Tuesday, April 12, 2011

चैत्रातला पाऊस

परवा संध्याकाळपासून जवळपास रोज पावसात भिजणे सुरु आहे. कितीही भिजलं तरी मन भरत नाहीये. पावसाची पहीली सर अस्ताव्यस्त येऊन गेली, घाई घाईने अंगावर झेलावी लागली. मग मात्र एक एक सर सावकाश, गार गार, पण तरी आत कुठेतरी बोचणी लावणारी. मग झर्‍यांतून - नद्यात - समुद्रात जाऊन परत बाप्ष व्हावं आणि परत त्याचा पाऊस होऊन तीच आधीची सर पुन: नव्याने अंगावर घेण्यातली मजा गेले ३ दिवस घेतोय .... नाही डोक्यावर पडलो नाहीये ..... शान्ता शेळकेंनी केलेला "मेघदूताचा" अनुवाद वाचतोय.

"मन्दाक्रांता" वृत्तातला मेघदूत मागे कधीतरी वाचलाही होता. पण १२ - १५ श्लोक वाचून झाल्यावर चाल कितीही छान वाटत असली तरी फारसं न कळणं या कारणाने पुस्तक बाजूला झालं. दर आषाढाच्या सुरुवातीला पेपरमध्ये "आषाढस्य प्रथमदिवसे" हे वाचलं कि त्या मेघदूताविषयी, त्याला दूत बनवू इच्छिणार्‍या त्या मिलनोत्सुक शापित यक्षाविषयी आणि यक्षाच्या तोंडुन कदाचित आपल्या पूर्वायुष्यातल्या विरह झालेल्या सखीलाच तो निरोप पोहचवू इच्छिणार्‍या कवीश्रेष्ठ कालिदासाबद्दल उगीच हुरहुर लागुन रहायची. पण म्हणून कधी घेतलय मेघदूत आणि बसलोय वाचायला असं कधी झालं नव्हतं.

परवा मॅजेस्टिक मध्ये गेलो होतो, तासभर तिथल्या पुस्तकांमध्ये घुटमळत होतो. अनेक विषयांवरची अनेक पुस्तके डोळ्याखालुन घातली. आणि नकळत काव्य विभागाकडे वळलो. पहिल्याच नजरेत "मेघदूत" नजरेत आलं. एक क्षण माधव ज्युलियन यांच असावं असं वाटलं पण खाली "अनुवाद : शान्ता शेळके" हे वाचलं आणि अधाश्यागत ते उचललं. किती वेळ तिथे उभा होतो माहित नाही पण २० - २२ श्लोक तर तिथेच वाचले. पाने उलटत होतो .... काय अफाट लिहायची बाई .... "तोच चंद्रमा नभात" उगीच नाही हो सुचलं एका श्लोकावरुन.

"तस्मिन्नद्रौ कतिचिदबलाविप्रयुक्तः स कामी  
नीत्वा मासान् कनकवलयभ्रंशरिक्तप्रकोष्ठः ।
आषाढस्य प्रथमदिवसे मेघमाश्लिष्टसानुं 
वप्रक्रीडापरिणतगजप्रेक्षणीयं ददर्श ॥२॥"

 - >
"गिरीवरी त्या महीने कांही कंठित राही तो विरही जन
सखिविरहे कृश असा जाहला गळे करांतुनि सुवर्णकंकण
आषाढाच्या पहिला दिवशीं बघ तो शिखरी मेघ वांकला
टक्कर देण्या तटभिंतीवर क्रिडातुर गज जणूं ठाकला!"

हा विरह दाखवणारा श्लोक असो किंवा मेघाला रस्ता सांगताना अगदि ठळक खाणाखुणा सांगणारा -

"गच्छन्तीनां रमणवसतिं योषितां तत्र नक्तं  
रुद्धालोके नरपतिपथे सूचिभेद्यैस्तमोभिः ।
सौदामिन्या कनकनिकषस्निग्धया दर्शयोर्वीं 
तोयोत्सर्गस्तनितमुखरो मा स्म भूर्विक्लवास्ताः ॥४१"
- >

"प्रिय भेटीस्तव अभिसारोत्सुक रमणी जेव्हा निघतेल रात्री
राजपथावर अडेल पाऊल निबिड तिमिर तो भरतां नेत्री
उजळ तयांची वाट विजेने कांचनरेषा जशी निकषावर
वर्षुन गर्जुन भिववु नको पण विलासिनी त्या जात्या कातर"

यातला कौतुकमिश्रित हळवेपणा असेल, शान्ता बाईंची लेखणी अव्याहत ओघवती राहिली आहे. ३ दिवसात ५ वेळा पुस्तक वाचून झालय अजुन कितीवेळा वाचिन? माहीत नाही, पण दरवेळि नवं काहितरी मिळतय. अनेकदा तर समजतय पण चिमटीत नेमकं पकडता येत नाही असं काहीसं वाटायला लागतं. याआधी "मधुशाला"  वाचताना असं झालं होतं.

झपाटलेपण काय असतं ते अनुभवायचं असेल तर नक्की हे मेघदूत वाचा. या वर्षीच्या आषाढा आधी ह्यातले शक्य तितके अनुवादित श्लोक पाठ करिन म्हणतोय ... पण नाहिच झाले तरी बाहेर आषाढचा पाऊस कोसळत असताना मेघदूताची पारायणे करणार हे नक्कि. तोवर अचानक चैत्रातच बरसलेल्या या पावसात भिजत राहीन म्हणतोय.

 - सौरभ वैशंपायन.

4 comments:

Reshma Apte said...

bhar chaitraat paus?? shanta shelakyaancha anuvaad?????? sahich ,,, meghadut baddal aaikale khup prayatn pan kela vaachaayacha pan as u correctly describe zepalech nahai re :( :(
aata he vachun baghitalech pahije ,,, baaki 2ch shlok ithe deun dokyaat bhunga sodun dilaays :P :P

आश्लेषा said...

thanks a lot, hya pustakachee oLakh karun dilyabaddal. tu takalele he 2 shlok itake tempting ahet kee lagech order karun takalay mee te :-)

Dhananjay said...

मेघदूत सुंदर आहेच! आणि शांताबाईंचा अनुवादही. प्रत्येक वेळी वाचताना नवीन काही सापडतं हेही खरंच.

मेघदूताचा मीही एक चाहता!

विनायक पंडित said...

सौरभ! भन्नाट काहीतरी तुमच्या हातात सापडलंय! तुम्ही त्याची मजा घेताय आणि आम्हा वाचणार्‍यांनाही देताय असं तुमच्या या पोस्टवरून सहज जाणवतंय! खूप छान लिहिता तुम्ही! पोस्ट आवडली.शांता शेळके यांचा मीही एक चाहता आहे.आभार!