Thursday, December 7, 2017

मुक्ती

फ्रान्झ लिस्त्झ या प्रसिद्ध पियानो वादकाचे छान उद्गार आहेत - "sorrowful & great is the artist's destiny!" म्हणजे "दुःखी आणि महान असणं हेच कलाकाराचे प्राक्तन असते". जगातल्या बहुतेक सर्व मोठ्या कलाकृती या दुःखातून तयार झालेल्या आहेत अथवा त्यांचा विषय शोकांतिका हाच आहे. पण तरीही एखाद्या कलाकृतीचा जन्म कसा होतो हे कुणीच सांगू शकत नाही. मग ती लहान असो वा महान असो. कलाकृती म्हणजे गणित नाही की दरवेळी २+२=४ हेच उत्तर येईल. उलट प्रत्येक कलाकृती ही दरवेळी वेगळी असते, नवीन असते. मग तो गायलेला सूर असू दे अथवा एखादे चित्र. जसं वाहत्या पाण्यात उभं राहिल्यावर परत त्याच पाण्याला स्पर्श करता येत येत नाही तसेच तो कलाकार "तीच" कलाकृती परत कधीच निर्माण करू शकत नाही. रियाझाने, सरावाने तो कदाचित "तशीच" कलाकृती  बनवू शकेल पण "तीच" नाही. कुठलीही कलाकृती एकदाच जन्म घेते सूर असो, शब्द असो किंवा चित्र असो. एखाद्या चित्रातला ब्रशचा अमुक एखादा फटकारा किंवा रेष फारच सुरेख आली आहे असं म्हणता येत नाही. चित्र हे पूर्ण  बघावे लागते. सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणजे समोर उभे राहिलेले चित्र असते. 

माझ्या ओळखीची लोकं अनेकदा मला विचारतात हे सगळं लिहायला तुला कसं सुचतं? पण माझ्याकडे याचं उत्तर नसतं आणि माझ्या माहितीप्रमाणे जगात काही अनुत्तरीत प्रश्न आहेत त्यापैकी हा एक प्रश्न. मुळात ती कला कलाकार निर्माण करतो कि कुठल्यातरी एका अनाम क्षणी एखादी अनाम शक्ती ती कलाकृती घडवून आणते? हा देखील शतकानुशतके वादाचा मुद्दा राहिला आहे. अनेकदा वर्षानुवर्षे अथक काम केल्यावर देखील जे मनात आहे ते कलेच्या रूपाने प्रकट होत नाही. तेच कधीतरी एखाद्या क्षणी नकळत घडून जातं. महिनोनमहिने आसपास देखील न फिरकणारे शब्द अचानक वादळ आल्यागत चहूबाजूंनी वेढतात. किती लिहू आणि किती नको असं होऊन जातं. अनेकदा आपण हे का लिहितोय हेच माहीत नसतं. फार आतून आतून वेडीवाकडी वळणं घेत धुराच्या वलयांसारखं तरंगत आलेलं काहीतरी कागदावर उतरवायची घाई झालेली असते. लिहून झाल्यावर ते आपण स्वतः तरी परत कधी वाचणार आहोत का हे देखील माहीत नसतं. त्याक्षणी फक्त लिहायची अनिवार इच्छा असते. काहींच्या नशिबी जिवंत असताना त्या कलाकृतीचं कौतुक किंवा यश पाहणं देखील नसतं. जगात अशा अनेक महान कलाकृती होऊन गेल्या आहेत. त्या महान कलाकृतींमधील शब्द देखील "अजरामर" बनतात, एखाद्या वज्रलेपासारखे. शतकानुशतके लोकं ते शब्द पुनः  पुनः उच्चारात राहातात. त्याक्षणी तो कलाकार आणि ती कला पुन्हा जिवंत होते - नवी होते.

सुरांचं मात्र तसं नसतं सूर निराकार असतात, ते दाखवता येत नाहीत ते फक्त अनुभवता येतात. सूर हा अनुभवाचा भाग झाला. सुरावरती बोट ठेवून "हा" सूर सुरेख झाला असं नाही सांगता येत. काही महान लोकांकडे सूर बघण्याची देखील ताकद असते, गाता गाता जो सूर लावलाय तो समोर साकार होऊन उभा राहिलेला असतो पण तो सूर ते दुसऱ्यांना नाही दाखवू शकत कारण सूर बघण्याची ती शक्ती इतरांत नसते, एक विचित्र तगमग होते, अशावेळी स्वतःच "सुभान अल्लाह!! क्या सूर है?" म्हणून संजीवन समाधी घेतल्यागत ऐन रंगात आलेली मैफिल थांबवून त्या कलाकाराच्या मनात त्याच्या एकट्याची मैफल सुरु होते. तो खरा मुक्तीचा क्षण असतो.

असा मुक्तीचा क्षण कधी ना कधी येतोच. त्यावेळी अंगातला "मी" पणाचा अंगरखा किनाऱ्यावर सोडून त्या क्षणात डुबकी मारता यायला हवी! बस!

  - सौरभ वैशंपायन