Monday, February 4, 2013

स्पंदने


भर थंडित त्याच्या अस्ताव्यस्त पहुडल्या उघड्या, काळ्या, थंडगार पडलेल्या अंगावरती मी हात टेकवला, खरंतर मलाच तेव्हा आधाराची गरज होती. त्याच्या थंड पडलेल्या देहातली धुगधुगीही अजूनही जाणवत होती. त्याच्या राकट कणखर देहातल्या नसां हाताला जाणवत होत्या. त्यात कधीकाळी गरम लाव्हाच वाहिला होता. त्याचे श्वासही सुरु होते. मी दूरवरती नजर फिरवली. उन्हं चढायला नुकतीच सुरुवात झाली होती. मी देखिल दूरुन त्याला भेटण्यासाठी बराच वेळ चालून आल्याने माझ्या अंगातून घामाच्या धारा लागल्या होत्याच. मी आल्याचा त्याला आनंद झाला होता की नव्हता मला कळत नव्हतं. बहुदा त्याला त्याचं सुखं दुखं काहीच नसावं. त्याची सध्याची एकंदर अवस्था गीतेच्या स्थितप्रज्ञाची झालीये. कधीकाळी ज्यांच्या बापजाद्यांना त्याने सर्वतोपरी मदत केली होती आज त्यांचे वंशज त्याकडे फार अनोळखीपणे बघतात. ओळख दाखवणारे अर्थात माझ्यासारखे हजारो रोज त्याला भेटायला येतातही, काही त्याच्या जुन्या आठवणी जागतात. पण त्याला भेटायला येणारे अर्धाधिक तर उलट त्याला नवीन जखमाच देऊन जातात. अश्या अनोळखी माणसांमुळे असेल कदाचित विरक्ती हाच त्याचा स्वभाव बनला आहे. त्याच्या सध्याच्या अवस्थेकडे बघून कधीकधी फार गलबलून येतं. त्याचं डोकं मांडिवरती घेऊन त्याला प्रेमाने थोपटता आलं असतं तर किती बरं झालं असतं असंही वाटून जातं. त्याची अवस्था मात्र समाधी लागल्यागत असलेल्या संन्याश्यासारखी क्वचित स्वत:त गुंगलेल्या निष्पाप मुलासारखी. कधी कधी काही ओळखीचे आवाज आले की चेहर्‍यावरती ओळखीचे हसू येतं, वळून बघतो देखिल, पण तितक्यापुरतच. इतरवेळी गुडूप अंधारात स्वत:ला हरवून टाकतो. त्या अंधारात त्याला बघणारं कोणी नसतं. मग डोळे मिटून उसासे टाकत शांत झोपला कि रोज रात्री त्याला स्वप्न पडतात. त्याचे जूने वैभवाचे दिवस त्याला दिसतात त्याच्या डोईवरती चढवलेली मोठी पागोटी, अंगावर खास त्याच्यासाठीच घडवलेले दागिने ..... अचानक त्याला वास्तवाची जाणीव येते तो दचकून जागा होतो, परत परत विस्कटलेली पागोटी, तुटलेले दागिने बघतो त्यालाही मग भरुन येतं. त्याच्या डोळ्यांच्या कडांनाही पाणी साठतं, छाताडावरती वाट्टेल ते घाव सहन करणार्‍या त्याला, ते अश्रू घरंगळताना कोणीतरी पाहील ह्याची तितकी भीती वाटत रहाते. त्याच्या सुदैवाने त्याचवेळी आकाशात वीजा कडाडून पाठोपाठ धो धो पाऊस सुरु होतो त्याचे अश्रू आणि पाऊस यातला फरक फार कुणाला समजत नाही. ज्यांना समजतो ते त्याच्या जवळ जातात. त्याला मिठीत घेण्याचा प्रयत्न करतात. पण त्याच्या विशाल, पिळदार देहापुढे सगळेच हात चिमुकले वाटतात. पण तरीही मी त्याला बिलगतो, त्याच्या निधड्या छातीवरती डोकं ठेवतो. नीट कान देऊन ऐकलं तर त्याच्या हृदयाची लयबद्ध स्पंदने देखिल ऐकू येत रहातात - शिवाजी ... शिवाजी ... शिवाजी ... शिवाजी.

 - सौरभ वैशंपायन.