Saturday, December 31, 2011

चिंता करितो विश्वाची
काल संध्याकाळि कॉफि पिताना ऑफिसच्या खिडकितून दिसणारा सूर्यास्त २०११ संपलं याची जाणीव देऊन गेला. दरवर्षी प्रमाणे "आयला ... वर्ष कसं सरलं ते समजलच नाहि" हे गेले आठवडाभर इतरांकडून ऐकणारं वाक्य मीच स्वत:ला ऐकवलं. खरच, दर वर्षी असच वाटत रहातं. व्यक्तीगत आयुष्यात अनेक लहान - मोठ्या घडामोडि घडल्या असतात. आनंदाचे - दु:खाचे क्षण आले असतात. अनेक नविन लोक आयुष्यात आले असतात काहि जवळची माणसं कायमची सोडून गेली असतात. अनेक गोष्टि पहिल्यांदाच केल्या असतात, आणि काहि गोष्टि शेवटच्याहि.

आपण आपल्या व्यक्तीगत आयुष्याचा ताळेबंद मांडतोच. पण आपल्या आजूबाजूला काय घडलं? काय घडतय व काय घडणार आहे? ह्याचा विचार किती स्वस्थपणे करतो? तसं तर प्रत्येक वर्ष आपलं काहीतरी वैशिष्ट्य मागे ठेवून जातं. पण २०११ हे वर्ष जगाच्या इतिहासात खूप बदल घडवण्याची सुरुवात ठरले होते. २०१२ मध्ये त्याचे परिणाम दृश्य स्वरूपात येतील. माझ्या मते १९८९ नंतर सलग इतक्या घडामोडि असलेले क्वचितच कुठले वर्ष असेल. १९८९ मध्ये सोव्हिएत युनियन कोसळले, पाठोपाठ बर्लिनची भिंत कोसळली "ग्लासानोत" व "पेरीस्त्रोइका" चे वारे रशियात वाहू लागले. अमेरिका एकटी 'महासत्ता' उरली. त्याचा माज अमेरिकेला तसाही होताच नंतर तर काही धरबंदच उरला नाही. जगाचे पोलीस हि भूमिका अमेरिका हट्टाने रेटू लागली. अफगाणिस्थानला रशियाचे व्हिएतनाम करायच्या नादात अमेरीकेने जे जिहादि पोसले होते ते मोजून एका दशकाने अमेरीकेवर उलटले. त्यात २००१ साली वर्ल्ड ट्रेड सेंटर खाली आल्यावर अमेरीकेची धुंदि काहिशी उतरली. त्याचे परिणामहि दूरागामी होते. त्याचीच फळे म्हणून अमेरिकेला आपली सेना अफगाणिस्थान - इराक मध्ये उतरवावी लागली. २००३ मध्ये बुश धाकटे यांनी इराक मध्ये उतरवलेले सैन्य गेल्याच पंधरवड्यात बराक ओबामांनी परत बोलावले आणि २०११ चा नाताळ अमेरीकन सैनिक आपापल्या घरी साजरा करतील हे दिलेले आश्वासन पाळले. यामागे अनेक उघड व छुपे हेतु आहेत. पुढच्या वर्षी असलेल्या निवडणुका लक्षात घेऊन ओबामांचे हे काम बघायला हवे. बुश कुलोत्पन्न दिवट्याने इराक  - अफगाणिस्थानात उतरवलेली सेना परत येण्याची चिन्हे दिसेनात. व्हिएतनाममध्ये आपलं काळं झालेलं तोंड अमेरिकन जनता अजून विसरली नसावी, व म्हणून इथेही आपले तळपट होणार ह्या स्वाभाविक भीतीने याच्या विरुध्द सामान्य अमेरिकन माणूस आवाज उठवू लागला. अखेर आधीच्याने केलेल्या चुका ओबामांनी निस्तरायचा पायंडाच पडला. सामान्य अमेरिकन आपल्या पाठीशी उभे करायला ओबामांनी ज्या अनेक गोष्टी केल्या त्यातली एक म्हणजे ह्या दोन ठिकाणाहून सैन्य परत बोलावणे. पण ह्याचे परीणाम भारताला व इस्त्राइलला भोगावे लागणार आहेत. कारण इथुन मोकळे झालेले व डोईजड झालेले जिहादि आता मोकाट बैलांप्रमाणे लेबनॉन व कश्मीरमध्ये उधळायला मोकळे झाले आहेत. 

२०११ या वर्षाची सुरुवातच अरब राष्ट्रांतील अनागोंदिने झाली. "अरब स्प्रिंग" म्हणून जगभर या लाटेचे कौतुक झाले, ते बरोबरहि होते. ट्युनिशियातील एका सामान्य फळविक्रेत्याने आत्मदहन केले, त्याचा वणवा झाला. पश्चिम आफ्रिकेच्या मॉरीटानापासून ते ओमानपर्यंत सामान्य जनतेला साम-दाम-दंड-भेद वापरुन आपल्या दावणीला बांधलेल्या आपापल्या नेत्यांविरुध्द अतिसामान्य माणूस उभा राहिला, त्याने मदांध सिंहासने चिरफाळली. इजिप्तच्या तेहरीर चौकात जमलेली गर्दि बघून जगभरातल्या नेत्यांच्या पायाखालची जमिन सरकली असेल, आपल्याकडे टिम अण्णाचे नवीन नवीन वारे होतेच. चीनने तर अरब उठावांच्या बातम्यांवर काहि काळ बंदि घातली होती. ट्युनिशिया, अल्जेरीया, लिबिया, इजिप्त, जॉर्डन, सिरीया, सौदि अरेबिया, ओमान, पॅलेस्टाइन सगळिकडे जनता रस्त्यावर उतरली. हिरण्याकश्यपूने प्रल्हादाला "कुठे आहे तुझा विष्णू?" म्हणून खांबाला लाथ मारावी आणि त्यातुन नरसिंह बाहेर यावा तसं काहिसं होतं हे. अरब राष्ट्रांत बघता बघता सत्ता पालट झाले. काहि ठिकाणी निवडणूका जाहिर झाल्या. गडाफिसारखा क्रूर हूकूमशहा दयेची याचना करत करत मेला. याच कर्नल गडाफिने एकेकाळि अमेरीकेला बोचकारले होते. "तेल" हे त्याचे शस्त्र होते. आणि अमेरीका त्याचे काहिहि बिघडवू शकली नव्हती. अमेरीकेचा एक शत्रू असा परस्पर मारला गेला. मुळात तो मारला गेला कारण अमेरीकेला तो नको होता. अन्यथा त्याची गरज असती तर अमेरीकेने त्याच्यासाठी काहिहि केले असते, जशी ती सौदि राजघराण्यासाठी करते अगदि तसेच. सौदि अरेबियातहि उठाव झाले पण त्याला फार हवा दिली गेली नाहि. सौदि राज घराण्याने सुध्दा चार - दोन सुविधा जाहिर करुन या बंडखोरीतली हवा तात्पुरती का होईना काढून टाकली.

लिबियात यजमानाच्याच काठीने साप मारला गेला त्यामुळे अमेरीकेला फार तोशिस पडली नाहि. पण २ मे तारीख उजाडली तीच या वर्षातली सर्वात महत्वाची बातमी घेऊन - "अमेरीकेच्या कारवाइत ओसामा बिन लादेन ठार!" बहुदा हि या वर्षातलीच नव्हे तर शतकातली सर्वात महत्वाची बातमी असावी. हे सगळे ऑपरेशन इतके गुप्त होते नेव्ही सीलच्या नेमक्या कुठल्या कमांडोने स्वहस्ते लादेनला पैगंबरवासी बनवले हे बराक ओबामांना देखिल सांगितले नाहि. पाठोपाठ ऑक्टोबर मध्येच अन्वर अल अवलाकि अमेरीकेच्या ड्रोन हल्यात मारला गेला. अल कायदाचे कंबरडेच याने मोडले. सध्या अमेरीका अयमन अल-जवाहिरीच्या मागे आहे. हा मारला गेला तर अल कायदाचा चेहराच पुसला जाईल. अर्थात याचा अर्थ अल कायदा संपली असा होत नाही. न जाणो ह्या मंथनातून कोणी सवाई लादेन उभा न राहिला म्हणजे मिळवले.

ह्या घडामोडित जग बुडले असताना तिथे युरोप व युरोपियन संघ आत्ममग्न मुलांप्रमाणे आपल्याच कोषात गेलाय हे सामान्य लोकांच्या फार उशीरा लक्षात आले. त्याचे झाले असे कि सध्या युरोपातील ग्रीस व इटली या राष्ट्रांची आर्थिक स्थिती अतिशय खराब आहे. खरंतर याची सुरुवात दोन वर्षांपूर्वी स्पेन, पोर्तुगाल, आयर्लंड यांच्यापासून झालीच होती, तद्‌नंतर ग्रीस व आता ऑक्टोबरच्या अखेरीस इटलीची भर पडली. इटली हि कुणी छोटीमोठी आर्थिक सत्ता नव्हे युरोपातली तिसरी मोठी अर्थव्यवस्था आहे आणि त्यांच्यावरच्या २.६ ट्रिलियन डॉलरच्या कर्जाच्या परतफेडिसाठी त्यांनी युरोपियन महासंघाकडे व जागतिक बॅंकेसमोर टोपी उपडि धरली. पण हा काहि ३ पैश्याचा तमाशा नव्हे कि वाजवली रोडच्या बाजूला गिटार आणि येणार्‍या - जाणार्‍याने टाकले २-४ युरो टोपीत. हा पैसा देखिल त्यांना देणार कोठून? मग बुडणारा जसा आजूबाजूला मिळेल त्याचा आधार घेतो तसे ग्रीस - इटली दिसेल तो हात पकडायला तयार आहेत. त्यांना जवळचे त्यातल्या त्यात भक्कम हात म्हणजे फ्रान्स व जर्मनी. पण ह्यांना पैसा - बेल आऊट पॅकेज पुरवावे तर त्याचा दुसरा अर्थ आपल्या तिजोरीला खड्डा पाडून घेणे. व आपल्या तिजोरीतला पैसा हा फ्रेंच - जर्मन नागरीकाचा आहे. अ‍ॅन्जेला मर्केल व सार्कोझी सहाजिकच हातचे रा्खून मदत करत आहेत. त्यांची पाऊले चूक कि बरोबर हे कदाचित येणारी ५ - ७ वर्षेच सांगू शकतील. सध्यातरी ग्रीस - स्पेन - इटली "युरो" चलन सोडायच्या विचारात असावेत आणि ते तसे असले तरी आश्चर्य वाटायला नको. अर्थात "युरो" सोडला तरी युरोपिअन युनियन कोणीहि सोडणार नाहि हे नक्कि. तिथे युरोपचे असे तर ऑगस्ट मध्ये "स्टॅन्डर्ड अ‍ॅन्ड पुअर" ने अमेरीकेचे गुंतवणूकिचे AAA स्टॅन्डर्ड कमी करून ते AA+ वरती आणले आणि मग अमेरीकेसकट जगभरात हि काहि दुखरी कळ उठली कि बास रे बास. एरवी या S&P चे गोडवे गाणारेच या संस्थेवरती आग पाखड करु लागले. भारतीयांसाठी गंमत म्हणजे अमेरीकेला तुमच्या देशातील गुंतवणूक AAA लायकिची नाहि हे सांगणारा बहाद्दर एक भारतीय होता. "देवेन शर्मा" त्यांच नाव. आपल्या बिहारच्या व आता झारखंडच्या धानबाद नामक एका मागासलेल्या भागातून मेहनतीने तिथे पोहचेला पठ्ठा. अर्थात राजा नागडा फिरत असला तरी तो नागडा आहे हे सांगायचं नसतं, ती चूक देवेन शर्मांनी न बिचकता केली. महिनाभरातच त्यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला.

युरोपियन महासंघाचं हे असं तर अमेरीकेतील न्यूयॉर्क मधल्या वॉल स्ट्रीट वरती सप्टेंबर मध्ये हजारो लोक एकमेकांच्या हातात हात गुंफुन उतरले. २००८ मध्ये जी आर्थिक मंदि आली होती त्यानंतर गेल्या २ वर्षात बरीच उलट सुलट चर्चा झाली, व १% लोकं जी आर्थिक ताकद राखून आहेत ते सरकारला त्यांची धोरणे बदलायला भाग पाडतात यावर लोकं आक्षेप घेऊ लागली. संप्पतीचे असमान वाटप, बेरोजगारी, भ्रष्टाचार याविरुध्द आवाज उठवण्यासाठी "ऑक्युपाय वॉल स्ट्रीट" हि संकल्पना निघाली. त्याचे पोस्टरच - एक नृत्यांगना चार्गिंग बुल (अमेरीकन स्टॉक एक्स्चेंजचे चिन्ह) वरती नृत्य करते आहे व खालती "Occupy wall Street, September 17th, BRING TENT" अशीच केली होती. आणि खरच ३ दिवसात हजारो लोक तिथल्या झ्युकोटि पार्क मध्ये जमले. मध्यमवर्गीय लोकांनीच वर्गणी काढून या चळवळीसाठी पैसा उभा केला. वॉल स्ट्रीट भागात लाऊड स्पीकर वरती बंदि असल्याने लोकांनी एक गंमतीदार शक्कल लढवली - "ह्युमन मायक्रोफोन".... म्हणजे जे घोषणा देणारे किंवा भाषण देणारे होते ते एक छोटं वाक्य म्हणून थांबायचे, ते वाक्य जितक्या लोकांनी ऐकलय ती परत तेच वाक्य एकत्र म्हणत, मग त्यांचा आवाज जितक्या लोकांपर्यंत जाइ ती लोकं पुन्हा ते वाक्य म्हणत .... अश्या तर्‍हेने "लिखित नियम" न मोडता उलट अजून मोठ्या आवाजात घोषणांच्या लाटा एका पाठोपाठ एक थडकत राहिल्या. यातली मुख्य घोषणा होती "we are 99%."


ह्या झाल्या मानव निर्मित घटना. २०११ नैसर्गिक आपत्तींनीहि गाजवले. मुख्यत: जपानमध्ये आलेले भूकंप व त्यानंतरची अति विध्वंसक त्सुनामी. हे कमी होतं म्हणून कि काय फुकुशिमा अणूभट्टितून आण्विक किरणांचे मोठ्या प्रमाणावर प्रसारण झाले. मुळात आधीच जपान आर्थिक चणचणीत असताना हि संकट एकामागोमाग एक थडकतच होती. या सगळ्याची भरपाई व्हायला निदान १० वर्षे सहज जातील ती सुध्दा ’स्थिर’ वर्षे हवीत. थायलंड, मेक्सिको या ठिकाणच्या महापुरांनी देखिल जगाच्या व अर्थात त्या देशांच्या आर्थिक बाजूवर मोठा आघात केला आहे. थायलंडच्या महापुराने तर अनेक इलेक्ट्रिक उपकरणे विकणार्‍या कंपन्यांच्या पुरवठ्यावर परीणाम झाला. कारण अनेक मोठ्या कंपन्यांचे उत्पादन करणारे कारखाने थायलंड मध्ये आहेत. साधी हार्डडिस्क घ्या, १० पैकि ८ हार्डडिस्कवरती ’मेड इन थायलंडचाच’ शिक्का असतो. या दिवसात मागणी इतका पुरवठा नसल्याने बाजारातील हार्डडिस्कच्या किंमतीहि लक्षणिय वाढल्या. जग आर्थिक दृष्ट्या असे जवळ आल्याने दुसर्‍या देशांतील कुठल्या आपत्तीने आपल्या सामान्यांच्या खिशाला चाट लागेल ह्याचा विचारहि करता येत नाहि. 

एकूणच गेल्या वर्षातील जगाचा आणि  देशाचा धांडोळा घेतल्यावर दिसणारं चित्र फारसं आशादायक नव्हतं असंच म्हणावं लागेल. इतक्या अस्थिर वर्षात जग तग धरुन रहातय हेच विशेष. आर्थिक संकटांनी अमेरीका, युरोप, जपान, बर्‍याच अंशी भारत देखिल ग्रासले आहेत. भारतात महागाईने गेल्या ६० वर्षातला कहर केला आहे, रुपयाची पत डॉलर समोर ३ महिन्यात घसरली. रेपो रेट कमी करायला RBI तयार नाहि, S&P ने अमेरीके बरोबर अर्थात भारताच्या गुंतवणूकिच्या दर्जाला कमी लेखल्याने परदेशी गुंतवणूकिचे वांदे झाले आहेत, शेअर बाजार त्या गणिताच्या पुस्तकातल्या भिंतीवरच्या पाली सारखा ३ फुट वर २ फुट खाली करतोय (कधी कधी तर उलटा ४ फुट खाली सुध्दा). राष्ट्रकुलदिपक कलमाडि, राष्ट्रसेविका कनिमोळी, ए. राजा वगैरे सुखनैव दिवस ढकलत आहेत. टिम अण्णांची आशा वाटत होती पण लोकांना कंटाळा येईल इतका मारा त्यांनीहि केल्याने जनता पुन्हा थंड झाली आहे. लोकपाल बिल फुटबॉल सारखे इथुन तिथे, ह्याकडून त्याकडे लाथाडले जात आहे. त्यातून ५ राज्यांच्या निवडणूका जाहिर झाल्याने हरीदासाची कथा मुळ पदावर आली आहे. आणि जनता पुन्हा आपणहुन खड्ड्यात उडि मारणार असेहि दिसत आहे.

२०११ हे वर्ष जगभरातच चळवळिंचे वर्ष होते. ह्यातल्या अनेक घटना पुढल्या दशकावर दूरागामी परीणाम करणार आहेत. पुढल्या वर्षात जवळपास २० देशांच्या निवडणूका आहेत. आणि त्यात अमेरीका - रशिया यांची अध्यक्ष - पंतप्रधान यांसारख्या महत्वाच्या पदांच्या निवडणूका आहेत. या निवडणूकांत ओबामांचे पारडे जड असले तरी आर्थिक निकषांवर त्यांची लोकप्रियता कमी झाल्याचे बोलले जात आहे, तश्यातच रीपब्लिकनांनी मीट रुमनींना अध्यक्षपदाचा दावेदार म्हणून उभे केले तर ओबामांना तगडि टक्कर मिळेल. दुसरीकडे रशियात तसेहि राष्ट्राध्यक्ष पुतीन लोकांच्या रोषाला बळि पडले आहेत, पण तरी ते आता पंतप्रधान पदासाठी उभे राहतील असे सध्याचे पंदप्रधान दिमित्रि मेदवेदेव्ह यांनीच जाहिर केले आहे. तुलनेने विरोधकांचा आवाज सध्या तुलनेने कमी असला तरी पुतीन यांना निवडणूक जिंकणे सोपे जाणार नाहि असे दिसत आहे. याच दरम्यान चीन मधल्या कम्युनिस्ट पार्टीच्या अध्यक्ष पदाचीहि निवडणूक होणार आहे. अर्थात हि निवडणूक चीनमध्ये अध्यक्षपदापेक्षा कमी नाहि असेच म्हणावे लागेल. फ्रान्समध्येहि अध्यक्षपदाची निवडणूक आहे. ह्या निवडणूकिवर फ्रान्सचीच नव्हे तर आर्थिक दृष्ट्या घुसमटलेल्या युरोपाचीहि मदार आहे असे म्हणावे लागेल. निकोलस सार्कोझी परत सत्तेवर येण्याची शक्यता मला तरी वाटत नाहि. खेरीज मेक्सिको, झिंब्वावे, व्हेनेझुएला, लिबिया, इजिप्त, इराण, दक्षिण कोरीया, येमेन, केनिया, युक्रेन अश्या जगावर परीणाम करतील अश्या देशांच्याया निवडणूका आहेतच.

तिथे उत्तर कोरीयात जनतेला मारुन मुटकुन "लाडके" म्हणवले जाणारे किम जोंग इल यांनी गेल्या पंधरवड्यात अखेरचा श्वास घेतला तरी लोकांना सुटकेचा निश्वास टाकता आला नाहि. कारण लगोलग त्यांचे धाकटे ’सुपुत्र’ किम जोंग उन गादिचे वारसदार ठरवले गेले आहेत. इतकेच नव्हे तर लगोलग त्यांना सेनेचे सर्वोच्च कमांडर देखिल जाहिर केले आहे, ह्याचा दुसरा अर्थ त्यांनी अपेक्षेपेक्षाहि बरीच लवकर पकड मजबूत केली आहे. असेच चालू राहिले तर हे तरुण रक्त जोशात येऊन दक्षिण कोरीयाची खोड काढणार नाहित याची अजिबात खात्री नाहिये. तसेहि गेल्यावर्षी दक्षिण कोरीयाची एक पाणबुडि उत्तर कोरीयाने बुडवली होती. युध्द सुरु व्हायचेच बाकि राहिले होते, पण तेव्हा पासून ताणले गेलेले संबध अजून सामान्य स्थितीवर आले नाहियेत. आणि येण्याची चिन्हेहि नाहित. उलट आम्हि दु:खात असताना दक्षिण कोरीयात नववर्षाचे स्वागत करणारा तारा दिसल्यास ते दक्षिण कोरीयाला महाग पडेल अशी धमकिहि त्यांनी दिली होती.


उत्तर कोरीयाच्या या धमकिच्या पार्श्वभूमीवरतीच सगळ्या जगाकडे दृष्टिक्षेप टाकल्यास २०१२ मध्ये जलप्रलय होऊन जग बुडण्यापेक्षा जगाच्या विविध भागात अग्निप्रलय होण्याचीच शक्यता जास्त दिसत आहे. आणि ती झालीच तर मध्यपूर्व हेच त्याचे केंद्र असेल. अरब स्प्रिंगसाठी कितीहि टाळ्या वाजवल्या तरी काहि बाजूंवर विचार हा झालाच पाहिजे. झाडून सगळ्याच अरब राष्ट्रात अचानक जाग व चेतना आल्याने प्रचंड अस्वस्थता व अस्थिरताहि आली आहे. आधीच या अरब राष्ट्रांचे एकमेकांत फारसे पटत नाही. तरी जेव्हा एखाद्या देशात क्रांती होते तेव्हा त्याला स्थिरता येण्यासाठी बाजूची राष्ट्रे शांत व भक्कम असावी लागतात पण अरब राष्ट्रांचा अख्खा पट्टाच क्रांतीप्रणव झाल्याने  सगळे चित्र अंधुक आहे व पुढले वर्षभर ते तसेच राहिल अशी चिन्हे आहेत.  लिबियामध्ये कट्टर मुस्लिम विचारधारेची लोकं सत्ता हस्तगत करणार असे वातावरण तयार झाले आहे. तसं झालंच तर लिबिया हा आफ्रिकि देशांतला दुसरा पाकिस्तानच तयार होईल जो आतंकवाद्यांना सुरक्षा देतो व मागणी तसा पुरवठाहि करतो. ट्युनिशियात अल नाहद नावाची कट्टर पंथियांचा पक्ष लोकांचे भरपुर समर्थन प्राप्त करते आहे. मोरक्कोची स्थिती वेगळि नहिये. १९७९ मध्ये इराणमध्ये जी इस्लामिक क्रांती झाली त्याची आठवण काहिंना होईल. शिया पंथिय इराणचा प्रभाव लेबनॉन वरती आहे. इजिप्त मध्येहि मुस्लिमब्रदरहुडचे बागलबच्चे असलेले "फ्रिडम अ‍ॅन्ड जस्टिस" पार्टि व कट्टर पंथिय सलाफी अल-नूर एकत्रित पणे सत्तेकडे कूच करत आहेत. याचा एक अर्थ सत्ता कट्टरपंथियांकडे जाण्याचा धोका आहे असा असला तरी दुसरा अर्थ  - होणारा संघर्ष हा मुक्त विचारधारा व मुस्लिम विचारधारा यांत होणारा नसून दोन मुस्लिम विचारधारांमधला आहे जे जास्त धोकादायक आहे. तसं बघता अरब राष्ट्रांत ३ मुस्लिम विचारधारा आहेत १) कट्टरपंथिय जे लिबियात आहेत, २) मवाळपंथी जे टर्कित दिसतात तर ३) मुस्लिमब्रदरहुड जे मधला मार्ग अवलंबत आहेत.


पुढचा विचार इस्त्राइल - पॅलेस्टाईन भागाचा करावा लागेल. गेल्या २ हजार वर्षाच जगातला क्वचितच असा कुठला भाग असेल तो इतका अस्थिर आहे. पॅलस्टाइन मध्ये हमासचा जोर प्रचंड वाढला आहे. वरुन त्याला सिरीया - इराणचा उघड पाठिंबा मिळाला आहे. दर दोन महिन्यात किमान एकदा तरी तरी इस्त्राइल - पॅलस्टाइन मध्ये युध्दसदृश्य परीस्थिती निर्माण होत आहे. त्याचा विस्फोट कधीहि होऊ शकतो. तो झालाच तर अमेरीकेला इस्त्राइलच्या बाजूने मध्ये पडावे लागेल. यामुळे १९७३पेक्षाहि भिषण परीस्थीती निर्माण होईलच, पण त्याचा परीणाम थेट तेलावर होणार आहे. स्वत:चे अणूतंत्रज्ञान वीज निर्मितीच्या नावावरती वाढवित सुटलेले इराण तर सध्या उघड उघड अमेरीकेला टुक टुक माकड करत खिजवतय. अमेरीकेची हेरगिरी करणारी २ ड्रोन्स खाली पाडल्यावर तर इराणला आयते कोलितच मिळाले आहे. असा जाहिर पोपट झाल्यावर वॉशिंग्टन मधले "ड्रोनाचार्य"  गप्प बसले तरच आश्चर्य होते. त्यांनी इराणवरती थेट सौदि अरेबियाच्या राजदूताची हत्या करण्याचा आरोप लावला. इराणने तो आरोप अर्थात फेटाळला. पण इराणाहि कालागती करण्यात मागे नाहि. कालच म्हणजे ३१ डिसेंबर रोजीच इराणने गल्फच्या आखातात मध्यम पल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली. वरुन "हारमुज चे संपूर्ण आखात आमच्या टप्यात आले आहे!" या शब्दात आपल्या सामर्थ्याची कल्पना जगाला दिली. हि साधी बाब नाहि. या ठिकाणहुन जगभरातील तेलाच्या एकूण २०% वाहतूक होते. आणि आजच म्हणजे नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशीच अमेरीकेने इराणवरील आर्थिक निर्बंध अधिक कडक केल्याचे जाहिर केले आहे, युरोपियन महासंघाने तसेहि इराणवरती १ डिसेंबर रोजी आर्थिक निर्बंध लादले होतेच. नव्या वर्षाची नांदिच अशी झाल्यावर पुढे जगाच्या रंगमंचावर काय काय होणार आहे याचा विचार करणे भाग पडते.

नाहि म्हणायला २०११ मधला जिंकलेला क्रिकेट विश्वचषक हि भारतीयांसाठी सुखद आठवण होती तर २०१२ सालचे ऑलंपिक हि उत्सुकता आहे. अश्या सुखद आठवणी व उत्सुकतांवर जग जगत असते. मी वरती जे लिहिले आहे त्याला काहिजण होकार देतील काहिंना नव्या वर्षाचा केलेला रसभंग वाटेल. पण आपण रोजच्या आयुष्यात या गोष्टिंकडे लक्ष देत नाहि, खरंतर तितका वेळहि नसतो. तरीहि नविन वाटेवर पाऊल ठेवताना "सिंहावलोकन" करावसं वाटलं इतकच.


सगळ्याचा विचार करताना मला राहुन राहुन चार्ल्स डिकन्सच्या "अ टेल ऑफ टू सिटिज्‌" या जगप्रसिध्द कादंबरी मधल्या  एका सुरेख परीच्छेदाची आठवण झाली -
"It was the best of times, it was the worst of times, it was the age of wisdom, it was the age of foolishness, it was the epoch of belief, it was the epoch of incredulity, it was the season of Light, it was the season of Darkness, it was the spring of hope, it was the winter of despair, we had everything before us, we had nothing before us, we were all going direct to heaven, we were all going direct the other way - in short, the period was so far like the present period, that some of its noisiest authorities insisted on its being received, for good or for evil, in the superlative degree of comparison only."


- सौरभ वैशंपायन

Thursday, December 22, 2011

शिवछत्रपती : एक नितांत सुंदर कोडं!
सध्या http://www.marathaempire.in या साइटच्या निमित्ताने शिवचरीत्र व त्याच्याशी संबधित घटनांवर बरेच वाचन होते आहे. नवनविन संदर्भ वाचनात येत आहेत. शिवपूर्वकाल - शिवकाल आणि शिवोत्तरकाल यांची आलटून पालटून तुलना होते आणि मग इतिहासात "जर-तर" ला स्थान नसते हे हजारदा स्वत:ला बजावून देखिल त्या तुलनेत स्वत:ला मी हरवून बसतो. शि-वा-जी या तीन अक्षरांनी जे काहि घडवलं त्याला जगाच्या इतिहासात तोड नाहि. केवळ मी मराठी आहे म्हणून मी म्हणत नाहिये किंवा यात अतिशयोक्तीहि नाहिये. परदेशी इतिहासकार शिवछत्रपतींची तुलना सिकंदर, नेपोलिअन बोनापार्टशी करतात. पण शिवछत्रपती हे त्यांच्यापेक्षा कित्येकपटींनी सरस आहेत. सिकंदर - नेपोलिअन यांना जगज्जेता व्हायचं होतं, फरक इथुनच सुरु होतो. महाराजांनी खरंतर छत्रपती व्हावं किंवा कोणी जग पादाक्रांत करणारा चक्रवर्ती सम्राट व्हावं म्हणून हे कार्य केलं नाहि. जनतेला आपल्या पोटच्या पोरांप्रमाणे त्यांनी सांभाळलं. अर्थात महाराजांचे लक्ष दिल्लीवर होतेच ते त्याला "थोरली मसलत" म्हणत. पण ते अमर्याद सत्तेसाठी हपापलेले दिसत नाहित.रयतेच्या काडिसहि हात लावू नये हे पत्रातून आपल्या अधिकार्‍यांना सांगतात. आज्ञापत्र किंवा शिवाजी महाराजांनी गडांवरती नामजाद केलेल्या अधिकार्‍यांना युध्द प्रसंगी. शांततामय कालखंडात व नवा किल्ला बांधतेवेळी केलेल्या आज्ञा/धाडलेली पत्रे वाचल्यावर हा माणूस बदलत्या काळाच्या बरोबरीचा विचार करतच होता पण आर्य चाणक्यांप्रमाणेच नंतरची कित्येक शतके सहज अबाधित राहिल - आदर्श राहिल असाहि विचार करत होता हे समजतं. राज्य कारभार करताना आजूबाजूच्या परीस्थितीचे त्यांना किती भान होते व आजूबाजूच्या देशी-परदेशी माणसांची त्यांना किती जाण होती हे त्यांच्या एका पत्रावरुन समजतं. फिरंगी लोकांना समुद्रकिनारी वखार बांधायला दिली कि ते हमखास पाठीशी आरमार घेऊन पुढे तट बांधून किल्ला करणार म्हणजे ती जागा गेलीच समजावे, म्हणून त्यांना समुद्र किनारी वस्ती करु देऊ नये. त्यांच्याशी संबध आले-गेले इतपतच असावेत असे स्पष्टपणे त्यांनी म्हंटले आहे. परकियांचे हेतु महाराजांनी आधीच स्वच्छ वाचले होते हेच यातुन दिसते.


महाराजांनी इतर धर्मियांवर अत्याचार केले नाहित मात्र त्यांना आपल्या डोक्यावर मिर्‍याही वाटू दिल्या नाहित. गरज पडली तेव्हा गोव्याच्या सीमेवरती जूलमाने धर्मांतर करणार्‍या ४ पाद्र्यांना पकडले व त्यांनाच हिंदू धर्म स्वीकारण्याचा हूकूम दिला, तो नाकारताच त्यांचा तिथल्या तिथे शिरच्छेद केला. त्या बरोबर धर्मांध पोर्तुगिजांचे हिंदू जनतेवरील विकृत अत्याचार बरेच थंड झाले. तसेच ३-४ ठिकाणे मंदिरे पाडून बलात्काराने मशिदि उभारल्या होत्या शिवछत्रपतींनी त्या पाडून पुन्हा तिथे मंदिरे उभारल्याचे दाखले आहेत. ज्यांना "हिंदवी" स्वराज्य म्हणताना जीभेला अर्धांगवायूचा झटका येतो त्यांच्यासाठी हे नमुनादाखल सांगतो आहे. शिवाय शिवछत्रपतींचे राज्य हे "हिंदवी स्वराज्य" होते आणि म्हणूनच इतर धर्महि सुखनैव नांदत होते हे लक्षात घ्यायला हवे. आणि शिवछत्रपतीच का? शिवरायांआधीचा कुठलाहि बलाढ्य हिंदू राजा घ्या व त्याच्या राज्यात दुसर्‍या धर्माची मुस्काटदाबी होत होती हे कुणीहि सप्रमाण सिध्द करुन दाखवावे. हि सामाजिक  गणिते पडताळली कि नसते भ्रम आपोआप लयास जातील. "गर न होते शिवराय तो होत सुन्नत सबकि!" किंवा "काल तुरकान भयो, दख्खनकि ढाल भयो!" हि केवळ तोंड देखली स्तुती सुमने नसून सुमारे हजार वर्ष हिंदु धर्मावर होणार्‍या आघातांचा आक्रोश होता. हे काव्यांच्या या दोन पंक्तीच सुमारे हजार वर्षांची ससेहोलपट सांगतात. हजार वर्षांची समाजाची हि धार्मिक फरपट थांबवणारी व्यक्ती अर्थातच "महान" बनते. इथे शिवराय "धार्मिक" कसोटिंवर उजळुन समोर येतात."योध्दा किंवा सेनापती" म्हणून महाराजांचा विचार करताना दोन गोष्टि आधी सांगतो एक म्हणजे अमेरीकेच्या वेस्ट पॉइंट मिलटरी अकादमीत शिकवण्यासाठी जगभरातल्या उत्तम लढायांची वाळूची प्रतिके तयार केली आहेत. त्यात २ युध्दे मराठ्यांची आहेत एक आहे प्रतापगडचे शिवराय-अफझलखान युध्द व दुसरे म्हणजे थोरल्या बाजीरावांनी जिंकलेली पालखेडची लढाई. दुसरी गोष्ट अशी कि व्हिएतनामच्या प्रतिकाराचे प्रतिक असलेले नेते "हो-ची-म्हिन" जेव्हा भारतात आले होते तेव्हा त्यांनी गुरिल्ला वॉर बाबत बोलताना श्री मोहन धारीया यांना म्हंटले होते "अमेरीकेविरुध्द लढताना आम्हि शिवाजीच्या गनिमी काव्याच्या क्लूप्त्या बारकाईने अभ्यासल्या होत्या!"  अमेरीकेला २४ वर्ष आगीचा पाऊस पाडून देखिल व्हिएतनाम मधून हरुन बाहेर पडावं लागलं होतं त्या पार्श्वभूमीवर याचा विचार व्हायला हवा. हे म्हणजे तीनशे वर्षांनी देखिल जूलूमा विरुध्द आवाज उठवणार्‍यांच्यापाठी शिवराय उभे राहिल्यासारखे तर होतेच पण अप्रत्यक्षपणे अमेरीकेलाच हरवल्यासारखे नव्हते काय? हा विचार केल्यावर मग महाराजांमधला योध्दा त्याचे तंत्र पुन्हा काळाच्या कसोटिवर यशस्वीपणे उतरते. कमीतकमी सामान व शक्य तितके चपळ सैन्य हा त्यांचा मुख्य मंत्र होता. अगदि स्वत: महाराज युध्दभूमीवर असतानाहि, जाड कापडाचे २ तंबू असत. लहान तंबु त्यांच्यायसाठी व मोठा तंबू चर्चा करायला त्यांना व सरदारांना असे, बास, इतकाच काय तो पसारा. जत्रेला निघाल्यागत आपले जनाने - बगीचेच गाड्यांवर लादुन फिरणार्‍या मुघलांना महाराज व मावळे येता-जाता आरामात का टपलवून जात याचे उत्तर यानंतर फारच सोप्पे होऊन जाते. तीच गोष्ट आरमाराची. भारतातील इतर मुख्य सतांचा आरमाराबाबत आनंद असताना, ज्याचे आरमार त्याचा समुद्र हे ओळखून व समुद्रप्रवास निषिध्द मानणारी वेडगळ वैचारिक जळमटे त्यांनी पार झटकून टाकली व समर्थ आरमाराची निर्मिती केली. पार कॉंगो-मस्कत पर्यंत मराठी जहाजे जात होती. अखेर "शिवाजी मुळचा दर्यावर्दि नाहि हि देवाची कृपा अन्यथा त्याने सगळा समुद्रच जिंकला असता!" असे म्हणायची पाळि त्यांनी टोपिकरांवर आणली होती. दुर्गबांधणीचे तंत्रज्ञान बघितल्यावर महाराज किती श्रेष्ठ दर्जाचे दुर्गस्थापत्यविशारद होते हे समजून येतं. खास करुन राजगड व रायगडची राजधानी म्हणून केलेली निवड. कुरटे बेटावर अजिंक्य शिवलंका असा सिंधुदुर्ग उभारण्याची कल्पना हे आजहि साक्ष द्यायला उभे आहेत.राज्य व राज्यकर्ता म्हणून अजून एक सर्वात महत्वाची बाब म्हणजे "आर्थिक" आघाडि. सुरुवातीला महाराजांनी पैसा जमा करायला दोनदा सुरत, कारंजे, दिंडोरी वगैरे लुटले तरी ती तत्कालिन गरज होती हे लक्षात घ्यायला हवे. स्वराज्याच्या सुरुवातीला पैसा उभारण्यासाठी दुसरी सोय नव्हती. आणि तसाहि झिजिया कर हा लुटिपेक्षा वेगळा नव्हता असे माझे वैयक्तीक मत आहे. आमच्याच देशात येऊन आंम्हाला नागवणार्‍या परदेशी लोकांच्या लेखणीला बळी पडलेले आमचे माजी पंतप्रधान शिवरायांना "लुटारु" म्हणून मोकळे होतात तेव्हा भारताच्या इतिहासाबाबतचे त्यांचे ज्ञान व दृष्टि स्पष्ट होते. मात्र महाराजांना व्यापारात मोठा बद्ल घडवून आणायचा होता व एक मोठे व्यापारी केंद्र रायगडवरती वसवायचे होते हे रायगडवरील हुजूरबाजार (ती "बाजारपेठ" नव्हे) व आज्ञापत्रातील "साहुकार" प्रकरण सांगते. तसेच गोव्यातुन येणारे मीठ पोर्तुगीज कमी दरांत विकतात त्याने स्वराज्यातील मीठाला तोटा होतो हे समजल्यावर पोर्तुगीज जे मीठ आणतील त्यावर भरपूर कर बसवा हा सोपा उपाय ते सुचवताना दिसतात. अजून अनेक उदाहरणे देता येतील. थोडक्यात तलवार व तराजू  या दोहोंचे महत्व महाराजांना सारखेच होते हे दिसते.

अश्या अनेक बाबी अनेक सद्गुण दाखवता येतील पण लेखातला शेवटचा म्हणून घेतलेला गुण म्हणजे चरीत्र. शत्रूनेहि आदराने मान झुकवावी इतके स्वच्छ चरीत्र महाराजांनी उभे केले. मुळातला उमदा स्वभाव व निष्कलंक चरीत्र यामुळेच त्यांचासाठी जीव द्यायला तयार झालेले लाखो जण शिवोत्तर कालातहि त्याच स्वामीनिष्ठेने लढत होते - पडत होते - जिंकत होते. गुणग्राहकता हि अजून एक जमेची बाजू. कुथला माणुस कुठे - कधी - कसा उपयोगात आणायचा याचे अचूक ज्ञान त्यांच्याकडे होते.

शिवछत्रपती हा न संपणारा विषय आहे. बौध्दिक, मानसिक, शारीरिक, आर्थिक, सामाजिक, सामरीक कसोट्यांवर ते यशस्वी ठरले. त्यांची उदाहरणे, विचार कालातीत ठरले. अश्यांना "द्रष्टा" हाच एकमेव योग्य शब्द आहे. लाखो कागदपत्रे नष्ट झाली, अजून लाखो कागदपत्रे अंधारात आहेत. शिवचरीत्राला आपण आत्ताशी कुठे स्पर्ष केलाय अजून खूप काहि प्रकाशात यायचे आहे. म्हणूनच म्हणतो शिवछ्त्रपती हे एक नितांत सुंदर कोडे आहे. कधीच न संपणारे तरीहि पुन: पुन: नव्याने सोडवूनहि गुंगवणारे, चकवणारे आणि तितकेच शिकवणारे देखिल!

 - सौरभ वैशंपायन.

Tuesday, December 6, 2011

जझीरे मेहरुब

पायात बारीकसा काटा घुसावा आणि अनेक प्रयत्न करूनहि काढता न आल्याने बघता बघता त्याचं कुरुप व्हावं, असे दोन काटे दख्खन प्रांतात घुसले एक होते "निझाम" आणि दुसरे होते "सिद्दि". अगदि भारत स्वतंत्र होऊन आपापली संस्थाने नाईलाजाने भारत अथवा पाकिस्तानात विलीन करावी लागली तोवर हे वेगळेपण राखून होते.

"राजापूरचे शिद्दि ’घरात जैसा उंदिर तैसा शत्रू’" हे महाराजांचे बोल संपूर्ण सत्य ठरले. निझाम - सिद्दि इतके चिवट कि देशाच्या दुर्दैवाने ते मराठ्यांना पुरुन उरले. जंजिरा जिंकण्यासाठी मराठ्यांनी काय केले नाही? पण किल्ला जिंकला म्हणता म्हणता माशी शिंकायची व सिद्दि पुन्हा तग धरायचा व वेळ मिळताच उचल खायचा. तब्बल ३२० वर्षे हा पापग्रह कोकण किनार्‍याला ग्रासून होता. भौगोलिक दृष्ट्या लहानश्या पण अती महत्वाच्या ठिकाणी सिद्यांनी आपली कधीच न निघणारी पाचर ठोकून ठेवली होती.

इतिहासाचा विचार करताना, शिवाजी महाराज हे इतरांपेक्षा दशांगुळे मोठे का ठरतात? हे बघण्यासाठी त्यांचे शत्रू किती क्रूर, शूर, कपटी, मुत्सद्दि, चिवट व बलाढ्य होते हे समजून घेतले पाहिजे. त्यांची तुलना महाराजांशी केली कि त्यावेळि व त्यानंतर महाराजांसारखा पट्टिचा राजकारणी झाला नाहि, चलाख योध्दा झाला नाहि, द्रष्टा किंवा राज्यकर्ता झाला नाहि हे सत्य अजून हजारो पटींनी उजळून समोर येतं.

काहि बाबी एकमेकांत इतक्या गुंतल्या असतात कि त्या वेगळ्या काढताच येत नाहित. मराठ्यांचे आरमार व जंजिरा हे इतिहासात एकमेकांना इतके छेद देतात कि "Pick-a-stick" च्या खेळासारख्या घटना एकमेकांवर अवलंबून आहेत. एकिला पकडायला जावं तर दुसरीला धक्का लागतो, तीला सोडवायला जावं तर ती अजून चार काड्यात दडली असते. थोडाफार प्रयत्न करताना मला जे काहि हाताला लागलं ते इथे मांडतोय. चला पहिली स्टीक उचलूया?  - कोण होते हे सिद्दि???

आफ्रिकेच्या पूर्व किनार्‍यावरचे इथिओपिया आणि एरिट्रिया माहित आहे? त्याच इथिओपियाच्या उत्तरेकडिल व एरिट्रिया च्या दक्षिणेकडिल काहि भागाला पूर्वी ’अ‍ॅबेसिनिया’ म्हणत, नंतर तर इथिओपियालाच अनेक नकाशात अ‍ॅबेसिनिया हे नाव मिळालेलं दिसतं. "हबश" लोकांनी इथे बरीच तलवार गाजवली स्वत:चे राज्य निर्माण केले. सिद्यांची कुळकथा सुरु होते ती इथुनच. सध्याचा सौदि अरेबिया म्हणजेच आधीचा अरबस्तानचा शेजार असल्याने हे कट्टर मुस्लिम बनले. आफ्रिकेतून जगभर गुलामांचा व्यापार होत असे. अ‍ॅबिसिनिया त्याला अपवाद कसे ठरेल? अमेरीका - युरोपमध्ये स्पॅनिश - पोर्तुगिज लोकं आफ्रिकेतील गुलाम नेत तर पूर्वेकडे अरबांनी या व्यवसायाला ’बरकत’ आणली. या हबस लोकांची भारताला पहिली ओळख झाली ती गुलाम म्हणून तरी किंवा व्यापारी म्हणून तरी. साधारण १२ व्या शतकाच्या आसपास ह्या हबस लोकांच्या वस्त्या भारताच्या पश्चिम किनार्‍यांवर पसरु लागल्या. मुळचे आफ्रिकि असले तरी इथल्या स्थानिकांबरोबर शरीरसंबध आल्याने पिढ्या न पिढ्या नाकि-डोळि बदलत गेल्या. पोर्तुगिजांचे पांढरे पाय ज्या अशुभ दिनी भारताला लागले त्याच दिवशी भारताबरोबर हबश्यांचेहि ग्रह नीचीचे झाले असे म्हणावे लागेल. पुढे इतर युरोपिय देखिल इथे हातपाय पसरु लागल्याने अरब-हबश्यांना आपला बाजार आवरता घ्यावा लागत होता.

जंजिरेकर सिद्यांचा ध्वज.


मात्र जात्याच चिवट, स्वामीनिष्ठ, कामसू, साहसी, शूर व क्रूर असल्याने या गुणांच्या जोरावर सिद्यांनी इथल्या बहमनी सत्तेत प्रवेश केला. मोठ्या पदांपर्यंत चढले. आपल्या लोकांना आणून इथली वस्ती वाढवली. मलिक अंबर हे सर्वात मोठं उदाहरण. दारिद्र्याने हैराण झालेल्या आई-बापाने या आठ वर्षाच्या पोराला बगदादला चक्क गुलाम म्हणून विकलं, तिथुन त्याला निझामशहाच्या चंगेजखान नामक मोठ्या मंत्र्याने अहमदनगरला स्वत:चा गुलाम म्हणून आणलं. मधल्या काळात निझामशाहिची वाताहात सुरु झाली पण स्वत:च्या कर्तृत्वावरती तो निझामशाहित वजीर पदापर्यंत पोहोचला. मुघलांना, बिदरशहाला, आदिलशहाला आलटुन पालटून तो धक्के देत राहिला, कधी मैत्री करत राहिला. नंतर नंतर त्याची ताकद इतकि वाढली कि दिल्लीहून पळून आलेल्या शहॉंजहानला त्याने शहाजीराजांच्या हाती सोपवले व मुघलांशी उघड शत्रुत्व पत्करले. मलिक अंबरच्या काळात निजामशाहि २ वेळा बुडता बुडता त्याने वाचवली. शहाजीराजांसारख्या हुशार व कर्तबगार मराठ्यांची एक फळिच या मलिक अंबरने उभी केली. शहाजीराजे व मलिक अंबर यांचा सुरुवातीला स्नेहसंबध होता, नंतर मात्र दोघांत दुरावा आल्याचे जाणवते. मलिक अंबर निसंशय एक उत्तम प्रशासक, कुशल सेनापती होता. त्याने शेतसार्‍याची जी पध्दत दख्खनप्रांतात लागु केली ती अगदि इंग्रजांच्या काळापर्यंत नावाजली गेली. असे अनेक हबशी निजामशाहि - आदिलशाहित होते.

जंजिर्‍याच्या जन्माची कथा मात्र बहमनी काळातच सुरु होते. झालं असं कि  इ.स.१४८२-८३ मध्ये जुन्नर प्रांताचा सुभेदार असलेल्या मलिक अहमदने कोकणवरती स्वारी केली. वर्षभर हि मोहिम चालली. त्याने १४८५-८६ च्या दरम्यान दंडा-राजपुरीच्या मेढेकोटाला धडक दिली. हा लाकडि परंतु भक्कम मेढेकोट बांधला होता कोळ्यांनी. व त्यांचा म्होरक्या होता रामाऊ पाटिल. त्याने मलिक अहमदला किनार्‍यावरुनच परतवला. पुढे बहमनी सत्तेचे पाच छकले उडली त्यात या मलिक अहमदने आपले बस्तान अहमदनगरला पक्के करुन १४९० मध्ये निजामशाहिची स्थापना केली. गादिवर येताच त्याने आपला पेरीमखान नामक मर्जीतला सरदार रामाऊ पाटलाच्या बंदोबस्तासाठी धाडला. पेरीमखान हुशार होता. त्याला माहित होतं लढून काहि हा खवळल्या दर्यातला मेढेकोट हाती लागणार नाहि. त्याने कपट खेळायचे ठरवले. त्याने ३ गलबते मेढेकोटाच्या टप्यात आणली व आपल्या माणसांबरोबर काहि दारूची पिंपे रामाऊ पाटलाला ’भेट’ म्हणून पाठवली. त्याच बरोबर विनंती केली कि आपण रेशमी कापडाचे व दारुचे व्यापारी आहोत. या मुक्कामात आंम्हाला संरक्षण पुरवावे अशी विनंती. त्या बदल्यात पैसा - दारु वगैरे देऊ. दारुच्या पिंपानी आपली नशा पसरवायला सुरुवात केली. रामाऊ पाटलाने त्याला मान्यता दिली. गलबतातून उपकाराची परतफेड व मैत्रीचा हात म्हणून अजून दारुची पिंपे मेढेकोटात पाठवली गेली. शिवाय सुरक्षा मिळावी म्हणून काहि रेशमी कापड्याच्या पेट्या न तपासताच मेढेकोटात येऊ दिल्या. दारु पिऊन रामाऊ पाटिल व त्याचे साथीदार झिंगले. मध्यरात्री त्या पेट्यांतून ११७ माणसे बाहेर पडली व दिसेल त्याला कापून काढायला सुरुवात केली. रामाऊ पाटिल कैद झाला. त्याला निजामशहा पुढे उभे केले. त्याने मोठ्या मनाने त्याला "आपलेसे" केले .... आता रामाऊ पाटलाचे नवे नाव होते - "एतबारराव". मुस्लिम धर्म स्वीकारुन त्याने नगर वरुन परतून मेढेकोटात पाय ठेवला पण पेरीमखानशी त्याचे जमेना. मग सोप्पा उपाय, निजामशहाने त्याची गर्दन मारायचा हुकूम पाठवला. कोळ्यांचे राज्य संपले. आणि सिद्यांचे सुरु झाले. इतिहासातील चुकांतुन धडा घ्यायचा असतो, त्या परत होऊ द्यायच्या नसतात, कदाचित या घटनेला समोर ठेवूनच शिवछत्रपतींनी कुठल्याहि गडावर आणि सैन्याच्या छावणीत दारु-नशा, स्त्रीया यांना संपूर्ण बंदि केली होती. एखादा नियम मोडणारा मिळालाच तर गर्दन मारण्याचे कडक हुकूम होते. (पानिपताच्यावेळि मराठ्यांना मुख्य नडले ते हेच, हाहि शिकण्यासारखा इतिहासच आहे.)

पहिला मूर्तजा निजामशहाच्या काळात वारंवार ढासळणार्‍या मेढेकोटाच्या जागी पक्के दगडि बांधकाम करायला सुरुवात झाली. १५६७ ते १५७१ असे चार वर्षे मर-मर खपवून घेऊन अर्धा मैल लांबीचा, सुमारे दिड मैल परीघाचा व १९ बुरुजांचा बलदंड व तितकाच देखणा पाणकोट किल्ला उभा राहिला - "जझीरे मेहरुब". इ.स. १६१८ मध्ये सिद्दि सुरुलखान हबशी हा जंजिर्‍याचा पहिला हबशी सुभेदार बनला. १६२० मध्ये त्याची जागा सिद्दि याकूतने घेतली. तर एकाच वर्षाने सिद्दि अंबर जंजिर्‍याचा सुभेदार झाला. १६३६ च्या तहानुसार हा भाग मुघलांनी विजापूरकरांना दिला. आणि सिद्दि - विजापूरकरांचे खटके उडायला सुरुवात झाली. मात्र सिद्दिशी झुंझत रहाण्यापेक्षा विजापुरने त्याला चुचकारून नागोठण्यापासून ते बाणकोटापर्यंतच्या समुद्रावरची त्याची सत्ता मान्य केली. त्या बदल्यात सिद्याने विजापुरकरांचा समुद्रि व्यापार व मक्केला जाणारे लोक यांच्या संरक्षणाची जबाबदारी स्विकारली. हबश्यांनी एकंदर ३२५ चौ मैल प्रदेशावर निरंकूश सत्ता निर्माण केली. याची उत्तर सीमा म्हणजे कुंडलिका नदि तर दक्षिण सीमा होती बाणकोटची खाडि. पूर्वेला रोहा, माणगाव, व महाड तालुक्यातील काहि गावे देखिल होती. ४० मैलांचा अरबी समुद्राचा किनारा, रोह्याच्या खाडिचा ४ मैलांचा तर खाली बाणकोटच्या खाडिचा १७ मैलांच्या भागात हबश्यांचा सुखनैव वावर असे. मात्र त्यांचे मुख्य ठिकाण होते दंडाराजपुरी व मुरुडचा जंजिरा किल्ला.१६४२ मध्ये सिद्दि अंबर पैगंबरवासी झाला. गादिवरती वंश परंपरागत हक्क नसे. कर्तृत्ववान सरदाराला ते पद मिळत असे. सिद्दि अंबर नंतर सिद्दि युसुफ जंजिर्‍याच्या गादिवरती आला. १६५५ मध्ये त्याच्या जागी सिद्दि फतखान अधिकारावरती आला. अर्थात गादिवरती कोणीहि आला तरी जनतेला काहि फरक पडत नसे. ते हालातच दिवस काढत. दिवस-रात्र कधीहि हबश्यांची टोळकि गावात शिरत कत्तल करत, स्त्रीया, तरुण मुले यांना पकडून गुलाम म्हणून विकायला घेऊन जात. अनेकदा स्त्रीयांवर अत्याचार करुन नंतर त्यांना समुद्रात फेकून देत. प्रत्यक्षात गुन्हा केला असो वा नसो त्यांनी ज्याला गुन्हेगार ठरवले त्याच्या पायांना धोंडा बांधून समुद्रात ढकलायला सिद्यांना मजा वाटे. अनेकांना पोत्यात घालून समुद्रात ढकलत. काहिंना उकळत्या तेलात टाकत. पकडलेल्या कोळ्यांच्या - गावकर्‍यांच्या तोंडात सक्तीने गोमांस कोंबून सक्तीचे धर्मांतर हि रोजचीच बाब झाली होती. किमान नाक-कान कापून सोडून दिले जाई. प्राण भय असले तरी गाव सोडून जाता येत नसे. दोन कारणे - कमालीचे दारीद्र्य असल्याने अख्या कुटुंबासकट कोकणातून - घाटावरच्या प्रवासासाठी देखिल लोकांकडे पैसे नसत. आणि एकटे दुकटे पळून जावे तर सिद्यांकडे बक्षिसाच्या अमिषाने कोणी चूगली केली तर उरले सुरले झोपडे देखिल राख होई, घरातल्या लेकि सुनांच्या अब्रूवरती जाहिर घाला पडे, तरूण पोरे गुलाम म्हणून तरी नेली जात किंवा समुद्रात तरी फेकली जात. सुक्या बरोबर ओले जळावे तसे त्यांचे शेजारी विनाकारण सिद्यांच्या जाचाला बळी पडत.

अशीच कोणीतरी मोरोबा सबनीस नावाच्या बापुड्याची निष्कारण चुगली सिद्याकडे केली - कासाच्या किल्यावरती राहणार्‍या या साध्या माणसाने जिवतीचे चित्र श्रावणात भिंतीवर लावून त्याची पुजा केली. कोणीतरी सिद्याचे कान फुंकले सबनीस तुमच्यावर जादू-टोणा करतो आहे. या हबश्यांचा भूत-प्रेत-चेटूक यावर पराकोटिचा आंधळा विश्वास. हे कळताच बिचार्‍या मोरोबांना तोफेच्या तोंडि दिले. हरी आवजी चित्रे नामक सद्‌गृहस्थाला खंडोबाच्या दर्शनाहुन यायला उशीर झाला, या कारणावरुन आधीच आजारी असलेल्या सिद्दि अंबरने खंडोबासमोर माझ्यावर चेटूक करतो या निरर्थक संशयाने त्याला व त्याच्या भावाला गोणीत भरून समुद्रात भिरकावले. बायका मुलांना गुलाम म्हणून विकायला काढले. त्यांच्या सुदैवाने त्यांच्या भावानेच - विसाजीपंत तुंगारे यांनी सांगितलेली रक्कम भरुन त्यांना विकत घेतले. पुढे हरी आवजी चित्र्यांचाच मुलगा "बाळाजी आवजी चित्रे" याला राजापूर मोहिमेच्या वेळि महाराजांनी हेरले व आपला चिटनीस बनवुन त्याच्या गुणांचे चीज केले. ह्या इतिहासाला ज्ञात असलेल्या चार-दोन गोष्टि, अश्या हजारोंना ह्या क्रूर हबश्यांनी जंजिर्‍यावरुन समुद्राचा तळ दाखवला.

पण १५ जानेवारी १६५६ रोजी एकूणच इतिहासावर दूरागामी परीणाम करणारी एक घटना घडली - जावळि प्रांतावर स्वराज्याचा भगवा फडकला. जावळि टाचेखाली आल्यावर मग महाराजांना कोकणाचे दारच सताड उघडले. जावळि पाठोपाठ त्यांनी उत्तर कोकण जिंकला. महाराज - सिद्दि समोरासमोर उभे ठाकले. आता संघर्ष अटळ होता व तितकाच तो गरजेचाहि होताच. त्राहि त्राहि करणार्‍या कोकणी जनतेला त्राता दिसला. १६५७ च्या पावसाळ्यात महाराजांनी सिद्यावरती मोहिम काढली. ३१ जुलै १६५७ रोजी शिवरायांच्या आज्ञेवरुन रघुनाथ बल्लाळ सबनीस थेट दंडा-राजपुरीवरती सुमारे ७ हजार सैन्यानिशी चालून गेले. तळे-घोसाळे झटक्यात काबीज करुन मराठी पाते राजापुरीत घुसले. रघुनाथपंतांनी सिद्याला जरब बसवली. त्याने तहाचे बोलणे लावले. व स्वराज्याला तोशीस देणार नाहि असा शब्द दिला.

महाराजांनी जंजिर्‍यावर मोठ्या अश्या ३ मोहिमा काढल्याच. पण मुख्यता महाराजांच्या दूरदर्शी स्वभावाला अनुसरुन त्यांनी केलेली गोष्ट म्हणजे मराठा आरमाराची निर्मिती. इतर सर्व सत्तांच्या आरमारांचा आनंद होता. सगळा समुद्र किनारा परकियांनी वाटून खाल्ला होता. इतकेच कशाला? पोर्तुगालच्या राजाने आपल्या पोरी बरोबर इंग्लंडच्या चार्ल्स दुसरा याला हुंडा म्हणून काय दिले? तर मुंबई बंदर. इथवर हे सोकावले होते. स्वत:चे बलाढ्य आरमार हा एकच उपाय होता. महाराजांनी पोर्तुगिजांकडुन नव्या छोट्या बोटि बांधून घेतल्या. मग व्यापार्‍यांना संरक्षण या नावा खाली त्यावर हलक्या तोफाहि चढवल्या व बोल बोल म्हणता आरमाराचा आकार त्याला दिला. पोर्तुगिजांनी कपाळाला हात लावला, पण आता उशीर झाला होता. पोर्तुगिजांनी अधिक मदितीसाठी नकार दिल्यावर पुढे महाराजांनी फ्रेंचांबरोबर मैत्री वाढवून तोफा व नौकाबांधणीचे नवे तंत्रज्ञान आपलेसे करायला चालना दिलेली दिसते. पण हि यादि मोठी होती - अरब, डच, फ्रेंच, पोर्तुगिज, इंग्रज, कुडाळकर सावंत या खेरीज सर्वात मोठी डोकेदुखी होता सिद्दि!

महाराजांनी केलेली राजकारणे बघुन मती गुंग होते. सिद्याला चाप लावायला महाराजांनी कुठवर मजल मारावी? महाराजांची जहाजे व माणसे - मक्का -मस्कत - इराण - कॉन्गो पर्यंत जाऊन आली. शत्रुचा शत्रू तो आपला मित्र या न्यायाने सिद्दिचा राग करणार्‍या मस्कतच्या इमामाची दाढी महाराजांनी इथुन कुरवाळली. महाराजांची जहाजे एकिकडे व्यापार्‍यांना संरक्षणाच्या नावाखाली मक्केपर्यंत जात होतीच पण महाराजांनी इतिहासातली एक आश्चर्यकारक घटना घडवून आणली. कोणाला स्वप्नातहि असे स्वप्न पडले नसेल, पण महाराजांनी प्रत्यक्षात थेट मुघलांच्या खजिन्यालाच हात घातला ... महाराजांनी सूरत लुटली. गजांत लक्ष्मी स्वराज्यात आली. इतक्या पैश्यांची सोय महाराज स्वराज्यात कुठे कुठे करायची याच विचारात होते. लागोपाठ महाराजांनी कुडाळ - फोंड्यावर मोहिम काढली. त्यात मिळालेल्या विजयाने उत्साहित होऊन लखम सावंतांना आश्रय दिल्याचे कारण काढून महाराजांनी पोर्तुगिजांच्या प्रदेशावर चालून गेले. त्यांनी घाबरुन काहि तोफा व नजराणा देऊन सुटका करुन घेतली. लखम सावंतांना सरळ करुन महाराज मालवणात आले. मालवण किनार्‍यावर उभे असताना समुद्रातून एक बेट बाहेर डोकावत होते. महाराजांनी जवळ उभ्या असलेल्या कृष्णा सावंत देसाईं व भानजी प्रभू देसाईंना विचाले ते बेट कुठले? उत्तर आले - "कुरटे".

निवडक बोटि कुरटे बेटाच्या दिशेने निघाल्या. खडक चुकवत बोटि कुरटे बेटाला लागल्या. बेटावर फेरी मारता मारताच महाराजांमधला दुर्गस्थापत्यविशारद सगळा अदमास घेत होता. शुध्द खडक, चहूबासूस समुद्र,सर्पाकार तरांडि, अभोवार अवघड खडक, शत्रूची तरांडी येण्यास तीन कोस ठाव नाहि. "चौर्‍यांशी बंदरी ऐसा जागा दुसरा नाहि!" महाराजांनी सुरतेच्या लक्ष्मीला कुरटे बेटावरती सढळ हस्ते रीते केले. लक्ष्मीला पुन्हा माहेर दिले. "... आदौ निर्विघ्नतासिध्दर्थं श्रीमहागणपतीपूजनं करीष्ये!" - २५ नोव्हेंबर १६६४ या दिवशी महाराजांच्याच हस्ते मुहुर्ताचा चीरा बसला. ऐन समुद्रात किल्ला उभा राहु लागला. पाच खंडि शिसे ओतुन पाया बनवला त्यावर चिरे उभे राहिले. चुन्याच्या गिलावांनी सहा हात रुंदिचे बेचळिस बुरुज आणि भक्कम तट उभे राहिले. जवळपास सव्वातीन हजार मजूर सुमारे ३ वर्ष राबत होते. महाराजांनी सिंधुदुर्ग उभारायला अगदि पोर्तुगिजांही मदत घेतली. जेव्हा तट उभारायला दगड कमी पडू लागला तो फोंडा व आंबोली घाटातून आणला. बांधकामात शत्रूचा आथळा येऊ नये म्हणून पाच हजारांचे सैन्य, काहि जहाजे, तोफा तीन वर्ष खडा पहारा देत होते. गोविंद विश्वनाथ प्रभू जीव ओतून आज्ञेबरहूकुम काम करत होते. सिद्याची मधून मधून छोटि छोटि आक्रमणे होतच होती पण अखेर २९ मार्च १६६७ रोजी बांधकाम पूर्ण झाले. सिद्दि रागाने मनगटे चावत बसला. अठरा टोपिकर कपाळावर हात धरुन बसले "चौर्‍यांशी बंदरी ऐसा जागा नाहि, अठरा टोपिकरांचे उरावर अजिंक्य शिवलंका" उभी राहिली.

इतकं सगळं महाराज का करत होते? उत्तर सोपे होते - ज्याचे आरमार त्याचा समुद्र. जंजिर्‍याला मिळवण्यासाठी महाराजांनी अजून काहि केले असेल तर रात्रंदिवस जंजिर्‍यावरुन भडिमार होत असतांनाहि जंजिर्‍या समोरीलच हाकेच्या अंतरावरील कांसाच्या बेटावरती पद्मदुर्ग बांधुन काढला. राजापुरीच्या उरावर दुसरी राजापुरी उभी केली. महाराज स्वराज्याच्या कार्याबाबत किती गंभीर होते हे बघा - राजपुरी प्रभावळीचा सुभेदार जिवाजी विनायक, पद्मदुर्गाच्या बांधकामाचे संरक्षण करणार्‍या दर्यासारंगाला व दौलतखानाला पैसा व रसद वेळेत पुरवत नव्हता. दर्या सारंगाने महाराजांकडे तक्रार केली महाराजांनी कडक शब्दात त्याला लिहिले - "पद्मदुर्ग वसवून राजापुरीच्या उरावरती दुसरी राजापुरी वसवली आहे. त्याची मदत व्हावी .... हबशियांनी काहि देऊन आपले चाकर तुम्हाला केले असतील त्या करता ऐसी बुध्दी केली असेल! तरी ऐशा चाकरास ठिकेठाक केलेच पाहिजे! ब्राह्मण म्हणुन कोण मुलाहिजा करु पाहतो?... या उपरी बोभाटा आलियाउपरी तुमचा मुलाहिजा करणार नाही. गनिमाचे चाकर, गनीम जालेस ऐसे जाणून बरा नतीजा तुम्हास पावेल, ताकिद असे." हे पत्र १६७५ मधले आहे, म्हणजे राज्याभिषेकानंतरचे. स्वराज्याच्या कार्यात महाराज धर्म - जात - पंथ बघत नसत.

महाराजांच्या आग्रा भेटि च्या आधी व नंतर घटना इतक्या वेगाने घडल्या कि महाराजांना एकेका राजकारणाला उसंत मिळत नव्हती. मिर्झाराजांच्या मृत्युनंतर सिद्याने उचल खाल्ली. अखेर महाराजांनी १६६९ च्या मे मध्ये सिद्याला चेचायचाच हे ठरवून मोहिम काढली. तसाहि अंतस्थ कलहाने जंजिरा बेजार होता, सिद्दि खैरीयत, सिद्दि संबूल, सिद्दि कासिम, हे सिद्दि फतहेखानाशी भांडून प्राणभयाने पळून गेले होते, नुसत्या संशयावरुन सिद्दि फतहेखानाने ७५ जण कापून काढले होते. संधीचा फायदा घेऊन महाराजांनी  त्याचे तळे - घोसाळे इत्यादि सात किल्ले जिंकले. सिद्दि फतहखान घाबरुन जंजिर्‍यात जाऊण बसला. जून १६६९ च्या एका पत्रात सिद्याने मुंबईच्या इंग्रजांकडे मदतीची याचना केल्याचे समजते पण सुरतच्या इंग्रजांनी "शिवाजीशी वैर घेण्याची आपली आज तरी तयारी नाहि, त्याला खिजवले जाईन असे काहि करु नका, दुसर्‍याच्या भांडणात पडू नये!" असे स्पष्टपणे बजावले. मराठे दंडा-राजापुरीत पोहोचले. सिद्याचा जमिनीवरचा मार्गच बंद झाला. समुद्रातहि अनेक तारवे उतरवून महाराजांनी समुद्राकडून त्याची कोंडि चालवली. जंजिर्‍यावर लांब पल्ल्याच्या ५७२ तोफा व भरपूर दारुगोळा होता. भांडून जंजिरा मिळण्याची शक्यता फारशी नव्हती पण हल्ले करण्याबरोबरच महाराजांनी मुख्यत: जंजिर्‍याची उपासमार करायचे ठरवले. या राजकारणात सिद्याने मुघलांना ओढले. सुरतेच्या मोंगल अधिकार्‍याने महाराजांना वेढा उठवायचे हुकूम दिले महाराजांनी तो दुर्लक्षीत करुनच कोलून लावला. अखेर मुघलांच्या ताब्यात किल्ला देण्याची भाषा सिद्दि करु लागल्याने कल्याणचा मुघल सुभेदार लोदिखानालाहि महाराजांनी दूर ठेवले. यावेळि मात्र इंग्रजांनी तो किल्ला मुघलांना मिळू नये म्हणून आपण विकत घेऊ असे सिद्याला कळवले. पण सिद्दि याला तयार झाला नसावा.

सहा महिन्यात महाराजांनी सिद्याचं भिजकं मांजर करून टाकलं. अखेर अभयदान मिळाल्यास आपण जंजिरा मराठ्यांना देऊ असा निरोप त्याने महाराजांना पाठवला. जंजिरा स्वराज्यात येण्याची शुभचिन्हे दिसू लागली ... इतक्यात सिद्दि खैरीयत व सिद्दि संबूळ हे दोन चिवट हबशी मराठ्यांविरुध्द उभे राहिले. मराठ्यांचा वेढा चूकवून ते किल्यात शिरले. आधी त्यांनी सिद्दि फतहेखानाला बाबापुता करुन शरणागती पत्करु नकोस असे समजावले, मात्र फतहेखान घाबरला होता तो ऐकेना. अखेर त्याला कैद करुन जंजिरा या तिघांनी आपल्या हातात घेतला, सिद्दि संबूल त्यांचा म्होरक्या बनला. काफराला शरण जाण्यापेक्षा भांडताना मरुन जाऊ या त्वेषाने ते लढू लागले. सिद्दि संबुलाने मुघलांशी संधान बांधले. मुघलांचा रेटा स्वराज्याकडे आला तसा जंजिर्‍याची मोहिम महाराजांनी आखडती घेतली. जंजिरा वाचला. आता महाराजांनी त्याला मधाचे बोट लावायचे ठरवले ऑगस्ट १६७० मध्ये त्यांनी सिद्याला पत्र लिहिले - "मी माहुली आणि इतर किल्ले जिंकून घेतल्यावर तू कसा तिकाव धरणार? त्यापेक्षा जंजिरा मला देऊन टाकलास तर माझ्या सैन्याचा प्रमुख करेन!" अर्थात सिद्दि यालाहि बधला नाहि. तरी महाराज जंजिरा जिंकण्यासाठी कुठवर प्रयत्न करत होते हे समजुन येईल. महाराजांसारखा राजकारणी, दुर्गस्थापत्यविशारद, अद्वितीय योध्दा व द्रष्टा असलेला माणूस जंजिर्‍याच्या माग इतका हात धुवुन लागला होता यावरुन जंजिर्‍याचे महत्व ओळखायला हवे.

इतर राजकारणात जंजिरा काहि महाराजांच्या डोळ्यासमोरुन हलत नव्हता. त्यांनी जंजिरा जिंकून देणार्‍यास १ मण सोने व अजून काहि बक्षिसे जाहिर केली. होळिच्या सणासाठी महाराज रायगड जवळच मुक्काम करुन होते. होळिची शिकारीसाठी त्यांना जळातील "मगरच" हवी होती. होळिचा दिवस उजाडला. दंडा-राजपुरीमधील  मराठ्यांनी देखिल होळिचा सण साजरा केला. खरे म्हणजे नियमानुसार किल्ला - छावणीत कुठलेहि मादक पदार्थ आणायला बंदि होती मात्र मराठे नशेत होते (बहुदा भांगच असावी). आणि सिद्याचा हल्ला आला. ४००-५०० माणसांनी दंडा-राजपुरीवरती हल्ला केला. समुद्रातुन - जमिनीवरुन हल्ला चढवला. मराठे गोंधळले. तरी तटावरुन चढणार्‍या काहि सिद्यांना त्यांनी कापून काढले. मात्र वाढता जोर बघून सिद्यांवर दारुगोळा वापरावा म्हणून दारु कोठार उघडले, अचानक अपघात झाला आणि अख्खे दारुचे कोठार जबरदस्त भडका होऊन उडाले. सिद्दि - मराठे दोघेहि घाबरले, पळापळी सुरु झाली. अचानक  सिद्दि याकूत ओरडू लागला "खस्सू खस्सू!" - हि सिद्यांची युध्दगर्जना. आपला नेता सुखरुप आहे हे बघून सिद्यांना चेव चढला मराठ्यांची सरसकट कत्तल सुरु झाली. जंजिरा मराठ्यांना मिळण्याऐवजी दंडा-राजपुरीच पडली. यावेळि महाराज जवळपास चाळिस मैल लांबवरच्या एका गावात झोपले होते, एखाद्याला आपल्या ध्येयाचा किती पराकोटिचा ध्यास असू शकतो हे समजेल -  राजपुरीत हे नाट्य घटत असताना तिथे महाराज अचानक दचकून जागे झाले, निकटच्या लोकांना बोलावून म्हणाले - "राजपुरीवर काहितरी संकट कोसळले आहे खास!"
ताबडतोब जासूद - हरकारे निघाले. दुसर्‍या दिवशी बातमी आली - राजापुरी हातची गेली.

"सिद्दि, उदरातली व्याधी!" या व्याधीवर महाराजांनी आता "विदेशी" औषोधपचार करायचे ठरवले. सुरतेहुन कुमक मिळाल्याने असेल पण सिद्दि मुजोर झाला. इंग्रजहि सिद्याशी संधान बांधून होते. महाराजांनी एकाच दगडात दोन पक्षी मारायचे ठरवले. महाराजांनी इंग्रजांना सिद्यांविरुध्द मदत मागितलीच, पण दुसरीकडे डचांना "आम्हि मुंबई मिळवून देण्याकरता आमचे ३ हजार सैन्य देतो, बदल्यात डचांनी दंडा-राजपुरी घेण्यासाठी मराठ्यांना मदत करावी!" असा करार रिकलॉफ नामक डच वकिलाशी केला. इंग्रजांना हे कळताच "धरणी पोटात घेईल तर बरे!" असे त्यांना वाटले असावे. लगोलग इंग्रजांनी सिद्दि - मराठे यांच्यात तह घडवून आणतो वगैरे बोलणी लावली. हा तह झाला नसला तरी सिद्दि - इंग्रज नरमले हे मात्र खरे.

यानंतर चार वर्ष तुलनेने जंजिर्‍याची आघाडि शांत होती. ऑगस्ट १६७६ मध्ये मोरोपंत पेशव्यांनी दहा हजार सैन्या सकट दंडा-राजपुरीवरती मोठी आघाडि उघडली. रामनगरचे चिवट कोळी राज्य मराठ्यांना शरण आले होते. सिद्दि मात्र समर्थपणे दावा मांडत होता. मोरोपंतांनी पद्मदुर्गावरील सोनकोळ्याच्या म्होरक्या लाय पाटिल यांना बोलावून घेतले.  - "तुम्ही चाकर श्रीशिवछत्रपतींचे. सरकारची चाकरी निकडिची पडली तरी कराल की नाही?"  लाय पाटिलांनी उत्तर दिले - "जी आज्ञा ते प्रमाण!" लगेच पंतांनी आपली कल्पना सांगितली. कल्पना अंगावर काटा आणणारी होती, तीचा स्वीकार करणे म्हणजे आपणहुन यमदुतांना मिठी मारायला जाण्यागत होते - "जंजिरे यांसी शिड्या मात्र तुम्हि लावून द्याव्या. आम्हि हजार बाराशे धारकरी तयार केले आहेत."  पण लाय पाटिल व त्याचे साथीदार वाघाच्या काळाजाचे असावेत अन्यथा कलालबांगडि, चावरी, लांडाकासम सारख्या राक्षसी तोफा आ वासून शत्रूचा ग्रास घ्यायला आसुसल्या होत्या त्याला शिड्या लावण्याचे धाडस स्वप्नातहि कोणी केले नसते. त्यांनी चक्क जंजिर्‍याला शिड्या लावल्या. काय अडचण आली ते इतिहासाला ठाऊक नाहि, परंतु रात्र संपून पहाट होऊ लागली तरी पंतांचे धारकरी आलेच नाहित. आता वेळ दवडण्यात अर्थ नव्हता. सिद्याला कळले असते तर सगळे मारले गेलेच असते शिवाय सिद्दि सावध झाला असता. पहाट होता-होता लाय पाटिल नाईलाजाने परत फिरले. झाल्या प्रकाराने मोरोपंत ओशाळले - "आम्हापासून कोताई जाली, धारकरी याहि माघार घेतली, आम्हापासोन अंतर पडले हे खरे!" मोरोपंत रायगडि परतले ते लाय पाटलांना घेऊनच. महाराजांपर्यंत हा पराक्रम पोहोचला होताच. महाराजांनी लाय पाटिल, पद्मदुर्गाचे हवालदार, सरनौबत, कारकून यांचा यथोचित सन्मान केला. लाय पाटलाला महाराजांनी पालखीचा मान दिला. लाय पाटिलांना नम्रतापूर्वक तो नाकारला - "जी आम्हि दर्यावरले लोक, पालखी नको!" महाराज उलट अजून खुष झाले. महाराजांमधला गुणग्राहक व दाद देणारा जाणकार जागा झाला, महाराजांनी पेशव्यांना आज्ञा केली - "गलबत बांधोन त्या गलबताचे नाव "पालखी" ठेऊन लाय पाटिल यांचे स्वाधीन करणे!" याच वेळि लाय पाटलाला दर्याकाठी सरपाटिलकिहि बहाल केली. जंजिर्‍याने पुन्हा मराठ्यांना हुलकावणी दिली.

१६७६ च्या मध्यावर जंजिर्‍यात पुन्हा भांडणे लागली. सिद्दि संबुल व सिद्दि कासिम यांच्यात वितुष्ट आले. औरंगजेबाने दंडा-राजपुरीची जहागिरी सिद्दि कासिमला दिली. मात्र सिद्दि संबूल त्यावरुन आपला हक्क सोडायला तयार नव्हता. ऑक्टोबर १६७७ मध्ये मुंबईच्या माझगाव बंदरा जवळ दोघांत छोटि लढाई देखिल झाली असावी. मात्र मुघलांनी सिद्दि कासिमची बाजू घेतल्याने सिद्दि संबूल हताश झाला व तडक मराठ्यांना येऊन मिळाला. १६७७ च्या दिवाळित सिद्दि कासिमने याचा राग काढायला मुंबई बंदरातून बाहेर पडून कोकण किनारपट्टिवरील जनतेत लुट चालवली. एप्रिल १६७८ मध्ये तो परत मुंबई-बंदरातील छावणीत गेला. या सर्व प्रकरणाच्या दरम्यान महाराज कर्नाटक स्वारीत होते. मे १६७८ मध्ये ते रायगडावर परत आले. सिद्दि कासिमला धडा शिकवायला ४ हजार सैन्यासह दर्यासारंग व दौलतखानाला पनवेलला पाठवले. मराठी आरमाराने माझगाव बंदरात सिद्याच्या आरमाराची कोंडि करुन त्याचे आरमार जाळून काढावे असा महाराजांचा मनसुबा होता. एकदा सिद्याचे आरमार पांगळे केले कि सिद्दि संबूळचीच मदत घेऊन जंजिर्‍याला भगदाड पाडायला वेळ लागणार नाहि असा महाराजांचा सहाजिक पवित्रा होता. पण सिद्दि कासिमने शहाणपणाने आपली सर्व गलबते सुरतेकडे हाकली. नंतर समुद्र खवळला असल्याने मराठी आरमाराला मोठी हालचाल करता आली नाहि. पोर्तुगिज व इंग्रज हे सिद्याच्या बाजूने उभे राहिले. कारण त्यांना माहित होते कि एकदा सिद्दिचा पाडाव होऊन जंजिरा महाराजांना मिळाला कि महाराज पश्चिम किनारपट्टिवरुन त्यांनाहि हाकलून देतील. सर्व कारणांनी जंजिरा घेण्याचा मनसुबा पुन्हा उधळला गेला. या घटने नंतर मात्र महाराजांना जंजिर्‍यावर मोठी मोहिम काढता आली नाहि.

महाराजांच्या निर्वाणानंतर सत्ता छत्रपती शंभूराजांकडे आली. शंभूराजांनी ९ वर्षात १००हुन अधिक लढाया केल्या. त्या हिशोबाने महिन्याला एक मोठी लढाई त्यांनी केली. त्यांना स्वस्थता मिळालीच नाहि. त्यांच्या या सर्व लढायांचा अभ्यास होणे गरजेचे आहेच पण जंजिरा मोहिम हि त्यांच्यातल्या कल्पक योध्याची नव्याने ओळख करुन देतात. औरंगजेबाची फूस मिळाल्याने सिद्याने स्वराज्यात घुसून पनवेल ते चौल पर्यंतचा पट्ट लुटला, जनतेला अक्षरश: उध्वस्त केले. संभाजीराजे संतप्त झाले. दौलतखानाच्या हाताखाली दिडशे गलबते दिली. व मोहिम दादजी रघुनाथाला देऊन सांगितले - "तुम्ही सिदिचा पाडाव करुन या, अष्टप्रधानातील एक पद तुम्हांस देऊ!" दादजी - दौलतखानाने १६८२ साली जंजिरा वेढला महिनाभर किल्यावर तोफा डागल्या. तट काहि ठिकाणी कोसळला पण सिद्दि दाद देईना. तो सुध्दा तोफा चालवून एका ठराविक अंतरापेक्षा मराठी गलबतांना जवळ येऊ देत नव्हता. संभाजी महाराजांनी आता अंतर्भेद करायचे ठरवले. खंडोजी फर्जंद, ज्यांनी साठ मावळ्यांच्या साथीने पन्हाळ्यासारखा बुलंद किल्ला स्वराज्यात आणला त्यांची निवड यावर केली. मी संभाजीचा हाडवैरी, महाराज गेल्यावर जुन्या जाणत्यांची पत्रास शंभूराजा बाळगत नाहि वगैरे खोटि कारणे देऊन ते काहि लोकांसोबत सिद्याला मिळाले. सिद्दि खूष झाला. मात्र तेथली एक बटकि हुशार निघाली. तीला कोंडाजी फर्जंदांचे खरे स्वरुप कळले तिने लगोलग सिद्याला सगळे सांगितले. कोंडाजींसारखा योध्दा सिद्याने हालहाल करुन मारला. बहुदा त्यांचे मुंडके संभाजी राजांना भेट म्हणून पाठवले होते. संभाजी महाराज अतिशय दु:खी झाले. मराठे झाल्या प्रकाराने हादरले त्याचा फायदा घेऊन सिद्याने जोर केला व मराठी आरमारावर तुटुन पडला. मराठ्यांना माघार घ्यावी लागली.

हा पराभव व कोंडाजींचा मृत्यु संभाजी महाराजांच्या जीव्हारी लागला. आपल्या स्वभावाशी सुसंगत अशी धक्कादायक योजना आखली. प्रभू रामचंद्र लंकेपर्यंत सेतू बांधू शकतात तर राजपुरीच्या किनार्‍यापासून ते जंजिर्‍यापर्यंतची खाडी असे कितीसे अंतर आहे? लगोलग कामाला सुरुवात झाली. जळातून  - स्थळातून सिद्याला चिमटित पकडायचा निश्चय शंभूराजांनी केला. अर्धाधिक खाडि भरली देखिल. सिद्याची त्यावर होणारी आक्रमणे परतवून लावली जात होती रोज सेतु जंजिर्‍याच्या जवळ येऊ लागला. सिद्याला आपली मृत्यू घंटा ऐकू येऊ लागली. थोड्याच दिवसात राजापुरीचे दगड जंजिर्‍याला लागणार हे दिसत होते पण सिद्याने सुदैव कि औरंग्याने स्वराज्यात रेटा वाढवला संभाजीराजांना हि मोहिम सोडुन स्वराज्याच्या दुसर्‍या आघाडिवरती धावून जावे लागले. मात्र दादजी रघूनाथ मागे राहून वेढा चालवत होता. पण शंभूछत्रपती असे तडकाफडकी गेल्याने सैन्यातला उत्साह निश्चित कमी झाला. पावसाळ्यात आरमाराचा वेढा हटवावा लागला. याचा फायदा घेऊन सिद्याने उलटा हल्ला केला व दादजी रघूनाथालाच महाडपर्यंत पिटाळले. इतकेच नव्हे तर सूड म्हणून दादजी रघूनाथाच्या बायकोचे अपहरण केले.

संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर तर उलटच घडले. स्वराज्यावर औरंग्याचा वरवंट फिरत होता. त्याने स्वराज्याची राजधानीही जिंकली, औरंगजेबाने हा किल्ला घेतला खरा पण तो सांभाळणे त्याला जड होऊन बसले. कारण गायकवाड, गोळे यांसारखे स्वराज्याचे पाईक, कांगोरी किल्यावरुन त्याला सतावत होतेच. गड मिळुनही जीवाला स्वस्थता लाभेना. अखेर वैतागुन त्याने किल्ला जंजिर्‍याचा सिद्दि खैरीयतखान याला दिला. मराठ्यांना दुर्दैवाने जंजिरा कधीच जिंकता आला नाही, पेला ओठाशी आला म्हणतानाच दरवेळि तो उडवला जात असे. मात्र सिद्यांनी गडावर जवळपास ४० वर्षे फतकल मांडली होती. अखेर ५ जून १७३३ या दिवशी शाहूमहाराजांच्या कारकिर्दीत रायगड पुन्हा मराठांनी घेतला.दोन गाद्यांच्या स्पर्धेतही मराठ्यांनी सिद्याला स्वस्थता लाभू दिली नाहि. त्यातून पेशवे बाळाजी विश्वनाथ या सिद्यामुळेच श्रीवर्धन मधून परागंदा झाले होते. त्यामुळे त्यांना कोकणी जनतेची स्थिती माहितहि होती व सिद्यावर रागही होताच. इ.स. १६८९ च्या सुमारास म्हणजे शंभूछत्रपतींच्या हत्येनंतर सिद्दीने उचल खाल्ली त्यामुळे त्यांना श्रीवर्धन सोडावे लागले. भट घराणे आंग्र्यांना सामिल आहेत या संशयाने सिद्दिने भट घराण्याचा छळ चालु केला. त्यांच्या "जानोजी" नावाच्या भावास सिद्दीने पोत्यात घालुन समुद्रात बुडवल्याची कथा आहे. त्याच किंवा तशाच कारणास्तव पिढीजात देशमुखी सोडून "बाळाजी भट" हे "भानु" कुटुंबा बरोबर सातार्यास आले. सिद्दीच्या हशमांनी पाठलाग सुरु केल्या वर मुरुड येथील वैशंपायन कुटुंबाकडे त्यांनी काही आठवडे आश्रय घेतला. बाळाजी बरोबर असलेल्या "भानु" कुटुंबात ३ भाउ होते. "हरी महादेव, बाळाजी महादेव आणि रामजी महादेव." त्या पैकी "बाळाजी महादेव" हा "नाना फडणवीस" याचा आजा.१७१६ मध्ये आग्र्यांनी सिद्दिवरती हल्ल चढवताच बाळाजी विश्वनाथांनी त्यांना मदत केली. सिद्दि त्याने नरमला. १७४६ मध्ये मध्येहि असच झालं, मात्र "सिद्दि सात रावणासारखा दैत्य" असून नानाजी सुर्वे यांनी त्यांचा नेता युध्दात मारला, त्यामुळे सिद्दि रेहमान गळपटला, मराठ्यांना शरण आला. आपल्या १२ महालांपैकि ७ महाल पेशव्यांना दिले.

१७५६ साली मात्र होऊ नये ते घडले कान्होजी जिवंत असेतो कोकणाला गोर्‍यांच्या पांढर्‍या पायांचा स्पर्ष झाला नाही. मानाजी - तुळाजी हे त्यांचे दोन पुत्र. आरमारी युध्दात तुळाजी अतिशय प्रविण होता. इंग्रजांचे एक गलबतहि त्याच्या नजरेतून सूटत नसे. इंग्रज कान्होजीला कावले होते. शाहू महाराजांनी त्याला सरखेल पदवीहि दिली. तुळाजीने, मानाजीला दूर सारुन सगळे विजयदुर्गाला मुख्य ठिकाण बनवून आरमार आपल्या हातात घेतले. मात्र पेशव्यांशी त्याने वैर धरले. पेशव्यांनी मानाजीचा पक्ष घेतला. हे बघून तुळाजी अजून बिथरला. त्याने पेशव्यांना दिली जाणारी सालाना थैली बंद केलीच, वरुन मानाजीला सुईच्या अग्रावर राहिल इतकि मातीहि देणार नाहि असा दुर्योधनी पवित्रा घेतला. पेशव्यांनी थैलीसाठी वकिल पाठवला त्याचे नाक कापून त्याला परत धाडले. आता पेशवे गप्प बसणे शक्य नव्हते. पण तुळाजीला ताळ्यावर आणावे इतके आरमार नव्हते. इथे इतिहासातली एक घोडचूक घडली मराठ्यांनी इंग्रजांची मदत मागितली. इंग्रज याचीच वाट बघत होते. १७५६ मध्ये अ‍ॅडमिरल वॉट्सन समुद्रातुन तर कर्नल क्लाईव्ह जमिनीवरुन विजय दुर्गावर तुटुन पडले. इंग्रजांच्या मार्‍याने गलबते पेटू लागली. विजयदुर्गावरच्या इमारती आगी लागून कोसळू लागल्या. तब्बल ७० गलबते आगिच्या भक्ष्यस्थानी सापडली. तुळाजीने सगळी सत्ता मानाजीला देऊन हात झटकले. तुळाजी नेस्तनाबुत झाला पण शिवछत्रपतींनी दूरदृष्टिने अथक मेहनत घेऊन उभे केलेले आरमार आता पक्षाघाताचा झटका आल्यागत झाले. उंदरावरच्या रागापोटि घराला चुड लावण्याचा प्रकार झाला. मराठ्यांच्या आरमाराचा दरारा जवळपास संपला. वरुन पुढल्या दोन वर्षांकरता विजयदुर्ग इंग्रजांकडे गेला. याचे दुरागामी परीणाम होणार होते.

१७६१ मध्ये रामजी बिवलकर, नारो त्र्यंबक, रघोजी आंग्रे यांसारखे झुंझार पुरुष जंजिर्‍यावर चालून गेले. पेशव्यांनी यावेळिही इंग्रजांची मदत घेतली. सिद्याची कोंडि करुन तो कधी शरण येतो याचीच वाट सगळे बघत होते. पण सिद्दी वस्ताद. त्याने वेढ्यातून पळ काढला व थेट मुंबईला जाऊन इंग्रजांचे पाय धरले. इंग्रजांनी उरले सुरले आरमार सज्ज करुन ते जंजिर्‍याजवळ आले. व मराठ्यांना उलट प्रश्न विचारला - "जंजिर्‍यावर हल्ला का केलात? तुम्हि आमचे मित्र, सिद्दिहि आमचा मित्र त्याने जंजिरा व कासा आमच्या स्वाधीन केला आहे त्यामुळे जंजिर्‍यावरचा हल्ला हा इंग्रजांवरचा हल्ला आहे. इथून निघून जा अन्यथा आंम्हाला तोफांचा वापर करावा लागेल!" त्यांनी जंजिर्‍यावर युनियन जॅक फडकावला, सिद्दि पुन्हा वाचला. मराठ्यांना हात चोळत बसावे लागले, कारण एकच - १६५६ मध्ये बुडवलेल्या आपल्याच गलबतांची भुते आता मराठ्यांना त्रास देत होती. तेव्हा आरमार असते तर इंग्रजांशी सागरी हुतुतु खेळता आला असता. नपेक्षा इंग्रज मध्ये पडलेच नसते. इंग्रजांनी हि दमदाटि केव्हा केली असेल??  उदगीरच्या लढाईत निजामाला पेशव्यांनी लोळवले होते तेव्हाची, तेव्हा पानिपत व्हायचे होते, मराठ्यांचे राज्य अटक ते कटक पसरले होते, दिल्लीला मराठे डाव्या पायाच्या अंगठ्याखाली चेपत होते तेव्हाची. हे इंग्रज कश्याच्या जोरावर करत होते? तर बलाढ्य आरमाराच्या. विजयदुर्गाचे प्रकरण मराठ्यांना जंजिर्‍यावरती इतके महाग पडेल असे वाटलेहि नसावे.

जंजिरा घेण्याचा शेवट्चा मोठा प्रयत्न म्हणजे नाना फडणविसांनी केलेले राजकारण. त्यावेळि जंजिर्‍यावर सिद्दि बाळुमियॉ होता. पण त्याचा सेनापती सिद्दि अबदुल्ला याने गादि बळकावली. सिद्दि बाळुमियॉ पळून पुण्यास आला. नाना फडणवीसांनी त्याला घोळात घेतले "एवीतेवी तुझी पाय काहि जंजिर्‍याला लागणार नाहित, त्यापेक्षा तो तु आम्हांला दे, त्याबदल्यात तुला स्वतंत्र जहागीर देऊ!" हा करार इंग्रजांच्याच मदतीने झाला. सिद्दि बाळुमियॉला सुरतेजवळ असलेली सचिन नामक सुपिक प्रांताची जहागीर दिली त्याने "कागदावरती" जंजिरा मराठ्यांना दिला. मात्र इंग्रजांनी यावेळि थातुरमातुर कारणे दाखवून हात वर केले, जंजिर्‍याला जिंकू शकेल असे आरमार मराठ्यांकडे नव्हते त्यामुळे सिद्दिला धक्काहि लागला नाहि.


पुढे इंग्रजांचे राज्य भारतावर सव्वाशे वर्षे होते. जंजिरा मात्र संस्थान म्हणूनच राहिले. अखेर भारत स्वतंत्र झाला तेव्हाच जंजिर्‍यावरचा सिद्याचा अंमल संपला आणि जंजिर्‍याचे संस्थान भारतात विलिन झाले. अशीहि साठा उत्तराची असफल  कहाणी संपूर्ण झाली.

 - सौरभ वैशंपायन
=============================
संदर्भ -
१) शककर्ते शिवराय - शिवकथाकार विजयराव देशमुख
२) महाराजांच्या मुलुखात - शिवकथाकार विजयराव देशमुख
३) महाराष्ट्राची धारातीर्थे - पं. महादेशशास्त्री जोशी.
४) राजाशिवछत्रपती - शिवशाहिर बाबासाहेब पुरंदरे.