Tuesday, May 19, 2009

मग माझा जीव तुझ्या वाटेवर वणवणेल...

मग माझा जीव तुझ्या वाटेवर वणवणेल..... लता दिदिंनी गायलेलं सुंदर गाणं, प्रथम या गाण्याचे कवी ग्रेस आहेत असं मला वाटलं होत, पण हे सुरेश भटांनी लिहिलेलें काव्य आहे(माहिती दिल्या बद्दल धन्यवाद यशोधरा आणी प्रशांत).


Get this widget | Track details | eSnips Social DNA

Monday, May 18, 2009

गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा...

परवा १६ तारखेला निवडणुकिचा निकाल लागला. त्यावरुन आचार्य अत्र्यांचा एक किस्सा आठवतोय. अशीच निवडणुकिची रणाधुमाळी झाली, अत्रे स्वत: उभे होतेच पण स्वत:च्या भागात प्रचार करण्यापेक्षाहि जास्तवेळ आपल्या साथीदारांच्या प्रचारात घालवला विशेषत: स. का पाटिलां विरुध्द जो उमेदवार उभा होता त्यासाठीतर त्यांनी आपले वक्तृत्व पणाला लावले. सकांवर अत्र्यांचा खास राग होता. स का पाटीलांना ते "नासका पाटील" म्हणत. झालं मत मोजणीला सुरुवात झाली बातमी आली अत्रे जिंकले, पाठोपाठ बातमी आली सका पाटील पडले. अत्र्यांनी प्रचार केलेला उमेदवार दणदणीत जिंकला. अत्रे दुहेरी खुषीत घरी आले, हार-तुरे स्वीकारत दारात उभे राहिले त्यांच्या मुलीने ओवाळायला तबक समोर धरले आणि एक कार्यकर्ता बोंबलत आला "साहेब, घोळ झालाय, मगाची बातमी चुकिची होती तुम्हि हरला आहात....साहेब तुमचा पराभव झालाय!" सगळ्या कार्यकर्त्यांवर निराशा पसरली पण हतबुध्द होतील ते अत्रे कसले आपल्या पहाडि आवाजात ते मुलीवर ओरडले "अगं मी पडलो म्हणुन काय झालं??? सकाला त्याच्या एरीयात जाऊन पाडलाय तु ओवाऽऽऽळ!!" हा किस्सा आठवायचे कारण असे कि सध्या महाराष्ट्रात तशीच घटना पुन्हा घडलीये, १५व्या लोकसभेच्या निवडणुकीत नवखी मनसे सपशेल आपटली एकहि जागा मिळाली नाहि पण मुंबईच्या सहाहि जागांवर त्यांनी इतकी मतं खाल्ली कि शिवसेनेला त्याचा जबर फटका बसुन शिवसेनेच्या मुंबईतील सहाहि जागा गेल्या. तुला ना मला.... अशी अवस्था झाली.

सत्तेची वारांगना काय खेळ खेळेल आणि भल्या भल्यांच्या तोंडचे पाणी पळवेल ते सांगता येत नाहि. या निवडणुकेच्या आधी केलेली सगळी भाकिते आणि गणिते चुकवत कॉंग्रेसने मित्रपक्षांसकट २६१ जागा जिंकत निर्विवाद बहुमत मिळवले. आता २७२ च्या आकड्यासाठी त्यांना अजुन फक्त ११ खासदार हवे आहेत. ते मिळाले कि पुढल्या आठवड्या भरात मंत्रीमंडळ व शपथविधींचे कार्यक्रम होतील कि पुढली ५ वर्षे बघायला नको. मुंबईवरील हल्ला, जगभरातील आर्थिक मंदि व त्यामुळे बेरोजगारी, महागाई असे प्रश्न सरकार पुढे उभे होते. भाजपाला परत संधी आहे असे जाणवत होते. अणुकराराच्या घटनेत हातालाच हात दाखवुन अवलक्षण करणारे उपद्रवी डावे भलत्याच प्रादेशिक पक्षांची मोळी बांधुन तिसरी फळी उभी करत होते. तर काहि अति शहाणे चौथी फळी उभी करत होते. मायावती, जयललिता, लालु-पासवान, डावे सगळे फालतु भाव खात होते मधुनच महाराष्ट्रात "मराठी पंतप्रधानाची" पुडी सोडली जात होती. कोणाचाहि पायपोस कोणाच्या पायात नव्हता. भाजपा - कॉंग्रेस कोणीहि आले तरी टेकुचे राजकारण होण्याची चिन्हे होती. मग ह्याला कडेवर घे, त्याचे गालगुच्चे घे, याची दाढी कुरवाळ हे प्रकार पुढले ५ वर्ष होणार हेहि समजत होते. आणि १६ तारखेला दुपारी १२ पर्यंत सगळं चित्र नीट समजलं उत्तरप्रदेश, राजस्थान, मध्यप्रदेश इथे कॉंग्रेसने मुसंडि मारुन आपली खुंटि बळकट केली होती. एरवी कॅमेरासमोर यायला उत्सुक चेहरेच गायब झाले, अडवाणींसारखा दिग्गज निवृत्तीची भाषा करु लागला. डाव्यांच्या तर कोणीतरी उलट्या हाताने सणसणीत मुस्काटात मारावी अशी अवस्था झाली. २००४ मध्ये ४३ जागांवर असलेले हे अडेलतट्टु लाल खेचर या निवडणुकित माकप १६ तर भाकप ६ वर आले(या गोष्टिवर मी मनातल्या मनात किमान लाखाची माळ वाजवली आणि दिवसभर नाशिक ढोलावर नाचत होतो!). एरवी विनाकारण धावणारी रालुंच्या राजदची आगगाडी ४ वर अडवली (इतकेच कशाला लालुप्रसाद पाटाण्यात पटाशीच्या दातांवर आपटले आहेत.)


मी भाजपासमर्थक असलो तरी यावेळी जे झाले ते चांगलेच झाले असे वाटतेय. मुख्यत: एका मोठ्या पक्षाचे सरकार आले आणि पुढील पाच वर्ष स्थिर सरकार राहणार हे नक्कि झाले. निदान आर्थिक मंदिच्या काळात सरकार स्थिर असणे अतिशय महत्वाचे होते. पावलापावलाला अडवणुक करणारे लालभाई आता फार फार तर रागावलेले लाल डोळे आणि जनतेने जाहिरपणे फोडलेले थोबाड घेऊन विरोधी बाकावर बसतील आणि हात चोळण्यापलीकडे काहिहि करु शकणार नाहित हि २००९ मधली सर्वात मोठी गॊष्ट. बरोबरच स्थानिक पक्षांचे असलेले अवास्तव महत्व कमी होऊन जनतेने राष्ट्रिय पातळीवरील पक्षांनी मते दिली हि त्याहुन उत्तम गोष्ट. लोकशाहि प्रगल्भ आणि बळकट होतेय हे दाखवणारी घटना आहे. २००४ मध्ये कॉंग्रेसला १४५ जागा मिळाल्या होत्या तर यावेळी त्यांना २०६ जागा मिळाल्या. भाजपाला चांगलाच फटाका बसलाय २००४ मध्ये त्यांना १३८ जागा मिळाल्या होत्या यावेळी त्यांना ११६ जागा मिळाल्या आहेत म्हणजे २२ जागा निसटल्या आहेत. प्रमोद महाजनांची उणीव, अटलजींची निवृत्ती, आपापासतले हेवेदावे, आणि राजस्थाम - मध्यप्रदेशातील फाजील आत्मविश्वास भाजपाला नडलाय. आता डोळे उघडतील हि अपेक्षा. तरी यावेळी सरासरी ५२-५३% इतकेच मतदान झाले ते निदान ७०% झाले असते तर कदाचित निर्णय थोडे बदलले असतेहि पण हि जर तर ची गोष्ट झाली.

आता थोडं महाराष्ट्राबद्दल - महाराष्ट्रात देखिल या निवडणुकिने बरेच राजकिय भूकंप घडवुन आणले आहेत. अर्थात इथेहि कॉंग्रेसची चांदि झाली आणि वेगवेगळ्या कारणांनी राष्ट्रवादि - शिवसेना यांना फटके बसले आहेत. मुंबईत मनसे इफेक्ट मुळे शिवसेनेच्या सगळ्या जागा गेल्या. सुरुवातीला म्हणालो तसे तुला ना मला घाल... अशी अवस्था नक्किच झाली विशेषत: मनसेने मराठीच्या मुद्यावरच शिवसेनेची लाखा - लाखांची मते खाल्ली आणि आपोपाप काहि अमराठी नेत्यांना मुंबईतुन लोकसभेवर जायला वाट करुन दिली. ह्याला विनोद म्हणा किंवा दैवदुर्विलास म्हणा पाच वर्षे काहिहि करु शकत नाहि. शिवसेनेहि हि अवस्था तर राष्ट्रवादिचा बालेकिल्ला असलेल्या पश्चिम महाराष्ट्र खिळखिळा झाल्याची जाणीव त्यांना झाली. कोल्हापुरात मंडलिकांनी केलेली यशस्वी बंडखोरी आता राष्ट्रवादिसाठी नक्किच चिंतेचा विषय आहे. तर हातकणंगलेतील शेट्टींचा विजय हा तिथल्या शेतकर्‍यांचा राष्ट्रवादिवरील उघड रोष दाखवतो, तिथे प्रचारासाठी तळ ठोकुनहि जयंत पाटिल काहिहि चमत्कार घडवु शकले नाहित यावरुन राष्ट्रवादिने धडा घ्यावा. असाच फटाका भाजपाला विदर्भात कॉंग्रेसकडुन मिळाला पण उत्तर महाराष्ट्रात अचानक चार जागांचा जॅकपॉट लागल्याने निदान भाजपाची लाज राखली गेली म्हणायची. उत्तर महाराष्टात राष्ट्रवादिने समीर भुजबळांच्या रुपाने एकमेव जागा जिंकली ती सुध्दा २०००० च्या निसटत्या फरकाने. मात्र हरुनहि हिरो ठरले ते मनसेचे हेमंत गोडसे. २ लाख मते खेचणार्‍या गोडसेंना नक्किच दाद द्यायला हवी. उत्तर महाराष्ट्रातल्या जातीय प्रचाराला कंटाळलेल्या आणि तरुण मतदारांनी गोडसेंना हा कौल दिला हे उघड आहे. सध्या तरी मुंबईच्या पराभवामुले सन्नाटा @ शिवसेना भवन असे वातावरण आहे. काल पासुन "बाळासाहेबांचे स्वप्न चक्काचुर केल्याबद्दल धन्यवाद राज ठाकरे!" असे खोचक sms फिरत आहेत. पण एकुण बघता राज ठाकरेंना जे साध्य करायचं होत ते त्यांनी केलं. पंजाच्या लढाईत हरल्यावरहि समोरच्याच्या ताकदिपेक्षा आपली बेटकुळी किती फुगते हे त्यांना आजमावयाचे होते ते त्यांनी केले. उलट आता मनसेची खरी परीक्षा आहे. येत्या चार महिन्यात जी विधानसभा निवडणुक येते आहे त्यात आपली करामत मनसेला दाखवणे आता भाग आहे कारण लोकांच्या अपेक्षा आता वाढल्या आहेत हे उघड आहे. सत्ता मिळाली नाहि तरी नजरेत भरतील इतक्या जागा जिंकुन विधानसभेचे व्यासपिठ स्वत:साठी मिळवणे आता मनसेला क्रमप्राप्त आहे.

जाता जाता आजची दणकेबाज गोष्ट सांगतो आज सकाळी ११:५५ च्या सुमारास निर्देशांकाने उसळी घेतली आणि थेट १४ हजारावर उडि मारली. स्थिर सरकार आलं म्हंटल्यावर निर्देशांकात वाढ होणार हे नक्कि होतं, पण १०% ची उसळी? कि त्यामुळे भारतीय शेअर बाजाराच्या इतिहासात प्रथमच अप्पर सर्किट लागण्याचा प्रकार घडवा? अखेर दिवसभरात दोनदा अप्पर सर्किट लावल्यानंतर बाजाराचे व्यवहार दिवसभरासाठी थांबवण्यात आले. एका तासात १०% पेक्षा जास्त चढ-उतार झाल्यास त्याला सर्किट म्हणतात, अश्यावेळी मार्केट अजुन अस्थिर होऊ नये म्हणून सेबी ताबडतोब थोडावेळ अथवा दिवसभरहि मार्केट बंद करते. दिवसभरात २ वेळा सेबीची धावपळ झाली हि मंदिच्या काळात टाळ्या वाजवण्यासारखि गोष्ट आहे.

एकुण काय नव्या कॉंगेस सरकारची आणि पर्यायाने देशाची सुरुवात चांगली झाली आहे म्हणायची. पुढे ५ वर्षात काय घडते ते काळावर सोडुन महाराष्ट्रात येऊ घातलेल्या विधानसभेवर लक्ष ठेवा!