Thursday, March 31, 2011

खुन्नसजिंकलोऽऽऽ


शेजारच्या घरात कोणीतरी तंबाखू भाजावी आणि त्याच्या वासाने खवखव होऊन ठसका लागावा तशी अवस्था काल "नेहरा आत - अश्विन बाहेर" हा बातमीने समस्त भारतीयांची झाली. इंग्लंड विरुध्दची शेवट्ची ओव्हर आठवली आणि लोकांच्या अंगावर जवळपास बाभळिचा काटा उभा राहीला. सेमी फायनलमध्ये ते सुध्दा पाकिस्तान विरुध्द? लोकांनी स्वप्नातसुध्दा नेहराला पाणी द्यायलाही ग्राउंडमध्ये बोलवलं नसतं, इथे आपले संघाचे प्रयोगशील चालक मालक धोनी ते प्रत्यक्षात करत होते. फेसबुक वरती जवळपास प्रत्येक स्टेटसवरती त्या उद्रेकाचा महापूर वाहिलेला बघितला असता तर नेहराच्या तोंडाला फेस आला असता. एकतर पाकिस्तान विरुध्दची मॅच म्हणजे युध्द असतं. (बहुदा हे जगातलं पहिलं असं युध्द असेल कि दोन्हि देशांचे पंतप्रधान एकमेकांच्या शेजारी बसून ते बघत होते, च्यायला पण या हाय प्रोफाईल लोकांचा मोठा प्रॉब्लेम हा असतो कि कितीही मनात आलं तरी ऑन द स्पॉट नाचता येत नाही!). आणि अश्या युध्दात नेहरा नामक तोफ वापरायचा विचार फारच घातक वाटायला लागला.

पण सचिन - सेहवाग खेळायला उतरले आणि सगळ्यांनी एकूणच धीराने घ्यायचं ठरवलं. पहीली दीड ओव्हर पाकिस्तानी बॉलिंग बरीही पडली पण नंतर मारकुटे मास्तरगैर हजर रहिलेल्या पोराची जशी हजेरी घेतात तशी सेहवागने उमर गुलची हजेरी घ्यायला सुरुवात केली. एकाच ओव्हरमध्ये त्याने ५ फोर मारुन उमर गुलची बत्तीच गुल करुन टाकली. बिचार्‍याची "उमर" झाल्यागत त्याच्या बॉलिंगची लाईन - लेन्थ बिघडवून टाकली. त्यांचा मुख्य बॉलरच असा जाहीर वाळत घातल्यावर भारतीय पाठिराख्यात जो काही स्वाभाविक उत्साह पसरला त्याला तोड नव्हती. त्यातुन शोएब अख्तर खेळत नव्हता. ड्रेसिंग रुम मध्ये आफ्रिदिच्या नावानं नखं कुरतडत बसला होता. सगळ्यांची अपेक्षा होती कि याही वेळी सचिन – शोएब सामना बघायला मिळेल. पण शोएबला २००३ सारखं थोतरवण्याचा सुयोग सचिनच्या कुंडलीत नव्हता.


युनिसने सोडलेला सचिनचा कॅच
काल सचिनचं भाग्य भरपुर जोरावर होतं. म्हणजे पाकिस्तानी फिल्डर्सच भोंडला खेळल्यागत जे “एक झेल सोडू बाई दोन झेल सोडू … दोन झेल सोडू बाई तीन झेल सोडू” चाललं होतं ते बघता मला आफ्रिदिची काळजी वाटत होती. हार्ट अ‍ॅटॅक किंवा आत्महत्या या गोष्टि विमा पॉलिसी कव्हर करत नाही त्यामुळे  इथे खुद्द सचिनला १ LBW, १ स्टंपिंग आणि ४ जीवदानं कॅचवरती मिळाल्यावर आफ्रिदिची अशी काळजी वाटणं सहाजिक होतं. अखेर स्वत: मेल्या शिवाय स्वर्ग दिसत नाही ह्या वाक्‌प्रचारानुसार शेवटी सचिनचा कॅच त्यानेच घेतला. सचिन ८५ वरती आउट झाला तेव्हा स्टेडियम मध्येच नव्हे तर भारतभर क्षणभर स्मशानशांतता पसरली आणि मग आफ्रिदिला शिव्या देत लोकांनी ती भंग केली. आज सचिन १००वे शतक पूर्ण करणार  तेही पाकिस्तान विरुध्द, असं वाटत असतानाच हे घडल्याने कदाचित अनेक टिव्ही बंदही झाले असावेत.

मग तिकिटाच्या रांगेत सरकत रहावं तसे आपले एक एक जण परतु लागले. यावेळि रियाझ वहाबचा दिवस होता पठ्यानं ५ विकेट घेऊन भारतीय संघाला टेकिला आणलं. विशेषत: युवराजला त्याने जे रीटर्न तिकिट काढून दिलं तो स्विंग बॉलिंगचा उत्तम नमुना होता. म्हणजे जवळपास युवराजला काही समजायच्या आत पाकिस्तानी फिल्डर्स एकमेकांना मिठ्या मारुन परत आपापल्या जागी फिल्डिंगला देखिल गेले होते. इथे खर्‍या अर्थाने भारतीय बॅटिंग “ऑक्सिजनवर” आली. सचिन खेळत असताना आपण २८० करणार असे वाटत होते ते २०८ तरी करा रेऽऽ अश्या अवस्थेला आले. अखेर परत रैना बरसे रीमझीम रीमझीम कामाला आला. बघता बघता पॉवरप्ले मध्ये ४३ रन्स निघाले आणि २६० चा ठिक ठाक स्कोअर उभा राहिला. तरी शाश्वती वाटत नव्हती.


आता सगळि मदार नेहरा आणि देव या दोघांवर होती. कारण सध्या झहीरखान वगळता बाकिचे ’धन्यवाद’ बॉलिंग करत आहेत. पण आश्चर्य असं कि नेहराने पहिल्या ४ ओव्हर चक्क ३.४० च्या इकोनॉमी रेटने टाकून, शिष्योत्तम अरूणीने बांधाच्या मध्ये झोपुन पाणी अडवलं होतं, तसच पाकिस्तानच्या बॅटिंगला थोपवुन धरले. बाकि पहिला नारळ गेल्या ३ मॅच प्रमाणे झहिरनेच वाढवला. मग मुनाफ, युवराज, हरभजन, नेहरा सगळ्यांनी आपापल्या परीने त्याला हातभार लावला. पण कालच्या मॅच मधल्या सर्वात बेस्ट विकेट्स म्हणजे – उमर अकमलची भज्जीने घेतलेली विकेट आणि मुनाफने लेग कटर टाकून अब्दुल रज्जाकचा उठवलेला बाजार. दोन्हि विकेट्समध्ये त्यांचे ऑफ स्टंप भेलकांडले. असद शफिकची युवराजने घेतलेली विकेट म्हणजे जवळपास “सूड” होता. बहाबने युवराजच्य मिडल स्टंपला लक्ष केले युवराजने असद्च्या.


खरंतर अकमलला भज्जीने सरळ जाणार्‍या संथ बॉलवरती चकवले, क्षणभर हरभजनने ’दुसरा’ वापरला कि काय? असंच वाटलं पण तो दुसरा नव्हता. सध्या एकुणच त्याची बॉलिंग चढावावरच्या दमल्या खेचरासारखी होतेय. त्याचा दुसराही तितकासा चालला नाही, तो “दुसरा” दुसराच कोणीतरी टाकतोय इतका निष्प्रभ झालाय. पण फायनल मध्ये मुरलीधरन नावाच्या श्रीलंकन अस्त्राला प्रत्युत्तर म्हणून हरभजन पुन्हा उपयोगात येईल अशी अपेक्षा. कालच्या मॅचने भज्जीला त्याचा सूर गवसला आहे असं वाटतय.


पण या सगळ्यात मिस्बाह – उल – हकचे कौतुक करावे लागेल. खरंतर त्याने मधल्या ४-५ ओव्हर शब्दश: नेट प्रॅक्टिस केली. आणि मग अंगात आल्यागत खेळायला सुरुवात केली, इतकि कि ड्रिंन्क्स ब्रेकमध्ये जावेद मियॉदादच्या पाया पडून आलाय कि काय असं वाटू लागलं. शेवटी मात्र त्याने कॉन्फिडन्सची हद्द ओलांडली असंच म्हणावं लागेल. ४९ व्या ओव्हरमध्ये तर स्ट्राइक जाऊ नये म्हणुन बॅटिंग पॉवरप्ले सारखी संधी असून सरळ सरळ मिळणार्‍या ३-४ रन्स देखिल घेतल्या नाहित. मात्र आता उशीर झाला होता. आधी संथ खेळून काढलेल्या ४ ओव्हर इथे भारी पडल्या. अखेर मोठा फटका मारायच्या नादात लॉंन्ग ऑन वरील कोहलीच्या हातात त्याने कॅच नाही तर भारताचा विजय अलगद सोपवला. मित्राचं घर सगळ्यांनी बोंबलून बोंबलून डोक्यावर घेतलं.


बूम बूम बाळा ’चड्डित’ रहात जा!
मग काय झालं हे बघायला त्याच्या घरी थांबलच कोण??? सगळे थेट शिवाजी पार्क. पाकिस्तानवरचा विजय साजरा करायला जगात याहुन उत्तम दुसरं ठिकाण असूच शकत नाही. इथल्या हवेत सुध्दा क्रिकेट वहाते, उगीच "सचिन" तयार होत नाहीत इथे, शिवाजी पार्कच्या मातीतच दम आहे. पाकिस्तान विरुध्दचं युध्द जिंकलो. आता वेळ आहे लंका दहनाची. लंकेचा “दशानन” पॅव्हेलियन मध्ये धाडून जिंकणं निश्चित सोपं नाही पण जिथे ऑसीज – पाकिस्तान यांना गुंडाळु शकतो तिथे लंकेला हरवण्याची ताकद आपला संघ निश्चित राखून आहे. पण प्रत्येकाची कालची रीअ‍ॅक्शन सांगाविशी वाटते – “आता वर्ल्डकप जिंकायचाय तो फक्त तेंडल्यासाठी, नाहितर पाकिस्तानला हरवले तिथेच आपण फायनल जिंकलो असंच समजतो!” - सौरभ वैशंपायन.

Monday, March 28, 2011

मरहबाऽऽ मरहबाऽऽ

सम्राटाला बहाल केलेलं गाणंही अर्थात सम्राटाच वर्णन करणारं हवं. असच एक गाणं विंडोज मूव्ही मेकर मध्ये बनवलेलं. Dedicate to SACHIN TENDULKAR!!!!!


 - सौरभ वैशंपायन.

Friday, March 25, 2011

यहॉं के हम सिकंदरमी ९० च्या दशकात जन्माला आलो या गोष्टिवर मी आज तुडुंब खुष आहे. कपिल पाजींना "लाईव्ह" वर्ल्डकप उचलताना पहाता आला नाही कारण त्यानंतरचा माझा जन्म. पण दस्तूरखुद्द सचिनला याची देही याची डोळा खेळताना बघणं हे कदाचित गेल्या त्र्याऐंशी लक्ष नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव जन्मांमधील केलेल्या पुण्यांच फळ असावं. आणि इतकच नाही आज दिवाळिचा डबल बोनस मिळावा तसं पॉन्टिंगच पडलेलं थोबाड बघायला मिळालं. खर म्हणजे जर एक "उद्दामपणा" सोडला तर पंटर खेळाडू निश्चित मोठा. पण "जर - तर" च्या गोष्टि आहेत ह्या. सध्या बिचार्‍याच्या कुंडली मधले ग्रह, कुंडलीतली आपापली जागा सोडून दुसर्‍या आकाशगंगेत पिकनिकला गेल्यागत आयुष्य भरकटलय त्याचं. आधी अ‍ॅशेस मध्ये इंग्लंडने त्याच्या साम्राज्याला चूड लावून तशीही अ‍ॅशरांगोळि करायला सुरुवात केलीच होती. आणि आता या वर्ल्डकपमध्ये ना त्याला आजवर १०० करता आले होते, न ऑस्ट्रेलियाकडून कोणाचं शतक झालं होतं. आणि आज त्याचं शतक झालं तर ऑसीजचं गेले १२ वर्ष निरंकुश चाललेलं संस्थान आपल्या "युवराजाने" खालसा केलं. नाडि तुटलेल्या लेंग्याला एका हाताने सावरत लढल्यागत  त्याचं "मेरी झांसी नही दूंगा ..... मेरी झांसी नहीं दुंगा" चाललं होतं पण काही फायदा नाही झाला.

दुपारी आपली कचकून केलेलि बॉलिंग बघूनच फेसबुकवर बोंब मारली कि आज आपण जिंकणार (आधीच अश्या रिक्षा फिरवायचे मक्ते एकट्या पॉल ऑक्टोपसकडे नाहीयेत म्हंटलं!). अर्थात झालंही तसच. अश्विनने आपण टिममध्ये येऊन जागा केवळ उबवली नाही हे परत सिध्द केलं. शेवटि रैना सुध्दा श्रावणातल्या पावसागत रीप रीप करत का होईना पण योग्यवेळि ठिक ठाक बरसला. पण गंभीरने मधल्या ओव्हर्स मध्ये खरच गंभीर परीस्थिती निर्माण केली होती. आदल्या बॉलवरचीच घाई घाईने धाव घ्यायची चूक त्याने पुढल्याच बॉलला करावी?? अर्थात ऑसीज एकच चूक परत परत करत नाहित म्हणून अख्खं एक तप क्रिकेटवरती त्यांनी बेगुमान राज्य केलं, तर हि संधी गंभीरला बरे देतील? गंभीर आऊट झालाच. पंटर प्रमाणे आपल्या धोनीचे वैयक्तिक ग्रह सध्या नीचीचे असावेत कारण त्याला अजून मोठी खेळि करता आली नाहिये. झालच तर एक जाहिरात कमी करुन तो वेळ एखाद्या सवत्स गायीच्या पायांतून जाऊन किंवा काहितरी शेपटि पकडून कसल्याश्या ग्रह शांती करतात ते करुन बघावं, कदाचित फायदा होईल.

बाकि सचिन तेंडुलकर बाबत म्या पामराने काय बोलावं? १८ हज्जार धावा? कधी कधी वाटतं हा देव (मी त्याला माणूस म्हणणं सोडलय २००* झाल्यापासून) वेडा झालाय. अरे काय ताकद आहे त्याची???? असं असतं का कधी?? रजनिकांतही असं नाही करु शकत. पण त्याच्या १००व्या १०० ची आस मात्र नक्किच लागली आहे. "लगान" मध्ये गावकरी देखिल जितक्या उत्कंठापूर्वक पावसाची वाट बघत नाहीत त्याहुनही जास्त उत्सुकतेने तमाम सचिनप्रेमी त्याच्या त्या विक्रमाची वाट बघत आहेत. आज त्याने त्या दिशेने सुरुवात केलीही होती, अगदि थर्ड मॅनला एक कॅचही सुटला होता, मला लगोलग २००३ च्या वर्ल्डकपची आठवण आली बहुदा वसिम अक्रमच्या बॉलिंगवरती एक्स्ट्रा कव्हरवरती सचिनचा कॅच सुटला होता तेव्हा ९८ खेळून गेला होता सचिन. मला वाटलं कि परत समांतर इतिहास घडणार, पण हाय!! घात झाला .... परत निघालेल्या तेंडुलकरला अंपायरने परत बोलावले व नो - बॉलचा रीव्हू घेतला तेव्हा सारखे वाटत होते "नो बॉऽऽऽऽल हवा रेऽऽ" पण तेही झाले नाही. तो नो बॉल असता तर पॉन्टिंगने नक्किच रागाने स्वत:च्या डोक्यावरचे केस उपटून घेतले असते. असो .... आता बहुदा हि बिलामत पाकिस्तानवरती कोसळणार अशी स्वाभाविक अपेक्षा करुया (या रम्य कल्पनेनी सुध्दा माझ्या चेहर्‍यावर जन्मभराचा आसूरी आनंद ओथंबलाय).

असो, तर मदांध महाराजा पॉन्टिंग याचे संस्थान खालसा केले याबद्दल युवराजच्या नावाऽऽनं चांऽऽऽग भलंऽऽऽ

 - सौरभ वैशंपायन.

Thursday, March 24, 2011

झिंग - Made In Asia, भाग अंतिम.

चीनच्या मांचुरिया भागावरुन रशिया व जपान यांच्यात १९०४ - ०५ मध्ये युध्द झाले. रशियाचा पराभव झाल्याने मांचुरीयाचा मोठा भाग जपानला मिळाला. या भागाचे महत्व असे की या भागातून दुसर्‍या महायुध्दात जपानला युध्दासाठी लागणारा कच्चा माल मिळत असे, तो मिळाला नसता तर जपानला एशिया – पॅसिफिक मध्ये ना जम बसवता आला असता ना पर्ल हार्बरवरती हल्ला करता आला असता. मांचुरिया आपल्या ताब्यात रहावा म्हणून जपानने तिथे आपले एक कळसूत्री बाहुले बसवले. याच प्रमाणे त्यांनी दक्षिण – पूर्व मंगोलियात देखील असेच एक कचकडे सरकार बसवले. १९११ मध्ये चीनमधली राजसत्ता उखडली गेली व प्रजासत्ताक आले. पण म्हणून जादूची कांडी फिरली नाही. जपान दुसर्‍या महायुध्दापर्यंत चीनला रेटा देतच होता. पहिल्या महायुध्दानंतर जर्मनीचे खच्चीकरण करण्यासाठी दोस्तांनी पॅरीस करारात परस्पर चीनचा शांटुंग प्रांताचे जो जर्मनीच्या अधिपत्याखाली होता त्याचे पालकत्व जपानला बहाल केले. त्या विरुध्द आवाज उठवण्याऐवजी चीनी सरकारने त्याला मान्यता दिली. म्हणजे देश कोणाचा राज्य कोणाचे? व तो परस्पर दिला जातो कोणाला? झाल्या प्रकाराने जपान अजून शेफारले. १९३९ सालपर्यंत तर जपानने जबरदस्तीने चीनचा संपूर्ण पूर्व किनाराच जिंकून घेतला होता. हे सगळं सांगण्याचा उद्देश हा की जपानने पध्दतशीरपणे आपल्या व्यापारासाठी राजमार्ग आखलाच पण पुढे याच मार्गवरुन अफूची ये जा सुरु झाली.

जपानने या संपूर्ण भागात अफूची अमर्याद लागवड करुन घेतली. जपानने चीन्यांना केवळ वापरुन घेतले. कधी "युनिट ३७१" मधले आपले विकृत रासायनिक – जैविक प्रयोगांचे गिनिपिग म्हणून तर इतरवेळी अफूच्या शेतात राबणारे मजूर म्हणून. मांचुरियाचे रुपांतर तर केवळ अफूच्या शेतीमध्ये झाले होते. जपानमध्ये जो अफू पिकत असे त्याचे रुपांतर जपानची "मित्सुई" ही प्रसिध्द कंपनी हेरोईन मध्ये करत असे. मांचुरिया व कोरियातुन कमावलेल्या अफूच्या जोरावर २०व्या शतकाच्या सुरुवातीला जपान हा जगातला सर्वात जास्त अफू उत्पादन व विक्री करणारा देश बनला. मांचुरियातील जवळपास अर्धाधिक तरुण पिढी अफूच्या व्यसनाने घेरली गेली. १९३७ साली लिग ऑफ नेशन्सने जगभरातील बेकायदेशीर अफू उत्पादन व विक्रीला जपानला जबाबदार धरले, कारण जगातील एकुण अफु उत्पादनापैकी जवळपास ९०% उत्पादन एकटा जपान करत होता. युध्दकाळात तर जपानने या भागात अफू, हेरॉइन व मॉर्फिन अक्षरश: वाटले. मजुरांना त्यांनी इतके व्यसनाधीन केले की पैशा ऐवजी मजुरांना अंमली पदार्थच दिले जात. अगदी दहा वर्षांच्या मुलांनासुध्दा हेरॉईनच्या सिगारेट्स दिल्या जात. सुमारे ५ लाख नागरीक या व्यसनाने बाधित होते, म्हणजे सुमारे १/८ लोकं अधिकृतरित्या गर्दुल्ले म्हणून नोंदवले गेले. अनधिकृत लोकांची तर गणनाच नसावी.
  

६ सप्टेंबर १९४६, हाजिमे सातोमी युध्दोत्तर कबुलीजबाब देताना.
२००७ साली जपानच्या नॅशनल लायब्ररीत दुर्लक्षित झालेली जी कागदपत्रे उजेडात आली त्यात उघड झाले की नांजिंग भाग, जो जपानने तीन लाख चीन्यांची कत्तल करुन जिंकला व तिथे आपले बाहुले बसवले त्या भागातुन जो अफू पिकवला गेला त्याची किंमत युध्द काळातल्या जपानी बाहुले असलेल्या नांजिंग सरकारच्या एकूण बजेट इतकीच होती . त्यावेळचा अफूचा व्यापार करणारी कंपनी “हून जी शांग तांग” हीने ३०० लाख युआन किंमतीचा अफू विकला व नांजिंग प्रांतिय सरकारचे बजेट होते ३७० लाख युआन. ही कंपनी म्हणायला खाजगी होती जिला नांजिंगच्या कळसूत्री सरकारने लायसन्स दिले होते. अर्थात या कंपनीला असेच इतके घबाड मिळाले नव्हते. त्या कंपनीचा मालक “हाजिमे सातोमि” हा त्यावेळचा ओपिअम किंग होता व जपानी राजघराण्याशी त्याचे चांगले संबध होते. व या सगळ्या व्यवहारातुन मिळालेल्या प्रचंड पैशातला काही भाग हा थेट जपानचे पंतप्रधान ’टोजो’ यांना मिळायचा. दुसर्‍या महायुध्दानंतर, जे जपानी युध्द गुन्हेगार होते त्यापैकी मेजर जनरल र्‍यूकिची तानाका यांनी आपल्या कबुलीजबाबात सांगितले “दर २ महिन्यांनी लेफ्टनंट जनरल कियोनबू शियोझावा हे नांजिंगच्या वार्‍या करत व येताना सातोमि यांच्याकडून पैशांच डबोल आणत!” हे शिओझावा युध्दकाळातील जपानमधील चीनच्या बिजींग कार्यालयाचे ( Ko-a-in ) प्रमुख होते. टोजोंचे ते उजवे हात मानले जात.


सातोमी याखेरीज अनेक मोठ्या अधिकार्‍यांची बडदास्त ठेवत. अनेक बड्या राजकारण्यांशी त्यांचे हितसंबध होते. अगदि ’नोबुसुके किशी’ यांच्या बरोबर देखील. हे तेच किशी जे १९५६ व १९५८ मध्ये जपानचे लागोपाठ २ वेळा पंतप्रधान झाले. यांनी १९४२ च्या निवडणूकित सातोमी यांच्याकडून ५ लाख येनची मदत झाली होती. हा पैसा अर्थातच अफू च्या व्यवहारातून आला होता. १४ डिसेंबर २००६ साली आपले पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच भारत – जपानमधील आर्थिक मैत्रीची सुरुवात करणारे महान नेते वगैरे म्हणून या किशींचा गौरव केला होता. अर्थात त्यात खोटं काहीच नव्हतं. पण भारताबरोबरच्या आर्थिक सहकार्याची सुरुवात करणार्‍या माणसाचे स्वत:चे आर्थिक हितसंबध कोणाशी व कुठवर होते हे लक्षात यावे इतकेच.


सातोमी अर्थातच ह्यातला बराचसा पैसा जपानच्या इंपिरिअल सैन्यासाठी देत असे. मुळात सगळा व्यवहारच गुंतागुंतीचा होता. जपानने त्यांच्या सैन्याच्या खर्चासाठी खास चलन छापून घेतले – ग्युनप्यो(Gunpyo). स्थानिक लोकांना, म्हणजे चीन्यांना अफू विकत घ्यायची असेल तर त्यांना ती ग्युनप्योमध्ये खरेदी करावी लागे. पण हे ग्युनप्यो सरळ सरळ मिळत नसत. तर लोकांना त्यांची लिगल टेंडर विकावी लागत, व त्या हिशोबात त्यांना ग्युनप्यो मिळत. यामुळे ग्युनप्योची किंमत वाढत गेली. रशिया – जपानच्या युध्दाच्या वेळी बेहिशोबी ग्युनप्यो छापला गेल्याने ज्या ग्युनप्योला फारशी किंमत उरली नव्हती तिला अफूमुळे सुगीचेच दिवस आले. शिवाय ग्युनप्योच्या मागे लिहिले होते की ते जपानी येन मध्ये कधीही रुपांतरीत करता येतील. त्यामुळे त्याला महत्व होतेच. सातोमींनी १९४२ या एका वर्षातच आपल्या जवळील काही ग्युनप्योंचे येन मध्ये रुपांतर केले त्याची किंमत होती - १०० लाख येन. यावरुन एकूण युध्दकाळात अफूने जपानी सैन्याला किती मदत दिली, हे समजते. युध्द संपेपर्यंत तर मांचुरिया, पूर्व मंगोलिया, व सगळ्या चीनच्या किनारी भागात या ग्युनप्योंचा सुळसुळाट झाला. १५ ऑगस्ट १९४५ ला जपानने शरणागती दिल्यावरही जवळपास महिनाभर हॉंगकॉंग मध्ये त्याचा चलन म्हणून वापर होत होता. मग ब्रिटिशांनी त्यावर बंदी आणली. व ग्युनप्योंना हॉंगकॉंग डॉलरमध्ये परिवर्तीत करण्याचे आदेश दिले. पण जपानी सरकारने ६ सप्टेंबर रोजी आता या चलनाला काही मुल्य नाही असे जाहीर करताच एका रात्रीत त्यांचे रुपांतर कागदाच्या कपट्यात झाले. ह्या ग्युनप्योंची शेवटाची रंजक कथा अशी कि १९९३ साली हॉंगकॉंगने जपान सरकारवर केस दाखल केली की एका रात्रीत हे चलन बाद केल्याने आमचे झालेले नुकसान भरुन द्या. पण जपानने ग्युनपोंसाठी काही कायदे केले नव्हते, तसेच सॅन फ्रान्सिस्को करारन्वये आम्ही सगळी नुकसान भरपाई केली आहे असे सांगून हात वर केले. सॅन फ्रान्सिस्को करारावर अमेरीका – इंग्लंडसकट ४७ देशांनी सह्या केल्या असल्याने १९९९ साली ही फाईल बंद झाली.


१८ व्या व १९ व्या शतकांत युरोपात जी औद्योगिक क्रांती झाली त्यातल्या भांडवलाचा मोठा वाटा हा भारत व चीन मधल्या अफूने ब्रिटन व युरोपिय देशांना दिला होता. खुद्द अमेरिका व ब्रिटनमध्ये अफूवर बंदी होती पण याचा अर्थ ते दुसर्‍या देशांत पिकवून तिसर्‍या देशांना विकायचे नाही असा थोडिच होतो? दुसर्‍यांच्या पिढ्या बरबाद करायची व त्यावरुनच पैसा कमवायची खोड ब्रिटन – अमेरिकेने पहिल्यापासून जपली आहे. त्याचाच प्रत्यय आता येणार होता रशियाला. ठिकाण होतं "अफगाणिस्थान". साल होतं १९७३. शस्त्र होतं अफू.


 - सौरभ वैशंपायन.

Wednesday, March 23, 2011

झिंग - Made In Asia, भाग ३


दुसरं अफू युध्द.

हॅरी पार्कर्सने हॉंगकॉंगहुन नौदलाची कुमक मागवली. पण यावेळी ब्रिटिश एकटे आले नाहीत. त्यांना फ्रेंच येऊन मिळाले. फ्रेंचाचा राग कशावरुन होता तर त्यांचा एक फ्रेंच धर्मप्रसारक चीनी सरकारने हालहाल करुन मारला होता. परत सुमारे दोन वर्षे हुतूतू खेळल्यावर चीनने शरणागती पत्करुन १८५८ साली तिअनस्टिन चा करार केला. या करारानुसार ब्रिटिशांना १८५८ साली तर अफूच्या व्यापाराचा मुक्त परवानाच मिळाला. शिवाय पुढील कलमे नव्याने चिन्यांना मान्य करावी लागली – १) ब्रिटन, रशिया, फ्रान्स व अमेरीका यांना पेकिंग सकट चीनच्या वेगवेगळ्या शहरात वकिलाती उघडता येतील.  २) न्य़ूझुआंग, दानश्यूई, हांकौ व नानजिंग सह १० नव्या बंदरात व्यापाराची सूट मिळावी.  ३) यांगत्से नदीवर परदेशी व्यापारी जहाजांच्या वाहतूकीला मोकळीक मिळावी.  ४) चीनच्या अंतर्गत भागात परदेशी लोकांना जाण्यास बंदी आहे ती उठवावी.  ५) चीनने ब्रिटिश व फ्रेंचांना ताबडतोब प्रत्येकी वीस लाख चांदीचे टाएल्स (तत्कालिन नाणे) नुकसान भरपाई म्हणून द्यावेत.


ह्या विजयाचा आनंद तायपिंग बंडखोरांनाच जास्त झाला त्यांनी ब्रिटिशांशी हातमिळवणी करायचा प्रयत्न चालू केला. पण ब्रिटिशांनी त्यांनाही टांगून ठेवले. तिअनस्टिनचा करार नुसता कागदावर उतरला होता पण त्याची शाई वाळण्यापूर्वीच चिन्यांनी नवा तंटा उभा केला. याच तहाला सरकारची अधिकृत मान्यता मिळावी म्हणून जे ब्रिटिश - फ्रेंच शिष्ट मंडळ  पेकिंग जमलार्गाने येत होते त्यावर टाकूच्या किल्यातून तोफांचा भडिमार केला. तीन जहाजातील सुमारे सातशे ब्रिटिश व काही फ्रेंच यात खलास झाले.  हे समजताच  जपान - चीनचा कमिशनर म्हणून नेमलेल्या ब्रिटिश अधिकारी एल्गीनच्या (हा तोच लॉर्ड एल्गिन जो पुढे  भारताचा व्हॉइसरी झाला) तळपायाची आग मस्तकात गेली १२ हजार ब्रिटिश व ६ हजार फ्रेंच, टाकूच्या किल्यावरती तुटुन पडले. टाकूचा किल्ला पडला. मांचू सेनेने परत तहाची बोलणी लावली. पण परत चिन्यांनी खंजीर खुपसला. तहाची बोलणी करायला गेलेल्या ब्रिटिश व शीख सैनिकांनाच अटक केली. एल्गीनच्या रागाचा भडका उडाला. त्याने थेट पेकिंगवरच चाल केली. ६ ऑक्टोबर १८६० ला ब्रिटिश – फ्रेंच सेना पेकिंग मध्ये घुसल्या. राजा जेहोलला पळून गेला. राजाचा राजवाडा त्यांनी ताब्यात घेतला. व अटक केलेल्या आपल्या माणसांना सोडवायला एल्गीन तुरुंगाकडे गेले – पण चिन्यांनी ब्रिटिश अधिकार्‍यांना व शीख सैन्याच्या तुकडीला हालहाल करुन मारले होते. एल्गीनच्या डोक्यात सूड उगवायचा विचार आला. १८ ऑक्टोबरला त्याने मांचू राजांचा भव्य दिव्य “यिहे युआन” व “युआन मिंग युआन” ज्यांना समर पॅलेस म्हणतात ते दोन्ही राजवाडे पेटवून दिले. शेकडो वर्षे दिमाखात उभा असलेले पण विलासी आणि नेभळट नेतृत्वाचे प्रतिक असलेले ते राजवाडे ढणाणा पेटले.


दुसरं अफू युध्द देखील ब्रिटनने जिंकलं होतं. आता वाढीव नुकसान भरपाई, अजून काही बंदरातून खुला व्यापार, धर्मप्रसाराला कायदेशीर मान्यता आणि अफूच्या व्यापाराला कायदेशीर मान्यता यावर नवीन अटिंसकट शेवटचा तह झाला. ब्रिटिश, फ्रेंच, व अमेरिका यांनी एकत्र येऊन चीनचे वस्त्रहरण केले.


ब्रिटन दोन दोन अफू युध्द जिंकले होते खरे, पण १८७३ मध्ये जी आर्थिक उलथापालथ झाली त्याचा फटका ब्रिटनला बसणे स्वाभाविक होते कारण जगभर त्यांच्या वसाहती पसरल्या होत्या. मग ह्याचा बोजा टाकायचा कोणावर? उत्तर सोप्पं होतं भारत आणि चीन. कवडीमोलावर काम करणारे मजूर भारतात होतेच. नुकतंच १८५७चं स्वातंत्र्यसमर व इंग्रजांच्या दृष्टीने ’बंड’ त्यांनी चिरडलं होतं. आता भारतीय त्यांचे ’गुलाम’ बनले होते. त्यांनी भारतातुन अफूचे अफाट पीक काढायला सुरुवात केली. त्यावेळी सुध्दा अनेक देशात अफूच्या विक्रीवर बंदी होती. पण ब्रिटनने त्यांचे ’गिर्‍हाइक’ ठरवले होते, “चीन!”  पण चीन मध्येच याची लागवड केली तर?? लगोलग चीन मध्ये दणकून अफू पेरलं गेलं. मग काय भारत आणि चीन मधले अफू जगाच्या बाजारपेठेत विकायचे व बक्कळ पैसा कमवायचा सपाटा ब्रिटिशांनी लावला. पाठोपाठ डच, स्पॅनिश लोकांनीही आपले खिसे यात बेमालून जड करुन घेतले. भारतात अफूचा लिलाव व्हायचा तो कलकत्त्यात. त्यावेळचे अनेक गुजराती व पारशी देखील यात सामील होत. १६१९ साली डचांनी तर जकार्तामध्ये एक बंदरच ताब्यात घेतलं. १६४० मध्ये ते बंगालमधून अफू नेत व तो जकार्तामध्ये विकत. १६६० साली त्यांनी ६१७ किलो अफू तिथे नेला. हळू हळू मागणी इतकी वाढली की पुढल्या २५ वर्षांत त्यांनी किती अफू तिथे न्यावा? -  तब्बल ७२,२८० किलो. डच व्यापारी  शिपिंगचा खर्च भागवल्यावर सुध्दा ४०० पट नफा कमवत. आशियात त्यादरम्यान व्यापारी कारणांनी जी सागरी वाहतुक होई  त्यात ३४% फक्त अफूसाठी वापरली जात होती.कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे …..

दोन अफू युध्द चीन हरला होता, पण चीनचे हाल इथे थांबणार नव्हते. चीनमध्ये अफूच्या बेसुमार लागवडीला खर्‍या अर्थाने हातभार लावला तो जपाननी. जपान व चीनमध्ये एकुण ११ युध्दं झाली. सुरुवात झाली ती कोरियाच्या स्वामित्वावरुन, १८७० साली. तैवान मधील कोळ्यांनी काही जपानी नाविकांना ठार मारले, जपानला तैवानवरती आक्रमण करायला कारणच मिळाले. त्यांनी तैवानमध्ये खोलवर घुसखोरी केली. चीनने तैवानच्या मदतीला धाव घेतली तसे लिऊ – चिऊ ही बेटं वगळता बाकी तैवान मधून जपानने माघार घेतली. मग चीनने देखील प्रकरण जास्त ताणले नाही. जपानने लिऊ – चिय़ बेटं पचवली, इथे जपानने चीनचे पाणी जोखले. मग आपला मोर्चा वळवला कोरियाकडे. १८७६ च्या फेब्रुवारी मध्ये जपानने कोरियावरती आक्रमण केले. व इतकी वर्ष चीनचे मांडलिक असलेल्या कोरियाशी करार करताना २ कलमे घातली – १) कोरिया हे स्वतंत्र सार्वभौम राष्ट्र म्हणून जपानशी व्यवहार करेल. व  २) कोरियाचा किनारा जपानला व्यापारासाठी खुला असेल.


मधल्या काळात कोरियात अंतर्गत बंडाळी माजली. चीनी सैन्याने येऊन ती बंडाळी मोडून काढली. मग चीन व जपानने एकत्र येऊन एक करार केला. त्या अंतर्गत कोरीयात दोघांपैकी कोणी काहीही हालचाल केली तर दुसर्‍या देशाला त्याची कल्पना दिली जाईल. मार्च १८९४ मध्ये पुन्हा कोरियात बंडाळी माजली. दोन्ही देशांनी आपापले सैन्य बंडाळी शमवायला पाठवले. चीनने केवळ १५०० व जपानने तब्बल ७०,०००. यानंतर जपानने कोरीयात जो तळ ठोकला तो ठोकलाच. इंग्लंड ने इथे मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करताच जपानने त्यांना परस्पर उडवून लावले. अखेर  १८९४ – ९५ मध्ये जे युध्द झाले त्यात जपानने चीनचा पराभव केला. झालेल्या तहात चीनवर जी कलमे घातली त्यातले एक कलम होते की चीनच्या सर्व व्यापारी बंदरातून जपानला जकातीशिवाय मालाची ने आण करता येईल. शिवाय चीनमध्ये जपानी व्यापारी ज्या वस्तू तयार करतील त्यावर कुठलाही अतिरीक्त कर असणार नाही.


क्रमश:

 - सौरभ वैशंपायन. 


===============
"झिंग - भाग अंतिम" 

Tuesday, March 22, 2011

झिंग - Made In Asia, भाग २


अफू बाई अफू

           भारतातील अफूच्या या पिकाचा पहिल्यांदा सर्वात जास्त फायदा उठवला तो पोर्तुगिजांनी. माळवा प्रांतातील अफू ते चीनमध्ये नेऊन  विकत. तसेही पोर्तुगिज ब्राझिल मधली तंबाखू चीनपर्यंत वाहून नेत असत. व त्याबदल्यात चीन मधले रेशीम विकत घेत. पण त्याला अडसर होता तो चीनच्या स्वत:च्या तंबाखूच्या उत्पादनाचा. मग अफू तंबाखू मध्ये मिसळून ती जाळायची व नळीतून तिचा धूर ओढायचा. ही कला पोर्तुगिजांनी भारतीय व चिन्यांना शिकवली. मग काय बारीक डोळे असलेले चीनी ती अफू मिश्रीत तंबाखू ओढल्यावर डोळे अजून बारीक करत व रंगीत दुनियेत हरवून जात. बघता बघता मिचमिच्या डोळ्यांवर नशेची झापडं कधी चढली हे त्यांनाच समजलं नाही. अखेर १७२३ साली क्विंग घराण्याच्या युंग चेंग या राजानी चीनमध्ये अफू व तंबाखूवर बंदी आणली. काही काळ ही बंदी कायम राहिली. स्वत:ला कोंडून घ्यायचे, जगाला कुतुहल वाटेल इतकी झाकपाक करुन टाकायची चीनची सवय आजची नाही, तशी जुनीच आहे. क्विंग घराणं तसं काही प्रजाहितदक्ष होतं वगैरे समजण्याचे कारण नाही. बाई, बाटली आणि काळा पैसा यांनी राजापासून ते सरदारांपर्यंत सगळ्यांना पोखरलं होतं. प्रजेचे हाल कुत्रं खाणार नाही असे होते. त्यातून जपान्यांनी चीनशी अगदी सहाव्या शतकापासून उभा दावा मांडला होता.


           थोडक्यात चीनला सांभाळू शकेल असा कोणीही नव्हता. पाच हजार वर्षांचा इतिहास वगैरे केवळ बुजगावण्यागत नाचवण्यासाठी उरला होता. अफू व तंबाखूवरती बंदी असताना ती विकायचे प्रयत्न सुरु केले ब्रिटिशांनी. ईस्ट इंडिया कंपनीला भारतात १७६१ साली अफूची लागवड करायची खुली सूट मिळाली. साहेब व्यापारात तसा हुशार आणि चिकट. मुश्किलीने का होईना ब्रिटिशांनी चीनच्या ग्वांगझोऊ म्हणजेच कॅंटॉन बंदरात व्यापारासाठी परवानगी मिळवलीच. ब्रिटिशांना बोट धरायला दिले कि ते हळू हळू हातच पकडत व नंतर गळा. चीनमध्ये ब्रिटिशांनी वेगळं केलं नाही. १७७३ च्या डिसेंबरमध्ये तसेही ’बोस्टन टि पार्टी’ मुळे उत्तर अमेरीकेतुन ब्रिटनचा बाजार उठायला नुकतीच सुरुवात झाली होतीच. या चहाने तोंड चांगलेच पोळले होते. म्हणून मग आता त्यांनी चीनमधला चहा फुंकून प्यायला सुरुवात केली. ते चहा विकत घेत व चीनला त्याबदल्यात चांदी व अफू देत. अफूसाठी ते भारतावर अवलंबुन होते. १७६७ मध्ये भारतातून जवळपास २ टन अफू चीनला रवाना झाला. याखेरीज चीनशी चांदी मध्ये व्यापार करता यावा म्हणून ब्रिटन हि चांदी युरोप व मेक्सिको मधून मिळवत असे. बघता बघता ब्रिटनचीच यात चांदी होऊ लागली. पण अमेरिकेने व युरोपिअन देशांनी विशेषत: जर्मनीने चांदीला आपल्या अर्थकारणातून बाजूला काढले. अमेरिकन याला "Panic of 1873" म्हणतात तर युरोपमध्ये याला “Long Depression” म्हणतात. या काळात सर्व व्यवहार सोन्याच्या पायावर व्हावा असे ठरले. या सगळ्या प्रकारात ब्रिटनची चीनमध्ये देखील पंचाईत होऊ लागली. मग यावर ब्रिटिशांनी जालीम उपाय शोधला – अफू!


पण सगळं सहज घडलं नाही, त्या आधी ब्रिटिश व क्विंग घराण्याची कॅंटॉन बंदरात पहिली सलामी झडली. साल होतं १८३९. सुमारे चार वर्ष हा झगडा सुरु होता. झालं असं की चीन सरकारच्या लक्षात येऊ लागलं कि ब्रिटन आपल्याला चहाच्या बदल्यात चांदी देतं आणि अफूच्या बदल्यात परत चांदीच घेतं. हे कळेपर्यंत बराच उशीर झाला होता. आता गंगा उलटी वाहु लागली.  म्हणजे आजवर चहाच्या बदल्यात ब्रिटन चीनला चांदी देत होतं. पण त्याच्याहुन जवळपास दीड व दोन पट चांदी अफूसाठी चीनबाहेर जाऊ लागली. म्हणजे १७९३ साली चीनमध्ये जवळपास २६ लाख टन चांदीचे साठे होते. जे १८२० साल उजाडताना ८ लाख टनांवर घसरलं होतं. शिवाय हादरवणारी गोष्ट अशी होती की चीनमध्ये जवळपास २० लाख गर्दुल्ले तयार झाले होते. क्विंग घराण्याने हा व्यापार बंद करायचे ठरवले. या कामगिरीसाठी त्यांनी  कॅंटॉन बंदरात लिन झेक्सू याची नेमणूक केली. त्याने १० मार्च १८३९ रोजी लगोलग अफू विकण्यावर बंदी घातली.  त्याने ब्रिटिशांसकट सर्व परदेशी व्यापार्‍यांना अफूचे साठे त्याच्या हवाली करण्यास सांगितले. व नियम मोडणार्‍यांना देहदंडाची शिक्षा जाहीर केली. ब्रिटिशांना त्याने कॅंटॉन बंदरात व्यापार करण्यास बंदी घातली. अखेर ठराविक नुकसान भरपाई मिळेल या बोलीवरती त्यावेळचा ब्रिटिश सुप्रिटेंडन्ट चार्ल्स एलिऑट ने ३ जुन १८३९ या दिवशी प्रत्येकी ५५ kg चे जवळपास २०,००० खोके झेक्सूच्या ताब्यात दिले. झेक्सूने ताबडतोब त्याची विल्हेवाट लावायला सुरुवात केली.


पहिलं अफू युध्द.

इथपर्यंतही सगळं ठीकठाक होतं. पुढे दारुच्या नशेत एका ब्रिटिश सैनिकाने चीनी कामगाराला गोळी घातली आणि नवाच बखेडा उभा राहीला. लिनने ब्रिटिश सैनिकाला ताब्यात देण्याची मागणी केली पण इंग्रजांनी ती नाकारली. लिनने इंग्रज बराकिचा मकाऊ मधून होणारा अन्नपुरवठा अडवला, पिण्याच्या पाण्यात विष कालवलं. इंग्रजांना तेथून माघार घ्यावी लागली. कॅंटॉन तात्पुरते सोडून ते हॉंगकॉंगला आले व तिथे इंग्रजांनी सैन्याची जमवाजमव सुरु झाली. एकमेकांची खुसपटं काढण्यात काही महिने गेले व अखेर जून १८४० मध्ये इंग्रजांनी ग्वांगडॉंग इथे जबरदस्त दणका दिला. इतके दिवस आपल्या तोफा व नाविक दलाचा नको इतका आत्मविश्वास असलेले चीनी या दणक्याने पार झोपले. १५ लष्करी बोटी, ४ वाफेवर चालणार्‍या बोटी, २५ लहान बोटी व ४००० होडगी सिंगापूरवरुन ग्वांगडॉंगला येऊन थडकली. त्यांनी पर्ल नदीचं मुख ताब्यात घेतलं. हबकलेल्या चीनने त्यांना व्यापारात आलेली खोट भरुन द्यायचे कबूल केले. पण युध्द थांबलं नाही. ते पुढली दोन वर्ष अगदी सवडीनं चालू राहिलं. इंग्रजांनाही घाई नव्हती. त्यांची छोटि होडगी या काळातही कॅंन्टॉन व आसपासच्या गावांत चोरुन मारुन अफू पोहोचवतच होती. चीनी आता अफू शिवाय जगू शकत नाही हे इंग्रजांनी ओळखलं होतं. अखेर ब्रिटिशांनी १८४२ मध्ये निंग्बो जिंकलं, लष्करी दृष्ट्या महत्वाचं शहर चिन्यांनी गमावलं. आणि १८४२ च्या मध्यावर त्यांनी यांगत्से नदीच्या मुखावर वर्चस्व निर्माण केल्यावर यांगत्से नदीवर चालणार्‍या व्यापारावर अवलंबून असलेल्या शांघायला शरण यावच लागलं.


पहिलं अफूचं युध्द ब्रिटिशांनी जिंकलं. आणि झालेल्या तहात कलमे ठरवली गेली – १) ब्रिटिशांना कॅन्टॉन, अमॉय, फूचौ, निंगपो, व अगदी शांघाय मध्येही व्यापार करायची सूट मिळावी.  २) चिनी सरकार सांगेल ती जकात भरु, परंतु अधिक खंडणी बंद.  ३) चिनी भूमीवरील ब्रिटिश वसाहतींना चीनी कायदे लागू होणार नाहीत. ४) हॉंगकॉंग वरती ब्रिटिशांचे नियंत्रण राहिल. म्हणजे आता तर इंग्रजांना काही धरबंधच उरला नाही. राजसत्तेला इंग्रजांकडून काय मिळालं? तर “अफू विकणार नाही!” असं तोंडी आश्वासन. बास!  याच दरम्यान चीनमध्ये तैपिंग बंडखोरांनी निष्क्रिय, भ्रष्ट व इंग्रजांसमोर पत घालवलेल्या राजसत्तेविरुध्द बंड पुकारलं. ब्रिटिशांना दुसर्‍या देशातील अशी प्रकरणे पोसायला फार आवडत. त्यांनी दोन्ही बाजुंचे गालगुच्चे घेणे सूरु ठेवले. त्यातच ख्रिस्ती धर्मोपदेशकांचा नुसता सुळसुळाट झाला होता. त्यांनी या बंडखोरांना अजूनच फितवले. बंडखोरांचा जोर इतका होता कि पेकिंग राजवट डळमळू लागली. त्यांना परत ब्रिटिशांचा आधार गरजेचा वाटला. आणि इथे ब्रिटिशांचा चीनच्या राजकारणात प्रवेश झाला. पण हा मधुचंद्र फार रंगला नाही, झालं असं की ८ ऑक्टोबर १८५६ ला ब्रिटिश निशाण फडकणार्‍या एका बोटीला “येह” या चिनी सरदाराने अडवले व त्यात अफू सापडला ह्या आरोपाखाली त्याने बोटीवरील १२ ब्रिटिश व्यापार्‍यांना अटक करुन त्यांचा छळ करायला सुरुवात केली. हॅरी पार्कस या इंग्रजी अधिकार्‍याने “त्या व्यापार्‍यांना सोडा अथवा हॉंगकॉंगहुन ब्रिटिश लष्कर मागवावे लागेल!” अश्या आशयाचे पत्र धाडले. येह ने त्याला भीक घातली नाही. झालं प्रकरण पेटलं.

क्रमश:

 - सौरभ वैशंपायन. 


==============
"झिंग - भाग ३" 

Monday, March 21, 2011

झिंग - Made In Asia, भाग १


        धर्म ही अफूची गोळि आहे असे मार्क्स म्हणाला होता. ह्यात कितपत तथ्य आहे हा भाग निराळा, पण धर्म आणि अफू या दोन गोष्टि एकत्र आल्या की मात्र कधीही न उतरणारी झिंग चढते हे मात्र खरं आहे. त्या मदात मग आपण केलेली प्रत्येक गोष्ट ही योग्यच आहे, असं वाटायला लागतं आणि समोरच्यालाही तसंच वाटावं अशी जबरस्ती केली जाते. त्याविरोधात गेलात तर तुम्ही शत्रू ठरता व शत्रूला शिक्षा एकच – मृत्यु!


        अंमली पदार्थ व दडपशाही यांच नातं तसं जुनंच आहे. गेल्या ४० वर्षांत या धंद्यातील दडपशाहीची जागा थेट आंतरराष्ट्रिय दहशतवादाने घेतली आहे. मुळात अंमली पदार्थ, त्यांचे सेवन अथवा विक्री, त्यामध्ये घालवला अथवा कमावला जाणारा भरघोस पैसा, त्यामध्ये असणारे धोके, व एकदा त्यात अडकलं कि सहसा न मिळणारी परतीची वाट ह्याविषयी समाजात अनेक समज – गैरसमज आहेत. अंमली पदार्थांची स्वत:ची अशी एक धुंद आणि काळि दुनिया आहे. सामान्य माणूस त्यात कधी पडत नाही. पण ह्या अंमली पदार्थांच्या पैशावर जागतिक स्तरावरचा, आर्थिक व धार्मिक दहशतवाद कसा जन्मतो, वाढतो आणि फोफावतो हे समजलं कि आपणं या चक्रात कधीही भरडले जाऊ शकतो याची जाणीव होते. आपल्या आजुबाजुला घडणारे भीषण दहशतवादी हल्ले हे बर्‍याचदा अंमली पदार्थांच्या व्यापारातुन आलेल्या पैशाने कार्यान्वित होतात हे वास्तव, परिस्थिती अजुनच गडद करतं. आणि अंमली पदार्थ व दहशतवाद यांतलं नात किती अतुट आहे हे अधोरेखित करतं. यामागचं हादरवुन टाकणारं वास्तव हे आहे कि यामध्ये मोजक्या कुख्यात संघटना, किंवा पाच – पन्नास ड्रग माफिया नसतात तर ह्या सगळ्याला खतपाणी घालणार्‍यांमध्ये आर्थिक व लष्करी महासत्ता, गुप्तहेर संघटना, मोठे मोठे राजकिय पुढारी, अनेक मोठि घराणी, व धनाढ्य कंपन्या असतात.

अश्याच अंमली पदार्थांच्या हलाहलाची व दहशतवादाच्या भस्मासूराची ही खरीखुरी गोष्ट, पुराणातल्या सूर्याला ग्रासणार्‍या राहू – केतूच्या युतीपेक्षा पिडादायक व भयानक.

 ===============

१) मेड इन एशिया!

आनंदाचं झाड


           
अफू हा काही कालचा शोध नक्कीच नाही. गेली ४ हजार वर्ष माणूस या “आनंदाच्या झाडाबरोबर” राहतो आहे. उत्खननातुन मिळालेल्या पुराव्यांवरुन साधारण तीस हजार वर्षांपूर्वी ’निआन्डेर्थल’ मानवाला पहिल्यांदा अफूची ओळख झाली असावी असा अंदाज आहे. पण तरी पहिला विश्वासजन्य म्हणता येईल असा पुरावा साधारण ख्रिस्तपूर्व ४००० वर्षांपूर्वी सुमेरीअन संस्कृतीतुन मिळतो. सुमेर म्हणजे सध्याचा इराक आहे तो भाग. इथल्या मेसेपोटेमिआ इथे याची लागवड केली जात असे. त्याला “हुल गिल” असं म्हणत, म्हणजे “आनंदाच झाड”.  ’ओडिस्सी’ या काव्यात होमरने याचे गुण गाताना म्हंटले आहे कि “मद्यातून ज्यांनी ज्यांनी याचे सेवन केले त्यांतील एकालाही आपल्या नातेवाईकाच्या मृत्युबाबत वाईट वाटले नाही. त्यांच्या समोर आई – वडिलांचा मृत्यु झाल्यावरही त्यांच्या डोळ्यातून अश्रु आले नाहीत!”
          

रोमन संस्कृतीमध्ये सोम्नस हा निद्रेचा देव आहे, ग्रीक लोक यालाच हायप्नोस संबोधत, हे देव देखील अनेकदा अफूची झाडे हातात घेऊन उडत असताना दाखवतात. इजिप्त मध्ये देखील याची लागवड व्हायला सुरुवात झाली. अगदी मेल्यावर राजाच्या ममी शेजारी अफू ची बोंडे ठेवत असत. पुढे सिकंदराने जग जिंकायला ज्या प्रदेशातून आपला मोर्चा नेला तिथे तिथे अफू पसरत गेले. वेदना व शोक भावनांचा विसर पाडायला लावणारे असल्याने सिकंदराच्या सैन्याला याचा खचित उपयोग झाला असणार. सिकंदराबरोबर ते भारतापर्यंत पोहोचले. साधारण आठव्या शतकात अरबस्तानात ह्याचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होऊ लागला. मुस्लिम धर्मात प्रेषितांनी दारु पिण्यास बंदी केल्याने हशिश अथवा अफू वापरुन त्यातून अरबांनी पळवाट काढली होती. याच दरम्यान चीनमध्ये देखील औषधात याचा वापर होऊ लागला.


             ग्रीक वैद्यांनी त्यावर अनेक प्रयोग करुन विष उतरवणे, डोकेदुखी, दमा, आवाजातील बिघाड, दृष्टीदोष, खोकला, रक्ताची उलटी, बहिरेपणा, लघवीशी संबधित आजार, ताप, अनेक स्त्रीरोग, यांवर अनेक औषधे शोधली होती. यासाठी ते कधी कधी पूर्ण झाडाचा उपयोग करीत तर कधी त्यातल्या विशिष्ट भागाचा उपयोग करत. अनेक वैद्यकीय प्रकारात अफूला “Hand Of God” म्हंटले आहे, हे किंचित अति वाटत असलं तरी असह्य दुखा: वरती जालीम उपाय होता हे मात्र खरं.  भारतात अफूला संस्कृत नाव होते “आफूकं” आणि “अहीफेन” अही म्हणजे साप व फेन म्हणजे फेस. विषावर याचा चांगला उतारा पडतो हे आयुर्वेदात सांगितले आहे. विविध आयुर्वेदिक ग्रंथात यावरती सखोल विवेचन केले आहे. पैकी “भाव प्रकाश” मध्ये “आफुकं शोषणं ग्राही श्लेष्मघ्नं वातपित्तलम ||”  असे वर्णन केले आहे. सुश्रुतानुसार व्रणातील आर्द्र भावाचा नाश करणे म्हणजे शोषण होय. अफूचा मुख्य उपयोग वेदना शमनार्थ असला तरी सूज उतरवणे व जखम सुकवणे यासाठी अफू मदत करत असावा. अफू वात वाढविणारा आहे हे श्लोकात सांगितलेच आहे. वाताच्या वाढण्याने जखमेत कोरडेपणा येतो. या खेरीज अफूला “ग्राही” असे देखील म्हंटले आहे म्हणजे मलातील द्रवाचे शोषण करणारा, थोडक्यात जुनाट अतिसारावर देखील अफू गुणकारी आहे.


            पंधराव्या शतकात मुघलांनी अफूच्या लागवडीला प्रोत्साहन दिले. अकबराच्या काळात ह्याच्याकडे उत्पन्नाचे चांगले साधन म्हणून बघितले जाई. गंगेच्या खोर्‍यात, बंगाल व पुढे अगदी आसामपर्यंत, तर या बाजूला माळवा प्रांतात याचे उत्पादन घेतले जाई. आजही भारतात मुख्यत: राजस्थान, माळव्यात व उत्तरप्रदेशात अफूची शेती होते. मात्र त्यावर कडक सरकारी निर्बंध आहेत. युनायटेड नेशन्सच्या १९६१ च्या व भारतीय अंमली पदार्थ विषयक १९८५ च्या कायद्या अंतर्गत अफू पिकवण्याचा परवाना मिळतो. हा अफू औषधी उपयोगांसाठी वापरतात. आपण जी खसखस वापरतो ती देखील अफूच्या झाडापासून मिळते.


 अफूच्या झाडाला थंड हवामान लागतं. मुळातच पाणी कमी लागत असल्याने रेताड जमिनीत देखील तरारुन पीक येतं. पहिल्या दोन महिन्यात याची काळजी घ्यावी लागते. साधारणत: पावसाळ्यात बी शेतात पसरवलं जातं. अफूच्या झाडाची पूर्ण वाढ व्हायला अदमासे चार महिने लागतात.  अफूचं झाड साधारण छाती इतकं वाढतं. ऐन हंगामात अफूचं शेत सुंदर लाल चुटूक फुलांनी बहरलं असतं. मग दोन आठवड्यांचा हंगाम संपल्यावर पाकळ्या गळून जातात, की मध्ये उरतं ते अफूचं बोंड. हे बोंड फिक्कट हिरव्या रंगाचं असतं. ते गडद हिरव्या रंगाच होतं व फुगून येतं. या बोंडाच्यावर एक छत्रीसारखा छोटा आकार असतो, त्याची टोके वरच्या बाजूला वळलेली दिसली की समजायचं - हे बोंड अफू काढायला तयार झालंय. त्याला धारदार सुरीने काळजीपूर्वक उभा छेद देतात, म्हणजे त्यातुन पांढर्‍या रंगाचा चीकासारखा घट्ट द्राव बाहेर पडतो. तो भांड्यात साठवायचा. हा द्राव गोळा करण्याचं काम साधारणत: पाऊस नसताना त्यातूनही दुपारच्यावेळी करतात. प्रत्येक बोंडातून साधारण चार – पाच वेळा हा द्राव निघतो. त्यानंतर ही बोंड कापून सुकवली जातात व त्यातून निघणार्‍या बिया पुढल्यावर्षीच्या लागवडीसाठी जपून ठेवल्या जातात. हे जमा केलेलं अफू मग काही दिवस सुकवण्याचं काम चालतं. अर्थात तो कडकडीत सुकवत नाहीत. घट्ट चिकटसर आणि चॉकलेटी रंगाचा अफू सर्वोत्तम समजला जातो. याच अफूवर प्रक्रिया करुन मॉर्फिन अथवा हेरॉइन बनवलं जातं. साधारण अफूच्या वजनाच्या १०% मॉर्फिन सहज मिळतं.


क्रमश:
 - सौरभ वैशंपायन.

===============
"झिंग - भाग २"

Tuesday, March 15, 2011

एका जंगलाची गोष्ट.

त्या उंच डोंगरमाथ्याभोवती पावसाळ्यात खूप काळे ढग जमा व्हायचे. यात्रेला यात्रेकरुंची झुंबड उडावी तसेच. आणि एकदा का पाऊस लागला कि किमान २-३ दिवस सतत बरसत रहायचा. अविश्रांत. वीजांचा जोर तर इतका वाढायचा कि तिच्याकडेच झेप घेत आहेत कि काय अशी वाटणारी  उंच शेंड्याची चार –दोन वेडि झाडे ती हमखास आडवी करायची. पण पावसाच्या आवाजात त्यांचे गेलेले बळी कुणालाच समजायचे नाहीत.  बाजूची झाडे सुध्दा अंग चोरुन उभी राहिल्यागत असायची. त्यांच्या पानांवरुनही अहोरात्र पाणी खाली ठिबकत रहायचं, मग डोंगरमाथ्यावरचं ते मातकट पाणी शेकडो ओढ्यांतून हजार दिशांना पांगायचं. पण बहुतेक ओढे डोंगराच्या पश्चिमेलाच जायचे, एखादाच वाट चुकला ओढा खुळ्यासारखा उगीच इकडची – तिकडची वाट धरायचा. सुरुवातीला वेगवेगळे धावणारे ओढे एका खोलगट ठिकाणी शहाण्यासारखे शिस्तीत एक व्हायचे आणि पश्चिमेच्या त्या रौद्र-रम्य कड्यावरुन मग तो एकसंध जलप्रपात घोंघों करत खालच्या दरीत उतरायचा. त्याच्या काही धारा टप्पे घेत उतरायच्या काही धारा मात्र सरळ दरीच्या खोल खोल अंधारात उडि घ्यायच्या. पण त्या खालपर्यंत पोहोचायच्या कि मध्येच त्यांचेही तुषार हवेत विखरायचे ते माहित नाही. कारण ती दरी होतीच तशी. शेकडो किंवा कदाचित हजारो वर्ष अस्पर्ष असलेली. तीचा बहुदा थांगच नसावा. थेट पाताळाचा रस्ता इथुनच सुरु होत असावा. प्रकाश सुध्दा तिच्या तळाला स्पर्ष करत नव्हता. इतकि खोल.


याच डोंगरा भोवती चारही बाजूंना नजर जाईल तिथवर पसरलेलं जंगल होतं. बारा मास हिरवंगार असायचं. आणि पावसाळा सुरु झाला कि गडद हिरवा रंग पसरायचा. इतका गडद कि कधी कधी गच्च झाडि काळपटपणाकडे झुकायची. डोंगरावर मन भरेतो कोसळल्यावर मग उरलेलं पाणी शिंपत ढग या जंगलावरुन पुढे सरकायचे. मग झाडांच्या खोडांवर सुध्दा शेवाळं चढायचं. मातीवर उतरलेल्या पहिल्या पावसाचा गंध जंगलभर पसरायचा. सगळं गार गार व्हायचं, बरचसं दमट सुध्दा. पावसाचा थेंब बसल्यावर काही झाडावरच्या शेंगा रागवल्याप्रमाणे तडकायच्या आणि त्यातल्या बीया चौफेर उडायच्या, बर्‍याचश्या त्याच झाडाखाली तर काहि आसपासच्या वीतभर झर्‍यांत पडून दुर वहात जायच्या. त्या वहाणार्‍या झर्‍यांतुन लहान मोठे अनेक जातींचे बेडुक रात्रंदिवस डराव डराव करत रहायचे. दिवसा जंगल शांत होतं असं वाटावं इतका आवाज रात्री वाढत असे. कुठलाही ऋतु असो, रातकिडे अहोरात्र किर्र किर्र करायचे. मग रातव्यांनाही जोर चढायचा. जंगलाच्या वेगवेगळ्या टोकांतून रातवे सलग ओरडत रहायचे.


रात्रभर भिजून गारठलेली माकडं सकाळ झाली कि अंग झटकायची. ढगाळ आकाशात सूर्याचा पत्ता नसायचाच. पण प्रकाश पाहिला कि ती आपोआप हुशार व्हायची. त्यांच्या आडदांड म्होरक्या सर्वात आधी त्याच्या हद्दितल्या सर्वात उंच झाडावर चढून छाती फुगवुन हुप्पऽऽ हुप्पऽऽ हुप्पऽऽ असा आवाज द्यायचा. काहि क्षणात जंगलातल्या विविध भागातून दूरुन तसेच काहीसे आवाज यायचे. हा सीमा ठरवण्याचा रोजचा दिनक्रम, एखाद्या दिवशी जंगलातल्या एखाद्या भागातून असा आवाज आला नाही तर पुढच्या दोन दिवसातच शेजारच्या हद्दितला एखादा मस्तवाल लांब सुळ्यांचा नर वानर सहा – आठ दांगट साथीदारांसककट दबकत अदमास घेत त्या हद्दित शिरायचा आणि मग त्या हद्दिमधील  निर्नायक टोळिवर वारंवार हल्ले करुन त्यांना जेरीस आणायचा. लहान पिल्लं चावे घेऊन मरायला सोडली जायची. पिल्लं मेली कि आपोआप माद्या या नव्या नायकाला स्वीकारयच्या. मग पुन्हा नव्याने हद्द मांडली जायची. अधिक माद्या, अधिक फळे, नव्या नायकाची नवी प्रजा. हे चक्र पिढ्या दर पिढ्या असंच सुरु असायचं.


बिचकण्यासारखं यात काही नव्हतं निदान जंगलातले नियम असेच असतात. क्रूर, चूकिला सहसा माफी न देणारे. पण त्यालाही चौकट होती. एकदा मोठी शिकार केली कि वाघ सुध्दा चार दिवस कुणाच्या वाटेला उगीच जात नसे. हो त्या निबिड  दरीत ५-६ वाघरु देखिल होती. बरेचसे बिबटे होते. सीमांवरुन यांच्यातही संघर्ष व्हायचाच. पण एरवी शिकारीच्या घटना सोडल्या तर जंगल शांतच म्हणावं लागेल. अर्थात वाघ शिकार करताना आवाज फारसा होतच नसे. शेवटच्या काही क्षणांमध्ये जी झटापट होई तितकिच, पण एकदा का हरणाचं – सांभराचं नरड मजबुत जबड्यात आलं कि सगळं आपसूक शांत होत असे. हां आता एखाद्या मोराने किंवा भेकराने मात्र वाघाची चाहुल लागल्याची हुल उठवली कि बघता बघता समोरचं कुरण मोकळं व्हायचं. काटकुळ्या पण मजबुत पायांनी लांब लांब उड्या टाकत बघता बघता ती हरणं जंगलात गायब होत. मर रागा रागाने वाघ शेपटिचा काळा गोंडा आपटत बसायचा. क्वचित संतापुन डरकाळिही फोडायचा. झाडावरचं एखादं कमनशिबी माकड बेसावध असेल तर दचकुन बिचार खाली भेलकांडायचं, कि मग त्याला वाघाने दबोचलाच समजा. पण असं फार म्हणजे फारच क्वचित व्हायचं. 


शिकार कराताना आवाज व्हायचा तो शिकारी कुत्र्यांमुळे. म्हणजे आवाज त्यांचा नसे … त्यांच्या शिकारीचा असे. दहा-बारा जणांचे टोळके घेरुन सावज लोळवत आणि त्याला जिवंत फाडायला सुरुवात करत. जीव जाईतो ते बिचारं कोकलायचं. आधी रानटि कुत्री डोळ्यांवरच हल्ला करत कि आंधळि शिकार हतबल होऊन खालीच बसकण मारायची आणि मग त्याच्या देहाचे लचके तोडून कुत्री पोट तट्ट होईपर्यंत खायची. पण हे सगळं स्वत:साठी नसायचं बरं, हि कुत्री मग एखाद्या उंचवट्या आड लपलेल्या गुहे समोर जायची व ते खाल्लेलं तिथे ओकायची कि दोन वीत  उंचीची नुकतीच मांस खायला लागलेली पिल्लं त्यावर तुटुन पडायची बघता बघता ते संपायचं आणि पिलांची पोटं टम्म झालेली असायची.


जंगल फार फार सुरेख होतं. वड, पिंपळ, जांभुळ,मोह, देवदार, अर्जुन, ऐन, साग, पळस, बाभळि, आंबा असे भरभक्कम वृक्ष होते. उन्हाळ्यात पळस आणि गुलमोहोर फुलला कि जंगलाचा तो भाग वणवा लागल्यागत दिसे. शाल्मलीच्या शेंड्यांवरुन पांढरट म्हातार्‍या भिरभिरत दूर कुठेतरी प्रवसाला निघायच्या. यावेळि ओढ्यांतलं पाणी आटायचं मग जंगलातल्या आतल्या भागात जिथे वर्षभर पुरेल इतकं पाणी साठलेलं असायचं त्या निसर्ग निर्मित पाणवठ्यांवर सगळ्यांची हजेरी लागायची. पण इथे रुबाब चालायचा तो मस्तवाल गव्यांचा. त्यांच्या येण्याजाण्याने जंगलात चारही दिशांना पायवाटा बनायच्या. पिलांना मध्ये ठेवुन १२-१५ जणांच वजनदार टोळकं शेपट्या उडवत निघालं कि वाघही आडवा येत नसे. मग तळ्याशी येऊन खालचे पांढरे पाय तितके पाण्यात बुडवुन ते मन भरेतो पाणी पीत. मात्र दोघे जण कान हलवत, ओली नाकं सगळ्या दिशांना वळवत दुसर्‍या  प्राण्यांची चाहुल घेत. मग बाकिचे मागे सरत व ते पुढे होऊन पाणी पित. समोरच्या  काठाला कधीतरी एक खुळचट रानडुक्कर उगीच ओली माती उकरत बसायचं.


त्या पाणवठ्याच्या काठी मग अनेकांची खुरे आणि पंजे उठत. उन्हाळ्यात अस्वलांच्या खुणा भरपुर. जांभळाच्या झाडावर चढून पोटभर गोड जांभळ खाल्ली कि आपसूक तहान लागायची, त्यातून उन्हाचा तडाखा वाढला कि अंगावरच्या काळ्या केसांनी अस्वलांची लाहि – लाहि होई मग अर्थात ते दिवस बुडताना पाण्याकडे वळत. कधी कधी जंगलाच्याही अंगवळणी नसलेली गोष्ट घडे, चक्क अस्वल आणि वाघ समोरा समोर येत. तहानेनी बेचैन झालेला वाघ झपाट्याने पाण्याकडे येताना अधु दृष्टि असलेल्या अस्वलाच्या नाकासमोर यायचा. अंह! अस्वलाला कमी समजु नका, बिचकलेलं अस्वल जीवघेणं ठरुही शकतं, दोहोंपैकि एकाने दिशा बदलली तर ठिक, नाहितर वाघाची तहान जिंकते कि अस्वलाचं वेडेपण ते परीस्थितीच ठरवे. अस्वलाला इथले आदिवासी खूप घाबरतात. हो आहेत कि इथे अनेक पिढ्या रहाणारे आदिवासी आहेत.


जंगलाचीच पोरं ती. पण त्यांच्यातही हैबत्या सोडल्यास बाकि कुणी आत खोल जंगलात एकटं जात नसे. हैबत्या मात्र सगळ्या जंगलाला ओळखत असे …. किंवा जंगल हैबत्याला ओळखत असावं. त्यावर वनदेवता प्रसन्न आहे असं त्याच्या पाड्यातल्या लोकांचा विश्वास होता. आवसेच्या रात्री सुध्दा हैबत्या बेधडक जंगलात जाई. आता आयुष्याची साठ – पासष्ठ वर्ष तिथे काढल्यावर त्यानं जंगल तळहातांवरच्य रेषांसारखं वाचलं नसतं तर नवल होतं. साठीचा म्हणून हिणवू नका, हैबत्या जंगलात शिरला कि काट्याकुट्यातून मनगटांसारख्या जाड वेलींच्या जंजाळातून वाट काढत तरातरा चालतो. तर हैबत्यावर वनदेवता प्रसन्न आहे …. यात थोडं खरही होतं आणि थोड खोटंही आणि अर्थात जंगालतल्या आतल्या पा्णवठ्या मधल्या जलपर्‍यांचे किस्से, माणसाला ओढणार्‍या अंधार्‍या दरीतल्या नरभक्षी वेलींचे किस्से हैबत्यानेच पाड्यावर हळूच सोडले होते. पण त्याने कोणाचे नुकसान झाले नाही. जंगलाच्या आतल्या भागात हैबत्या शिवाय मात्र कोणी जात नसे हे मात्र खरं.


हां एकदा फाकत्या मात्र हैबत्याशिवाय जंगलात गेला होता खरा. त्याला हैबत्याचा संशय होता. खरंखोट करायला एकदा कुणालाहि न सांगता तो जंगलात शक्य तितक्या आत अंधार्‍या दरीकडे शिरला होता. दोन दिवस तो परतला नाही. वाड्यातल्या एका शेंबड्या पोराने त्याला जंगलात जाताना बघितल्याचं सांगितलं तसं चार माणसं घेऊन हैबत्या आत शिरला. दोन दिवस शोधाशोध केल्यावर दरीच्या वाटेवरील एका ओढ्याकाठी फाकत्याच्या कंबरेचं नेसु फाटलेलं – रक्ताळलेलं मिळालं. बहुदा वाघाने ओढुन नेला असावा. हैबत्याने मान हलवली नक्किच कोजागीरीच्या आसपासचे दिवस होते. मिलनाला आसुसलेले वाघ यावेळि आक्रामक होतात. आसपास कोणी फिरकलेलं त्यांना आवडत नाही. नंतर मात्र हैबत्या वगळता कोणी जंगलात एकटा गेला नाही.


हैबत्याला वाघ बिबट्यांच्या बसण्याच्या जागाही अचूक माहित होत्या. तो तासनतास झाडावर चढून त्यांना बघत बसे. त्याला एक वाघिण पोटच्या लेकिप्रमाणे मनापासून आवडे, उन्हाची तीरीप तिच्या अंगावर पडली कि लव सोन्यासारखी लकाके. उन खात ती अनेकदा अंग चाटत ओढ्याच्या खालच्या अंगाला बसत असे. बहुदा तिलाही हैबत्याची सवय झाली असावी. हैबत्या आसपास असला तरी तीच दुर्लक्ष करी. फाकत्याच्या मृत्युची खबर लागली त्याच्या नंतरच्या महिन्यात हैबत्याला ती वाघिण परत दिसली. तीची चाल मंदावली होती, अंग जड झालेलं दिसत होतं. पुढच्या काही दिवसातच ती पिल्लं व्याणार हे हैबत्याने ओळखलं. दोन आठवड्यांनी हैबत्याला अंदाज आला, जंगलातल्या खूप आतल्या भागात ती निघून गेली असावी असा अंदाज लावुन तो तिच्या गुहेचा शोध करत पोहोचला. यावेळि मात्र हैबत्याची चाहुल लागताच तीने गुरगुरुन नापसंती दर्शवली. हैबत्यानेही त्रास दिला नाही. तीने बहुदा तीन किंवा चार पिलांना जन्म दिला होता. मासभर तीला त्रास द्यायचा नाही हे ठरवुन हैबत्या पाड्यावर परतला. 


महिना दिड महिना सगळं सुरळित चाललेलं होतं पण एके दिवशी आक्रित घडलं. जंगला बाहेर एक जीप थांबली. त्यातुन ४ माणसं खाली उतरली. ती जंगलातल्या आतल्या भागात चालू लागली. इथे जंगलाच्या दुसर्‍या टोकाला हैबत्या बेचैन झाला. का कुणास ठाउक पण गेले चार दिवस त्याला आतुन अस्वस्थ वाटत होतं.  त्याचं मन सारखं अंधार्‍या दरीच्या दिशेने धावू लागलं. अखेर सकाळच्या पहिल्या किरणा सोबतच तो लगबगीने आत जंगलात निघाला. घामाघुम होऊन तो गुहेजवळ पोहोचला तेव्हा सूर्य पिवळट झाला होता. बराचवेळ वाट बघून त्याला ना वाघिण दिसली ना पिलांची हालचाल. अखेर मनाचा हिय्या करुन तो दबकत गुहेत डोकावला, गुहा रिकामी होती. त्याला परत कधी ती वाघिणही दिसली नाही किंवा तिच्या पिलांचे काय झाले ते सुध्दा समजले नाही.


पण जंगलाला सगळं माहीत होतं. ती जंगलाला अनोळखी असलेली माणसं जंगलात शिरल्यावर दोन दिवसांनी,  सूर्य कलतीकडे झुकला असताना, दरीतून दोन बंदूकिचे बार काढल्याचे आवाज घुमले. नुकतेच घरट्याकडे परतू लागलेले बगळे, वेडे राघू आणि अजून काहि पक्षी कलकलाट करत पुन्हा दुर उडाले. थोड्याच वेळात सगळं पुन्हा शांत झालं. मात्र दूरवर हुप्पे जोरजोरात बराचवेळ ओरडत होते. त्या वाघिणीची शिकार झाली होती. आणि दोन दिवस वाट बघूनही आपली आई नेहमीप्रमाणे दूध पाजायला  का आली नाही हे न समजल्याने भुकेने हैराण झालेले तीनही बच्चे बिचकत बिचकत गुहे बाहेर निघाले…. ते  बिबट्या- तरसांच्या तोंडि पडले होते.


त्या जंगला पासून खूप खूप दूर एका कुठल्याश्या शहरातल्या एका “AC” हॉल मध्ये “SAVE TIGER” वरती तज्ञांचे भाषण सुरु होते. आणि त्याच वेळि जंगलाला अनोळखी असलेली ती चार माणसे बंदूका खांद्यावर टाकून परत जंगलात शिरत होती. जंगलाला माणसाची दृष्ट लागली होती.


-   - सौरभ वैशंपायन.


Monday, March 14, 2011

लाईन वहींसे शुरु होती है ......सचिन ....
.
.
.
.
.
हे नाव लिहिल्यानंतर वास्तविक पुढे काही लिहावं असं उरत नाही (नपेक्षा ते पुरत नाही), जसं "शिवाजी" या तीन अक्षरांनी गवताला देखिल भाले फुटतात आणि त्या तीन अक्षरात शास्ताखानाच्या बोटापासून ते अफझलखानाच्या पोटापर्यंत सगळ येतं तसच सचिन हा त्रयाक्षरी शब्द लिहिला कि ८९च्या कराची मॅचपासून ते सलग चार कसोटि शतकांपर्यंत आणि गेल्या वर्षीच्या SA विरुध्दच्या २००* पासून ते परवाच्या SA विरुध्दच्याच शतकापर्यंत सगळं येतं. सध्या सचिन शतकांचे शतक पूर्ण करण्याच्या उंबरठ्यावर आहे. आणि ज्या जोमाने सध्या तो खेळतो आहे ते बघता पुढल्या ३ मॅच मध्येच तो उंबरठा ओलांडेल असे म्हणायला हरकत नाही (अर्थात यात किमान सेमीफायनलपर्यंतचा प्रवास जमेस धरला आहे .... i hope सर धोनी त्यांची प्रयोगशाळा बंद करतील व पियुष चावलालाच खेळवण्याचा हट्ट किंवा जीवघेण्या क्षणी नेहरालाच शेवटची ओव्हर देण्याचा आचरट निर्णय पुन्हा घेणार नाही).

सचिनच्या शतकांचे शतक झाल्यावर सगळेच लिहितील पण त्या आधीच लिहिण्यात जास्त मजा आहे असं मला वाटतं. सचिन किती महान आहे हे सांगायला मला आकडेवारीत किंवा त्याच्या अफलातुन किश्श्यात जावेसे वाटत नाही. वरती अपेक्षा केल्याप्रमाणे कदाचित २ आठवड्यातच ते इतरत्र तुम्हांला वाचायला मिळतीलच. पण मला माझा वैयक्तीक किस्सा सांगावासा वाटतो - शाळेत असतानाची गोष्ट, वर्गात मित्र एकत्र येऊन जश्या टिम बनतात तशी अर्थात आमची टिम होती. एकदा तश्याच दुसर्‍या टिमशी खेळताना आम्हांला जिंकायला चार (किंवा पाच) बॉल मध्ये ३ रन्स हवे होते सहज शक्य देखिल होते मात्र शेवटची विकेट होती. ’सचिन’ नावाचा मित्र बॅटिंगसाठी उतरला त्याने २ बॉल बिना रन्सचे नुसते टोलावले आणि तिसर्‍या बॉलला आउट झाला, आम्हि मॅच हरलो, पण आमच्यातला एक जण त्यावर दात - ओठ खाऊन डाफरला - "अरे डुकरा, मॅच गेली XXXX XXX पण निदान नावाची तरी लाज राखायचीस!" थोडक्यात तेव्हा पासूनच सचिन हे नाव सुध्दा अदबीनं घेतलं जायचं.

सगळ्यांना सचिनचे वलय दिसते पण इथवर पोहोचण्यासाठी सचिनने जी मेहनत घेतली आहे लोकांनी त्याकडे बघावं. शिवाय काही गोष्टि "तिथून" ... म्हणजे वरुनच माणूस घेऊन येतो,  नाहितर क्रिकेट हा धर्म असलेल्या देशात गल्लोगल्ली गावस्कर आणि सचिन तयार झाले नसते का??? अनेक जण आले आणि गेले काहींचे नाव देखिल लक्षात राहु नये असेही होते. सध्या चेंज द गेमच्या नावाखाली, बॉलरच्या एखाद्या लूज बॉलवर, दंडाच्या जोरावर, संपूर्ण रामभरोसे बॅट वाट्टेल तशी फिरवुन हॅलिकॉप्टर शॉट, पल्लू स्कूप, सूपर स्कूप वगैरे मारणार्‍यांना सांगु इच्छितो  - असं नसतं रेऽऽऽ असं नसतं. कारण पन्नास मॅच मध्ये एकदा लागणार्‍या अश्या एका शॉटने गेम चेंज होत असता तर मग तेंडुलकर - गावस्करांनी काय गोट्या खेळल्या का??? जवळपास ऑफ स्टंपवर पडणारा चेंडु मागे फाईन लेगच्या बाउंड्रिकडे दुडुदुडु धावायला सुरुवात करतो तेव्हा ’सचिन’ हा ’सचिन’ का आहे ह्याचं उत्तर मिळतं. बरं त्यात फार मोठा शॉट मारलाय असं जाणवतहि नाही. गुडघा जमिनीला टेकवून साहेब जेव्हा स्वीप करतात तेव्हा मनगटाचा वापर हा द्रविड आणि सचिननेच करावा ह्यावर शिक्कामोर्तब होतं.

सचिन मॅच विनर नाही असं काही "तज्ञांच" म्हणणं असतं, त्यांनी आधी परवाच्या SA विरुध्दच्या किंवा इंग्लंड विरुध्दच्या मॅच विषयी बोलावं. सचिन जे मिळवतो ते इतर खेळाडू कसं मातीत कालवतात ह्याचं उत्तम उदाहरण आहे. परवा सचिन ज्या पध्दतीने खेळत होता ते बघून फेसबुकवरती मुकुल मस्करीत म्हणाला - "आजहि २०० बहुदा ... सारखं सारखं काय साउथ आफ्रिकाच??" पण हे वाचून पूर्ण होत नाही तोच सचिन आउट झाला. सचिनला दृष्ट लागली असं नाही म्हणणार कारण देवाला दृष्ट लागत नाही असं माझी आजी म्हणते, पण मुकुलला म्हणालो - "का बोललास असं .... आउट झाला ना??? ..... पण असू दे ... इतर घोड्यांनाही धावु दे कि, रोज रोज काय सचिन???" पण उरलेले ८ घोडे हे दादर चौपाटिवरच्या घोडागाडिलाही बांधायच्या लायकिचे खेळले नाहित. असो, शिळ्या [किंवा नासवलेल्या x-(  ] कढिला उत नको आणायला.

बाकि सचिन लयीत आला कि त्याची खेळण्यातली नजाकत बघण्यात जे सुख असतं ते शब्दातीत असतं. त्याच्या बॅटचं रुपांतर लखलखीत सुर्‍यात होतं आणि मग समोर असलेले बॉलर गरीब बिचारे बकरे होतात. रक्तहिन खाटिकखाना कसा असतो हे बघायचं असेल तर लयीत आलेल्या सचिनचा खेळ बघावा. एरवी शांत असणारा सचिन त्यावेळि चंगेजखानपेक्षाही क्रूर होऊन बॉलर्सची कत्तल करतो. गेल्याच वर्षी दक्षिण आफ्रिकेच्या विरुध्द २००* केले तेव्हा उद्या चिकन - मटणाच्या दुकानात ह्यांच हवाबंद पार्सल मिळणार कि काय अशी चिंता भारतीयांनाच वाटावी इतकं वाईट्ट खेळला होता सचिन. आपल्या स्पीनने भल्याभल्या बॅट्समना तिरकिट धाऽऽ करायला लावणार्‍या वॉर्नला बटन तुटलेल्या शर्टसारखा सचिनने शब्दश: खुंटिला "टांगला" होता. अ‍ॅलन डोनाल्ड, मॅकग्राथ ह्यांना तीन्हि स्टंप उघडे टाकून लॉन्ग ऑन किंवा डिप कव्हरमध्ये प्रेक्षकांत भिरकवण्याची ’जिगर’ तेंडल्या मध्येच आहे.

Form is temporary class is permanent हे सचिनने वारंवार सिध्द केलय, करत राहिल. सचिनने कधी निवृत्त व्हावे हे इतरांनी सांगु नये. मी नेहमी म्हणतो कि ८९ सालपासून आजवर नॉन-स्ट्रायकर एन्डवरचे सगळे बदलले पण सचिन अजून खेळतोच आहे त्यात काहीही खोटं नाहिये. आज शतकांचे शतक करायला १ शतक आणि ODI मध्ये शतकांचे अर्ध शतक करायला २ शतके बाकी आहेत ती होणं फारसे लांबही नाहिये मात्र सगळ्यांना आस आहे ती सचिन सकट वर्ल्डकप जिंकण्याची. आणि यासाठीच वरच्या देवाचा धावा करणारे या ग्राउंडवरच्या देवाला बीटवीन द विकेट "धाव" म्हणतील यात शंका नाही.

सचिन = क्रिकेट, हेच खरं. सचिन क्रिकेट जगतो. परवा देखिल जाणारी फोर अडवण्याकरीता तो ज्या डेडिकेशनने जीव खाऊन धावला ते पाहून, जणू ’चेंडु सीमापर नीट जातोय ना?’ हे बघायला त्याच्यामागे आरामात धावणारे नवे खेळाडु अजूनच खुजे वाटायला लागतात. सचिन सगळ्यांपेक्षा दशांगुळे वर उरतो तो असा.

सरते शेवटि मी क्रिकेट पितामह डब्ल्यू. जी. ग्रेस, सर डॉन ब्रॅडमन, लिटिल मास्टर गावस्कर, सर गॅरी सोबर्स, किंग व्हिविअन रीचर्ड्स या आणि अश्या अनेक दिग्गजांचा संपूर्ण मान राखून सांगु इच्छितो सचिन जेव्हा त्याचे शतकांचे शतक गाठेल तेव्हा त्याच्यासाठी अमिताभचा एकच डायलॉग त्याला लागु होईल - "लाईन वहींसे शुरु होती है ..... जहॉ पे हम खडे होते है।"


 - सौरभ वैशंपायन.

अनंत अमुची ध्येयासक्ती .....


शाळेत आंम्हाला कुसुमाग्रजांची "कोलंबसचे गर्वगीत" म्हणून एक कविता होती. त्यात खलाशी असलेला गर्वोन्मत्त कोलंबस "पदच्युत" आणि "पामर" असलेल्या समुद्राला कसा हिणवतो त्याचे रोमांचक वर्णन कुसुमाग्रजांनी केलय. ती कविता वाचल्यावर, त्यावेळचं बालमन सहाजिक आपणही समुद्रावर असंच राक्षसी लाटांशी झुंज घेत, नवं जग शोधावं अशी स्वप्न बघूही लागलं होतं. अनेकांना ही कविता तोंडपाठही असेल. पण परवा जपानमधल्या ८.९ रीश्टर स्केलच्या भूकंपाची व त्यामुळे आलेल्या त्सुनामीची बातमी आली आणि समुद्राला खिजवणार्‍या कवितेतल्या काही ओळी शब्दश: समुद्रानेच मानवावर उलटवल्या आहेत कि काय असं वाटायला लावणारी दृश्ये प्रत्यक्ष टिव्हीवरती बघायला मिळत होती -

"हजार जिव्हा तुझ्या गर्जु दे, प्रतिध्वनीने त्या समुद्रा, डळमळु दे तारे 
विराट वादळ हेलकावु दे, पर्वत पाण्याचे ढळु दे दिशाकोन सारे 

ताम्रसुरा प्राशुन मातु दे, दैत्य नभामधले, दडु द्या पाताळी सविता 
आणि तयांची अधिराणी ही दुभंग धरणीला, कराया पाजळु दे पलिता"त्यानंतर जपानमध्ये गेले ३ दिवस जे काही चालू आहे ते खरोखर एखाद्या ताम्रासुराचे थैमान आहे. भुकंप - त्सुनामी हि संकटं कमी होती कि काय, पण आधीच अणुबॉम्ब पडुन त्याचे दुष्परीणाम भोगलेल्या जपानला आता भुकंपामुळे  नुकसान झालेल्या त्यांच्याच एका अणूभट्टितून होणार्‍याकिरणोत्सर्जनाचा धोका निर्माण झालाय.


काडि काडि करुन जमवलेले हजारो संसार उध्वस्त झाले आहेत. माणूस किती क्षुल्लक असावा आणि विज्ञानाच्या सहाय्याने मानवाने ह्यॅव केले त्यॅव केले म्हणून कितीही पाठ थोपटून घेतली तरी निसर्ग विरुध्द मानव हा लढा शेवटपर्यंत अगदि अस्साच असमान रहाणार आहे ह्याची जाणीव परत एकदा झाली. त्या त्सुनामीच्या भोवर्‍यात एक अख्खं मालवाहू जहाज केसेन्नुमा शहराच्या मध्यभागी नांगरल्यागत उभं राहिलं आणि त्या गर्वगीतातील -

"पदच्युता, तव भीषण नर्तन असेच चालु दे, फुटु दे नभ माथ्यावरती
आणि तुटु दे अखंड उल्का वर्षावत अग्नी, नाविका ना कुठली भीती
"

 या कडव्यांवरतीच एक प्रश्नचिन्ह उभं राहिलं. 
जपानला उगवत्या सूर्याचा देश म्हणतात, जात्याच उद्यमशील असलेल्या स्वभावामुळे तो फिनिक्स पक्ष्याप्रमाणे परत झेप घेईलही, पण एका क्षणात काहि हजार जीव  - "कोट्यवधी जगतात जीवाणू, जगती अन् मरती जशी ती गवताची पाती" या ओळिंसारखे संपले त्याचं काय??? तरी कदाचित त्यांच्याकडे वारंवार भूकंप होतात म्हणुन बांधलेली बहुतांशी घरे लाकडि असतात. मोठ्या इमारती भूकंपाचे तीव्र झटके सहन करु शकतील अश्या असतात. सध्या मी "एका दिशेचा शोध" हे पुस्तक वाचतोय, त्यात श्री संदिप वासलेकर म्हणतात ते खरे आहे - "एखाद्या मोठ्या भूकंपात किती लोकं मरतात हे त्या देशात राज्यकारभार व प्रशासन कसे चालते आणि लोकांची सामाजिक मुल्ये काय आहेत यावर जास्त अवलंबुन आहे. ज्या देशात राजकिय पुढारी व शासकिय अधिकारी गैरमार्गाने इमारत बांधण्यास परवानगी देतात, बांधकाम करणारे नफा कमावण्यासाठी कमी दर्जाचा माल वापरतात, सामानात भेसळ करतात अश्या देशात भूकंप झाल्यास हजारो नव्हे तर लाखो लोक मरतील" . जपानच्या नुकसानातुन आपण याही दृष्टिने धडा घ्यायला हवा असं मला वाटतं.


सध्यातरी प्रश्नांशिवाय काहिच नाहीये. गेल्याच दशकांत त्सुनामीचा एक तडाखा आपल्यालाही बसला होता. त्यातुन मोडलेले संसार परत उभे राहीले, काही अजून रहात आहेत. पुढे जाण्याचं नावच आयुष्य आहे. मरणात जग जगतं हे खोटं नाही. म्हणूनच कुसुमाग्रजांसारख्या शब्दप्रभूला मानवी जीवनाची क्षणभंगुरता माहीत असताना देखिल कोलंबसच्या तोंडुन समुद्राला हिणवण्याची इच्छा झाली असावी. -
"अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अन्‌ आशा, किनारा तुला पामराला!"
पण या कवितेबरोबर मला कुसुमाग्रजांचीच "कणा" कविता देखिल आठवते आहे विशेषत: दुर्दम्य मानवी स्वभाव दाखवणार्‍या त्याच्या शेवटच्या २ ओळी - 

"मोडुन पडला संसार तरी मोडला नाही कणा,
पाठीवरती हात ठेवुन फक्त "लढ" म्हणा!"


 - सौरभ वैशंपायन.

Thursday, March 10, 2011

"तू"

भरतीच्या दर्याच्या गाजेसारखी, तू
पायीचे पैंजण-घुंगरु वाजे तशी, तू
लाजाळू बुझताना लाजे तशी, तू
वेलीवरती इवले फुल साजे तशी, तू

श्रावणाचा रंगलुब्ध इंद्रधनू, तू
पावसात चिंब स्तब्ध गौरतनु, तू
निळ्याशार डोहातले प्रतिबिंब, तू
निळ्यागर्द नभामधले चंद्रबिंब, तू

 - सौरभ वैशंपायन