Thursday, November 26, 2009

तर्पण
सूर्यग्रहणाआधी जसे सूर्याला त्याचे वेध लागतात तसेच वेध गेल्या दोन दिवसांपासून सामान्य मुंबईकरांपासून ते मिडियापर्यंत सगळ्यांना लागले होते. निमित्त होते २६/११ च्या वर्षपूर्तीचे. मी ठरवलं होतं यावर नाहि लिहायचं. कारण हर तर्‍हेने हा विषय गेली वर्षभर चर्चिला गेला आहे. पण मनातली अस्वस्थता अखेर आता इथे कागदावर बाहेर पडतेच आहे. का?? माहित नाहि! पण त्या घटनेशी प्रत्येक मुंबईकराचं नात जडलय. आणि हे नातं म्हणजे नुसते भावनांचे बळे बळे काढलेले कढ नव्हेत किंवा कुणाला दाखवण्यासाठी छाती पिटुन काढलेले हेलहि नव्हेत. २६/११ ला आतुन हादरलेला मुंबईकर आत्ताशी कुठे सावरतोय. दबकत बिचकत ट्रेन मध्ये चढताना, सीएसटि, ताज इथे उभं राहताना परत परत ती खपली निघतेय. मुंबई स्पीरीट - वर्क स्पीरीट नावाच्या कुबड्यांवर मुंबई उभी राहते आहे. आणि अशीच अनंतकाल त्या कुबड्यांवर उभी राहिल. “मजबुरी का नाम मुंबई स्पीरीट!” काहिंना हे पटेल तर कोणाला अजीर्ण होईल, पण हि वस्तुस्थिती आहे. पण मजबुरी म्हणुन का होईना त्याच वर्क स्पीरीटसाठी मोठ्या मनानं टाळ्या वाजवाव्यात म्हणून नाहि नाहि म्हणताना लिहितोय.

आज सकाळी जाग आली तीच सकाळच्या टि व्ही वरील बातम्यांनी. त्यातली पत्रकार अखंड बडबडत होती मध्येच ती म्हणाली बरोबर एका वर्षापूर्वी याच ताजवर अनपेक्षीत दहशतवादि हल्ला झाला. डोक्यात सणकच गेली. अनपेक्षीत??? RAW आणि सरकारी यंत्रणांना धडधडित संदेश मिळाला होता मुंबईवर समुद्रमार्गे हल्ला होऊ शकतो. आणि म्हणे अनपेक्षीत हल्ला. खरी प्रश्नांची सुरुवात इथुन होते. त्या संदेशाचं काय केलत?? हा प्रश्न स्ट्रायकर सारख्या दुसर्‍या प्रश्नावर आदळतो आणि बघता बघता हजारो प्रश्न डोक्यात विखुरतात.

या ठिकाणी हल्ला कसा झाला? कोणी केला? सरकार किती छान झोपलं होत? याची चर्चा करण्यात हशील नाहि. ते सगळ्यांना माहित आहे. कौतुकाची गोष्टि अशी आहेत कि आमचं साहित्यच काम करत नव्हतं. आमच्या पोलिसांकडे असलेल्या बंदुकिंनी आपण शेवटची गोळी कधी ओकलो होतो हे आठवायचा प्रयत्न केला तर तीला आठवेच ना!!! आणि आमची “बुलेटप्रुफ जॅकेट्स?” बेसिकली ती फक्त जॅकेट्स होती कारण त्यात बुलेट थांबल्याच नाहित. किंवा असतील असतील जॅकेट बुलेटप्रुफच असतील पण कसाब आणि कंपनीच्या गोळ्यांमध्येच डिफेक्ट असेल. कुठल्या कंपनीच्या गोळ्या वापरता तेहि विचारा त्याला चौकशीत.

करकरेंनी सारखी मदत मागुन देखिल कामा हॉस्पिटलकडे मदत का पाठवली नाहि?? कि पोलिस दलाचा शिरस्ता आहे कि सहकार्‍यांनी मदत मागितली तर शपथेवर ती मिळु द्यायची नाहि?? कारण दोन महिन्यांपूर्वी गडचिरोलित जे १६ पोलिस शहिद झाले त्यांनी सुध्दा लवकरात लवकर हॅलिकॉप्टरची मदत पाठवा असे वायरलेस वरुन सांगितले होते, मदत येते आहे हे ते किमान चार तास “ऐकत” होते. केवळ दारुगोळा संपला म्हणुन नक्षलवाद्यांनी त्या बहाद्दरांना कुत्र्याच्या मौतीने मारले. याउलट आमच्या माननिय नेत्यांना निवडणूकिच्या प्रचाराला कशी भराभर हॅलिकॉप्टर्स मिळतात हे बहुदा E=mc² पेक्षा कठिण समिकरण आहे. पुढचे प्रश्न कामटेंना कामा हॉस्पिटलपाशी कोणी जायला सांगितले? आमचे तीन मोठ्या पदावरील अधिकारी एकाच गाडित का बसले? अलम दुनियेला आग लागली तरी प्रोटोकॉल मध्ये न बसणारी गोष्ट करायची नाहि असे स्पष्ट आदेश त्यांना ट्रेनिंगमध्ये असताना हि चूक त्यांच्याकडुन का घडली? ते जबर जखमी आहेत हे कळल्यावर सुध्दा अर्धातास त्यांच्याकडे कोणीच का फिरकले नाहि? कंट्रोलरुमला करकरेंनी किमान ६ - ७ संदेश पाठवुन देखिल “करकरे कुठे होते हे मला माहित नव्हते!” असे राकेश मारीया कसे म्हणू शकतात? करकरेंचं सो कॉल्ड बुलेटप्रुफजॅकेट कसं गायब झाल? हॉस्पिटलमध्ये पोहोचेपर्यंत त्यांच्याच स्ट्रेचरवर होतं म्हणे. मज पामराच्या डोक्यापलिकडचे प्रश्न आहेत.

या सर्व हल्ल्यात सर्वात महत्वाची बाब “नरीमन हाऊस” ज्या गोष्टिकडे सगळ्यांच सर्वात जास्त दुर्लक्ष झालं ते ठिकाण. इथे इस्त्रायली किंवा ज्यू लोकं राहतात, हे २७ तारखेपर्यंत आजुबाजुच्या इमारतीमधील लोकांनाहि महित नव्हते ते ठिकाण अतिरेक्यांनी किती अचूक टिपले हे पाहता ताज-सीएसटी-ट्रायडंट हे खरंतर फक्त “स्क्रीन सेव्हर” असावेत आणि मेन डेस्क्टॉप वेगळाच असावा हे समजतं. कॅफे लिओपोल्ड देखिल केवळ गोरी चमडि मारायची आणि मुंबई परदेशींसाठी असुरक्षित आहे हे जगाला दाखवायचं त्याने भारताच्या आर्थिक राजधानीला “डॉलर्स” मध्ये फटका बसला पाहिजे यासाठी निवडलं. बाकि ताज- ट्रायडेंट हे उच्चभ्रू तर सीएसटी आम जनतेला सैरभैर करण्यासाठी वापरलं. नरीमन हाऊस एकदा उडवलं कि आपोआप इस्त्राइल – भारत यांच्यात कटुता निर्माण होणारच हे ते ओळखुन होते. आतातर हेडली प्रकरणामुळे ज्यूंची भारतातील वसतीगृहे वा धर्मस्थळे हि “मोसादच्या” कारवायांची ठिकाणे असु शकतात हे ठरवुन त्यांवर निशाणा साधुन ते इस्त्राइलला धमकवण्याची नवी पध्दत सुरु करत आहेत.

बाकि काहिहि म्हणा, या अतिरेक्यांना आपण एखादे “मॅनेजमेंट” कॉलेज काढुन दिले पाहिजे. ज्या मास्टर माईंड ने हा कट रचला त्याला केवळ यासाठी धन्यवाद दिले पाहिजेत कि “बाबा आमच्या व्यवस्थेत किती भगदाडे आहेत हे दाखवलस हे उपकारच होय!” या घटनेनी गल्लीपासुन ते दिल्लीपर्यंत भल्याभल्यांच्या बुडाखालच्या खुर्च्या हिसकावुन घेतल्या. लोकांनी सगळं ऑपरेशन संपल्यावर पुढचे काहि दिवस “we want CEO not CM!” असे फलक झळकावले. लाखो रुपयांच्या मेणबत्या जाळल्या, ढिगाने गुलाबांची निर्माल्ये झाली, हे सगळं बेगडि होतं असं मी मुळीच म्हणणार नाहि उलट ती त्यावेळची स्वाभाविक प्रतिक्रियाच होती आणि ती बरोबरहि होती. पण आपला ताणून झोप काढायचा दिवस दर पाच वर्षांनी एकदा येतो. आपला CEO कोण व्हावा हे आम्हि तेव्हा ठरवत नाहि. मग ५२% झालेल्या मतदानावर आपापसात “मांडवली” करुन ते सत्तेवर बसतात. त्यांना सरकार स्थापन करायला पंधरवडा लागतो याची लाजहि वाटत नाहि. याला कारण आपणच आहोत.

आता प्रत्येकाने आपापली जबाबदारी मान्य करायची वेळ आलीये. अन्यथा शहिद झालेले १६ पोलिस आणि १ उमदा NSG कमांडो यांच बलिदान केवळ फुकट गेलं असच म्हणावं लागेल. त्यावेळि अथवा त्यानंतर समाजाने काय चुका केल्या हे बघितले पाहिजे. सोपे उदाहरण – नरीमन हाऊस! काय घडतय हे दुसर्‍यांच्या खांद्यावरुन वाकुन वाकुन बघायची सवय त्यादिवशीहि आपण जाहिर केली. तिथे नरीमन हाऊस मध्ये जे काहि सुरु होते तो तमाशा खचित नव्हता, पण गर्दि करायचा काय तो उत्साह? वा?? पोलिसांची कामं हि अशी वाढतात. एखाद्या अतिरेक्याने खिडकितुन एखादि फैर खाली चालवली असती तर गोळ्यांनी ८-१० आणि पळापळित - चेंगराचेंगरीत ८० जण मेले असते. तीच गोष्ट मिडियाची, सबसे तेज च्या नावा खाली कुठली बातमी? कशी द्यायची? काय दाखवायचं? किती दाखवायचं? याचं भानच TRP च्या घाणेरड्या स्पर्धेत मिडियाला राहिलं नव्हतं किंवा रहात नाहि हि १०१% सत्य गोष्ट आहे. कदाचित काहि पोलिस आणि एका NSG कमांडोच्या रक्ताचे डाग मिडियावर कायमचे लागले आहेत भले ते कितीहि नाकारोत. कराचित बसलेले आका जे संदेश देत होते त्यावरुन ते धडधडित समोर आलय.

या सगळ्यात अतिशय कौतुक करावं आणि पाठ थोपटावी असे काम मुंबई अग्निशमन दलाने केले. पोलिस – NSG इतकेच त्यांचे कौतुक करायला हवे जे तितकेसे झाले नाहिये. समोर केवळ मृत्यु तांडव करत असताना कुठल्याहि सुरक्षा साधनांशिवाय ताज आणि ट्रायडेंटला भिडायच हि कल्पनाच अंगावर काटा आणणारी आहे. आणि त्या लोकांनी सलग ७२ तास ते काम यशस्वीपणे करुन दाखवलय. नेहमीप्रमाणेच जीवापेक्षा कर्तव्याला पुढे ठेवणार्‍या त्या हिरोंची मुंबई कायमची आभारी राहिल.

एका वर्षात सुरक्षेत ज्या सुधारण्या घड्ल्या त्या स्वागतार्ह आहेतच पण त्या पुरेश्या नाहित हेहि खरयं. सीएसटि सारख्या प्रचंड गर्दिच्या ठिकाणी अजुन सुरक्षा ढिलीच आहे. आणि असं किती स्टेशन्सवर सुविधा कश्या पुरवणार हा नविन प्रश्न आहेच. कितीहि उपाय केले तरी तोकडेच ठरतील हे सत्य आहे. नव्याने फोर्स वन हि यंत्रणा स्थापन केलेली असली तरी त्याचा उपयोग व्हायला हवा आणि त्याचा ताण दुसर्‍यावर पडता कामा नये. हे सगळं यासाठी म्हणतोय कि काल पेपर मध्ये बातमी होती कि एका वर्षात जरुरिच्या शस्त्रांची खरेदि सरकारने केलीच नाहिये. फोर्स वनला AK -47 कमी पडु नयेत म्हणुन क्विक रीसपॉन्स टिम च्या “कॉम्बॅट व्हॅन” वरील AK -47 काढुन घेतल्या आहेत. मग जमेल तेव्हा शस्त्रे खरेदि केल्यावर ह्या रायफल्स परत केल्या जातील. सगळा आनंदि आनंद आहे. म्हणजे न होवो पण उद्या परत असा हल्ला झालाच तर NSG टिम येईतो कॉम्बॅट टिम काय गाडि साईडला लावुन भजन करणार??? आणि कसली क्विक रीस्पॉन्स टिम?? करकरेंनी मदत मागितल्यावर क्विक रीस्पॉन्स मिळालाच नाहि. हि टिम भलत्याच बिल्डिंगच्या छतावर मुक्काम ठोकुन होती कारण त्यांना वरिष्ठांकडुन आदेश मिळाले नव्हते. उद्या फोर्स वनचा असा बोर्‍या न वाजला म्हणजे मिळवलं.

याखेरीज साध्या साध्या बाबतीत जागरुकता येणे गरजेचे आहे. ट्रेन मध्ये ८ – १० स्टेशन नंतर एखादि बॅग हलली नसेल, व ठेवणारी व्यक्ती कोण हे समजत नसेल तर ती कोणाची आहे हा एक प्रश्न विचारायचा त्रास आपण घ्यायला हवा. पर्यटनाच्या नावाखाली अनेक महत्वाच्या वास्तुंचे फोटो कोणीहि काढतो. महत्वाच्या ठिकाणी फोटो काढण्यास सरकारने बंदि करावी. सरकारी कार्यालयांचे फोटो कोणी घेत असेल अथवा महत्वाच्या वास्तुंच्या पार्श्वभूमीवर कोणी स्वत:चे फोटो काढुन घेत असेल तर पोलिस व सामान्य जनता यांनी त्यांना हटकायला हवे. गुगल मॅप कितीहि प्रगत झाले तरी प्रत्यक्ष इमारतींचे फोटो काढल्या शिवाय अतिरेकि कुठलिहि योजना बनवत नाहित. म्हणून शक्य तिथे या गोष्टि राबवल्या पाहिजेत. डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजे आपत्कालि व्यवस्थापनांचे गट मुंबई अथवा महत्वाच्या शहरांतील प्रत्येक उपनगरांत तयार करवेत. त्यांचा पहिला संपर्क स्थानिक पोलिस ठाण्यांशी होईल अशी व्यवस्था करावी. याने दहशतवादि हल्ला असो वा पाऊस-भूकंप यांसारखे नैसर्गिक संकट याचा फायदा होईलच.

२६/११ जी जखम खूप खोल आहे, नाहि भरणार इतक्यात. भरुहि देऊ नका! असे अपमान धगधगत ठेवायचे असतात. विज्ञान, अध्यात्म, तत्वज्ञान आणि इतिहास हे सगळे एका नियमा बाबत एकमत दर्शवतात – चक्र नेहमी पूर्ण फिरतं. कदाचित हे चक्राच अर्धच आवर्तन असेल, पण गेल्या वर्षभरात खुद्द पाकिस्तानात लाहोर, पेशावर, कराची, इस्लामाबाद इथे जे स्फोट होत आहेत त्यावरुन चक्र त्याचं आवर्तन पुर्ण करायच्या दिशेने जातय. उरल्या आवर्तनात अजुन काय समोर येणार ते नियतीलाच ठाऊक. पण अशी वर्षश्राध्द आणि तर्पण परत न करायला लागोत हिच इच्छा!

- सौरभ वैशंपायन.

Monday, November 16, 2009

JUST DO IT!CNG - Clean ‘N’ Green! तसा नवाच ग्रुप. कोणी सुरु केला? कोणती NGO मदत करते?, काय कामं करतात? कुठे करतात? असे अनेक प्रश्न तुमच्या डोक्यात येतील. तर मुळात सुरुवात कशी झाली हा मुद्दा. शिवाजीपार्क मध्ये रोज येत असलेल्या एकाच्या डोक्यातली हि झकास कल्पना. आपण रोज इथे असतो. कधीकधी तर घरात कमी आणि पार्कातच जास्त पडिक असतो. अर्थात दादर – माहिम भागातल्या प्रत्येक तरुणाचं असच असतं. पार्कचा कट्टा हि हक्काची जागा असते. पण तेच पार्क कचर्‍याने भरलं असताना लोकांना चैन कसं पडतं? ह्यासाठी काहितरी आपणच सुरु केलं पाहिजे असं ठरवुन दादरमधील “मुकुल साठेनं” हा ग्रुप, नपेक्षा “प्रोजेक्ट” सुरु केलाय. मला हि कल्पना आवडली आणि मी व अजुन काहिजण मुकुलला ह्यात मदत करत आहोत. कुठलीहि NGO ह्यात आम्हाला मदत करत नाहिये, किंवा तशी अपेक्षाहि नाहि. आम्हाला इथे हवे फक्त न लाजता काम करणारे जास्तीत जास्त हात. व ह्याची जाणीव असलेले सुजाण नागरीक.

मुकुल सांगतो – “हा विचार अनेक दिवस डोक्यात होता, पण आपण हे कोणाला सांगितलं तर ते वेड्यात काढतील असं वाटायचं! पण एके दिवशी माझ्या ग्रुपसमोर मी हि कल्पना मांडली आणि सगळ्यांना पसंतहि पडली!” मुकुल आणि त्याच्या ग्रुपने एका रविवारी संपूर्ण पार्क भोवती एक चक्कर मारली. कुठे कुठे कचरा पडलाय? कुठे प्लास्टिक जास्त आहे? कचराकुंड्या कुठे आहेत? ह्या सगळ्याचा विचार केला आणि १ नोव्हेंबरला त्यांनी प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली देखिल. काम आणि एरिया वाढत गेला तशी कचर्‍याच्या पिशव्यांची संख्या वाढत गेली. पहिल्याच रविवारी पार्कातल्या एका कोपर्‍यातुन १२ पिशव्या प्लास्टिक निघाले यात होती मुख्यता गुटख्याची पाकिटे. खालोखाल होते चहा – कॉफिचे प्लास्टिक ग्लास, मग वेफर्स ची पाकिटे, चॉकलेट रॅपर्स वगैरे वगैरे. ८ तारखेच्या रविवारी आम्ही १४ पिशव्या प्लॅटिक जमा करुन ते कचर्‍यात टाकले. कालच्या रविवारी पार्कात कुठल्यातरी सत्संगाच्या निमित्ताने गर्दि असल्याने फक्त ७ पिशव्याच झाल्या पण हेहि नसे थोडके.

कालचा महत्वाचा मुद्दा – एका जॉगिंग करणार्‍या व्यक्तीने स्वत: थांबुन आजुबाजुला पडलेल्या चार सहा प्लॅस्टिकच्या पिशव्या पटापटा गोळा करुन आमच्या पिशवीत टाकल्या आणि परत जॉगिंगला निघुनहि गेला. हे असं झालं कि थोडं समाधान वाटतं, कदाचित आमच्यासारखाच पार्कावर मनापासून प्रेम करणारा कोणीतरी होता, नाव माहित नाहि, चेहराहि लक्षात न रहावा इतक्या पटकन आला थोडि का होईना मदत केली नी गेला. लोकांपर्यंत CNG चे काम पोहोचायला सुरुवात झालीये हे आमच्या दृष्टिने महत्वाचं आहे. तेव्हा मुकुलला मी म्हणालो – “मुकुल यात ह्याने जितकी मदत केली तितकी मदत समोर सत्संगाला आलेल्या गर्दितल्या प्रत्येकाने केली तरी तासाभरात सगळे पार्क चकाचक होईल!” आणि शब्दश: ते शक्यहि होते. शाळेत शिकवतात कि स्वच्छता हे देवाचे रुप आहे वगैरे, पण सत्संग करुन देव मिळवणारेच तिथे कचरा टाकुन जातात तेव्हा त्यांची किव येते. त्यांना आणि इतरांना सांगावसं वाटतं कि “बाबांनो मद्त केली नाहित तरी चालेल निदान कामं वाढवु नका!” अनेक लोकं आम्हांला थांबवुन हे काय करताय? का करताय? ह्याची माहिती घेतात. त्या लोकांना सुध्दा “कामं वाढवु नका!” हे गोड शब्दात सांगतो.

तसा तर हा विषय फार मोठा आहे. ह्याचा एक धागा थेट ग्लोबल वॉर्मिंगपर्यंत जोडताहि येईल. पण फारसे प्रवचन न देता काहि गोष्टि नमुद कराव्याश्या वाटतात. आपण आपल्या पुरती वैयक्तीक आणि सार्वजनिक स्वच्छता बाळगली तरी खूप काहि बदलु शकेल. अर्थात प्रत्येकाने हा विचार करायला हवा. स्वत:ला “सुशिक्षित” म्हणवणारे आणि चकाचक ब्रॅंडेड कपडे – बुट घालुन वावरणारे जेव्हा वेफर्स खाऊन त्याचे पाकिट चुरगाळुन रस्त्यात फेकतात, कोल्ड्रिंकचे ग्लास रेल्वेच्या रुळांत फेकतात तेव्हा त्रागा होतो. माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलामांनी आपल्या एका भाषणात एक अचुक उदाहरण दिले होते – “आपण परदेशात गेल्यावर तिथले स्वच्छतेचे नियम पाळतो कारण माहित असतं कि चुकले तर पकडले जाऊ आणि डॉलर्स मध्ये दंड भरावा लागेल. पण ज्या क्षणी आपण भारतात उतरतो लगोलग हातातला कचरा खाली पडतो आणि घरी आल्यावर मात्र बाहेरच्या देशात किती स्वच्छता आहे हे आपण इतरांना सांगतो!” हे कुठेतरी बदलायला हवं.

शहरातच कशाला? गेल्यावर्षी मी कोयना अभयारण्यात व्याघ्रगणनेसाठी गेलो होते तिथेहि गुटख्याची काहि पाकिटे आढळली होती. डोकं फिरणं सहाजिक आहे पण आपल्याला हे मान्य केलं पाहिजे कि प्लॅस्टिक हा आपल्या आयुष्यातला अविभाज्य भाग झालाय, त्याला आता हद्दपार करणे शक्यहि नाहि. पण आपण त्याचा वापर शक्य तितका कमी करु शकतो. पावसाळा वगळता एरवी ७-८ महिने आपण कापडि आणि कागदि पिशव्या वापरु शकतो. चॉकलेट ची रॅपर्स, चहा – कॉफिचे ग्लास आपण सार्वजनिक कचराकुंड्यातच टाकायचे कष्ट घेतले तर BMC चे काम आपोआप कमी होईल. आपण फक्त महानगरपालिकेला शिव्या देण्यात धन्यता मानणे मुर्खपणाचे आहे. आपण काय करतो? किती कचरा करतो? हे बघुन त्यात चांगला बदल घडवणे गरजेचे आहे. यात नुसता प्लॅस्टिकच नव्हे तर कुठल्याहि प्रकारचा कचरा सार्वजनिक ठिकाणी टाकणार नाहि हा नियम प्रत्येकाने स्वत:पुरता तरी पाळावा.

तर पुन्हा मुळ मुद्याकडे – प्रत्येक रविवारी सकाळी ९ वाजता आम्हि शिवाजीपार्क जीमखान्यापाशी भेटतो. तिथे सर्वानुमते शिवाजीपार्कचा कुठला एरिया स्वच्छ करायचा हे ठरतं आणि ग्रुप तिथे सरकतो. सध्यातरी महिन्यातुन एक रविवार दादर चौपाटी साफ करायचे ठरते आहे. खरंतर दादर चौपाटि साफ करणं हे सध्या आमच्या आवाक्यापलीकडचं काम आहे हे समजतय, पण कुठुनतरी सुरुवात केलीच पाहिजे. मुळात दादर चौपाटिवर लोकं जात नाहित कारण ती अस्वच्छ आहे आणि ती दुर्लक्षीत राहिल्याने अजुन अस्वच्छ होते आहे.

काहि महिने असेच काम करुन दादर चौपाटि व शिवाजीपार्क जर आम्हि साफ करु शकलो तर पुढील निवडणूकित आम्हि “कार्यसम्राट” म्हणून निवडुन येऊ. हा विनोदाचा भाग सोडला तर महापौर निवासाच्या मागचा समुद्रकिनारा कचर्‍याने भरलेला असतो आणि महापौर निवासाच्या गेट शेजारच्या बसस्टॉपवर “keep Mumbai clean!” चा मुंबई महानगरपालिकेचा बोर्ड लागलेला असतो ह्यापेक्षा मोठा विनोद क्वचितच दुसरा असेल.

असो, सध्या तरी आम्हांला गरज आहे कुठलीहि अपेक्षा न ठेवता आम्हांला मदत करणार्‍या लोकांची. “आम्हि” तुमची वाट बघतोय!


ऑरकुट आणि फेसबुकवर आमच्या ग्रुपच्या कम्युनिटिज आहेत, त्यांना भेट देऊन त्यात सहभागी होऊन तुम्हि आमच्या कामात सहभागी होऊ शकता, नव्या कल्पना राबवायला मदत करु शकता. -

Click here for Orkut community Link
.

Click here for Facebook group link


- सौरभ वैशंपायन.