पायात बारीकसा काटा घुसावा आणि अनेक प्रयत्न करूनहि काढता न आल्याने बघता बघता त्याचं कुरुप व्हावं, असे दोन काटे दख्खन प्रांतात घुसले एक होते "निझाम" आणि दुसरे होते "सिद्दि". अगदि भारत स्वतंत्र होऊन आपापली संस्थाने नाईलाजाने भारत अथवा पाकिस्तानात विलीन करावी लागली तोवर हे वेगळेपण राखून होते.
"राजापूरचे शिद्दि ’घरात जैसा उंदिर तैसा शत्रू’" हे महाराजांचे बोल संपूर्ण सत्य ठरले. निझाम - सिद्दि इतके चिवट कि देशाच्या दुर्दैवाने ते मराठ्यांना पुरुन उरले. जंजिरा जिंकण्यासाठी मराठ्यांनी काय केले नाही? पण किल्ला जिंकला म्हणता म्हणता माशी शिंकायची व सिद्दि पुन्हा तग धरायचा व वेळ मिळताच उचल खायचा. तब्बल ३२० वर्षे हा पापग्रह कोकण किनार्याला ग्रासून होता. भौगोलिक दृष्ट्या लहानश्या पण अती महत्वाच्या ठिकाणी सिद्यांनी आपली कधीच न निघणारी पाचर ठोकून ठेवली होती.
इतिहासाचा विचार करताना, शिवाजी महाराज हे इतरांपेक्षा दशांगुळे मोठे का ठरतात? हे बघण्यासाठी त्यांचे शत्रू किती क्रूर, शूर, कपटी, मुत्सद्दि, चिवट व बलाढ्य होते हे समजून घेतले पाहिजे. त्यांची तुलना महाराजांशी केली कि त्यावेळि व त्यानंतर महाराजांसारखा पट्टिचा राजकारणी झाला नाहि, चलाख योध्दा झाला नाहि, द्रष्टा किंवा राज्यकर्ता झाला नाहि हे सत्य अजून हजारो पटींनी उजळून समोर येतं.
काहि बाबी एकमेकांत इतक्या गुंतल्या असतात कि त्या वेगळ्या काढताच येत नाहित. मराठ्यांचे आरमार व जंजिरा हे इतिहासात एकमेकांना इतके छेद देतात कि "Pick-a-stick" च्या खेळासारख्या घटना एकमेकांवर अवलंबून आहेत. एकिला पकडायला जावं तर दुसरीला धक्का लागतो, तीला सोडवायला जावं तर ती अजून चार काड्यात दडली असते. थोडाफार प्रयत्न करताना मला जे काहि हाताला लागलं ते इथे मांडतोय. चला पहिली स्टीक उचलूया? - कोण होते हे सिद्दि???
आफ्रिकेच्या पूर्व किनार्यावरचे इथिओपिया आणि एरिट्रिया माहित आहे? त्याच इथिओपियाच्या उत्तरेकडिल व एरिट्रिया च्या दक्षिणेकडिल काहि भागाला पूर्वी ’अॅबेसिनिया’ म्हणत, नंतर तर इथिओपियालाच अनेक नकाशात अॅबेसिनिया हे नाव मिळालेलं दिसतं. "हबश" लोकांनी इथे बरीच तलवार गाजवली स्वत:चे राज्य निर्माण केले. सिद्यांची कुळकथा सुरु होते ती इथुनच. सध्याचा सौदि अरेबिया म्हणजेच आधीचा अरबस्तानचा शेजार असल्याने हे कट्टर मुस्लिम बनले. आफ्रिकेतून जगभर गुलामांचा व्यापार होत असे. अॅबिसिनिया त्याला अपवाद कसे ठरेल? अमेरीका - युरोपमध्ये स्पॅनिश - पोर्तुगिज लोकं आफ्रिकेतील गुलाम नेत तर पूर्वेकडे अरबांनी या व्यवसायाला ’बरकत’ आणली. या हबस लोकांची भारताला पहिली ओळख झाली ती गुलाम म्हणून तरी किंवा व्यापारी म्हणून तरी. साधारण १२ व्या शतकाच्या आसपास ह्या हबस लोकांच्या वस्त्या भारताच्या पश्चिम किनार्यांवर पसरु लागल्या. मुळचे आफ्रिकि असले तरी इथल्या स्थानिकांबरोबर शरीरसंबध आल्याने पिढ्या न पिढ्या नाकि-डोळि बदलत गेल्या. पोर्तुगिजांचे पांढरे पाय ज्या अशुभ दिनी भारताला लागले त्याच दिवशी भारताबरोबर हबश्यांचेहि ग्रह नीचीचे झाले असे म्हणावे लागेल. पुढे इतर युरोपिय देखिल इथे हातपाय पसरु लागल्याने अरब-हबश्यांना आपला बाजार आवरता घ्यावा लागत होता.
मात्र जात्याच चिवट, स्वामीनिष्ठ, कामसू, साहसी, शूर व क्रूर असल्याने या गुणांच्या जोरावर सिद्यांनी इथल्या बहमनी सत्तेत प्रवेश केला. मोठ्या पदांपर्यंत चढले. आपल्या लोकांना आणून इथली वस्ती वाढवली. मलिक अंबर हे सर्वात मोठं उदाहरण. दारिद्र्याने हैराण झालेल्या आई-बापाने या आठ वर्षाच्या पोराला बगदादला चक्क गुलाम म्हणून विकलं, तिथुन त्याला निझामशहाच्या चंगेजखान नामक मोठ्या मंत्र्याने अहमदनगरला स्वत:चा गुलाम म्हणून आणलं. मधल्या काळात निझामशाहिची वाताहात सुरु झाली पण स्वत:च्या कर्तृत्वावरती तो निझामशाहित वजीर पदापर्यंत पोहोचला. मुघलांना, बिदरशहाला, आदिलशहाला आलटुन पालटून तो धक्के देत राहिला, कधी मैत्री करत राहिला. नंतर नंतर त्याची ताकद इतकि वाढली कि दिल्लीहून पळून आलेल्या शहॉंजहानला त्याने शहाजीराजांच्या हाती सोपवले व मुघलांशी उघड शत्रुत्व पत्करले. मलिक अंबरच्या काळात निजामशाहि २ वेळा बुडता बुडता त्याने वाचवली. शहाजीराजांसारख्या हुशार व कर्तबगार मराठ्यांची एक फळिच या मलिक अंबरने उभी केली. शहाजीराजे व मलिक अंबर यांचा सुरुवातीला स्नेहसंबध होता, नंतर मात्र दोघांत दुरावा आल्याचे जाणवते. मलिक अंबर निसंशय एक उत्तम प्रशासक, कुशल सेनापती होता. त्याने शेतसार्याची जी पध्दत दख्खनप्रांतात लागु केली ती अगदि इंग्रजांच्या काळापर्यंत नावाजली गेली. असे अनेक हबशी निजामशाहि - आदिलशाहित होते.
जंजिर्याच्या जन्माची कथा मात्र बहमनी काळातच सुरु होते. झालं असं कि इ.स.१४८२-८३ मध्ये जुन्नर प्रांताचा सुभेदार असलेल्या मलिक अहमदने कोकणवरती स्वारी केली. वर्षभर हि मोहिम चालली. त्याने १४८५-८६ च्या दरम्यान दंडा-राजपुरीच्या मेढेकोटाला धडक दिली. हा लाकडि परंतु भक्कम मेढेकोट बांधला होता कोळ्यांनी. व त्यांचा म्होरक्या होता रामाऊ पाटिल. त्याने मलिक अहमदला किनार्यावरुनच परतवला. पुढे बहमनी सत्तेचे पाच छकले उडली त्यात या मलिक अहमदने आपले बस्तान अहमदनगरला पक्के करुन १४९० मध्ये निजामशाहिची स्थापना केली. गादिवर येताच त्याने आपला पेरीमखान नामक मर्जीतला सरदार रामाऊ पाटलाच्या बंदोबस्तासाठी धाडला. पेरीमखान हुशार होता. त्याला माहित होतं लढून काहि हा खवळल्या दर्यातला मेढेकोट हाती लागणार नाहि. त्याने कपट खेळायचे ठरवले. त्याने ३ गलबते मेढेकोटाच्या टप्यात आणली व आपल्या माणसांबरोबर काहि दारूची पिंपे रामाऊ पाटलाला ’भेट’ म्हणून पाठवली. त्याच बरोबर विनंती केली कि आपण रेशमी कापडाचे व दारुचे व्यापारी आहोत. या मुक्कामात आंम्हाला संरक्षण पुरवावे अशी विनंती. त्या बदल्यात पैसा - दारु वगैरे देऊ. दारुच्या पिंपानी आपली नशा पसरवायला सुरुवात केली. रामाऊ पाटलाने त्याला मान्यता दिली. गलबतातून उपकाराची परतफेड व मैत्रीचा हात म्हणून अजून दारुची पिंपे मेढेकोटात पाठवली गेली. शिवाय सुरक्षा मिळावी म्हणून काहि रेशमी कापड्याच्या पेट्या न तपासताच मेढेकोटात येऊ दिल्या. दारु पिऊन रामाऊ पाटिल व त्याचे साथीदार झिंगले. मध्यरात्री त्या पेट्यांतून ११७ माणसे बाहेर पडली व दिसेल त्याला कापून काढायला सुरुवात केली. रामाऊ पाटिल कैद झाला. त्याला निजामशहा पुढे उभे केले. त्याने मोठ्या मनाने त्याला "आपलेसे" केले .... आता रामाऊ पाटलाचे नवे नाव होते - "एतबारराव". मुस्लिम धर्म स्वीकारुन त्याने नगर वरुन परतून मेढेकोटात पाय ठेवला पण पेरीमखानशी त्याचे जमेना. मग सोप्पा उपाय, निजामशहाने त्याची गर्दन मारायचा हुकूम पाठवला. कोळ्यांचे राज्य संपले. आणि सिद्यांचे सुरु झाले. इतिहासातील चुकांतुन धडा घ्यायचा असतो, त्या परत होऊ द्यायच्या नसतात, कदाचित या घटनेला समोर ठेवूनच शिवछत्रपतींनी कुठल्याहि गडावर आणि सैन्याच्या छावणीत दारु-नशा, स्त्रीया यांना संपूर्ण बंदि केली होती. एखादा नियम मोडणारा मिळालाच तर गर्दन मारण्याचे कडक हुकूम होते. (पानिपताच्यावेळि मराठ्यांना मुख्य नडले ते हेच, हाहि शिकण्यासारखा इतिहासच आहे.)
पहिला मूर्तजा निजामशहाच्या काळात वारंवार ढासळणार्या मेढेकोटाच्या जागी पक्के दगडि बांधकाम करायला सुरुवात झाली. १५६७ ते १५७१ असे चार वर्षे मर-मर खपवून घेऊन अर्धा मैल लांबीचा, सुमारे दिड मैल परीघाचा व १९ बुरुजांचा बलदंड व तितकाच देखणा पाणकोट किल्ला उभा राहिला - "जझीरे मेहरुब". इ.स. १६१८ मध्ये सिद्दि सुरुलखान हबशी हा जंजिर्याचा पहिला हबशी सुभेदार बनला. १६२० मध्ये त्याची जागा सिद्दि याकूतने घेतली. तर एकाच वर्षाने सिद्दि अंबर जंजिर्याचा सुभेदार झाला. १६३६ च्या तहानुसार हा भाग मुघलांनी विजापूरकरांना दिला. आणि सिद्दि - विजापूरकरांचे खटके उडायला सुरुवात झाली. मात्र सिद्दिशी झुंझत रहाण्यापेक्षा विजापुरने त्याला चुचकारून नागोठण्यापासून ते बाणकोटापर्यंतच्या समुद्रावरची त्याची सत्ता मान्य केली. त्या बदल्यात सिद्याने विजापुरकरांचा समुद्रि व्यापार व मक्केला जाणारे लोक यांच्या संरक्षणाची जबाबदारी स्विकारली. हबश्यांनी एकंदर ३२५ चौ मैल प्रदेशावर निरंकूश सत्ता निर्माण केली. याची उत्तर सीमा म्हणजे कुंडलिका नदि तर दक्षिण सीमा होती बाणकोटची खाडि. पूर्वेला रोहा, माणगाव, व महाड तालुक्यातील काहि गावे देखिल होती. ४० मैलांचा अरबी समुद्राचा किनारा, रोह्याच्या खाडिचा ४ मैलांचा तर खाली बाणकोटच्या खाडिचा १७ मैलांच्या भागात हबश्यांचा सुखनैव वावर असे. मात्र त्यांचे मुख्य ठिकाण होते दंडाराजपुरी व मुरुडचा जंजिरा किल्ला.
१६४२ मध्ये सिद्दि अंबर पैगंबरवासी झाला. गादिवरती वंश परंपरागत हक्क नसे. कर्तृत्ववान सरदाराला ते पद मिळत असे. सिद्दि अंबर नंतर सिद्दि युसुफ जंजिर्याच्या गादिवरती आला. १६५५ मध्ये त्याच्या जागी सिद्दि फतखान अधिकारावरती आला. अर्थात गादिवरती कोणीहि आला तरी जनतेला काहि फरक पडत नसे. ते हालातच दिवस काढत. दिवस-रात्र कधीहि हबश्यांची टोळकि गावात शिरत कत्तल करत, स्त्रीया, तरुण मुले यांना पकडून गुलाम म्हणून विकायला घेऊन जात. अनेकदा स्त्रीयांवर अत्याचार करुन नंतर त्यांना समुद्रात फेकून देत. प्रत्यक्षात गुन्हा केला असो वा नसो त्यांनी ज्याला गुन्हेगार ठरवले त्याच्या पायांना धोंडा बांधून समुद्रात ढकलायला सिद्यांना मजा वाटे. अनेकांना पोत्यात घालून समुद्रात ढकलत. काहिंना उकळत्या तेलात टाकत. पकडलेल्या कोळ्यांच्या - गावकर्यांच्या तोंडात सक्तीने गोमांस कोंबून सक्तीचे धर्मांतर हि रोजचीच बाब झाली होती. किमान नाक-कान कापून सोडून दिले जाई. प्राण भय असले तरी गाव सोडून जाता येत नसे. दोन कारणे - कमालीचे दारीद्र्य असल्याने अख्या कुटुंबासकट कोकणातून - घाटावरच्या प्रवासासाठी देखिल लोकांकडे पैसे नसत. आणि एकटे दुकटे पळून जावे तर सिद्यांकडे बक्षिसाच्या अमिषाने कोणी चूगली केली तर उरले सुरले झोपडे देखिल राख होई, घरातल्या लेकि सुनांच्या अब्रूवरती जाहिर घाला पडे, तरूण पोरे गुलाम म्हणून तरी नेली जात किंवा समुद्रात तरी फेकली जात. सुक्या बरोबर ओले जळावे तसे त्यांचे शेजारी विनाकारण सिद्यांच्या जाचाला बळी पडत.
अशीच कोणीतरी मोरोबा सबनीस नावाच्या बापुड्याची निष्कारण चुगली सिद्याकडे केली - कासाच्या किल्यावरती राहणार्या या साध्या माणसाने जिवतीचे चित्र श्रावणात भिंतीवर लावून त्याची पुजा केली. कोणीतरी सिद्याचे कान फुंकले सबनीस तुमच्यावर जादू-टोणा करतो आहे. या हबश्यांचा भूत-प्रेत-चेटूक यावर पराकोटिचा आंधळा विश्वास. हे कळताच बिचार्या मोरोबांना तोफेच्या तोंडि दिले. हरी आवजी चित्रे नामक सद्गृहस्थाला खंडोबाच्या दर्शनाहुन यायला उशीर झाला, या कारणावरुन आधीच आजारी असलेल्या सिद्दि अंबरने खंडोबासमोर माझ्यावर चेटूक करतो या निरर्थक संशयाने त्याला व त्याच्या भावाला गोणीत भरून समुद्रात भिरकावले. बायका मुलांना गुलाम म्हणून विकायला काढले. त्यांच्या सुदैवाने त्यांच्या भावानेच - विसाजीपंत तुंगारे यांनी सांगितलेली रक्कम भरुन त्यांना विकत घेतले. पुढे हरी आवजी चित्र्यांचाच मुलगा "बाळाजी आवजी चित्रे" याला राजापूर मोहिमेच्या वेळि महाराजांनी हेरले व आपला चिटनीस बनवुन त्याच्या गुणांचे चीज केले. ह्या इतिहासाला ज्ञात असलेल्या चार-दोन गोष्टि, अश्या हजारोंना ह्या क्रूर हबश्यांनी जंजिर्यावरुन समुद्राचा तळ दाखवला.
पण १५ जानेवारी १६५६ रोजी एकूणच इतिहासावर दूरागामी परीणाम करणारी एक घटना घडली - जावळि प्रांतावर स्वराज्याचा भगवा फडकला. जावळि टाचेखाली आल्यावर मग महाराजांना कोकणाचे दारच सताड उघडले. जावळि पाठोपाठ त्यांनी उत्तर कोकण जिंकला. महाराज - सिद्दि समोरासमोर उभे ठाकले. आता संघर्ष अटळ होता व तितकाच तो गरजेचाहि होताच. त्राहि त्राहि करणार्या कोकणी जनतेला त्राता दिसला. १६५७ च्या पावसाळ्यात महाराजांनी सिद्यावरती मोहिम काढली. ३१ जुलै १६५७ रोजी शिवरायांच्या आज्ञेवरुन रघुनाथ बल्लाळ सबनीस थेट दंडा-राजपुरीवरती सुमारे ७ हजार सैन्यानिशी चालून गेले. तळे-घोसाळे झटक्यात काबीज करुन मराठी पाते राजापुरीत घुसले. रघुनाथपंतांनी सिद्याला जरब बसवली. त्याने तहाचे बोलणे लावले. व स्वराज्याला तोशीस देणार नाहि असा शब्द दिला.
महाराजांनी जंजिर्यावर मोठ्या अश्या ३ मोहिमा काढल्याच. पण मुख्यता महाराजांच्या दूरदर्शी स्वभावाला अनुसरुन त्यांनी केलेली गोष्ट म्हणजे मराठा आरमाराची निर्मिती. इतर सर्व सत्तांच्या आरमारांचा आनंद होता. सगळा समुद्र किनारा परकियांनी वाटून खाल्ला होता. इतकेच कशाला? पोर्तुगालच्या राजाने आपल्या पोरी बरोबर इंग्लंडच्या चार्ल्स दुसरा याला हुंडा म्हणून काय दिले? तर मुंबई बंदर. इथवर हे सोकावले होते. स्वत:चे बलाढ्य आरमार हा एकच उपाय होता. महाराजांनी पोर्तुगिजांकडुन नव्या छोट्या बोटि बांधून घेतल्या. मग व्यापार्यांना संरक्षण या नावा खाली त्यावर हलक्या तोफाहि चढवल्या व बोल बोल म्हणता आरमाराचा आकार त्याला दिला. पोर्तुगिजांनी कपाळाला हात लावला, पण आता उशीर झाला होता. पोर्तुगिजांनी अधिक मदितीसाठी नकार दिल्यावर पुढे महाराजांनी फ्रेंचांबरोबर मैत्री वाढवून तोफा व नौकाबांधणीचे नवे तंत्रज्ञान आपलेसे करायला चालना दिलेली दिसते. पण हि यादि मोठी होती - अरब, डच, फ्रेंच, पोर्तुगिज, इंग्रज, कुडाळकर सावंत या खेरीज सर्वात मोठी डोकेदुखी होता सिद्दि!
महाराजांनी केलेली राजकारणे बघुन मती गुंग होते. सिद्याला चाप लावायला महाराजांनी कुठवर मजल मारावी? महाराजांची जहाजे व माणसे - मक्का -मस्कत - इराण - कॉन्गो पर्यंत जाऊन आली. शत्रुचा शत्रू तो आपला मित्र या न्यायाने सिद्दिचा राग करणार्या मस्कतच्या इमामाची दाढी महाराजांनी इथुन कुरवाळली. महाराजांची जहाजे एकिकडे व्यापार्यांना संरक्षणाच्या नावाखाली मक्केपर्यंत जात होतीच पण महाराजांनी इतिहासातली एक आश्चर्यकारक घटना घडवून आणली. कोणाला स्वप्नातहि असे स्वप्न पडले नसेल, पण महाराजांनी प्रत्यक्षात थेट मुघलांच्या खजिन्यालाच हात घातला ... महाराजांनी सूरत लुटली. गजांत लक्ष्मी स्वराज्यात आली. इतक्या पैश्यांची सोय महाराज स्वराज्यात कुठे कुठे करायची याच विचारात होते. लागोपाठ महाराजांनी कुडाळ - फोंड्यावर मोहिम काढली. त्यात मिळालेल्या विजयाने उत्साहित होऊन लखम सावंतांना आश्रय दिल्याचे कारण काढून महाराजांनी पोर्तुगिजांच्या प्रदेशावर चालून गेले. त्यांनी घाबरुन काहि तोफा व नजराणा देऊन सुटका करुन घेतली. लखम सावंतांना सरळ करुन महाराज मालवणात आले. मालवण किनार्यावर उभे असताना समुद्रातून एक बेट बाहेर डोकावत होते. महाराजांनी जवळ उभ्या असलेल्या कृष्णा सावंत देसाईं व भानजी प्रभू देसाईंना विचाले ते बेट कुठले? उत्तर आले - "कुरटे".
निवडक बोटि कुरटे बेटाच्या दिशेने निघाल्या. खडक चुकवत बोटि कुरटे बेटाला लागल्या. बेटावर फेरी मारता मारताच महाराजांमधला दुर्गस्थापत्यविशारद सगळा अदमास घेत होता. शुध्द खडक, चहूबासूस समुद्र,सर्पाकार तरांडि, अभोवार अवघड खडक, शत्रूची तरांडी येण्यास तीन कोस ठाव नाहि. "चौर्यांशी बंदरी ऐसा जागा दुसरा नाहि!" महाराजांनी सुरतेच्या लक्ष्मीला कुरटे बेटावरती सढळ हस्ते रीते केले. लक्ष्मीला पुन्हा माहेर दिले. "... आदौ निर्विघ्नतासिध्दर्थं श्रीमहागणपतीपूजनं करीष्ये!" - २५ नोव्हेंबर १६६४ या दिवशी महाराजांच्याच हस्ते मुहुर्ताचा चीरा बसला. ऐन समुद्रात किल्ला उभा राहु लागला. पाच खंडि शिसे ओतुन पाया बनवला त्यावर चिरे उभे राहिले. चुन्याच्या गिलावांनी सहा हात रुंदिचे बेचळिस बुरुज आणि भक्कम तट उभे राहिले. जवळपास सव्वातीन हजार मजूर सुमारे ३ वर्ष राबत होते. महाराजांनी सिंधुदुर्ग उभारायला अगदि पोर्तुगिजांही मदत घेतली. जेव्हा तट उभारायला दगड कमी पडू लागला तो फोंडा व आंबोली घाटातून आणला. बांधकामात शत्रूचा आथळा येऊ नये म्हणून पाच हजारांचे सैन्य, काहि जहाजे, तोफा तीन वर्ष खडा पहारा देत होते. गोविंद विश्वनाथ प्रभू जीव ओतून आज्ञेबरहूकुम काम करत होते. सिद्याची मधून मधून छोटि छोटि आक्रमणे होतच होती पण अखेर २९ मार्च १६६७ रोजी बांधकाम पूर्ण झाले. सिद्दि रागाने मनगटे चावत बसला. अठरा टोपिकर कपाळावर हात धरुन बसले "चौर्यांशी बंदरी ऐसा जागा नाहि, अठरा टोपिकरांचे उरावर अजिंक्य शिवलंका" उभी राहिली.
इतकं सगळं महाराज का करत होते? उत्तर सोपे होते - ज्याचे आरमार त्याचा समुद्र. जंजिर्याला मिळवण्यासाठी महाराजांनी अजून काहि केले असेल तर रात्रंदिवस जंजिर्यावरुन भडिमार होत असतांनाहि जंजिर्या समोरीलच हाकेच्या अंतरावरील कांसाच्या बेटावरती पद्मदुर्ग बांधुन काढला. राजापुरीच्या उरावर दुसरी राजापुरी उभी केली. महाराज स्वराज्याच्या कार्याबाबत किती गंभीर होते हे बघा - राजपुरी प्रभावळीचा सुभेदार जिवाजी विनायक, पद्मदुर्गाच्या बांधकामाचे संरक्षण करणार्या दर्यासारंगाला व दौलतखानाला पैसा व रसद वेळेत पुरवत नव्हता. दर्या सारंगाने महाराजांकडे तक्रार केली महाराजांनी कडक शब्दात त्याला लिहिले - "पद्मदुर्ग वसवून राजापुरीच्या उरावरती दुसरी राजापुरी वसवली आहे. त्याची मदत व्हावी .... हबशियांनी काहि देऊन आपले चाकर तुम्हाला केले असतील त्या करता ऐसी बुध्दी केली असेल! तरी ऐशा चाकरास ठिकेठाक केलेच पाहिजे! ब्राह्मण म्हणुन कोण मुलाहिजा करु पाहतो?... या उपरी बोभाटा आलियाउपरी तुमचा मुलाहिजा करणार नाही. गनिमाचे चाकर, गनीम जालेस ऐसे जाणून बरा नतीजा तुम्हास पावेल, ताकिद असे." हे पत्र १६७५ मधले आहे, म्हणजे राज्याभिषेकानंतरचे. स्वराज्याच्या कार्यात महाराज धर्म - जात - पंथ बघत नसत.
महाराजांच्या आग्रा भेटि च्या आधी व नंतर घटना इतक्या वेगाने घडल्या कि महाराजांना एकेका राजकारणाला उसंत मिळत नव्हती. मिर्झाराजांच्या मृत्युनंतर सिद्याने उचल खाल्ली. अखेर महाराजांनी १६६९ च्या मे मध्ये सिद्याला चेचायचाच हे ठरवून मोहिम काढली. तसाहि अंतस्थ कलहाने जंजिरा बेजार होता, सिद्दि खैरीयत, सिद्दि संबूल, सिद्दि कासिम, हे सिद्दि फतहेखानाशी भांडून प्राणभयाने पळून गेले होते, नुसत्या संशयावरुन सिद्दि फतहेखानाने ७५ जण कापून काढले होते. संधीचा फायदा घेऊन महाराजांनी त्याचे तळे - घोसाळे इत्यादि सात किल्ले जिंकले. सिद्दि फतहखान घाबरुन जंजिर्यात जाऊण बसला. जून १६६९ च्या एका पत्रात सिद्याने मुंबईच्या इंग्रजांकडे मदतीची याचना केल्याचे समजते पण सुरतच्या इंग्रजांनी "शिवाजीशी वैर घेण्याची आपली आज तरी तयारी नाहि, त्याला खिजवले जाईन असे काहि करु नका, दुसर्याच्या भांडणात पडू नये!" असे स्पष्टपणे बजावले. मराठे दंडा-राजापुरीत पोहोचले. सिद्याचा जमिनीवरचा मार्गच बंद झाला. समुद्रातहि अनेक तारवे उतरवून महाराजांनी समुद्राकडून त्याची कोंडि चालवली. जंजिर्यावर लांब पल्ल्याच्या ५७२ तोफा व भरपूर दारुगोळा होता. भांडून जंजिरा मिळण्याची शक्यता फारशी नव्हती पण हल्ले करण्याबरोबरच महाराजांनी मुख्यत: जंजिर्याची उपासमार करायचे ठरवले. या राजकारणात सिद्याने मुघलांना ओढले. सुरतेच्या मोंगल अधिकार्याने महाराजांना वेढा उठवायचे हुकूम दिले महाराजांनी तो दुर्लक्षीत करुनच कोलून लावला. अखेर मुघलांच्या ताब्यात किल्ला देण्याची भाषा सिद्दि करु लागल्याने कल्याणचा मुघल सुभेदार लोदिखानालाहि महाराजांनी दूर ठेवले. यावेळि मात्र इंग्रजांनी तो किल्ला मुघलांना मिळू नये म्हणून आपण विकत घेऊ असे सिद्याला कळवले. पण सिद्दि याला तयार झाला नसावा.
सहा महिन्यात महाराजांनी सिद्याचं भिजकं मांजर करून टाकलं. अखेर अभयदान मिळाल्यास आपण जंजिरा मराठ्यांना देऊ असा निरोप त्याने महाराजांना पाठवला. जंजिरा स्वराज्यात येण्याची शुभचिन्हे दिसू लागली ... इतक्यात सिद्दि खैरीयत व सिद्दि संबूळ हे दोन चिवट हबशी मराठ्यांविरुध्द उभे राहिले. मराठ्यांचा वेढा चूकवून ते किल्यात शिरले. आधी त्यांनी सिद्दि फतहेखानाला बाबापुता करुन शरणागती पत्करु नकोस असे समजावले, मात्र फतहेखान घाबरला होता तो ऐकेना. अखेर त्याला कैद करुन जंजिरा या तिघांनी आपल्या हातात घेतला, सिद्दि संबूल त्यांचा म्होरक्या बनला. काफराला शरण जाण्यापेक्षा भांडताना मरुन जाऊ या त्वेषाने ते लढू लागले. सिद्दि संबुलाने मुघलांशी संधान बांधले. मुघलांचा रेटा स्वराज्याकडे आला तसा जंजिर्याची मोहिम महाराजांनी आखडती घेतली. जंजिरा वाचला. आता महाराजांनी त्याला मधाचे बोट लावायचे ठरवले ऑगस्ट १६७० मध्ये त्यांनी सिद्याला पत्र लिहिले - "मी माहुली आणि इतर किल्ले जिंकून घेतल्यावर तू कसा तिकाव धरणार? त्यापेक्षा जंजिरा मला देऊन टाकलास तर माझ्या सैन्याचा प्रमुख करेन!" अर्थात सिद्दि यालाहि बधला नाहि. तरी महाराज जंजिरा जिंकण्यासाठी कुठवर प्रयत्न करत होते हे समजुन येईल. महाराजांसारखा राजकारणी, दुर्गस्थापत्यविशारद, अद्वितीय योध्दा व द्रष्टा असलेला माणूस जंजिर्याच्या माग इतका हात धुवुन लागला होता यावरुन जंजिर्याचे महत्व ओळखायला हवे.
इतर राजकारणात जंजिरा काहि महाराजांच्या डोळ्यासमोरुन हलत नव्हता. त्यांनी जंजिरा जिंकून देणार्यास १ मण सोने व अजून काहि बक्षिसे जाहिर केली. होळिच्या सणासाठी महाराज रायगड जवळच मुक्काम करुन होते. होळिची शिकारीसाठी त्यांना जळातील "मगरच" हवी होती. होळिचा दिवस उजाडला. दंडा-राजपुरीमधील मराठ्यांनी देखिल होळिचा सण साजरा केला. खरे म्हणजे नियमानुसार किल्ला - छावणीत कुठलेहि मादक पदार्थ आणायला बंदि होती मात्र मराठे नशेत होते (बहुदा भांगच असावी). आणि सिद्याचा हल्ला आला. ४००-५०० माणसांनी दंडा-राजपुरीवरती हल्ला केला. समुद्रातुन - जमिनीवरुन हल्ला चढवला. मराठे गोंधळले. तरी तटावरुन चढणार्या काहि सिद्यांना त्यांनी कापून काढले. मात्र वाढता जोर बघून सिद्यांवर दारुगोळा वापरावा म्हणून दारु कोठार उघडले, अचानक अपघात झाला आणि अख्खे दारुचे कोठार जबरदस्त भडका होऊन उडाले. सिद्दि - मराठे दोघेहि घाबरले, पळापळी सुरु झाली. अचानक सिद्दि याकूत ओरडू लागला "खस्सू खस्सू!" - हि सिद्यांची युध्दगर्जना. आपला नेता सुखरुप आहे हे बघून सिद्यांना चेव चढला मराठ्यांची सरसकट कत्तल सुरु झाली. जंजिरा मराठ्यांना मिळण्याऐवजी दंडा-राजपुरीच पडली. यावेळि महाराज जवळपास चाळिस मैल लांबवरच्या एका गावात झोपले होते, एखाद्याला आपल्या ध्येयाचा किती पराकोटिचा ध्यास असू शकतो हे समजेल - राजपुरीत हे नाट्य घटत असताना तिथे महाराज अचानक दचकून जागे झाले, निकटच्या लोकांना बोलावून म्हणाले - "राजपुरीवर काहितरी संकट कोसळले आहे खास!"
ताबडतोब जासूद - हरकारे निघाले. दुसर्या दिवशी बातमी आली - राजापुरी हातची गेली.
"सिद्दि, उदरातली व्याधी!" या व्याधीवर महाराजांनी आता "विदेशी" औषोधपचार करायचे ठरवले. सुरतेहुन कुमक मिळाल्याने असेल पण सिद्दि मुजोर झाला. इंग्रजहि सिद्याशी संधान बांधून होते. महाराजांनी एकाच दगडात दोन पक्षी मारायचे ठरवले. महाराजांनी इंग्रजांना सिद्यांविरुध्द मदत मागितलीच, पण दुसरीकडे डचांना "आम्हि मुंबई मिळवून देण्याकरता आमचे ३ हजार सैन्य देतो, बदल्यात डचांनी दंडा-राजपुरी घेण्यासाठी मराठ्यांना मदत करावी!" असा करार रिकलॉफ नामक डच वकिलाशी केला. इंग्रजांना हे कळताच "धरणी पोटात घेईल तर बरे!" असे त्यांना वाटले असावे. लगोलग इंग्रजांनी सिद्दि - मराठे यांच्यात तह घडवून आणतो वगैरे बोलणी लावली. हा तह झाला नसला तरी सिद्दि - इंग्रज नरमले हे मात्र खरे.
यानंतर चार वर्ष तुलनेने जंजिर्याची आघाडि शांत होती. ऑगस्ट १६७६ मध्ये मोरोपंत पेशव्यांनी दहा हजार सैन्या सकट दंडा-राजपुरीवरती मोठी आघाडि उघडली. रामनगरचे चिवट कोळी राज्य मराठ्यांना शरण आले होते. सिद्दि मात्र समर्थपणे दावा मांडत होता. मोरोपंतांनी पद्मदुर्गावरील सोनकोळ्याच्या म्होरक्या लाय पाटिल यांना बोलावून घेतले. - "तुम्ही चाकर श्रीशिवछत्रपतींचे. सरकारची चाकरी निकडिची पडली तरी कराल की नाही?" लाय पाटिलांनी उत्तर दिले - "जी आज्ञा ते प्रमाण!" लगेच पंतांनी आपली कल्पना सांगितली. कल्पना अंगावर काटा आणणारी होती, तीचा स्वीकार करणे म्हणजे आपणहुन यमदुतांना मिठी मारायला जाण्यागत होते - "जंजिरे यांसी शिड्या मात्र तुम्हि लावून द्याव्या. आम्हि हजार बाराशे धारकरी तयार केले आहेत." पण लाय पाटिल व त्याचे साथीदार वाघाच्या काळाजाचे असावेत अन्यथा कलालबांगडि, चावरी, लांडाकासम सारख्या राक्षसी तोफा आ वासून शत्रूचा ग्रास घ्यायला आसुसल्या होत्या त्याला शिड्या लावण्याचे धाडस स्वप्नातहि कोणी केले नसते. त्यांनी चक्क जंजिर्याला शिड्या लावल्या. काय अडचण आली ते इतिहासाला ठाऊक नाहि, परंतु रात्र संपून पहाट होऊ लागली तरी पंतांचे धारकरी आलेच नाहित. आता वेळ दवडण्यात अर्थ नव्हता. सिद्याला कळले असते तर सगळे मारले गेलेच असते शिवाय सिद्दि सावध झाला असता. पहाट होता-होता लाय पाटिल नाईलाजाने परत फिरले. झाल्या प्रकाराने मोरोपंत ओशाळले - "आम्हापासून कोताई जाली, धारकरी याहि माघार घेतली, आम्हापासोन अंतर पडले हे खरे!" मोरोपंत रायगडि परतले ते लाय पाटलांना घेऊनच. महाराजांपर्यंत हा पराक्रम पोहोचला होताच. महाराजांनी लाय पाटिल, पद्मदुर्गाचे हवालदार, सरनौबत, कारकून यांचा यथोचित सन्मान केला. लाय पाटलाला महाराजांनी पालखीचा मान दिला. लाय पाटिलांना नम्रतापूर्वक तो नाकारला - "जी आम्हि दर्यावरले लोक, पालखी नको!" महाराज उलट अजून खुष झाले. महाराजांमधला गुणग्राहक व दाद देणारा जाणकार जागा झाला, महाराजांनी पेशव्यांना आज्ञा केली - "गलबत बांधोन त्या गलबताचे नाव "पालखी" ठेऊन लाय पाटिल यांचे स्वाधीन करणे!" याच वेळि लाय पाटलाला दर्याकाठी सरपाटिलकिहि बहाल केली. जंजिर्याने पुन्हा मराठ्यांना हुलकावणी दिली.
१६७६ च्या मध्यावर जंजिर्यात पुन्हा भांडणे लागली. सिद्दि संबुल व सिद्दि कासिम यांच्यात वितुष्ट आले. औरंगजेबाने दंडा-राजपुरीची जहागिरी सिद्दि कासिमला दिली. मात्र सिद्दि संबूल त्यावरुन आपला हक्क सोडायला तयार नव्हता. ऑक्टोबर १६७७ मध्ये मुंबईच्या माझगाव बंदरा जवळ दोघांत छोटि लढाई देखिल झाली असावी. मात्र मुघलांनी सिद्दि कासिमची बाजू घेतल्याने सिद्दि संबूल हताश झाला व तडक मराठ्यांना येऊन मिळाला. १६७७ च्या दिवाळित सिद्दि कासिमने याचा राग काढायला मुंबई बंदरातून बाहेर पडून कोकण किनारपट्टिवरील जनतेत लुट चालवली. एप्रिल १६७८ मध्ये तो परत मुंबई-बंदरातील छावणीत गेला. या सर्व प्रकरणाच्या दरम्यान महाराज कर्नाटक स्वारीत होते. मे १६७८ मध्ये ते रायगडावर परत आले. सिद्दि कासिमला धडा शिकवायला ४ हजार सैन्यासह दर्यासारंग व दौलतखानाला पनवेलला पाठवले. मराठी आरमाराने माझगाव बंदरात सिद्याच्या आरमाराची कोंडि करुन त्याचे आरमार जाळून काढावे असा महाराजांचा मनसुबा होता. एकदा सिद्याचे आरमार पांगळे केले कि सिद्दि संबूळचीच मदत घेऊन जंजिर्याला भगदाड पाडायला वेळ लागणार नाहि असा महाराजांचा सहाजिक पवित्रा होता. पण सिद्दि कासिमने शहाणपणाने आपली सर्व गलबते सुरतेकडे हाकली. नंतर समुद्र खवळला असल्याने मराठी आरमाराला मोठी हालचाल करता आली नाहि. पोर्तुगिज व इंग्रज हे सिद्याच्या बाजूने उभे राहिले. कारण त्यांना माहित होते कि एकदा सिद्दिचा पाडाव होऊन जंजिरा महाराजांना मिळाला कि महाराज पश्चिम किनारपट्टिवरुन त्यांनाहि हाकलून देतील. सर्व कारणांनी जंजिरा घेण्याचा मनसुबा पुन्हा उधळला गेला. या घटने नंतर मात्र महाराजांना जंजिर्यावर मोठी मोहिम काढता आली नाहि.
महाराजांच्या निर्वाणानंतर सत्ता छत्रपती शंभूराजांकडे आली. शंभूराजांनी ९ वर्षात १००हुन अधिक लढाया केल्या. त्या हिशोबाने महिन्याला एक मोठी लढाई त्यांनी केली. त्यांना स्वस्थता मिळालीच नाहि. त्यांच्या या सर्व लढायांचा अभ्यास होणे गरजेचे आहेच पण जंजिरा मोहिम हि त्यांच्यातल्या कल्पक योध्याची नव्याने ओळख करुन देतात. औरंगजेबाची फूस मिळाल्याने सिद्याने स्वराज्यात घुसून पनवेल ते चौल पर्यंतचा पट्ट लुटला, जनतेला अक्षरश: उध्वस्त केले. संभाजीराजे संतप्त झाले. दौलतखानाच्या हाताखाली दिडशे गलबते दिली. व मोहिम दादजी रघुनाथाला देऊन सांगितले - "तुम्ही सिदिचा पाडाव करुन या, अष्टप्रधानातील एक पद तुम्हांस देऊ!" दादजी - दौलतखानाने १६८२ साली जंजिरा वेढला महिनाभर किल्यावर तोफा डागल्या. तट काहि ठिकाणी कोसळला पण सिद्दि दाद देईना. तो सुध्दा तोफा चालवून एका ठराविक अंतरापेक्षा मराठी गलबतांना जवळ येऊ देत नव्हता. संभाजी महाराजांनी आता अंतर्भेद करायचे ठरवले. खंडोजी फर्जंद, ज्यांनी साठ मावळ्यांच्या साथीने पन्हाळ्यासारखा बुलंद किल्ला स्वराज्यात आणला त्यांची निवड यावर केली. मी संभाजीचा हाडवैरी, महाराज गेल्यावर जुन्या जाणत्यांची पत्रास शंभूराजा बाळगत नाहि वगैरे खोटि कारणे देऊन ते काहि लोकांसोबत सिद्याला मिळाले. सिद्दि खूष झाला. मात्र तेथली एक बटकि हुशार निघाली. तीला कोंडाजी फर्जंदांचे खरे स्वरुप कळले तिने लगोलग सिद्याला सगळे सांगितले. कोंडाजींसारखा योध्दा सिद्याने हालहाल करुन मारला. बहुदा त्यांचे मुंडके संभाजी राजांना भेट म्हणून पाठवले होते. संभाजी महाराज अतिशय दु:खी झाले. मराठे झाल्या प्रकाराने हादरले त्याचा फायदा घेऊन सिद्याने जोर केला व मराठी आरमारावर तुटुन पडला. मराठ्यांना माघार घ्यावी लागली.
हा पराभव व कोंडाजींचा मृत्यु संभाजी महाराजांच्या जीव्हारी लागला. आपल्या स्वभावाशी सुसंगत अशी धक्कादायक योजना आखली. प्रभू रामचंद्र लंकेपर्यंत सेतू बांधू शकतात तर राजपुरीच्या किनार्यापासून ते जंजिर्यापर्यंतची खाडी असे कितीसे अंतर आहे? लगोलग कामाला सुरुवात झाली. जळातून - स्थळातून सिद्याला चिमटित पकडायचा निश्चय शंभूराजांनी केला. अर्धाधिक खाडि भरली देखिल. सिद्याची त्यावर होणारी आक्रमणे परतवून लावली जात होती रोज सेतु जंजिर्याच्या जवळ येऊ लागला. सिद्याला आपली मृत्यू घंटा ऐकू येऊ लागली. थोड्याच दिवसात राजापुरीचे दगड जंजिर्याला लागणार हे दिसत होते पण सिद्याने सुदैव कि औरंग्याने स्वराज्यात रेटा वाढवला संभाजीराजांना हि मोहिम सोडुन स्वराज्याच्या दुसर्या आघाडिवरती धावून जावे लागले. मात्र दादजी रघूनाथ मागे राहून वेढा चालवत होता. पण शंभूछत्रपती असे तडकाफडकी गेल्याने सैन्यातला उत्साह निश्चित कमी झाला. पावसाळ्यात आरमाराचा वेढा हटवावा लागला. याचा फायदा घेऊन सिद्याने उलटा हल्ला केला व दादजी रघूनाथालाच महाडपर्यंत पिटाळले. इतकेच नव्हे तर सूड म्हणून दादजी रघूनाथाच्या बायकोचे अपहरण केले.
संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर तर उलटच घडले. स्वराज्यावर औरंग्याचा वरवंट फिरत होता. त्याने स्वराज्याची राजधानीही जिंकली, औरंगजेबाने हा किल्ला घेतला खरा पण तो सांभाळणे त्याला जड होऊन बसले. कारण गायकवाड, गोळे यांसारखे स्वराज्याचे पाईक, कांगोरी किल्यावरुन त्याला सतावत होतेच. गड मिळुनही जीवाला स्वस्थता लाभेना. अखेर वैतागुन त्याने किल्ला जंजिर्याचा सिद्दि खैरीयतखान याला दिला. मराठ्यांना दुर्दैवाने जंजिरा कधीच जिंकता आला नाही, पेला ओठाशी आला म्हणतानाच दरवेळि तो उडवला जात असे. मात्र सिद्यांनी गडावर जवळपास ४० वर्षे फतकल मांडली होती. अखेर ५ जून १७३३ या दिवशी शाहूमहाराजांच्या कारकिर्दीत रायगड पुन्हा मराठांनी घेतला.
दोन गाद्यांच्या स्पर्धेतही मराठ्यांनी सिद्याला स्वस्थता लाभू दिली नाहि. त्यातून पेशवे बाळाजी विश्वनाथ या सिद्यामुळेच श्रीवर्धन मधून परागंदा झाले होते. त्यामुळे त्यांना कोकणी जनतेची स्थिती माहितहि होती व सिद्यावर रागही होताच. इ.स. १६८९ च्या सुमारास म्हणजे शंभूछत्रपतींच्या हत्येनंतर सिद्दीने उचल खाल्ली त्यामुळे त्यांना श्रीवर्धन सोडावे लागले. भट घराणे आंग्र्यांना सामिल आहेत या संशयाने सिद्दिने भट घराण्याचा छळ चालु केला. त्यांच्या "जानोजी" नावाच्या भावास सिद्दीने पोत्यात घालुन समुद्रात बुडवल्याची कथा आहे. त्याच किंवा तशाच कारणास्तव पिढीजात देशमुखी सोडून "बाळाजी भट" हे "भानु" कुटुंबा बरोबर सातार्यास आले. सिद्दीच्या हशमांनी पाठलाग सुरु केल्या वर मुरुड येथील वैशंपायन कुटुंबाकडे त्यांनी काही आठवडे आश्रय घेतला. बाळाजी बरोबर असलेल्या "भानु" कुटुंबात ३ भाउ होते. "हरी महादेव, बाळाजी महादेव आणि रामजी महादेव." त्या पैकी "बाळाजी महादेव" हा "नाना फडणवीस" याचा आजा.१७१६ मध्ये आग्र्यांनी सिद्दिवरती हल्ल चढवताच बाळाजी विश्वनाथांनी त्यांना मदत केली. सिद्दि त्याने नरमला. १७४६ मध्ये मध्येहि असच झालं, मात्र "सिद्दि सात रावणासारखा दैत्य" असून नानाजी सुर्वे यांनी त्यांचा नेता युध्दात मारला, त्यामुळे सिद्दि रेहमान गळपटला, मराठ्यांना शरण आला. आपल्या १२ महालांपैकि ७ महाल पेशव्यांना दिले.
१७५६ साली मात्र होऊ नये ते घडले कान्होजी जिवंत असेतो कोकणाला गोर्यांच्या पांढर्या पायांचा स्पर्ष झाला नाही. मानाजी - तुळाजी हे त्यांचे दोन पुत्र. आरमारी युध्दात तुळाजी अतिशय प्रविण होता. इंग्रजांचे एक गलबतहि त्याच्या नजरेतून सूटत नसे. इंग्रज कान्होजीला कावले होते. शाहू महाराजांनी त्याला सरखेल पदवीहि दिली. तुळाजीने, मानाजीला दूर सारुन सगळे विजयदुर्गाला मुख्य ठिकाण बनवून आरमार आपल्या हातात घेतले. मात्र पेशव्यांशी त्याने वैर धरले. पेशव्यांनी मानाजीचा पक्ष घेतला. हे बघून तुळाजी अजून बिथरला. त्याने पेशव्यांना दिली जाणारी सालाना थैली बंद केलीच, वरुन मानाजीला सुईच्या अग्रावर राहिल इतकि मातीहि देणार नाहि असा दुर्योधनी पवित्रा घेतला. पेशव्यांनी थैलीसाठी वकिल पाठवला त्याचे नाक कापून त्याला परत धाडले. आता पेशवे गप्प बसणे शक्य नव्हते. पण तुळाजीला ताळ्यावर आणावे इतके आरमार नव्हते. इथे इतिहासातली एक घोडचूक घडली मराठ्यांनी इंग्रजांची मदत मागितली. इंग्रज याचीच वाट बघत होते. १७५६ मध्ये अॅडमिरल वॉट्सन समुद्रातुन तर कर्नल क्लाईव्ह जमिनीवरुन विजय दुर्गावर तुटुन पडले. इंग्रजांच्या मार्याने गलबते पेटू लागली. विजयदुर्गावरच्या इमारती आगी लागून कोसळू लागल्या. तब्बल ७० गलबते आगिच्या भक्ष्यस्थानी सापडली. तुळाजीने सगळी सत्ता मानाजीला देऊन हात झटकले. तुळाजी नेस्तनाबुत झाला पण शिवछत्रपतींनी दूरदृष्टिने अथक मेहनत घेऊन उभे केलेले आरमार आता पक्षाघाताचा झटका आल्यागत झाले. उंदरावरच्या रागापोटि घराला चुड लावण्याचा प्रकार झाला. मराठ्यांच्या आरमाराचा दरारा जवळपास संपला. वरुन पुढल्या दोन वर्षांकरता विजयदुर्ग इंग्रजांकडे गेला. याचे दुरागामी परीणाम होणार होते.
१७६१ मध्ये रामजी बिवलकर, नारो त्र्यंबक, रघोजी आंग्रे यांसारखे झुंझार पुरुष जंजिर्यावर चालून गेले. पेशव्यांनी यावेळिही इंग्रजांची मदत घेतली. सिद्याची कोंडि करुन तो कधी शरण येतो याचीच वाट सगळे बघत होते. पण सिद्दी वस्ताद. त्याने वेढ्यातून पळ काढला व थेट मुंबईला जाऊन इंग्रजांचे पाय धरले. इंग्रजांनी उरले सुरले आरमार सज्ज करुन ते जंजिर्याजवळ आले. व मराठ्यांना उलट प्रश्न विचारला - "जंजिर्यावर हल्ला का केलात? तुम्हि आमचे मित्र, सिद्दिहि आमचा मित्र त्याने जंजिरा व कासा आमच्या स्वाधीन केला आहे त्यामुळे जंजिर्यावरचा हल्ला हा इंग्रजांवरचा हल्ला आहे. इथून निघून जा अन्यथा आंम्हाला तोफांचा वापर करावा लागेल!" त्यांनी जंजिर्यावर युनियन जॅक फडकावला, सिद्दि पुन्हा वाचला. मराठ्यांना हात चोळत बसावे लागले, कारण एकच - १६५६ मध्ये बुडवलेल्या आपल्याच गलबतांची भुते आता मराठ्यांना त्रास देत होती. तेव्हा आरमार असते तर इंग्रजांशी सागरी हुतुतु खेळता आला असता. नपेक्षा इंग्रज मध्ये पडलेच नसते. इंग्रजांनी हि दमदाटि केव्हा केली असेल?? उदगीरच्या लढाईत निजामाला पेशव्यांनी लोळवले होते तेव्हाची, तेव्हा पानिपत व्हायचे होते, मराठ्यांचे राज्य अटक ते कटक पसरले होते, दिल्लीला मराठे डाव्या पायाच्या अंगठ्याखाली चेपत होते तेव्हाची. हे इंग्रज कश्याच्या जोरावर करत होते? तर बलाढ्य आरमाराच्या. विजयदुर्गाचे प्रकरण मराठ्यांना जंजिर्यावरती इतके महाग पडेल असे वाटलेहि नसावे.
जंजिरा घेण्याचा शेवट्चा मोठा प्रयत्न म्हणजे नाना फडणविसांनी केलेले राजकारण. त्यावेळि जंजिर्यावर सिद्दि बाळुमियॉ होता. पण त्याचा सेनापती सिद्दि अबदुल्ला याने गादि बळकावली. सिद्दि बाळुमियॉ पळून पुण्यास आला. नाना फडणवीसांनी त्याला घोळात घेतले "एवीतेवी तुझी पाय काहि जंजिर्याला लागणार नाहित, त्यापेक्षा तो तु आम्हांला दे, त्याबदल्यात तुला स्वतंत्र जहागीर देऊ!" हा करार इंग्रजांच्याच मदतीने झाला. सिद्दि बाळुमियॉला सुरतेजवळ असलेली सचिन नामक सुपिक प्रांताची जहागीर दिली त्याने "कागदावरती" जंजिरा मराठ्यांना दिला. मात्र इंग्रजांनी यावेळि थातुरमातुर कारणे दाखवून हात वर केले, जंजिर्याला जिंकू शकेल असे आरमार मराठ्यांकडे नव्हते त्यामुळे सिद्दिला धक्काहि लागला नाहि.
पुढे इंग्रजांचे राज्य भारतावर सव्वाशे वर्षे होते. जंजिरा मात्र संस्थान म्हणूनच राहिले. अखेर भारत स्वतंत्र झाला तेव्हाच जंजिर्यावरचा सिद्याचा अंमल संपला आणि जंजिर्याचे संस्थान भारतात विलिन झाले. अशीहि साठा उत्तराची असफल कहाणी संपूर्ण झाली.
- सौरभ वैशंपायन
=============================
संदर्भ -
१) शककर्ते शिवराय - शिवकथाकार विजयराव देशमुख
२) महाराजांच्या मुलुखात - शिवकथाकार विजयराव देशमुख
३) महाराष्ट्राची धारातीर्थे - पं. महादेशशास्त्री जोशी.
४) राजाशिवछत्रपती - शिवशाहिर बाबासाहेब पुरंदरे.

जंजिरेकर सिद्यांचा ध्वज. |

10 comments:
धन्यवाद मित्रा! तुझ्यामुळे बरीच माहिती मिळाली आज! महाराजांचा दूरदर्शीपणा तो किती, की आजही देशावरची आक्रमणे समुद्रमार्गेच होत आहेत, किनारे तरी आणि निवांतच आहेत ! :(
जबरदस्त!
उत्क्रुष्ट लिखाण केले आहेस,
जंजिर्याची अहद पासून तहद पर्यंत अख्खी कुंडली मांडलीस!
तुझ्या बारकाईने केलेल्या अभ्यासाला सलाम!!
baarkaaine abhyas kelela yaatun disun yetoy!
utkrusht likhan kele aahes!
मस्त लेख !!
बरीच माहिती मिळाली,
अजुन हवी आहे, लवकरच तुला संपर्क करीन !
:)
मस्त आहे, खूप छान जमलंय
छान लेख !
keep it up
मोलाची माहिती. लेखणी लाजवाब
Jabardast..
फार छान माहिती.
कलाल बांगडी तोफ जंजिऱ्यावर कशी आली याची काही माहिती मिळू शकेल का ?
Post a Comment