Friday, September 18, 2009

थरार

कोयना नगरच्या जंगलातला शेवटचा दिवस. बुध्द पौर्णिमा होती त्या दिवशी. १९ मे २००८. त्या दिवशी आम्हाला रात्रभर जागायचं होतं आणि पौर्णिमेच्या चंद्रप्रकाशात जंगल वाचायचं होतं. सगळी सकाळ कुठल्या जागी जास्त प्राणी दिसतील यावर खल करत कोयनेच्या पाण्याभोवती फेरी मारत घालवली. बापूकाकांनी डाव्याहाताला दूऽऽर एक जागा दाखवली "त्या तिथं बसुया! समोर किंजरवड्याचा वढा बी हाय, जनावरं तिथुन खाली सरकतात पाण्याला!" रात्री टेहाळणी करायला जागा खरचं चांगली होती त्या ठिकाणी मागे मोठं झाडहि होतं आणि पुढे थेट २५-३० फुटाची उतरंड होती. शिवाय एक झाडहि आडवं पडलं होतं त्यामुळे नैसर्गिक आडोसा देखिल तयार झाला होता.

दुपारी साधारण ३ वाजता कोयनानगर अभयारण्याचे प्रमुख नाईक साहेब बोटितुन झुंगटिला आले होते. ते आल्यावर थोड्या गप्पा झाल्या आम्ही मिळावलेला वाघाच्या पायचा १४x१४ सेमी. चा ठसा बघुन ते खुष झाले, शिवाय आदल्या दिवशी मिळालेली वाघाची विष्ठा बघुन ते आपणहुन सांगत होते. विष्ठेवरुन वाघाने काय खाल्लं ते समजतं. कुठल्या जनावराचे केस आहेत ते समजतं. इव्हन नुसती शिकार झालेली असेल तर ती कोणी केलीये ते समजतं. वाघाने शिकार केल्यावर तो शिकारीला छातीपासुन पोटापर्यंत फाडतो आणि कोथळा बाजुला काढुन मांस खातो. पण बिबट असेल ते लचके तोडुन खातं मिळेल तो भाग ओरबाडायला सुरुवात करतं. वाघ अतिशय स्वच्छ खातो. तसंच तरस, दिसायला बेढब प्राणी पण शिकार स्वच्छ खातो. बिबट्या खाताना खाल्ल्या ठिकाणी मांसाचे तुकडे - रक्त आसपास उडतं. शिकारी कुत्रे तर जिवंत फाडायला सुरुवात करतात, अतिशय निर्दय शिकारी. मग वेगवेगळ्या विषयांवरुन प्राण्यांची हद्द कशी ठरते ते सांगायला लागले. वाघाला साधारण १०० चौ किमी परीसर लागतो, मादा वाघाला ६० चौ किमी परीसर लागतो, कधीकधी नर-मादा यांचे परीसर एकमेकांमध्ये शिरलेले असतात. त्यांच्यात त्यावरुन फारसा झगडा होत नाहि पण २ नर समोर आले कि "जंगल राज" म्हणजे काय ते समजतं. पण तसं फार कमी होतं. एक तर सध्या वाघांची संख्या कमी. त्यातुन अभयारण्यात बरीच जागा मिळते. वाघ स्वत:ची हद्दा ठरवताना स्वत:च्या मुत्राचा फवारा आजुबाजुच्या झाडांवर उडवतो अथवा विष्ठा केल्यावर मागचा भाग खोडांवर घासतो. शिवाय जर तुम्हांला आजुबाजुच्या झाडावर दोन बाजुंनी जमिनीपासुन १० फुटांवर नखांचे २ ओरखाडे असले तर खुषाल समजा कि तुम्हि जंगलाच्या राजाच्या क्षेत्रात घुसखोरी केली आहे. पण तेच ८ फुटांवर तीन ओरखाडे असतील तर ते अस्वलाचे असतात. सांभर आपली शिंगे मुळा पासुन ते साधारण चारफुटांपर्यंत घासतो. त्यावरुन तिथे कोणाची सत्ता आहे वावर आहे ते समजतं. अखेर त्यांनी गप्पा आटोपल्या व म्हणाले "आम्हि समोरच्या किनार्‍यावर आहोत आज वस्तीला! आजच्या रात्रीसाठी कुठली जागा निवडली आहे?" बापुंनी बोटानी ती जागा दाखवली तसे मान हलवत ते उठले आणि आपली हॅट चढवत बोटीकडे निघाले. समोरच्या किनार्‍यालाच त्यांनी तंबु ठोकला.

रात्री जागायचं म्हणुन त्या दुपारी झाडांच्या गार सावलीत तासभर सगळ्यांनी ताणून दिली. दुपारचे साडे चार वाजले तसे आम्ही निघायची तयारी करु लागलो. मीनलने प्रत्येक माणसाला एक या हिशोबाने सरळ ५ मॅगीची पाकिटे शिजवुन एका पातेल्यात घेतली. आकाश तस ढगाळचं होतं. जंगलाच्या मधुन वाट काढत बापूंनी दाखवलेल्या ठिकाणी बाहेर पडलो. साधारण ५:३० वाजत आले होते. आम्ही जी जागा निवडली होती तिथुन कोयना अभयारण्यातील झुंगटि विभागाचा एक मोठा कोपरा नजरेच्या टप्प्यात येत होता. शिवाय ३ दिवसांपूर्वी खालच्याच बाजुला तिथे बिबट्याचा ताजा ठसाहि मिळाला होता म्हणजे प्राण्यांच्या बर्‍यापैकी वावरात असलेली जागा होती.

अमित आणि माझी स्लीपिंग मॅट अंथरुन त्यावर एक गडद रंगाची चादर पसरली आणि बसलो. बापू आमच्याहुन थोडे उंचावर बसले होते. साधारण अर्धातास गेला असेल नसेल बापूंनी शूऽऽक असा हलका आवाज काढुन डावीकडे बोट दाखवले. एक मोठ्ठा गवा सुकल्या ओढ्याच्या डाव्या बाजुला असलेल्या उतरंडि वरुन खाली येत होता. लगोलग अजुन २ गवे त्याच्या पाठी होते. तो झाडांची रांग जिथे संपते तिथे येऊन उभा राहिला व सगळ्या परीसराचा अंदाज घेऊ लागला. आता गव्यांची एक रांगच खाली सरकु लागली. दोन बच्चेहि होते. कुठलाहि धोका नाहि म्हंटल्यावर तो हळु हळु पुढे सरकला मागोमाग त्याचा ११ जणांचा कळप सावकाश पाण्याजवळ आला. वार्‍याची दिशा आमच्याकडे होती म्हणजे आमचा वास त्यांच्यापर्यंत जाण्याची शक्यताच नव्हती. फक्त आवाज आणि हालचाल या दोन गोष्टि कमीतकमी होणे गरजेचे होते.

पाणी पिताना २ गवे आजुबाजुला लक्ष ठेवत होते. सगळ्यांचं पाणी पिऊन झाल्यावर ते पुढे आले आणि पाणी पिऊ लागले. गव्याला दिवसभराची तहान भागवायला किंवा पाण्याचा जरुरी इतका साठा(साधारण १२ गॅलन) करायला त्याला किमान १०-१२ मिनिटे लागतात. किमान १००० किलोचा हा प्राणी जेव्हा जंगलातुन कळपाने फिरतो तेव्हा कोणीहि वाटेला जायची शक्यता नसते. साधारण चार फुट उंच आणि १०-११ फुट असलेल्या या धुडाच्या वाटेला जाणार तरी कोण? पोटभर पाणी प्यायल्यावर परत मुख्य नर गवा जंगलाच्या वाटेला लागला. मधुनच तो मागे वळुन बघत होता. बघता बघता कळप आल्या ठिकाणहुनच परत गेला. जंगलाचे काहि अलिखित नियम असतात, प्रत्येक प्राण्याची हद्द, त्यांचे येण्या जाण्याचे रस्ते ठरलेले असतात. जेव्हा या गोष्टिंचे दुसर्‍याकडुन उल्लंघन होते तेव्हा संघर्ष अटळ असतो.

गवे आल्यावाटेने गेले. मध्ये मोजुन ३-४ मिनिटे झाली असतील नसतील गवे जिथुन आले होते त्याच बाजुन ओरडण्याचा आवाज आला आणि काहि कळायच्या आत एक सांभर मादि जीवाच्या आकांताने धावत तिथुन पाण्याकडे आली आणि समोरच्या काठावरुन समांतर धावु लागली. मागोमाग ८ शिकारी कुत्रे धावत होते, ती बिचारी पोटातुन फ्रॅक फ्रॅक असे आवाज काढत होती. एकाने धावता धावता तिच्या पायाला जबड्यात पकडले तशी तिने दुणग्या झाडल्या तो शिकारीकुत्रा ७-८ फुट उडला, उठुन त्याने मान झाडली आणि परत पाठलागावर निघाला बाकिच्या ७ जणांनी तिला हुसकावत पुढे नेले. आमच्या पासुन २५०-३०० फुटांवर सगळं सुरु होतं. आम्ही श्वास रोखुन सगळं बघत होतो. मादि हुशार होती ती सरळ पाण्यात शिरली आणि पाण्यात पाय आपटु लागली. पाण्यात जाऊन तीच्यावर हल्ला करायचा अयशस्वी प्रयत्न २ कुत्र्यांनी केला पण कुत्र्यांची उंची कमी होती एखादा जवळ आलाच असता तर तीने त्याला खुराने पाण्याखाली दाबले असते. हे नैसर्गिक शहाणपण होतं. उंचीचा लाभ घेत तीने पाण्यात सुरक्षित जागा मिळवली होती.

मागे बापू काकांचा जीव वरखाली होत होता - "आरं आरं त्ये फाडुन खाणार रं!" सारखी चुक चुक करत करु लागले. आणि अचानक उभे राहुन "हेऽऽऽ हुश्शाऽऽ हॅहऽऽऽ" असे ओरडायला लागले हातवारे करु लागले. आम्ही गोंधळलो इतकावेळ काय वेडे म्हणुन दबकुन बसलो होतो?? बापू काका खाली बसा काय करताय?? तसे ते आमच्यावर खेकसले - "थांबा वो! हे ह्यांच खाण नाय! हुश्शऽऽ हॅकऽऽ!!हे ससे खाणार, येखादा पट्टेरी असता तर मी काय बी बोललो नसतो!!" आम्हि कपाळाला हात लावला. अमीतने त्यांच्या पॅंट चा बॉटम खेचायला सुरुवात केली. आम्हाला जे घडतय त्या बद्दल वाईट वाटत होतं पण निसर्गाचा नियम मोडायला आम्हाला काहिहि अधिकार नव्हता. समजा आम्हि तिथे नसतो तर काहि बदलणार होतं का? ती मादा शिकार बनणारच होती. "जीवो जीवस्य जीवनम!" हा नियम इथेहि होता. त्या शिकारी कुत्र्यांना देखिल पिल्ले असतील ती जगवायला त्यांना या मादिचा जीव घेणे भाग होते. शिवाय दुसरी भीती हि होती कि शिकारी कुत्र्यांनी त्यांचा मोर्चा आमच्याकडे वळवला तर आमच्यापर्यंत पोहोचायला त्यांना २-४ मिनीटेहि खूप होती. शिवाय आम्हाला वाचवायला सांभर हुश्श हुर्र असे आवाज काढणार नव्हतं!

अखेर छ्या! छ्या!! म्हणत बापू काका खाली बसले. पुढे काय घडतय ते बघत आम्ही पुन्हा शांत बसुन राहिलो. त्या कुत्र्यांनी अखेर १०-१५ मिनिटांनी तीचा नाद सोडला आणि ते जंगलात निघुन गेले. सांभर मादि थोडावेळ पाण्यातच राहिली मग हवेत कुत्र्यांचा वास घेत घेत एक एक पाऊल ताकत ती पाण्याच्या बाहेर आली. परत थोडावेळ ती काठावर उभी राहिली व नंतर दबकत दबकत जंगलात निघुन गेली. जे काहि बघितलं होत त्यामुळे आम्ही अजुनहि हबकलो होतो. बापू हुश्श सुटली असं म्हणुन निश्वास टाकला. आता अंधारायला सुरुवात झाली त्यातुन आकाश काळ्या ढगांनी भरुन आल्याने अजुनच अंधार दाटला. अमित वैतागुन दबक्या आवाजात पुटपुटला - "मे च्या मध्यावर पावसाळी ढग?? गेल्यावर्षी सुध्दा हेच झालं होतं!" इतक्यात तेजसने हं! असं ओरडुन परत समोरच्या काठाकडे बोट दाखवलं पुन्हा सांभर मादि पुढे आणि ते कुत्रे पाठी असे परत धावत आले. ती परत पाण्यात शिरली. यावेळी मात्र सहाच कुत्रे होते. बराचसा अंधार पडला तसा ते धावत जंगलात निघुन गेले. बापू दबक्या आवाजात म्हणाले अंधारात कुत्र्यांना शिकार नाय करता येत. परत सांभर मादि कान टवकारुन बाहेर आली तीची शेपटीहि वर होती. आता ती जंगलात निघुन गेली तसे बापू म्हणाले "नाय वाचत ती! जखमी आसल तर रक्ताचा वास काढत उद्यापर्यंत ते तीची शिकार करतील!!" पण बुध्द पौर्णिमेच्या रात्री तरी तीला जीवदान मिळाले होते हे नक्कि.

अंधार पडला आणि मागोमाग पाऊस पडायला सुरुवात झाली. पाऊस वाढला तसा आम्हि टॉवर वर जायचा निर्णय घेतला. बॅटरीच्या प्रकाशात किर्र जंगलातुन वाट काढताना मनात कुठेतरी धागधुग होती. जीम कॉर्बेटचे नरभक्षक वाघांचे किस्से आठवत होते. वाघ शिकार करताना शेवटच्या माणसाला बरोबर उचलतो आणि पुढील माणसाला काहि समजायच्या आत त्याला ओढुन नेतो हे कॉर्बेटसारख्या पट्टिच्या शिकार्‍याचे बोल मनात यायला लागले .... सर्वात मागे मीच चालत होतो. वाघोबा आजची रात्र उपास करा उद्या आम्हि गेल्यावर हवा तो गोंधळ घाला असे म्हणत अखेर टॉवरपाशी पोहोचलो. थंऽऽड झालेली मॅगी किती वाईट्ट लागते हे त्या दिवशी समजलं भूक असुन देखिल थोडि मॅगी उरलीच. अमितला म्हणालो अमित हिच गरम असती तर आपण भांडुन-भांडुन मॅगी ओरबाडली असती ना? अखेर टॉवरवर पसरलो आनी पाऊसानेहि जोर धरला रात्री उशीरापर्यंत पाऊस पडत होता. सकाळ उजाडली ती थंड वारे आणि पक्ष्यांचे सुंदर किलबिलणे घेऊन.

दुसर्‍या दिवशी नाईक साहेब म्हणाले "बरं झालं तुमच्या समोर शिकार नाहि झाली ते! वाईट्ट फाडतात शिकारी कुत्रे. सांभर मादि सापडली असती तर आधी त्यांनी डोळ्यावरच हल्ला केला असता. दोन्हि डोळे चावुन - ओरबाडुन बाहेर काढले असते आणि मग खाली पाडुन मांडि पासुन फाडायला सुरुवात केली असती. ती रक्त जाऊन मरेतो ओरडत राहिली असती! पण तुम्हांला जे बघायला मिळालं ते खुप कमी जणांना बघायला मिळतं! नशिबवान आहात!!"

हे बघायला मिळालं म्हणून आम्हि नक्किच नशीबवान होतो. कारण असा जंगलातला लाईव्ह थरार रोज रोज थोडिच बघायला मिळतो??





- सौरभ वैशंपायन