कधी कधी विचारांच चक्र चालु होतं, विनाकारणच काही विचार डोक्यात घर करुन राहतात. मग डोक्यात विचारांची गर्दी होते आणि मुंबईच्या ट्रेन मधल्या माणसांसारखे ते बाहेर सुद्धा लटकू लागतात. मग अश्या बिचार्या विचारांना घर असावं म्हणुनच हा प्रपंच. फारसं काही सांगायच-लिहायचं नाहीये, तसंच मी लिहीन-बोलेन-सांगेन ते सगळ्यांना पटलचं पाहिजे असाही हट्ट नाहीये. हे माझे विचार आहेत, कोण्या एका क्षणी मला सहज सुचलेले ...... अगदी सहज!!!
Monday, June 23, 2008
"ग-म-भ-न"
व्हाईटनी ब्राऊन यांचे एक वाक्य आहे - "Our bombs are smarter than the average high school student. At least they can find Kuwait." त्यामागचे संदर्भ घेण्यापेक्षा त्यामागची वस्तुस्थिती लक्षात घेणे इथे महत्वाचे आहे. पु.लं. देखिल ’बिगरी ते मॅट्रिक’ मध्ये म्हणतात - "माझ्या बिगरी पासुन ते मॅट्रिक पर्यंतच्या शिक्षणाला "खडतर" या खेरीज दुसरा शब्द नाहिये!!"(महान माणसांची मते बर्याचदा जुळतात, म्हणुन कदाचित मला यांची मते पटत असावित.)असो, गिरीशने मला कॉल करुन विचारले "मी आत्ता "ग-म-भ-न" ची तिकिटे काढतोय येणार का?" नाटकाची आधी बरीच स्तुती आधीच ऐकली होती. शिवाय "श्री. मिलिंद बोकिल" यांच्या "शाळा" या कादंबरी वरुन हे नाटक बसवले आहे,असं ऐकुन होतो. मी स्वत: अजुन तरी ती वाचली नाहिये. पण तिच्याबद्दल खुप ऐकले आहे. म्हणुन त्याला हो काढ कि! म्हणुन मंजुरी दिली. "सुहास शिरवळकरांच्या" कॉलेज लाईफवरची "दुनियादारी" सारखिच हि कादंबरी गाजते आहे. शिरवळकरांची त्यात बर्यापैकी शिवराळ आहे पण ते वाचताना देखिल ऑड वाटत नाहि. उलट ती भाषा नसती तर वाचताना खटकलं असतं. तसच काहिसं "ग-म-भ-न" बघताना वाटतं.
नाटकाची "खरी" सुरुवात हि १० मिनिटांनंतर "भ"च्या बाराखडितील शिवी ने झालीये. त्याक्षणी क्षणभर "हांऽऽऽऽऽऽ! हेच ते! हेच ते! जे शोधत होतो. उगिच काहितरी सुविचार कोंबुन शाळा उभी करायची आणि मग त्याचा कोंडवाडा बनवायचं थांबवा आत!" असं वाटुन गेलं. तिथुन नाटकाने जी काहि पकड घेतली आहे ती शेवट्पर्यंत. अगदी शेवटी अर्रर्रर्र संपलं??? असं होतं. नाटक पुढे चालुच रहावं असं वाटत असताना थांबणं हिच त्या नाटकची ताकद असते. "ग-म-भ-न" मधील सगळ्यांनी ते नाटक इतकं उत्तम वठवलय, कि नाटकाची गती कुठे कमी पडत नाहि, कुठे बोअर होत नाहि. उलट काहि "पंच" असे आहेत कि टाळ्या मोठ्या मुश्किलीने थांबतात.
मी काहि नाटकचे परीक्षण लिहित नाहिये(मला कुठे त्याचे पैसे मिळतात??) किंवा नाटकाची स्टोरी देखिल मी इथे सांगणार नाहिये, प्रत्यक्षात जाऊन बघा. पण त्यातले प्रत्येक कॅरेक्टर हे आपल्या शालेय जीवनात येउन गेले आहेत हि जाणीव आपल्याला प्रत्येक वेळी होत राहते. बर्याचदा स्टेज वर आपणच उभे राहतो. अरे आपण देखिल हेच करायचो याऽऽऽऽर. मुलींची टिंगल, आचरट कमेंटस पास करणं, शिक्षकांवर राग काढणं, मारामार्या, शिवीगाळ, "अवांतर" वाचनाची पुस्तकं त्यांच्यावर तुटुन पडणं, मग ती पुस्तके कोणाच्या घरी सुरक्षीत राहतील? कोणाकडे पकडली जातील? यावर गंभीर चर्चा. सगळं-सगळं जसं च्या तसं डोळ्यासमोर उभे राहिले. माझी शाळा कर्जत मधील अभिनव ज्ञान मंदिर. मुला-मुलिंची शाळा आठवीपर्यंत वेगवेगळ्या वेळी. मात्र नववी-दहावी मुला-मुलींची शाळा एकाच वेळी पण वर्ग वेगवेगळे अशी व्यवस्था होती. त्यामुळे एकत्र शिकण्याची "संधी" मिळाली नाहि. पण गणित-विज्ञान-संस्कृत चा क्लास एकत्रच असायचा. मग प्रत्येकाची "लाईन" ठरलेली. एखादि सुंदर मुलगी असेल तर चार जणांच लक्ष तीच्यावरच खिळलेलं. तिच्या येण्या-जाण्याच्या वाटेवर मित्रांसाठि लावलेलं सेटिंग, अतिशाहण्या मुलिंवरचा राग त्यांना क्लास मध्ये त्रास देउन काढणे. "ग-म-भ-न" बघताना सगळं कसं डोळ्यासमोर उभं राहत होतं. मी तसा सभ्य(दिसायला म्हणतोय मी) आणि अभ्यासात बरा विद्यार्थी होतो, त्यामुळे शिक्षक वगैरे चटकन माझ्या वाटेला जात नसत. मग आचरटपणा करुन नामानिराळे राहणे मला फारसे जड जात नसे. शिवाय नववीत असताना शाळेसाठि "अणुस्फोट" हा विषय घेऊन मी जिल्हा पातळीपर्यंत धडक मारली होती, त्यामुळे मी सगळ्या शाळेत "scientist" नावाने प्रसिध्द होतो. आणि इथे "ग-म-भ-न" मध्ये देखिल एक scientist आहे चित्रे म्हणुन. खरं सांगतोय नाटक बघुन आलो आणि रात्री २ वाजेपर्यंत अख्खि शाळा डोळ्यांसमोर नाचत होती. शाळेचे ते ३ जिने, शाळाभरल्यावर एकाचा दुसर्याशी न जुळाणारा सुर लावुन म्हंटलेली प्रार्थना, प्रार्थना म्हणताना सुध्दा एकमेकांना हळुच मारलेल्या लाथा आणि टपल्या, कंटाळावाण्या विषयांच्या तासाला खिडकितुन दिसणारे शाळेचे मागचे मोठ्ठे मैदान, त्यावर पावसाळ्यातला फुटबॉल, N.C.C., M.C.C., स्काऊट. मग परेड करताना चुकले कि उघड्या पोटरीवर बसणारे केनचे फटके. त्याचे कॅंप-शाळेची सहल. जाताना म्हंटलेली गाणी. गॅदरींग मधे व्हॉलेंटिअर होऊन भाव खाणे. व्हॉलेंटिअर बनल्यावर मिळाणारा(ढापला जाणारा) श्रमपरीहार-फराळ मग अश्या निमित्तांनी रविवारी देखिल शाळेत जाउन शाळेची सजावट. सगळी व्यवस्था. एरवी कोणी स्टाफरुम मध्ये जात नसे त्या दिवसांत कोणाचीहि परमिशन न घेता अख्खि स्टाफरुम आंदण दिल्या सारखि वापरणे आणि दुसर्या दिवशी अरे स्टाफ रुम मध्ये तंगड्या वर करुन बसलो होतो! हे वाढवुन सांगणे. असं सगळ सगळ डोळ्यासमोर नाचायला लागलं. शिवाय नावडत्या शिक्षकांना बॉम्ब ने उडवायचे विचार सगळेच करतात हे "ग-म-भ-न" बघताना प्रकर्षाने जाणवलं आणि त्याचा आनंदच झाला. शिवाय मित्राला किंवा "तिला" एखादा शिक्षक मारत असला कि त्याचा येणारा राग. मित्राच्या वाटचे आपण खाल्लेले फटके. सगळं सगळं आठवलं.
मध्ये मी "तोत्तोचान" हे एका जपान मधल्या मुलीवरचे छोटेसे पुस्तक वाचले. ती मुलगी मुक्त-शाळेत जात असते. म्हणजे झाडाखालची शाळा. तिथे तुम्हाला आवडणार्या गोष्टि करायच्या. कोणी ओरडणार नाहि. निळ्या रंगाचे झाड आणि हिरव्या रंगाचे आकाश काढले तरी कोणी रागावणार नाहि. मुलं-मुली एकत्र शिकणार, एकत्र खाऊ खाणार. पुस्तक वाचताना गुरुदेवांच्या "शांतीनिकेतनची" आठवण झाली. टागोर मुलांची होणारी घुसमट समजुन होते, म्हणुनच त्यांनी शांतीनिकेतनची स्थापना केली. आम्हाला अशी शाळा नाहिच मिळाली. पु.लं. म्हणातात तसे "गप्प बसा!" संस्कृतीत आम्हि वाढलो-शिकलो-मोठे झालो. काहि जण शाळा सोडुन गेले. आजहि मी अक्षय कुलकर्णीला सगळीकडे शोधतोय, त्याचे बाबा जज होते. त्यांची बदली झाली आणि पत्ता न देता-घेताच एके दिवशी तो निघुन गेला. मी देखिल मुंबईला आलो. सगळं सुटत गेलं. काहि मित्र-मैत्रीणी आहेत अजुन कॉन्टॅक्ट मध्ये अजुनहि जमलो कि जुने विषय निघतात. मग ग्रुप मधली भांडणं, रुसवे-फुगवे, परत एकत्र येणं. शाळेतली ह्याची-त्याची "लाईन" यांची आठवण काढुन आपण किती बालिश होतो म्हणुन आम्हि आता पोटभर हसुन घेतो. पण आज मी शाळेला खुप miss करतोय. पण त्या अडिच-तीन तासात "ग-म-भ-न" ने मला माझी शाळा मिळवुन दिली त्या बद्दल "ग-म-भ-न" च्या अख्ख्या टिमला थॅंक्स. शाळेच्या आठवणीने पोटभर हसता-हसता प्रेक्षकांच्या डोळ्यांच्या कडेवर नकळत जमा झालेलं थेंबभर पाणी हिच "ग-म-भ-न" ची खरी कमाई आहे.
-सौरभ वैशंपायन.
Monday, June 16, 2008
पहाट
पहाटेचा गार वारा, चांदण्याहि उठुन गेल्या,
जवळ घेताच तु मला, पापण्या अलगद मिटुन गेल्या. - १
संथ लयीतले तुझे श्वास, सुरासारखे फिरु लागले,
अन दुणावलेले श्वास माझे, त्यामध्येच विरु लागले. - २
मोहरल्या गात्रांमधुनी, थरथरे अजुन उरली रात,
अजुन अन घुमतात, गुज तुझे कानात. - ३
आताशा जराशी सैल, मजभोवती रेशीमगाठ,
त्यातच गुंतत होतो, इतक्यात झाली पहाट. - ४
- सौरभ वैशंपायन.
जवळ घेताच तु मला, पापण्या अलगद मिटुन गेल्या. - १
संथ लयीतले तुझे श्वास, सुरासारखे फिरु लागले,
अन दुणावलेले श्वास माझे, त्यामध्येच विरु लागले. - २
मोहरल्या गात्रांमधुनी, थरथरे अजुन उरली रात,
अजुन अन घुमतात, गुज तुझे कानात. - ३
आताशा जराशी सैल, मजभोवती रेशीमगाठ,
त्यातच गुंतत होतो, इतक्यात झाली पहाट. - ४
- सौरभ वैशंपायन.
Subscribe to:
Posts (Atom)