कोरोनामुळे जगाचं रूप बदलून गेलं आहे. अजूनही बरंच काही बदलणार आहे. काम करण्याच्या, जगण्याच्या पद्धतीत फरक पडत चालला आहे. ज्या गोष्टी आधी अशक्य वाटत होत्या त्या दिनाचर्येचा भाग होऊ लागल्या आहेत. आणि ज्या गोष्टी रोजचा जगण्याचा भाग होत्या त्या तितक्याश्या महत्वाच्या राहिलेल्या नाहीत.
सुरुवातीला हे सगळं महिना दीड महिन्यात आटोक्यात येईल असं वाटत होतं पण अर्धा ऑक्टोबर संपला पण भारतभर परिस्थिती बिकट होत चालली आहे. सरकारी यंत्रणा, वैद्यकीय सेवा, पोलीस, शास्त्रज्ञ विविध समाजसेवी संस्था जीव तोडून काम करत आहेत पण काही ठिकाणी साधनांची कमतरता, काही ठिकाणी पैश्यांची कमतरता, काही ठिकाणी निष्काळजीपणा तर काही ठिकाणी पूर्णतः गोंधळ यामुळे गोष्टी कठीण बनल्या आहेत.
या सगळ्यात सर्वात जास्त प्रभाव पडला आहे तो प्रत्येकाच्या आर्थिक स्थितीवर. आर्थिक फटका अर्थातच सगळ्यांनाच बसला आहे पण जे अतिश्रीमंत, श्रीमंत किंवा उच्च मध्यमवर्गीय आहेत त्यांच्या आयुष्यात उलथापालथ होईल इतका फरक पडलेला नाही मात्र कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि गरिबांना जोरदार चटका बसलेला असून अगदीच हातावर पोट असलेले तर बिचारे पार होरपळले गेले आहेत.
या आपत्तीतून सावरल्यावर यातून धडा घेऊन पुढे सरकारने आपल्या प्रशासकीय, वैद्यकीय, आर्थिक, आपत्कालीन यंत्रणा भविष्यात असं संकट आल्यास त्याला तोंड देण्यासाठी सज्ज करणे आवश्यक आहे. सरकार शिवाय सामान्य माणसाने देखील आपापली जबाबदारी उचलणे आवश्यक आहे.
वरती म्हंटल्याप्रमाणे सर्वांनाच आर्थिक चिमटा बसला आहे. यातून सर्वांनीच आणि त्यातूनही मुख्यतः मध्यमवर्गीय आणि गरीब व्यक्तींनी भविष्याचा विचार करून काटेकोर आर्थिक नियोजन करणे अत्यंत आवश्यक आहे. माझ्या या लेखाचा रोख मुख्यतः मध्यमवर्गीय आणि गरिबांकडे आहे. अतिश्रीमंत अथवा अतिगरीब या दोन्ही टोकांच्या बाबतीत कुठलेही भाष्य करण्यास अथवा मैत्रीपूर्ण सल्ला देण्यास मी असमर्थ आहे असं मला वाटतं.
मी स्वतः आर्थिक नियोजनाची सुरुवात फारच उशिरा म्हणजे माझ्या वयाच्या तिशीत केली. ती सुरुवात मी किमान पंचविशीत करायला हवी होती असं आता राहून राहून वाटतं. असो, वीस ते तीस दरम्यान असलेल्या सर्व तरुणांना मी हे सांगू इच्छितो की शक्य तितक्या लवकर आणि शक्य तितकं आर्थिक नियोजन करायला सुरवात करा (मग तुम्ही शिकत असाल आणि घरून पॉकेटमनी जरी मिळत असेल तरी) जाणकारांकडून मार्गदर्शन घेऊन त्यातूनही सुरुवातील SIP आणि तसे विविध गुंतवणुकीचे सोपे पर्याय जाणून घ्या व गुंतवणूक करायला सुरुवात करा. जर खांद्यावर कुटुंबाची पूर्ण जबाबदारी नसेल तर उलट शक्य तितकी अधिकाधिक गुंतवणूक करा जेणेकरून तिचा भविष्यात फायदा होईल.
लेख वाचणाऱ्या सर्वांनी किमान एक गोष्ट ध्यानात ठेवून साध्य करण्याचा प्रयत्न करा की आपल्याला घरखर्चाला दर महिना जितका खर्च येतो (महिनाभराचा किराणा, सर्व बिले, फी, असल्यास औषधे) तो "जीवनावश्यक" खर्च तितका जाणून त्यावर अजून थोडी रक्कम (उदाहरण म्हणून महिन्याला या सगळ्याला १७-१८ हजार रु लागत असल्यास वरचे २ टाकून २० हजार) ... असे किमान ३ महिन्याचे बफर (म्हणजे साधारण ६० हजार रुपये) तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवा अथवा हाताशी तितकी रक्कम असल्यास बाजूला काढून ठेवा. हे साध्य करण्यासाठी काहींना एका झटक्यात जमेल काहींना कदाचित दोन वर्ष निघून जातील पण हरकत नाही सुरुवात तर करा. वाटल्यास हे बफर सहा महिन्यांपर्यंत वाढवता आले तर उत्तमच पण आत्तासारखे कुठलेही आर्थिक संकट येत नाही तोवर याला हात लावायचा नाही म्हणजे नाही. या फंडाचा फायदा असा होईल की न होवो पण काही कारणाने दोन तीन महिने उत्पन्नाचा स्रोत आटला अथवा थांबला तरी आपण आणि कुटुंब त्यातून तरू शकेल व आर्थिक ताण नसल्याने शांत डोक्याने परिस्थिती हाताळता येईल.
असा बफर तयार झाला की गुंतवणुकीचे अथवा आर्थिक नियोजनाचे पर्याय शोधत राहावेत. सर्वात जास्त आणि झटपट खर्च होणाऱ्या काही कारणांपैकी २ अत्यंत महत्वाची कारणे म्हणजे शिक्षण आणि अनपेक्षित आजारपण अथवा अपघात. त्यांचाही विचार करून ठेवणे आवश्यक आहे.
ज्यांच्या घरात लहान मुलं आहेत त्यांनी शक्य झाल्यास मुलांच्या नावे दर महिना थोडी थोडी गुंतवणूक करावी. आजकाल अगदी पाचशे रुपये महिनापासून गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. पुन्हा काल्पनिक उदाहरण घेऊ समजा ते मूल जेमतेम वर्षभराचं आहे आणि महिना फक्त ५०० रु गुंतवणूक केलीत तरी वर्षाचे ६ हजार. त्यांच्या वयाच्या २१ व्या वर्षीपर्यंत म्हणजे पुढील २० वर्ष दर महिना फक्त ५०० रु गुंतवले तरी मुद्दलच सव्वालाखांच्या आसपास होऊ शकेल. गुंतवणुकीच्या विविध पर्यायानुसार कमीतकमी व्याज धरूनही त्यांच्या उच्च शिक्षणाचा खर्च निश्चित करता येईल. इथे मुद्दा इतकाच आहे की मूल जितकं लहान असताना आपण त्याच्या नावे गुंतवणूक करू तितकं चांगलं.
इन्शुरन्स, टर्म इन्शुरन्स आणि हेल्थ इन्शुरन्स हे देखील मृत्यू, आजारपण, अपघात अशावेळी उपयोगी पडतात. आजकाल महिना ७००-८०० रुपयांचा मासिक हप्ता भरून ५० लाखांपर्यंतचे संरक्षण देणारे टर्म इन्शुरन्स/हेल्थ इन्शुरन्स अगदी सहज ऑनलाइन मिळतात. त्यातील तज्ञांशी बोलुन अधिक जाणून घेऊ शकता.
रोजचा खर्च लिहून ठेवायची सवय करा. अगदी एक रुपयाचे चॉकलेट खाल्ले तरी नोंद झालीच पाहिजे. यात कंजूसपणा किंवा कमीपणा नसून घामाच्या एकेका रुपयाला कुठे पाय फुटले याचा ट्रॅक ठेवणे इतकाच याचा उद्देश. आजकाल कॉम्प्युटर/मोबाईल मध्ये अशी applications किंवा excel sheets असतात. त्यात साधे कारण आणि पुढे जमा-खर्चाचे ३ रकाने केले तरी हे सहज जमते. सुरुवातील महिना दीड महिना हा ट्रॅक ठेवणे कठीण जाते कधी कंटाळा येतो कधी विसरायला होतं पण विश्वास ठेवा एकदा सवय लागली की डोक्यात हिशोब बसायला लागतो. महिन्याच्या सुरुवातीला बँकमधे, खिश्यात, असल्यास ई-वॉलेट मध्ये किती पैसे आहेत, कुठे कधी कसे किती पैसे खर्च झाले? त्यातले गुंतवणुकीत किती ठेवले, आवश्यक खर्च किती, अनावश्यक खर्च किती झाला व महिनाअखेर शिल्लक किती हे एका क्लिकवर समजतं. मी स्वतः गेली काही वर्षे हे करतो आहे आणि माझ्या मित्र- मैत्रिणींना हे करण्याचा सल्ला देतो. अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे केलेली गुंतवणूक व त्याची कागदपत्रे ही घरातील किमान एका माणसाला माहीत असावी याची काळजी घ्या.
लक्षात ठेवा पैसा, आजारपण, अपघात आणि मृत्यू या आपल्या हातात नसलेल्या गोष्टी आहेत. आपले आर्थिक नियोजन जितके चांगले तितकी किमान एक बाजू शक्य तितकी सावरता येते. अथवा आजारपण किंवा अपघात यात पैसा उपयोगाला येतो. मृत्यूनंतर आपल्या कुटुंबाचा आधार बनू शकतो.
पैसा हे सर्वकाही नसतं पण पैसा हे खूप म्हणजे खूप काही असतं. मृत्यू अथवा अपघाताचा नकारात्मक विचार न करता काही अप्रिय घटना घडलीच तर त्यातूनही आपण अथवा कुटुंब सावरले पाहिजे हा "अर्थ-सकारात्मक" विचार नक्की करा.
- सौरभ वैशंपायन