Friday, April 15, 2011

इस मिट्टि में दम है।



आकाशगंगेत म्हणे असं ठिकाण आहे जिथे नविन तारे जन्माला येतात. दादर, मुंबई २८ मध्ये सुध्दा असंच एक ठिकाण आहे "शिवाजी पार्क". इथेही तारे जन्माला येतात - क्रिकेटमधले. द्वारकानाथ संझगिरी म्हणतात ते अगदि  बरोबर आहे, शिवाजी पार्क जवळच्या घरांतील लहान बाळे उभी रहातात तीच बॅटच्या आधाराने. रोज अनेक जण इथल्या मातीत घाम - रक्त मिसळवून इथली माती नव्याने "तयार" करत असतात. कुस्तीच्या आखाड्यातली चिकण माती जशी  तेल, ताक मिसळवून संस्कारीत करतात व त्यातच बलाढ्य मल्ल तयार होतात तसंच काहीसं.

२२ वर्षांपूर्वी असाच एक तारा या मातीतून निपजला - सचिन. सचिन तेंडुलकर रोज रोज जन्माला येत नाहीत, अशी माणसं घडवणारे साचे देव सुध्दा लग्गेच मोडून टाकतो ,बनलेली मुर्ती पहीली आणि शेवटची. पण सचिनची मुर्ती घडवायला देवाने सुध्दा बहुदा शिवाजी पार्कची माती खणून नेली असावी.

माणूस त्याच्यातील गुणांनी देवपदाला पोहोचतो, सचिनही अनेकांसाठी देव आहे. एखाद्या अवताराचे बालपण जिथे जाते त्या स्थानाला महत्व प्राप्त होतं. मग लोकं ती जागा पूजतात. पण शिवाजी पार्कबाबत असं नाही होताना दिसत. म्हणजे श्रीकृष्णाच्या बाबलीला घडल्या तिथे मथुरेत - गोकुळात डोकं टेकायच, आणि आपला "वामन"  घडताना ज्या मैदानाने बघितला त्यावर कचरा टाकायचा???  निदान सचिनला देव मानणार्‍यांनी तरी नक्किच हे करु नका रे!

शिवाजीपार्कला खूप मोठा "इतिहास" आहे. त्यात राजकिय, सामाजिक, सांस्कृतिक आहेच पण त्याला मुख्यत: आहे तो खेळांचा इतिहास. या मैदानाने अनेक वेगवेगळ्या मैदानी आणि मर्दानी खेळातल्या हिर्‍यांना स्वत:च्या अंगावर खेळवले आहेत. आणि त्यातूनही क्रिकेटसाठी तर हे गुरुकुल आहे. ७-८ क्रिकेट क्लब्सचे पीच आहेत इथे. कधीतरी गावस्कर, वाडेकरांचेही पाय इथल्या पीचना लागले होते.

रोज शेकडो लहान मुले त्यांच्याही वजनाहून अधिक असलेली त्यांची किट सांभाळत येणारे त्यांचे पालक, डोळ्यात सचिन बनण्याची स्वप्ने घेऊन येतात. वर म्हणलो तसे "सचिन" तर सारखे सारखे  नाही बनत, पण रोज सकाळि अनेक मुलं घाम - रक्त त्या मातीत मिसळताना दिसतात, खेळात जीव ओततात, ते बघून जाणवतं कि अजून मातीवर "संस्कार" सुरु आहेत. कोण जाणे कधी तरी १-२ पिढ्यांनी माती संस्कारीत झाली कि एखाद्या रात्री देव परत गुपचूप खाली उतरेल आणि परत थोडिशी माती खणून नेईल ...... after all - इस मिट्टि में दम है!

 - सौरभ वैशंपायन.

1 comment:

सिद्धार्थ said...

इस मिट्टि में दम है! +1

सुरेख लेख.