पुलं जाऊन आज १२ वर्ष झाली. पण मुळात पुलं आपल्यात नाहीयेत हेच खरं वाटत नाही. कारण एकही दिवस असा जात नाही जेव्हा पुलंची किमान एकदा आठवण होत नाही. आणि कुठल्याही चांगल्या वाईट कारणाने पुलंची आठवण होतेच. त्यातून सध्या एकीकडे "अपूर्वाई" वाचणं सुरु आहे. शिवाय त्यांच्या वेगवेगळ्या MP3 ऐकणं असतच अधुन मधून. रोजचं आयुष्य असं पुलंकीत असणं यासारखं सुख नाही.
हा माणूस काहिही लिहू शकायचा. कुठल्याही विषयात, कुठल्याही लेव्हलपर्यंत विनोदी शब्दचित्रापासून ते चटका लावून जाणार्या प्रसंगाचे शब्दचित्र सहज उभं करायची ताकद त्यांच्या लेखणीत होती. आणि मुळात वाचणार्या व्यक्तीला ते पटायचं. हे फारच कमी लोकांना जमतं. व्यक्ती आणि वल्ली, असा मी असामी, गणगोत, म्हैस यातली खरी आणि काल्पनीक पात्रे वाचताना आपण यांना ’ओळखतो’ ही भावना तयार होते.
महाराष्ट्राला विनोद, उपहास, कोपरखळ्या नवीन नाहीत. पण पुलंच्या विनोदांची आणि एकंदरच विचारांची घडण आणि उंची वेगळी होती. पुलंनी विनोदाने कधी कुणाला ’घायाळ’ केले नाही. सोनाराने कान टोचावेत तसे त्यांचे विनोद असत. आणिबाणी जाहीर झाली तेव्हा शिवाजीपार्कवरील सभेत देखिल त्यांचा तोल सुटला नाही. त्या भाषणात तक्षकाची गोष्ट सांगताना - "...आणि ऋषींनी "तक्षकाय स्वाहा:" म्हंटले पण तक्षकाची आहुती यज्ञात पडेना, कारण तो इंद्राच्या सिंहासनापाठी लपला होता, म्हणून ऋषींनी ’इंद्राय तक्षकाय स्वाहा: अशी आहुती दिली त्या बरोबर ’इंदिराचं’ सिंहासन डळमळू लागलं" असं म्हणून वरुन "लक्ष द्या ... मी "इंद्राच" सिंहासन म्हंटलय बरं का!!" हेही ठेवून दिलं होतं. हे असले शालजोडितले भल्याभल्यांना सरळ करायची ताकद राखून होते. म्हणूनच कदाचित पुलं एकटेच "महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तीमत्व" ठरले.
पुलंच्या साधनेचं बारा वर्षांच एक तप झालय. पूर्वी म्हणे देवाची कठोर साधना केली की अनेक तपांनंतर तो प्रसन्न होत असे. इथे उलटं आहे. "पुरुषोत्तम" केव्हाच प्रसन्न झालाय. त्यांनी इतकं देऊन ठेवलंय - इतकं देऊन ठेवलय की आपल्या इवल्याश्या हातात ते मावत नाही.
अनंत हस्ते पुरुषोत्तमाने देता किती घेशील दो करांने?
- सौरभ वैशंपायन.
2 comments:
tu chan lihitos.....yashwant ho mitra
Thank you Akshay! :-)
Post a Comment