Saturday, May 24, 2008

पाऊलखुणा.......

मे महिन्याच्या दिवसात, दुपारी जेवणात मोठ्ठ्या वाटित आमरस घ्यावा त्यात २ चमचे तुप सोडावे व तो ओरपावा, अशा साधारण ४ वाट्या पोटात गेल्या कि मग झकास अंधार होईल अश्या दारे-खिडक्या लावाव्यात. एक उशी जमिनीवर टाकावी. पंखा फुल्ल स्पिडवर करुन त्याखाली प्रफुल्ल मनाने आडवं व्हावं, म्हणजे खरंतर टेबलवर ’डिसेक्शनला’ आलेल्या बेडकासारखं तंगड्या ताणुन झोप घ्यायची, यासारखं सुख दुसरं नाहि. निदान मे महिन्याच्या टळटळित दुपारी तरी हि सुखाची इतपत हिरवळ देखिल खुप होते! पण सुख बोचतं-बोचतं म्हणातात तसं काहिसं होऊन, घराच्या बाहेर सोडुन द्या, मी प्रत्यक्ष मुंबई बाहेर निघालो. मी-मिनल आणि अमित. व्याघ्र-गणनेसाठी कोयना धरणाजवळ. मुंबई-परळहुन रात्री १०:३०ला सातार्‍यासाठि निघालो. सकाळि ०४:४५ ला सातारा. गाडित अर्थात सुखाची झोप मिळालीच नाहि. परत कोयनानगरकडे जाणारी गाडि कधी?? यावर उत्तर मिळालं ०७:१५ म्हणजे किमान २ तास तरी "हरी-हरी". पण शेवटि थोडं फ्रेश होऊन सातारा S.T. कॅन्टिन मध्येच २ मिसळ/शिरा/उपिट आणि चहा हाणंल आणि गाडिची वाट बघत बसलो. शेवटि साधारण ०६:५०ला सातारा-रत्नागिरी गाडि लागली. हि कोयनानगरमार्गे जाते. त्याच गाडित बसलो. धावाधाव करुन जी जागा मिळवली होती ते आरक्षित होती - बोंबला!! पण ’जिसका कोई नहि होता उसका खुदा होता है!’ गाडित पाठिमागे आम्हाला ३ जागा मिळाल्याच ते देखिल पुढिल अडिच तास. आमच्याच शेजारी पंडित नावाचे गृहस्थ होते तेहि आमच्यासारखेच Tiger Census साठि जात होते. हळु हळु गप्पांचा ओघ व्यंकटेश माडगुळकर-चित्तमपल्ली-गो.नि.दां. कडे वळला आणि मग आमच्या बाजुच्या सीट्वरुन एक मध्यम वयाचे गृहस्थ नाटकात संवाद म्हणत-म्हणत रंगमंचावर येतात तसे आमच्यात घुसले. आणि मग पुढले दिड तास ते किर्तन करत होते आणि आम्ही श्रवणभक्ती. त्यांना रत्नागिरीला उतरायचे होते म्हणुन त्यांच्याकडे आमच्यापेक्षा मोप वेळ होता. त्यांच बोलण चालु असताना मध्ये वाटायच कि आम्ही वाचलेल्या पुस्तकांची यादि त्यांना द्यावी निदान त्याने तरी ते गप्प बसतील. शेवटि कोणत्यातरी थांब्यावर ते चहा पिऊन आले, तदनंतर वर्तमानपत्रात डोकं खुपसलं म्हणुन निभावलं. अखेर कोयनानगरला पोहोचलो. गाडितुन उतरल्यावर एक व्यक्ती अमितपाशी आली आणि "Tiger Census" साठि आलात का? वगैरे विचारु लागले. तेहि त्याचसाठि आले होते, त्यांच आड्नाव डोईफोडे होतं. त्यांच्याबरोबर चिपळुणचे दोघेजण होते - दिक्षीत आणि काणे. त्यांच्याशी ओळख करुन घेतली. परत थोडं खाऊन आम्ही वन अधिकार्‍यांच्या कार्यालयाकडे कुच केले. ’मोहितेसाहेब’ आत आलेल्यांची नावे नोंदवुन घेत होते. अमीतला बघताच त्यांनी ’या मेंगळे’ करुन आत बोलावुन घेतलं. अमीत सलग चौथ्यावर्षी येत असल्यानं त्याला ते ओळखत होते. आम्हाला नंतर वाघाचे ठसे कसे घ्यायचे? कसे मोजायचे? ते कागदावर कसे उतरवायचे आणि सरते शेवटी त्यांचा साचा कसा तयार करायचा याची सीडीच दाखवली. सीडी दाखावल्या नंतर आम्हाला मागच्या अंगणात नेले तिथे कोयनानगरचे प्रमुख अधिकारी नाईक साहेब बसले होते. त्यांनी माहिती द्यायला सुरुवात केली - "जंगलात सिगारेट, दारु, तंबाखु, बिडी, गुटखे हे प्रकार चालणार नाहित. जंगलातुन तुम्हाला काहिहि बाहेर नेता येणार नाहि, २५००० रु. चा दंड होईल तो वेगळाच. जंगलातल्या प्रत्येक काडिवर फक्त जंगलाचाच हक्क आहे. तुमचे ग्रुप लिडर जसे सांगतील तसेच वागा. स्वत:ची अक्कल लावु नका. एकटे-दुकटे विनाकारण झाडि-फांदितुन फिरु नका. वाघ-बिबट तुमची चाहुल लागताच लपतील, पण चुकुन अस्वल समोर आले तर मोजुन मिनीट्भरात तुमच्या बरगड्या मांसातुन मोकळ्या करेल. ते खाणार नाहि तुम्हाला, मात्र चोथा बनवुन फेकुन देईल. म्हणुन प्राण्यांना त्रास होईल असे वागु नका. तुम्ही पाहुणे आहात ते मालक आहेत, पाहुण्यांसारखेच वागा. तुम्हाला वाघाचे आणि बिबट्याचे ठसे मिळवायचे आहेत. आत्ता आत जसं दाखवलय तसे त्याचे साचे बनवायचे आहेत. कदाचित दोन वेगवेगळ्या खोर्‍यातल्या ग्रुप्सना एकाच वाघाचे ठसे मिळतील, काहि प्रॉब्लेम नाहि उलट आपल्याला वाघाचे क्षेत्र समजेल. आणि ज्यांच नशीब असेल त्यांनाच वाघ बघायला मिळेल. मी गेली ३२ वर्ष सर्विस करतोय महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जंगलात पण मला फक्त ३ वेळाच समोरा-समोर वाघ दिसलाय. फार बुझरं जनावर आहे ते. घाबरत नाहि पण समोर यायला लाजतं. म्हणून काळाजी घ्या परफ्युम्स-डिओ असल्या गोष्टि जवळ बाळागु देखिल नका, इथेच काढुन ठेवा. जंगल हे परफ्युम लावुन फिरण्याचं ठिकाण नव्हे. तुमचाच वास प्राण्यांना १-२ km पर्यंत सहज समजतो, त्यातुन डिओ वापरलेत तर जनावर दिसणं देखिल मुष्किल होईल. वाघ सोडाच दुसरा कोणताहि प्राणी देखिल दिसणार नाहि. आणि महत्वाची गोष्ट - झुंगटि, मालदेव, पाली, आणि बामणोली या ४ ठिकाणी वाघाचा ठसा मिळायलाच पाहिजे!!! ४६४ रनिंग km. च्या जंगलातुन तुम्हाला हे सगळं शोधायचं आहे. मेहनत घ्या नक्कि ठसा-विष्ठा मिळेल, किंवा म्हणालो तस नशीब असेल तर वाघ-बिबटहि बघायला मिळेल. आता इतर महत्वाच्या सुचना - कोणाला काहि गंभीर आजार? त्याची औषधे? सगळं व्यवस्थित आहे ना? कारण देव न करो पण कोणाला काहि झालेच तर तुमच्या मदतीसाठि यायला आम्हाला किमान ३ तास आणि परतीच्या प्रवासाला ३ तास असे ६-७ तास कोयनानगरला पोहोचायला लागतील. कोणाला दमा-ब्लड्प्रेशर असे त्रास असतील तर त्यांनी आत्ताच सांगा. त्यांना फिरण्या ऐवजी तितकेच दुसरे महत्वाचे काम देऊ! नंतर तुम्हा-आम्हाला त्रास नको. शिवाय आता रेडिओ-गाणी ८ दिवस विसरा, जंगलात मोठ्याने बोलायचे-हसायचे नाहि. कोणी इथे पिकनिक किंवा ट्रेकसाठि आलेलं नाहिये. हिमालयात ट्रेक केला याची मिजास इथे नकोय, इथल्या दगड-माती समोर टिकाव लागेल याशी शाश्वती नाहि. असो All the best!!" आमच्या ७०-७५ जणांचे छोटे ग्रुप करुन कोयनेच्या वेगवेगळ्या खोर्‍यातले विभाग वाटुन दिले. आम्हाला "झुंगटि" विभाग आला होता. आमच्या तिघांबरोबर तेजस डांगरे हा चौथा भिडु देखिल दिला. शिवाय अभयारण्याची माहिती असलेला माहितगार माणुस आम्हा प्रत्येक ग्रुपला दिला. आमच्या ग्रुपचे लिडर होते - "बापू गुरव" पण ते कोयना नगरला आले नव्हते. ते आम्हाला लॉंच मधुन जाताना अवसारी सब-स्टेशनला भेटणार होते. यानंतर सगळे जेवायला पांगले. आम्हाला उन्हात चालत जाऊन हॉटेलमध्ये जायचा कंटाळा आला होता. म्हणुन मिनलने आणलेले ४-४ ठेपलेच आम्ही घश्याखाली उतरवले आणि गप-गुमान लॉंचकडे घेऊन जाणार्‍या जीपची वाट बघत बसलो. जवळपास दिड-दोन तास वाट बघावि लागली. मधल्या वेळेत आम्हाला एक काच, स्केच-पेन,मोठ्ठा प्लास्टिक मग, ट्रेसिंग पेपर्स, प्लॅस्टर ऑफ पॅरीसआणि ७-८ किलोचा तांदुळ-तेल-मसाले असा शिधा दिला. आधीच आमच्याकडे सामान भरपूर त्यातुन काच आणि बरोबर ८ किलोचा शिधा. बर!!तो शिजवणार कशात हा आमच्या पुढिल यक्षप्रश्न होता, कारण आम्हि बरोबर भांडि आणलि नव्हती. पण मग मोहिते साहेबांनी अवसारी स्टेशनला नोरोप ठेवला कि बापू गुरवांबरोबर २ भांडि-पातेलि पाठवा. अखेर दोन तास उन्हात तिष्ठत काढल्या नंतर एक जीप्सी-जीप आली आणि म्हणता-म्हणता भरली देखिल. मला आणि तेजसला मागे लटकुन उभ रहावं लागलं. ५ मिनीटांचा वळण-वाटांचा रस्ता संपवुन "कोयना धरण" अशी पाटि लावलेल्या महाद्वारातुन आत गेलो. आत शिरताच उजव्या हाताला प्रचंड मोठ्ठे धरण आणि डावीकडे नजर जाईल तिथपर्यंत पाणीच-पाणी. भणाण वारा सुटला होता. जीप थांबली तिथे समोर थोडं खाली ३-४ लॉंच लाटांवर डुलत होत्या. आम्हाला एका मोठ्या लॉंच मध्ये बसण्यास सांगितले त्यात ऑल्रेडि एक पुण्याचा ग्रुप बसला होता. आम्हि सामान आत टाकुन फतकल मारली. अजुन काहि ग्रुप आले कि निघु हे उत्तर आम्हि जवळपास दिडतास ऐकत होतो. आम्हि बसलेल्या ठिकाणी उन येत होत. अखेर एक-एक ग्रुप येऊ लागला. आम्हि मांडि सोडुन शेवटि फोर्थ सीट वरती आलो. सामान आणि माणसं यांनी लॉंच खच्चुन भरली आणि सरते शेवटि संध्याकाळी ०५:१० ला आम्हि कोयनानगरचा किनारा सोडला. लॉंच पाण्याच्या मध्यभागी आल्यावर कोयनेचं पाणी आमच्या अंगावर उडु लागलं. अर्ध्या तासाने मात्र त्या अवघडुन गेलेल्या लॉंचचा आम्हाला कंटाळा येउ लागला. अधुन-मधुन मिनल-अमीत बरोबर गप्पा चालु होत्या. शिवाय पुण्याच्या त्या ग्रुप मध्ये २ मुली होत्या, त्यातली एक दिसायला चांगली होती! तेव्हढाच कंटाळा कमी करायला तिचा हातभार लागत होता. अखेर तासभर लॉंच गेल्यावर अवसारी आलं. तिथे २ माणसं लॉंच मध्ये चढली. त्यातच आमचे ग्रुप लिडर "बापू गुरव" होते. साधारण साठिकडे झुकणारं वय, बारीकशी पण काटक अंगकाठि, काळा रंग, समोरचा एक दात पडलेला, अर्ध टक्कल आणि उरलेल्या केसांची चांदि झालेली एक मध्यम उंचीची मुर्ती ३-४ पिशव्या आणि खांद्याला बंदुक लावुन लॉंच मधे शिरली. लॉंच मधील गर्दी अजुन वाढली. त्यांनी बरोबर २ पातेली आणली आहेत हे कळल्यावर आमचा जीव त्याच २ भांड्यांमध्ये पडला एकदाचा. त्यापुढे जवळपास दिड-पावणेदोन तास लॉंच चालुच होती. लॉंचची अवस्था "स्वदेस" मधल्या त्या तराफ्या सारखिच झालि होती. अमितचे हे चौथे वर्ष असल्याने आम्हि त्याला त्याचे अनुभव विचारत होतो. अमित सांगत होता - "सर्वात महत्वाची गोष्ट म्हणाजे अर्ज विनंत्या करुन देखिल वर्षभर कोणालाहि आत सोडत नाहित. अशा ठिकाणी आपण ७ दिवस राहणार आहोत. इतक्या कोअर एरियात कोणालाच जाऊ देत नाहित. खुप घनदाट जंगलात आपण जाणार आहोत, जिथे सुर्याचे किरणहि जमिनीला स्पर्ष करु शकत नाहित. माहितगार माणासाशिवाय कोणी आत गेलाच तर वाट मिळणं कठिण आहे." लॉंच थांबली तेव्हा आम्ही ५ जण झुंगटि पश्चिमेला उतरलो. रात्रीचे ८ वाजले होते. अंधाऽऽऽर होता. आकाशात चंद्रकोर होती तितकाच काय तो प्रकाश. आम्हाला भरपुर खडकाळ भागात उतरवुन लॉंच निघाली. लॉंचचा दुर जाणारा आवाज आमचा एकटेपणा वाढवत होता. २-४ मिनीटात लॉंचचा आवाज ऐकु येईनासा झाला आणि रातकिड्यांचा सुरु. नजर चंद्रप्रकाशाला सरावल्याने आता आजुबाजुचं थोडं थोडं दिसु लागलं होतं. तरी बॅटरीच्या प्रकाशात आम्ही आमचं सामान मोठ्या दगडा जवळ रचुन घेतले. खरंतर आमच्या बरोबर मिनल असल्याने आम्हाला सुरक्षीततेच्या दृष्टिने टॉवर दिला होता. पण बापूकाका म्हणाले "समोरच्या झाडितच आहे तो टॉवर, पण रात्री समोरची भुसभुशीत माती चढुन जाणं कठिण आहे! इतकं सामान त्यातुन हि बायडि बरोबर आहे, आज आपण उघड्यावर काढु, फटफटंलं कि जाऊ तिथं!!" तरी डोक्यात प्रश्नचिन्ह घेउन आम्हि त्यांना हो म्हणालो.

कोयनेचा बापू -
बापू गुरव त्या चंद्रप्रकाशात आम्हाला जंगलातले किस्से त्यांच्या गावरान भाषेत सांगत होते - "आमचा जनमच जंगलामधला, रात्री-बेरात्री सुदिक आम्हि इथं उठ-बस करतो. या बापू गुरवाला इथल्या समद्या वाटा माहित हायेत! उन-पाऊस काय पण फरक नाय पडत. जनावराचं पण भय नाय, कमरेला कोयता असला कि झाल. मी आत्ता बंदुक आणलिये पण ती नुसती आवाज करायला. पण त्याची गरजच नाय, माणसाची चाहुन लागली कि जनावर दुर जातं." आम्हि श्रवणभक्ती करतच होतो. ते ऐकता-ऐकता त्यांची तांदुळाची भाकरी आणि चटणी बाहेर आली आणि आमचे ठेपले. बापू चालुच होते "जनावरांत अस्वल लई येडं, खात नाय पण फाडुन टाकतं पाकं(पार)! मागं एकदा ३ बायड्यांना माज्यापाठि जंगल बघायला पाठिवल हुतं, हे दगड दिसतय? तसच गोल दगड होतं, त्यापाठि अस्वल अस्स बसलं हुत! एक बाई ओरडायला लागली पर म्या जरा बाजु-बाजुनं नेलं, ती एकच वाट हुती कारण, अस्वल भी न हलता बसुन र्‍हायल. बघा जनावर केव्हा काय करल न्हाय सांगु शकत!!" मध्येच पाण्याकडे बघुन म्हणाले - "या साली लई पाणे हाय! मागल्या वर्षी नव्हतं, तेव्हा पाणी पाकं खालि गेलतं, मग काय रातभर कधी अस्वलाची चाहुल, कधी बिबट्याची कधी रान डुकराची! यंदा भरपुर पाणी हाय, जनावराला जास्त खाली सरकायची गरज नाय!" जेवण(?) झाल्यावर ते समोरच्या दगडामागे डोकावले आणि "अरे रे! लई चिखल हाय आत. हा दगड आतुन पोकळ हाय! ३ माणुस सहज झोपेल, शिवाय वर भोक पडलय, त्यामुळ कय शिजवलं तर धुर वरती निघुन जातु. पर यंदा साली पाणी भरपुर हाय म्हणून आत चिकल हाय! आता इथचं जरा साफ करुन झोपु, मी अस्सा थोडा वरच्या बाजुला झोपेल!" असं म्हणून ते तिथले गोटे साफ करु लागले. मी-अमित-तेजस त्यांना मदत करु लागलो ५ मिनीटात "झोपणेबल" जागा झाली एकदाची. स्लिपिंगमॅट जोडुन त्यावर चादर पसरली .... गाऽऽर वारा अंगाला झोंबत होता. मोजुन १० फुटांवर पाणी होते. "झोपा बिनधास्त!!" - इति बापू गुरव. त्यांनी त्यांचे अंथरुण पसरले, एक कांबळ घेतली नी आडवे झाले. आम्हाला काय डोंबल झोप लागणार? एकतर पाण्याच्या लाटांनी चुबुक-चुळबुक-चुबुक-चुळबुक असे आवाज येत होते, त्यामुळे सारखं पाण्यावर कोणीतरी जनावर आलयं असंच वाटायचं, मधुनच झुळकिने पाचोळा वाजायचा कि डोळ्यांवर आली-आली म्हणणारी झापडे जायची. शेवटी रात्री १०:३०-११:०० ला झोप लागली असावी. परत थंडिने जाग आली तो या क्षीतीजापासुन त्या क्षीतीजी पावतो सगळं आकाश लाख्खो तार्‍यांनी भरुन गेलं होतं, इतकं सुंदर आकाश मी ७-८ वर्षांपुर्वी भिवपुरीतच बघितलं होतं. घड्याळात बघितलं, साधारण २:३० होत होते. परत थंडि आण सावधपणा यामुळे तासभर त्या चांदण्या मोजण्यात गेला. परत डोळे मिटले. मधेच एक पक्षी आमच्या डोक्याशीच येउन ओरडायला लागला म्हणुन जिला कदाचित झोप म्हणता येईल अशी काहितरी अवस्था देखिल चाळवली गेली - तेजसने मोबाईलवर ०४:३०चा अलार्म लावला होता आणि साहेबांनी पक्ष्याचा आवाज अलार्म म्हणून ठेवला होता, इतके करुन साहेब डाराडुर आणि आम्हि तिघे टकटकित. परत पुढचा तास या कुशीवरुन त्या कुशीवर करण्यात गेला.

दिवस पहिला:
फटफटलं तशी आन्हिकं उरकली. अचानक बापूंनी उजव्या हाताला समोरच्या किनार्‍यावर "गवा!!" असं म्हणतच बोट दाखवलं. सकाळि ०६:१५च्या कोवळ्या किरणात देखिल त्याचे गुडघ्यापासुन खालचे पांढरे पाय समजुन येत होते. गवा "पांढर्‍या पायाचा" असला तरी आमच्या पहिल्या दिवसाची सुरुवात मात्र त्याने चांगली केली होती. मिनलला मी बॅग मधुन दुर्बीण काढुन दिली, पण तोवर गव्याला आमची चाहुल लागली असावी, त्याने परत जंगलाचा रस्ता धरला. साधारण ०७:१५ ला आम्हि कॅमेरा, दुर्बीण गळ्यात आणि पाणी-खाणं असं गरजेपुरतं सामान छोट्या सॅक मध्ये घालुन निघालो. बाकिच सामान त्या जंगलात उघड्यावर टाकुन जाण्यात काहिहि धोका नव्हता. किनार्‍याला धरुनच आम्हि मऊ मातीत प्राण्यांच्या पायाचे ठसे बघत पुढे सरकत होतो. गव्यांचे, अस्वलांचे, रानमांजराचे, साळिंदरांचे झालेच तर टिटवीचे सुध्दा. बापूकाका त्या ठश्यां बद्दल सांगत होते. मग आमच्या पाच जणांत थोडे-थोडे अंतर आपसुकच पडत गेले, आम्हि वेगवेगळ्या ठिकाणी वाघ-बिबट्याचे ठसे शोधु लागलो. मधेच अमितने हलक्या आवाजात इशारा केला. आम्हि जवळ जाताच त्याने हाताने जमिनिकडे बोट दाखवले. मधे बदामासारखि गादि आणि ४ बोटं. बिबट्याचा ठसा होता तो. त्याच्याच आसपास अजुन तसेच ठसे होते. आम्हि त्याचे चारहि पाय मिळतील असे ठसे घेतले, कारण आम्हाला त्याची लांबी काढायची होती. ठसा घेताना फार काळजीपूर्वक घ्यावा लागतो. शिकारी जनावरांच्या मागच्या डाव्या पायाचा ठसा घेतात. ठश्याची लांबी-रुंदि आणि गादि याची मापे घेतात. तर जनावराची लांबी मोजताना पुढच्या पायाची बोटे ते मागच्या पायाची गादि असे अंतर मोजतात. लांबी मोजल्यावर तो बच्चा आहे कि तरुण आहे कि पुर्ण वाढ झालेलं जनावर आहे ते समजतं. पूर्ण वाढ झालेल्या नर बिबट्या हा जास्तीत-जास्त ८० सेंमी पासुन ८५ सेंमीपर्यंत असतो. तर मादि साधारण ७८ सेंमी पासुन ८२ सेंमीपर्यंत असते. शिवाय वाघ-बिबट्या नराची बोटे गोलाकार तर मादिची थोडि लांबुडकि असतात, अर्थात नराचा पंजा हा चौरस तर मादिचा लांबुडका-आयताकृती असतो. आधी आम्हि काच त्या ठश्यावर दोन पट्ट्यांच्या सहय्याने ठेवली. काचेवर स्केचपेनच्या सहाय्याने त्याच्या डाव्या पायाचा ठसा काळजीपूर्वक उतरवुन घेतला, लगोलग त्याला ट्रेसिंगपेपर वर उतरवलं त्याची मोजमापे घेतली. शेवटि त्याभोवती चार पट्ट्या रचुन त्यावर आम्हि PP ओतले आणि साचा घेतला. सकळिच मिळालेल्या बिबट्याच्या ठश्याने आमचा उत्साह द्विगुणित झाला. पुर्ण वाढ झालेल्या बिबट्याचा ठसा होता तो, साधारण ८३ सेंमी होता. बापूंनी पाण्याकडे नजर टाकली - "१७-१८ दिवसांपूर्वीचा असल! पाणी फार दुर नाय!" आमच्या त्या सगळ्या हालचालीमुळे समोरील जंगलातील माकडे सावध झाली आणि त्यांनी ४-६ वेळा मोठ्यांदा "हुप्प-हुप्प" असा कॉल केला. म्हणाजे आता सगळ्या जंगलाला २ पायांचे कोणी संशयित प्राणी त्या भागात आल्याचे समजले होते तर. तो ठसा घेऊन आम्हि पुढे निघालो, डोक्यावरुन २ टिटव्या जीवाच्या आकांताने ओरडात उडत होत्या. बहुदा आम्हि त्यांच्या एरीआत घुसखोरी केली असावी. टिटव्या दगडांमध्येच त्यांछी अंडि घालतात. ती सहजासहजी समजुन येत नाहि. त्यासाठिच त्यांचा सगळा आटापिटा चालला होता. पुढे गेल्यावर एका ठिकाणी भरपुर जांभळाअच्या बीया एकगठ्ठा पडल्या होत्या. बापू म्हणाले -"अस्वलाची विष्ठा", अर्थात आजुबाजुला अस्वलाच्या पाऊलखुणा होत्याच. मधुनच सांबारांचे "फुर्र-फुर्र-फुर्र" असे तर भेकरांचे ’फ्रॅक-फ्रॅक-फ्रॅक-फ्रॅक" असे पोटातुन काढलेले आवाज येत होते. एखादे शेकरु पण मधुनच ओरडत ओरडत होते. विविध पक्ष्यांच्या आवाजाने सगळे रान गजबजले होतेच, पक्ष्यांबद्दल फारसे ज्ञान नसल्याचा किंवा बरोबर कोणी पक्षीतज्ञ नाहि याचे फार वाईट वाटल तेव्हा. मधुनच ६-७ पोपटांचा थवा डोक्यावरुन किनार्‍यापार व्हायचा. चालुन थकल्यावर एके ठिकाणी बसलो होतो डाव्या हाताच्या ओहोळात अमीत उतरुन ठसे शोधत होता. तिथेहि त्याला बिबट्याचे ठसे मिळाले. आणि जवळंच सांबाराची हाडं पण होती. परत येताना समोरुन एक लॉंच येताना दिसली. ती बघुन बापूकाका आम्हाला बसायला सांगुन झपझप खाली उतरले. आम्हि झाडाच्या सावलीत बसुन हलक्या आवाजात चित्तम्पल्ली आणि माडगुळकरांच्या रानकथांबाबत गप्पा मारत होतो. मिनलने कृष्णमेघ कुंते यांचीहि आठवण करुन दिली. या गप्पात वेळ निघुन गेला. नंतर २०-२५ मिनीटांनी आम्हालाहि बापूंनी खाली बोलावले. तिथे आमच्या बरोबरच एक ग्रुप जो झुंगटि पूर्वेला उतरला होता तो जमला होता. त्यांना काय झटाका आला होता माहित नाहि, पण त्यांना पश्चिम झुंगटि पाहिजे होतं. बहुदा आम्हि यायच्या आधी त्यांचा बापूं बरोबर काहितरी वाद झाला होता. पण आम्हाला खाली बोलावल्यावर आम्हि सांगितले - "आमच्या बरोबर मुलगी आहे! टॉवर आम्हालाच पाहिजे! मोहिते साहेबांनीच तिच्यासाठिच टॉवर असलेला झुंगटिचा भाग आम्हाला दिलाय!!" वाद एका वाक्यात खलास. पण तो ग्रुप तिथुन परत गेला नाहि. आम्हि आदली रात्र जिथे काढली होती तिथेच थोडं वर त्यांनी त्यांच बस्तान टाकलं. आम्हि आमच्या कॅम्प वर परत आलो. मी आणि अमितने आमच्या आणि मिनलच्या सॅक टॉवरखाली आणुन टाकल्या. आमच्या त्या ठिकाणा पासुन टॉवर २ मिनीटावर दिसत होता. पण त्या भुसभुशीत मातीतुन वर चढणे जरा त्रासदायक प्रकार होता. उन्हाळ्यात कोयनेचे पाणी कमी होत जाते, ते मागे सरताना लाल मातीच्या पायर्‍याच बनवत जाते. पण त्या कच्च्याच असतात. एका वरुन पाय घसरला की पुढच्या ४ पायर्‍या तुटतात. २ मिनीटावर दिसणारा टॉवर त्या मातीच्या रस्त्यामुळे १० मिनीटावर गेला. शेवटि कसरत करत मिनल, तेजस देखिल वर आले. बापुकाकांना ते नविन नव्हतं ते सराईत पणे वर आले. आमची दुपारच्या जेवणाची सुरुवात झाली. जेवणासाठि समोरच्याच एका झाडाखाली चुल मांडली. मी, अमित आणि तेजस मिळुन कांदे-बटाटे आणि लसुण कापुन मिनलला देत होतो. मिनलने झकासपैकि खिचडि केली, त्या आठ दिवसात मिनल आमची अन्नपुर्णा होती. कापाकापीच आम्हि बघायचो, शिजवायची मात्र तिच. खुप दिवसांनी असं चुलीवरचं खायला मिळालं. चुलीवरच्या जेवणाची चवच छान असते. जेवण झाल्यावर त्याच झाडाच्या सावलीत आम्हि ताणुन दिली. आम्हाला बापुंचा त्यांच्या बरोबर काय वाद झाला ते माहित नाहि, पण पूर्ण दुपारभर बापु बड्बड करत होते. आम्हि दोन्हि ग्रुप एकमेकांना समोरासमोर सहज पाहु शकत होतो. दुपारी साधारण ०४:३० च्या आसपास टॉवर मागच्या जंगलातुन बापू आनंदाने धावत आले - "चला लवकर, तिथं, त्या तिथं, मागं पट्टेर्‍याचा मोठा ठसा हाय!" आम्हि लगबगीनं सगळ ठसा घेणाचे सगळे सामान आणि कॅमेरे उचलले आणि झपाझप त्यांच्या मागुन निघालो. ठश्या शेजारी बसत बापू म्हणाले - "असे या बाजुनी या! बा! बा!! बा!!! कसला पंजा हाये बघा त्यो! पट्टेरीचाच! अजुन कोणाचा??" दुपारी ०४-०४:३० देडिल जंगलात अंधारुन आलं होत. सुर्यास्ताला अजुन २ तास तरी होते. बाकि जाऊ दे, आम्हाला आमच्या पासुन २५०-३०० फुटांवर सुर्यकिरणे पसरलेली दिसत होती. पण आमच्या आजुबाजुला इतकि दाट झाडे-झुडुपे होती कि एकहि कवडसा आमच्या आसपास पडत नव्हता. आम्हि फोटो काढायचा प्रयत्न करत होतो. त्या अंधार्‍या जागेत नीट फोटो येत नव्हता, फ्लॅश वापरला कि फोटो सपाट यायचा. शेवटि मी माझ्याकडे असलेल्या हेडटॉर्चने २-३ कोनातुन गादिची आणि बोटांची सावली येईल असे फोकस टाकुन फोटो घेतले. मनासारखा किंवा त्यातल्या-त्यात बरा फोटो आल्यावर आम्हि त्याची मोजमापे घेऊ लागलो. १५X१५ सेंमी चा म्हणजे अर्ध्या फुटाचा पंजा होता. चौरस पंजा म्हणजे नराचा पंजा. आणि त्याची स्ट्राईड होती १२६ सेंमी. म्हणजे जवळ जवळ सव्वाचार फुट. आता त्यापुढे साधारण २ फुटि तोंड आणि मागे तीन साडे तीन फुट शेपुट जोडलं कि झाला नाकापासुन शेपटापर्यंत १० फुटि वाघ तयार. बापुंनी परत विचार करुन सांगितलं - " २ दिवसापूर्वीच असंल!! असल्या मातीत ४ दिसापेक्षा जास्त नाय खुणा टिकत. आत्ताच बघा किती त्रास होतोय आपल्याला? असंल २ दिवसा पूर्वीचाच असल!!" त्या ठश्याचा आम्हि साचा घेतला, मोठ्या आनंदान आम्हि परत आलो. रात्री बापू सांगत होते - "मागं असाच एकदा सांजच्याला निघालो होतो, पाऊस लागला होता, कड्यावरुन असा वळलो तर समोर वाघरु, मला पाहुन बुझलं आणि काय वाघच त्यो, गुरगुरला नी अश्शी दानकन उडि मारली दरीत, खाली थोड्या झाडोर्‍याचा आवाज झाला आनी कड्याखालुन दुर-दुर सरकत गेला. अस्सा काटा आला अंगावर!! पण म्या बघितलं, त्याचे पंजे उठले हुते, ते मोठ्या पानानं झाकले, जवळच त्यानं आखाडा(लोळण्याची जागा) केला हुता त्ये बी बघितलं, दुसर्‍या दिवशी हापिसात सायबाला जाउन समद सांगितलं. लगेच गाडि घेऊन माझ्या मागं ४ साहेब आलं. त्यांची खात्री पटल्याव्र मला कोल्हापुरच्या हापिसात नेऊन मला सर्टिफिकट दिलं. सगळ्या मजुरात म्याच लई वेळा वाघ बघितलाय! दर महिन्यात एकदा तरी दिसतोच. वाघ दिसला, तो वाटेवरच असेल तर हात जोडुन म्हणतु - तु तुज्या वाटेनं जा, मला माज्या वाटेनं जाऊ दे!!" हे सगळ सांगताना बापूंच्या चेहर्‍यावरच्या अनुभवी सुरकुत्या लयीत हलत होत्या. मधुनच क्षणभर थांबुन डोळे मितुन, मानेला होकारार्थी झटाका देत बोलायची त्यांची सवय आम्हाला देखिल सरावाची झाली होती. हे सगळं ऐकताना मिनलने एकिकडे मॅगी शिजवायला ठेवले होते. शिवाय सकाळाची बरीच खिचडी देखिल उरली होती. शिवाय बापू काकांची काल रात्रीची एक तांदुळाची भाकरी देखिल उरली होती. भाकरी अगदि कडक झाली होती पण अमित ने ती मॅगीत टाकली खिचडि संपवे पर्यंत भाकरी परत मऊ झाली होती, कोणीहि आत्तापर्यंत तांदुळाची शिळी भाकरी आणी मॅगी अशी डिश कल्पनेतहि खाल्ली नसेल ती आम्हि प्रत्यक्ष खात होतो. ’पानात पडेल ते आणि सगळ्यांना सारख्या प्रमाणात’ या नियमाने सगळ्यांनी निमुट्पणे ती भाकरी-मॅगी डिश मटकावली. जेवण झाल्यावर सामानाची आवरा-आवर करुन आम्हि टॉवरकडे मोर्चा वळवला. टॉवर मोठ्ठा होता. आम्हि पाचहि जण झोपल्यावरहि बॅग, पाण्याच्या बाटल्या, पाऊच बुट हे सगळं ठेवायला बरीच जागा होती. संध्याकाळपासुनच रातवा काऽपूऽ-काऽपूऽ-काऽपूऽ चा ताल धरुन बसला होता. आणि अजुन ४-५ ठिकाणहुन त्याला तशीच साथ मिळत होती. रातकिडे देखिल अविरतपणे आपली किरऽऽऽऽऽऽऽऽऽकिरऽऽऽऽऽऽऽऽऽ ची ड्युटि न थांबता पार पाडत होते. पहिला दिवस आजुबाजुच्या वातावरणाशी जुळवण्यात गेला. सुर्यास्त झाल्या्वर जेवण सोडुन काहिच काम नव्हतं. जेवण करुन आम्हि ०९:१५ ला टॉवरवरती आलो आणि गप्पा मारता मारता ०९:४५ ला सगळे आडवे. मुंबईत आम्हि ०९:४५ ला जेवतो आणि १२:००-०१:०० ला झोपतो. इथे TV, Internet, Mobile, Walkman असे काहिच नव्हते, त्याची गरजहि नव्हती. आज काय-काय झालं याची उजळणी मनातल्या मनात चालु होती. जागा अनोळखि होती म्हणा किंवा आपण जंगलात आहोत म्हणुन म्हणा टॉवरवर देखिल नीट झोप लागत नव्हती. दर २ तासांनी जाग येतच होती. त्यातुन मी कडेला झोपल्याने लोखंडि टॉवरच्या पट्ट्या मधुनच खांद्याला, कोपराला गाऽऽऽर चटका देत होत्याच. मग परत कुशीवर व्हायचे, पांघरुण नीट करायचे आणि झोपायचा प्रयत्न करायचा हे वारंवार होत होते. मधे एकदा तेजसच्या कृपेने कालचाच तो पक्ष्याचा अलार्म देखिल वाजला, मग त्याची मान मुरगाळायचा कार्यक्रम देखिल पार पडला. अखेर कंटाळुन ०५:४५ ला मी आणि मिनल उठुन बसलो.

दिवस दुसरा:
फटफटत होतं. अंगाभोवती पांघरुण कवटाळुन नुसते बसुन राहिलो. बसल्या जागेवरुन समोरचा किनारा दिसत होता, कोणी प्राणी दिसत आहेत का म्हणुन बघत बसलो होतो. अमित देखिल उगीचच तोंडावरुन पांघरुण घेऊन झोपला होता. दर २ मिनिटांनी तो कुशी बदलत होता. शेवटी बापूकाका उठले आणि खाली उतरले. टॉवरचं मॅनहोल उघडावं लागलं अर्थात त्यावर पसरलेल्या अमितला उठावं लागलं. पटापटा आवरुन ७ वाजता भटाकंतीला निघालो. अमितने बापूंना समोरचा डोंगर दाखवुन विचारले - "बापू, तो डोंगर कसला?" बापुंनी लांब हात पसरला - "त्यो? झुंगटिचा किल्ला!! कोणी नाय जात तिथं!" किल्ला शब्द ऐकल्यावर आमचे कान अपोआप टवकारले गेले. "चला मग जाऊन येऊ!!" - अमित. बापूंनी मानेनेच नाहि नाहि म्हणत सुरुवात केली - " काय बघायचयं? काय गावनार नाय!" पण अमितने त्यांना राजी केलं. चालता-चालता वरच्या फांद्यांवर माकड उड्या मारत होतं. अं हं माकड नव्हे शेकरु होतं. शेकरु म्हणजे मोठि खार, मोठि म्हणजे मांजरी इतकि मोठि खार! आमचे पाय झुंगटि किल्ल्याकडे पडत होते. मधेच अमितने मिनलला विचारले - "मिनल लायटर कुठे आहे?" मिनलने खालचा ओठ बाहेर काढुन खांद्यावरच्या बॅगकडे अंगठा हलवला. " वा! म्हणजे अस्वल आलं तर काय टाईम प्लिज! म्हणुन बॅगमधुन लायटर काढणार आहे का?" - अमित. मी विचारले - " लायटरने अस्वलाला काय होणार? डोंबल?" त्यावर अमित उत्तरला अरे चटकन खालचा पाचोळा पेटवायचा कि ते पळुन जातं." एव्हाना मिनल तो लायटर काढुन तो पेटवायचा प्रयत्न करत होती, पण काहि केल्या तो पेटत नव्हता. अमित पुढे झाला आणि मिनलच्या खांद्यावर हात ठेवुन म्हणाला "घे काढला अस्वलाने तुझाअ कोथळा बाहेर!!" आम्हि सगळे खी-खी करुन हसलो. इतका वेळ बापू आमचे उद्योग बघत होते. "अहो! नाई काई होनार, आसं कसं अस्वल येईल उगाच?? माणसाला बघुन दुर जानार ते! आपन त्याच्या रस्त्यात आलो किंवा जखमी आसल तरच येड्यावानी अंगावर येतय!! आम्हि परत बापूम्च्या मागे चालायला सुरुवात केली. मध्ये मिनलला थोडि सुकलेली विष्ठा मिळाली. ती उचलुन तिने बापुंना विचारले हि कोणाची असेल? बापुंनी बरीक डोळे करुन बघितले - "हेऽऽऽ साळिंदराचं असणार!" आजुबाजुला चौकस नजर टाकत आम्हि पुढे झालो. आता चांगलाच चढ आणि रेताड जमिनीचा पट्ट सुरु झाला. खसाखसा पाय घसरत होते. मी सोडुन बाकि सगळ्यांकडे काठ्या होत्या. त्या आधारावर ते पुढे जात होते. मला काठिचा अडथळा वाटतो, म्हणूनच मी नव्हती घेतली काठि. शिवाय एका हातने मला कॅमेरा सांभाळायचा होताच. शेवटी चार जण बसतील इतपत जागा आली, तसे विसावा घेण्यासाठि थांबलो. पाण्याची देवाणघेवाण झाली. वरची झाड खसखसली परत ’शेकरु’. हे शेकरु बर्‍यापैकि धीट असतं. तो झाडाच्या शेंड्यावरुन खाली उतरत आमच्या डोक्यावरील फांदिवर आलं आणि आमच्याकडे बघु लागलं. अमित त्याचा फोटो काढणार तोच त्याने दुसर्‍या झाडावर उडि मारली आणि परत वरती झरझर निघुन गेलं. आम्हि देखिल पुढे कुच केलं. झुंगटीच्या त्या पट्ट्यात एक मोठ्ठ झाड लागलं. त्या झाडाच्या खोडात ३ जण सहज बसु शकतील इतकं मोठं खोड होतं आणि उंची म्हणाल तर आसपासची झाडं त्याच्या अर्ध्यावर देखिल पोचत नव्हती. त्या झाडाला बघुन उगीच माझे अष्टसात्विक भाव जागृत झाले. सगळं सोडुन त्या झाडाखाली तप करायला बसायचा मोह मला क्षणभर झाला. गौतम बुध्दाला देखिल त्या बोधीवृक्षाकडे बघुन असचं काहिसं वाटलं असेल कदाचित. अर्थात एखादि अप्सरा तपोभंग करायला येईपर्यंतच मी तप केले असते.....असो, तर सांगण्याचा मुद्दा असा - "पेड हो तो ऐसा, वरना ना हो!" ते झाड कॅमेराच्या कुठल्याहि अँगलच्या बाहेरचं होत याचं मला आजहि अतोनात दु:ख होतय. शेवटी साधारण २ तास ते अंगावर येणारं रान तुडवल्यावर अचानक डोक्यावरचं छप्पर उडाल्यागत प्रकाश दिसला. आता सगळी खांद्या इतकी कारवी वाढली होती, ती पार सुकली होती. चालताना त्याच्या बीया कपड्यांवर लगटत होत्या. हि कारवी असते तिला सात वर्षातुन एकदाच फुले येतात. एका ठिकाणी बापु थांबले पलीकडे खो‌ऽऽऽल दरी दिसत होती - "हे, आपण सातार्‍यात नी समोरचे डोंगर रत्नागिरीतले. आपण दोघांच्या शीमेवर उभे र्‍हाईलो! आहोत!" मग बापु आमच्याकडे वळुन म्हणाले - " गेल्या १०० वर्सात प्राणी नी कातकरी सोडुन कोन बी आलं नसेल हिथं!" आम्हाला जवळपास अमेरिगो फर्डिनांडला अमेरीकेचा किनारा मिळाल्यावर जितका आनंद झाला असेल तितका आनंद झाला. रत्नागिरीतील त्या काळ्याकभिन्न पहडांना डोळ्यांत साठवत आम्ही शेवटचा टप्पा चढायला सुरुवात केली. वाटेवर मधे २-३ ठिकाणी ताजं शेण पडलं होतं. सगळ्यात पुढे जाणार्‍या अमितला बापु म्हणाले - "पुढं चाहुल घ्या, एखादा गवा असल, दिसला तर तसेच मागे फिरा! आल्या पावली निमुट वळुया!" पण सुदैवाने गवा नव्हता. आम्ही झुंगटीच्या किल्लावर पोहोचलो. पण तो किल्ला वगैरे काहि नव्हता नुसतेच पठार होते. साधारण १००X१५० फुटाचे असेल जेमतेम बाकि सगळा उतार आणि रखरखाट. आजुबाजुला आम्ही अंदाज घेतला पण बांधुन काढल्याची एकहि खुण आम्हाला मिळाली नाहि. जरा निराशा झाली पण आम्हि उजव्या हाताला खाली बघितले - कोयनेचा अख्खा झुंगटि भाग मी कॅमेरात बंद केला. फारच सुंदर दृष्य होते ते. त्या पठारावर जाऊन दरीच्या टोकाशी फतकल मारली आणि बंद मोबाईल सुरु केले. घरी एक-एक फोन लावुन "अजुन तरी सुखरुप आहोत!" असा निरोप दिला. मग थोडं खाणं झालं. आदल्या रात्री एका भांड्यात मी घरुन आणलेले मुग-मटकि व सोयाबीन भिजत घातले होते. सकाळी निघताना मीठ घालुन बांधले होते. पौष्टिक ते पौष्टिक शिवाय तहान लागत नाहि. अशा दोन्हि सोयी भिजल्या कडधन्यात असतात. अर्धातास त्या पठारावर काढला. आमच्या समोर थोडासा उजव्या हाताला ३-४ डोंगर रांगा ओलांडुन ’वासोटा’ किल्ला आम्हाला खुणावत होता. साधारण १०:४५ ला आम्ही परतीला लागलो. खाली उतरताना परत शेकरुने दर्शन दिले. हा मगाशीच दिसलेला शेकरु असावा. साधारण ११:४५ ला आम्ही मुक्कामावर आलो. आज आंघोळ करायचीच हा निश्चय केला होता. उतरताना मी अमितला सुध्दा तयार केलं. आम्हि मुक्कामावर पोहोचताच "चला पोहायला जाऊया!" या अमितच्या वाक्यावर चष्म्यावरुन बघत मिनल म्हणाली - "मला कांदे-बटाटे कापून द्या आणि मग जे करायचे आहे ते करा!!" आमच्या पोहण्याच्या उत्साहावर मिनलने अख्ख्या कोयनेचे पाणी फिरवले. नीमुटपणे १५-२० मिनीटे खुऽऽऽप काबाडकष्ट करुन कांदे-बटाटे चिरुन दिले, आणि...... पाण्याकडे धूम ठोकली - येऽऽऽऽऽधबाऽऽक!!! अडिच दिवसांनी आंघोळ होत होती. आधी घामाचे घाण कपडे व्यवस्थित धुवुन घेतले. वारा इतका भणाणा होता कि पिळुन कपडा आडवा घातला न घातला कि अर्धा वाळुनहि जायचा. कपडे-मोजे धुतल्यावर मग किमान पुढचा सव्वा तास - " कोयना जळी खेळु खेळ कन्हैय्या काऽऽऽऽ लाजता??? सुरु होते. मी स्वत: दिड वर्षांनी असा भरपुर पाण्यात पोहायला उतरलो होतो. वा!वा!! तो सव्वा तास जे काहि पोहणे-डुंबणे झाले काय सांगावे? कोयना आमच्या तिर्थरुपांनी आम्हाला आंदण दिल्यासारखी त्या गाऽऽऽर पाण्यात आम्हि उंडारत होतो, पण मिनलला आमचा तो आनंद फार काळ बघवला नाहि. सव्वा तासाने तिने आम्हाला - "बास झालं!!जेवायला चला आता!" अशी वरुनच हाक मारली. मिनल तेव्हा फार दुष्टपणे वागल्याचा आरोप आम्हि तिघांनी दाखल केला. कोणाहि सहृदय माणसाच्या अंतकरणाला दयेने पाझर फुटावा असे उतरलेले चेहरे घेऊन आम्हि नाईलाजाने बाहेर पडालो. टॉवेल उचलेपर्यंत वार्‍याने अर्धे अंग कोरडे झाले होते. धुवुन वाळत घातलेले कपडे कडकडित वाळले होते. परत तेच स्वच्छ कपडे अंगावर चढवुन तो चढ मोठ्या कष्टानं चढु लागलो. चढ पुर्ण होत आला आणि आऽऽहाहा गरमा गरम खिचडिचा जो काहि घमघमाट नाकात शिरला कि बस्स्स! इतका वेळ पाण्यात राहुन ’भुक’ नावाची गोष्ट या जगात असते याचा विसर पडला होता, त्या स्मृतीभ्रंशातुन आम्ही चटकन बाहेर आलो. धावा-धाव करुन आम्हि ताटे घेऊन "ओम। भवती भिक्षां देहि!" करत बसलो. मग आमच्या अन्नपुर्णेने आम्हाला पोटभर जेवु घातले. अन तिच्यावरील "त्या" दुष्टपणाच्या आरोपातुन आम्हि तिची "बाईज्जत" मुक्तता केली. पोहुन झाल्यावर जेवण्यासारखे आणि जेवुन झाल्यावर दुपारी तासभर झोप काढण्यासारखे दुसरे सुख क्वचितच कुठले असेल. त्या झाडांच्या गार सावलीत अंगावर कवडसे खेळवत आम्हि ताणुस दिली. जोरात वारा सुटला कि पानांचा सळसळाट वाढायचा. थोड्यावेळाने जाग आली तो सुर्याचा रंग पिवळसरपणाकडे झुकला होता. सुर्यास्त होईतो आम्हि प्राण्यांचे निरीक्षण करत टॉवरच्या उजवीकडिल उतारावर बसलो होतो. संध्याकाळ झाली तशी जेवणाची तयारी केली. झटपट भात आणि रस्साभाजी तयार झाली. जेवल्यावर अर्थात तसे काहि काम नव्हते ८-८:३० लाच टॉवर वरती जाऊन बसलो. बापू तर १५ मिनिटात डाराडुर झोपले.

आम्हि सगळे पडल्या पडल्या दिवसभराचा विचार करत होतो. अर्धातास असाच गेला रातकिडे किर्र-किर्र करतच होते. अचानक टॉवरच्या मागच्या बाजूला खाली पाचोळ्यातुन चालण्याचा आवाज आला. तसा मी सावध झालो. दोन मिनिटांच्या शांततेनंतर परत स्पष्टपणे तसाच चालण्याचा आवाज म्हणजे उतारावरच्या पाचोळ्यावर खादा माणुस घाईघाईत चालल्यावर जसा आवाज होईल तसाच आवाज होता. आता अमित सुध्दा उठुन बसला म्हणजे मी एकट्यानेच आवाज ऐकला नव्हता. परत शांतता आता आवाज टॉवरच्या दिशेने सरकत होता. मिनल देखिल कानोसा घेत बसली. तितक्यात तेजस कुशीवर आमच्याकडे वळुन म्हणाला "एऽऽऽऽ खाली चालतय कोणीतरीऽऽ!" तसे आम्हि तिघेहि उखडलो, ओठांवर बोट टेकवुन त्याला गप्प हो म्हणून दटावले. अमित हळुच उठला मागोमाग मी आणि मिनल होतोच. आता सगळाच टॉवर लोखंडि असल्याने थोडिशी हालचाल सुध्दा आवाज निर्माण करत होती. दुसरा कुठलाहि आवाज झाला कि खालचा चालणारा आवाज बंद होत होता. यावेळि अश्या आडरानात कोण आलं होतं? खरं सांगायच तर हृदयाची धकधक वाढली होती. कारण सांभर - भेकर - हरिण रात्री भटकत नाहित. वाघ - बिबट्या मार्जरवंशिय असल्याने त्यांच्या चालण्याचा इतका मोठा आवाज होतच नाहि. मग इतक्या सहज रात्री कोण येत आहे हे समजत नव्हतं. अमितने हळुच उशाशी ठेवलेला ३२ LEDचा अतिशत पॉवरफुल हेडटॉर्च उचलला. आवाज जवळ - जवळ येत होता. पौर्णिमा अगदिच दोन दिवसांवर होती म्हणून चंद्रप्रकाशहि बराच होता. आवाज जसा टॉवरच्या खाली आला तसा अमितने एकदम हेडटॉर्च सुरु केला पण मध्ये इतक्या फांद्या आणि पाने होती कि जमिनिवर फक्त कवडसेच पडले. लगोलग खालचा आवाजहि थांबला. आम्हि पाने-फांद्या चूकवुन प्रकाश खालपर्यंत पोहोचवत होतो पण काहिहि फायदा नव्हता. टॉवरच्या उजव्या बाजुने वाकुन अमितने तसाच प्रयत्न केला पण काहिहि दिसत नव्हतं. अखेर अमितने हेडटॉर्च बंद केला. परत पाच मिनिटं रातकिड्यांच्या किरकिरि शिवाय काहिच ऐकु येत नव्हते. परत चालण्याचा आवाज आता मात्र तो आवाज जंगलातल्या आतल्या भागात सरकत बंद झाला. बापू काका डाराडूर होते. मधुनच घोरण्याशी साम्य असलेले आवाज ते काढत होते. पुढचे २ तास आम्हि फक्त कानोसे घेत जागेच होते. जरा खुट्ट झालं कि झोप उडायची. दुसर्‍या दिवशी बापूंना रात्रीचा प्रकार सांगितला तसा "माणसासारखा चालणारा आवाज??? आवो साळिंदरऽऽऽ" इतकच म्हणून त्यांनी विषयच उडवुन लावला.

पण तशीच दुसरीहि रात्र नविन आवाजाने भरलेली होती. पण त्या आधी दुसर्‍या दिवशी सकाळि काय झाले ते सांगतो - सकाळी आवरुन निघालो. पाण्याला वळसा घालुन समोरच्या किनार्‍याला लागलो काठाकाठाने काहि ठसे मिळत आहेत का बघत होतो. बर्‍याच ठिकाणी गव्यांच्या पाऊलांच्या खुणा होत्या. मधुन मधुन साळिंदर, टिटव्यांच्या खुणाहि मिळत होत्या. एकमेकांपासून १०-१२ फुटांचे अंतर ठेवुन आम्हि एका रांगेत चाललो होतो. सर्वात पाठिमागे बापूकाका होते अचानक बापू काका दबक्या आवाजात ओरडले "आबाऽऽबा बाऽऽ ते बगाऽऽऽऽ" आम्हि वळुन बापूंकडे बघु लागलो तसे ते उखडले - "आवो त्ये बगा तिथंऽऽ आरं आरं त्यो बगा पट्टेर्‍याऽऽऽ बाबो तो बगा लवकर, झाडित सरकतोय!!!" ते दूर डोंगराकडे बोट दाखवत होते पण आंम्हाला त्या डोंगरातली नेमकि दिशा कळत नव्हती. ते परत ओरडले -"आरं गेला रं अस्सा पिवळा पिवळा सोन्यागत रंग!" आणि हातात जवळपास दोन-अडिच फुटाचे अंतर पाडुन "समोरुन येवडा तरि चेहरा आसंल रं‌‍ऽऽऽ च्यॅक चॅक!!" असं म्हणून डोक्याला हात लावुन खालि उकिडवे बसले. हे सगळं मोजुन दहा-बारा सेकंदात घडलं होतं. परत त्यांनी विचारलं "नाय दिसला कोणाला??" आम्हि पडलेले आणि बेसिकली वाघ तिथे होता ह्याची नुकतीच डोक्यात एन्ट्री झालेली संवेदना घेऊन गोंधळलेले चेहरे घेऊन उभे होतो. आम्हि नाहि म्हणताच "श्या!" असा वैतागलेला स्वर काढला. अहो काका पण तुम्हि पाहिला ना? या मिनलच्या प्रश्नावर ते हसुन म्हणाले -"आगं म्या काय दर महिन्या आड असा वाघ बघतोच. तुम्हि बघितला तरच त्ये मोजणार! म्या किती बी सांगितलं तरि फायदा नाय!!" आता आम्हि जाऽम एक्साइट झालो. मग बापुंनी सावकाश ती जागा दाखवली, पावसाळ्यात पाणी वाहुन एक घळ तयार झाली होती तिथे तो वाघ खाली वाढलेल्या कारवीत उतरला असावा. आम्हि बापूंना म्हणालो - "चला मग जाऊ तिथं. मिळेल ठसा - विष्ठा चलाऽऽ!" तसे बापू काका सरळ खाली बसले - "नाय भेटनार काय बी! ह्ये आसली जमिन हाय!" म्हणत तिथल्या रेताड जमिनीकडे बोट दाखवले. पण आम्हाला आता रहावत नव्हतं. आम्हि त्यांच्या मागे भुणभुण करु लागलो - "बापूकाका चला ना!" अखेर गवताची काडि उपटुन ती नाचवत ते उठले - "परत सांगतो काय नाय भेटणार!" अचानक ते थांबले आणि हाताने खाली बसा अशी खुण केली मग समोरच्या झाडिकडे बोट दाखवले आणि म्हणाले "रानडुक्कर" एक भरभक्कम रानडुक्कर तुरुतुरु पळत समोरच्या झाडित गायब झालेले आम्हिहि पाहिले. पाच मिनिटे ते बाहेर येईल अशी आशा धरुन आम्हि दबकुन बसलो पण बहुदा त्याला आमची चाहुल लागली असावी. ते परतले नाहि. मग आम्हि त्या घळिकडे कूच केले. त्या घळिकडे पोहोचायला आम्हांला किमान सव्वातास लागला. बापू म्हणाले ते खरे होते काहिहि मिळणे शक्यच नव्हते. पण अमित - तेजस म्हणाले "आम्हि जरा पुढे जाऊन येतो विष्ठा वगैरे मिळते का बघु!" बापूंनी हवे ते करा असा हात झटकला. एका खुज्या झाडाच्या सावलीत आम्हि तिघेहि बसलो. मग आमच्या गप्पा सुरु झाल्या बापू वाघा बद्दल माहिती सांगत होते - "वाघ काटेरी झाडित नाय शिरत हे तवचा(त्वचा) असते ना त्यची लई हुळहुळी असते, जरा काय लागलं कि चिघळणार, मानंला लागंलं कि चाटुन साफ बी करत येत नाय त्यावर माश्या बसल्या तर जखम वाढते!" वाघांना बच्चे कुठल्या मोसमात होतात? यावर सांगायला लागले साधारण "दिवाळिच्या टायमाला हिथं आलात तर सगळ्या दर्‍यांतुन डरकाळ्या ऐकु येतात. नर - मादा एकमेकांना शोधत आवाज देत फिरतात. त्यांच मीलन झालं कि वाघिण चार येक महिन्यांनी पिलांना जनम देते!" आमच्या अश्या गप्पा चालु होत्या पंधरा - वीस मिनिटे झाली तरी हि दोघं आले नाहित तसे बापू काका "हिथुन हलु नका!" असे सांगुन त्या दोघांच्या मागावर गेले. मीनल आणि मी एकहि शब्द न बोलता बसलो होतो. आता मनात नवे नवे विचार येऊ लागले आता वाघ अच्चानक समोर आला तर? वाघ आपल्याकडे लपुन बघत असेल? ती वाघीण तर नसेल? एकटिच असेल कि बच्चे असतील? समजा बछडे असतील आणि बछड्यांसाठी आम्हि धोका वाटलो तर??? अमित - तेजस का नाहि आले अजुन?? अचानक अमितच्या हसण्याचा आवाज आला आणि या विचारांची साखळि तुटली. तिथे वळुन बघितलं तर तिघेहि हसत - हसत येत होते. "काय बे? काय झालं?" विचारताच त्याने जीभ बाहेर काढली आणि "आई शप्पथ!" अश्या आशयाची मान हलवली. मग येऊन समोर बसला आणि सांगायला लागला - "इथुन दहा मिनिटांवर आम्हि गेलो होतो, अचानक समोरच्या झाडित काहितरी पिवळट हलताना दिसले. तसा तेजसला हाताने थांबायला सांगितलं आणि मी हळुच पुढे गेलो. झाडित आता हालचाल स्पष्ट दिसत हो्ती. अचानक २-३ काळे पट्टेहि दिसले. पट्टे जागेवरुन थोडे हलले. झाडिपासुन मी १५-२० फुटांवर उभा होतो. खरं सांगायच तर हृदय असं वीतभर वर सरकुन घशाशी आलं होतं पण होईल ते बघु एक फोटो मिळावायचाच म्हणुन अजुन २ पाऊलं पुढे गेलो आणि त्या पिवळ्या-काळ्या प्रकाराने झर्रकन हालचाल केली आणि..... मोठ्ठी रानकोंबडि उडुन वरच्या फांदिवर गेली. तीच्या शेपटिच्या पिसार्‍यातले काळे पट्टे तेव्हा नीट दिसले!" असं म्हणुन त्याने डोक्यावर हात मारला आणि परत हसायला लागला. पण तरि त्यावेळि अमितने ती दोन पाऊले पुढे जाण्याचा धोका घेतला याबाबत त्याचे कौतुक वाटले.

पदरि काहिहि न मिळाल्याची निराशा घेऊन मागे फिरलो. पण वाटेत जंगलातल्या पायवाटेच्या शेजारी अमितला वाघाची सुकलेली वि्ष्ठा मिळाली अनेक दिवसांपूर्वीची असावी, उचलल्यावर तुकडे पडत होते म्हणुन एका तिला पिशवीत घालुन कॅंपकडे निघालो. कॅंपसाईट जवळ आलो तर वन विभागाची लॉंच किनार्‍याला लागली होती. त्यात काहि - मुलं होती जवळ आल्यावर समजलं कि पुण्याचा ग्रुप होता(हां तोच चांगल्या चेहर्‍याची मुलगी फेम!) आणि मग एक वनखात्याचा माणुस लॉंच मधुन उतरला - "आलात? वाट बघुन दहा मिनिटात निघणारच होतो!" मग ’कुतुहलापोटि’ मी विचारले "हा ग्रुप तुमच्याबरोबर कसा?" लॉंच मधले "कुतुहल" काहितरि खाण्यात मग्न होते. तसा उखडुन म्हणाला "शिक्षा म्हणून फिरवतोय त्यांना.... मालदेवला होते काल यांच्यामुळे वाघाची शिकार गेली, बरं झालं आम्हि जवळाच कॅंप केला होता. यांचा आवाज इतका होता कि वाघ आणि शिकार दोघेहि पळुन गेले! जंगलाचे नियम माहित नाहित त्यांना इथे राहु देण्यात अर्थ नाहि..... तसहि ग्रुप मधले ३ जण आजारी आहेत. ह्यांना आता दिवसभर जंगलातल्या वेगवेगळ्या कॅंपवर फिरवणार आणि रात्री उशीरा कोयना नगरला सोडणार. तशीहि गाडि आहे स्वत:ची, जातील पहाटे घरि!" मग गेल्या दोन दिवसांतली माहिती आमच्या कडुन त्याने घेतली मग अजुन पाऊण तास त्या ग्रुपला पिदवायला टंगळमंगळ केली उगीच ठरवुन गप्पा वाढवत होता. अखेर कुतुहलासकट गडि आला तैसा निघोन गेला. गेल्यावर परत आधिच्याच ४ दिवसांतले टाईम टेबल गिरवले आणि रात्री टॉवरवर गेलो.

रात्री उशीरा जंगलाच्या आतुन जनावराचा कण्हण्यागत जोरजोरात ओरडण्याच्या आवाज येत होता. नेहमीप्रमाणे बापूंना जगाची फिकिर नसल्याने ते झोपेत गुडुप झाले होते. आम्हि आपापले तर्क लढवत होतो. भेकराला शिकारि कुत्र्यांनी किंवा बिबट्याने दबोचले असावे आणि बिचारं शेवटचे आचके देत ओरडत असावं. किमान वीस - पंचवीस मिनिटे हा आवाज येत होता. मग अर्धा तास तसाच गेला परत अजुन थोडा दुरु तो आवाज यायला लागला पण यावेळि पाच मिनिटांत तो बंद झाला, जंगलाचा कानोसा घेत आम्हि उशीरापर्यंत जागे होते. अमितने त्या रात्री मालिशवाल्याचा धंदा उघडला होता आमच्या थकलेल्या पोटर्‍यांना आणि पाऊलांना अमितने झकास मसाज करुन दिला - "हलकटांनो! फुकटाची सेवा करुन घेताय?? घरी गेल्यावर माझ्या अकाउंट मध्ये प्रत्येकि पाचशे रुपये ट्रान्स्फर करा!" असं म्हणत त्याने आपल्या नव्या साईड बिझनेसची सुरुवात केली. दुसर्‍या दिवशी सकाळि परत वन विभागाची लॉंच आली त्यातुन तीन चार नविन माणसे बाहेर पडली. त्यांच्याकडे HTC चा अर्थात नॅव्हिगेशन सकटचा फोन, नाईट व्हिजनची सोय असलेला कॅननचा महागडा डिजिटल कॅमेरा, वॉकि टॉकि अशी बरीच इ-साधने होती. आल्यावर त्याने आमच्या कडच्या वाघाच्या ठश्याला पालथे घाउन त्याचे फोटो घेतले. मग गप्पांच्या ओघात रात्रीचा प्रसंग त्यांना सांगितला तसे म्हणले "नाहि शिकार नसेल झाली. शिकारीत एकदम झालेल्या छटापटिने आधी झाडांच्या खसपसीचा आवाज येतो व पाच-एक मिनिटे जनावर धडपड करते मग सगळे शांत होते. वाघ - बिबट्याने शिकार केली तर ते बहुदा थेट गळा पकडतात त्यामुळे विंड पाईप आपोआप बंद होतो त्यामुळे आवाज निघण्याचा सवालच नाहि. गुदमरुन शिकार प्राण सोडते. तुम्हांला अस्वलांचा आवाज ऐकु आला असावा, सध्या अस्वलांचा मेटिंग सिझन आहे, मादा अस्वलाचा आवाज असेल तो. अस्वलांच्या मीलनांत बराच ते गोंधळ घालतांत एकमेकांवर गुरगुरणे, मोठ्याने आवाज करणे सुरु असते. दिवसा उकाड्यामुळे अस्वले सावलीत किंवा जंगलातल्या आतल्या भागात फिरतांत, जांभळे, बोरं, मध शोधत, आपली हद्द ठरवत हे भटकणे सुरु असते. उकाड्याने हैराण अस्वले एप्रिल - मे मध्ये मीलन सहसा रात्री किंवा पहाटेच्या थंड वेळी करतात!" ह्या सगळ्या ज्ञान वाटपा नंतर त्यांच्या डिजीकॅमचे जादुचे प्रयोग बघितले. त्या फक्त लेन्सची किंमतच चाळिस हजार होती. आमच्याकडुन नविन माहितीची नोंद करुन ते परत निघुन गेले. दररोज इथे प्राण्यांच्या बाबतीतली नविन माहिती मिळत होती.

मधला एक दिवस फारसे काहि झाले नाहि. सकाळि दुर दोन अस्वले आणि दुपारी गव्यांचे तीन वेगवेगळे गट दिसले. इतकेच. पण यातला सर्वात कळस म्हणजे आमचा जंगलातला शेवटचा दिवस होता. १९ मे २००८ - बुध्द पौर्णिमा.
शेवटाच्या दिवशी संध्याकाळी आम्हाला हे दिसलं, आमच्या पासुन २५०-३०० फुटांवर हे सगळं चालल होतं. -

क्रमश: