चार युगं उलटली कि ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो. मग पुराणात एक युग म्हणजे किती दिवस वगैरे गणितं मांडली आहेत. मर्त्य लोकांसाठी ब्रह्मदेवाचं युग बघणं ते जगणं शक्य नसतं, पण आपल्याच आसपास काही व्यक्ती अश्या असतात कि त्यांचं आयुष्य एक "युग" बनलेलं असतं. त्या व्यक्ती बरोबर ते "युग" संपतं. सकाळि पंडितजींच्या निधनाची बातमी आली आणि अजून एक "युग" संपलं याची जाणीव झाली.
समाजात काही मोठी माणसं अशी असतात कि त्या व्यक्तींशी कदाचित कधी भेट झाली नसते, त्यांच्या बरोबर कधी ओळख किंवा प्रत्यक्ष संबध आलेला नसतो. पण भावनिक दृष्ट्या ती व्यक्ती तिथे असणं आपल्याकरता समाधानचं असतं. समाजासाठी त्या व्यक्तीने बरच काही दिलं असतं ..... देत असते. हि माणसं एक एक करुन आपल्यातून निघून जातात, ती जागा कायमची रिकामी होते. अगदी टिपिकल श्रध्दांजली टाईप "पोकळी" वगैरे नाही म्हणणार मी, पण ती रीकामी जागा दुसरं कोणी नाही घेऊ शकत हे सुध्दा तितकच खरं.
ह्या माणसांनी त्यांच्या आयुष्यात त्यांच्या क्षेत्रातले आणि एकुणच समाजामधले भरपुर चढ उतार बघितले असतात, बर्याचदा त्या चढ उतारांचे कारणच ती व्यक्ती बनुन जाते. त्यांनी स्वत: नवी कलाकृती किंवा नवे आदर्श उभे केले असतात. सृजनाची उर्मी - त्याचा अर्थ लोकांना समजावलेला असतो. समाज बांधणीत आपला वाटा दिलेला असतो. त्यांचे बोट धरुन समाज, नवीन पिढी युगांतरातुन जात असते. त्यांना एखादा पुरस्कार मिळाला कि आपल्याला आपल्या घरातील कोणाचा तरी सन्मान झाल्यासारखा वाटतो. अशी माणसं गेल्यावर मग अनेक दिवस हुरहुर लागुन रहाते.
पंडितजी गेले ..... भारताने आज खर्या अर्थाने एक "रत्न" गमावले. अशी माणसं देव आपल्याला देतो त्याबद्दल त्याचे धन्यवाद द्यावेत, कि त्यांना परत बोलावुन घेतो त्याबद्दल त्याच्याशी भांडावं? हे समजत नाही. पु. लं., बाबुजी किंवा बाबा आमटे गेल्यावर आतून जितकं रिकामं रिकामं वाटलं होतं तितकच आज परत वाटतंय.
पंडितजींच्या गाण्याला "वन्स मोअर" देता यायचा, तसा त्यांच्या संपूर्ण आयुष्यालाच "वन्स मोअर" देता आला असता तर किती बरं झालं असतं?? पण प्रत्येक रंगलेल्या मैफिलीला आणि आयुष्याला भैरवी असते हेच वास्तव आहे. आत्ता राहुन राहुन पंडितजींची "बोले ना वो हमसे पिया" हीच भैरवी आत कुठेतरी रेंगाळतेय.
- सौरभ वैशंपायन.
2 comments:
Atishay sunder shabdat tumhi Panditjina shradhanjli vahili aahet.
Kharach ek RATN gamavale ahe :(
Panditjina bhavpurn shradhanjli (
>>पंडितजींच्या गाण्याला "वन्स मोअर" देता यायचा, तसा त्यांच्या संपूर्ण आयुष्यालाच "वन्स मोअर" देता आला असता तर किती बरं झालं असतं??<<
अप्रतिम मित्रा !!!!
Post a Comment