सूर्यग्रहणाआधी जसे सूर्याला त्याचे वेध लागतात तसेच वेध गेल्या दोन दिवसांपासून सामान्य मुंबईकरांपासून ते मिडियापर्यंत सगळ्यांना लागले होते. निमित्त होते २६/११ च्या वर्षपूर्तीचे. मी ठरवलं होतं यावर नाहि लिहायचं. कारण हर तर्हेने हा विषय गेली वर्षभर चर्चिला गेला आहे. पण मनातली अस्वस्थता अखेर आता इथे कागदावर बाहेर पडतेच आहे. का?? माहित नाहि! पण त्या घटनेशी प्रत्येक मुंबईकराचं नात जडलय. आणि हे नातं म्हणजे नुसते भावनांचे बळे बळे काढलेले कढ नव्हेत किंवा कुणाला दाखवण्यासाठी छाती पिटुन काढलेले हेलहि नव्हेत. २६/११ ला आतुन हादरलेला मुंबईकर आत्ताशी कुठे सावरतोय. दबकत बिचकत ट्रेन मध्ये चढताना, सीएसटि, ताज इथे उभं राहताना परत परत ती खपली निघतेय. मुंबई स्पीरीट - वर्क स्पीरीट नावाच्या कुबड्यांवर मुंबई उभी राहते आहे. आणि अशीच अनंतकाल त्या कुबड्यांवर उभी राहिल. “मजबुरी का नाम मुंबई स्पीरीट!” काहिंना हे पटेल तर कोणाला अजीर्ण होईल, पण हि वस्तुस्थिती आहे. पण मजबुरी म्हणुन का होईना त्याच वर्क स्पीरीटसाठी मोठ्या मनानं टाळ्या वाजवाव्यात म्हणून नाहि नाहि म्हणताना लिहितोय.
आज सकाळी जाग आली तीच सकाळच्या टि व्ही वरील बातम्यांनी. त्यातली पत्रकार अखंड बडबडत होती मध्येच ती म्हणाली बरोबर एका वर्षापूर्वी याच ताजवर अनपेक्षीत दहशतवादि हल्ला झाला. डोक्यात सणकच गेली. अनपेक्षीत??? RAW आणि सरकारी यंत्रणांना धडधडित संदेश मिळाला होता मुंबईवर समुद्रमार्गे हल्ला होऊ शकतो. आणि म्हणे अनपेक्षीत हल्ला. खरी प्रश्नांची सुरुवात इथुन होते. त्या संदेशाचं काय केलत?? हा प्रश्न स्ट्रायकर सारख्या दुसर्या प्रश्नावर आदळतो आणि बघता बघता हजारो प्रश्न डोक्यात विखुरतात.
या ठिकाणी हल्ला कसा झाला? कोणी केला? सरकार किती छान झोपलं होत? याची चर्चा करण्यात हशील नाहि. ते सगळ्यांना माहित आहे. कौतुकाची गोष्टि अशी आहेत कि आमचं साहित्यच काम करत नव्हतं. आमच्या पोलिसांकडे असलेल्या बंदुकिंनी आपण शेवटची गोळी कधी ओकलो होतो हे आठवायचा प्रयत्न केला तर तीला आठवेच ना!!! आणि आमची “बुलेटप्रुफ जॅकेट्स?” बेसिकली ती फक्त जॅकेट्स होती कारण त्यात बुलेट थांबल्याच नाहित. किंवा असतील असतील जॅकेट बुलेटप्रुफच असतील पण कसाब आणि कंपनीच्या गोळ्यांमध्येच डिफेक्ट असेल. कुठल्या कंपनीच्या गोळ्या वापरता तेहि विचारा त्याला चौकशीत.
करकरेंनी सारखी मदत मागुन देखिल कामा हॉस्पिटलकडे मदत का पाठवली नाहि?? कि पोलिस दलाचा शिरस्ता आहे कि सहकार्यांनी मदत मागितली तर शपथेवर ती मिळु द्यायची नाहि?? कारण दोन महिन्यांपूर्वी गडचिरोलित जे १६ पोलिस शहिद झाले त्यांनी सुध्दा लवकरात लवकर हॅलिकॉप्टरची मदत पाठवा असे वायरलेस वरुन सांगितले होते, मदत येते आहे हे ते किमान चार तास “ऐकत” होते. केवळ दारुगोळा संपला म्हणुन नक्षलवाद्यांनी त्या बहाद्दरांना कुत्र्याच्या मौतीने मारले. याउलट आमच्या माननिय नेत्यांना निवडणूकिच्या प्रचाराला कशी भराभर हॅलिकॉप्टर्स मिळतात हे बहुदा E=mc² पेक्षा कठिण समिकरण आहे. पुढचे प्रश्न कामटेंना कामा हॉस्पिटलपाशी कोणी जायला सांगितले? आमचे तीन मोठ्या पदावरील अधिकारी एकाच गाडित का बसले? अलम दुनियेला आग लागली तरी प्रोटोकॉल मध्ये न बसणारी गोष्ट करायची नाहि असे स्पष्ट आदेश त्यांना ट्रेनिंगमध्ये असताना हि चूक त्यांच्याकडुन का घडली? ते जबर जखमी आहेत हे कळल्यावर सुध्दा अर्धातास त्यांच्याकडे कोणीच का फिरकले नाहि? कंट्रोलरुमला करकरेंनी किमान ६ - ७ संदेश पाठवुन देखिल “करकरे कुठे होते हे मला माहित नव्हते!” असे राकेश मारीया कसे म्हणू शकतात? करकरेंचं सो कॉल्ड बुलेटप्रुफजॅकेट कसं गायब झाल? हॉस्पिटलमध्ये पोहोचेपर्यंत त्यांच्याच स्ट्रेचरवर होतं म्हणे. मज पामराच्या डोक्यापलिकडचे प्रश्न आहेत.
या सर्व हल्ल्यात सर्वात महत्वाची बाब “नरीमन हाऊस” ज्या गोष्टिकडे सगळ्यांच सर्वात जास्त दुर्लक्ष झालं ते ठिकाण. इथे इस्त्रायली किंवा ज्यू लोकं राहतात, हे २७ तारखेपर्यंत आजुबाजुच्या इमारतीमधील लोकांनाहि महित नव्हते ते ठिकाण अतिरेक्यांनी किती अचूक टिपले हे पाहता ताज-सीएसटी-ट्रायडंट हे खरंतर फक्त “स्क्रीन सेव्हर” असावेत आणि मेन डेस्क्टॉप वेगळाच असावा हे समजतं. कॅफे लिओपोल्ड देखिल केवळ गोरी चमडि मारायची आणि मुंबई परदेशींसाठी असुरक्षित आहे हे जगाला दाखवायचं त्याने भारताच्या आर्थिक राजधानीला “डॉलर्स” मध्ये फटका बसला पाहिजे यासाठी निवडलं. बाकि ताज- ट्रायडेंट हे उच्चभ्रू तर सीएसटी आम जनतेला सैरभैर करण्यासाठी वापरलं. नरीमन हाऊस एकदा उडवलं कि आपोआप इस्त्राइल – भारत यांच्यात कटुता निर्माण होणारच हे ते ओळखुन होते. आतातर हेडली प्रकरणामुळे ज्यूंची भारतातील वसतीगृहे वा धर्मस्थळे हि “मोसादच्या” कारवायांची ठिकाणे असु शकतात हे ठरवुन त्यांवर निशाणा साधुन ते इस्त्राइलला धमकवण्याची नवी पध्दत सुरु करत आहेत.
बाकि काहिहि म्हणा, या अतिरेक्यांना आपण एखादे “मॅनेजमेंट” कॉलेज काढुन दिले पाहिजे. ज्या मास्टर माईंड ने हा कट रचला त्याला केवळ यासाठी धन्यवाद दिले पाहिजेत कि “बाबा आमच्या व्यवस्थेत किती भगदाडे आहेत हे दाखवलस हे उपकारच होय!” या घटनेनी गल्लीपासुन ते दिल्लीपर्यंत भल्याभल्यांच्या बुडाखालच्या खुर्च्या हिसकावुन घेतल्या. लोकांनी सगळं ऑपरेशन संपल्यावर पुढचे काहि दिवस “we want CEO not CM!” असे फलक झळकावले. लाखो रुपयांच्या मेणबत्या जाळल्या, ढिगाने गुलाबांची निर्माल्ये झाली, हे सगळं बेगडि होतं असं मी मुळीच म्हणणार नाहि उलट ती त्यावेळची स्वाभाविक प्रतिक्रियाच होती आणि ती बरोबरहि होती. पण आपला ताणून झोप काढायचा दिवस दर पाच वर्षांनी एकदा येतो. आपला CEO कोण व्हावा हे आम्हि तेव्हा ठरवत नाहि. मग ५२% झालेल्या मतदानावर आपापसात “मांडवली” करुन ते सत्तेवर बसतात. त्यांना सरकार स्थापन करायला पंधरवडा लागतो याची लाजहि वाटत नाहि. याला कारण आपणच आहोत.
आता प्रत्येकाने आपापली जबाबदारी मान्य करायची वेळ आलीये. अन्यथा शहिद झालेले १६ पोलिस आणि १ उमदा NSG कमांडो यांच बलिदान केवळ फुकट गेलं असच म्हणावं लागेल. त्यावेळि अथवा त्यानंतर समाजाने काय चुका केल्या हे बघितले पाहिजे. सोपे उदाहरण – नरीमन हाऊस! काय घडतय हे दुसर्यांच्या खांद्यावरुन वाकुन वाकुन बघायची सवय त्यादिवशीहि आपण जाहिर केली. तिथे नरीमन हाऊस मध्ये जे काहि सुरु होते तो तमाशा खचित नव्हता, पण गर्दि करायचा काय तो उत्साह? वा?? पोलिसांची कामं हि अशी वाढतात. एखाद्या अतिरेक्याने खिडकितुन एखादि फैर खाली चालवली असती तर गोळ्यांनी ८-१० आणि पळापळित - चेंगराचेंगरीत ८० जण मेले असते. तीच गोष्ट मिडियाची, सबसे तेज च्या नावा खाली कुठली बातमी? कशी द्यायची? काय दाखवायचं? किती दाखवायचं? याचं भानच TRP च्या घाणेरड्या स्पर्धेत मिडियाला राहिलं नव्हतं किंवा रहात नाहि हि १०१% सत्य गोष्ट आहे. कदाचित काहि पोलिस आणि एका NSG कमांडोच्या रक्ताचे डाग मिडियावर कायमचे लागले आहेत भले ते कितीहि नाकारोत. कराचित बसलेले आका जे संदेश देत होते त्यावरुन ते धडधडित समोर आलय.
या सगळ्यात अतिशय कौतुक करावं आणि पाठ थोपटावी असे काम मुंबई अग्निशमन दलाने केले. पोलिस – NSG इतकेच त्यांचे कौतुक करायला हवे जे तितकेसे झाले नाहिये. समोर केवळ मृत्यु तांडव करत असताना कुठल्याहि सुरक्षा साधनांशिवाय ताज आणि ट्रायडेंटला भिडायच हि कल्पनाच अंगावर काटा आणणारी आहे. आणि त्या लोकांनी सलग ७२ तास ते काम यशस्वीपणे करुन दाखवलय. नेहमीप्रमाणेच जीवापेक्षा कर्तव्याला पुढे ठेवणार्या त्या हिरोंची मुंबई कायमची आभारी राहिल.
एका वर्षात सुरक्षेत ज्या सुधारण्या घड्ल्या त्या स्वागतार्ह आहेतच पण त्या पुरेश्या नाहित हेहि खरयं. सीएसटि सारख्या प्रचंड गर्दिच्या ठिकाणी अजुन सुरक्षा ढिलीच आहे. आणि असं किती स्टेशन्सवर सुविधा कश्या पुरवणार हा नविन प्रश्न आहेच. कितीहि उपाय केले तरी तोकडेच ठरतील हे सत्य आहे. नव्याने फोर्स वन हि यंत्रणा स्थापन केलेली असली तरी त्याचा उपयोग व्हायला हवा आणि त्याचा ताण दुसर्यावर पडता कामा नये. हे सगळं यासाठी म्हणतोय कि काल पेपर मध्ये बातमी होती कि एका वर्षात जरुरिच्या शस्त्रांची खरेदि सरकारने केलीच नाहिये. फोर्स वनला AK -47 कमी पडु नयेत म्हणुन क्विक रीसपॉन्स टिम च्या “कॉम्बॅट व्हॅन” वरील AK -47 काढुन घेतल्या आहेत. मग जमेल तेव्हा शस्त्रे खरेदि केल्यावर ह्या रायफल्स परत केल्या जातील. सगळा आनंदि आनंद आहे. म्हणजे न होवो पण उद्या परत असा हल्ला झालाच तर NSG टिम येईतो कॉम्बॅट टिम काय गाडि साईडला लावुन भजन करणार??? आणि कसली क्विक रीस्पॉन्स टिम?? करकरेंनी मदत मागितल्यावर क्विक रीस्पॉन्स मिळालाच नाहि. हि टिम भलत्याच बिल्डिंगच्या छतावर मुक्काम ठोकुन होती कारण त्यांना वरिष्ठांकडुन आदेश मिळाले नव्हते. उद्या फोर्स वनचा असा बोर्या न वाजला म्हणजे मिळवलं.
याखेरीज साध्या साध्या बाबतीत जागरुकता येणे गरजेचे आहे. ट्रेन मध्ये ८ – १० स्टेशन नंतर एखादि बॅग हलली नसेल, व ठेवणारी व्यक्ती कोण हे समजत नसेल तर ती कोणाची आहे हा एक प्रश्न विचारायचा त्रास आपण घ्यायला हवा. पर्यटनाच्या नावाखाली अनेक महत्वाच्या वास्तुंचे फोटो कोणीहि काढतो. महत्वाच्या ठिकाणी फोटो काढण्यास सरकारने बंदि करावी. सरकारी कार्यालयांचे फोटो कोणी घेत असेल अथवा महत्वाच्या वास्तुंच्या पार्श्वभूमीवर कोणी स्वत:चे फोटो काढुन घेत असेल तर पोलिस व सामान्य जनता यांनी त्यांना हटकायला हवे. गुगल मॅप कितीहि प्रगत झाले तरी प्रत्यक्ष इमारतींचे फोटो काढल्या शिवाय अतिरेकि कुठलिहि योजना बनवत नाहित. म्हणून शक्य तिथे या गोष्टि राबवल्या पाहिजेत. डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजे आपत्कालि व्यवस्थापनांचे गट मुंबई अथवा महत्वाच्या शहरांतील प्रत्येक उपनगरांत तयार करवेत. त्यांचा पहिला संपर्क स्थानिक पोलिस ठाण्यांशी होईल अशी व्यवस्था करावी. याने दहशतवादि हल्ला असो वा पाऊस-भूकंप यांसारखे नैसर्गिक संकट याचा फायदा होईलच.
२६/११ जी जखम खूप खोल आहे, नाहि भरणार इतक्यात. भरुहि देऊ नका! असे अपमान धगधगत ठेवायचे असतात. विज्ञान, अध्यात्म, तत्वज्ञान आणि इतिहास हे सगळे एका नियमा बाबत एकमत दर्शवतात – चक्र नेहमी पूर्ण फिरतं. कदाचित हे चक्राच अर्धच आवर्तन असेल, पण गेल्या वर्षभरात खुद्द पाकिस्तानात लाहोर, पेशावर, कराची, इस्लामाबाद इथे जे स्फोट होत आहेत त्यावरुन चक्र त्याचं आवर्तन पुर्ण करायच्या दिशेने जातय. उरल्या आवर्तनात अजुन काय समोर येणार ते नियतीलाच ठाऊक. पण अशी वर्षश्राध्द आणि तर्पण परत न करायला लागोत हिच इच्छा!
- सौरभ वैशंपायन.
13 comments:
खरच खुप सुन्दरपणे मांडली आहे व्यथा ....
धन्यवाद
lekh khup chhan,muddesud aani vicharpurvak lihila aahes.majboorika naam mumbai spirit he kharech aahe.manse potapanyasaathee kuthlyahi paristhitit baher padtat.defective jackets,junee nirupayogi shastre vaprun aaple police shurpane aalya prasangala samore gele. agnishaman dalabarobarach Ombale yaanee sudha kautukaspad kam kele aahe.aaplya deshat devavar havala thevun jagayche hech khare.
'सूर्यग्रहणाआधी जसे सूर्याला त्याचे वेध लागतात'
---
या विधानाला काही शास्त्राधार आहे का? आपल्या आणि पृथ्वीच्या मधे चंद्र येतो आहे याची सूर्याला खबरबातही नसेल. ग्रहणाचे वेध लागतात ते त्या ग्रहणाची आगाऊ माहिती असणार्या माणसाला. प्राण्यांनाही त्याची ज़ाणीव प्रकाश भलत्याच वेळी खूप मलूल झाला तरच होत असावी. भिंतींआड असलेल्या माणसांनाही ग्रहणाचा काही फरक पडत नाही.
करकरेंनी सारखी मदत मागुन देखिल कामा हॉस्पिटलकडे मदत का पाठवली नाहि?? कि पोलिस दलाचा शिरस्ता आहे कि सहकार्यांनी मदत मागितली तर शपथेवर ती मिळु द्यायची नाहि?? कामटेंना कामा हॉस्पिटलपाशी कोणी जायला सांगितले? आमचे तीन मोठ्या पदावरील अधिकारी एकाच गाडित का बसले? अलम दुनियेला आग लागली तरी प्रोटोकॉल मध्ये न बसणारी गोष्ट करायची नाहि असे स्पष्ट आदेश त्यांना ट्रेनिंगमध्ये असताना हि चूक त्यांच्याकडुन का घडली? ते जबर जखमी आहेत हे कळल्यावर सुध्दा अर्धातास त्यांच्याकडे कोणीच का फिरकले नाहि? कंट्रोलरुमला करकरेंनी किमान ६ - ७ संदेश पाठवुन देखिल “करकरे कुठे होते हे मला माहित नव्हते!” असे राकेश मारीया कसे म्हणू शकतात? करकरेंचं सो कॉल्ड बुलेटप्रुफजॅकेट कसं गायब झाल? उद्या परत असा हल्ला झालाच तर NSG टिम येईतो कॉम्बॅट टिम काय गाडि साईडला लावुन भजन करणार??? आणि कसली क्विक रीस्पॉन्स टिम??
प्रश्न विचारण फार सोपं असतं नाही का??? x-(
I didn't like this post! Our system is no-way efficient, in fact pathetically corrupted, with lots of loopholes, but such a distrust is way too much! Introspection is always for good, but suspicion against our own people agitated me the most, esp. the ppl who tried their best despite all the odds you've mentioned in your post! "पोलिस दलाचा शिरस्ता आहे कि सहकार्यांनी मदत मागितली तर शपथेवर ती मिळु द्यायची नाहि??" Is this the way we convey our gratitude they deserve?
prashna vicharne sope aste naahee ka?
hoy. nakkich. pan je prashna Saurabhne vicharle aahet te chukiche nakkich naaheet. hya goshtee ka hot naaheet he shodhun kadhne garjeche aahe. ashamule aapli mahatvachi manse aapan gamavto.
@ sahadev,
या प्रश्नांचे उत्तरे द्यायला सरकार बांधील आहे, प्रश्न विचारणं सोप्प असतं - बरोबर. पण विचारलेला एकहि प्रश्न चूक नाहिये ना?? या प्रश्नांची उत्तरे समोर यायलाच हवीत! व्यवस्थेतील भगदाडे बुझणार कशी? आनी गडचिरोलीचे उदाहरण १०१% बरोबर आहे. ४ तास तुम्हांला मदत पाठवता येत नाहि?? बरं नाहि आली तर मग का याची उत्तरे तर द्याल कि नाहि. क्विक रीस्पॉन्स टिम का बनवली? फालतु बंधनात न अडकता लगोलग कारवाई करायला ना? मग झाली का नाहि?
"Introspection is always for good, but suspicion against our own people agitated me the most, esp. the ppl who tried their best despite all the odds you've mentioned in your post!"
आर्मीवाल्यांकडुन नाहि होत अश्या चुका त्या??? त्यांनी स्वत:चे प्राण देऊन मुंबई वाचवली ह्यात शंका नहि त्यांच्या हौतात्म्याला मी तसूभरहि धक्का लावत नाहि - लावुहि शकत नाहि! पण हा प्रोटोकॉल आहे ना? कि जबाबदारीच्या पदावरील व्यक्तींनी आणिबाणीच्या काळात एकाच ठिकाणी राहु नये, अथवा एकत्र प्रवास करु नये??? प्रोटोकॉल मोडला काय झालं? ३ उमदे पोलिस ऑफिसर हकनाक गेले? बरं झाला त्यांच्यावर हल्ला मदत का नाहि मिळाली अर्धातास?
Hey saurabh, should i say nice post? well do not want to say that but u have done a good job. i do not know whether you have gone thru the book of Atul Kulkarni Mumbai attack 26/11 if not go thru it!
Now the ? remains who was responsible for it? we all are yes we all! coz govt. will act upon the pressure of aam janta. see here one point is very imp these attacks were on taj!! & that's the reason all the industry is talking about it! well if govt can't do it's job then it's our responsibility to do the job!
MEDIA is the main culprit along with the ppl who always had TRPs in their mind! :( its sad but our media ppl have to go to school once again to learn what to say/show & what not to!!
some one said it is india's 9/11 i strongly differ on this just coz we all knew what is terrorissssssm is since 19993!
After this attack there were almost 6/7 attacks on Indian soil by different agencies. Now who is responsible for all this?? the blame game will be continued.. If 'we all' can do something then it is the time to do it!
चक्र नेहमी पूर्ण फिरतं. कदाचित हे चक्राच अर्धच आवर्तन असेल, पण गेल्या वर्षभरात खुद्द पाकिस्तानात लाहोर, पेशावर, कराची, इस्लामाबाद इथे जे स्फोट होत आहेत त्यावरुन चक्र त्याचं आवर्तन पुर्ण करायच्या दिशेने जातय.>>>
Sorry Saurabh!! u wanna say that it is pakistan who is responsible for all this & we should payback???
"u wanna say that it is pakistan who is responsible for all this & we should payback???"
nop, i mean to say that terrorism will make life worst than hell for pak. we don't need to do any "payback" activity. पण भारताला त्याचा त्रास होणार. पाक आपल्या कर्माने उध्वस्ततेच्या गर्केत जाईल पण शेजारी म्हणून आपल्याला त्यांच्या जळत्या घराची धग लागणारच. पण तशीहि ती लागतेच आहे. आपण पाक मधल्या फुटिर गटांना अजुन चुचकारले पाहिजे! शक्य झाले तर तर त्यांना हाताशी धरुन पाक उभा - आडवा फोडायची कारस्थाने करायला प्रत्यावात नाहि. माझे म्हणणे इतकेच आहे कि भारताने काहिहि केले नाहि तरी पुढील ३-४ दशकात पाक दहशतवादाच्या ओझ्याखाली खंगुन - गुदमरुन मरेल.
terrorism will make life worst than hell for pak.>> Hmm same will be for india right??
आपण पाक मधल्या फुटिर गटांना अजुन चुचकारले पाहिजे! शक्य झाले तर तर त्यांना हाताशी धरुन पाक उभा - आडवा फोडायची कारस्थाने करायला प्रत्यावात नाहि>>> it's sad then saurabh! coz they want 'this' to happen then history will be repeated! well we all have to understand first why this bloody terrorism takes place? There must be a reason for all this happening.
[Jar tu as bolla astaas ki Akhand bhaart karawa tar gosht veglee hote mitra what u r sayin is different..]
If you goooogle it U will find the "reasons" by Osama & his buddies on their mission.
Well we can discuss all this not on blog though.
BTW apsra aali cha video aahe mazyakade :D :D youtube varun Download karun ghetlaay tula havaay ka? Sonali jyana aawdt nahi tynaanee gane aikaav as mhnto mi ;)
दिप अखंड भारत खरतर निदान पुढील १०० - २०० वर्ष तरी शक्य नाहिये हे सत्य आपण पचवलं पाहिजे. प पाकिस्तान अखंड राहता कामा नये यासाठी प्रयत्न करायला हवेत. हि राजनीती आहे. आपण जसा बांगलादेश फोडला तसे पक मधले असंतुष्ट प्रदेश फोडायचे. शत्रुला जर्जर करायचे. कुटिल डावांना महाकुटिल आणि टोकाचे पाताळयंत्री डाव मांडायचे. ओसामाचे मिशन एकाच कारणानीच आहे - अमेरिका अरब अथवा मुस्लिम राष्ट्रातुन जे तेल पित आहे ते ओसामाला मान्य नाहि. सगळे युध्द हे मुख्यता तेल य एकाच गोष्टिसाठी चालले आहे. धर्माचा वापर करुन ओसामा - अयातुल्ला फक्त आपले बंदे उभे करत आहेत. जिहाद विरुध्द क्रुसेड हा बनाव आहे. मुळ कारण एकच तेलावर कुणाचा हक्क. ९/११ झाले त्यात एक तरी आरोपि इराकि किंवा अफगाणी आहे का?? नाहि! सगळे सौदि किंवा इराणी आहेत पण आज अमेरीका कोणावर बॉम्ब टाकत आहे? इराक - अफगाणिस्थान वरच ना? सौदि किंवा इतर अरब राष्ट्रांना का हात लावत नाहियेत? इराण इतका अरेरावी करतोय अमेरिका गप्प का? अरे जॉर्ज बुश पिता पुत्र, कोंडेलिसा राईस हे तेल व्यापारात किती गुंतले आहे हे ओपन सिक्रेट आहे. एकाच कुठल्याश्या तेल कंपनित बुश आणि ओसामा दोघांचेहि शेयर्स आहेत असे "९/११ फॅरेनहिट" हि फिल्म सांगते.
भारत इराण यांच्यातील तेलाची पाईपलाईन टाकणारा प्रकल्प का रखडला? आणि भारताशी अमेरीकेने अणूकरार इतक्या सहज का केला? कारण भारताने जास्त तेल वापरु नये.
मित्रा हा दहशतवाद एकाच खांबावर उभा आहे - तेल. आपण फक्त प्यादि आहोत. खरे चालवणारे दुसरेच आहेत.
Post a Comment