Saturday, July 2, 2016

The lesson of History!!!

इतिहासाचा अभ्यास करताना साधारण कसा केला जावा ह्याबाबत स्वानुभवाचे चार शब्द देतो आहे. मी ह्या विषयातला अधिकारी वगैरे मुळीच नाही हे सर्वप्रथम सांगुन टाकतो. विद्यार्थी आपण कसा अभ्यास करतो हे मित्रांना सांगतो तद्वत हे एका परीने स्वानुभव कथन आहे. मी देखिल आत्ताशी कुठे अभ्यासाला प्रयत्नपूर्वक सुरुवात केली आहे. खाली लिहीलेल्यापैकी अनेक गोष्टी मलाही नीट जमत नाहीत पण त्याचा विचार करुन ठेवला आहे तो मांडतो आहे.

जगप्रसिद्ध अमेरीकन संशोधक व अत्यंत जेष्ठ श्रेष्ठ इतिहासकार विल ड्युरांट आणि त्यांची बायको व नंतरची सहलेखिका एरियल ड्युरांट ह्यांनी आपल्या आयुष्यातली किमान ३० वर्षे फक्त वेगवेगळ्या संस्कृतींचा अभ्यास करण्यात, वेगवेगळे साहित्य, लेख, ताम्रपट, वस्तू, हस्तलिखिते, पोथ्या, कथा, वगैरे जमवण्यात घालवली आणि मग एक एक करत जगभरातील संस्कृतींवरती अवाढव्य ग्रंथ लिहीले. विल ड्युरांटचे फक्त "history of civilization" चेच ११ खंड आहेत. ते त्याने १९३५ ते १९७५ ह्या ४० वर्षांच्या काळात लिहीले व प्रसिद्ध केले. २० इतर ग्रंथ आहेत पैकी ५ ग्रंथ तर त्याच्या मृत्यु पश्चात तब्बल २ दशकांनी प्रसिद्ध केले गेले. सांगायचा मुद्दा असा की लोकं आपलं उभं आयुष्य खर्ची घालतात संशोधनापोटी त्यामुळे इतिहासाचा अभ्यास करताना इतिहास हा समुद्र आहे; समुद्र पिऊन संपवून टाकू म्हणणार्‍या टिटवीच्या चोचीत असे कितीसे पाणी मावणार? ह्याच विचाराने ह्याला हात घालावा. आपण जितके वाचू त्याच्या पलीकडे अस्पर्षित असे हजारपट उरलेले आहे ह्याची जाणीव सतत ठेवावी.

इतिहास हा फसवा असतो. विल ड्युरांटच्या "The lesson of History" ची प्रस्तावनाच इतिहासवाचकांसाठी गीता-बायबल-कुराण आहे. त्यात ते म्हणतात - "आपण हे सगळं का करतोय? आपल्या हाताला काय लागणार आहे? पराक्रमी राजांच्या दु:खद मृत्युच्या घटना? इतिहासातून मनुष्य स्वभावाबाबत तुम्हांला असं काय वेगळं मिळतं जे रस्त्यात चालणार्‍या कुणाही भणंगाला एकही पान न वाचताच समजू शकतं?" ...... "History is non-sense" ...... "To begin with, do we really know what the past was? what actually happened? or is history "a fable" not quite "agreed upon"? Our knowledge of any past event is always incomplete probably inaccurate, beclouded by ambivalent evidence & biased historians, & perhaps distorted by our own patriotic or religious partnership. "most history is guessing , & the rest is prejudice." विल ड्युरांटने फार ओघवत्या शैलीत हे सगळं लिहीलं आहे. जमल्यास नक्की मिळवुन वाचा.

आपल्याकडे इतिहासाचार्य राजवाडेंनी देखिल इतिहासाचा अभ्यास कसा करावा ह्याबाबत फार काटेकोर लिहीले आहे. "अस्सल कागदाचा एक चिठोराही समस्त बखरीं व इतर साधनांची मते हाणून पाडू शकतो!" इतक्या स्वच्छ शब्दांत त्यांनी अस्सल साधनांचे महत्व विशद केले आहे. म्हणून अस्सल साधने मिळतील तितकी मिळवण्याचा प्रयत्न करावा. ह्यातही प्रथम दर्जाची, दुय्यम व तिय्यम असे गट पडतात. शक्य तितक्या समकालिन साधनांवरती जोर देऊन इतिहास मांडता येतो. तुम्ही त्या काळापासून जितके दूर सरकता तितके गोंधळ वाढत जाणे, असलेली माहीती नष्ट होणे, नसलेली माहीती घुसवली जाणे हे प्रकार फार सर्रास घडतात. समकालिन साधनांतही पदरी ठेवलेले लेखनिक, भाट त्या त्या घराण्याची वाहवा करतानाच दिसतात. म्हणुन एकाच घटनेबाबत स्वकीय - परकिय काय म्हणतात त्यातले योग्य - अयोग्य काय हे समजून घेण्याची तयारी हवी. अनेकदा आपल्याला अप्रिय उल्लेखही सापडतात, अनेकद धक्कादायक माहीती हाताला लागते. ती स्वीकारायची तयारी हवी ..... निदान नवीन पुरावे समोर येईपर्यंत तरी. नवीन विश्वासजन्य पुरावे समोर आले तर ते स्वीकारावेत आधीचे मत बदलण्यात कमी पणा वाटून घेउ नये.

इतिहास वाचताना कधी अंगावरती गुलाबपाणी शिंपडलं जात तर कधी कधी चिखलही. इतिहास दचकवणाही असू शकतो. एखादी व्यक्ती बघता बघता नायक अथवा खलनायक बनू शकते. तरीही कुठलीही व्यक्ती संपूर्णत: एकाच रंगात रंगवून टाकण्याचा मोह शक्य तितका आवरावा. बहुतांषी प्रत्येक व्यक्ती आणि घटनेत चांगले व वाईट अश्या दोन्ही बाजू असतातच. व्यक्ती अथवा साम्राज्यांची बलस्थाने व कमकुवत बाजू नोंद करुन आणि मान्य करुन पुढे गेल्यास डोक्याला व पर्यायाने अभ्यास करताना त्रास कमी होतो. दोन व्यक्तींमध्ये तुलना शक्यतो टाळावी खासकरुन त्यात एक वा अनेक पिढ्यांचे अंतर असल्यास, कारण दोन व्यक्तींची मानसिक, शारिरीक, बौध्दिक, आर्थिक, सामाजिक वगैरे अनेक पातळ्यांवरती परीस्थिती सारखी असेलच असे नाही. यातला एखादा पैलू देखिल त्या व्यक्तीचे व्यक्तीमत्व अथवा एखाद्या घटनेचे परीमाण व परीणाम टोकाचे बदलू शकतो.
अजून एक, खास करुन भारतीय मानसिकतेसाठी नोंदवावंस वाटतं - चारीत्र्य व चरीत्र एकच समजू नये. बाई-बाटलीचा शौक, रंगेल, इष्कबाझ म्हणजे ती व्यक्ती वाईटच हा पूर्वग्रह इतिहासाच्या अभ्यासाचे फार मोठे नुकसान करतो. लेबल लावलं की विषय संपल्यात जमा असतो. वैयक्तिक आयुष्याचा अभ्यास करताना ह्या नोंदी निश्चितच महत्वपूर्ण असतात क्वचित प्रसंगी ह्यातूनच इतिहास घडत असतो हे देखिल मान्य पण सुरुवातच झापडं लावून करु नये. जमल्यास ऐतिहासिक व्यक्तीचं वैयक्तिक आणि सामाजिक आयुष्य वेगळं करुन अभ्यासावं.
इतिहासाचा अभ्यास म्हणजे केवळ रक्ताचे पाट व लढाया नव्हेत. "सामान्यांचे आयुष्य हाच इतिहासाचा विषय असतो" असे टॉलस्टॉयने म्हंटले ते उगाच नाही. इतिहासात अवघं जग सामावलं आहे. इतिहासात अगणित विषय आहेत. तरी एखाद्या व्यक्तीच्या चरीत्रापासून ते महायुध्दासारख्या जगड्व्याळ विषयापर्यंत काहिही असू शकतं. उदा. एखादा मानवसमूह अभ्यासासाठी घेतला तरी त्यावर तत्कालिन भूगोल, हवामान, रहाणीमान, सामाजिक, आर्थिक, लष्करी, धार्मिक समजूतींचा पगडा अभ्यासावा लागतो. ह्या कसोट्यांवरती घासून तो मानव समूह किती प्रगत होता हे समजू शकतं. इतिहासाचा अभ्यास करताना घडून गेलेल्या घटनांवरती आपला सद्य कालखंड व आपले विचार लादू नयेत. त्यात हमखास तफावत असते. अगदि २-३ दशकांमध्ये देखिल सर्वसाधारण समाजमान्यतांमध्ये टोकाचा फरक पडलेला असू शकतो. त्यावेळची समाजमान्यता कशी होती ह्याची नोंद करुन ठेवल्यास इतिहास सुटसुटित होतो. त्याच्याशी नाही - नाही म्हणून झगडत बसण्यात वेळ वाया घालवू नये. नेमकं असं घडलं हा "निष्कर्ष" अथवा असं व्हायला हवं होतं किंवा नको होतं हे आपला "मत" असू शकतं - "हट्ट" नव्हे. शिवाय तो निष्कर्ष अथवा मत ही काळ्या दगडावरती रेघ मानून चालू नये.

इतिहासाच्या अभ्यासात भूगोल, खगोल, हवामान, अन्न, धार्मिक - जातीय प्रथा व परंपरा, कायदा व व्यवस्था, आर्थिक, सामाजिक व लष्करी घडी, पत्रे, पोथ्या, दंतकथा, गाणी, तंत्रज्ञान, वास्तुशास्त्र अथवा वास्तूसंरचना, तत्कालिन शिक्षण पद्धती, दळणवळणाची साधने, भाषा, लीपी, चलन, शेती, करपद्धती, शस्त्रास्त्रे, तत्कालिन विज्ञान असे शेकडो विषय अभ्यासता येतात. आमच्या पूर्वजांकडे हे होतं आणि ते होतं वगैरे म्हणणं अस्मितेचा भाग असू शकतो त्याने जीवाला बरं वाटतं पण त्याची कसोटीवर उतरलेली सिद्धता व डोळ्यांना दिसणारे अंतिम रुप काय? हा मोठा प्रश्न आहे. ह्यावर विचार व्हावा. एखादे ऐतिहासिक साधन समोर धरले तर त्यातून आपण किती विषय काढू शकतो ह्याचा विचार करावा. उदा. एक साधे पत्र घेतले तरी त्यातून त्या दोन व्यक्तींचा एकमेकांशी असलेला नातेसंबध, दोघांची सामाजिक अथवा अर्थिक परीस्थिती, वयातील अंतर, सामाजिक परीस्थिती, धार्मिक समजूती, वगैरे आपल्याला शोधक नजरेने बाजूला काढता येतात का? हे बघावे, त्या पत्रातील कालगणना, सही, शिक्के, पत्राची भाषा, मायने, लीपी ह्या तांत्रिकबाबी मेहनत करुन आत्मसात केल्या तर साधने हाताळताना सोपी जातात. इतिहास अभ्यासताना ज्योतिषापासून ते विज्ञानापर्यंत कशालाही त्याज्य अथवा तुच्छ समजू नये समावेश करुन घ्यावा. तो इतिहासाकडे बघण्याचाच एक पैलू आहे. ऐकायला गंमत वाटेल पण नेपोलियन वरती फ्रेंचांनी इतका अभ्यास केलाय की म्हणे एक पुस्तक हे त्याला लहानपणापासून मरेपर्यंत झालेल्या आजारांवरतीच आहे. लोकं इथवर इतिहास खणून काढतात. यावर थोडा विचार व्हावा.
दर्या्खोर्‍या तून भटकणार्‍या माझ्या मित्र-मैत्रिणींना विनंती. ह्या भटकंती दरम्यान एक कसलातरी छंद जीवाला लावून घ्या, फोटोग्राफी, वनस्पती - प्राणी - पक्षी - किटक ह्यांच्या नोंदी, भौगोलिक रचना, गड - दुर्गांचे स्थापत्यशास्त्र, पाणी साठवण्याच्या जुन्या सोयी आणि पद्धती, जुन्या कला, गावागावांतुन मिळणार्या दंतकथा, कविता, गाणी, लोककथा, परंपरा, त्या त्या भागातले अन्न अश्या विभिन्न गोष्टींपैकी एकाची नोंद करायचा व जमल्यास ब्लॉग - सोशल साईट्स वरती त्या बाबतीत लिहिते होण्याचा तरी छंद लावून घ्या. विश्वास ठेवा इतिहास ह्यातूनच जपला जातो - समजतो - उलगडतो. न जाणो तिथला कुणी म्हातारबाबा वळचणीला अडकवलेलं एखादं शे - दोनशे वर्षांपूर्वीच तलवारीचं - भाला - बरच्याचं पातं, एखादा जीर्ण कागद, जुनाट वस्तू, नाणं काढून तुमच्या समोर ठेवेल आणि सुखद धक्का देईल. किंवा तुमच्या एकद्या झाडा-पाना-फुलाच्या अथवा प्राणी-पक्षी -किटकाच्या नोंदिने/ फोटोने निसर्गाचा इतिहास उलगडला जाईल. तुम्हांलाच नाही तर ह्या विषयांचा अभ्यास करणार्‍यांसाठी तुमची एक नोंद अथवा फोटो हा घबाड मिळाल्याचा आनंद देऊ शकतो.
थोडक्यात काय? तर इतिहास फार सुरेख आहे. त्यावर कुठलाही पूर्वग्रह न ठेवता प्रेम करता यायला पाहीजे बस्स!

अजून काय लिहिणे? सुज्ञ असा.

लेखनसीमा.

- सौरभ वैशंपायन.