्ये बसायला जागा मिळाली १३ रुपयात त्याने बेडियाला सोडले. सनावत बेडिया अंतर १७ किमी आहे. सकाळि साधारण पाउणे अकराला इंदोरवरुन निघालो होतो घड्याळात बघितले तर एक चाळिस होत होते. साधारण तीन तास लागले होते. श्रीपादजींनी दिलेल्या नंबरवरती फोन करत होतो पण फोनच लागत नव्हता. म्हणुन परत श्रीपादजींना फोन लावला तसा त्यांनी मला डॉ सोनींच्या दवाखान्याचा पत्ता दिला व म्हणाले तिथे कोणालाही विचारा, छोटे गाव आहे. कोणीही सांगेल. तिथे पोहोचलात कि चेतनसाठी विचारा. अर्थात पुढल्या दहा मिनीटात या प्रकारेच माझी तिथे चेतनशी भेट झाली. कॉफि झाल्यावर आम्ही बाईकवरुन रावेरखेडिकडे निघालो.

चेतन रावशिंदे, साधारण २७-२८ वर्षांचा मुलगा. जवळच एका शाळेत इतिहास विषय शिकवतो. स्वत: अभाविपचा कार्यकर्ता आहे. मी मुंबईवरुन असा चौकशी करत इथे आलो हे बघुन त्यालाच जास्त आनंद झाला होता. असं कोणी सहसा येत नाही, २७-२८ एप्रिलला पुण्यतीथीच्या २ दिवसांत अगदि मुंबई – पुण्यापासून माणसांचा ओघ असतो पण समाधीला अजुन प्रकाशात आणायची गरज आहे, वगैरे सांगत होता. रावेरखेडि कडे जाणार्‍या रस्त्यातला पहीला मुख्य रोडचा ४ किमीचा पट्टा संपला आणि उजवीकडचा कच्चा रस्ता सुरु झाल्यावर मग समाधीकडे का कोणी येत नाही हे समजले. समाधीपर्यंतचा पुढचा साधारण ६-७ किमीचा रस्ता खराब म्हणजे इतका खराब होता कि बाईकच्या गचक्यांनी कंबरेला त्रास होऊ लागला. सगळा कच्चा रस्ता, त्यातुन नोव्हेंबर मध्ये बराच पाऊस झाल्याने अजुन खड्डे पडले होते. एकदा तर पडता पडता वाचलो. सगळ्या प्रवासात प्रचंड धुळ उडत होती बहुदा २०० ग्रॅम माती पचवली असावी.
रस्त्याच्या दोन्हि बाजुंना शेते होती. चेतन सांगत होता कि इथे कापूस, गहू आणि मीरची होते. भारतातील क्रमांक दोनचे मीरची उत्पादन बडवाह जिल्ह्यामध्ये होते.  सध्या गहु लावणे सुरु झाले आहे. उन्हाळ्यापर्यंत गहूच पिकवला जाईल मग मधले दोन महीने सगळिकडे सामसूम असते. तरी नर्मदामैय्याचे पाणी आहे म्हणून इथे शेती छान पिकते. या संभाषणा दरम्यान अखेर गाडि गचके खात रावेर गावात पोहोचली. साधारण १०० उंबर्‍यांचे गाव असावे. उजवीकडच्या टेकडिवर एक मंदिर दिसत होते. तर डावीकडे एक भग्न तरी मोठे प्रवेशद्वार होते.गाडि तिथुन अजुन २०० मीटर पुढे आली आणि ज्याकरता हा प्रवास केला होता त्या समाधीचे प्रवेशद्वार समोर दिसत होते.

भोवतालचे गेट उघडुन आत गेलो. उजव्या हाताला थोर पिंपळ होता. त्या खाली हनुमान ठाण मांडुन बसला होता. अजुन २-३ शेंदुर लावलेले देव होते. पिंपळापलीकडे तीव्र उतार होता व उताराच्या शेवटि नर्मदेचे संथ आणि उथळ पात्र वाहत होते. समाधीच्या मुख्य प्रवेशद्वाराला कुलुप होते. सेकंदभर बिचकायला झाले. इतक्यात चेतन म्हणाला – “ये रखवालदार भी कहॉ गया?” असं म्हणत परत माघारी चालत गेटपाशी गेला. एक दोन हाकात तो राखणदार कुठुन तो आला. कुलुप उघडले तसे देवळाच्या किंवा त्याहीपेक्षा रायगड – राजगडाच्या महाद्वाराच्या चिरेबंदि उंबरठ्याला भक्तीने स्पर्ष करतो तितक्याच भक्तीने त्या उंबरठ्याला वाकुन हात लावुन मग उंबरठा ओलांडला. उजव्या हाताला शिवपिंडि च्या आकाराशी साम्य असलेली दगडि समाधी होती. तिच्या मधोमध एक खोल कोनडा होता. चेतन चपला काढुन वर गेला आणि त्या कोनड्यात डोकं घालुन जोरात “जय होऽऽ पेशवा बाजीराऽव, …. छत्रपती शिवाजी महाराज कीऽऽऽ“  असं म्हणाला, आपसूक माझ्याहि तोंडुन “जऽय” बाहेर पडलचं. बुट उतरवुन मागोमाग मी समाधीच्या पायर्‍या चढुन वर गेलो. आत संगमरवरी शिवपिंडि होती. त्या शिवपिंडि खालीच राऊंच्या अस्थिरक्षेला ठेवलं आहे असं मानतात. नासिरजंगला रणांगणात यथेच्छ पिटुन काढल्यानंतर मुंगीपैठण इथे मराठे व निजाम यांच्यात तह झाला. तिथुन राऊ मुक्कामासाठी रावेरखेडिला आले. व एप्रिल महिन्याच्या रखरखित उन्हाने घात केला. उष्माघाताने त्यांना ताप चढला व अल्प आजारात त्यांचे निधन झाले. त्यांच्या आठवणीत ग्वाल्हेरच्या शिंदे स्वारींनी ही समाधी बांधली.

समाधीपुढे डोके टेकवुन दोन क्षण नतमस्तक झालो. अचाट साहसे करणारा योध्दा इथे कायमचा निजला होता. नजर वळेल तिथे लगबगीने मुजरे झडावेत व भारतभर ज्यांचे सत्कार सोहळे घडावेत असा दरारा असलेल्या पराक्रमी योध्याच्या समाधीवर येणारी बिलामत बघुन मन बेचैन झालं. सरकार काहीच करत नाहीये असं नाहि, पाणी चढणार तिथुन खाली एक जुजबी उतरती संरक्षक भिंत बांधली आहे. पण त्याने फारसा फरक पडणार नाही, पाणी किमान तीनफुट वरती येणार. सरकारी पातळीवर हळु हळु जाग येते आहे, काही राजकिय वजन असलेले नेते आपापल्या परीने प्रयत्न करत आहे पण त्याला पुरेसा वेग नाहीये. जर एखादि मजबुत संरक्षक भिंत बांधली तर समाधीला वाचवता येऊ शकेल. दुसरा पर्याय असा असू शकतो कि समाधी अजुन थोडि वरती हलवावी किंवा तिसरा पर्याय – ही समाधी आहे तशीच राहु द्यावी, पण नविन समाधी लोकांना सहज दर्शन घेता येईल व इतिहासाला उजाळा मिळेल अशी बांधावी.

समाधीच्या आजुबाजुचे फोटो घेत होतो. समाधी भोवतीच्या तटबंदिवरती जायला २ जीने आहेत. वरती फिरत आमच्यात बर्‍याच गोष्टि चालल्या होत्या. नर्मदेच्या पात्राकडे बोट दाखवुन चेतन म्हणाला उन्हाळ्यात केवळ गुडघाभर पाणी उरतं. नर्मदेच्या उगमापासून ते गुजरातपर्यंत केवळ १-२ अशी ठिकाणं आहेत जिथे नर्मदा इतक्या सहज ओलांडली जाऊ शकते. त्यापैकि रावेर हे गाव. उत्तर – दक्षिण प्रवास/व्यापार/स्वार्‍या करणार्‍यांना इथे नर्मदा सहज ओलांडता येत असे. म्हणूनच बाजीरावांच्या आज्ञेवारुन इथे चुंगीनाका उभारला. चुंगीनाका म्हणजे कर गोळा करण्याचे ठिकाण. नदिचे असे उतार हातात असणं सामरिक व आर्थिक दृष्ट्या सहाजिक महत्वाचं होतं.
समाधीच्या आधी जे पडकं पण मोठं प्रवेशद्वार  होतं तो हाच चुंगी नाका. पावसाळ्यात पाणी बरच येत असेल ना? या प्रश्नावर त्याने समोरच्या क्षितीजावर झाडांची दाट रांग होती, त्याकडे बोट दाखवत म्हणाला – खरंतर  ती झाडं म्हणजे नर्मदेचा समोरचा किनारा. सध्या पाणी उतरुन मध्ये मध्ये वाळूची बेटं तयार झाली आहेत. उजवीकडे दूर त्या मंदिराचा ठिपका दिसतोय? पस्तीस चाळिस वर्षांपूर्वी महापुर आला होता तर त्या मंदिरात पाणी शिरलं होतं. आणि त्यावेळि या समाधीमध्येही पाणी घुसलं होतं म्हणतात.


पुन्हा आमच्या इतर गप्पा सुरु झाल्या, माझ्या टि-शर्ट वरची शिवछत्रपतींची राजमुद्रा त्याला दाखवत म्हणालो – “यह शिवाजी महाराज कि राजमुद्रा है।“ व ती वाचून त्याला त्याचा अर्थ सांगितला. “मुद्रा भद्राय राजते।“ याचा अर्थ ऐकुन  म्हणाला – “आजकल के नेता तो यह मुद्रा पढने के भी लायक नही है शायद।“ खाली उतरता उतरता त्याला विचारले “आप रावशिंदे, मतलब मराठी।“ तसा हसला व म्हणाला - “जी वैसे तो सिर्फ सरनेम मराठी बाकि है, होलकर – शिंदे के साथ कभी दादा – परदादा आये थे …. बस बाद में यही के हो गये। मेरे दादाजी भी इस्कूल टिचर थे, पासही के गॉवमें पढाते थे। कुछ मराठी के शब्द पता है लेकिन सब समझमें नहीं आती, यहां पुणेसे आये लोगोंके साथ श्रीपादजी मराठी में बोलतें है तो थोडि बहुत मराठी सुनने मिलती है, वरना यहॉ कि प्रमुख भाषा निमाडि है।“

पुन्हा समाधीला नमस्कार करुन बुट चढवले. आणि परतीची सुरुवात केली. मध्ये चुंगीनाक्यापाशी थांबलो. या गेटला देखिल कुलुप होते. पुरातत्व खात्याचे बोर्ड लागले होते हे बघुन जरा बरे वाटले जेणेकरुन त्यावर पुढे अधिक्रमण होणार नाही अशी अपेक्षा नक्कि बाळगता येईल. एकेकाळि लाखो रुपयांचा कर गोळा केलेली वास्तू अशी पडिक झालेली बघुन पुन्हा इतिहासाविषयी अनास्था असलेल्या
.
समाजाची किव वाटली. मागे वळलो तर समोरच्या टेकडि वरचे मंदिर दाखवत चेतन म्हणाला – “वह मंदिर राऊजी गुजर जाने के बाद उनकि याद में काशीबाईसाहेब ने बनवाया था।“
आमचा परतीचा प्रवास जरा सुसह्य वाटला. यावेळि चेतनने कि थोडा वेगळा रस्ता घेतला होता बहुदा. कारण पहिल्यापेक्षा खड्डे किंचित कमी होते. चेतन भरभरुन बोलत होता. सरकारवरती अखंड तोंडसुख घेत होता. – “इस जगह अगर किसी बादशहा का गुंबद होता तो सरकार खुद उसपर पैसा खर्च करती, मेले लगतें यहॉ पर। इस देश में शिवाजी राजा, राणा प्रताप या पेशवा पंडित होना शायद गुनाह है। भूल जाते है लोग …. अकबर महान कहलवाता है, कुतुबशहा और औरंगजेबकी कब्रपे लोग फुलोंकि चादर चढवाते है, और यहॉ एक फुल रखने कोई आता नहीं …. हमारी तरफसे इस समाधी को प्रकाश में लाने के लिये और बचाने केलिये कोशिश कर तो रहें है। लेकिन लोगों का साथ चाहिये …. बोलना तो चाहता नही लेकिन पेशवा बाजीराव ने जिनको बडा सरदार बनवाया उनके वंशज आज अपने नाम अंग्रेजो जैसे रखतें है, सालभर परदेश में होते है, वे भूल गये अपने पुर्खोंको। इंदौर यहॉ से सिर्फ ७५ किमी दूर है लेकिन शायद पिछले कई सालों मे होलकर परीवारसे इस समाधी के दर्शन के लिये कोई भी नही आया होगा।“ त्याच्या आत काय जळत होतं ते सगळं माझ्यापर्यंत पोहोचत होतं.

परत बेडियाला आल्यावर त्याने त्याच्या घरी नेले. “आपके भोजनका प्रबंध हो चूका है। हाथ धो लिजिये, थोडा फ्रेश हो जाईए।“ दहा मिनीटातच गरम जेवण आले. त्याला बरोबर जेवायला बसण्याचा आग्रह करताच म्हणाला – “आप आनेसे दस मिनट पहले ही खाना हो चूका था, बिना संकोच के आप शुरु किजिये.” जेवताना घरातल्यांबद्दल माहिती सांगत होता. एक भाऊ CA करतो आहे. चेतन अजुन पुढे शिकायचं म्हणतोय शिवाय अजून चांगली नोकरी शोधतोय. मुंबईला येणं होतं का या प्रश्नावर हसला “जी एक बार बच गये, वापस कब आना होगा पता नही।“ माझ्या चेहर्‍यावरचे प्रश्न चिन्ह बघुन म्हणाला  वो “रेल भर्ती के एक्झाम मे महाराष्ट्राके बाहरवालें लोगोंको पीटा था ना? उसी परीक्षा के लिये आया था. मामा के साथ दुसरेही दिन भाग आया।“ आयला हे ऐकुन हातातला घासच थांबला. मग जरा सावरुन म्हणालो “यह देखो मुंबई मे जो मेहनत करेगा वो कमायेगा …. कुछ राजनिती खेलनेवाले ये चीजे करतें है, राज ठाकरें के बारें मे कहोगे तो उनका कहना पोलटिकल थ्रेट के बारें मे था। तुमने कभी बंगाली या गुजरातींयो को मुंबईमें पीटते हुए सुना है? नही ना? क्योकि वो लोग पॉलिटिक्समे ज्यादा गडबड नही करते। और महाराष्ट्रा मे ही क्यो? किसी भी प्रांतके स्थानिय लोगोंको नौकरी एवं शिक्षा में उस राज्यमें पहला चान्स मिलना चाहिये।“ त्यालाही ते पटलं.

जेवण झाल्यावर त्याला  विचारलं “चेतनजी, पेट्रोलका कितना खर्चा हुआ प्लीज बताइये!” तसा माझा हात खाली दाबत – “आप मेहमान है, भुल जाईये!” त्याला समजावण्याचा खूप प्रयत्न केला कि बाबा दुसर्‍या कुठल्या पर्यायाने हे केलं असतं तर खर्च करावाच लागला असता मग तुला का देऊ नये? पण ऐकेच ना. “अगर ३-४ लोग होते और बडि गाडी करनी पडती तो जरुर ले लेता, लेकिन आप इतनी दुर से समाधी के दर्शन के लिये आये बहुत अच्छा लगा, पैसे देने कि जिद से अच्छा है के हो सके तो अप्रैल में पुण्यतीथी के दिन जरुर आने कि कोशिश किजिए! बडा समारोह होता है।“

त्याला व डॉ सोनींना भेटुन मी परत सनावतचा रस्ता धरला. एक इच्छा पूर्ण झाली होती, पण २८ एप्रिलला परत रावेरखेडिला यावं या नव्या इच्छेला मनात रुजवुन ती गेली होती. सुर्य कलतीकडे झुकला होता माझा प्रवास इंदोरच्या दिशेने सुरु झाला होता, का ते माहित नाही पण थोरल्या बाजीरावांच्या विषयी विचार करताना मनात सारखं दबंगचं टायटल सॉग आपसूक वाजत होतं –

दबंग!

“मन बलवान, लागे चट्टान, रहे मैदान में आगे ….
जो जुंझार हो तैय्यार, वहि सरदारसा लागे ….
धार को काटे रे, चीर धरे सन्नाटे रे, जब वीर भरे हुंकारे ….. दबंग दबंग दबंग

जब बात आन पे आवे रे
वो बाण करज पे खावे रे
जो सब के प्राण बचावे रे ….  है वो ही दबंग

वो शूरवीर कहलावे रे
सर काल बने मंडरावे रे
 दुष्मन को मार गिरावे रे …. है वो ही दबंग

धार को काटे रे, चीर धरे सन्नाटे रे, जब वीर भरे हुंकारे ….. दबंग दबंग दबंग.


 - सौरभ वैशंपायन.