Tuesday, November 29, 2011

जो बात तुझमें है.....


 गेले ३ दिवस वेळ मिळेल तसं मधुबालाचं स्केच काढत होतो. जगात काहि गोष्टि अश्या असतात ज्या जन्मजात नास्तिकालाहि ’देव आहेच’ आणि तो सुध्दा केवळ सर्वोत्तम कलाकारच आहे, हे मान्य करायला भाग पाडतील, "मधुबाला" हि त्यातलीच एक. अश्या गोष्टि फक्त देवच निर्माण करु शकतो. देवाने मधुबालाला सुध्दा ’फुरसतसे’ म्हणतात तसंच बनवलं असणार. बायबल मधले काहि उतारे म्हणतात कि - पहिले या जगात काहिच नव्हतं, मग देवाने अंधार निर्माण केला, मग देवाने प्रकाश निर्माण केला, मग ह्यॅंव केले, मग त्यॅंव केले, अखेर ६ दिवसात जग निर्माण झाल्यावर त्याला थकवा आला व त्याने एक दिवस आराम केला ... तोच दिवस म्हणजे "रविवार". हे जर खरं असतं तर मधुबाला, लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर वगैरे घडवल्यावर देवाने अतिश्रमाने महिनाभराची सीक लिव्ह टाकली असती. 

व्हीनस हि ग्रीकांची सौंदर्य आणि प्रेम देवता आहे म्हणे, प्राचिन ग्रीकांच दुर्भाग्य कि मधुबाला त्यांच्या नंतर २ सहस्त्रकांनी जन्माला आल्याने त्यांना मधुबालाला बघता आलं नाहि, नाहितर त्यांनी देवतेला व्हीनस ऐवजी ’मधुबाला’ असंच नाव ठेवलं असतं. मधुबालाची जन्म तारिख तरी काय असावी? तर "१४ फेब्रुवारी". ५६ मिस युनिव्हर्स घरात मोलकरणी म्हणून राबतील इतकं सौदर्य कसं असू शकतं कुणाजवळ?

पण जन्मजात नास्तिकाला जगात देव आहे असं मान्य करायला लावणार्‍या गोष्टिच अंधश्रध्दाळू माणसाला जगात देव नाहिच हे सुध्दा मान्य करायला बर्‍याचदा भाग पाडतात, मधुबाला त्यातलीच एक.  करोडो हृदये धकधक करत रहाण्याचे कारण असलेल्या मधुबालाच्याच हृदयाला छिद्र असावं? पण अल्पायुष्यातच तिने आपल्या सौंदर्याची मोहिनी जगावर अशी घातली आहे कि अजून हटता हटत नाहि. 

मधुबालाचं स्केच काढताना आपण किती टुकार चित्रकार आहोत हे राहून राहून जाणवलं. काहि गोष्टि फक्त देवच करु शकतो हेच खरं. स्केच काढताना रफी साहेबांच एकच गाणं डोक्यात होतं - "जो बात तुझमें है, तेरी तस्वीर में नहि।"

 - सौरभ वैशंपायन.