Sunday, October 24, 2010

दुर्दम्य


http://www.foreignpolicy.com/articles/2009/12/30/afghanistan_2009_a_year_in_photos?page=0,43


काल अगाणिस्तानविषयी थोडे सर्फिंग करत असताना या लिंक वरती पोचलो आणि पुढला जवळपास पाउणतास वेड्यासारखे यातले फोटो बघत होतो. २००९ साली अफगाणिस्तानात वेगवेगळ्या फोटोग्राफर्सनी काढलेले फोटो आहेत. ४९ फोटोतुन अफगाणिस्तानचा वर्षभराचा प्रवास यात दाखवला आहे. प्रत्येक फोटोमध्ये एक गोष्ट आहे.

वरच्या फोटोपाशी आलो आणि अफगाणिस्तानातील सत्य परीस्थिती समजली. इतकं खरं चित्र क्वचित बघायला मिळतं. अफगाणिस्तानाच्या राजकिय, भौगिलिक, लष्करी इतिहासाविषयी आजवर खूप काही लिहीले गेले आहे. पण अफगाणिस्तानमधील सामान्य माणसांविषयी किती लिहीले आहे हा प्रश्न उरतोच. लिहीले असले तरी ते काल्पनिक, कादंबरी स्वरुपात लिहीले आहे. शौझिया, परवाना ही काही प्रातिनिधिक उदाहरणे देताही येतील. पण ते शब्दचित्र, जिवंत चित्र नव्हे. दुर्बल राष्ट्र बलाढ्य देशांची प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष समरांगणे कशी बनतात? ह्याचा नियतीने घालुन दिलेला पाठ म्हणजे अफगाणिस्तान. कुसुमाग्रज म्हणाले होते - "धर्माचा ध्वज जेव्हा अडाण्यांच्या हाती जातो, तेव्हा त्या ध्वजावरुन गळणारे रक्त त्याच धर्माचे असते!" आधी रशिया, मग तालिबान आणि आता अमेरीका ..... गेली चाळिस वर्ष अफगाणिस्तानात पाऊस पडतो तो बॉम्बचा, पिक येतं ते सुरुंगांचं आणि अफूचं, आणि हवा वाहते ती रासायनिक धूराची. हे कधी संपणार ह्याचं उत्तर अजूनही दृष्टिपथात नाहीये. म्हणून याचं तात्पुरतं उत्तर इथल्या माणसांनी शोधलय - आहे तो क्षण आनंदात जगा.

कब्रस्तानात उभं राहुन पतंग उडवण्याची "मजा" घेणे हा केवळ नाईलाज नाहीये, परीस्थितीने शिकवलेला धडा आहे. गेली चार दशकं संपूर्ण देशच कब्रस्तान बनला असताना माणूस आनंदि कसा राहू शकतो? या प्रश्नाचं उत्तर "जावे त्याच्या वंशा" याच शब्दात द्यावं लागेल. कदाचित हरवण्यासारखं काही उरलच नसल्याने याहुन वाईट काही असूच शकत नाही, जे काही वाईट व्हायचय ते होऊन गेलय या भावनेतुन कदाचित आजची अफगाणी माणसे जगत असतील. आनंद ही मानसिक अवस्था आहे. आणि एखाद्याने आनंदी रहायच ठरवलंच तर तो कुठेही आनंदी राहु शकतो ह्याचं हे चित्र आहे.

अफगाणच्या रखखित मातीतून आज अफू तरारुन उभा रहातो आहे, उद्या रसरशीत नाजूक फुलं देखिल उमलतील या दुर्दम्य आशेवर जगणार्‍या सामान्य अफगाणी माणसाला सलाम!

- सौरभ वैशंपायन.