Tuesday, May 11, 2021

संवाद

लहान बाळाने त्याच्या मुठीत आजोबांचे बोट पकडलेले आहे असा दोघांच्या फक्त हातांचा एक फोटो काही महिन्यांपूर्वी बघण्यात आला तेव्हा सुचलेली कविता आज ड्राफ्ट साफ करताना पुन्हा समोर आली. त्या क्षणी आजोबा नातवंडाशी/पतवंडाशी काय संवाद साधत असतील -

=====

एक चिमुकला स्पर्श मिटवतो,
आपुल्या काळामधले अंतर,
वृद्धत्व नव्हे हे दुजे बालपण,
दिलेस मजला याचे प्रत्यंतर.

अनुभवांच्या छिन्नीने त्या,
सुरकुत्या उमटल्या अंगांगावर,
खाच-खळगे टाळून साऱ्या,
ओतू बघतो तव हातांवर.

आपुले नशीब घडवी आपण,
की सटवाई लिही खरोखर?
एकाकडूनी दुसऱ्या हाती,
चालत राही डाव निरंतर.

काही सरले काही उरले,
आयुष्याचा खेळून चौसर,
माझ्या डोळ्यांमधली देतो,
तुजला काही स्वप्ने सुंदर.

- सौरभ वैशंपायन

No comments: