Tuesday, February 19, 2019

सूर्योदय

जगात किती खोटारडेपणा भरलाय? लोकंही खोटी आणि खोटारड्या लोकांचा देवसुद्धा खोटा!!

गाभाऱ्यातल्या दगडाशी शिव्या – शापांसहीत यथेच्छ भांडुन अंधारातच घाटाच्या पायऱ्या तरातरा उतरुन नदीपात्रात उतरलो ...
... जलसमाधि घेण्याकरिता!

पाण्याचा जीवघेणा थंडपणा तापलेलं डोकं शांत करु शकत नव्हता.मनाचा हिय्या करुन स्वतःला पाण्यात झोकुन देणार
इतक्यात,
घाट उतरत जवळ येणाऱ्या घुंघरांचा आवाज ऐकु आला.

आवाज थांबला तसा मागे वळलो.
तळव्याने आडोसा धरलेल्या दिव्याचा प्रकाश तुझ्या शांत शांत सस्मित चेहऱ्यावर पसरला होता.
मी पाण्यात दगडासारखा जागीच खिळलो.

“सर्वेत्र सुखिन: सन्तु ...” किणकिणत्या निरागस आवाजात तू तीन-तीनदा म्हणत असलेला शांतिमंत्र कानात घुमत राहीला.

तबकातला तो दिवा उचलुन हलक्या हाताने तू पाण्यात सोडलास, आणि बाजुचे पाणी ओंजळीने ढकलत दिव्याला दिशा दिलीस.

दिव्याने प्रवाहावर डोलत पुढे जायला सुरुवात केली. दूर जाणाऱ्या ज्योतिकडे मी एकटक बघु लागलो.
पुढच्याच वळणावर हेलकावा खात दिवा नजरेआड झाला आणि क्षणार्धात समोरच्या डोंगराची कडा दिसु लागली.

ही तर सूर्योदयाची पहीली खुण

“हिरण्मयेन पात्रेण सत्यस्यापिहितं मुखम्‌।
तत् त्वं पूषन्नपावृणु सत्यधर्माय दृष्टये॥“


मी उगाच पुटपुटलो.

भानावर येऊन पुन्हा नजर वळवली.
तुझी पाठमोरी आकृति वरच्या शेवटच्या पायरीवर पोहोचली होती.

नकळत माझे पाय मला पाण्याबाहेर घेऊन आले. पाणी निथळत क्षणभर पहील्या पायरीवर थांबलो मग दोन दोन पायऱ्या चढत वर आलो.

झुंजुमुंजु प्रकाशात भरभर पुढे जात असलेल्या तुझ्या पावलांनी मलाही दिशा दाखवली होती
त्या दिशेने निघालो.

जाता जाता मंदिराच्या कळसाला हात जोडले,
गाभाऱ्यातला देवाला इतकं देखिल बास होतं म्हणे!

 - सौरभ वैशंपायन

No comments: