रात्री बेरात्री जोरदार पाऊस सुरु होतो, त्याच्याच आवाजाने जाग येते. मग कोसळणार्या सरींचा आवाज बराचवेळ झोपु देत नाही. अश्यावेळि कुशी बदलत बराच वेळ निघुन जातो ..... बाहेर पावसाचा जोर कमी होतो मग झाडावरुन, छतावरुन एकाच जागी टपटपणार्या थेंबांचा एका ठराविक लयीतला आवाज तेव्हढा ऐकु येत रहातो .... कुणा रुणझुण रुणझुण चालणार्या नाजुक पावलांगत... मग परत पेंग येऊ लागलेलीच असताना अचानक दोन - चार शब्द सुचतात, परत झोप उडते पुढचे शब्द शोधायला मन दहा दिशांना पळतं .... बर्याच वेळाने कदाचित चारच ओळि तयार होतात पण त्यातही मजा वाटते. चटकन बाजुचा मोबाईल उचलायचा आणि ड्राफ्ट्स मध्ये त्या चार ओळि रोमन मराठित टाईप करायच्या. पण अश्या ओळि मग हरवुन जाऊ नयेत म्हणून त्या अश्या एकत्र करायचा प्रयत्न .... उडणार्या कागदांवरील पेपरवेट सारखा. यापुढे २ महीने सुचतील तश्या पावसावरच्या ओळी इथे देत जाईन. हळुहळु पावसाळ्यावरिल ओळिंची मैफिल जमेल आणि मोसमातील शेवटची सर बरसून गेल्यावर "पाऊसफुल्ल" चा बोर्ड लागेल .... पुढल्या पावसाळ्यापर्यंत!
- सौरभ वैशंपायन.
=================
पाऊस तिथे बाहेर,
पाऊस माझ्या अंगणात,
चिंब ओली तू,
उभी माझ्या मनात.
=================
गुढ गाऽऽर धुके,
डोंगरावर ढगांची झुल,
हातात तुझा नाजूक हात,
त्यात अशी ही रानभूल !
=================
बाहेर रीमझीम पाऊस,
आत मोहरलेली गात्र,
जळणारा अत्तरदिवा,
सुगंधु लागलेली रात्र.
=================
हेवा वाटतो थेंबांचा,
सुदैव त्यांच्या भाली,
नभातुन निसटलेले,
उतरले तुझ्या गाली.
=================
1 comment:
क्या बात है!
असं होतं खरं! दोन-चार ओळी सुचतात आणि लिहून ठेवल्या नाही की विसरल्या जातात. क्या आयडिया है सरजी :P
बाय द वे, "पाऊस फुल्ल" हे शीर्षकही मस्त आहे.
Post a Comment