Tuesday, September 29, 2015

The storm on the sea of GalileeRembrandt ह्या डच चित्रकाराने १६३३ मध्ये काढलेले हे चित्र - "The storm on the sea of Galilee." भर समुद्रात आलेले वादळ येशुने शांत केले व लोकांचा जीव वाचवला अश्या कथेवर आधारित हे चित्र होते. १९९० मध्ये अमेरीकेतील एका संग्रहालयातुन हे व अशी अजुन १०-१२ चित्र चोरी झाली ती आजतागयत मिळाली नाहीये. आजवरची सर्वात मोठी चोरी आहे म्हणे ही.
असो, त्या चित्राला बघुन एक कविता सुचली -
===============
तटतटून फुगले शिड,
नेई गलबत हाकारुन,
भणाण वाऱ्यासंगे त्वरेने
आले जलद भरुन

आले जलद भरुन,
दश दिशा अंधारुन
उठु लागती पर्वतप्राय
लाटा चोहीकडुन

लाटा चोहीकडुन,
उसळती,
लाटा चोहीकडुन
बुडविन नौका
म्हणतो सागर
एका इरेस पडुन

सागर इकडे
सागर तिकडे
खाली सागर
सागर वरती
घेरुन टाकी
उधाण भरती
दूरवरी ना
दिसते धरती

पुन्हा न दिसणे
अंगण - घर ते
क्षणा क्षणाला
आशा विरते
मृत्यु समोरी
जीवन हरते
आणि अचानक
कुणास स्मरते -

नौकेत अपुल्या
एक विभूति
लाडकी अपुली
म्हणे प्रभू ती
उडवुन खिल्ली
ज्यास नाडती
त्राहि म्हणूनी
हात जोडती

ऊभा राहीला
हासत हासत
अभय वचने
बोले प्रेषित
सोडुन द्या रे
दृष्टि दूषित
उजळुनी टाका
मने कलुषित

जन्म मृत्युचे
चक्र अटळ जरी
रात्री नंतर
येई दिवस तरी
मनी धरा रे
दृढ विश्वासा
येवोत संकटे
किती तुम्हांवरी

स्मरा पित्यासी
हाका गलबत
दुर किनारा
मिळेल अलबत
निधडी छाती
करी करामत
उधळुनी द्या हे
वादळ खलबत

ऊभा निश्चयी
दावित वाटा
जाइ गलबत
फोडुनी लाटा
शमले वादळ
बघता बघता
नियतीचाही अन्
झुकला काटा

- सौरभ वैशंपायन

Thursday, June 4, 2015

मास्तर - KEYवसंत वसंत लिमये, ऐकायलाच हटके असलेलं नाव. जसं नाव तसा माणूसही एकदम हटके. जवळच्या माणसांसाठी "बाळ्या", नवख्यांसाठी "सर" आणि ह्या दोहोंच्या मधल्यांसाठी "मास्तर." माणूस दिलखुलास. एखादी गोष्ट मनात आली की घोळ घालत न बसता काम करुन मोकळा होणारा. माझ्या आठवणीप्रमाणे माझे ट्रेकवरचे २ लेख वाचून खुली दाद द्यायला म्हणून आपणहून मास्तरांनी मला फोन केला होता तिथे आमची औपचारीक ओळख झाली. गिर्यारोहण क्षेत्रात वावरणार्‍या लोकांसाठी "वसंत वसंत लिमये" हे नाव किती मोठं आहे हे वेगळं सांगायला नको, त्यांचा आपणहून आलेला फोन ही माझ्यासाठी अर्थात मोठी गोष्ट होती. ४ वर्षांपूर्वी तो फोन त्यांनी का केला होता? हे मला आत्ता २-३ दिवसांपूर्वी समजलं जेव्हा त्यांच नवं पुस्तक "कॅम्प फायर" हातात पडलं. ट्रेकिंगच्या सुरस रम्य कथा हा आम्हांला त्यावेळी जोडणारा धागा होता. वास्तविक "कॅम्प फायर" हे त्यांचे पहिले पुस्तक नाही, आधीही अनेक ठिकाणी स्तंभलेखन, लघुकथा लेखन, "धुंद-स्वच्छंद" हे पुस्तक आणि आंतरराष्ट्रीय संदर्भ असणारी अत्यंत वेगवान कथानकाची "लॉक ग्रिफिन" हि कादंबरी त्यांच्या लेखणीतून उतरली आहे. पण ह्या नव्या पुस्तकाची - बात ही कुछ और है।

मला स्वत:ला "Story teller" व्हायची इच्छा आहे. आपण घेतलेला अनुभव किंवा सुचलेली कल्पना सांगताना समोरच्या माणसांनी खुर्चीची टेकली पाठ सोडून उत्सुकतेनं पुढे झुकून बसायला हवं हे माझं स्वप्न आहे. मास्तरांशी माझी ओळख वाढत जाण्यामागचं हे एक कारण. मास्तर स्वत: एक उत्तम  "Story teller" आहे हे मी स्वानुभवावरुन सांगतो. कॅम्प फायरची पानं पलटताना देखिल ह्याचा अनुभव येत रहातो. मुळात निलेश जाधव यांनी तयार केलेलं पुस्तकाचं मुखपृष्ठंच झकास उतरलंय. त्यातल्या डोंगराच्या चित्राचा हाताला जाणवणारा खरखरीतपणाच उत्सुकता चाळवणारा आहे. आतली प्रत्येक लेखांना अनुरुप काढलेली रेखाचित्रे सुद्धा अत्यंत सुरेख झाली आहेत.

हे पुस्तक म्हणजे वसंत लिमयेंनी स्वत: ८० आणि ९० च्या दशकांत वेगवेगळ्या मासिकांत, वृत्तपत्रात त्यांच्या डोळस भटकंतीच्या अनुभवांवरती जे स्तंभलेखन केले त्याचं संकलन आहे. वास्तविक माझं अर्धं पुस्तक वाचून झाल्यावरच पुस्तकावरती लिहायचा मोह अनावर झाला होता, पण त्यावर ताबा ठेवून आधी पुस्तक पूर्ण केलं आणि आत्ता लिहायला बसलो.  प्रत्येक लेख अनुभवांचा खजिना आहे. वाचता वाचता आपण मास्तरांबरोबर तिथे त्या जागी जाऊन पोहोचतो. पुस्तकाचं नावंच इतकं मस्त ठेवलंय - "कॅम्प फायर" ..... ट्रेक अथवा भटकंतीच्या रात्री शेकोटीभोवती जागवत ट्रेकच्या, प्राणी-पक्षांच्या, जंगलाच्या, इतिहासाच्या, माणसांच्या आणि अगदी भूताखेतांच्या अश्या जगभरच्या गप्पा मारण्याची मजा काय असते ती ट्रेकर्सना विचारा. तो अनुभव घेतला नसेल तर स्वत: घ्या .... आणि कुठल्याही कारणाने ते पण झेपणारं नसेल त्यांनी निदान हे पुस्तक वाचा. या पुस्तकाची तुलना मी "सिंहासन बत्तीशी" बरोबर करेन. जशी दर रात्री सिंहासनावरची एक एक पुतळी जिवंत होऊन विक्रमादित्याची गोष्ट सांगते तसंच पुस्तकाची दिड - दोन पानं जिवंत होतात आपल्याला गोष्ट सांगतात. मास्तर सुरुवातीचे २-३ परीच्छेदच अशी वातावरण निर्मिती करतात कि ते सगळं समोर घडायला लागतं. डोंगर दर्‍यातुन फिरला असाल, गिर्यारोहणातील चार तांत्रिक बाबी माहीत असतील तर ह्या "कथाकथनाची" मजा अजूनच वाढते.

अडीच - तीन हजार फुटी कोकणकड्याला सर करणारा हा माणूस कोकणकडा संबधीत चार लेखात त्यांच्या सगळ्या ग्रुपची सगळी उरफोडी धडपड मांडतो ती वाचूनच थकायला होतं. इतका वेडेपणा करायची काय गरज? हा प्रश्नही काहींना पडेल आणि त्याची उत्तर पुस्तकाच्या इतर लेखात निश्चित सापडतील. सह्याद्रि अथवा हिमालयातील माहीती देणारं हे पुस्तक नव्हे. गिर्यारोहणातील तांत्रिक बाबींचा खल करणारं देखिल नव्हे पण हे त्यांच्या काही दशकांतील अनुभवांचे गाठोडे आहे. हे पुस्तक वाचून ट्रेकिंग मधलं सगळ सगळं समजेल असंही नाही कारण व्यक्तीपरत्वे अनुभव बदलतात व ते अनुभव स्वत: घेणं हाच सर्वोत्तम मार्ग. पण निदान कसं वागावं? हे नक्कीच समजेल. हे बरे - वाईट अनुभव रक्त आटवूनच मिळतात.

हे पुस्तक म्हणजे पांढर्‍यावरती काहीतरी काळं आत्मस्तुतीपर लेखन नव्हे. बहुतांशी वेळा लिहिताना मास्तरांनी "आम्ही सगळे" हा  ट्रेकिंगचा नियम लिखाणात प्रत्यक्ष - अप्रत्यक्षपणे पाळलाय. १९८२ - ८३ साली स्कॉटलंडला जाऊन त्यांनी आऊट डोअर एज्युकेशमध्ये टिचर्स डिप्लोमा पूर्ण केला. सह्याद्रि - हिमालय आणि युरोपातल्या भटकंतीचा प्रचंड अनुभव ह्या व्यक्तीने घेतलाय. आज ह्या माणसाचा शब्द गिर्यारोहण क्षेत्रात फार लक्षपूर्वक ऐकला जातो. चुकणार्‍यांचा हक्काने कान पकडावा इतका अधिकार आज निश्चित त्यांच्याकडे आहे. लिमयेंचे लिखाण अथवा कार्यक्रमांमधले भाषण अथवा अनुभवकथन हे केवळ शब्दांचे मनोरे नसतात. गिर्यारोहण क्षेत्रात एक जबरदस्त गोष्ट म्हणजे समजा तुम्ही अथवा तुमच्या चमुने आजवरती अस्पर्शित शिखर सर केले तर त्याला नाव द्यायचा मान त्या व्यक्ती अथवा चमूला मिळतो. नाव देताना काही अलिखित बाबी सांभाळाव्या लागतात जसे - ते नाव आजुबाजूच्या परीसराला साजेसे असावे, त्याने त्या शिखराचे वैशिष्ट लक्षात यावे. एव्हरेस्ट सर करण्याआधी शेर्पा तेनसिंग व एडमंड हिलेरी यांनी सरावासाठी हिमालयातील बद्रिनाथ परीसरातील एक शिखर सर करायचा प्रयत्न केला होता, त्यात त्यांना काही कारणाने अपयश आले होते. पुढे एका चमूने तो सर केला, त्या चमुचे ग्रुप लिडर होते वसंत वसंत लिमये - त्या शिखराला नाव दिले - "एकदंत" आता बद्रिनाथ परीसरात ३ शिखरे झाली - निलकंठ, पार्वती व त्या दोहोंमध्ये तुटलेल्या दातासारखा दिसणारा "एकदंत". ह्या शिवाय कुमॉंऊ भागात त्रिधार, खड्गधुरा आणि उत्तरधुरा अशी अजुनही तीन अस्पर्शित शिखरांना नाव देण्याचा मान लिमये व त्यांच्या चमूला मिळालाय. गिर्यारोहण क्षेत्रात वावरणार्‍यांना ज्यांच्या अंगाखांद्यावरती आपण खेळलो त्यांचेच बारसे करण्याचा हा मान नक्की काय असतो हे समजेल. आयुष्यात ४ वेळा ही संधी मिळणं हा केवळ नशिबाचा भाग नव्हे. त्यासाठी स्वत:ला त्या हजारो फुटी दोरांवरती झोकून द्यावं लागतं. कभिन्न कातळाला भिडावं लागतं. कंबरभर बर्फात खसर-फसर करत पाय ओढावे लागतात. तेव्हा हे मोठेपण येतं. अनेकदा कल्पनेबाहेरची किंमत चुकवावी लागते. स्वत:च्या जीवाशी खेळावं लागतं. दुर्दैवाने आपले साथीदार गमवावे लागतात. हे सगळं केल्यानंतर मागे उरतो तो "अवलिया" बनतो. त्यासाठी वेगळे प्रयत्न करावे नाही लागत. निसर्ग कधी कुरवाळून तर कधी धपाटे घालून तुम्हांला शहाणं बनवतो. ह्या प्रवासात इतर अवलियेही भेटतात. मग यात्रेत चार क्षणांकरता भेटलेले फकिर गप्पा मारता मारता कसे चिलीम फिरवतात? तशीच जगण्याचीही मैफिल सजते. मास्तरांच्या आयुष्यात आलेले असे काही अवलियेही त्यांनी आवर्जून नमुद केले आहेत.


मी पूर्ण लेखात वसंत लिमयेंचा उल्लेख अनेकदा "मास्तर" असा मुद्दामहुनच केलाय कारण खरंच हा माणूस "मास्तर" आहे - सह्याद्रीच्या  "blackboard" किंवा हिमालयाच्या "whiteboard" वरती शिकवणारा "मास्तर". त्या अनुभवांची एक "मास्तर - key" देखील आहे त्यांच्याकडे. त्याच मास्तर-key ने भटकंतीची दारं उघडायची असतील हे पुस्तक आवर्जून वाचायलाच हवं ..... चुकलं .... मास्तरांच्या समोरील त्या शेकोटीभोवती बसायला हवं ..... पानं पलटता पलटता "कॅम्प फायरची" मजा घ्यायलाच हवी.

  - सौरभ वैशंपायन


Saturday, March 28, 2015

जयाची लिला वर्णिती लोक तीन्ही


श्रीराम - श्रीकृष्ण ह्या लोकोत्तर महापुरुषांच्या कार्यावरती अतुलनिय महाकाव्ये लिहिली गेली. ह्या दोघांनी आपले एकंदरच आयुष्य किती व्यापुन टाकले आहे ह्याचा विचार करताना मजा वाटू लागते. रोजच्या लहान सहान गोष्टी घ्या. कुणा भावंडामध्ये प्रेम दिसलं की - "बघा राम-लक्ष्मणांसारखी जोडी आहे" असे आपण म्हणतो. लहान मुलांच्या लीला ह्या "कृष्णासारख्या" असतात. आज्ञाधारी मुलगा हा "रामासारखा" असतो तर सतत मुलींच्या गराड्यात असलेला "कान्हा" असतो. उदाहरणे सुद्धा आपली जागा बदलत नाहीत. एक मर्यादा पुरुषोत्तम दुसरा अमर्याद पुरुषोत्तम. दोन व्यक्ती दोन टोके. ह्यांना आपल्या आयुष्यातून वजा केले तर? संस्कृती समजवणारी २ महाकाव्ये, अनेक कथा, हजारो काव्ये, हजारो गाणी, हजारो चित्रे निघून जातील. जगण्यातून "राम" निघून जाईल. माझ्या मते श्रीराम हा आत्म्याप्रमाणे आहे तर श्रीकृष्ण मना सारखा आहे. आत्म्याला जन्मभर शरीराची मर्यादा सांभाळावी लागते मन मात्र अमर्याद संचार करु शकतं. शरीरातुन आत्मा गेला कि देह निष्प्राण होतो अशी समजुत आहे .... आयुष्यात अथवा एखाद्या गोष्टीत राम राहिला नाही असेच आपण म्हणतो. तेच मनाबाबत म्हणाल तर मन आपल्या ताब्यात नसून आपण मनाच्या ताब्यात असतो हे कुणालाही मान्य होईल.पण आपली गोची अशी आहे की स्वत:वर मर्यादा आलेल्या चालत नाही आणि अमर्याद वागणं आपल्याला झेपत नाही.

याक्षणी मी मुद्दामहुन रामावरती लिहायला बसलोय. म्हणजे हा विषय अनेक दिवस डोक्यात होताच, व्हॉट्सअ‍ॅपच्या एका ग्रुपवरती राम - सीता - अग्निदिव्य वगैरे अगदि जुजबी चर्चा झाली त्याने परत ह्या विषयाने डोक्यात बागडायला सुरुवात केली. आधी अनेक वर्ष मलाही ह्याबाबत काही कळत नव्हतं. राम आपोआप IPC खाली आरोपीच्या पिंजर्‍यात ऊभा केला जात असे. पण मग हळुहळू काही गोष्टी नव्याने वाचनात येऊ लागल्या काही गोष्टी आपणहुन उलगडल्या जाऊ लागल्या. २०१४-२०१५ मध्ये राहुन आपण काही शे अथवा काही हजारवर्षांपूर्वीची समाजव्यवस्था व समाजमान्यता काय होती हे समजून घ्यायला हवे. आपण उलटे करतो त्यांना समजून घेण्या ऐवजी आपली मते आपण आदर्शांवरती लादतो. मात्र आपण २०१५ चे भारतीय संविधान त्या काळाला लागु करुन चालणार नाही ह्याची जाणीव होत गेली तशी विचारांना वेगळी दिशा वेगळी वाट मिळाली.

श्रीराम अथवा श्रीकृष्ण ह्यांना आपण आधीच देवत्व देऊन त्यांच्या प्रत्येक कृतीला गुदमरवून टाकतो. यांनी केली ती दैवी योजना होती म्हणून विचार चिरडून टाकले जातात. पण त्यांना माणसात आणले तर त्यांनी "माणूस" म्हणून केलेले कार्य अवाढव्य आहे ह्याची जाणीव होऊन मग ही माणसे  Larger than life बनतात. रामाबाबत विचार करतोय तेव्हा सगळे काव्य फुलोरे आपण बाजूला ठेवू. अमानवीय गोष्टी, चमत्कारांची जळमटे दूर करु. तसेच आधीच रामाला आरोपिच्या पिंजर्‍यात न ढकलता रामायणकालीन व त्याबरोबर अगदि अलीकडच्या काळाचाही विचार करुन बघायचा हा प्रयत्न आहे. लोकांना माझी मते पटतीलच असेही नाही व ती पटवून घ्यावीतच असाही हट्ट नाही.

मुळातच रामायण अथवा रामाचे आयुष्य हे "मर्यादा" सांभाळण्यात गेले आहे. समाजमानस व राम दोन्ही चौकटी मोडणारे नाहीयेत हे लक्षात घ्यावे लागेल. यद्यपी शुद्धम् लोक विरुद्ध नाकरणीय़म्‌ नाचरणीयम्‌ ..... चांगली गोष्ट असली तरी बदल नको. आहेत ते नियम काटेकोरपणे पाळू, उगीच प्रवाहा विरुद्द जाणारा रामही श्रीकृष्णाप्रमाणे क्रांतिकारी वगैरे नाही आणि जनता त्याहुन नाही. "जैसे थे" परीस्थिती मान्य करणारे समाजमानस रामायणात सतत डोकावते. मला याक्षणी कुठले कांड व त्यातील नेमका श्लोक आठवत नाही मात्र रामाच्या एका पूर्वजाला काही नियम मोडले म्हणून राज्यत्याग करावा लागल्याचा उल्लेख वाचल्याचे स्मरते. रामाची निवड देखिल सभा भरवुन दशरथाचे मोठे लांबलचक भाषण होऊन मग झालेली आहे. मी म्हातारा झाल्याने मला राज्य चालवणे आता जमत नाही असा सूर लावून ज्याला "जाणीव" अथवा ताकद नाही तो राज्य चालवण्यास उपयुक्त नाही वगैरे वगैरे बरेच काही सांगुन दशरथ रामाचे व त्याच्या गुणांचे कौतुक करुन राम हे राज्य चालवायला माझ्या दृष्टिने योग्य आहे असेही मत मांडतो. मात्र पुढे तो जनतेला विचारतो कि "तुम्हांला हे मान्य आहे का? राम तुम्हांला राजा म्हणून चालेल का? अजुन कोणाचे/मध्यस्थांचे काही विरोधी विचार असतील तरी त्यांनी नि:शंक मनाने मांडावे त्यातुन भलेच होऊ शकेल!" -


यदीदम् मेऽनुरूपार्धं मया साधु सुमन्त्रितम् |
भवन्तो मेऽनुमन्यन्तां कथं वा करवाण्यहम् ॥१५॥
यद्यप्येषा मम प्रीतिर्हितमन्यद्विचिन्त्यताम् |
अन्या मद्यस्थचिन्ता हि विमर्दाभ्यधिकोदया ॥१६॥ (अयोध्या कांड सर्ग २)

हे ऐकल्यावर सर्व जनता खुष झाली सर्वजण रामाचा जयजयकार करु लागले. त्यावर दशरथ गंमतीने म्हणतो - "अरे हे काय? रामाला राजा म्हणून तुमची मान्यता मिळताच मी तुम्हांला अप्रिय झालो बहुदा!" थोडक्यात राजा आहोत म्हणून वाट्टेल तसा राज्यशकट हाकला जात नसे. राजा हा जनतेच्या मान्यतेवरती निवडला जात असे हेच यातून दिसते.

ही रामाला "राजा" म्हणून मान्यता मिळताना "आनंदाची" घटना ह्या करीता आधीच सांगितली कारण साधारण समाजमन व राजाची मानसिकता कुठे झुकली होती हे समजेल. राम वनवासाला निघेपर्यंत व्यक्ती अथवा लोकांच्या समुहाची आनंद अथवा दु:खाची वर्णने ही एका चौकटीबाहेर गेल्याची उदाहरणे मिळत नाहीत. रामायण हे काव्य एकंदरच पुलंच्या कथाकथना मधील त्या पिंजर्‍यातील पोपटाप्रमाणे मीरची खात खात "अहिंसा - सत्य - अस्तेय"  हेच परत परत म्हणणारे आढळते. वाली देखिल मरताना फिल्म मधल्या शेवटचे श्वास मोजणार्‍या भारत उर्फ मनोज कुमार सारखा बडबड बडबड करत - रामाशी "शास्त्रार्थाची" चर्चा करत करत शेवटी स्वत:ची चूक मान्य करुन मरतो.

यानंतर मुख्य प्रसंग म्हणजे सीतेचे अग्निदिव्य व पुढे अयोध्येत पोहोचल्यावर सीतेचा त्याग. रामायण वाचताना रामाच्या प्रतिमेला पहिला धक्का तेव्हा बसतो जेव्हा रावणवध झाल्यावरती बिभीषण सीतेला सन्मानपूर्वक रामासमोर आणतो तेव्हा पूर्ण रामायणात एकदाच रामाचा तोल सुटलेला दिसतो. सीता समोर आल्यावरती चारचौघात तो तिला अद्वातद्वा बोलतो. मी तुला मुक्त केले आहे सर्व दिशा तुला मोकळ्या आहेत तुला हवे तिथे तू जाऊ शकतेस. तुला इथे उपस्थित असलेला किंवा नसलेला दुसरा कुणी पुरुष आवडला तर तू त्याच्या बरोबर उरलेले आयुष्य व्यतीत करु शकतेस. मी तुझ्या स्वीकार करु शकत नाही. रावणाने तुझ्यावरती कशावरुन जबरदस्ती केली नसेल? वगैरे वगैरे बरेच काही आणि २-३ तुरळक ठिकाणी तर असंबद्ध बोलताना आढळतो. हा भाग आतापर्यंत वाचलेल्या संयमी रामाशी अजिबातच संगती लावता येत नाही इतका टोकाचा संतापी राम उभा केला आहे. (गदिमांनी याच प्रसंगावरती गीत रामायणात "सखी सरले ते दोघांमधले नाते" हे गाणे लिहिले आहे.)  एक अख्खा सर्ग ह्यावरतीच आहे. मग सीतेचा सहाजिक विलाप आणि संताप ह्यावरती पुढचा सर्ग आहे. सीता रामाचा धिक्कार करते आणि लक्ष्मणाला चिता रचायला सांगते. आणि अग्नीचे स्मरण करुन त्यात प्रवेश करते. म्हणजे थोडक्यात रामाने अग्निपरीक्षा मागितली नाहीये आणि सीता अग्निपरीक्षा देत नसून संतापून जीव देते आहे असा सीन आहे. तीने अग्नित प्रवेश केल्यावरती एक अख्खा सर्ग देवता खाली येऊन रामाचे व सीतेचे गुणगान करतात सीतेचा स्वीकार कर म्हणून गळ घालतात. तोवर ही अग्नीमध्ये "वेटिंग" मोडवरती. मग पुढल्या सर्गात अग्निच प्रकट होतो. सीतेचा हात धरुन रामासमोर तीला ऊभी करतो आणि ती माझ्या तेजाहुनही पवित्र असल्याची साक्ष देतो मग राम आनंदाश्रु ढाळत स्वत:च्या मुळ स्वभावाला जागुन अत्यंत मृदुभाषी झालेला आढळतो. ज्याप्रमाणे सूर्य व प्रकाश वेगळे नाहीत तसेच सीता आणि मी वेगळे नाहीच, माझा सीतेवरती पूर्ण विश्वास आहे. मात्र त्याच बरोबर अग्नी देवाची साक्ष मिळाल्याने कोणी हिच्यावरती संशय घेणार नाहीत तसेच मलाही कामांध बनून सीतेचा स्वीकार केला असे म्हणणार नाहीत. हीचे पावित्र्य इतके प्रखर आहे की रावण हिचे काहिच वाकडे करु शकणार नव्हता. असे बरेच कोडकौतुक करताना आढळतो. ४ सर्गांची संगती लागता लागत नाही.

शांत, संयमी, मृदुभाषी, एक वचनी, एकबाणी, मर्यादा पुरुषोत्तम असलेला राम अख्या रामायणातले आपले रुप ह्या ३-४ सर्गांकरतो सोडतो आणि अयोध्येला निघताना पुन्हा आपला शांत, संयमी, मृदुभाषी, एक वचनी, एकबाणी, मर्यादा पुरुषोत्तम होतो. माझा सांगायचा मुद्दा असा की हा भाग उत्तर रामायणा प्रमाणेच प्रक्षेप आहे का? अशी स्वाभाविक शंका येते म्हणजे ज्या काळात स्त्रीयांना मर्यादा घातल्या जाव्यात अशी आचरट धारणा पक्कि होत गेली व काळाच्या ओघात स्त्रीयांना घरात कोंडले गेले त्याकाळात हा भाग आला असावा का? लोकांनी मुळ वाल्मिकी रामायण नक्की वाचून माझ्याप्रमाणे त्यांनाही हेच वाटतं का ते तपासून बघावे. मला इथे रामाची वकीलीही करायची नाहीये अथवा मला हा भाग अडचणीचा वाटतो म्हणून तो प्रक्षेप आहे असेही मला म्हणायचे नाही.  एकतर मी म्हणालो तसे चमत्कार काव्य फुलोरे बाजुला ठेवुन आपण असा विचार करु की सीता संतापून अग्निदिव्याला (अथवा जीव द्यायला) तयार झाली तरी पेटलेल्या चितेत जाऊन जिवंत परत येणे अथवा अग्नीपुरुष प्रकट होणे वगैरे सरळ सरळ भाकड कथा आहेत. आता रामायण कालिन अग्नि अथवा कुठलीही दिव्ये कशे होती कल्पना नाही मात्र शिवकालात अथवा पेशवाईत कुठल्या पद्धतीची दिव्य करावी लागत त्याची कल्पना देतो. त्या दिव्यांना कुठलाही वैज्ञानिक अथवा प्रमाण आधार नाही. पंचमहाभुतांची भीती  ... खोटं बोललं तर ती शक्तीच शिक्षा करेल ही भाबडी भावना असे. अग्नीदिव्य म्हणजे एक तापलेला आगीचा लालबुंद गोळा ज्याने अग्निदिव्य घ्यायचे कबूल केले त्याला दोन हिरव्या पानांमध्ये धरुन उचलावा लागे. त्या आधी तो पुरेसा गरम आहे हे लोकांना कळावे म्हणून त्यावरती पेंढ्याच्या काड्या टाकत त्यांनी पेट घेतलेला बघितला की तो पुरेसा तापलेला गोळा उचलायचा व तिथून काही पावले जी काही पन्नास - शंभर ठरलेली असतील ती पावले शांतपणे चालत जाऊन दुसर्‍या पेंढ्याच्या भार्‍यावरती टाकायच्या म्हणजे तो पेंढा जळत असे. ह्या दरम्यान त्याचा हात पोळला, त्याने तो गोळा खाली टाकला अथवा दुसर्‍या टोकाला असलेल्या पेंढ्याला आग लागली नाही तर हा माणूस खोटं बोलतोय असं समजलं जात असे. दुसरे असे जलदिव्य. म्हणजे काय तर जो दिव्य करणार आहे त्याने पाण्यात बुडी मारायची त्याच्या शेजारी एक धनुर्धारी व दुसरा एक पोहणारा असे दोघेजण असत. ह्याचे डोके पाण्याच्या खाली गेल्याक्षणी धनुर्धर बाण चालवणार. तो बाण पाण्यात अथवा काठावर कुठेही जाऊन पडला कि पोहायला उभा असलेला माणुस तिथवर जाणार व गेल्या मार्गानेच परत येणार. हे होईपर्यंत  डोके वर काढायचे नाही. माणूस परत आला की पाण्यात डुबकि मारलेल्याला वरती खेचणार. ही अशी दिव्ये असत. ज्यांना काही लॉजिक नाही. असेच काहीसे दिव्य सीतेने केले असावे का?

उत्तर रामायण मी आधी म्हणालो तसा सरळ सरळ प्रक्षेप आहे. कारण वाल्मिकी रामायणात शेवटच्या सर्गात रामाने पुढे दहा हजार वर्षे सुखाने राज्य केले. त्याच्या राज्यकालात कुनीच दु:खी नव्हते, रोग, वन्यप्राणी वगैरेंपासून प्रजाजन सुरक्षित होते वगैरे रामराज्याची कल्पना आहे. त्याच्या पिढ्यांनी देखिल सुख उपभोगले हे सांगुन रामायण जो कोणी वाचेल त्याचे कसे भले होईल ह्याची जंत्री दिली आहे. म्हणजे सीता - लक्ष्मणाचा त्याग वगैरे मुळ रामायणात नाही. आता तरीही उत्तर रामायणाचा विचार करायचा म्हंटलाच तर आपण हे लक्षात घ्यायला हवे की रामाची पत्नी कोण असावी? हा लोकांचा आक्षेप नसून राजाप्रमाणेच आमची राणी आदर्श व चारीत्र्याची पुतळी असावी हा आग्रह आहे. रामही जनतेच्या मागणीसाठी तिचा त्याग करतो. तिला वनात पाठवून पुन्हा तिच्याशी काहीच संपर्क ठेवत नाही. मात्र आपण हे देखिल लक्षात घ्यायला हवे की तो दुसरे लग्न करत नाही, राजा असून भूमीशय्या करतो, एकभुक्त रहातो, ब्रह्मचर्य पाळतो, यज्ञ समारंभात सीतेची मुर्ती बनवून घेतो. अखेर सीतेला धरणीने पोटात घेतल्यावर आपला देखिल अवतार संपला ह्याची जाणीव होते ... थोडक्यात त्यालाही आयुष्यात रस उरत नाही मात्र स्वत: देहत्याग करण्या आधी एका घटनेत तो शब्द दिला असल्याने लक्ष्मणाचा देखिल त्याग करतो. कथेनुसार होते असे की रामाच्या अवतार समाप्तीचा निरोप घेऊन काळपुरुष रामाला भेटायला येतो व सांगतो मी देवलोकांतुन काही निरोप घेऊन आलो आहे. तो तुला सांगायचा आहे मात्र आपल्या बोलण्याच्या मध्ये कुणीही खंड पाडू नये. राम त्याला वचन देतो की जर कोणी मध्ये आलंच तर त्याला देहांत प्रायश्चित्त देईन. बाहेर सर्वात विश्वासु म्हणून लक्ष्मणाला पहार्‍यावरती उभे करतो. थोड्याच वेळात दुर्वास तिथे येतात व मला रामाची भेट हवी म्हणून हट्ट करतात. लक्ष्मण प्रेमाने, आदराने, गयावया करुन सर्व प्रकारे त्यांना समजवण्याचा प्रयत्न करतो. पण उलट ते अजून चिडतात व रघुकुलासकट अयोध्येलाच शाप देण्याची धमकि देतात. नाईलाजाने लक्ष्मण त्या खोलीचा दरवाजा उघडून दोघांच्या बोलण्यात व्यत्यय आणतो. काळपुरुष अदृष्य़ होतो. राम दुर्वासांची भेट घेतो. मात्र काळपुरुषाला दिलेल्या शब्दानुसार राम लक्ष्मणाला बोलावतो आणि सांगतो - "मी तुला माझ्यापासून दूर जायला सांगतो आहे, कारण माझ्यापासून दूर जाणे हेच तुला मृत्युसमान आहे! हेच तुझे देहांत प्रायश्चित्". लक्ष्मणही रामाला नमस्कार करुन सरळ शरयुवरती जाऊन जलसमाधी घेतो. म्हणजे राजपदासाठी एकट्या सीतेचा त्याग केला का तर नाही. राजा म्हणून दिलेला शब्द पाळायला त्याने लक्ष्मणाचाही त्याग केला आहे. राजमर्यादा सांभाळताना त्याने स्व:ता सगळ्या मर्यादा आखून घेतल्या व त्या पाळल्याचे रामायण - उत्तर रामायण सांगते. तिथे त्याने स्त्री - पुरुष भेद केला नाही.

सीतेवरती रामाचे किती निरातीशय प्रेम होते हे त्याच्या सीता हरणानंतरच्या विलापातुन दिसते. सीतेसाठी अठरा पद्मं वानर जमा करतो, जीव पणाला लावून तो युद्ध करतोच की. त्या ३-४ सर्गांनंतर परत राम - सीता दोघही "जैसे थे". अख्या रामायणतल्या त्या तीन असंबद्ध सर्गांसाठी रामाला एका बाजूने सरसकट झोडपले जाऊ नये. इतकेच म्हणणे मांडायला मी हा लेख लिहिला आहे. उत्तरकालात स्त्रीयांना धार्मिक रुढी परंपरांच्याखाली दडपून टाकायला कुणीतरी रामाचा वापर केला हा रामाचा दोष नाही. २०१५ चे नियम व रामायणकालिन नियम हे एक असूच शकत नाहीत. मी उत्तर रामायणाला तसेही फारसे महत्व देत नाही. मुळ वाल्मिकी रामायण मी म्हणालो तसे वाचून बघावे. माझे म्हणणे पटतय का त्याचा विचार व्हावा.

बाकी राम हा म्हणालो तसा आत्मा बनला आहे. आपल्या संस्कृतीत अखेरचे नाम हे रामनाम असावे असे मानले जाते इतका राम अभिन्न भाग झालाय. उत्तरेपासून दक्षिणेत लंकेपर्यंत ते पार तिथे पलीकडे इंडोनेशियापर्यंत रामायणाच्या पाऊलखुणा सापडतात. वडिलांनी दिलेल्या शब्दाखातर वनवास स्वीकारायचा, वनवासात पत्नीचे अपहरण झाल्यावरती शोध घेत घेत दंडकारण्य ओलांडायचे,  राज्य मिळवून देऊन सुग्रीवावरती उपकार करुन त्याची मदत घ्यायची, रावणाच्या राज्यात सत्तेची इच्छा कुणाला आहे हे ओळखुन बिभिषणाशी संपर्क साधायचा, समुद्रातुन सेतु बांधायचा, रावणाचा पराभव करुन त्याला मारुन त्याच्या पाठीराख्यांची गठडी वळायची, राजकिय, सामरिक व इतर नीती नियमांचा - आदर्शांचा - कारणांचा - परिणामांचा विचार करुन ते राज्य स्वत: न उपभोगता बिभीषणाच्या पदरात टाकणे आणि परत येणे ..... हे सगळं भव्य दिव्य आहे.त्याने दिपून जायला होतं आणि समर्थ रामदास मनाच्या श्लोकात म्हणतात तसा राम पाठीराखा भासायला लागतो आपोआप हात जोडले जातात व मुखातुन श्लोक बाहेर पडतो -

समर्थाचिया सेवका वक्र पाहे।
असा सर्व भूमंडळी कोण आहे?
जयाची लिला वर्णिती लोक तीन्ही
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी॥

 - सौरभ वैशंपायन

Saturday, January 24, 2015

मै तो सुपरमॅन ...

मध्ये काही दिवसांपूर्वी व्हॉट्सअ‍ॅपवरती मेसेज आला होता, संभाजी महाराजांबाबत. शंभूराजांचं अमानवी वर्णन त्यात केलं होतं. उंची सात फुट काय? आणि तलवारीचं वजन ६५ किलो काय? सिंह-वाघांचे जबडे हाताने उभे फाडत ... वगैरे वगैरे बरच काही. कपाळाला हात लावावा इतकाही तो मेसेज विशेष नव्हता. त्या आधी शिवाजी महाराजांवरती देखिल एक मेसेज फिरत होता - व्हिएतनामच्या राष्ट्राध्यक्षाने रायगडवर येऊन तिथली माती बॅग मध्ये घेतली, सुभाषबाबू हिटलरला भेटायला गेले तेव्हा हिटलर शिवरायांवरचे पुस्तक वाचत बसला होता; अश्या अनेक सुरस रम्य कथा त्यात होत्या. हे मेसेज हसून सोडून द्यायचे असतात.

आपले राष्ट्रपुरुष हे "अमानवी" किंवा १००% आदर्शांचा  आणि फक्त सद्गुणांचाच तितका पुतळा असायलाच हवेत हा आपला हट्ट का असतो हे मला समजत नाही. मुघलांसमोर हार न मानलेले सगळे महायोद्धे अश्या अनुयायी + मावळ्यांसमोर आपली तलवार निमुटपणे म्यान करतात. मला शाळेच्या अभ्यासक्रमात जनार्दन लवंगारेंचा "महापुरुषांचा पराभव" म्हणून एक धडा होता. महापुरुषांचा पराभव हा शत्रू करत नाहीत तर त्याचे अनुयायीच करतात हे सप्रमाण त्यांनी सांगितले होते. तो धडा दुसर्‍या चालीवरती वाचायची गरज मला वाटली. म्हणजे नेत्याने - आदर्शाने जे नीतीनियम घालून दिले त्याला हरताळ फासणे हा वेगळाच मुद्दा आहे, मात्र आपल्या आदर्शाने काडीचीही चूक करता कामा नये ... नव्हे!!! त्यांनी चूक केली असेल तरी ती चूक नव्हतीच हा जो काही आपल्या समाजाचा हट्ट असतो त्याचे कौतूक करावे तितके कमी आहे.

ते क्षत्रियकुलावतंस शिवाजीराजे झाले म्हणून झोपतानाही कंबरेला तलवार असायलाच हवी ही अपेक्षा करणारे आपल्याकडे बहुसंख्य मिळतात हे स्वानुभवाने सांगतोय. बरं, चार खर्‍या गोष्टि ह्यांना ससंदर्भ समजवाव्यात तर "महापुरुषांचा" अपमान झाला असं गावभर बोंबलत फिरतात. आजकाल सोशल नेटवर्किंगच्या साईट्स असल्याने भोंग्याच्या रिक्षांचे पैसे देखिल भरायची गरज उरलेली नाही. म्हणजे जसं पोरगं उकाड्याने कितीही कावलं असलं तरी बहुतांशी आयांचा त्याला गोंड्याची कानटोपी चढवायचा जो हट्ट असतो; त्याच पद्धतीने इतिहासातील महापुरुषांच्या मोठेपणाची हौस ह्या महाभागांनाच असते. मोबाईलवरती आलेले मेसेज व कादंबर्‍या हे ह्या महाभागांचे "संदर्भ" असतात. वरुन ते महापुरुष जातीनिहाय वाटून घेतलेले असतात. आंबेडकरवादि सावरकरांकडे बघत नाहीत, सावरकरवादि गांधींकडे बघणार नाहीत, गांधीवादी कुणाकडेच बघणार नाहीत.

मी तरी खोटं का बोलू? ८-१० वर्षांपूर्वीपर्यंत मी सावरकरांपलीकडे बघत नव्हतो. पण वय, वाचन, अक्कल वाढत गेली तशी निदान दुसर्‍या बाजूचं म्हणंणं ऐकायची तयारी झाली. फाळणीच्या बाबतीत डॉ आंबेडकरांचे बरेचसे विचार "प्रॅक्टिकल" होते. वास्तवाला धरुन होते तर सावरकरांचे विचार हे कितीही राष्ट्रप्रेमाने ओतप्रोत भरलेले होते तरी ते आत्यंतिक आदर्श असे "हिंदू" विचार होते. व मुळात हातातली परीस्थिती कुठल्याही कारणाने निसटल्यावर सावरकरांचे ते विचार प्रत्यक्षात येऊ शकत नव्हते ह्याची जाणीव झाली. शिवाय स्वा. सावरकर अथवा डॉ. आंबेडकर हे "इतिहासकार" खचितच नव्हेत ह्याची जाणीव झाली. ते "विचारवंत" होते असं म्हणता येईल व त्यांच्या दृष्टिने समाज जसा होता अथवा व्हायला हवा होता ती उदाहरणे इतिहासातून हुडकून लोकांसमोर ठेवली. स्वा. सावरकरांवरती जसा आत्यंतिक व एकांगी हिंदूत्वाचा शिक्का मारुन लोकं मोकळे होतात तसेच डॉ आंबेडकरांवरती देखिल धम्माबाबत त्यांनी जे विचार मांडले त्यावर धम्मप्रसारासाठी डॉ. आंबेडकरांच्याही १०० वर्ष आधीपासून काम करणार्‍या जगभरातील संस्थांनी "श्रीयुत आंबेडकरांनी त्यांना हवा तो धम्म मांडला खरा धम्म नव्हे!" अशी टिका केली होती. या प्रकारच्या समकालिन टिका आपण लक्षात घ्यायला हव्यात. त्यांच्यात काही तथ्य असेल तर निदान ते ध्यानात घ्यायला हवे.

मुळात महापुरुष असोत अथवा आपल्या दृष्टिने खलपुरुष असोत पहिल्यांदा त्या गुणदोषांसकट इतिहासातील ते पात्र स्वीकारायला हवं. तरच इतिहास समजायला सुरुवात व मदत होते. खलपुरुषांचा चांगला गुण अथवा महापुरुषाचा वाईट गुण नाकारुन काही मिळणार नसते ना इतिहास बदलणार असतो. शिवाय जे कर्तृत्व गाजवले अथवा ज्या चूका झाल्या त्या पूर्वायुष्यात कि उत्तर आयुष्यात ह्यावर विचार व्हायला हवा. आधी चूका करुन नंतर इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवावे असे काही अचाट - अफाट करुन दाखवले असेल तर उत्तमच. मात्र राघोबांसारखे आधी अटकेपार झेंडे गाडायचे व नंतर इंग्रजांशी चुंबाचुंबी करायची असे असेल तर कपाळाला हात लावावासा वाटतो. अर्थात अटकेपारचा झेंडा ही जमेची बाजू घ्यायची व उत्तर आयुष्यातून काय करायचं नाही? हे शिकायचं. इतिहास हा धडा घेण्यासाठी असतो. एकमेकांच्या उरावर बसण्याकरता नव्हे हे समजून घ्यायची वेळ आली आहे.

शेकडो वर्षांनी अथवा काही दशकांनी आपल्याला एकसंध इतिहास दिसू शकतो, आधीच्या व नंतरच्या घटना संगतीवार दिसतात पण त्याकाळी तो इतिहास "LIVE" असतो हे आपण लक्षात घ्यायला हवं. दुसरी गोष्ट  इतिहासातील पात्रांची मनोभूमिका आपण अनेकदा लक्षात घेत नाही. सर्वात मोठे उदाहरण छत्रपती शंभूराजे. आजकाल - "शंभूराजे मुघलांना जाऊन मिळाले ते शिवाजी महाराज व शंभूराजे यांचा मुघलांना चकवायला ठरवलेला संयुक्तिक राजकिय डाव होता." असं सांगितलं जातं. पण त्यात घरातल्या स्त्रीयांना कसं काय समाविष्ट केलं ह्याचं उत्तर कोणी देत नाही. वर्षभर आघाडी शांत ठेवायची म्हणून भूपाळगड प्रकरण होऊ देतील? भूपाळगडावरती सातशे जणांचे हात तोडले गेले, भूपाळगड पाडला गेला. हे केवळ एक डाव म्हणून शिवराय कसे होऊ देतील? ती संभाजी महाराजांची तरुण वयातल्या उसळत्या रक्ताची चूक होती हे लक्षात घ्यायला हवं. उलट संभाजीराजे त्यांच्या शीघ्रकोपी स्वभावाला धरुनच वागले. शीघ्रकोप हा त्यांचा स्वभाव होता त्याला कोणी काहीच करु शकत नाही. त्या शीघ्रकोपी व्यक्तित्वासकट त्यांचा इतिहास मान्य करायला हवा. आणि हा शीघ्रकोप पुढेही गोवा स्वारीत पोर्तुगीज विजरई दिसल्यावर वहात्या पाण्यात घोडा घालणे असो अथवा कलशाची बाजू घेऊन शिर्क्यांवर केलेला हल्ला असो कायम दिसून येतो. एखादा गुण चांगला की वाईट हा प्रश्नच नाही परीस्थितीनुरुप तो गुण चांगला - वाईट असा बदलू शकतो. त्यामूळे शीघ्रकोपी शंभूराजांचे व्यक्तित्व एकदा लक्षात घेतले की इतिहास सुटसुटित होतो.

संभाजीराजांची मनोभूमिका अत्यंत शांतपणे लक्षात घ्यायची गरज आहे. सख्खी आई नाही. वयाच्या नवव्या वर्षी राजकारणासाठी मुघलांचा मनसबदार म्हणून जावं लागतं, मागोमाग आग्र्याचं जीवघेणं संकट, जीव वाचावा म्हणून का होईना पण खुद्द वडीलांनीच जिवंतपणी श्राद्ध घालणं,  मग परत मुघलांशी शांतता हवी म्हणून पुन्हा मनसबदार होणे. हे सगळं वयाच्या १२-१४ पर्यंत बर्‍याच अंशी अनाकलनिय असेलही. वडील सांगतात ते चांगलच असेल हा समजूतदारपणा असेलही, पण शारीरिकच नव्हे तर जे वैचारीक दृष्ट्या उमलण्याचं फुलण्याचं वय असतं त्या वयात संभाजीराजे जगावेगळ्या मनस्थितीतून गेले ह्यात वाद नाही. अश्या घडामोडी कुणा पिता-पुत्राच्या आयुष्यात आल्यासं दुसरं उदाहरण नाही. उलट म्हणूनच मुघलांना जाऊन मिळणे अथवा पुढे शिवाजी महाराज जिवंत असताना अघोर मार्गाला जाऊन केलेला कलषाभिषेक असो, संभाजी महाराजांच्या जुन्या दुखावलेपणाची संगती लागायला सुरुवात होते. आज ३५०-३७५ वर्षांनी आपण बघताना शिवराय हे सगळं सगळं स्वराज्यासाठी करत होते हे आपल्याला समजतं पण आपण मागे जाऊन संभाजीराजांच्या त्या त्या वयात स्वत:ला त्या जागी ठेवायचा प्रयत्न जरी केला तरी मनात शेकडो प्रश्न उभे रहातात.

जे घडलं त्यात चूक ना महाराजांची होती ना संभाजीराजांची त्या - त्याक्षणी एक राजा अथवा राजपुत्रच नव्हे तर एक व्यक्ती म्हणून जे वाटलं ते त्यांनी केलं. आपण दोहोंची बाजू समजून घ्यायला हवी. खासकरुन शंभूराजांची. आणि बाजू समजून घेणे म्हणजे जे कटू घडलं त्यावर मखमालिशी करणं नव्हे. संभाजीराजे अत्यंत बुद्धीमान होते आणि अश्या माणसांची घुसमट लवकर होते. त्यांच्या मनासारखं व त्यांना आव्हान देईल असं काम मिळालं नाही की अश्या बुद्धीमान लोकांच "आपली इथे किंमत नाही" हे मत फार लवकर बनतं. कदाचित अश्याच परीस्थितीत मनाचा कोंडमारा होऊन ते मुघलांना जाऊन मिळाले. मात्र ते ज्या तिरमीरीत उठून मुघलांना जाऊन मिळाले त्याहून जास्त ओढीने स्वराज्याकडे परत आले. आपलं ऐकणारं इथे कोणीच नाही संतापाच्या भरात आपण आपल्याच माणसांना त्रास दिलाय हे ज्याक्षणी लक्षात आलं त्याक्षणी त्यांनी परतायचा निर्णय घेतला.

दुसरी गोष्ट बाकरें गुरुजींना दिलेले दानपत्र एक -एक ओळ सुटी करुन वाचली की संभाजीराजांचे संपूर्ण व्यक्तीमत्व तपशीलवार डोळ्यासमोर उभे रहाते. ते स्वत: संभाजीमहाराजांनी दिलेले दानपत्र असल्याने ऐतिहासिक दृष्ट्या ते अमुल्य आहे. यामध्ये ते आजोबा शहाजीराजे व वडिल शिवाजी महाराज यांच्या शौर्याची, पराक्रमाची, दानशूरतेची, प्रजाहीतासाठी असलेल्या तळमळीची प्रचंड स्तुती करतात. मात्र शिवराय "वडिलांच्या भूमिकेत कमी पडले" असा सूर एका वाक्यात दिसून येतो. ते सगळं वाचताना पंचपक्वानात कचकन दाताखाली बारिकसा खडा यावा तसं एकक्षण वाटतं, पण संभाजीराजांच्या बाजुचा विचार करता यात मला काहीच वावगे वाटत नाही. मी परत सांगतो जे घडलं त्यात चूक ना महाराजांची होती ना संभाजीराजांची. शिवाजी महाराजांना स्वराज्याचा गाडा हाकायचा होता. पण त्यात ते कुटुंबाला वेळ देऊ शकले नाहीत आणि ते शक्यही नव्हतं. अन्यथा स्वराज्य उभं रहातंच ना. पण वडिलांकडून मुलाच्या ज्या अपेक्षा असतात त्यांची अपेक्षा संभाजीराजांनी उमलत्या वयात केली असेल व व्यस्त वेळामुळे महाराज त्या पूर्ण करु शकले नसतील तर संभाजीराजांची घालमेल होणं स्वाभाविक होतं.

वडील - मुलाच्या नात्यातला हा तडा इतरही अनेक थोरा मोठ्यांच्या बाबतीत दिसून येतो. मग ते लोकमान्य टिळक - श्रीधरपंत टिळक असोत अथवा महात्मा गांधी व हरीलाल असोत. लोकमान्य टिळक व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यात वैचारिक भूमिकेत अजिबात पटत नसे. त्याचे पडसाद अगदी केसरी विरुद्ध मूकनायक अश्या स्वरुपातही उमटले. पण लोकमान्य टिळकांचे पुत्र श्रीधरपंत हे मात्र बाबासाहेबांचे जीवलग मित्र बनले. बाबासाहेबांचे स्पष्ट मत होते की बाळ गंगाधर टिळक हे खरे लोकमान्य नव्हेत. तर श्रीधरपंत हेच खरे लोकमान्य. श्रीधरपंत देखिल बाबासाहेबांना इतके जवळचे मानत की त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी शेवटचे पत्र लिहीले ते डॉ आंबेडकरांना. श्रीधरपंतांचं असं जाणं बाबासाहेबांनाही भावनिक पातळीवरती फार हेलावून टाकणारं होतं. तीच गोष्ट गांधीजी व त्यांचा थोरला मुलगा हरीलालची. तुम्ही असाल जगासाठी बापू - महात्मा ... "माझे वडील कुठे आहेत?" हा त्यांचा स्वाभाविक प्रश्न होता. व त्यांना तो प्रश्न पडायचे कारण सर्वात मोठा पुत्र असल्याने वडिलांचा आपल्या हातातून सुटत चाललेला हात त्यांनी अनुभवला होता. इंग्लंडला जाऊन वकिलीच्या उच्च शिक्षणाबाबत वडिलांनीच घेतलेली विरोधाची भूमिका ही "स्वातंत्र्यसैनिक" म्हणून घेतलेली होती. तो नकार एक तरुण, काहीतरी करुन स्वत:ला सिद्ध करायला धडपत असणारा "मुलगा" म्हणून हरीलाल यांच्या मनाला लागणं हे आपण समजून घ्यायला हवं. ह्या नात्यांच्या नाजूक गाठी हलक्या हातानेच सोडवाव्या लागतात. दोहोंची भूमिका समजून घ्यावी लागते.

इतिहास हा दरवेळी तलवारींनी खेळलेला - रक्ताळलेला नसतो. त्याला नात्याचेही अत्यंत हळवे पदर असतात. ते हातावर बसलेल्या फुलपाखरागत हळुवार हाताने सांभाळावे लागतात ह्याचं भान आपल्याला यायला हवं. एकदा संभाजीराजांची मनोभूमिका अंशत: अनुभवली तरी संभाजीराजे मुघलांना जाऊन मिळाले ह्यावर पांघरुण घालायची गरज उरत नाही. उलट नंतर त्यांचा त्या सगळ्यातून बाहेर पडून डोळे दिपवून टाकणारा पराक्रम व मृत्यूलाही धीरोदात्तपणे सामोरे जाणारी वीरवृत्ती अजून लखलख करत तेजाळते.

मी काय लिहीलय हे कदाचित काही त्रस्त समंधांना समजणारही नाही. तो त्यांना महापुरुषांचा अपमान, संभाजीराजांना बदनाम वगैरे करण्याचा डाव वाटेल कारण ती लोकं झोपतानाही कंबरेला एक अदृष्य़ तलवार लटकवून झोपतात. ह्याच त्रस्त समंधांपासून इतिहास जपण्याची विनंती करणारा हा लेख. आपले महापुरुष सुद्धा "माणूस" होते "सुपरमॅन" नव्हते. त्यांनाही राग-लोभ-प्रेम-तिरस्कार-भीती-करुणा अश्या सहाजिक मानवी भावना होत्या. त्यांच्या हळव्या भावना आपण समजून घेण्याचा साधा प्रयत्नही केला नाही तर स्वत:ला अनुयायी तरी का म्हणवून घ्यायचे? आपले हट्ट व अवाजवी अपेक्षांचे ओझे इतिहासातील महापुरुषांच्या खांद्यावर टाकणे आपण थांबवायला हवे. एखाद्या मेसेजमध्ये कधीच न घडलेल्या गोष्टी ठोकून देऊन महापुरुषांना मोठे करण्याइतके आपण मोठे झालो नाही ह्याची जाणीव ठेवावी. महापुरुषांनी आधीच इतके करुन ठेवले आहे की त्यांना खोट्या ठिगळांची गरज नाही. त्यामुळे जगातल्या सगळ्याच गोष्टिंची अपेक्षा एकाच व्यक्तीकडून करण्यात काही हशील नाही हे आजकालच्या वैचारीक "सुपरमॅन" असलेल्यांनी समजून अमानवी मेसेज तयार करणे अथवा अजून पुढे दहा जणांना पाठवणे थांबवायला हवे.

अजून काय लिहीणे? सुज्ञ असा!

 - सौरभ वैशंपायन.

Wednesday, January 21, 2015

परींदे - Birds in War.

"मेरी इजाजत के सिवा यहॉं परींदा भी पर नही मार सकता!" हा संवाद अनेकदा आपण ऐकला असेल. पण पूर्वीपासून खरोखर ह्याचा प्रत्यय युद्धभूमीवर येत असे. पूर्वी एखाद्या किल्याला/गावाला वेढा दिला की शत्रू शरण येईपर्यंत तो वेढा राबवला जात असे. मग बाहेरुन मदत मागायची कशी? सोप्पे उत्तर, प्रशिक्षित केलेले "कबूतर" पाठवायचे. त्याच्या पायाला चिठ्ठी बांधायची व सोडायचे. मग अश्या कबुतरांना थांबवण्यासाठी प्रशिक्षित तीरंदाज नेमले जायचे. पण बाण असा जाऊन जाऊन किती उंच व किती दूर जाणार? मग उपाय म्हणून "ससाणे" पाळून त्यांना प्रशिक्षित करत व ते ससाणे कबुतरांवरती सोडले जात. पण समजा एकाचवेळी ढीगभर कबुतरं उडवली तर? .... ससाण्यांचीही मग फौज तयार केली जात असे. जोवर शत्रू टेकीला येत नाही तोवर आत - बाहेर कोणी जाणार नाही ..... "पाखरु" पण नाही.


ससाणे वगैरे पाळण्याचे उल्लेख ४ हजार वर्षाहुन जुने आढळतात. मेसेपोटेमिया मध्ये ह्याची सुरुवात झाली असे समजले जाते. तरी पण  साधारण हे असे ससाणे, गरुड वगैरे पाळण्याची पद्धत मुख्यत: उझबेगीस्तान, मंगोलिया, किरगिझस्तान वगैरे भागात फार पुरातन आहे. पुढे हुणांनी ती पद्धत युरोपात नेली तर मंगोलांनी आपल्याकडे. म्हणूनच आपणही अनेक मुघल शासक मनगटांवरती ससाणे वगैरे घेऊन उभे असलेले अनेक चित्रात बघतो. सम्राट अकबराचे एक असेच चित्र प्रसिद्ध आहे. शहजहान सकट इतर अनेक मुघलांची, चांद-बीबी वगैरेंची देखिल अशी ससाणे हातावरती घेतलेली मुघल शैलीची चित्रे आहेत. अर्थात ही चित्रे समकालिनच होती असेही म्हणता येत नाही. रंगीत चित्रे तर सरळ सरळ गेल्या १५०-२०० वर्षात काढली गेली यात शंका नाही. एकंदरच ससाणा हे सामर्थ्य, क्रुरता, वेग, बेदरकारपणा, शौर्य वगैरेंचे प्रतिक मानले गेले. त्यामुळे ससाणे पाळणं हा छंद मुघल शासकांत दिसून येतो. तसे तर पूर्वीचे अनेक शासक, अनेक प्राणी पक्षी पाळत. मोर, पांढरी कबुतरं व पोपट वगैरे तर फारच सहज आढळून येतात. वाघ, बिबट्यांचे बछडे लहानपणीपासून बाळगून ते देखिल पाळले जात. पण अशी चित्र म्हणून आढळतात ती बव्हंशी ससाण्याला मनगटावर बसवलेलीच.

एकंदरच ससाणा हा जगभरातील संस्कृतीत मानाचे स्थान पटकवलेला पक्षी दिसून येतो. इजिप्शियन संस्कृतीत तर तो रक्षकाच्या रुपात देखिल दिसतो. मानवी धडांवरती ससाण्याचे डोके असलेली अनेक चित्रे आढळुन येतात. इजिप्शियन राजांच्या मुकुटावरती पुढील बाजूस नाग व मागच्या बाजूला ससाण्याचे पंख पसरलेले चित्र अथवा मुर्ती मिळतात.चीन, जपान मध्ये तिसर्‍या - चौथ्या शतकात, अरबस्तानात ५ व्या शतकात, तर युरोपात आठव्या शतकात ससाणे पाळण्याचे स्पष्ट उल्लेख मिळायला सुरुवात होते. कुराणात ससाणा, शिकारी कुत्रे वगैरेंनी केलेली शिकार "हलाल" समजली जात असल्याने अरबस्तानात देखिल शिकारीसाठी ससाणे पाळले जात. १३ व्या शतकात तैमुर मिर्झा नामक अरबी इसमाने "बाझ नामा-यी नासिरी" हा ससाण्यांवरील ग्रंथच पर्शियन भाषेत लिहीला.

इसवीसन ९०३ मधली किएव्ह मधली एक कथा सांगितली जाते - की ड्रेव्हलियन्सने किएव्हच्या राजाला मारल्याने "ओल्गा" ही त्याची बायको किएव्हची राज्यकर्ती बनली. किएव्ह व ड्रेव्हलियन्समध्ये दिर्घकाळ युद्ध सुरु होतं. नवर्‍याच्या मृत्यूचा सूड घेण्यासाठी तीने अनेकदा ड्रेव्हलियन्सना खोटे बोलून फसवून ठार केले. नंतर ड्रेव्हलियन्सचा एक मोठा गट तीने पकडला त्यांनी गयावया केल्यावरती त्यांना प्रत्येकी ३ चिमण्या व ३ कबुतरे द्यायला सांगितली. मागणी विचित्र होती. पण जीव वाचवायला त्यांनी ती मिळवून दिली. तीने ड्रेव्हलियन्सना सोडून दिले. जशी संध्याकाळ झाली तशी तीने त्या कबुतरांच्या व चिमण्यांच्या पायाला दोर्‍याने व ओल्या कापडातुन "सल्फरचे" तुकडे बांधुन त्यांना सोडून दिलं म्हणे. त्या चिमण्या व कबुतरे आपल्या नेहमीच्या घरातील वळचणीत शिरले थोड्याचवेळात त्या सल्फरचा हवेशी संयोग होऊन ते पेटले व ड्रेव्हलियन्सचे अख्खे गाव आगीच्या वेढ्यात पडले. अशी एक कथा "ओल्गा ऑफ किएव्ह" म्हणून मिळते.

आधी सर्व सामान्य शिकारी जमातींचा म्हणून ओळखला जाणारा हा वारसा पुढे पुढे प्रतिष्ठेची बाब समजली जाऊन फक्त आर्थिक वा शासकिय उतरंडित उच्चवर्गियांचा हा "छंद" झाला. FALCONRY मध्ये केवळ ससाणा न रहाता इतर अनेक ताकदवान पक्षी समाविष्ट झाले. इतकेच कशाला पुढे पुढे युरोपात तर कोणी कुठला ससाणा अथवा तत्सम पक्षी पाळायचा ह्याचे काटेकोर नियमच बनले. सम्राट, राजा, राणी, राजपुत्र, राजकन्या, प्रधान, दरबारी लोक, धर्मगुरु, शासकिय अधिकारी अशी ती उतरंड लागत गेली. सम्राट असे तो सुवर्ण गरुड, गिधाड, व ससाण्यातील "मर्लिन" नामक प्रजात पाळू शकत असे, बाकी कोणाला हे पक्षी पाळायचे अधिकार नव्हते. राजा "ग्रे-फाल्कन" प्रजात बाळगत असे, राणी अथवा राजकुमार "पेरीग्रीन" प्रजातीचे ससाणे पाळत असत. अर्थात युरोपातील वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या प्रजाती पाळायचे नियम होते. मात्र ढोबळ मानाने वरीलप्रमाणेच नोंदि मिळतात.


मात्र पुढे पुढे हा केवळ छंद न रहाता "युद्धात" वापरायचे साधन बनला. वरती सांगितले तसे शत्रुकडून संदेश घेऊन उडलेली कबुतरं; हे ससाणे मधल्यामध्ये पकडून ठार करत. अगदि दुसर्‍या महायुद्धापर्यंत ह्याचा वापर केला जात असे. पहिल्या महायुद्धात तर फ्रेंच व जर्मन्स संदेश वहनाचा खात्रीशीर मार्ग म्हणून कबुतरे वापरत. अगदि ही पोस्टल सर्विस "पाठीवरती" मिरवली जात असे. व गरज पडेल तिथुन ह्या कबुतरांना सीमेवरुन मुख्य तळाकडे अथवा शत्रुच्या सीमेपलीकडे सोडले जात असे. पहिल्या महायुद्धातला हा सरसकट वापरला गेलेला
प्रकार होता. स्वीस सैन्याने देखिल ह्याचा वापर केला. अमेरीकन सिग्नलिंग सर्विसच्या कबुतरांनी फ्रेंचांची फार मोठी मदत केली. इतकेच काय तर "चेर अ‍ॅमी" नामक कबुतरीने त्या काळतले अत्यंत महत्वाचे असे १२ संदेश अत्यंत योग्यवेळी पोहोचवल्याने तीला फ्रेंचांकडून चक्क "Croix de Guerre with Palm" म्हणून "मरणोत्तर" अवॉर्ड दिला. आपल्या शेवटच्या खेपेत बिचारीला पंखात, छातीत व पायात छर्रे लागुन ती गंभीर जखमी झाली तरीही तीने तो अत्यंत महत्वाचा संदेश पोहोचवून ७७च्या डिव्हिजन मधील २०० अमेरीकन सैनिकांचे प्राण वाचवले. अमेरीकन्सनी फ्रेंच सरहद्दिवरती अशी १२ कबुतर केंद्रे उघडली जिथे कबुतरे येऊन संदेश पोचवत. तब्बल १५०० कबुतरे त्यांनी यासाठी वापरली. अश्या कबुतरांना war/homing pigeons म्हणत. त्यांना ठार मारणं अथवा जखमी करणं देखिल 21A कायद्याखाली गुन्हा ठरवण्यात आलं होतं. "homing pigeons देशाचे महत्वाचे काम करत आहेत. त्यांना मारु नका, सरकारला मदत करा. त्यांना ठार करणं, जखमी करणं हा गुन्हा असून असे करताना कुणी आढळल्यास त्याची माहीती पोलिस, लष्कर वगैरेंना द्या. गुन्हेगाराला ६ महिन्यांची कैद, १०० पाउंड दंड अथवा दोन्हीची शिक्षा आहे." असे संदेश देणारी पत्रके जागोजागी लावली होती. शिकार करणार्‍यांची माहीती देणार्‍याला ५ पाउंडाचे बक्षिस सुद्धा होते.


दुसर्‍या महायुद्धात तर कहर तेव्हा झाला जेव्हा जर्मन सेनाधिकारी व नाझींच्या क्रूर अश्या SS संघटनेचा सर्वेसर्वा "हिमलर" हा स्वत: कबुतरांचा प्रेमी होता. व तो "German National Pigeon Society" चा अध्यक्ष देखिल होता. त्याने जर्मनीतील शक्य तितकी कबुतरे पकडायचा त्यांना पाळायचा व प्रशिक्षित करायचा घाट घालता.  या कबुतरांचा वापर निरोप पोचवणारी यंत्रणा म्हणून करायचे ठरवले. ब्रिटिश गुप्तहेर संस्था MI5 हिने अश्या कबुतरांचा छडा लावायचे व ती थांबवायचे ठरवले. ब्रिटिश कागदपत्रांनुसार अशी कबुतरे १९४० पासूनच बेल्जियन, बाल्कन प्रदेश व पश्चिम हॉलंडमधील छुप्या "गेस्टापोंना" निरोप पोहचवायला ये जा करत. मग ब्रिटिशांनी ह्याला आळा घालण्यासाठी "ससाण्यांची गस्त" सुरु करायचे ठरवले. शेकडो ससाणे प्रशिक्षित केले गेले व त्यांनी अश्या कबुतरांना पकडायला अथवा ठार करायला सुरुवात केली. ब्रिटिश कागदपत्रांत दोन पकडल्या गेलेल्या कबुतरांबाबत एक गंमतीशीर नोंद आढळते. त्यांना "युद्धकैदि" ठरवले गेले - "Both birds are now prisoners of war working hard at breeding English pigeons." एकिकडे माणसे तर जीव खाऊन लढतच होती मात्र त्या बरोबर जर्मन कबुतरे विरुद्ध ब्रिटिश ससाणे असं आकाशातलं विचित्र युद्ध देखिल सुरु झालं होतं. 


दुसर्‍या महायुद्धात शह - काटशह देणे सुरु होते. निरोप अथवा खुणांसाठी चिन्हे काढलेले वीजेचे खांब, विशिष्ट
पद्धतीने कापणी केलेली शेते, घराबाहेर लटकवलेल्या संस्थयास्पद वस्तू ह्या MI5 चे लक्ष बनल्या होत्याच पण कुणी कबुतर पाळणारा आढळलाच तर MI5 त्याला कधीही चौकशीसाठी उचलेल याचा भरवसा उरला नव्हता. याच दरम्यान ब्रिटनने देखिल कबुतरांचा "उडते बॉम्ब" म्हणून जर्मन विमानांविरुद्ध अयशस्वी वापर केला होता. MI5 खेरीज MI14  व MI16 देखिल ह्यावर विचार करु लागली होती. ह्या कबुतरांच्या अंगावरती अगदि जीवाणूंच्या डब्या लावून शत्रू प्रदेशात सोडायच्या कल्पना त्यांच्या डोक्यात आल्या होत्या. ४०० कबुतरांना यासाठी प्रशिक्षण द्यायचे ठरले होते मात्र हा प्रोजेक्ट गरजेपेक्षा खूप जास्त खर्चिक आहे असा शेरा मारुन हे प्रकार थांबवले गेले.


पहिल्या महायुद्धात तर कबुतरांच्या गळ्यात कॅमेरा अडकवून शत्रुंच्या प्रदेशांचे वरुन फोटो काढण्याचे प्रयत्न जर्मन्सने केले होते. अर्थात हाती फार काही लागले नाही. पण ती कल्पना भन्नाट होती यात वाद नाही. नंतर तसा प्रयत्न कुणी केल्याचे उदाहरण नाही. मात्र दुसर्‍या महायुद्धात ब्रिटिशांनी तब्बल अडिच लाख कबुतरांना ह्या युद्धात खेचले. व या पैकी ३२ कबुतरांना 21st डिकन्स मेडलने गौरविल्याची नोंद आहे. हा पुरस्कार म्हणजे प्राणी - पक्षी यांचा "व्हिक्टोरीया क्रॉस" समजला जातो. वरती उल्लेख केलेल्या अमेरीकन "चेर अ‍ॅमी" कबुतरीप्रमाणेच ब्रिटनचे "विल्यम ऑफ ऑरेंज" नामक कबुतर "21st डिकन्स मेडल" या शौर्य पुरस्काराचे मानकरी ठरले. त्याच्या मुळे अर्नहेमच्या युद्धात तब्बल २००० ब्रिटिश सैनिकांचे प्राण वाचले. जर्मन्सच्या सुसज्ज वेढ्यामुळे संदेश पोहोचवायला रेडियो सेटचा वापर करता येत नव्हता तेव्हा विल्यम ऑफ ऑरेंजने ती कामगिरी यशस्वीपणे पार पाडली. यासाठी साडेचार तासात त्याने तब्बल ४०० किमीचा प्रवास केल्याची नोंद आहे.  पण ब्रिटिशांना रानटी ससाण्यांचा वेगळाच प्रश्न उभा राहीला अनेकदा हे ससाणे ब्रिटिशांचे निरोप आणणारी कबुतरेच ठार मारत. विशेषत: दक्षिणेकडे इंग्लिश चॅनल पार करुन येणारी कबुतरे ह्या ससाण्यांच्या भक्ष्यस्थानी पडत. अश्या ६०० रानटी ससाण्यांना त्यावेळी गोळ्या घालून ठार केले. अनेक घरटी नष्ट केली. अनेक अंडी नष्ट केली. अखेर रोनाल्ड स्टिव्हन्सने कबुतरांप्रमाणेच ससाणे पकडून त्यांना लष्करी उपयोगासाठी वापरता येईल हे सुचवले.

अमेरीका व जपानच्या मधील उत्तर पॅसिफिक महासागरात "मिड वे" बेटांवरती अमेरीकेने १९४०च्या आसपास आपला नाविक व हवाई तळ बनवला. इथून जी विमाने ये-जा करत त्यांच्यासाठी सर्वात मोठा धोका होता तो इथे असलेल्या "सीगल" पक्षांच्या. ते एखाद्या क्षेपणास्त्रासारखे विमानांवरती येऊन धडकत अथवा विमानांच्या इंजिनमध्ये ओढले जात त्याने विमानचे नुकसान होई अथवा संपूर्ण विमानच कोसळण्याचा धोका होता. त्यांना सुरुवातीला शॉटगन्सने ठार केले जाई पण सीगल्सची संख्याच इतकी प्रचंड होती की ह्या प्रकारांना आळा बसत नव्हता. एक उपाय म्हणून तिथे अमेरीकन नेव्हीने काही ससाणे पाळले आणि त्यांच्या भीतीने धावपट्टिच्या बाजूने सीगल फिरकणे जवळपास बंद झाले. आज जगभर अनेक ठिकाणी ही पद्धत वापरली जाते.


आज FALCONRY हा जगभरात लोकप्रिय खेळ/छंद म्हणून ओळखला जातो. जगभरात फाल्कनर्सचे क्लब्स आहेत. त्यांच्यात स्पर्धा देखिल घेतल्या जातात. शर्यतीच्या घोड्यांची जसी खास पैदास केली जाते तशीच ससाण्यांची, घुबडांची, गरुडांची खास पैदास केली जाते. दोन वेगवेगळ्या प्रजातींचे असे शिकारी पक्षी वापरुन मिश्र प्रजातींच्या ससाण्यांची, गरुडांची वगैरे पैदास करतात. अर्थात युरोपियन देशात व अमेरीकेत ह्यावरती कडक नियम घातले आहेत. कतार, युनायटेड अरब अमिरात वगैरे देशात देखिल हा प्रचंड लोकप्रिय खेळ आहे.  मंगोलियामध्ये तर घोडेस्वारी व  FALCONRY हे जवळपास त्यांच्या संस्कृतीचे भाग आहेत. मंगोलियात ह्याचा उत्सव करतात व त्या निमित्ताने स्पर्धा भरवल्या जातात.

मला पक्षांच्या युद्धातील सहभागाबाबत या  लेखाच्या निमित्ताने अनेक दुवे वाचनात आले. अनेक क्लब्सच्या साइट्स बघितल्या, हजारो फोटो बघता आले. कुठला फोटो निवडू हा प्रश्न पडावा असे त्यात शेकडो सुंदर सुंदर फोटो होते पण खालच्या फोटोपाशी आलो आणि त्या फोटो वरची लिहीलेली कॅप्शन १००% पटली त्याच चित्राने FALCONRY व युद्धातील पक्षी याची तोंडओळख करुन देणार्‍या लेखाचा शेवट करतो - - सौरभ वैशंपायन.

Wednesday, January 7, 2015

वाण्याची गोष्ट

आयुष्यात प्रथमच लहान मुलांसाठी काहीतरी लिहीलंय. कविता सुचताना मजा वाटली, पण एकंदर कठिण काम होतं. लहान लहान ८-१० शब्दांचीच कडवी करा, त्यातच यमक बसवा. बोजड शब्द नकोत. त्यात गोष्ट असायला हवी. मोठ्यांच्या दृष्टिने कविता कितीही निरर्थक असली तरी लहान मुलांना मजा वाटून ते त्यांच्या डोळ्यांसमोर उभं रहायला हवं. हे इतकं सांभाळताना मुख्य गोष्ट मात्र पूर्ण बोंबलली, ती म्हणजे लहान मुलांसाठी असल्याने जास्तीत जास्त ५-७ कडव्यांत कविता संपायला हवी होती. माझी एक मैत्रिण म्हणाली "कविता मजेदार आहे, पण लहान मुलांसाठी तू जवळपास "खंड-काव्य" लिहीलं आहेस!" :-D :-D .....  तसं तिच्या म्हणण्यातलं तथ्य मान्य करायला हवं कारण मुलांना एका जागी इतका वेळ बसवत नाही. मात्र तरीसुद्धा ही कविता इतरांना वाचायला द्याविशी वाटली. लहान मुलांच्या एखाद्या कार्यक्रमात कवितेतून गोष्ट म्हणून मात्र ही सादर करता येईल १० मिनीटांची काव्य - नाटुकली टाईप काहीतरी निघू शकेल यातून. :-p

===========

हिरवे नावाचे,
कोरडे गाव,
गावात होता,
पाण्याला भाव.

गावात होता,
हुशार वाणी,
धान्या बरोबर,
विके पाणी.

जमवली त्याने,
भरपुर नाणी,
मुलगी त्याची,
सुंदर शहाणी.

मुलीचं म्हणे,
करीन लग्न,
सुखी संसारात,
होईल मग्न.

पण .....

बबलू टबलू,
गाव-गुंड,
ताडमाड उंच,
चाल थंड.

बबलू बारीक,
टबलू लठ्ठ,
डोक्याने पण,
दोघे मठ्ठ.

बबलू टबलू,
दाणगट फार,
करती चोरी,
देती मार.

बबलू टबलू,
घरात आले,
वाण्याचे सगळे,
पैसे नेले,

वाण्याला लागली,
खूप मोठी चिंता,
मुलीचे लग्न,
कसे होईल आता?

कोण पैसे,
परत आणेल?
बबलू टबलूला,
फटके हाणेल?

गावातला पिंट्या,
कवि - गायक,
लोकांना वाटे,
त्रासदायक.

कविता करी,
फार टुकार,
लोक म्हणती,
बेकार बेकार.

आवाज त्याचा,
खूप भसाडा,
काचा फुटती,
जाऊन तडा.

वाण्याला सुचली,
मोठी युक्ति,
गुंडांपासून,
मिळेल मुक्ति.

पिंटूला बोलावुन,
केला प्लॅन,
पिंटू बसला,
लावून ध्यान.

वाणी गेला,
बबलूकडे,
पैज लावली,
सोन्याचे कडे.

पैज होती,
भलतीच धीट,
पिंटूच्या कविता,
ऐकायच्या नीट.

बबलू गेला,
पिंटूसमोर,
कवितेला म्हणे,
देईन वन्समोअर.

कविता ऐकुन,
मोजुन पाच,
बबलू झाला वेडा,
करु लागला नाच.

टबलूला ह्याचा,
आला राग,
हिरवे गावात,
भागमभाग.

पिंटुची त्याने,
पकडली मान,
पिंटुने घेतली,
मोठी तान.

टबलूचे फुटले,
दोन्ही कान,
कानात बोटे,
सोडली मान.

बबलू टबलू,
दोघे मिळुन,
गावाबाहेर,
गेले पळुन.

 - सौरभ वैशंपायन