Tuesday, September 29, 2015

The storm on the sea of Galilee



Rembrandt ह्या डच चित्रकाराने १६३३ मध्ये काढलेले हे चित्र - "The storm on the sea of Galilee." भर समुद्रात आलेले वादळ येशुने शांत केले व लोकांचा जीव वाचवला अश्या कथेवर आधारित हे चित्र होते. १९९० मध्ये अमेरीकेतील एका संग्रहालयातुन हे व अशी अजुन १०-१२ चित्र चोरी झाली ती आजतागयत मिळाली नाहीये. आजवरची सर्वात मोठी चोरी आहे म्हणे ही.
असो, त्या चित्राला बघुन एक कविता सुचली -
===============
तटतटून फुगले शिड,
नेई गलबत हाकारुन,
भणाण वाऱ्यासंगे त्वरेने
आले जलद भरुन

आले जलद भरुन,
दश दिशा अंधारुन
उठु लागती पर्वतप्राय
लाटा चोहीकडुन

लाटा चोहीकडुन,
उसळती,
लाटा चोहीकडुन
बुडविन नौका
म्हणतो सागर
एका इरेस पडुन

सागर इकडे
सागर तिकडे
खाली सागर
सागर वरती
घेरुन टाकी
उधाण भरती
दूरवरी ना
दिसते धरती

पुन्हा न दिसणे
अंगण - घर ते
क्षणा क्षणाला
आशा विरते
मृत्यु समोरी
जीवन हरते
आणि अचानक
कुणास स्मरते -

नौकेत अपुल्या
एक विभूति
लाडकी अपुली
म्हणे प्रभू ती
उडवुन खिल्ली
ज्यास नाडती
त्राहि म्हणूनी
हात जोडती

ऊभा राहीला
हासत हासत
अभय वचने
बोले प्रेषित
सोडुन द्या रे
दृष्टि दूषित
उजळुनी टाका
मने कलुषित

जन्म मृत्युचे
चक्र अटळ जरी
रात्री नंतर
येई दिवस तरी
मनी धरा रे
दृढ विश्वासा
येवोत संकटे
किती तुम्हांवरी

स्मरा पित्यासी
हाका गलबत
दुर किनारा
मिळेल अलबत
निधडी छाती
करी करामत
उधळुनी द्या हे
वादळ खलबत

ऊभा निश्चयी
दावित वाटा
जाइ गलबत
फोडुनी लाटा
शमले वादळ
बघता बघता
नियतीचाही अन्
झुकला काटा

- सौरभ वैशंपायन