Tuesday, July 22, 2008

आर्य

१>गिधाड!

मध्यानीच्या सुर्यालाहि झाकुन टाकावं इतकी गिधाडं आकाशात गरगरत होती. आज त्यांना बर्‍याच दिवसांनी पोट फुटेतोवर खायला मिळणार होते. त्यांच्या चोचींना लाल रंग चढणार होता आणि त्यांच्या जिभेला गरम रक्त लागणार होतं. खाली हजारो प्रेते रक्ताच्या चिखलात पडली होती. त्यात लहान-मोठे, स्त्री-पुरुष असा कुठलाच भेद नव्हता. वाचलेली लहान मुले त्या प्रेतांजवळ फतकल मारुन भीतीने रडत ओरडत होती. त्यातहि ज्यांच वय नेमकं काय झालय हे कळण्या इतपत होतं त्यांची पाचावर धारण बसली होती. भीत-भीत ते त्या प्रेतांच्या खचात आपले नातेवाईक शोधत होते. काहि मरणपंथाला लागलेले जीव तळमळ करत एक घोट पाण्याची अवास्तव अपेक्षा करत यमदुतांच्या वाटेकडे डोळे लावुन बसले होते. आजुबाजुला फुटकि भांडि-कुंडि, घोड्यांनी तुडवुन काढलेले तंबु, गळुन पडलेली रक्ताळलेली शस्त्रे असं बरच सामान विखुरलेलं होतं. जे या यातनातुंन सुटले होते ते नशीबवान होते म्हणायचे, निदान ज्या स्त्रीया पहिल्या हल्ल्यात मेल्या त्या सुटल्या कारण ज्या जिवंत राहिल्या त्यांच्या अर्धमेल्या देहाला सिकंदराच्या ग्रीक लांडग्यांनी ओरबाडुन त्यांची लक्तरे केली होती. आणि आता वरची गिधाडे त्यांच्या मरणाची वाट बघत होती. आणि हळु-हळु गिधाडे गिरक्या घेत खाली उतरु लागली, थोड्याच वेळात रक्ताचा वस हुंगत कोल्हि-कुत्री देखिल आली आणि त्या ठिकाणाला यमपुरीहुन वाईट दशा आली.

गांधार, राणीगत, उत्तखंड सारखी अनेक राज्य आणि गणराज्य जिंकत सिकंदर तक्षशीलेपर्यंत आला होता. आता त्याचा मोर्चा केकय साम्राज्याकडे वळला. मात्र केकयच्या आधी मस्कावतीनं त्याची वाट रोखली. चुटकीसरशी जिंकु या भ्रमात असलेल्या ग्रीक सैन्याचे डोळे पांढरे व्हायची वेळ यावी असा तिखट प्रतिकार मस्कावतीनं केला. खरं तर असा प्रतिकार त्याला प्रत्येक राज्याकडुन होत होता अपवाद फक्त तक्षशीलेच्या अंभीचा होता. स्वत:हुन त्याने सिकंदराशी हात मिळवणी केली होती, कारण त्याला पौरव राजाला हरवायच होतं आणि त्यासाठि तो कुठल्याहि थराला जायला तयार होता. तक्षशीलाच फितुर झाल्यावर सिकंदराला भारताचे दरवाजे सताड उघडे झाले. आणि आता तो त्या भागातल्या एकुलत्या एक बलशाली राज्यावर चाल करुन जात होता, केकयवर- पौरव राजावर. पण केकयवर जाताना मस्कावतीनं वाट रोखली. एखाद्या मद चढलेल्या हत्तीला मुंगीनं हैराण करावं तसं मस्कावतीनं आपली चिमुटभर ताकद सिकंदरा विरुध्द वापरली. मात्र नाईलाज झाला. मनुष्यबळ, शस्त्रास्त्रे, पैसा या बाबतीत सिकंदर शेकडो पटीने बलाढ्य होता. सिकंदर जग जिंकायच्या महत्वाकांक्षेने पिसाट झाला होता. त्या मस्कावतीच्या नागरीकांना-सैनिकांना बिचार्‍यांना आपले राज्य वाचविणे हाच एक उद्देश होता. पिसाट वृत्तीने मस्कावतीचा बचाव मोडुन काढला. गणराज्याचा नेताच पडला म्हणून वेळ पडली तेव्हा त्या राज्यातल्या स्त्रीयाहि त्या नेत्याच्य पत्नीच्या बरोबर तलवार घेऊन मैदानात उतरल्या. पण असा कितीसा टिकाव लागणार होता? अखेर मस्कावतिनं हत्यार ठेवलं.

सिकंदरानं गणराज्यातील काहि प्रमुखांना बोलावुन त्यांना सांगितले - "आमच्यात सामिल व्हा आणि पुढे लढाईत मदत करा, किंवा हे राज्य सोडुन दुर निघुन जा! दोन्हि मान्य नसेल तर तुमचा विनाश ठरलेला आहे!! आम्हाला सामिल झालात तर योग्य मोबदला देऊ किंवा जायचे असेल तर निघुन जायला तुम्हाला २ दिवसांची मुदत देतो!! तिसरा दिवस विनाश घेऊन उगवेल!" पराभूतांना स्वत:च मत नसत. बिचारे काय करतात? विचारांती ठरवलं - आपण दुर निघुन जाऊ, निदान त्या अंभी राजा सारखी आपली तलवार स्वकियांच्या रक्तानं माखवण नको. आपल्या पिल्लांचे आयुष्य इथुन दुर सुरक्षीत तरी राहिल. मोठ्या जड अंत:करणाने, जिथे उभं आयुष्य काढलं ती मातृभूमी सोडुन तिथले नागरीक निघाले. पण इतक्या हजारो लोकांचा प्रवास सहाजिकच धीम्या गतीनं होऊ लागला. पहिलाच मुक्काम नगराच्या वेशी बाहेर थोड्याच अंतरावरील माळावर पडला. सकाळी उठुन निघण्याच्या तयारीत असताना अचानक धुळीचे ढग उठले. घोड्यांच्या टापांचा आवाज वाढत गेला आणि आली - सिकंदराच्या सैन्याची गिधाडि धाड मस्कावतीच्या बेसावध नागरीकांवर पडली. सिकंदरानी शब्द मोडला होता....कपटाने त्यांचा काटा काढला होता...जग्जेता म्हणवणार्‍याकडे शब्द राखण्याचीहि दानत नव्हती. क्षणभरात अमानुष कत्तल उडाली. सारे मातीमोल झाले. कापाकापी, बलात्कारांना ऊत आला. जे या तडाख्यातुन वाचले ते नेसत्या वस्त्रानिशी परागंदा झाले. मागे राहिले आक्रोष, शाप, अश्रु आणि मृत्युचे शिसारी आणणारे तांडव.

- सौरभ वैशंपायन(मुंबई).

Thursday, July 17, 2008

रारंग ढांग

"श्री प्रभाकर पेंढारकर" यांच्या "रारंग ढांग" या पुस्तकातील मला आवडलेले २ उतारे इथे देतोय. हे दोन्हि उतारे त्या पुस्तकातील "मिनू खंबाटा" या पात्राने गाजवले आहेत. झक्क्क्क्क्क्कास आहे. वाचा नक्कि प्रेमात पडाल.१]

नाइन्थ फील्ड कंपनीत मिनूचं काम होतं की नाहि ते माहित नाहि. मात्र तेथुन पुढं डिटॅचमेंट थ्रीला तो विश्वनाथला सोडायला आला. कालचीच ओळख पण अगदि पूर्वापार जानी दोस्ती असल्यासारखी. विश्वनाथ एकटाच राहणार आहे म्हणुन त्यानं उंची व्हिस्किची छोटि बाटली आणलेली.

"दोस्त, हि जागा मोठि सुरेख आहे." खोलीची पहाणी करत मिनू म्हणाला. तात्पुरत्या बांधलेल्या पत्र्याच्या ह्या खोलीत त्याला काय छान दिसलं ह्याचा विश्वनाथला अंदाज येईना. त्यानं विचारल तसं मिनू हसुन म्हणाला "हनीमूनला अशी जागा शोधुन सापडणार नाहि. हा इथला एकांत, नि:शब्द शांतता, दूरवर दिसणारा किन्नोर कैलास, एका बाजुला रारंग ढांग....आणि खालुन वाहत जाणारी सतलज. निळ्या निळ्या आकाशाखाली, खुल्या निसर्गाच्या सान्निध्यात नुकतं लग्न झालेली पण अद्याप प्रियकर आणि प्रेयसी असलेली फक्त दोघं जण! आलीच तर पावसची एखादि सर! उफ, अश्या भिजलेल्या ओल्या ओठांच तू कधी चुंबन घेतलं आहेस? - नाहिऽऽ?? अरे दोस्ता, त्याइतकं सौदर्याच दुसरं ऍप्रिसिएशन नाहि. प्रेमाला दिलेलं दुसरा इतका मोठा कॉंम्ल्पिमेंट नाहि!!"
विश्वनाथ नुसता हसला. विव्हल होत मिनू म्हणाला "दोस्ता, हसु नकोस. चुंबना बाबत आपण बोलतो आहोत. काहि जणी चुंबन घेतलं कि लाजुन लाल होतात, काहि रागावतात, काहि चावतात, काहि मारतातहि. ह्या सर्व परवडल्या. पण तुम्हि भावनेच्या आवेगात, भान हरपुन चुंबन घेतलत कि काहि चक्क हसत सुटतात. ह्या इतकि दारुण फजिती दुसरी कोणती असेल? तेव्हा तु तरी हसु नकोस."


२]

सर्व खटाटोप करणं सार्थकि लागलं असं वाटाण्या जोगी हि नारळांची आणि तांदळाच्या पिठाची चीज बनली होती. पुटुची चव अफलातुन जमली होती.
तोंडात घातलेला मोठा तुकडा खात विश्वनाथनं विचारलं,
"तुम्हांला कशी काय हि केरळातली चीज माहित?"
केरळ...लॅंड ऑफ लगुन्स....लॅंड ऑफ गोल्डन पाम...ऍंन्ड लॅंड ऑफ कथकली - एवढचं वर्णन टूरीस्ट गाईडमध्ये केरळच दिलं असतं. अत्यंत अरसिक, कल्पकताशून्य लोक सरकारी नोकरी धरतात आणि वर चढतात. त्यांनी लिहिलेलं वर्णन हे त्यांच्यासारखच रुक्ष आणि साचेबंद."
"तुम्हाला कसा दिसला केरळ?" विश्वनाथनं विचारलं.
"केरळ - माझ्या डोळ्यातुन पहायचा आहे तुला? केरळ लॅंड ऑफ पुटु ऍंड दि लॅंड ऑफ मुंडु!"
"मुंडु? हे काय प्रकरण आहे?"
"दॅट्स इट! ह्या वर्णनाबरोबर उत्सुकता जागी झाली पाहिजे. हा काय पदार्थ आहे? पहायचा? ऐकायचा? खायचा कि अनुभवायचा? पुटु तुला खायला इथे मिळाला पण मुंडु साठि तुला केरळलाच गेलं पाहिजे. mundu has made Keral the land of beauties!"
मिनू हवेत तरंगल्यागत बोलू लागला. त्याचे पाय जमिनीवरुन सुटले होते हे खरं, पण ते केरळच्या आठवणीमुळे कि त्यानं नुकत्याच रिकाम्या केलेल्या रमच्या चवथ्या ग्लासमुळे, विश्वनाथला समजेना.
"सुकुमारन नायर.... ह्या विशुला सांग... what is mundu..? mundu in chirikal!"
"नाहि. मी चिरीकलला कधी गेलो नाहि."
"अरेरे सुकू, मग तु कसला केरळचा? फुकट फुकट घालवलस तू आजवरचं आयुष्य! दोस्ता ग्लास भर जरा....ह्या चिरीकलीच्या आठवणीनं नशा आला, त्यात थोडि इथली रम मिसळु दे. चिरीकल....एक छोटसं खेडं. समुद्रकिनारी वसलेलं! तिथल्या मोपला मुली. संध्याकाळाची वेळ. नदिवरुन परतत आहेत. कमरेवर भरलेली घागर....अंगात लांब हातांचा ब्लाऊज. चिटाच्या कापडाचा, मोठ्या डिझाइनचा. डोक्यावर सफेद रुमाल आणि खाली लुंगी...केरळच्या भाषेत ’मुंडू’!"

विश्वनाथ थक्क झाला. मुंडू म्हणजे लुंगी हे त्याला कल्पनेतही वाटलं नव्हतं. केरळच्या खेड्यात हरवलेला मिनू पुढं सांगु लागला,
"ह्या लुंगीच्या दोन्हि कडा समोर आलेल्या. ह्या कडा चालताना उघड्या पडतात; कधी कधी पाय पुढं लुंगी मागुन येते. हात कमरेवरची घागर सावरण्यात गुंतलेले. कधी जोराचं वार येतं. लुंगी उडते, गोरे गोरे पाय, नाजुक पण भरलेल्या पोटर्‍या....असच जोरदार वारं येईल तर... नजरेत सगळी उत्सुकता दाटते. पण दोस्त. झंझावात आला तरी मुंडू तिथच. वर सरकतच नाहि. This far & no further! म्हणुनच त्या मुंडूच आकर्षण कधी कमी होत नाहि. मिनी मॉड स्कर्ट आले आणि गेले...पण मुंडू तो मुंडूच!"
बोलता बोलतामिनू विश्वनाथ जवळ आला. खांद्यावर हात ठेवत त्यानं विचारलं, "विशू, दोस्त, चल येतोस केरळला?"
"चला..."
मिनू खुर्चीवर बसला. रमचा ग्लास उचलत तो म्हणाला, "पण येऊन काय करणार तु? ह्या रारंग ढांगाच ओझ तुझ्या डोक्यावर! आणि त्यापलीकडं स्वत:च्या सात्विकतेचं, सज्जनपणाचं ओझ! ते विसरायला जमायच नाहि तुला!"
मिनूनं ग्लास अर्धाधिक रीकामा केला. धुंद डोळ्यांनी विश्वनाथकडे पाहत त्यानं विचारलं -
"दोस्ता, खर सांग, कधी वडिल माणासांचा डोळाअ चुकवुन सिगरेट ओढलीस?"
"नाहि!"
एकदा तरी ड्रिंक घेतलस, किमान बिअर तरी?"
"नाहि."
"कुणाच्या मिठीत, काळ्याभोर केसांच्या धुंद वासात स्वत:ला हरवुन गेलायस?"
"नाहि."
"लाल-गुलाबी, नाजुक ओलसर ओठांचा हलकेच मुका घेतलायस?....नाहि? बर, निदान कधी कुणावर तुझ्यासारख्या पथ्यकारक प्रकृतिला मानवेल असं प्लॅटॅनिक प्रेम तरी केलयस?"
"अद्याप तरी नाहि."
"मग शहाण्याऽऽ ती उमा कोण???"
ह्या एकदम अनपेक्षीत प्रश्नानं विश्वनाथ चक्रावलाच. आजच आलेलं उमाच पत्र त्याच्या शर्टाच्या खिशात होतं. ते पाहिलं कि काय ह्याने?
चाचरत त्यानं प्रश्न केला - "कोण उमा??"
"तुला माहित नाहि उमा कोण ते? ठिक आहे! मी सांगतो, जे. जे. स्कूल ऑफ आर्टची विद्यार्थीनी. गोरीपान, गुलाबी कांतीची, लाजर्‍या डोळ्यांची! माहित नाहि तुला?"
विश्वनाथ पार गडबडुन गेला. "खरच तुमची नी तिची ओळख आहे?"
मिनू हसला आणि म्हणाला "मुंबईतली कोणती मुलगी आहे, जी दिसायला सुरेख आले आणि मला माहित नाहि?" बोल, आणखि तिची काय माहिती पाहिजे तुला?
ह्या प्लेबॉय पारश्याची आणि तिची ओळख कशी? हे कोडं विश्वनाथला सुटेना. मनात प्रश्न अनेक पण बाहेर एकहि येईना. त्याच्या मनातल बरोबर ओळखल्या सारख मिनू म्हणाला -
"तिची माझ्याशी ओळेख कुठे झाली, कशी झाली, ऐकायचय? - तिची माझी ओळख काल झाली. इथं हिमालयात झाली."
"म्हणजे?"
"ए चक्कर, तुझ्या खोलीत त्या चित्राखाली ठणठणीत अक्षरात लिहिलय - ’उमा’."
"म्हणजे गोरीपान, लाजरी......"
"ज्यांच्या प्रेमात तुझ्यासारखे भाबडे तरुण पडातात अशा नव्वद टक्के मुली गोर्‍यापान असतात, लाजर्‍या असतात, पण त्यांचे डोळे मोठे बोलके असतात. आणि ह्यापैकी काहिही नसल्या तरी तुझ्या सारख्यांना निदान त्या तशा वाटतात. हे तसं वाटण म्हणाजे प्रेमाच पहिलं लक्षण आहे."
"पण मी कुठ सांगितलं कि मी तिच्या प्रेमात पडलो आहे?"
"पडला नसलास अद्याप तर मग पड! आणि काय रे? तिच्या प्रेमात पडला नसतास तर ते समुद्राच चित्र कशाला आणालस? सत्यसाईबाबाचं आणायच होतस!"
"ते चित्र चांगल आहे!"
त्यापेक्षा ते तिने काढलय हे खर कारण आहे. तुला पटायच नाहि. अस कर उठ इथुन. ती क्वीन्सची बाटली घेऊन ये. अख्खी पाजतो तुला ती पोटात गेली कि तुझ्या तोंडुन जे मनाच्या तळाशी असेल ते बाहेर येईल ते तुला ऐकवतो. तुझा स्वत:चाच तुला परीचय होईल!"
मिनू नशेतहि फार मोहक मिस्किल हसला.
"तू असं कर त्या क्वीन्स च्या बाटलीतली दारु बाहेर ओतुन टाक. स्वच्छ पाणी भर आणि त्यात मनी प्लॅंट किंवा एखादं फुलझाड लाव.अन त्या हिरव्या पानाकडं किंवा एखद्या कळी कडे कौतुकान बघत बैस. तेव्हढच तुला झेपेल. कारण प्रेमाला सामोर जायला मोठ धैर्य लागतं. प्रीतीची बेहोशी अनुभवायला दिल लागतो दोस्त! तो असता तर तर पहिल्या रात्री मी सांगितल होतं ना, डिटॅचमेंट थ्री मधली तुझी खोली हि मधुचंद्र साजरा करायला योग्य जागा आहे हे तु उमाला लिहिल असतस आणि विचारलं असतस "येतेस का? मी वाट पाहतो आहे!" दोस्त तुझ्या त्या दोन ओळींच्या पत्रावर तिनं आयुष्य झुगारुन दिलं असतं."

Tuesday, July 15, 2008

पोटा कडुन PETA कडे .........

People for the Ethical Treatment of Animals (PETA) हि संस्था मुक्या प्राण्यांच्या छळा विरुध्द आवाज उठविते. त्यात मांसाहार करु नका, प्राणीजन्य सौंदर्य साधने वापरु नका हे आणि असे अजुन बरेच मुद्दे ते लोकांसमोर मांडतात. मांसाहार करावा कि नाहि हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. तसेच एखाद्या जातीने मांसाहार करावा किंवा करु नये यावरहि माझे काहि म्हणणे नाहि. मी स्वत: शाकाहारी आहे(खरंतर मी अंड खातो, पण गेल्या वर्षी ट्रेकला मोजुन १ अंड खाल्ल होतं, त्या आधी जवळपास २-३ वर्ष तेहि खाल्ल्याचं मला आठवत नाहि.)


मांसाहार न करण्याची माझी कारणे -

१)फक्त माझ्या जीभेला चांगलं लागतं म्हणुन हाल-हाल करुन एखाद्याचा जीव घेणं मला पटत नाहि.

२)वरील वाक्यावर काहि "विद्वान" म्हणतात मग झाडांना जीव नसतो का? पण त्यात फारसे तथ्य नाहि, कारण झाड(धान्ये,पाला,फळे etc.) परत उगवु शकते. मुठभर गव्हापासुन किलोभर गहु सहज परत मिळु शकतो. किंवा साधी कोथींबिर जरी बाजारातुन आणली आणि एखाद्या भांड्यात पाणी भरुन ठेवली तर हिरवीगार राहु शकते. फाळातल्या बी पासुन शेकडो फळे देणारे नविन झाड उगवु शकते. कोंबडि किंवा बकरीचा एक पाय तोडुन तिला बाजुला ठेवली तर तिथे दुसर पाय़ फ़ुटणार आहे का? किंवा कोंबडिचं पिस खुराड्यात ठेवले तर नविन कोंबडि मिळणार आहे का? म्हणुनच व्हेज अन्नात हिंसा कमी असते. आणि निर्मीती जास्त असते. अगदी काहि रोगांवर देखिल गव्हचे सत्व वापरतात.

३)तुम्ही ज्या क्षणी प्राणी/पक्षी मारता त्या क्षणी "विघटन" सुरु होते. विघटन म्हणजे कुजणे-सडणे. आता विघटन हि फारच नैसर्गीक क्रीया आहे. काहिवेळा तर ’-५’ टेंप्रेचर मध्ये देखिल अतिशय संथ पध्दतीने विघटन चालु असतेच असते. ’-५’ मध्ये जगु शकणारे जंतु असतात. त्यामुळे ते सुगुना चिकन असो किंवा दुर्गुना चिकन असो, स्वच्छ वगैरे असत नाहि. तसे भाजीचे नसते. भाजी जोवर सतत ओली होत नाहि तोवर कुजत नाहि. म्हणजे भाजी जास्त स्वच्छ राहु शकते.

४)मासे कोणी २ दिवस एखाद्या खोलीत उघड्यावर ठेवले आहेत का(वाळवलेले किंवा सुकट/ड म्हणत नाहिये)? किंवा कोणी ठेवेल का? नाहि ना? आम्ही कोबी, मेथी, सीमला मिर्ची ४ दिवस ठेवतो. आणि त्याचा वासहि येत नाहि. कदाचित ती सुकतील पण त्यांच्या वासाने घरात थांबवत नाहिये असं कधी होत नाहि(भाजी "कुजली तर? चा प्रश्न वेगळा आहे, खोलीत ठेवलेली भाजी जर पातळ कपड्याने झाकुन ठेवली(जेणेकरुन स्वच्छ राहिल पण दमट होणार नाहि) तर भाजी ४-५ दिवस सहज टिकते.)

५)मांसाला स्वत:ची अशी फारच कमी चव असते. म्हणजे कोंबडि आणि बदक किंवा बोकड आणि ससा यांच्या मांसात चव वेगळी असेलहि, असायलाहि हवी(नाहितर फायदा काय?) ते चावण्यासाठि देखिल वेगळे कष्ट घ्यावे लागत असतील(मऊ/वातड). पण "बघा कोंबडी कशी तिखट आहे आणि बदक असे आंबट आहे, मात्र अजुन थोडे मोठे झाले असते तर मात्र गोड लागले असत हं!" असे कोणीहि मांसाहारी म्हणु शकत नाहि. व्हेज वाले हे नक्किच म्हणु शकतात.

६)वनस्पतींना खाउन "प्लांट-गुनिया" होत नाहि . काहि वनस्पती विषारी असतात पण त्यांचा वापर आपण भाजीत करतच नाहि. हांऽऽ आता मी धोतर्‍याचेच बी खाणार असं कोणी म्हणालं तर मात्र काहि इलाज नाहि.

७)कढिपत्ता जरी सुकला तरी त्याला १० मिनिटे पाण्यात टाकले कि परत हिरवट होतो, बरं चवहि तीच राहते. मांसाहाराचं असं असतं का?

८)कच्च मांस तुम्ही खाऊ शकता का?(खाऊन दाखवु का? हा मुद्दा नाहिये मी म्हणिन तेव्हा आणि ते खायच मग बड्याचं आणि छोट्याच हा फरक नकोय) पण आम्ही कच्चे कोबी, सिमला मिर्ची, खातो. आजकाल तर चायनीज मध्ये या कच्च्या भाज्यां शिवाय पानहि हलत नाहि.

९)मांसाहारात किती प्रकारच्या चवी देउ शकता? गोड मासे, तुरट कोंबडि आणि कडु बोकड असे कोणी ऐकले अथवा खाल्ले आहे का? नाहि ना? आम्ही मात्र देऊ/खाऊ शकतो.

१०)जेव्हा मांसाहारात variety असते लोकं म्हणतात तेव्हा, शाकाहारात त्याच्या १०० पट जास्त variety आहे हे विसरतात का? इतकिच चव डेव्हलप करायची असेल तर व्हेज पदार्थ जगातल्या सगळ्या चवी देऊ शकतात.
गोड(साखर-गुळ-फळे), आंबट(आमचुर, आमसुल, लिंबु), तिखट(अर्थात मीरची), तुरट(आवळ्याचे लोणचे,/ढेणसे(टॉमेटो सारखा प्रकार)), कडु(कारले,मेथी), जळजळीत(लवंग, काळी मिरी), पांचट(गवार, भोपळा), जळकट(बटाट्याच्या भाजीची खरपुंडि), उग्र(लसुण, कांदा), खरपुस वगैरे वगैरे. या शिवाय - कोबी, कोथिंबीर,शेपुची भाजी या कोणत्या चवीत बसतात हा संशोधनाचा मुद्दा आहे(आणि ते संशोधन दुसर्‍याने करावे, मला भोपळा आणि या तीन गोष्टि अज्जिबात आवडत नाहित!! )
तिखट, जळजळित किंवा जळकट चवी शि्वाय अजुन कोणत्या चवी मांसाहार देऊ शकतो?????सांगण्याचा मुद्दा इतकाच. आपल्या एखाद्या रविवारची सुट्टि एखाद्या कोंबडिची कायमची सुट्टि तर करत नाहि ना? याचा विचार व्हावा.

Tuesday, July 1, 2008

सप्तर्षि

सरनौबत प्रतापराव गुजरांनी शरण आलेल्या बहलोलखान पठाणाला धर्मवाट दिली. महाराजांना ही बातमी समजताच. त्यांनी टाकोटाक सरनौबतांना पत्र लिहीले - "स्वत:ला सरनौबत म्हणवता? तुम्ही तो केवळ शिपाईगिरीच केली! बहलोल इतुका बहुत वळवळ करीत आहे, त्यांस मारुनी फ़त्ते करणे अन्यथा आम्हांस तोंड न दाखविणे!". तीच चिड मस्तकात घेउन सरनौबत प्रतापराव गुजरांनी नेसरी येथे अवघ्या सहा अंगरक्षकांसहीत बहलोलखान पठाणाच्या फ़ौजेवर हल्ला चढवला आणि अजुन एक खिंड पावन झाली.

काय घडविले? कसे म्हणावे सेनापती सुजाण?
कुणा विचरुनी दिला सोडुनि, खासा बहलोल पठाण? -१

पुनश्च अडवा, धुळीस मिळवा, प्रयत्ने भगिरथ करुनी.
तोवर अमान्य असें अम्हांसी, बघणे तव मुख फ़िरुनी. -२

शब्द नव्हे ते कट्यार फ़िरली, उभी काळजा वरती.
गळुन पडला खलिता खाली, नयनांत आसवे भरती -३

रक्त तापले, श्वासागणिक फ़ुलु लागली छाती.
मांड टाकली घोड्यावरती, उडु लागली माती. -४

सात अश्व चौखुर उधळले, तडीताघातासाठी.
म्यानातुनी जणु वीज घेतली, ढाल घेतली पाठी. -५

पठाण दिसता वेग वाढला, ढळुन गेला तोल.
पतंग येता अग्निवरती, खुशीत ये बहलोल. -६

अरीसेनेसी छेदत सुटले, सात शिवाचे बाण.
छातीवरती घाव झेलले, अखेर सुटले प्राण -७

सप्तदलांचे बिल्वपत्र ते, पायी शिवाच्या पडले.
श्वास रोखुनी धरती सारे, आक्रितची हे घडले. -८

बेभान होउनी लढले-पडले, वीर मराठी सात.
तम छेदूनी उर्ध्व दिशेला, झाले सप्तर्षि नभात. -९


- © सौरभ वैशंपायन(मुंबई).