Saturday, November 29, 2008

पण लक्षात कोण घेतो……?

२६ नोव्हेंबर २००८, रात्रीचे ९ वाजुन ४० मिनिटे ....मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस पासुन मृत्युचे चालु झालेले तांडव आत्ताशी कुठे शमतोय. अजुन ताज धुमसतेच आहे. दहशतवाद हा ऑक्टोबर १९४७ पासुनच भारताच्या पाचवीला पुजलाय. १९४७ च्या काश्मीर हल्ल्यापासुन परवाच्या घटनेपर्यंतचा प्रवास कसा झाला हा फार मोठ्ठा प्रश्न आहे. त्यावर शेकडो पुस्तके आणि हज्जारो लेख लिहुनहि झाले आहेत – होतील. पण किमान १६ अतिरेकि समुद्र मार्गाने मुंबई सारख्या भारताच्या अति महत्वाच्या आणि आर्थिक राजधानी म्हणावल्या जाणार्‍या शहरात उतरुन भारताच्या पोलिस-लष्कर-NSG यांसारख्या भक्कम यंत्रणांशी थोडि थोडकि नव्हे तर ४८ तासांपेक्षा जास्त झुंज घेतात. आपल्याकडिल अत्याधुनिक हत्यारे वापरुन १५३ व्यक्तींचा जीव घेतात. १४ पोलिस आणि ३ NSG चे जवान शहिद होतात. नागरीकांची तर गणनाच नाहि. पण हे किती दिवस २? ४? १०? नंतर सगळं विसरणार. मग परत एखादा बॉम्बस्फोट होईतो आम्हि झोपणार. हे चक्र असच सुरु राहणार. कदाचित या जगाच्या अंतापर्यंत(किंवा पाकिस्तानच्या). मुळात नागरीकांमध्येच जाणीव नाहि. वर्क स्पीरीट च्या नावाखाली मुंबईला सलाम ठोकले जातात. मग एखाद्या दिवशी सगळी मुंबई मिनिटभरासाठी स्तब्ध होऊन श्रध्दांजलीचा कार्यक्रम होतो. बाऽऽऽऽस झालं काम. दहशतवादाला धर्म नसतो वगैरे तत्वज्ञान ओकले जाते.

काल पंतप्रधान गरीऽऽऽब चेहरा घेऊन सगळ्याचा “कडक” शब्दात निषेध नोंदवत होते. क्षणभर वाटुन गेले हे आवाहन दहशतवाद्यांना दाखवले तर दया येऊन ते परतीची वाट धरतील इतका बापडा चेहरा आणि त्याहुन खालचा स्वर लावुन आमचे पंतप्रधान “प्रत्युत्तराची” भाषा करत होते. आमचे राष्ट्रपती-पंतप्रधान स्वत:च्याच ऑपरेशन केलेल्या पायांवर उभे राहतात हिच मोठी गोष्ट आहे असे सारखे वाटते. मी लिहिलेलं हे सगळं खुप आक्रस्ताळेपणाने किंवा अपमानकारक वाटेल पण हा आजच्या तरुण पिढीचा संताप आहे. जे भ्रष्टाचारी नेते मेले पाहिजेत ते ठणठणीत आणि जे जवान-किसान जगायला हवेत ते असे मरत आहेत.

मूळात ४८ तास झुंज घेऊ शकतील इतका दारुगोळा घेऊन हे यमदुत आत येतात कसे हा प्रश्न विचारल्यावर अजुनच नविन माहिती हाताशी लागते – ते सगळे किमान ३ महिने मुंबईत होते. दक्षीण मुंबईची खडा न खडा माहिती जमा करुन ते परत पाकिस्तानात गेले तिथे सगळी तयारी करुन कराची-गुजरात-मुंबई असा प्रवास करुन त्यांनी हा आकांत घडवला. खोलवर विचार केल्यास हे सगळे चक्र एकमेकांत खुप गुंतले आहे. पाकिस्तानासारखे असंतुलित व नेहमी हुकुमशहांच्या आणि मुल्ला-मौलवींच्या प्रभावाखाली राहिलेले राष्ट्र असताना त्याचा भारतावर परीणाम होणारच. अफगाणिस्थानात अल कायदा पुन्हा बळकट होतोय, गेले काहि दिवस इराण अमेरीकेशी अरेरावीने बोलतोय, ओसामा-अयातुल्लाची तत्वज्ञाने तिथल्या मदरश्यांतुन तरुणांच्या टाळक्यात ठसवली जात आहेत इतकि कि इंजिनिअर असलेले तरुण अल्लाहसाठी जिहाद करायला फिदायीन हल्ले करत आहेत. म्हणुनच अमेरीका-ब्रिटन-इस्राइल या ३ नावांनंतर “भारत” हा देश चौथ्या क्रमांकावर आहे हे विसरुन चालणार नाहि. त्यातुन चीन सारखे राष्ट्र भारता विरुध्द इथल्या शक्तींना छुपी मदत करते हे काहि नविन नाहि. दहशतवाद कीती पसरलाय हा विचार केला तरी हा देश कसा चालतोय याचे कौतुक करावे लागेल… वर काश्मीर, पंजाबात खलीस्तानवादी, नेपाळ सीमेपासुन विदर्भापर्यंत पसरलेले माओवादि, आसाम मधले फुटीरतावादि, सिक्किम-अरुणाचलप्रदेशावरची चीनची वखवखलेली नजर, भारताच्या कुशीतला कृतघ्न बांग्लादेश, खाली उत्तर श्रीलंकेत लिट्टे, त्यातुन वेगळा द्रविड देश असावा अशी मागणी करणारी माणारे या देशात आहेत याची जाणीव बहुदा लोकांना नाहिये. हे कमी की काय अंदमान-निकोबार मध्ये बांग्लादेशी घुसखोरी करत आहेत. भारत - श्रीलंकेच्या बरोबर खाली अमेरीका-ब्रिटनचा संयुक्त नाविक तळ “दिएगो गार्सिआ” आहेच. आणि हे सगळे काहि संत नव्हेत. आंतराष्ट्रिय राजकारणात कोणी कोणाचा मित्र नसतो. आपल्या देशाचा नागडा स्वार्थ इतकीच प्रत्येकाची खरी बाजु असते.

आपण जागतीक पातळीवर युनो अथवा सार्क सारख्या आंतराष्ट्रिय व्यासपिठांची “शक्तीपिठे” कधीच केली नाहित. मात्र पाक काश्मीर मध्ये भारत जवळपास “कयामत ढा रहा है!” हेच चित्र निर्माण करत फिरत होता-आहे. याचा परीणाम भारताला नक्किच भोगावा लागला होता. आता परत अमेरीकेचा नवनिर्वाचित अध्यक्ष ओबामा परत तेच त्रिपक्षीय वाटाघाटिचे गाणे गाऊ लागलाय. भारताने कुठल्याहि परीस्थीतीत फक्त द्वि-पक्षीय वाटाघाटीचा हट्ट सोडुन चालणार नाहि. खरतर काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असुन आज दुसर्‍या देशा बरोबर सीमा आखाव्या लागत आहेत. हे घोंगडं पं. नेहरुनी भिजवुन ठेवलय. “डोमेलच्या पुढे जाऊ नका! कारण त्यापुढे भारताशी इमान नसलेली कट्टर माणसे आहेत!” हि मेजर सेन यांना दिलेली सुचना भारताला आज महाग पडतेय. तेव्हा भारताला काश्मीर घेणे सहज शक्य होते तेव्हा काहि कारणांनी तो घेतला नाहि त्याचा फार मोठा इतिहास आहे. जागे अभावी इथे सगळा देता येत नसला तरी थोडक्यात सांगायचे तर फारुख अब्दुल्लाचा बाप शेर-ए-कश्मीर उर्फ शेख अब्दुल्ल याला स्वतंत्र कश्मीर हवा होता त्यासाठी त्याने पाकिस्तानच्या गळ्यात गळे घातले होते मात्र पाकिस्तान आपल्याला फसवत आहे हे कळल्यावर हाच शेख दिल्लीत पळत आला, नेहरुंनी त्याला मदत केली पण अशी त्रांगड निर्माण करणारी मदत जी आज भारताला त्रास देणारी ठरलीये. बर पुढे याच शेख अब्दुल्लाचे नेहरु-गांधी घराण्याने किती गालगुच्चे घेतले हे जगाला माहित आहे. त्याचा मुलगा फारुख अब्दुल्ला हा अजुनहि स्वतंत्र काश्मीरचा फुत्कार मधुन-मधुन टाकत असतोच आणि इतके करुन हाच फारुख अब्दुल्ला, राज ठाकरें विरुध्द शिवाजी पार्क वरील समाजवादि पार्टिच्या मेळाव्यात एकोप्याच्या गप्पा मारतो. बहुदा असे विनोद भारताखेरीज कुठे घडत असतील असे मला वाटत नाहि. आज ठरवले तरी युध्द आणि जगाची नाराजी ओढावुन ती निभावुन नेण्याची आर्थिक-सामाजिक-राजकिय-सामरीक ताकद भारतात येत नाहि तोवर संपुर्ण काश्मीर भारताला जिंकता येणार नाहि ये उघडे-वाघडे सत्य आहे. कारण यात पाक-भारतच नव्हे तर चीन व अमेरीकेचे हितसंबध गुंतले आहेत हे सांगणे न लगे. शाक्सगम, मानसरोवर च्या पलीकडिल भाग चीनचे साम-दाम-दंड-भेद वापरुन ६२ पासुन थोडा-थोडा करत बळकावलाय.

पाकचे असे तर या बाजुला चीन पाकिस्तानला अग्वादा बंदर बांधण्यात मदत करतय. श्रीलंकेला लिट्टे विरुध्द लढायला चीन हत्यारे पुरवतय. त्यामुळे श्रीलंका चीनची मांडलिक बनलि तर भारतालाच त्याचा त्रास होणार आहे. आणि आमचे करुणानिधी तमिळींना न्याय मिळावा म्हणुन लिट्टेची मदत करायला भारत सरकारला भाग पाडायचे उद्योग करत आहेत. लिट्टे काहि सत्संग भरवणारी धर्मदाय संस्था निश्चित नाहिये. आपला एक पंतप्रधान याच लिट्टेने ग्रासला होता. आपला शेजारी म्यानमार तिथे हुकुमशाहिच आहे, मादाम स्यु कि अजुन किती वर्ष तुरुंगात घालवणार आहेत? या प्रश्ना बरोबरच म्यानामारला चीन मदत करतोय हे जास्त धोकादायक आहे कारण अरुणाचलप्रदेशची शेकडो किलोमीटरची सीमारेषा म्यानामारला लागली आहे. भारतीय पंतप्रधान चीनच्या पारंपारीक प्रतिस्पर्धी असलेल्या जपानला भेट देऊन आल्यावर चीनची अस्वस्थता बघण्यासारखी होती. चीन भारताला सगळीकडुन घेरतय. या ड्रॅगनचा विळाखा आत्ताच खिळखिळा केला पाहिजे.

प्रत्येक जण झाल्याप्रकाराचा राजकिय लाभ उठवणार. विरोधी पक्ष सरकार-सुरक्षा यंत्रणा झोप काढत होतं का? हा प्रश्न विचारणार. सरकार म्हणणार येणारा डोक्यावर पट्टि बांधुन थोडिच येतो कि मी आतंकवादि आहे म्हणुन? आम्हि आता अमुक एक दल आणी समिती स्थापन करु. अश्या समित्या स्थापन होणार चौकशी होणार सरकार बदलले कि आपला स्वार्थ साधणारे निष्कर्ष काढायला लावणार किंवा नविन समिती बसवणार मग “तारीख पे तारीख” पडत राहणार १३ वर्षे खटले चालणार अर्धे आरोपि म्हातारे होऊन मरणार, काहि तुरुंगात जास्त सुरक्षीत राहणार, मसुद अझर सारखे सुदैवी आणि लंबी पहुच असलेले अतिरेकि एखाद्या विमान अपहरणानंतर सुटुन पाकिस्तानात जाणार मग “जैश-ए-मुहम्मद” सारखे आत्मघातकि जिहादि पथक स्थापन करणार, अफझल गुरु तुरुंगात मानव अधिकारवाल्यांच्या उपकारावर एकेक दिवस पुढे ढकलत राहणार. मात्र अफझल गुरु जिवंत कसा या अस्वस्थतेने संसदेवरील हल्ला आपल्यावर झेलणार्यांचा नातेवाईक त्यांची मरणोत्तर शौर्य पदके परत करतोय याची दखल कोण घेणार? लाऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽज वाटायला हवी त्याची, शौर्य पदके परत केली जातात – कोणासाठी एका आतंकवाद्यासाठी????? आणि सरकार अफझलला लटकवण्या ऐवजी निलाजरेपणाने आतंकवाद्यांच्या मुलांना आर्थिक मदत देत फिरतय. वाऽऽऽऽऽऽऽऽऽ. प्रत्येक नागरीकाला याची लाज वाटायला हवी. येत्या निवडणुकीत अश्या सरकारला त्यांची “जागा” दाखवायला हवी. हा प्रकार म्हणजे जखमेवर मीठ चोळण्याचा झाला.

सरकार कुठलेहि असो आतंकवादा विरुध्द लढणारी एक यंत्रणा पाहिजे. कडक कायदे हवेत इतके कि आतंकवाद्यांनी मरणाची भीक मागितली पाहिजे. पण हे सगळे काहि आज म्हंटले आणि उद्या उभे राहिले इतके सोप्पे नाहिये . राजकिय स्वार्थ सोडुन सगळ्यांनी एक मुखाने कठोर कायदे निर्माण करुन ते राबवायला हवेत. याच बरोबर नागरी सुरक्षेची अंतर्गत सुविधा असली पाहिजे त्यासाठी डिजास्टर मॅनेजमेंट ची सुदृढ यंत्रणा देखिल दुसर्‍या बाजुला उभी केली पाहिजे. ती आधी़च केली असती तर गुजरात मधुन जी बोट बोट मालकाला ठार मारुन बळकावली आणि पुढे जे झालं ते कदाचीत झालं नसतं अथवा निदान आटोक्यात आणता आलं असतें. किंवा नरीमन हाऊस बाहेर जी फाजील बघ्यांची गर्दि जमुन पोलिसांचे काम उगीच वाढवत होती ती जमा झाली नसती. अमेरीका - युरोपिअन राष्ट्रे अथवा इस्राइल सारख्या काहि राष्ट्रांत किमान ३ वर्षांचे सैनिकी प्रशिक्षण दिले जाते. भारताला आर्थिक दृष्ट्या हे सध्या शक्य नसले तरी NCC सारखी शक्य तितकी आपत्कालीन मदत दले यासाठी शाळा पातळी पासुन ते जेष्ठ नागरीकांपर्यंत बनवली पाहिजेत. याचा उपयोग अश्या घटनांच्यावेळी होईलच पण नैसर्गिक आपत्तीत देखिल बरेच नुकसान टाळता येईल. आपला नविन शेजारी संशयास्पद हालचाल करत नाहिये ना? तो जास्तीत जास्त वेळ घरातच घालवत नाहिये ना? जास्त ओळख न वाढवता अलिप्त राहुन आपले व्यवहार करतोय का? असे प्रश्न देशाच्या सुरक्षेसाठी विचारणे गरजेच आहे. गाडित आजुबाजुला ठेवलेली एखादि बॅग सहा-आठ स्टेशन नंतर हलली नसेल तर ती कोणाची आहे? हा प्रश्न विचारला पाहिजे.

या अश्या यंत्रणां खेरीज समाजात अनेक बाबतीत आज जागरुकता येणे फार गरजेचे आहे. संजय दत्तवर AK ४७ जवळ बाळगल्याचा आरोप असताना त्याचे चित्रपट हिट होतातच कसे? चिंकारा मारुन सलमान खान सुटतो कसा? आणि सुटल्यावर त्यावर बहिष्कार टाकायचे सोडुन तो सुटल्याचा आनंद मनवलाच कसा जातो? सलमान-संजय म्हणजे काहि दैवी अवतार नव्हे, उलटे टांगुन बडवुन काढावे हि तो यांची लायकि. कधी कधी तर प्रश्न पडतो कि इथल्या लोकांची बौध्दिक पातळी इतकि खालावली आहे का?? संजय दत्तला मध्ये ९३ च्या सुनावणीसाठी कोर्टाने बोलावले तर दोन तरुणींना त्यांचे (अनावश्यक)मत विचारले तर म्हणे “तो किती चांगला दिसतो असं करेल असे नाहि वाटत!” तिच गोष्ट सलमान खान सुटुन आल्यावर त्याच्या बंगल्या समोर शेकड्यांनी जमलेले लोक फटाके फोडुन आनंद मनवताची दृष्ये केवळ उबग आणणारी होती. आणि हे तर काहिच नाहि, ज्यांचे एन्काउंटर करायला कधीकाळी पोलिस बंदुका सरसावुन धावत होते. आज त्यांच्या Z+ सिक्युरीटिसाठी सरकार खर्च करतं कारण ते निवडुन संसदेवर जातात. ते जातात कसे हा प्रश्नच आंम्हाला कधी पडत नाहि.?? फुलन देवी, अरुण गवळी, पप्पु कलानी हे निवडले जातातच कसे? त्यांना निवडणुकिला उभे राहुच कसे दिले जाते? इतका का कायदा गाढव आहे? समाजात या सगळ्या बद्दल जागृती निर्माण होत नाहि तोवर हे असंच घडत राहणार.

हे सगळं लिहिल तर आहे, पण हे लक्षात कोण घेतो………? परत ये रे माझ्या मागल्या नाहि झालं म्हणजे मिळवलं.


- सौरभ वैशंपायन.
(२८/११/२००८))

Tuesday, November 18, 2008

जागो रे….

CCNA च्या परीक्षेसाठी आयडेंटिफिकेशन प्रुफ लागेल म्हणुन मी त्या डॉक्युमेंट्सची जमवजमव करु लागलो तेव्हा माझ्या लक्षात आले.............. मी अजुन माझे VOTER ID CARD काढलेलेच नाहिये. हे सांगणे काहि भुषणावह नाहिये, उलट २४ वर्षांच्या मुलाकडे अजुन VOTER ID CARD नाहिये हि अत्यंत चुकिची गोष्ट आहे. मागच्या निवडणुकिच्या वेळी मी लक्षच दिले नाहि. मात्र आता ती चुक सुधारेन म्हणतोय. तुमचे भारतीय नागरीकत्वा बरोबरचे राहत्या ठिकाणेचे प्रुफ म्हणुन तर तुम्हि त्याचा सगळीकडे वापर करु शकताच पण महत्वाचं म्हणजे तुम्हि तुमचा मतदानाचा हक्क बजावु शकता. तुमचे एक मत फरक पाडु शकते. मी अधिक माहिती करीता टाटा ने चालवलेल्या “जागो रे!” मोहिमेच्या साईटवर चक्कर टाकुन आलो. अतिशय छान आणि माहितीपूर्ण साईट आहे. आम्हि गरीबी, भ्रष्टाचार, अन्याय, सुरक्षा यांच्यावर ताशेरे ओढतो पण मतदानाला कितीजण बाहेर पडतात? खरतर ९०% पेक्षा कमी मतदान होणं हि आपल्या मतदारसंघाला लाज आणणारी गोष्ट आहे. कश्मिरात निदान अतिरेक्यांच्या धाकाने कमी मतदान होतं इथे आमचा आळस नडतोय! मग झोपडपट्टितले दादा पैसे घेतात आणि आजुबाजुची त्यांची अनुयायी आणि चेले मंडळी त्याच्या एका शब्दाखातर अथवा धमकिखातर सांगितल्या निशाणीवर ठप्पा लावतात. मग पैसे चारुन सत्तेवर येणारे अनेक महाभाग नगरपालिकेत, विधानसभेत आणि लोकसभेत बसतात. प्राथमिक इंग्रजी धड बोलु न शकणार्‍या शिक्षणमंत्र्यांच्या हातात आमच्या शिक्षणाचे सुकाणु दिले जाते, घोटाळे करणारे, मर्डर चार्ज असलेले गुन्हेगार उजळमाथ्याने पोलिस संरक्षणातुन फिरतात. आणि आम्हि ये रे माझ्या मागल्या करत “सिस्टिमला” दोष देत सकाळची ८:१०ची गाडि पकडण्याच्या चिंतेत हरवुन जातो.

सुशिक्षित म्हणवणारे आम्हि आमचा हक्कच बजावत नाहि. टाटाच्या त्या साईटवर – “तुम्हि या आधी कधी मतदान केले आहे का?” या प्रश्नावर ४५% लोकांनी “होय!” तर ५५% लोकांनी “नाहि!” असे उत्तर दिलेय. म्हणजे जे इंटरनेट वापरु शकतात, ज्यांना लिहिता-वाचता येते किमान पातळीवरील चांगल्या-वाईटाचा विचार करु शकतात त्यापैकी ५५% टक्के लोकांनी मतदानच केलेले नाहिये. दुर्दैवाने मीहि त्यातला एक आहे. पेज थ्री वरील लोकं फक्त फोटो काढुन घेण्यासाठीच मतदान केंद्रांवर येतात याबाबत मी नि:शंक आहे. झोपडपट्ति अथवा मेंढरे कॅटेगरीतली माणसं पैसे, दारु, चिकन यांना भुलुन सांगेल तिथे शिक्का मारतात. मग मध्यमवर्गिय माणुस काय करतो? घरी बसुन “हॅट सालं देशाचं काहि खरं नाहि! अमुक एक पार्टि आली तर देशाला विकुन खाईल, तमुक पार्टी आली तर धार्मिक तंटे वाढतील, सोम्याने इतक्या करोडचा घोटाळा केला होता तरी जिंकला! गोम्या चांगला आहे पण लोकं मागे नाहि त्याच्या! ” असे म्हणत मान झटकुन नेमेची येतात निवडणुका” या ठेक्यावर ते विचार उडवुन देतो!

VOTER ID CARD मिळवण्यासाठी काय करावं लागतं याची देखिल माहिती नसते. असली तरी बरेचजण त्याकडे लक्ष देत नाहि. असो, जास्त डोकं न खाजवता याबाबत माहिती हवी असेल तर सरळ TATAच्या http://jaagore.com/ या साईटवर जा. तिथे “REGISTRATION PROCESS” वर क्लिक करा - http://jaagore.com/faq.html#1 इथे तुम्हांला हवी ती सगळी माहिती मिळेल.

“अपने को क्या करनेका है!?” या मुंबईय़्य़ा भाषेतील प्रश्नाने सगळ्याची वाट लावली आहे. मात्र हा प्रश्न मी तरी पुन्हा विचारणार नाहि. येत्या ७-८ महिन्यात महाराष्ट्र विधानसभा आणि लोकसभा निवडणुका आहेत. त्यात ज्याचे माप त्याच्या पदरात टाकायला मी तयार होतोय. सगळे एक प्रश्न विचारतात – “सगळेच चोर आहेत साले,काय फरक पडणार?” तर त्यांना सांगतो – मग त्यातल्या त्यात कमीतकमी चोर असेल त्याला वोट करा.

उठा, दाखवा तुमची ताकद! “YOU” can make a difference!

निवडणुकिच्या दिवशी जर तुम्हि वोट करत नसाल तर तुम्हि झोपला आहात, आपणच झोपलो तर देश कसा जागेल? जागो रेऽऽऽ


- सौरभ वैशंपायन.