क्रिकेट हा सभ्य लोकांचा खेळ आहे म्हणे!
"म्हणे" हा शब्द यासाठी कि "स्लेजिंग" या प्रकाराने क्रिकेट वरचेवर डागाळत असते. समोरच्या संघामधल्याला खेळाडुला अपशब्द ऐकवुन त्याचे लक्ष विचलित करणे, त्याचा खेळातला जम - त्याची लय बिघडवणे म्हणजे स्लेजिंग. स्लेजिंगचा वापर सर्रास एक अस्त्र म्हणून केला जातो. एक क्रिकेटप्रेमी म्हणून स्लेजिंगचा तोटा मान्य असला, तरी मानवी वृत्ती व स्वभाव यांवर औषध नसते हे देखिल जाणतो. आणि अगदिच स्लेजिंग नाही पण बॅट्समनचे लक्ष विचलित होईल इतपत बडबड करणे, फलंदाजाला "कथ्थक" करायला लावणारे १-२ चांगले बॉल टाकले कि त्यामागोमाग फलंदाजाला "खुन्नस" द्यायचे प्रकार आपण वरचेवर बघतो. किंवा बॉलरला सलग २-३ वेळा सीमापार पाठवल्यावर गोलंदाजाला "चड्डित रहा बेऽ" ह्या नजरेने बघणे देखिल नॉर्मल आहे. हे सांगताना १९९६ च्या वर्ल्डकप मधील बंगरुळु येथिल भारत - पाक सामन्याची आठवण आली. आमीर सोहेल विरुध्द व्यंकटेश प्रसाद हि माझ्या वयाच्या तरुणांसाठी पहिली ठळक आठवण असू शकते. प्रसादला लागोपाठ दोनवेळा फोर मारल्यावर आमीर सोहेलला चेव चढला. तसेही ४५ बॉल मध्ये त्याने ५५ रन्स केले होते. क्रिजमधुन दोन हात पुढे येऊन डिप कव्हर मध्ये जिथे चौकार मारला होता तिथे बॅटने व हाताने सोहेलने २-३ वेळा खुणावुन प्रसादला डिवचले, पण प्रसादचे लक्ष विचलीत होण्याऐवजी त्या उन्मादात आमीर आपले लक्ष्य गमावुन बसला, पुढच्याच चेंडुवरती त्याने प्रसाद समोर नांगी टाकली. आत घुसणार्या बॉलवरती ऑफ स्टंप भेलकांडुन सोहेलचा बाजार उठल्यावर स्टेडियममध्ये आणि आजूबाजूला झालेला जल्लोष मला स्पष्ट आठवतोय. तो क्षण माझ्या डोक्यात अज्जून तसाच "फ्रिझ" होऊन राहिला आहे. उपांत्यपूर्व सामना असून मॅच पाकिस्तान विरुध्द असल्याने भारतीयांसाठी ती जवळपास फायनल होती. अर्थात मॅच भारत जिंकला. पण चेरी ऑन टॉप मात्र "सोहेल x प्रसादाच" किस्सा राहिला.
त्याआधी व नंतरचे अनेक किस्से सांगता येतील असेच काही ऐकिव पण खरे किस्से -
अॅशेस सीरीज म्हणजे ऑस्ट्रेलिया व इंग्लंड मधलं युध्द असतं, अगदि भारत - पाक सारखं. अश्याच एका अॅशेस सामन्यात इयान बोथम फलंदाजीला आला ऑस्ट्रेलियाच्या रॉडनी मार्शने त्याला विचारले - "तुझी बायको आणि माझी मुले कशी आहेत??" वास्तविक हा थेट बोथमच्या पत्नीच्या चारीत्र्यावर विनाकारण चढवलेला हल्ला होता. कोणाही सद्गृहस्थाचे पित्त सहाजिक खवळले असते. मात्र मार्शच्या आचरट स्वभावाला जाणणार्या बोथमने शांतपणे उत्तर दिले "बायको ठिक आहे, मुले "मतीमंद" आहेत!"
पाकिस्तान - ऑस्ट्रेलिया सामना चालू होता. खेळा दरम्यान बोलाचाली झाली व गरम डोक्याच्या जावेद मियॉंदाद ने ह्युजेसला बस कंडक्टर म्हणून हाक मारली. काही ओव्हरनंतर ह्युजेसच्याच बॉलिंगवरती मियॉंदाद आउट झाला. तो पॅव्हेलियन मध्ये परतताना मागुन ह्युजेसने आवाज दिला - "एस्क्युजमीऽ तिकिट प्लीज!" मियॉंदाद किती उखडला असेल याची कल्पनाच केलेली बरी.
एका मॅच दरम्यान इंग्लंडचा खेळाडू जार्डिन याने तक्रार केली कि ऑस्ट्रेलियन प्लेअर्सनी त्याला "बास्टर्ड" असे अत्यंत शेलके संबोधन वापरले. तसे ऑस्ट्रेलियन कॅप्टन बिल वुडफुल चटकन पुढे झाला आणि आपल्या साथीदारांना दरडावण्याचे नाटक करत त्याने विचारले - "Which one of you bastards called this bastard a bastard?” हे ऐकुन जार्डिनला झक मारुन तक्रार केली असं झालं असेल.
भारताचा सामना ऑस्ट्रेलिया विरुध्द होता, रवी शास्त्रीने राखिव खेळाडु म्हणून मैदानात उतरलेल्या माईक व्हाइटनीकडे चेंडु टोलावला, व एक धाव घ्यायचा प्रयत्न केला. तसा माईक व्हाइटनी ओरडला - तु जर धावलास तर मी (बॉलने) तुझे डोके फोडिन!" रवी शास्त्रीने त्याच्याकडे न बघताच त्याला चपराक दिली - "जितका बोलतोस तितकि बॅटिंग चांगली केली असतीस तर आज राखिव खेळाडू नसतास!"
वेस्ट इंडिज विरुध्दच्या मॅच मध्ये खेळाची सुरुवात करण्याचा दबाव येऊ नये म्हणून सुनिल गावस्करांनी त्या दिवशी तिसर्या क्रमांकावर फलंदाजीसाठी यायचे ठरवले. पण माल्कम मार्शलच्या तोफखान्यासमोर अंशुमन गायकवाड व वेंगसरकर लागोपाठ धारातिर्थी पडले. भारताची अवस्था ०/२ अशी केविलवाणी झाली. मग मैदानात उतरलेल्या गावस्करांना विवियन रिचर्डसनने ऐकवले - "तू कधी फलंदाजीला उतरतोस त्याने फरक पडत नाही, रन्स अजूनही शून्यच आहेत!"
असे अनेक किस्से सांगता येतील. हल्लीचे म्हणाल तर मायकल क्लार्क विरुध्द फ्लिंन्टॉफ, अॅलन डोनाल्ड आणि मायकल आर्थटन, झहिरखान विरुध रीकि पॉन्टिंग, गंभीर विरुध्द आफ्रिदि, गंभीर विरुध्द कामरान अकमल, किंवा शोइब विरुध्द हरभजनसिंग, आपल्या श्रीसंथचा पीचवरचा "नाच" कोण विसरु शकेल? हे न संपणारं आहे. सगळि गोष्ट बघता एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते कि स्लेजिंग प्रत्येक देशाकडून होतं, झालय पण ऑस्ट्रेलियन्स बहुतेकवेळा आघाडिवर असतात. २ वर्षांमागे हरभजनसिंग विरुध्द हेडनचा झालेल्या वादावर प्रचंड वादळ उठलं प्रकरण फारच ताणलं गेलं. मात्र त्यावर प्रतिक्रिया देताना अॅलन लॅम्ब या इंग्लंडच्या माजी खेळाडुने ऑस्ट्रेलियन खेळाडुंच्या मानसिकतेवर नेमके बोट ठेवले - "ऑस्ट्रेलियन खेळाडुंनी हरभजनसिंग बद्दल तक्रार करणे हास्यास्पद आहे, कम-ऑऽऽन, ऑस्ट्रेलियन टिम इतके स्लेजिंग कोणीच करत नाहि, अश्या लोकांनी हरभजनसिंग विरुध्द बोलणे शोभत नाही!". पण हे बर्याच अंशी खरे आहे. ऑस्ट्रेलियन खेळाडुंचा माजोरडेपणा काही केल्या जात नाहि मग ते जिंकत असो व हरत असोत. समोरच्याला टोमणे मारल्याशिवाय त्यांना बहुदा जेवण पचत नसावे. एका सामन्यात स्टीव वॉ वरती अॅम्ब्रोज धावुन गेला होता, कॅप्टन रीचर्डसनने त्याला रोखुन धरले अन्यथा ताडमाड अॅम्ब्रोजने स्टीव वॉची हाडे सहज खिळखिळी केली असती. त्यावेळि काय बोलाचाली झाली होती ते वॉ ने आपल्या आत्मवृत्तात दिले आहे. वॉ ने वापरलेले शब्द खरोखर अत्यंत खालच्या दर्जाचे होते.
आणि मैदानावरचे फक्त खेळाडु स्लेजिंग करतात असे नाही त्या हुल्लडबाजीत प्रेक्षकही असतात. इंझमामला "बटाट्या" म्हणून हिणवणार्याची इंझमामने बॅटने केलेली धुलाई लोकांच्या लक्षात असेल. किंवा हरभजन - हेडन वादानंतर ऑस्ट्रेलियन प्रेक्षकांनी राग व्यक्त करायला चक्क गांधीजींना विनाकारण मध्ये आणून त्यांना अर्धनग्न माणूस वगैरे बोल लावले होते. हे एकुणच सगळं क्लेषदायक आहे. ICC ने आता स्लेजिंगबाबत काही धोरणे काहि शिक्षा जाहीर केल्या आहेत पण शिक्षेच्या भीतीपेक्षा एकमेकांबद्दलचा आदर राखुन खिलाडु वृत्तीने एकमेकांना सामोरे गेल्यास जास्त उत्तम. आता वर्ल्डकपसाठी प्रत्येकजण जीवापाड झुंझेल. आनंद, दु:ख, जिद्द, निराशा, चिकाटि, ढेपाळलेपण, हतबलता, मुजोरपणा, दादागिरी, त्वेष, जल्लोष अश्या विवीध भावना खेळाडू व समर्थक यांच्याकडुन दर्शवल्या जातील. काहि अंशी त्या क्रिया - प्रतिक्रिया सहज म्हणून अलेल्या असतील तरी स्लेजिंगचा वारा न लागो राजसा हिच इच्छा. शेवटी "स्पिरीट ऑफ द गेम!" टिकणे गरजेचे.
- सौरभ वैशंपायन.
4 comments:
वा छान,
"ऑस्ट्रेलियन कॅप्टन बिल वुडफुल चटकन पुढे झाला आणि आपल्या साथीदारांना दरडावण्याचे नाटक करत त्याने विचारले - "Which one of you bastards called this bastard a bastard?” हे ऐकुन जार्डिनला झक मारुन तक्रार केली असं झालं असेल."
हे भारीच होते.:D
माझ्या ब्लॉगचा पत्ता:http://prashantredkarsobat.blogspot.com/
युवराज चे फ़्लिंटोफ़ वर भडकुन हाणलेले अमर सहा षट्कार विसरलात बहुतेक राजे
^^^^
Lihava titaka kami ahe, tase tar bharapur lihita yetil.
patakan athavale kinva vachalele kisse takale.
मॅकग्रा रामनरेश सरवानच्या अंगावर धावून गेला होता ती ड्युएल बेस्ट आहे.
Post a Comment