Monday, June 15, 2009

सोहळा

काजळ उधार मागावे, तुला आभाळाने आज
अन सोबत मागावी, तुझ्या कटाक्षाची वीज - १

मग अधीर थेंबांनी, तुझी मोहरावी कळी,
एक अवखळ बट, अन गालावर खळी - २

ओला आसमंत सारा, ओला मातीचा सुवास,
ओली ओठांची पाकळी, ओले मोकळाले केस - ३

अशी कडाडावी वीज, उरामध्ये झंझावात,
ओले गौर तनु तुझे, ओघळावे अंतरात - ४

सये असा उतरावा, तुझ्या रुपाचा सोहळा,
आणि कोसळुन जावा, नवा पाऊस हळवा - ५

- सौरभ वैशंपायन.

Thursday, June 11, 2009

इतिहास

सेंट हेलेनातील तुरुंगातुन नेपोलियन ने आपल्या मुलाला जे पत्र लिहिले त्यात तो म्हणतो – “इतिहासासारखा गुरु नाहि, आयुष्याचे तत्वज्ञान ज्याला म्हणतात ते इतिहासाच्या मननानेच तयार होते!” स्वत: इतिहास घडवणार्‍या माणसाचे हे अनुभवी शब्द आहेत. इतिहास हि काळाची पाऊले आहेत, काळ स्वत: पुढे जाताना हि पाऊले मागे ठेवुन जातो. काळ स्थितप्रज्ञ असला तरी त्याची पाऊले कुठल्या दिशेने पडतील हे समजायला त्याच्या आधीच्या पाऊलांची दिशा बघणे क्रमप्राप्त असते. आणि वेळ पडल्यास राष्ट्र निर्मितीसाठी ती पाऊले बदलण्याची ताकद अंगी बाणावी लागते. इतिहासात काय घडले ह्याचा बारीक अभ्यास केला तर भविष्यात इतिहास घडवता येतो – वाक्य विचित्र वाटेल पण खरे आहे. हिटलर ने सिध्द करुनहि दाखवले. सत्तेत आल्यावर त्याने दरवेळी अश्या कृती केल्या ज्याने जर्मन राष्ट्राच्या अस्मितेला चेतवले जाईल. मग ते व्हर्साय कराराच्या जाहिर चिंध्या करणे असो, किंवा फ्रान्सची शरणागती त्याच गाडिच्या डब्यात घेणे असो. ज्या घटनांनी जर्मनीच्या मानहानीचा इतिहास रचला त्याच घटनांना त्याने उलटे फिरवले. मात्र हाच हिटलर रशियावर हल्ला करताना इतिहासातील काहि गोष्टि नजरेआड करता झाला आणि जर्मनी पराभवाच्या गर्केत फेकला गेला.“

काय करायचे?” या पेक्षा “काय करायचे नाहि?” हे इतिहासापासुन शिकावे. इतिहास बदलणे शक्य नसते वेळप्रसंगी निदान शब्द बदलावेत. इतिहास शिकवतानाच राष्ट्रीय अस्मितेला हात घातला जाईल असा शिकवावा. आपापल्या देशाचा नागडा स्वार्थ कसा साधावा व प्रसंगी दुसर्‍याला नागवुन आपले भले कसे करावे याची उदाहरणे जगाच्या इतिहासात पानोपानी मिळतील. दुसर्‍या महायुध्दाआधी ब्रिटिशांनी जगाचे मातेरे केले आणि नंतर अमेरीकेने. या जगातला असा एकहि भाग नाहि जिथे या दोन उपद्रवी देशांनी अशांतता निर्माण केली नाहिये. स्वत:च्या पोळिवर तुप ओढताना या दोघांनी कसल्याहि नीती नियमांची तमा बाळागली नाहि. किती रक्तपात होतो याची फिकिर केली नाहि. यांनी शस्त्राच्या बळावर आपल्याला हवा तसा इतिहास लिहिला. हवे तसे निष्कर्ष काढले. पण म्हणून काळ त्यांना माफ करेलच असे नाहि. आज दहशतवाद अमेरीकेला उध्वस्त करायला उस्तुक आहे आणि हे अमेरीकेच्या कर्माचेच फल आहे. पण इथे भारताचे बरोबर उलटे झालेय, दरवेळी पडती बाजु घेतल्याने भारतासमोर दहशतवादाचा प्रश्न उभा आहे.

प्रत्येक भूमीचा एक स्वभाव असतो. जसा मध्यपुर्वेच्या भूमीला कायम रक्ताची तहान आहे तशीच भारताची भूमी हि मुळातच शांतताप्रिय भूमी आहे. गेल्या अडिच हजार वर्षात भारताने कोणावरहि आक्रमण केले नाहिये, मात्र भारतावर अव्याहत आक्रमणे झाली. जगात भल्याभल्या संस्कृती आणि साम्राज्ये उदयास आली अणि धुळीला मिळाली, मात्र भारत सगळी आक्रमणे पचवुन आजहि उभा आहे, नाहि म्हणायला काहि कधी भरुन न येणार्‍या काहि जखमा झाल्याहि पण वैदिक संस्कृती मात्र नामशेष झाली नाहि. असे असताना डॉ. आंबेडकरांसारखा विद्वान जेव्हा “हिंदुंचा इतिहास हा पराभवांचा इतिहास आहे!” असे विधान करतो तेव्हा राग येण्यापेक्षा त्रागा होतो. मुळात इतिहास शिकवण्यातच चुक होतेय. जग पालथे घालणारा सिकंदर भारताचे अंगणहि पार करु शकला नाहि, हुण, शक यांच्या टोळधाडि जगभर उच्छाद मांडत असताना भारत त्यांना पुरुन उरला हे का सांगत नाहि? एकछत्री साम्राज्याचे स्वप्न देणार्‍या आर्य चाणक्यांचा इतिहास का शिकवत नाहि? मुघलांचा इतिहास २ धड्यांत विभागुन दिला जातो मात्र शिवछत्रपती, राणाप्रताप एकेका परीच्छेदात संपतात याचे आश्चर्य वाटते. संभाजीराजे आणि थोरल्या बाजीरावांचा २ ओळिंपेक्षा जास्त उल्लेखहि मिळत नाहि. पण दुसर्‍या बाजीरावाच्या पानभर चुका दाखवल्या जातात. १८५७ ला शिपाईगर्दि ठरवले जाते. टिळक मंडालेयात हवापालटाला काय गेले होते आणि वेळ जावा म्हणून गीतारहस्य लिहिला जवळपास अश्या पध्दतीचा इतिहास शिकवला जातो. सगळे क्रांतिकारक एकमेकांच्या कोपरांना ढुश्या देत बिचारे एकाच धड्यात कोंबले असतात. बाकि इतिहास १९२० पासुन सुरु होतो. आणि व्हाया १९४२+ गोलमेज परीषद, लाल किल्यावर संपतो. सगळं कसं मिळमीळीत. बचावात्मक मानसिकता तयार करायची सवयच लागलीये. जरा म्हणून आक्रामकता नाहि. तीच तीच पाठ्यपुस्तके, तीच जरुरीच्या मार्कांपुरती बघायची दृष्टि. तसेहि इ.भू.ना. मध्ये ५० मिळाले कि आम्हि धन्य. खर्‍या अर्थाने उद्याचे नागरीक घडवणार्‍या या तीन विषयांबाबतच कमालीची अनास्था. सन आणि तहांची कलमे लिहिली कि मार्क्स मिळतात. बाकि वासुदेव बळवंत फडके कोण? सुभाषबाबुंनी काय अग्निदिव्य केले? याच्याशी काहिहि सोयरसुतक नसते. शिवरायांना रायगडावर जन्माला घालणारी आणि शिवनेरीवर राज्याभिषेक करवणारी विद्वान मंडळी कमी नाहित. हि आमची इतिहासाबद्दलची आस्था. चित्रपट बनवले तरी त्यात असोका कलिंगच्या राजकुमारीबरोबर नाचतो, आणि अकबराला जोधा शिवाय काहि दिसत नाहि.


आमच्या राजधानीत आजहि घोरी, बाबर, अकबर, हुमायुन, औरंगजेब यांच्या नावाचे रस्ते आहेत, मुंबईच्या संग्रहालयाच्या पाटिवर “छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय” या शेजारी कंसात - “जुने प्रिन्स ऑफ वेल्स संग्रहालय” असे लिहिले जाते. गेट वे ऑफ इंडियाच्या सुशोभिकरच्या नावाखाली करोडो रुपये खर्च होतात पण युनियन जॅक आपल्या बगलेत मारुन शेवटचा ब्रिटिश याच वास्तुमधुन बाहेर पडला असे शिल्प सोडा साधी पाटिहि लावली जात नाहि. शिवरायांचा पुतळा समुद्रात उभा करायला काहि शे करोड रुपये जाहिर करतात पण एकेकाळी महाराजांच्या काळजाचे तुकडे असलेले बेलाग किल्ले मोडकळिस आले आहेत हे सोयीस्करपणे सरकार व जनता विसरते. भारताला स्वातंत्र्य “बिना खड्ग बिना ढाल” मिळाले हे धातांत असत्य सांगताना कोणाची जीभ जराहि अडखळत नाहि. आमचे जवान युध्द जिंकतात आणि नेते त्यांना त्यांच्या सहकार्‍यांच्या रक्तरेषेवरुन परत बोलावुन, "झाले गेले विसरुन जाऊ" अशी चाल न बदलणारी शांततेची रटाळ गाणी गातात. मग आत्मिक समाधानासाठी आम्हि “इस्त्राएल असं नाहि करत!” म्हणुन त्यांच्यासाठी चार टाळ्या वाजवतो आणि शांत होतो. कारण आमचा शालेय इतिहास हा अहिंसा शिकवतो एका कानफटात मारल्यावर दुसरा गाल पुढे करायला सांगतो. निदान आपल्या देशाने जसे वागावे असे वाटते तसे दुसरा देश वागतोय हे दिसल्यावर अशी सहाजिक भावना त्यापाठी असते. मग यातुनच स्वकियांचेच कसे चुकले हेहि सांगणारी कोडगी मनोवृत्ती तयार होते. "अकबर महान सम्राट था, शिवाजी तो लुटेरा था।" अशी गरळ उत्तरेतली तरुण मंडळी इंटरनेटवर ओकताना सापडतात. या वृत्तीला समाजवादि, कम्युनिस्ट किंवा मानवतावादि वृत्ती असेहि समानार्थी शब्द आहेत. ते चुकिचा इतिहास अजुन रंगवुन सांगतात. हे चक्र अव्याहत चालुच राहते. बरं शिकवा पानिपताचा पराभव कोण नको म्हणतोय? पण हेहि सांगा कि हे राष्ट्रावरच संकट एकट्या मराठ्यांनी आपल्या छातीवर घेतलं. अब्दालीला असा फ्टाकारला कि परत दिल्लीत फिरकला नाहि. डंकर्कच्या पळपुटेपणाला यशस्वी माघार म्हणावताना त्यांना लाज वाटत नसेल तर राष्ट्र वाचवताना रणात मरुन पराभव झाल्याची खंत आपण का बाळगावी? पण चर्चेत सर्व गमावुन यशाला गालबोट लावणारे, पराभवाची धुंदि तरी बाळगतील हे शक्य नाहि.


आम्हि आमचा इतिहास लिहित नाहि, मग कोणी ग्रॅंट डफ मराठ्यांचा आद्य इतिहासकार म्हणवला जातो, १८५७ च्या स्वातंत्र्यसमराला इंग्रज उठाव-जिहाद म्हणतात आम्हिहि तेच मानतो, जगभरातील नकाशे “POK” पाकिस्तानचा भाग दाखवतात आम्हि आक्षेपच घेत नाहि. तिबेट गिळुन चीन सिक्कीमकडे वळतोय आम्हि निद्रिस्त. स्वत:लाच एकदा विचारा पुर्वेकडील सातहि राज्यांची नावे एका फटक्यात मला सांगता येतात? त्यांची राजधानी कोणती ते मला माहितीये? त्यांचा इतिहास मला माहितीये? त्यांना मी “ए चीनी” अशी हाक मारतो आणि आमच्याशी जोडलेली नाळ हिसडामारुन तोडतो. याच गोष्टितुन इतिहास घडतो, विघटनवादि वृत्ती येते मग ते आपल्याकडे बोट दाखवुन “यु इंडियन” अशी हाक मारतात. काळ अश्या चुकांना माफ करत नाहि.

इतिहासात काय नाहि? देव देश, धर्म, भाषा, विज्ञान, कला, भूगोल या सगळ्याला इतिहासाने वेढले आहे. हाच इतिहास जपा, मनन करा, राबवा अन्यथा कोणी जेम्स लेन येऊन तो विकृत करेल आणि आम्हि एकमेकांची नरडि धरु. परत ये रे माझ्या मागल्या… आम्हि भांडु आणि पुस्तकात परकियांच्या कौतुकाचे पोवाडे गायले जातील.

अजुन काय लिहिणे सुज्ञ असा.

लेखनसीमा।


- सौरभ वैशंपायन.