Thursday, May 3, 2007

परित्राण




थरथरे भूमी सारी, क्षणी कोसळे आकाश,
लागे सुर्याला ग्रहण झाकोळला प्रकाश. - १

धन्य झाले विजापूर, उभा राहीला अफ़झल,
प्रार्थती शिवास सगळे, पचवावे हलाहल. -२

बुत्शकिन मैं गाझी, घुमला आवाज करडा,
फुटली भवानी घावात, झाला स्वप्नांचा चुरडा. -३

काळीज फाटे जिजाऊचे, दु:खे आक्रंदली धरणी,
जीव जपुन रे कान्हा, दुष्ट कंसाची करणी. -४

छळविला पिता याने,मारीला फसवुनि भ्राता,
फोडल्या लेण्या नी राऊळे कोणी उरला न त्राता. -५

गर्दीस गनीम मिळवा तुला स्वराज्याची आण,
राम तूच कृष्ण तूच करी त्वरे परित्राण. -६

भेट ठरली प्रतापी सरे वेळ सावकाश,
पसरले बाहु असुराचे उलगडे यम-पाश. - ७

हिरण्यासी अधांतरी नरसिंह जैसा फाडे,
तैसा फाटला अफ़झल, उडले रुधिर शिंतोडे. - ८

शांत झाला शिव-नृप, अग्नि अंतरीचा विझे,
आंदोळली पृथ्वी सारी, देई झुगारुन ओझे. -९


- सौरभ वैशंपायन.

1 comment:

Amit Dange said...

gr8 gr8 saurabh.khupach sundar aahe tujhi vakyarachana. khupach sundar. apratim ahe. good keep it up.