Tuesday, September 21, 2010

बुध्द !जगलो काल पावतो, जणू अनिरुध्द मी,
जोर ना चाले कुणाचा, ना कुणाशी बध्द मी.
बांधिल मी माझ्या मनाला, अंतरातील युध्द मी,
संगराच्या मध्यभागी, शांत निजला बुध्द मी ॥१॥वज्र अस्थिपंजराचे, दान देण्या सिध्द मी
तोडती लचके गिधाडे, ना तरीहि क्रुध्द मी,
सोहळे ना सोवळ्याचे, निष्कलंक शुध्द मी,
संगराच्या मध्यभागी, शांत निजला बुध्द मी ॥२॥

- सौरभ वैशंपायन.

Wednesday, September 1, 2010

ए मुहोब्बत तेरी अंजाम पे रोना आया.....
ए मुहोब्बत तेरी अंजाम पे रोना आया


बेगम अख्तरांचा आवाज म्हणजे एखाद्या धारदार कट्यारी सारखा होता. त्यांची फारशी गाणी मी ऐकली नाहियेत पण जी काहि बोटावर मोजण्याइतकि ऐकली त्यातले "ए मुहोब्बत तेरी अंजाम पे रोना आया..." हे मला सर्वात आवडलेले गाणे आहे.

बेगम अख्तरांचा एक किस्सा मध्ये मला श्री अंबरीश मिश्र यांच्या "शुभ्र काही जीवघेणे" या अप्रतिम पुस्तकात वाचायला मिळाला होता. बहुदा लाहो्रच्या एका मैफिलीत त्यांनी २-३ बंदिशी सादर केल्या. मग एका बंदिशीला त्यांनी एक तान घेतली त्यांच्या गळ्यातुन तो वरचा स्वर इतका जबरदस्त आला कि त्यांनी तिथल्या तिथे गाणे थांबवले व म्हणाल्या - "सुभान अल्लाह क्या चीज है!" आणि मग पुढे त्या गायल्याच नाहित.

कलाकाराला आयुष्याच्या कुठल्या वळणावर कलेचा खरा परीसस्पर्श होईल कोणी सांगु शकत नाहि. बर्‍याचदा तो स्पर्श आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यातहि होतो. बहुदा त्याक्षणी बेगम अख्तरांना तो झाला होता. त्याक्षणी त्यांना तो स्वर दिसला होता, त्यांनी त्या स्वराला स्पर्श केला होता.

- सौरभ वैशंपायन.