Saturday, October 6, 2012

अक्लेश केशव मंजरी तिलकम् - अनुवाद

"अक्लेश केशव मंजरी तिलकम् - अष्टपदी" म्हणून जयदेव या ओरिसामधील कवीची एक काव्य रचना आहे. राधा हे काल्पनिक पात्र कृष्ण चरीत्रात आणण्याची कल्पना जयदेवांची समजली जाते. त्यांनी श्रीकृष्ण - राधेवरती गीत-गोविंद हे अध्यात्मिक आणि तरीही शृंगार रसाने परीपूर्ण असे काव्य रचले. माझ्या एका मित्राने - अंबरीश फडणवीस याने त्यातली अष्टपदी मला मराठीत पद्य अनुवाद करायला दिली. या काव्यात राधा किंवा गोपी म्हणा श्रीकृष्णा बरोबर आदल्या रात्री केलेल्या रतीक्रिडेबाबत आपल्या सखीला सांगते आहे अशी कल्पना आहे. मी अर्थात शब्दश: अनुवाद केला नाहीये, एखाद दुसरी गोष्ट जाग सोडूनही गेली आहे. शिवाय अष्टपदी मधली सातच पदे मी घेतली आहेत कारण आठव्या पदात तुका म्हणे - नामा म्हणे तसं जयदेवांनी स्वत:चेही "म्हणे" घातले आहे आणि स्वत:ला लक्ष्मीचा भक्त संबोधुन हे काव्य सगळीकडे सुख शांती पसरवो असेही म्हंटले आहे.

अनेकांच्या दृष्टिने हि कविता अब्रह्मण्यम्‌ होऊ शकते. पण ह्याचा अर्थ शृंगाराला आपली संस्कृती किती रसिकतेने घेत असे हे देखिल समजण्याचा उत्तम मार्ग आहे. श्री आदि शंकराचार्यांनी देखिल शिव-पार्वतीच्या प्रणयलीलांचे वर्णन केले आहे. पार्वती - लक्ष्मी यांचे तर केसापासून ते नखापर्यंत "आपादमस्तक" म्हणतात तसे अत्यंत शृंगार पूर्ण वर्णन श्लोकांत केल्याचे आपल्याला दिसते, पण त्यात कुठलीही वासना नसून केवळ स्तुती आहे. ह्या गोष्टि लक्षात घेतल्या तर मग खजुराहोतील कामुक शिल्पेही सुजाणपणे व रसिकतेने बघता येतील आणि इतिहासाचार्य राजवाड्यांचे भारतीय विवाह संस्थेचा इतिहास वाचतानाही बिचकायला होणार नाही. कवीश्रेष्ठ कालिदासाने मेघदूतात तर ठिकठीकाणी अशी चुरचुरीत किंवा चटका लावणारी विरहाची किनार असलेल्या शृंगाराची पेरणी केली आहे.

भारतीय अध्यात्माला व्यक्त व्हायला कुठेही बंधने नाहियेत मग तो जयदेव - आदी शंकराचार्यांनी मांडलेला शृंगार असेल किंवा भर ’रणांगणात’ सांगितलेली गीता असेल.

तर इतकि प्रस्तावना अशा करीता कि मी कुठल्या पार्श्वभूमीवरती हि कविता करतो आहे हे तुम्हांला समजायला हवं. तरीही हे कुणाला अश्लिलतेने भरलेले वाटल्यास एकच सांगणे - मुळ काव्यासमोर माझा पद्यानुवाद फारच "पांचट" आहे.
=========================




शांत सभोवती रात्र सजणी, दूर सजले एकाकी उपवन,
अंधाराची लेवून कांती, हसतो कामूक श्यामल मोहन,
लपाछुपीचा खेळ चालला, चंचल त्या प्रणयाच्या रात्री,
मिठीत अचानक खेचून घेता, अनाम वादळ उठले गात्री ॥१॥

कामातुर स्पर्षाने त्याच्या, रोम-रोम उठले होऊन पुलकित,
कुरवाळित सांगे नकोस लाजू, नकोस होऊ उगा भयचकित,
प्रणयी गुंजरव करु लागले, मिठीस त्याच्या  घेई लपेटून,
मृदु शब्दांनी तया सुखविता, वस्त्र कटीचे गेले निसटून ॥२॥


अन्निजवले मजला त्याने, मऊ तृणांच्या शय्येवरती,
उरोज उन्नत तये चुंबिले, विसावला क्षण त्यांच्यावरती,
निरवसनी देहावर अवघ्या, सख्याचे प्रणयी हात फिरती,
उचलुन अधोमुख सल्लज चेहरा, करी दंतक्षत अधरावरती ॥३॥

प्रणयक्रिडेने म्लान होऊनी, मिटे पापणी होऊन हर्षित,
चिंब जाहले शरीर स्वेदे, तनु दोघांची होई कंपित,
मदन शरांनी दोघे जखमी, मिलन सुखाची झाली घाई,
देह बिलगता नसे विलगता, निशा धुंद मग सरकत जाई ॥४॥

सित्कारातुन प्रणय वेदना, केली जाहीर, जणू कपोत घुमतो,
प्रणयचतुर प्रियकर माझा, मला रिझविण्या अश्रांत श्रमतो,
केसांमधली कुसुमे चुरली, बटा पसरल्या धरणीवरती,
प्रणयाराधनेत येई आर्तता, नखे उमटली वक्षांवरती ॥५॥

रुणझुणणारे चुकार पैंजण, नाद तयांचा वाढत गेला,
मीलनसुखासी सेवित असता, कटिवरली तुटे मेखला,
अंबाड्यासी देता हिसका, मुक्त जाहले केस बांधले,
जवळ घेऊनी दिली घेतली न आठवी कितीक चुंबने ॥६॥

मृदु शय्येवर निवांत निजले, ओठ बिचारे होत कुसुंबी,
संभोगाचा शीण हराया, शरीर पहुडले पृथुल नितंबी,
अर्धे मिटले नयन तयाचे, नील कमलदल जणू उमलले,
नवी चेतना फुलली तेव्हा, मदनमोहना पुनश्च भुलले. ॥७॥

 - सौरभ वैशंपायन.

3 comments:

Anonymous said...

होते जरी मुळात सुंदर, भाषेचे पण पडले अंतर
प्राशिली तरी काव्यसुधा, वाचुनी मित्रा तव भाषांतर

र ला र आणि ट ला ट जोडणारा
------सुरजीत

Abhishek said...

राधेचं गॉसिप, उत्तम झालंय!

Anonymous said...

राधा ही कृष्णाची केवळ सखी नसून मूर्तिमंत समर्पणबुद्धी आहे हे आपण ध्यानात घेणे आवश्यक होते.