Thursday, November 14, 2013

सिंहासन चोविशीआपल्याकडे सम्राट विक्रमादित्यावरती "सिंहासन बत्तीशी" म्हणून ३२ गोष्टिंचा एक संग्रह आहे. प्रत्येक रात्री सिंहासनावरची एक एक दिव्य पुतळी जिवंत होऊन ते सिंहासन शोधुन काढणार्‍या राजा भोजाला सम्राट विक्रमादित्याच्या एकेका सद्गुगुणाबाबत सांगत असते व शेवटि म्हणते "हे राज‍न, हा गुण तुझ्यात असला तरच तु ह्या दिव्य सिंहासनावरती बैस!" आणि मग राजा भोज मोठ्या मनाने अश्या ३२ रात्री जागुन त्या गोष्टि ऐकतो व अखेर नम्रपणे त्या सिंहासनावरती बसायला नकार देतो. उद्या आपल्या चालत्या बोलत्या विक्रमादित्याचा संपूर्ण कारकिर्दितला शेवटचा सामना आहे. अर्थात त्याचे वेगळे असे सिंहासन कधी नव्हते, पण मागे सचिन वरीलच एका लेखात म्हणालो होतो तसं "सिंहासनासाठी सम्राट नसतो सम्राटांसाठी सिंहासनं असतं, आणि ते नसलं तर सम्राट जिथे बसतो ती जागा आपसूक सिंहासन होते!" उद्याची कसोटी संपेल तेव्हा आम्ही विक्रमादित्याच्या २४ वर्षांच्या गोष्टि येणार्‍या पिढ्यांना सांगू आणि विचारु - "मनापासून सांग, तू खरच "सचिन" होऊ शकतोस का?"

१५ नोव्हेंबर १९८९, कराची ते १४ नोव्हेंबर २०१३ वानखेडे .... २४ वर्ष. क्रिकेटच्या किमान ४ पिढ्या बदलल्या. सचिन पहिल्यांदा खेळायला उतरला तेव्हा जन्मही न झालेल्या किंवा रांगणार्‍या अनेकां बरोबर सचिन आज खेळतो आहे. मात्र तसंच सचिनचा जन्म झाला त्याचवेळि काही सचिन द्वेष्ट्यांचा सुद्धा जन्म झाला असावा, कारण तशी काही माणसं मी आजूबाजूला बघितली आहेत. सचिन निवृत्त कधी होणार? सचिनचा इतका उदो उदो का? हे प्रश्न अशा महानुभवांना नेहमी पडत. पैकी त्यांची पहिली इच्छा उद्या पूर्ण होते आहे. पण सचिनचा उदो उदो का? हे समजण्यासाठी २४ वर्ष बघावी लागतील. मी त्याच्या अशक्य विक्रमांबाबत बोलतच नाहीये. त्याच्या गेल्या २४ वर्षातील खेळ व सामाजिक जीवनाबाबत बोलतोय.

एक खेळाडू म्हणून जेव्हा आपण त्याची कारकिर्द तपासतो. तेव्हा इतकी शारिरीक, मानसिक, भावनिक तंदुरुस्ती त्याने कुठुन मिळवली व जपली? ह्याचं कौतुक मिश्रित आश्चर्य वाटत रहातं. कुठलाही मैदानी खेळ खेळणार्‍या खेळाडूची कारकिर्द हि शारिरीक तंदुरुस्तीवरती अवलंबून असते हे सहाजिक आहे. आजवर अनेक वेगवेगळे खेळ व खेळाडू बघितले पण इतकी मोठि कारकिर्द माझ्या बघण्यात नाही. क्रिकेटमध्ये नाहीच नाही. १५-१६ वर्ष खेळणारे अनेक दिग्गज आहेतही पण शरिर थकू लागलं, सांधे कुरकुरु लागले की ते "सन्माननिय" निवृत्ती घेतात जे फार सहाजिक व बरोबरही आहे. पण "सचिन संपला" अशी १२-१२-१२ रोजी जगबुडि होणार इतकिच धादांत असत्य आवई ३-४ वेळा उठली होती हे सगळ्यांना आठवत असेल. त्याची पाठदुखी, त्याचा शस्त्रक्रिया झालेला टेनिस एल्बो, त्याचे पोतडिभर nervous 90's वगैरे, जवळपास ६-८ महिने तो संघा बाहेरही होता. पण तो परत आला, त्याने पाहिलं, त्याने जिंकलं.

Titan कप वगळता कॅप्टनशीप तितकी त्याला कधीच मानवली नाही. काही काळ मॅच फिक्सिंगचे काळे ढगही संपूर्ण भारतीय क्रिकेटवरती पसरले होते, अनेक जुने जाणते त्यात फसले, त्यांचे हात व चेहरे काळे पडले पण सचिन निष्कलंकच राहीला. मॅच फिक्सिंगनंतर बरीच जुनी खोडं उपटून फेकली गेली. फांद्या सपासप कापल्यावर नवी पालवी फुटावी तसाच काहिकाळ डळमळलेला भारतीय संघ नवा आकार घेऊ लागला. सौरव गांगुलीने त्याला आकार दिला. आजचा धोनीच्या हाता खालच्या संघापाठी कुठेतरी गांगुलीचे कष्ट आहेत. त्याच वेळी एक बाजू सचिनने लावून धरली होती हे देखिल तितकच खरं. तेव्हाही अगदि काल-परवासारखा सचिन शिवाय उरलेला संघ कुठला? हाच प्रश्न होता.

आजकाल T-20 चा जमाना आहे. सगळं झटपट. त्यात चूक किती बरोबर किती हा भाग निराळा. पण चार मॅच मध्ये दिसलेला चेहरा पाचव्या मॅचपासून पुढे दिसेल की नाही याची शाश्वती नसते. शारीरीक, मानसिक क्षमतेचा कस लावणारं कसोटि क्रिकेट मागे पडलंय. फक्त दंडाच्या जोरावरती पोतडिभर रन्स खेचणार्‍यांना कसोटि मध्ये लागणारी कसोटि कितपत झेपेल हा प्रश्न उरत असताना दुसर्‍या बाजूला चक्क २ तपं टिकून २००वी कसोटी खेळणारा ४० वर्षांचा हा खेळाडू बघितला की आपोआप सलाम केला जातो. एकदिवसीय खेळात सर्वात वेगवान शतक आणि कसोटि मधल्या ३०० धावा हे दोन मुख्य अपवाद वगळता क्रिकेट मधला व अर्थात फलंदाजी मधला जवळपास प्रत्येक विक्रम आज सचिनच्या नावावर आहे. इथवर पोहोचायला सचिनने अफाऽऽऽट मेहनत घेतली आहे.

इतकं असून सचिनला एकदाही बेताल वागताना बघितलं नाही. ना मैदानात ना मैदाना बाहेर. प्रसिद्धिचं इतकं मोठं वलय असताना सचिनने डोक्यात हवा जाऊन गैरवर्तन कधीच केलं नाही, म्हणून सचिन मोठा. आपल्या वलयाची व त्या वलयाची आपल्या चाहत्यांवर असलेल्या छापाची सचिनला जाणिव आहे व म्हणून इतर सर्व जण दारूच्या ब्रॅन्डच्या "make it large" म्हणत जाहिराती करत असताना सचिनने ती गोष्ट कधी केली नाही. म्हणूनच सचिन आपसूक larger than life झाला. त्याने कधी भारतीय संघातल्या अथवा विरुद्ध संघातल्या खेळाडूबाबत जाहिरपणे वाईट मतप्रदर्शन केलं नाही. मिडिया व "जाणकार" म्हणावणार्‍यांकडून जेव्हा जेव्हा बोचरी टिका झाली तेव्हाही सचिनची बॅटच बोलली.शिवाय सचिन वेगवेगळ्या कार्यक्रमात अथवा मुलाखतींमध्ये बोलला तेव्हा शब्द न शब्द त्याने जपून वापरला. एक उदाहरण द्यायचं झालंच तर अर्चना विजया या T V anchor वा मॉडेलचं देता येईल. तिने स्वत:च्या ब्लॉगवरती लिहिलेली गोष्ट - एका मुलाखती नंतर सचिनने सहज मला विचारलं "“How do you maintain your physique?” वरती हीच कन्यका सांगते - "दहातले नऊ जण "फिजिक" ऐवजी "फिगर" हा शब्द वापरतात ज्याला एक ’ओशटपणा’ असतो. पण सचिन बोलतानाही शब्दांची निवड कित्ती अचूक करतो. व त्याच मुळे आज तो इतक्या उंचीवर का आहे ते समजतं."

आज इतक्या उंचीवर पोचल्यावरही हा दरवर्षी रणजी सामने न चुकता खेळतो. खेळाडू म्हणून सचिनची चपळता का टिकून आहे ह्याचं गमक इथे आहे. चेंडूचा टप्पा बॅटच्या मध्यावर येतो आहे ना हे बघायला तो आजही ओल्या चेंडूने सराव करतो. उष्ण आणि आर्द्र (humid) ठिकाणी खेळावं लागणार असेल तर शरीरात पाण्याची कमी होऊ नये म्हणून केवळ पाणी पिण्यासाठी पहाटेचा गजर लावून उठणारा हा काटेकोर माणूस आहे. सचिन उगीच घडत नाहीत. त्यासाठी येतानाच काहि गोष्टि वरुन आणाव्या लागतात. शिवाय घरातलं वातावरण अपयशात पाठींबा देणारं हवं आणि यशात कान ओढणारं देखिल, तसंच संपूर्ण जीव ओतणारा आणि खेळ व खेळाडूलाच पैलू पाडणारा आचरेकर सरांसारखा अतिशय शिस्तबद्ध प्रशिक्षक लागतो. अन्यथा पावसाळ्यात  कुत्र्याच्या छत्र्या उगवतात तसे ’महान’ क्रिकेटपटू गल्लोगल्ली तयार झाले नसते का??? फक्त ५.६ फुटाचा असूनही सचिन इतरांपेक्षा दशांगुळं मोठा दिसतो तो असा.


"सचिन" होणं फार अवघड आहे. अख्खा देश आपल्याकडे बघतोय, प्रत्येक मॅच मध्ये त्यांना शतक हवय जे अशक्य आहे .... तरी त्या अपेक्षांच ओझं खांद्यावर घेणं फार फार धीराचं काम आहे. अनेक लोकांना वाटेल त्यात काय? त्या ओझ्या बरोबर करोडो रुपये कमावलेच कि त्याने? पण तो ज्या उंचीवरती आहे त्या उंचीवर बहुतकरुन माणसांचे पाय जमिनीवरुन सुटतात व अशी ओझी पेलवत नाहीत. पण हा आपला २४ वर्ष कृष्णासारखा लोकांच्या बोजड अपेक्षा व भारतीय संघाचा गोवर्धन करंगळीवर तोलून ऊभा होता. ह्या सामन्यानंतर त्या गोवर्धनाला आपापल्या बॅटचे टेकू देणारे गोप यापुढे सचिन शिवाय देखिल खूप यशस्वी ठरोत ही स्वाभाविक सदिच्छा आहेच. पण आपलं विश्वरुप दर्शन दाखवत पिचवरती "तो" बॉलर्सची रक्तहीन अहिंसक "कत्तल" करत असताना अख्या मैदानात जो "सच्चिन - सच्चिन" आवाज घुमत रहातो तो उद्याच्या कसोटी नंतर परत ऐकू येणार नाही. त्या "सच्चिन - सच्चिन" मध्ये महाभारत युद्धाच्या "पाज्चजन्यं ह्रषीकेशो देवदत्तं धनंजय:" पासून ते एखाद्या महाआरतीपर्यंत सगळं आपसूक सामावतं. कारण सचिन हा क्रिकेट रसिकांचा देव आहे. सचिन ज्या क्षणापर्यंत खेळेल तोवर क्रिकेट हा "धर्म" असेल, ज्या क्षणी तो पिच सोडेल त्याक्षणी क्रिकेट हा "खेळ" होईल! मग कदाचित या कसोटी नंतर जन्माला आलेली पोरं - टोरं थोडी मोठी होऊन जेव्हा हातात बॅट धरुन "चला क्रिकेट खेळू!" असं म्हणतील तेव्हा त्यांना आम्ही बघितलेल्या - अनुभवलेल्या या सिंहासन चोवीशी मधली एखादी गोष्ट सांगून म्हणू - "बाळा, सचिन जे खेळायचा ना त्याला क्रिकेट म्हणत!!!"

 - सौरभ वैशंपायन

Wednesday, October 30, 2013

पुनरुत्थान!

 काही लाख वर्षांपूर्वी तिथे रोजच निसर्गाची दिवाळी साजरी व्हायची. लावारसाचे अनार उंच उंच उडायचे. निसर्गचक्राप्रमाणे ते शांत होत गेलं आणि उभी राहीली एक अभेद्य भिंत - सह्याद्रि!

पुढे त्या सह्याद्रिच्या अंगा खांद्यावरती अनेक सत्तांनी आपली ठाणी वसवली. श्री शिवछत्रपतींनी देखिल अनेक दुर्गम दुर्ग जिंकले अथवा नव्याने बांधले.


त्यावेळी ज्या दुर्गांनी छातीचा कोट करुन परकियांचे तोफगोळे आपल्या अंगावर झेलले व इथल्या मातीला स्वातंत्र्य मिळवून दिले - राखले. आज त्या दुर्गांची आपण साधी स्वच्छ्ताही राखू शकत नाही हि अत्यंत लाजेची गोष्ट आहे. अनेक कद्रू, कपाळकरंटी आणि निर्बुध्द लोकं तिथे आपली नावे लिहितात, दारुच्या पार्टी करतात, पान - गुटक्यांच्या पिंकांचे सडे शिंपतात ...... पण अगदिच अंधार नाहिये. पणतीची एक मिणमिणती वात सुध्दा अंधार दूर करु शकते तश्या ह्या निराशेच्या गोष्टिला छेद देणारे तरुण आज महाराष्ट्रात आहेत.

आपण मोठ्या आनंदाने दिवाळी साजरी करत असताना आपल्या शिवरायांचे दुर्ग अंधारात कसे? ह्या प्रश्नाने बेचैन होऊन मग सुरु झाला एक नवा उपक्रम. ऐन दिवाळीच गडकोटांवरती साजरी करायची. महाराष्ट्रातल्या एकातरी दुर्गावरती जाऊन शक्य तितकी साफ सफाई करायची, डागडुजी करुन गडावरची मंदिरे, समाधी, महाद्वार, पायर्‍या यांना तोरणांनी, फुलांनी, रांगोळ्यांनी, पणत्यांनी सजवायचे आणि अंधार पडला कि त्या पणत्या उजळवायच्या. शतकानुशतके अंधार बघितलेल्या दुर्गांना त्या २-४ दिवसात का होईना पण पुन्हा प्रकाशित करायचे.

मग एक चमत्कार घडतो, दुर्गातील वास्तू पुरुष जागा होतो. शहारुन उठतो, त्याला शिवकालातील उडवलेल्या चंद्रज्योती आठवतात. चार क्षण का होईना तो भरुन पावतो. ऐन सणासुदिला घरदार सोडून दूर गावच्या लाडक्या आज्जी - आजोबांना भेटायला जावं तसं आपणहून आलेल्या त्या तरुणांना तो तोंड भरुन आशिर्वाद देतो - "कल्याणमस्तु!", "तस्थातु!"

अश्या अनेक संस्था आजआपल्या आजूबाजूला काम करतात. FB वरती त्यांची पेजेसआहेत. महिना - पंधरा दिवस आधी त्यांचे संकल्प व त्यावर्षी निवडलेला दिवस आणि दुर्ग तिथे समजू शकतो. तुम्हालाहि शक्य झालं तर अश्या एखाद्या संस्थेबरोबर नक्कि जा. गडावरची दिवाळी अनुभवून बघा. तिथल्या वास्तू पुरुषाचा आशिर्वाद घ्या!

आणि समजा हे जमलं नाहि तरी एक गोष्ट नक्की करा ..... आजुबाजुच्या लहान मुलांना घरासमोर एखादा छोटासा "दुर्गम" गड बांधु द्या. या मातीशी त्यांनी नाळ पुन्हा जोडा!

शुभ दिपावली!!!

Monday, February 4, 2013

स्पंदने


भर थंडित त्याच्या अस्ताव्यस्त पहुडल्या उघड्या, काळ्या, थंडगार पडलेल्या अंगावरती मी हात टेकवला, खरंतर मलाच तेव्हा आधाराची गरज होती. त्याच्या थंड पडलेल्या देहातली धुगधुगीही अजूनही जाणवत होती. त्याच्या राकट कणखर देहातल्या नसां हाताला जाणवत होत्या. त्यात कधीकाळी गरम लाव्हाच वाहिला होता. त्याचे श्वासही सुरु होते. मी दूरवरती नजर फिरवली. उन्हं चढायला नुकतीच सुरुवात झाली होती. मी देखिल दूरुन त्याला भेटण्यासाठी बराच वेळ चालून आल्याने माझ्या अंगातून घामाच्या धारा लागल्या होत्याच. मी आल्याचा त्याला आनंद झाला होता की नव्हता मला कळत नव्हतं. बहुदा त्याला त्याचं सुखं दुखं काहीच नसावं. त्याची सध्याची एकंदर अवस्था गीतेच्या स्थितप्रज्ञाची झालीये. कधीकाळी ज्यांच्या बापजाद्यांना त्याने सर्वतोपरी मदत केली होती आज त्यांचे वंशज त्याकडे फार अनोळखीपणे बघतात. ओळख दाखवणारे अर्थात माझ्यासारखे हजारो रोज त्याला भेटायला येतातही, काही त्याच्या जुन्या आठवणी जागतात. पण त्याला भेटायला येणारे अर्धाधिक तर उलट त्याला नवीन जखमाच देऊन जातात. अश्या अनोळखी माणसांमुळे असेल कदाचित विरक्ती हाच त्याचा स्वभाव बनला आहे. त्याच्या सध्याच्या अवस्थेकडे बघून कधीकधी फार गलबलून येतं. त्याचं डोकं मांडिवरती घेऊन त्याला प्रेमाने थोपटता आलं असतं तर किती बरं झालं असतं असंही वाटून जातं. त्याची अवस्था मात्र समाधी लागल्यागत असलेल्या संन्याश्यासारखी क्वचित स्वत:त गुंगलेल्या निष्पाप मुलासारखी. कधी कधी काही ओळखीचे आवाज आले की चेहर्‍यावरती ओळखीचे हसू येतं, वळून बघतो देखिल, पण तितक्यापुरतच. इतरवेळी गुडूप अंधारात स्वत:ला हरवून टाकतो. त्या अंधारात त्याला बघणारं कोणी नसतं. मग डोळे मिटून उसासे टाकत शांत झोपला कि रोज रात्री त्याला स्वप्न पडतात. त्याचे जूने वैभवाचे दिवस त्याला दिसतात त्याच्या डोईवरती चढवलेली मोठी पागोटी, अंगावर खास त्याच्यासाठीच घडवलेले दागिने ..... अचानक त्याला वास्तवाची जाणीव येते तो दचकून जागा होतो, परत परत विस्कटलेली पागोटी, तुटलेले दागिने बघतो त्यालाही मग भरुन येतं. त्याच्या डोळ्यांच्या कडांनाही पाणी साठतं, छाताडावरती वाट्टेल ते घाव सहन करणार्‍या त्याला, ते अश्रू घरंगळताना कोणीतरी पाहील ह्याची तितकी भीती वाटत रहाते. त्याच्या सुदैवाने त्याचवेळी आकाशात वीजा कडाडून पाठोपाठ धो धो पाऊस सुरु होतो त्याचे अश्रू आणि पाऊस यातला फरक फार कुणाला समजत नाही. ज्यांना समजतो ते त्याच्या जवळ जातात. त्याला मिठीत घेण्याचा प्रयत्न करतात. पण त्याच्या विशाल, पिळदार देहापुढे सगळेच हात चिमुकले वाटतात. पण तरीही मी त्याला बिलगतो, त्याच्या निधड्या छातीवरती डोकं ठेवतो. नीट कान देऊन ऐकलं तर त्याच्या हृदयाची लयबद्ध स्पंदने देखिल ऐकू येत रहातात - शिवाजी ... शिवाजी ... शिवाजी ... शिवाजी.

 - सौरभ वैशंपायन.

Tuesday, January 29, 2013

दुर्ग भांडार
सहा - सात महिन्यांपूर्वी माझ्या ओळखीच्या व्यक्तीच्या अल्बममध्ये मी दुर्ग भांडारचे फोटो बघितले होते. त्यादिवशीपासून दुर्ग भांडारला जायची संधी शोधत होतो. माझ्या ओळखीचे जे काही २-३ ट्रेकिंग ग्रुप आहेत त्यातल्या सगळ्यांची डोकी या प्लानवरुन खाऊन झाली होती. अखेर परवा २६ जानेवारीच्या मुहुर्तावरती पोदार कॉलेजच्या ग्रुप बरोबर जायची संधी मिळाली.

दुर्ग भांडार हा नाशिक जवळील ब्रह्मगिरीच्या डोंगराचाच एक भाग आहे. दररोज शेकडो व शनिवार - रविवारी हजारो लोकं ब्रह्मगिरी व जटा मंदिरात दर्शनासाठी येतात पण फारच कमी लोकांना पुढे एखादा दुर्ग आहे ह्याची कल्पना असते. माझ्या आजवरच्या अविस्मरणिय ट्रेक्सपैकी दुर्ग भांडार पहिल्या पाचांत ठेवायला हरकत नाही. जटामंदिरवरुनच पुढे अक्षरश: १५-२० मिनिटांच्या अंतरावरती हा दुर्ग सह्याद्रिच्या काळ्याकभिन्न कातळात "खोदून" काढलेला आहे. अर्थात जटामंदिर ते गड मधली वाट ही रेताड, भुसभुशीत, ढिसाळ, वगैरे शब्दांना आपल्यात सामावणारी व जेमतेम ’एक पाय नाचू रे गोविंदा’ करत पार करावी लागत असल्याने त्या दिशेला कोणी फिरकत नाही. चूक झाली तर डाव्या बाजूला २०-२५ फुटांचा अतिशय तीव्र उतार व मग थेट दरी आहे. ज्यांना ट्रेकची फार सवय नाही त्यांच्यासाठी कींवा आयुष्यातल्या पहिल्याच ट्रेकसाठी हा गड नक्किच नाही.


मी वर म्हणालो तसा कातळात "खोदून" काढलेला हा माझ्या पाहण्यातला पहिलाच गड आहे. मुळात तिथे गडाची मुख्य डोंगराहुन वेगळी अशी बांधणी दिसतच नसल्याने गडाच्या प्रवेशद्वारापर्यंत पोहोचल्या शिवाय खात्रीच होत नाही की इथे कुठलाही दुर्ग असेल. जवळ गेल्यावर ५-६० फुटांवरुनही प्रथमदर्शनी त्याचे प्रवेशद्वार हे सुरुवातीला पाण्याचे खोदलेले टाकेच असावे असे वाटते. कारण या वाटेच्या आधीच्या ट्प्यावर खरंच एक पाण्याचे टाके आहे. वापरात नसल्याने पाणी अस्वच्छ आहे. मात्र एकदा का त्या चिंचोळ्या वाटेपाशी पोहोचलो की मती गुंग करणारे, अफाट मेहनत व सुरक्षिततेच्या दृष्टिने जबर शक्कल लढवलेले बांधकाम ..... नपेक्षा "खोदकाम" दिसते. उजव्या हाताच्या भिंतीत इतर गडांप्रमाणेच शिवकालिन असणारे हनुमानाचे शिल्प दिसते. आणि मग थोड्या सरळसोट उतरणार्‍या साधारण फुटभर उंचीच्या ५०-५५ पायर्‍या एखाद्या गुढ भुयारात उतराव्यात तश्या खाली घेऊन जातात. एका वेळि एकच माणूस जाऊ शकेल इतपतच जागा. हा कातळ पहारींनी, छिन्नी-हातोड्याने तब्बल ६० फूट तरी सरळसोट खोदला आहे. वरती बघितलं की आकाशाची भगभगीत पट्टी तेव्हढी दिसत रहाते. 

खाली पोहोचलो की अजुन एक अनपेक्षित गोष्ट आपली वाट बघत असते. ते म्हणजे गडाचे केवळ दोन - अडिच फुटि उंचीचे व फक्त तीन फुट लांबीचे पहिले प्रवेशद्वार. गडात शिरणार्‍या माणसाला आधी इथेच गुडघे टेकावे लागतात. लहान मुलाप्रमाणे रांगतच तिथून बाहेर पडावे लागते. हे तंत्र इतके जबरदस्त आहे की आतल्या बाजूला एक - दोन पहारेकरी जरी तलवार घेऊन बसले तरी ह्या गडाचे अगदी आरामात रक्षण करु शकतात. दरवाज्यातून प्रवेश करताना आधी डोके आत घालावे लागते दोन्ही हात जमीनीवरती टेकले असतात, गुडघे टेकल्याने कुठल्याही दिशेला सरकायचा वेग उरला नसतो आणि त्यातून चिंचोळी जागा. आत शिरु पाहणार्‍याचे डोके धडापासून विनासायास वेगळे होण्याची संपूर्ण खात्री.

हा पहिला रांगता प्रवेश झाला की उजवीकडे वळायचं,  दुसरी गंमत वाट बघत असते - दोन्ही बाजूला दरी आणि मध्ये जेमतेम ८-१० फुटाचा कातळ ज्यावरुन चालत दुसर्‍या टोकाला जायचं असतं. भणाण वारा असला तर दरीत फेकले जाण्याचे शक्यता असतेच. सुदैवाने वारा नव्हता पण इथे दुसरा त्रास वानरांचा होतो. आम्ही आत प्रवेश करताच उजव्या हाताच्या एका शिळेवरती अतिशय स्वस्थ चित्ताने तो बसला होता. यांना माणसांची इतकी सवय झाली आहे की अगदि एकट्या वानरालाही हाकलवून लावायचे प्रयत्न जवळपास निष्फळ असतात. फार फार तर आपल्यावरती उपकार केल्यागत फुटभर जागा बदलतात. हा टप्पा पार करुन पलिकडच्या कातळकड्याकडे पोहोचलं की डाव्या हाताला पुन्हा नवीन "लोटांगण" असतच. गडाचे दुसरे प्रवेशद्वारही अगदी तसेच. शिवाय यातुन आत गेलं की आधीच्या प्रवेशद्वारासारखं थेट वरपर्यंत पायर्‍या दिसत नाहित जवळपास ९० अंशात वळत जाणार्‍या फुटभर उंचीच्या पायर्‍या आहेत.

वरती कुठलंलही इमारतीचं बांधकाम दिसत नाही, कींवा तसे कुठलेही पुरावे दिसत नाहित. सरळ नाकासमोर चालत गेलं की उजव्या बाजूला थोडं खाली पाण्याची दोन टाकी खोदली आहेत. पैकी एक टाकं त्यातल्या त्यात स्वच्छ आहे असं मानता येतं, दुसरं टाकं मात्र हिरवट पाण्याने भरलेलं आहे. तिथुनच पुढे दोन मिनिटांवरती कातळ फोडून तयार केलेला बुरुज आहे. वास्तविक बुरुजापेक्षाही तो एखादा सज्जा असल्यागत फोडून काढला आहे तोफा अथवा बंदूंकांचा मारा करायला कुठलीही सोय, जंग्या नहियेत. मला पाणी वाहून जायलाही काही व्यवस्था दिसली नाही, पण ती असावी अन्यथा पावसाळ्याच्या दिवसात इथे छातीभर पाणी साठेल. या बुरुजात उतरताना काळजी घ्यावी लागते डाव्या बाजूला दरी आहे, अजिबात चूक न करता इथून बुरुजात उतरावं लागतं. बुरुजात उतरलं की खाली त्र्यंबकेश्वर दिसतं. अजून उजवीकडे बघितलं की खाली गंगाद्वारकडे जाणारा रस्ता व समोर ब्रह्मगिरीचा डोंगर दिसतो. परत संपूर्ण मागे वळलं व बुरुजात जिथून उतरलं तिथे जाऊन उभं राहीलं की समोर थोडंस डाव्या हाताला हरीहर गड व बसगड दिसतो. बास संपला गड. या गडात पहाण्यासारखं म्हणाल तर जवळपास काही नाही पण अनुभवण्यासारखं खूप काही आहे. माझ्या अंदाजाप्रमाणे व आधीच्या प्रवेशद्वाराजवळ जे मारुतीचे शिल्प कोरलेले दिसते त्यावरुन हा शिवकालीन गड असावा. जो नावाप्रमाणेच खजिना अथवा परचक्र आल्यास महत्वाच्या व्यक्तींना लपायला देखिल वापरता येऊ शकेल असा असावा, मात्र परत सांगतो वरती कुणाला रहता येईल, अन्न, दारुगोळा, खजिना साठवता येईल असं काही बांधकाम अथवा अवशेष दिसत नाहीत. त्यामूळे हा नक्कि कधी व का बांधला हे समजायला काही मार्ग नाहिये. मी आजवर वाचलेल्या इतिहासातही याचा उल्लेख मला मिळालेला नाही.

बुरुजातच फतकल मांडून आम्ही पोटपूजा सुरु केली. तासभर आराम - गप्पा झाल्यावरती परत निघालो. तोच रस्ता, तीच लोटांगणं मग त्या लोटांगणासहित फेसबुकच्या प्रोफाईलला डकवता येईल असा फोटो काढण्याची प्रत्येकाची धडपड सुरु झाली. आम्हा ६ जणांचा ग्रुप थोडा मागे पडला. आम्ही कातळकड्याच्या ८ फुटी चिंचोळ्या पट्टिवरती आलो आणि  समोरुन ५-७ वानरांचं टोळकं उभं राहीलं, डाव्या दरीतून  अजून दोघं वर आली, मागे वळलो तर एक जण आधीच येऊन उभा होता. त्यांनी फार हुशारीने जागा निवडली होती. पुढे - मागे माकडं डावी-उजवीकडे दरी. धीट तर इतके होते कि घाबरवायला पाण्याची रिकामी बाटली वाजवली तर ३ लहान पिल्लं पुढे येऊन तीच बाटली धरायचा प्रयत्न करु लागली. एक जण पुढे झाला व त्याने सरळ एका मुलीच्या ट्रॅकपॅन्टचा कोपरा चिमटीत पकडला. आता कुठलीही आक्रस्ताळी हालचाल जीवावरती बेतू शकत होती किंवा त्यांचा हल्ला ओढावून घ्यायला कारणीभूत ठरु शकत होती. गपगुमान एकमेकांची बॅग पकडून झुकझुक गाडि बनवली. त्यांच्याशी नजर न मिळवता मधला ५० फुटांचा पट्टा शब्दश: जीव मुठीत धरुन पार केला. त्यांच्या सरावल्या नजरांनाही आमच्या हातात खाण्यासारखं काही दिसलं नाही त्यामू्ळे त्यांनीही मग काही आडकाठी केली नाही. हे दिव्य पार करुन पुन्हा त्याच ढेकळांच्या घसरड्या वाटेवरुन तोल सावरत अखेर जटा मंदिर गाठलं. दुर्ग भांडारचा ट्रेक पूर्ण झाला होता. सगळे  जण या अनुभवाने "cloud 9" वरती पोहोचले होते.

परत येताना डोक्यात एकच विचार आला - ताजमहाल किंवा राजस्थानातले सुंदर राजवाडे बांधणे हे अर्थात फार मोठे व कलेच्या दृष्टिने अजोड आहे. मात्र त्याचवेळी सह्याद्रिच्या कातळकड्यातून अशी सर्वथा अजिंक्य वाटावी अशी जागा कोरुन काढणं जास्त कठीण आहे. त्या दोन्ही दरवाज्यांत घालावी लागणारी लोटांगणं हि त्या कारागिरांना, मजूरांना व ज्याच्या डोक्यात ही कल्पना आली त्यालाच घातली असं मी अजूनही समजतोय. थोडक्यात किमान एकदा घ्यावा असा हा अनुभव आहे. 

 - सौरभ वैशंपायन.