Wednesday, October 22, 2008

पालपुराण!

ईऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽ असे ओरडुन तीने मला घट्ट मिठी मारली. मला नक्कि काय झाले ते समजले नाहि, पण लग्गेच फिल्म मध्ये दाखवतात तसे बासरीचे प्रसन्न background music कानात आपसुक वाजायला सुरुवात झाली. मुळात काय झाले हेच माहित नसल्याने तीने ती मिठी आनंदाने, दु:खाने कि घाबरुन मारली होती हे मला कळेनासं झाल. पण सुरुवातीला तिने जो ईकारान्त स्वर काढला होता त्यावरुन घाबरुन तिने मला मिठी मारली असावी असा अंदाज मी बांधला(कारण मुली ८०% वेळा हाच स्वर वापरतात आणि हा आनंदाचा देखिल असु शकतो you never know). तिच्या मिठीतुन सुटण्याचा अज्जिबात प्रयत्न न करता मी शांतपणे विचारले “काय झाल?”, “ भिंतीवर बघ” - ती, मी म्हणालो “घड्याळ आहे! मग काय झालं?” तशी माझावर डाफरली “इडियट, उजवीकडे बघ! २-२ पाली आहेऽऽऽऽत!” मग मी उजवीकडे बघितले दोन पाली एकमेकांकडे तोड करुन भिंतीवर चिकटल्या होत्या. मध्येच एक पाल चुकचुकली पण हे चुकचुकणे समोरच्या पालीसाठी होते कि हि सुंदर कन्यका माझ्या मिठीत आल्याबद्दल होते ते मला समजले नाहि. मी तिला म्हणालो “अग घाबरतेस काय? पाल म्हणजे काय मगर आहे कि डायनॉसोरस?” तशी रडवेल्या स्वरात म्हणाली “ते बरे, त्यांची भिती तरी वाटते किळस नाहि!” तसा मी अजुनहि शांत होतो. इथे कोणाला घाई होती मिठी सोडवण्याची? पण ती मध्येच माझ्यावर ओरडली “अरे बघतोस काय? हाकलव ना त्यांना!” आणि मग लहान मुले हॉरर फिल्म बघताना डोळ्यांच्या कडेतुन किंवा बोटांच्या फटितुन बघतात तशी एका डोळ्याने ती पालींकडे बघायला लागली.

नाईलाजाने मी पालींना “शुकऽऽ हुश्शऽऽहुर्रऽऽ“ असे त्यांना झेपतील असे आवाज काढुन हाकलवायचा प्रयत्न करु लागलो. हि एका डोळ्याने तो चित्तथरारक प्रसंग बघत होतीच. पण झाल उलटंच त्यातली शिशुपाल(लहान पाल) वर सरकण्याऐवजी चार बोटं खालीच सरकली तशी खसक्कन मान वळवुन “आंऽऽऽऽऽ“ असा अनुनासिक स्वर तिने काढला आणि माझ्या शर्टचा चोळामोळा करत तिने तिची पकड अजुन घट्ट केली. तिचे लक्ष नाहि असे बघुन मी हाताने पालीला “जा” ऐवजी “ये-ये” अशी खुण करु लागलो. परत मी “शुकऽऽ हुश्शऽऽहुर्रऽऽ“ असे आवाज काढुन बघितले, न जाणो हिच “पाली भाषा” असायची आणि त्या आवाजांपैकी एकाचा अर्थ “खाली ये” असा असेल तर? म्हणून मी नेटाने आवाज काढणे सुरु ठेवले होते. आता मात्र ती पाल वर-वर गेली, तशी दुसरी पाल परत चुकचुकली. प्रत्येक ५ सेकंदानी ’इकडुन’ प्रश्न येत होता “गेल्या का? – गेल्या का?” . मी उत्तर न देता फक्त “शुकऽऽ हुश्शऽऽहुर्रऽऽ“ असे आवाजच काढत होतो त्यावरुन त्या अजुन आहेत असे तिला आपोआप समजत होते व त्यामुळे ती जैसे थे स्थितीत उभी राहिली. व्वा! काय प्रसंग होता? पाली भिंतीला चिकटल्या होत्या आणि ती मला!

अखेर त्या दोन्हि पाली कुठल्याश्या कपाटामागे लुप्त झाल्या(बॅड लक). मी फारच जड अंत:करणाने तीला “हुं गेल्या गं!” असे सांगितले तशी मग ती दोन पावले मागे सरकली. परत-परत भिंतीच्या या टोका पासुन त्या टोकापर्यंत नजर भीरभीरवत ती बाजु झाली. मग जीवाचे असे हाल करुन वर लाडिक आवाजात “ओह सॉरीऽऽ“ असेहि म्हणाली. “मोस्ट वेलकम!” हे शब्द मी जीभेकडुन पडजीभेकडे ढकलले. “मला ना लहानपणा पासुन पालीची किळस वाटते! एकदा माझ्या अंगावर पडली होती, तेव्हापासुन पाल म्हंटलं कि ….यॅक !” असं म्हणुन तीने चेहरा शक्य तितका वाकडा केला. मी मनातल्या मनात त्या पालीची दृष्ट काढुन टाकली.

मग मला उगीच सुरसुरी आली –

मी: बर झालं ना मी बंगाली नाहिये ते?

ती: का?

मी: बंगाली असतो तर बहुदा माझे आडनाव “पाल” असते. (यावर ती खीखी करुन मनापासुन हसली.) पण मग मला सांग…

ती: काय?

मी: समजा माझे आडनाव “पाल” असते तर आत्ता तु मला मिठी मारली असती का? कि भिंतीवरची पाल आणि हा मनुष्य पाल यांच्यात गोंधळुन उभी राहिली असतीस?

ती: आता हा फालतु प्रश्न आहे, मुळात तुझे आडनाव पाल असते तर मी तुझ्याशी मैत्रीच केली नसती.(आईचा घो रेऽऽ! पोरगी स्मार्ट आहे यार, साला हा विचारच केला नव्हता!)

मी: “अगं घरात असावी एखदि पाल!”

ती: शीऽऽऽऽऽऽऽ ती कशाला?

मी: अगं म्हणजे झुरळं होत नाहित घरात (आता अजुन काय सांगणार? खर कारण म्हणजे मगाचा ऍक्शनरीप्ले होत रहावा हेच होतं)!

ती:यॅऽऽऽक, अशी पाल वगैरे असेल तर मी परत नाहि हं येणार तुझ्या घरी! त्या पालींना घराबाहेर काढ आधी.(आयला, आला का प्रॉब्लेम? समस्त पाल जमात माझ्यासाठी अडचण ठरत होती. उद्या केलं प्रपोज आणि फक्त घरात पाली आहेत म्हणुन ती नाहि म्हणाली तर?)

मी: बरं बाई! तु गेल्यावर हाकलवीन झालं समाधान?

ती गेल्यावर आधी त्या पालींना घरा बाहेर हुसकावलं(बिचार्‍यांनी माझ्या आयुष्यात काहि अतिसुंदर क्षण आणल्यावर असे करणे शुध्द कृतघ्नपणा होता हे मला समजत होतं, पण माझाहि नाईलाज होता. माझ्या लग्नानंतर नक्कि परत बोलविन या बोलीवर त्यांना बाहेर हुसकावले!) . आणि लगोलग काहि गोष्टिं ठरवुन टाकल्या – १)आम्रपाली हा चित्रपट बघायचा नाहि. २)अर्जुन रामपालचे चित्रपट बघायचे नाहित(तसहि कोण त्या ठोकळ्याला बघतोय?) ३)श्री नायपाल(कि नायपॉल? एकच ते) यांच्या पुस्तकाला कितीहि पुरस्कार मिळाले तरी ते वाचायचे नाहि ४)पाली गावात जायच नाहि, अष्टविनायकांपैकी सात जणांनाच भेट द्यायची. आणि ५)निदान “होकार” येईपर्यंत पाल अथवा पाली अश्या कुटल्याहि उच्चाराशी संबधित गोष्टिंची आपण संबध ठेवायचा नाहि.


तुर्तास इतकच!

------------------------------------------
डिस्क्लेमर: दुर्दैवाने हि घटना व यातली "ती" अजुन तरी पुर्णत: काल्पनिक आहे. हे ज्या दिवशी खरे होईल त्या दिवशी हा डिस्क्लेमर काढण्यात येईल याची आगाऊ नोंद घ्यावी.
------------------------------------------


- सौरभ वैशंपायन.

Monday, October 20, 2008

वेठबिगारी

सध्या घरात वेठबिगारीवर काम करतोय. म्हणजे दिवाळी आधीची आवराआवर!
दिवाळी टु दिवाळी काहि काम करायची असतात त्यापैकी एक म्हणजे माळा आवरणे, पलंग, मोठ्ठे लोखंडि कपाट, ह्या गोष्टि पोटात खड्डा पडेपर्यंत जोर लावुन (विनाकारण)जागेवरुन हलवायच्या असतात. चुकुन "अग जाऊदे ना! कोण कपाटं हवलुन त्याच्या मागे बघणार आहेत?" असा प्रश्न तोंडुन निघुन गेला कि "हे बघ हे मलाहि समजत तु अक्कल शिकवायची गरज नाहिये, सांगतेय ते नीमुटपणे कर, तुझ्यापेक्षा ३० पावसाळे जास्त बघितले आहेत मी, हां आता तु शिकव मला, मागच्या वर्षी देखिल हेच म्हणाला होतास, कपाटामागे किती जंजाळ आहे ते माहिती आहे का? दोन आठवड्यांपूर्वी रद्दी काढायला सांगितली होती ती तश्शीच, मित्र-मैत्रिणींच्या हमाल्या करायला सांगा एका पायावर तयार मी चुकुन काहि सांगितल तर तोंड वाकडे, आमची कींमतच नाहिये कोणाला!!!!" अशी सगळी हुकमी वाक्ये एका नजरेतुन टपाटप पडतात. म्हणुन मग काहिहि न बोलता हो हुक्म म्हणत झाडु, पोतेरी, पिशव्या, केरभरणी अशी अस्त्रे-शस्त्रे बळजबरी हाता कोंबली जातात. "अरे उंच आहेस ना? नुसता हात वर केलास तरी छतापर्यंत झाडु पोहचतो तुझा, मला मेलीला खुर्ची घ्यावी लागते!" अशी प्रस्तावना करत या गोष्टिंनी तुम्हांला एखाद्या बंदुकिप्रमाणे लोड केलं जातं.

कालहि आईने हसत-हसत चहाचा कप हातात दिला - "आज ओट्याखालची आवराआवर करायची आहे!" मी काहिहि उत्तर/रीऍक्शन/प्रतिक्रिया न देता पेपर मध्ये तोंड घातले.

आई: "अरे काय म्हणतेय मी?"

मी: "हं"

आई: "मग जरा थोबाड उघडुन करतो म्हण कि"

मी: "हं, करतो!"

आई:"हे बघ आधी पुढचे डबे काढुन इथे ठेव ओलं कापड देते डब्याची झाकणं पुसुन ठेवत जा दोन्हि कामं होतील!"

मी: "हे बघ मला ज्या गोष्टिंची अडगळ वाटेल ते मी फेकणार थांबवणार नसशील तरच ओटा डिपार्टमेंटला हात लावणार. एकतर ओटा हा फारच संवेदनशील भाग आहे घरातला. दिवसभरातुन किमान एक हजार एकशे एक वेळा पुसला जातो!"

आई: "...आणि म्हणुनच तो स्वच्छ राहतो. मेलं एक दिवस काय काम करायला सांगितलं तर अटि घालतात, आमची किंमतच कुठे आहे!"

मी: "ऑफर आपके सामने है! हां या ना?"

आई: "ठिक आहे पण मला दाखव आणि मगच टाक."

मी: "म्हणजे थोडक्यात जैसे थे?"

आई: "चहा पिऊन झाला कि लग्गेच कामाला लाग, मला नंतर तिथे स्वयंपाक करायचा आहे!" (माझ्या प्रश्नाला आईने मुरलेल्या राजकारण्या प्रमाणे "कट" मारला होता.)


भारतात बालमजुरांची वयोमर्यादा फक्त १४ असल्याचे दु:ख झालेल्या काहि क्षणांपैकी काहि क्षण गोंजारत मी कामाला सुरुवात केली. या "बायका" कॅटेगरीचं मला फाऽऽऽऽऽऽर कौतुक वाटतं. "लागेल कधीतरी" या घोषावर अनेक चित्रविचित्र किंवा त्याच त्याच गोष्टि जमा केल्या जातात. मी सामान काढलं तसं मागे उभं राहुन "हळु, तेल आहे!" किंवा "ग्लासचा बॉक्स सांभाळुन काढ. मागच्यावेळी बाबांनी त्यातला एक फोडुन झालाय ऑलरेडि!" अशी हतविर्य करणारी वाक्ये(हुकुम) "चॅलेंज" खेळल्या सारखी "मेरा एक और" करत टाकली जात होतीच.

डब्यांची पहिली रांग संपल्यावर मग अलीबाबाची खरी गुहा उघडली. रीकाम्या बरण्या, बरण्यांची झाकणे, टप्परवेअर(हा एक घाणेरडा प्रकार असतो, बायकांना जाऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽम कौतुक असतं या प्रकाराचं. इतका बेक्कार प्रकार मी अजुन पाहिला नाहिये.) दुधाचे २ कुकर, चकलीचे साधारण ५ सोर्‍ये( सोर्‍येच ना?) पिशवीत पिशवी पिशवीत पिशवी असे काहितरी काळॆ-मिठ किंवा तत्सम काहितरी हाताला लागत होते.

हे सगळं काढताना मी चेहर्‍यावर आयुष्यभराचे त्रासिक भाव आणुन "काय हे? बरण्या-बरण्या-बरण्या-बरण्या, सोर्‍ये-सोर्‍ये-सोर्‍ये-सोर्‍ये, झाकणं-झाकणं-झाकणं-झाकणं" अशी प्रत्येक गोष्टिची चारवेळा यादि करत होतो. मागुन आईने एकदा ऐकल, दोनदा ऐकलं मग आईने ऐकवलं - "बघु ना! तुझी बायको आली कि बघुच! तेव्हा तीने काहिहि केलं तरी चकार शब्द काढणार नाहिस. लिहुन ठेव!" मग मी "काहि म्हणालीस का?" असे भाव करुन परत ओट्याखाली डोकं घातलं. मग परत डोकं बाहेर काढुन आईला विचारलं - "आई!! आजीनी बाबांना असंच म्हंटल असेल का गं?" असा सरळ साधा प्रश्न केला. त्यावर आईनी "अनुल्लेखाने मारणे" हा उपाय वापरला. मला आजकाल आईची भीती वाटते काहिहि झालं तरी आई माझ्या होणार्‍या बायकोवर जाऊन पोहोचते. ती कोण आहे ते अजुन तरी मला माहित नाहि(म्हणजे तश्या मी बर्‍याच जणी आईला सुन म्हणुन ठरवुन ठेवल्या आहेत!) पण तिला जिथे असेल तिथे बर्‍याच उचक्या लागत असतील हे नक्कि!(त्यातल्या प्रत्येकिला विचारलं पाहिजे "काल तुला उचक्या लागल्या होत्या का?" म्हणजे पत्रिका वगैरे बघायला नको ना!)

असो, तर सध्या वेठबिगार म्हणुन काम करतोय, मोबदला म्हणुन दोन कप चहा, दोन वेळच जेवण आणि झोपायला थोडि जागा दिली जाते. विनोद सोडा पण आवरायला काढलेली जागा दुसर्‍या दिवशी बघुन "वा! बर झालं आवरलं. आता पुढच्या दिवाळीपर्यंत आराम!!" असा विचार येतो आणि सुटलो बाबा एकदाचा म्हणुन निश्वास टाकतो न टाकतो तोच "अरे पंखे पुसायचे आहेत आज!" असा आईचा खुऽऽऽऽऽप प्रेमळ आवाज येतो तिच्या हातात एक चहाचा वाफाळता कप असतो आणि चेहर्‍यावर "आज इतक तर कर उद्या काय करायच ते आज ठरवुन ठेवते!" अश्या आशयाचे स्मित असते. मग चहा संपवुन परत "बालमजुर" वेठबिगारीला जुंपला जातो!

- सौरभ वैशंपायन.

Friday, October 17, 2008

विक्रमादित्य



११,९५३ – ११,९५३, अरे नाहि नाहि शेअरमार्केट चा निर्देशांक नाहिये हा. सकाळी प्रत्येक क्रिकेट रसिक हि संख्या घोकतच उठला असेल. करोडो रुपयांचे कोलगेट स्माईल देणार्‍या, स्विपशॉट किंवा लॉंग ऑफ ला चेंडु तडकावणार्‍या सचिन तेंडुलकरच्या एखाद्या पोस्टरला त्यांनी मनोभावे नमस्कार केला असेल आणि “सच्चिन धाऽऽऽऽऽऽऽऽऽव रे! धाव!” अशी आर्त साद त्या क्रिकेटच्या देवाला घातली असेल. “सचिन तेंडुलकर लारापेक्षा फक्त १५ धावा मागे”, “सचिन विश्वविक्रमाच्या उंबरठ्यावर” अश्या मथळ्यांशिवाय “आज सचिन विश्वविक्रम घडविणार” या वाक्यासमोर “उद्गारचिन्हा” ऐवजी “प्रश्नचिन्ह” बघुन माझ्याप्रमाणेच अनेकांची “खचकली” असेल. “इडियट सालेऽऽ हा काय प्रश्न झाला का?? झक मारायला पत्रकार आणि क्रिडा समिक्षक झाले का?? तेंडल्या म्हणजे काय यांना म्युनसिपाल्टिचा बेजबाबदार अधिकारी वाटाला काय??” असे प्रश्न चेहर्‍यावर आपसुक आले असतील. तर काहि विघ्नसंतोषी समाजकंटक किंवा ऑस्ट्रेलियाचे कट्टर भारतीय समर्थक “सचिनने आज १३ धावा केल्या तरी बस झालं!” , “सचिन म्हातारा झालाय, सचिनला हाकला” असे म्हणत कडकडा बोटं मोडत बसले असतील.

पण “सचिन संपला” हि गोष्ट ०८-०८-२००८ किंवा ०९-०९-२००९ या दिवशी जगबुडि होणार इतकीच धादांत खोटि आहे. जेव्हा डॉन ब्रॅडमन म्हणाले “सचिन माझ्यासारखाच खेळतो!” तिथे अवघा संदेहो तुटला आहे. सचिन हा प्रत्यक्ष इश्वरी अवतार आहे या एकाच गोष्टिवर मी डोळॆ झाकुन विश्वास ठेवतो. ब्रायन लारा हा देखिल माझासाठी देव असला तरी तो गावकुसा बाहेरचा देव झाला. माझ्या देव्हार्‍यात सचिन-गावस्कर-कपिल-कुंबळे-गांगुली हे पंचायतन आहे. यातल्या शेवटच्या ३ नावांवर काहिजण हसतील देखिल पण हसोत बापडे, भारत जिंकावा म्हणुन मी व अनेकांनी केलेले अनेक नवस याच पंचायतनाने पूर्ण केले आहेत यात वाद नाहि. गावस्कर-कपिल यांना प्रत्यक्ष खेळताना पाहिल्याचं फारच अंधुक आठवतय. कपिलने विश्वचषक उचलला तेव्हा माझा जन्म देखिल झाला नव्हता. पण तरी त्यांचं देव्हार्‍यातील पारंपारीक स्थान मी हलवले नाहिये. पाकिस्तानच्या १० गड्यांना एकहाती तंबुत पाठविणार्‍या कुंबळेचा बॉल बर्‍याचदा सुतापेक्षाहि सरळ जातो हे माहित असुनहि मी त्यावर तुडुंब खुष आहे. त्याला कोणी कितिहि डिवचल तरी त्याला जे काहि सांगायच-करायचय ते तो मैदानात सिध्द करतो. सौरव गांगुलीबाबत म्हणाल तो उद्दाम आहे पण महाराजा उद्दाम वागणारच. साध्या सोज्वळ भारतीय संघाला त्यानेच “अरे” ला “का रे?” विचारायची हिंमत दिली हे कोणी नाकारु शकत नाहि. इंग्लंडला नॅटवेस्ट सीरीज जिंकल्यावर त्याने टि-शर्ट गरगरवुन फ्लिंटॉप आणि कंपनीला जी काहि म्हणुन खुन्नस दिली होती त्यासाठी मी त्याच्यावरुन १०० ग्रेग चॅपेल ओवाळुन टाकले आहेत. मध्ये त्याच्या माजोरडेपणामुळेच वर्षभर त्याला टिममधुन बाहेर ठेवलं होतं. पण पिंजर्‍यात गेला म्हणुन वाघ गवत खात नाहि हेच त्याने धडाकेबाज पुनरागमन करुन सिध्द केलं. सध्या महाराजाचं संस्थान खालसा होण्याच्या मार्गावर आहे पण तो महाराजा होता आहे आणि राहिल. तर सचिन – सौरव गांगुली किंवा कुंबळे यांना हातात कधी बॅट न पकडलेल्यांनी किंवा सोबर्सला आपणच बॅटिंग शिकवली होती अणि वॉर्नला आम्हिच चेंडु वळवायला शिकवल होतं अश्या तोर्‍यात टाकुन बोलणार्‍यांचा मला मनस्वी राग आहे. तसा तर सचिनला किंवा अनिल कुंबळेला नावे ठेवणारा प्रत्येक जण माझासाठी समाजकंटक असुन त्यांना किमान ५ वर्षे सक्त मजुरीची शिक्षा द्यावी अशी एक जनहित याचिका मी न्यायालयात दाखल करायच्या विचारात आहे.

असो, तर मुळ मुद्दा ११९५३ या संख्येचा आहे. सचिन रमेश तेंडुलकर हा (देव)माणुस ब्रायन लारा नामक व्यक्ती पेक्षा फक्त १५ धावांनी मागे होता. बंगरुळ कसोटितच हा विक्रम तो मोडणार असे वाटत असताना हाय रे दैवा घात ची झाला. वैयक्तीक १३ धावांवर असताना तो बाद झाला होता. मात्र आज(१७-१०-०८) त्याने ८८ धावा ठोकत आपल्या अर्धशतकांचेहि अर्धशतक साजरे केलेच पण त्याने लाराचा ११,९५३ धावांचा विक्रम मोडला आता १२,०२७ धावांसहित तेंडुलकर सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे. तसे बघता सचिन विक्रम करण्यासाठी कधीच मैदानात उतरत नाहि पण तो मैदानात उतरला कि किमान ५ सामन्यांमागे एखादा विक्रम त्याच्या नावावर आपोआप घडत जातो. आज फलंदाजी मधले कुठले असे विश्वविक्रम सचिनच्या नावावर उरले आहेत हा पीएच डि करण्यासारखा विषय आहे. आता त्याच्या पाठी लारा ११,९५३, ऍलन बॉर्डर ११,१७४, स्टीव वॉ १०,९२७, राहुल द्रविड १०,३४१ आणि रीकी पॉंन्टिंग १०,२३९ असे पाच जण त्यातल्या त्यात ’जवळ’ आहेत त्यापैकी लारा, बॉर्डर आणि स्टिव वॉ हे तर क्रिकेट मधुन निवृत्त झाले आहेत. आणि द्रविड-पॉन्टिंग त्यापेक्षा किमान १६०० धावांनी मागे आहेत.

१५ नोव्हेंबर १९८९ या दिवशी त्याने वयाच्या १६व्या वर्षी कराचीत पाकिस्तान विरुध्द आपल्या कारकिर्दिची सुरुवात केली. आणि ३५ वर्षांचा सचिन आजहि भल्या-भल्यांच्या तोंडचे पाणी पळवत धावतोच आहे. आजवर त्याने ४१७ एकदिवसीय सामन्यांत एकुण ४२ शतके व ८९ अर्धशतकांसहित, ४४.३३ च्या सरसरीने १६,३६१ धावा कुटल्या आहेत. यात सर्वोच्च धावसंख्या आहे १८६* आहे. गोलंदाजीत ४४.१२ च्या सरासरीने १५७ विकेट्स मिळवल्या आहेत. १५२ कसोटी सामन्यांत एकुण ३९ शतके व ५० अर्धशतकांसहित ५४.०२ च्या सरासरीने १२,०२७ धावा काढल्या आहेत. २४८* या कसोटितील सर्वोच्च धावा आहेत.

सचिनला कॅप्टनशीप फारशी मानवली नाहि. नाहि म्हणायला टायटन कप जिंकला वानखेडेवर, पण तो अपवाद ठरला. त्याकडुन कर्णधारपद काढुन घेतले आणि परत त्याची फलंदाजी बहरली. तो नंतर गांगुली, द्रविड, सेहवाग, कुंबळे, धोनी यांच्या सोबत खेळाला पण त्याने कुठेहि आपण फार कोणी मोठे असल्याचे दाखवले नाहि. कर्णधार-प्रशिक्षक-निवड समिती यांच्या बरोबर त्याचे कधी वाद झाले नाहित. त्यांनी ठरवल त्या क्रमांकावर तो फलंदाजीला उतरला. सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारा सचिन म्हणुनच सर्वांचा आदर्श ठरला. हरभजन-सायमंड वादात तोच सर्वप्रथम हरभजनच्या मागे खंबीरपणे उभा राहिला. वैयक्तीक आयुष्यात देखिल त्याने कधीहि वाद-विवादांना उपजु दिले नाहि. तो मध्ये सलग ३-४ सामन्यांत एकेरी धावसंख्येवर बाद झाला तेव्हा प्रेक्षकांनी त्याचे हुर्यो उडवली होती. पण सचिन खचला नाहि. खुद्द लतादिदि त्याच्यामागे उभ्या राहिल्या व त्यांनी विनंती केली "सचिनवर प्रेम करा, त्याची हुर्यो उडवु नका!" आणि सचिन "परत" आला.

सचिन तेंडुलकर एक गारुड आहे. सगळ्यांना लहानपणी तेंडुलकर व्हायची स्वप्ने पडतात. सगळ्यांना सचिनची प्रसिध्दी दिसते, त्याचे मान-मरातब दिसतात, त्याची पारीतोषके, दिसतात, त्याच्या जाहिराती आणि त्याची फेरारी दिसते पण सचिनची मेहनत किती जणांना दिसते? सचिनला एका मुलाखतीत विचारले तुझ्या यशाचे रहस्य काय? त्यावर सचिन उत्तरला: “there in no shortcut to success! Hardwork is the only way!” मेहनत-मेहनत-मेहनत हिच सचिनची त्रिसुत्री आहे. विनोद कांबळीची एक आठवण इथे सांगण्यासारखी आहे – "मागे एकदा इंग्लंड दौर्‍यावर गेले असताना सकाळी ६ वाजता भिंतीवर पलीकडुन काहितरी सतत धपऽधप असं आपटत होत, मी बघितले तर शेजारच्या खोलीत सचिन रबरी चेंडु घेऊन मॅचची तयारी करत होता!!" कदाचित बाकिचे खेळाडु व सचिन यांच्यात हा फरक आहे आणि म्हणुनच सचिन ग्रेट आहे.

सचिनने निवृत्त व्हावे असे म्हणणारे आता किमान पुढील २ सीरीजपर्यंत गप्प बसतील. तरी सचिन २०११ चा वर्ल्डकप खेळेल याबद्दल मला खात्री आहे. किंवा किमान त्याने एकदिवसीय सामन्यात ५० शतके व १०० अर्धशतके करावीत तर कसोटीत देखिल ५० शतके व ७५ अर्धशतके करावीत आणि मग वटल्यास निवृत्त व्हावे अशी "रास्त" अपेक्षा आहे. इथे त्यावर अपेक्षा लादल्या जात आहेत असे वाटेलहि पण सचिनला पुढील ३ वर्षात एकुण १९ शतके अज्जिबात कठीण नाहियेत.

आज सचिन सर्वोच्च धावा काढणारा फलंदाज झाला आहे. एक भारतीय आणि त्यातुन मराठी माणुस असे झेंडे उभारत चालल्याचा सार्थ अभिमान आहे. त्याचे नाव आता विक्रमादित्यच ठेवायला हवे. समर्थ रामदास स्वामी आणि छत्रपती शिवराय या दोन मराठी दैवतांची माफी मागुन या तिसर्या दैवतासाठी मी म्हणेन – “विक्रमांचा महामेरु। भारतीय संघासी आधारु। अखंड स्थितीचा निर्धारु। “श्रीमंत” योगी॥“


- सौरभ वैशंपायन.

Thursday, September 11, 2008

आठवण....

आठवते का? आकाशावर उमटुन गेली होती लाली,
आठवतो का? तोच रक्तीमा फुलला होता तुझ्याच गाली. - १

आठवले का? हळवे स्पर्श, नीसटती त्यांची हुरहुर,
आठवली का? उशीर होता लटक्या रागाची कुरबुर. - २

आठवतो का? ओंजळित फुलला होता चाफा धुंद,
आठवला का? सुवास कसला? चोरला त्याने तुझाच गंध. - ३

आठवली का? अधीर वचने अधराची अधराला,
आठवले का? चुकार अश्रु बिलगते पदराला. - ४

आठवते का? मी निघतो म्हणता घट्ट मीठि विणलेली,
आठवली मज, मला शोधती नजर तुझी शिणलेली. - ५

- सौरभ वैशंपायन(मुंबई).

Tuesday, September 9, 2008

श्यामसखा

कुणी नसावे दुरवर परी,
श्यामसखा जवळी असावा,
श्रावणधारांसवेच अलगद,
श्यामसखा बरसुनी जावा - १

श्यामसख्याच्या निळाईत अन मग,
गौरतनु हे रंगुन जावे,
वेणु त्याने लावताच ओठी,
सप्तसुरात दंगुनी जावे - २

श्यामसखा असा बरसता,
चंद्र लाजुनी चुरुन जावा,
सैलावल्या केसात अन मग,
स्पर्श जरासा उरुन जावा - ३

- सौरभ वैशंपायन.

Tuesday, August 12, 2008

कॅलेंडर - ५७ ते ४७

प्रत्येक भारतीयाच्या घरात हे कॅलेंडर लागावे अशी इच्छा. मी सध्या १८५७ ते १९४७ या दरम्यान "क्रांतिकारकांनी" जे "सशस्त्र क्रांतीचे" प्रयत्न केले त्याचा मागोवा तारखे नुसार घेतला आहे. ज्यांना क्रांतिकारकांशी संबधीत(जन्म-मृत्यु-कार्य) अश्या घटना माहित असतील तर त्यांनी मला ती माहिती द्यावी.



जानेवारी.
२ - १)हुतात्मा विठ्ठल लक्ष्मण कोतवाल उर्फ भाई कोतवाल पुण्यतिथी(१९४३). २)हुतात्मा हिराजी पाटिल पुण्यतिथी.



फेब्रुवारी.
३ - क्रांतिसूर्य उमाजी नाईक पुण्यतिथी(१८३४).

१७ - आद्यक्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके पुण्यतिथी(१८८३).

२६ - स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आत्मार्पण दिन(१९६६).

२७ - चंद्रशेखर आझाद पुण्यतिथी.

मार्च
२३ - भगतसिंग-राजगुरु-सुखदेव पुण्यतिथी (१९३१).


एप्रिल
१९ - अनंत कान्हेरे पुण्यतिथी(१९१०).

१८ - १)सेनापती तात्या टोपे पुण्यतिथी(१८५९). २)दामोदर हरी चापेकर पुण्यतिथी(१८९८).

३० - खुदिराम बोस यांनी मुझफ्फरपुरमध्ये किंग्जफोर्डच्या बग्गीवर बॉम्ब टाकला(१९०८).

मे.
१ - हुतात्मा विठ्ठल लक्ष्मण कोतवाल उर्फ भाई कोतवाल जयंती(१९१२).

८ - वासुदेव हरी चापेकर पुण्यतिथी(१८९९).

१० - १८५७ च्या स्वातंत्र्यसमराची सुरुवात.

१२ - बाळकृष्ण हरी चापेकर पुण्यतिथी(१८९९).

२८ - स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर जयंती(१८८३).



जुन
१८ - राणी लक्ष्मीबाई पुण्यतिथी(१८५८).

२२ - आयस्टर व रॅंड वध(१८९७)(चापेकर बंधु). वीर सावरकर व नेताजी बोस भेट(सावरकर सदन, मुंबई, १९४१)

२५ - दामोदर हरी चापेकर जयंती(१८६९).

जुलै
१ - कर्झन वायली वध(१९०८)(मदनलाल धिंग्रा)

८ - मार्सेलिस इथुन वीर सावरकरांचा निसटण्याचा प्रयत्न(१९१०).

२३ - १)लोकमान्य बाळ गंगाधर टिळक जयंती. २)चंद्रशेखर आझाद जयंती.

ऑगस्ट
१ - लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पुण्यतिथी(१९२०)

१८ - खुदिराम बोस पुण्यतिथी(१९०८)

३ - क्रांतिसिंह नाना पाटिल जयंती(१९००).

सप्टेंबर.


ऑक्टोबर.
२१ - राणी लक्श्मीबाई जयंती(१८३५).

नोव्हेंबर.
४ - आद्यक्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके जयंती(१८४५).

१२ - सेनापती बापट जयंती(१८८०).

१६ - विष्णू गणेश पिंगळे पुण्यतिथी(१९१५).

२८ - सेनापती बापट पुण्यतिथी(१९६७).

डिसेंबर.
६ - क्रांतिसिंह नाना पाटिल पुण्यतिथी(१९७६).

१७ - सॉंडर्स वध(१९२८)(भगतसिंग-राजगुरु-आझाद).

२१ - जॅक्सन वध(१९०९)(अनंत कान्हेरे).

Tuesday, July 22, 2008

आर्य

१>गिधाड!

मध्यानीच्या सुर्यालाहि झाकुन टाकावं इतकी गिधाडं आकाशात गरगरत होती. आज त्यांना बर्‍याच दिवसांनी पोट फुटेतोवर खायला मिळणार होते. त्यांच्या चोचींना लाल रंग चढणार होता आणि त्यांच्या जिभेला गरम रक्त लागणार होतं. खाली हजारो प्रेते रक्ताच्या चिखलात पडली होती. त्यात लहान-मोठे, स्त्री-पुरुष असा कुठलाच भेद नव्हता. वाचलेली लहान मुले त्या प्रेतांजवळ फतकल मारुन भीतीने रडत ओरडत होती. त्यातहि ज्यांच वय नेमकं काय झालय हे कळण्या इतपत होतं त्यांची पाचावर धारण बसली होती. भीत-भीत ते त्या प्रेतांच्या खचात आपले नातेवाईक शोधत होते. काहि मरणपंथाला लागलेले जीव तळमळ करत एक घोट पाण्याची अवास्तव अपेक्षा करत यमदुतांच्या वाटेकडे डोळे लावुन बसले होते. आजुबाजुला फुटकि भांडि-कुंडि, घोड्यांनी तुडवुन काढलेले तंबु, गळुन पडलेली रक्ताळलेली शस्त्रे असं बरच सामान विखुरलेलं होतं. जे या यातनातुंन सुटले होते ते नशीबवान होते म्हणायचे, निदान ज्या स्त्रीया पहिल्या हल्ल्यात मेल्या त्या सुटल्या कारण ज्या जिवंत राहिल्या त्यांच्या अर्धमेल्या देहाला सिकंदराच्या ग्रीक लांडग्यांनी ओरबाडुन त्यांची लक्तरे केली होती. आणि आता वरची गिधाडे त्यांच्या मरणाची वाट बघत होती. आणि हळु-हळु गिधाडे गिरक्या घेत खाली उतरु लागली, थोड्याच वेळात रक्ताचा वस हुंगत कोल्हि-कुत्री देखिल आली आणि त्या ठिकाणाला यमपुरीहुन वाईट दशा आली.

गांधार, राणीगत, उत्तखंड सारखी अनेक राज्य आणि गणराज्य जिंकत सिकंदर तक्षशीलेपर्यंत आला होता. आता त्याचा मोर्चा केकय साम्राज्याकडे वळला. मात्र केकयच्या आधी मस्कावतीनं त्याची वाट रोखली. चुटकीसरशी जिंकु या भ्रमात असलेल्या ग्रीक सैन्याचे डोळे पांढरे व्हायची वेळ यावी असा तिखट प्रतिकार मस्कावतीनं केला. खरं तर असा प्रतिकार त्याला प्रत्येक राज्याकडुन होत होता अपवाद फक्त तक्षशीलेच्या अंभीचा होता. स्वत:हुन त्याने सिकंदराशी हात मिळवणी केली होती, कारण त्याला पौरव राजाला हरवायच होतं आणि त्यासाठि तो कुठल्याहि थराला जायला तयार होता. तक्षशीलाच फितुर झाल्यावर सिकंदराला भारताचे दरवाजे सताड उघडे झाले. आणि आता तो त्या भागातल्या एकुलत्या एक बलशाली राज्यावर चाल करुन जात होता, केकयवर- पौरव राजावर. पण केकयवर जाताना मस्कावतीनं वाट रोखली. एखाद्या मद चढलेल्या हत्तीला मुंगीनं हैराण करावं तसं मस्कावतीनं आपली चिमुटभर ताकद सिकंदरा विरुध्द वापरली. मात्र नाईलाज झाला. मनुष्यबळ, शस्त्रास्त्रे, पैसा या बाबतीत सिकंदर शेकडो पटीने बलाढ्य होता. सिकंदर जग जिंकायच्या महत्वाकांक्षेने पिसाट झाला होता. त्या मस्कावतीच्या नागरीकांना-सैनिकांना बिचार्‍यांना आपले राज्य वाचविणे हाच एक उद्देश होता. पिसाट वृत्तीने मस्कावतीचा बचाव मोडुन काढला. गणराज्याचा नेताच पडला म्हणून वेळ पडली तेव्हा त्या राज्यातल्या स्त्रीयाहि त्या नेत्याच्य पत्नीच्या बरोबर तलवार घेऊन मैदानात उतरल्या. पण असा कितीसा टिकाव लागणार होता? अखेर मस्कावतिनं हत्यार ठेवलं.

सिकंदरानं गणराज्यातील काहि प्रमुखांना बोलावुन त्यांना सांगितले - "आमच्यात सामिल व्हा आणि पुढे लढाईत मदत करा, किंवा हे राज्य सोडुन दुर निघुन जा! दोन्हि मान्य नसेल तर तुमचा विनाश ठरलेला आहे!! आम्हाला सामिल झालात तर योग्य मोबदला देऊ किंवा जायचे असेल तर निघुन जायला तुम्हाला २ दिवसांची मुदत देतो!! तिसरा दिवस विनाश घेऊन उगवेल!" पराभूतांना स्वत:च मत नसत. बिचारे काय करतात? विचारांती ठरवलं - आपण दुर निघुन जाऊ, निदान त्या अंभी राजा सारखी आपली तलवार स्वकियांच्या रक्तानं माखवण नको. आपल्या पिल्लांचे आयुष्य इथुन दुर सुरक्षीत तरी राहिल. मोठ्या जड अंत:करणाने, जिथे उभं आयुष्य काढलं ती मातृभूमी सोडुन तिथले नागरीक निघाले. पण इतक्या हजारो लोकांचा प्रवास सहाजिकच धीम्या गतीनं होऊ लागला. पहिलाच मुक्काम नगराच्या वेशी बाहेर थोड्याच अंतरावरील माळावर पडला. सकाळी उठुन निघण्याच्या तयारीत असताना अचानक धुळीचे ढग उठले. घोड्यांच्या टापांचा आवाज वाढत गेला आणि आली - सिकंदराच्या सैन्याची गिधाडि धाड मस्कावतीच्या बेसावध नागरीकांवर पडली. सिकंदरानी शब्द मोडला होता....कपटाने त्यांचा काटा काढला होता...जग्जेता म्हणवणार्‍याकडे शब्द राखण्याचीहि दानत नव्हती. क्षणभरात अमानुष कत्तल उडाली. सारे मातीमोल झाले. कापाकापी, बलात्कारांना ऊत आला. जे या तडाख्यातुन वाचले ते नेसत्या वस्त्रानिशी परागंदा झाले. मागे राहिले आक्रोष, शाप, अश्रु आणि मृत्युचे शिसारी आणणारे तांडव.

- सौरभ वैशंपायन(मुंबई).

Thursday, July 17, 2008

रारंग ढांग

"श्री प्रभाकर पेंढारकर" यांच्या "रारंग ढांग" या पुस्तकातील मला आवडलेले २ उतारे इथे देतोय. हे दोन्हि उतारे त्या पुस्तकातील "मिनू खंबाटा" या पात्राने गाजवले आहेत. झक्क्क्क्क्क्कास आहे. वाचा नक्कि प्रेमात पडाल.



१]

नाइन्थ फील्ड कंपनीत मिनूचं काम होतं की नाहि ते माहित नाहि. मात्र तेथुन पुढं डिटॅचमेंट थ्रीला तो विश्वनाथला सोडायला आला. कालचीच ओळख पण अगदि पूर्वापार जानी दोस्ती असल्यासारखी. विश्वनाथ एकटाच राहणार आहे म्हणुन त्यानं उंची व्हिस्किची छोटि बाटली आणलेली.

"दोस्त, हि जागा मोठि सुरेख आहे." खोलीची पहाणी करत मिनू म्हणाला. तात्पुरत्या बांधलेल्या पत्र्याच्या ह्या खोलीत त्याला काय छान दिसलं ह्याचा विश्वनाथला अंदाज येईना. त्यानं विचारल तसं मिनू हसुन म्हणाला "हनीमूनला अशी जागा शोधुन सापडणार नाहि. हा इथला एकांत, नि:शब्द शांतता, दूरवर दिसणारा किन्नोर कैलास, एका बाजुला रारंग ढांग....आणि खालुन वाहत जाणारी सतलज. निळ्या निळ्या आकाशाखाली, खुल्या निसर्गाच्या सान्निध्यात नुकतं लग्न झालेली पण अद्याप प्रियकर आणि प्रेयसी असलेली फक्त दोघं जण! आलीच तर पावसची एखादि सर! उफ, अश्या भिजलेल्या ओल्या ओठांच तू कधी चुंबन घेतलं आहेस? - नाहिऽऽ?? अरे दोस्ता, त्याइतकं सौदर्याच दुसरं ऍप्रिसिएशन नाहि. प्रेमाला दिलेलं दुसरा इतका मोठा कॉंम्ल्पिमेंट नाहि!!"
विश्वनाथ नुसता हसला. विव्हल होत मिनू म्हणाला "दोस्ता, हसु नकोस. चुंबना बाबत आपण बोलतो आहोत. काहि जणी चुंबन घेतलं कि लाजुन लाल होतात, काहि रागावतात, काहि चावतात, काहि मारतातहि. ह्या सर्व परवडल्या. पण तुम्हि भावनेच्या आवेगात, भान हरपुन चुंबन घेतलत कि काहि चक्क हसत सुटतात. ह्या इतकि दारुण फजिती दुसरी कोणती असेल? तेव्हा तु तरी हसु नकोस."


२]

सर्व खटाटोप करणं सार्थकि लागलं असं वाटाण्या जोगी हि नारळांची आणि तांदळाच्या पिठाची चीज बनली होती. पुटुची चव अफलातुन जमली होती.
तोंडात घातलेला मोठा तुकडा खात विश्वनाथनं विचारलं,
"तुम्हांला कशी काय हि केरळातली चीज माहित?"
केरळ...लॅंड ऑफ लगुन्स....लॅंड ऑफ गोल्डन पाम...ऍंन्ड लॅंड ऑफ कथकली - एवढचं वर्णन टूरीस्ट गाईडमध्ये केरळच दिलं असतं. अत्यंत अरसिक, कल्पकताशून्य लोक सरकारी नोकरी धरतात आणि वर चढतात. त्यांनी लिहिलेलं वर्णन हे त्यांच्यासारखच रुक्ष आणि साचेबंद."
"तुम्हाला कसा दिसला केरळ?" विश्वनाथनं विचारलं.
"केरळ - माझ्या डोळ्यातुन पहायचा आहे तुला? केरळ लॅंड ऑफ पुटु ऍंड दि लॅंड ऑफ मुंडु!"
"मुंडु? हे काय प्रकरण आहे?"
"दॅट्स इट! ह्या वर्णनाबरोबर उत्सुकता जागी झाली पाहिजे. हा काय पदार्थ आहे? पहायचा? ऐकायचा? खायचा कि अनुभवायचा? पुटु तुला खायला इथे मिळाला पण मुंडु साठि तुला केरळलाच गेलं पाहिजे. mundu has made Keral the land of beauties!"
मिनू हवेत तरंगल्यागत बोलू लागला. त्याचे पाय जमिनीवरुन सुटले होते हे खरं, पण ते केरळच्या आठवणीमुळे कि त्यानं नुकत्याच रिकाम्या केलेल्या रमच्या चवथ्या ग्लासमुळे, विश्वनाथला समजेना.
"सुकुमारन नायर.... ह्या विशुला सांग... what is mundu..? mundu in chirikal!"
"नाहि. मी चिरीकलला कधी गेलो नाहि."
"अरेरे सुकू, मग तु कसला केरळचा? फुकट फुकट घालवलस तू आजवरचं आयुष्य! दोस्ता ग्लास भर जरा....ह्या चिरीकलीच्या आठवणीनं नशा आला, त्यात थोडि इथली रम मिसळु दे. चिरीकल....एक छोटसं खेडं. समुद्रकिनारी वसलेलं! तिथल्या मोपला मुली. संध्याकाळाची वेळ. नदिवरुन परतत आहेत. कमरेवर भरलेली घागर....अंगात लांब हातांचा ब्लाऊज. चिटाच्या कापडाचा, मोठ्या डिझाइनचा. डोक्यावर सफेद रुमाल आणि खाली लुंगी...केरळच्या भाषेत ’मुंडू’!"

विश्वनाथ थक्क झाला. मुंडू म्हणजे लुंगी हे त्याला कल्पनेतही वाटलं नव्हतं. केरळच्या खेड्यात हरवलेला मिनू पुढं सांगु लागला,
"ह्या लुंगीच्या दोन्हि कडा समोर आलेल्या. ह्या कडा चालताना उघड्या पडतात; कधी कधी पाय पुढं लुंगी मागुन येते. हात कमरेवरची घागर सावरण्यात गुंतलेले. कधी जोराचं वार येतं. लुंगी उडते, गोरे गोरे पाय, नाजुक पण भरलेल्या पोटर्‍या....असच जोरदार वारं येईल तर... नजरेत सगळी उत्सुकता दाटते. पण दोस्त. झंझावात आला तरी मुंडू तिथच. वर सरकतच नाहि. This far & no further! म्हणुनच त्या मुंडूच आकर्षण कधी कमी होत नाहि. मिनी मॉड स्कर्ट आले आणि गेले...पण मुंडू तो मुंडूच!"
बोलता बोलतामिनू विश्वनाथ जवळ आला. खांद्यावर हात ठेवत त्यानं विचारलं, "विशू, दोस्त, चल येतोस केरळला?"
"चला..."
मिनू खुर्चीवर बसला. रमचा ग्लास उचलत तो म्हणाला, "पण येऊन काय करणार तु? ह्या रारंग ढांगाच ओझ तुझ्या डोक्यावर! आणि त्यापलीकडं स्वत:च्या सात्विकतेचं, सज्जनपणाचं ओझ! ते विसरायला जमायच नाहि तुला!"
मिनूनं ग्लास अर्धाधिक रीकामा केला. धुंद डोळ्यांनी विश्वनाथकडे पाहत त्यानं विचारलं -
"दोस्ता, खर सांग, कधी वडिल माणासांचा डोळाअ चुकवुन सिगरेट ओढलीस?"
"नाहि!"
एकदा तरी ड्रिंक घेतलस, किमान बिअर तरी?"
"नाहि."
"कुणाच्या मिठीत, काळ्याभोर केसांच्या धुंद वासात स्वत:ला हरवुन गेलायस?"
"नाहि."
"लाल-गुलाबी, नाजुक ओलसर ओठांचा हलकेच मुका घेतलायस?....नाहि? बर, निदान कधी कुणावर तुझ्यासारख्या पथ्यकारक प्रकृतिला मानवेल असं प्लॅटॅनिक प्रेम तरी केलयस?"
"अद्याप तरी नाहि."
"मग शहाण्याऽऽ ती उमा कोण???"
ह्या एकदम अनपेक्षीत प्रश्नानं विश्वनाथ चक्रावलाच. आजच आलेलं उमाच पत्र त्याच्या शर्टाच्या खिशात होतं. ते पाहिलं कि काय ह्याने?
चाचरत त्यानं प्रश्न केला - "कोण उमा??"
"तुला माहित नाहि उमा कोण ते? ठिक आहे! मी सांगतो, जे. जे. स्कूल ऑफ आर्टची विद्यार्थीनी. गोरीपान, गुलाबी कांतीची, लाजर्‍या डोळ्यांची! माहित नाहि तुला?"
विश्वनाथ पार गडबडुन गेला. "खरच तुमची नी तिची ओळख आहे?"
मिनू हसला आणि म्हणाला "मुंबईतली कोणती मुलगी आहे, जी दिसायला सुरेख आले आणि मला माहित नाहि?" बोल, आणखि तिची काय माहिती पाहिजे तुला?
ह्या प्लेबॉय पारश्याची आणि तिची ओळख कशी? हे कोडं विश्वनाथला सुटेना. मनात प्रश्न अनेक पण बाहेर एकहि येईना. त्याच्या मनातल बरोबर ओळखल्या सारख मिनू म्हणाला -
"तिची माझ्याशी ओळेख कुठे झाली, कशी झाली, ऐकायचय? - तिची माझी ओळख काल झाली. इथं हिमालयात झाली."
"म्हणजे?"
"ए चक्कर, तुझ्या खोलीत त्या चित्राखाली ठणठणीत अक्षरात लिहिलय - ’उमा’."
"म्हणजे गोरीपान, लाजरी......"
"ज्यांच्या प्रेमात तुझ्यासारखे भाबडे तरुण पडातात अशा नव्वद टक्के मुली गोर्‍यापान असतात, लाजर्‍या असतात, पण त्यांचे डोळे मोठे बोलके असतात. आणि ह्यापैकी काहिही नसल्या तरी तुझ्या सारख्यांना निदान त्या तशा वाटतात. हे तसं वाटण म्हणाजे प्रेमाच पहिलं लक्षण आहे."
"पण मी कुठ सांगितलं कि मी तिच्या प्रेमात पडलो आहे?"
"पडला नसलास अद्याप तर मग पड! आणि काय रे? तिच्या प्रेमात पडला नसतास तर ते समुद्राच चित्र कशाला आणालस? सत्यसाईबाबाचं आणायच होतस!"
"ते चित्र चांगल आहे!"
त्यापेक्षा ते तिने काढलय हे खर कारण आहे. तुला पटायच नाहि. अस कर उठ इथुन. ती क्वीन्सची बाटली घेऊन ये. अख्खी पाजतो तुला ती पोटात गेली कि तुझ्या तोंडुन जे मनाच्या तळाशी असेल ते बाहेर येईल ते तुला ऐकवतो. तुझा स्वत:चाच तुला परीचय होईल!"
मिनू नशेतहि फार मोहक मिस्किल हसला.
"तू असं कर त्या क्वीन्स च्या बाटलीतली दारु बाहेर ओतुन टाक. स्वच्छ पाणी भर आणि त्यात मनी प्लॅंट किंवा एखादं फुलझाड लाव.अन त्या हिरव्या पानाकडं किंवा एखद्या कळी कडे कौतुकान बघत बैस. तेव्हढच तुला झेपेल. कारण प्रेमाला सामोर जायला मोठ धैर्य लागतं. प्रीतीची बेहोशी अनुभवायला दिल लागतो दोस्त! तो असता तर तर पहिल्या रात्री मी सांगितल होतं ना, डिटॅचमेंट थ्री मधली तुझी खोली हि मधुचंद्र साजरा करायला योग्य जागा आहे हे तु उमाला लिहिल असतस आणि विचारलं असतस "येतेस का? मी वाट पाहतो आहे!" दोस्त तुझ्या त्या दोन ओळींच्या पत्रावर तिनं आयुष्य झुगारुन दिलं असतं."

Tuesday, July 15, 2008

पोटा कडुन PETA कडे .........

People for the Ethical Treatment of Animals (PETA) हि संस्था मुक्या प्राण्यांच्या छळा विरुध्द आवाज उठविते. त्यात मांसाहार करु नका, प्राणीजन्य सौंदर्य साधने वापरु नका हे आणि असे अजुन बरेच मुद्दे ते लोकांसमोर मांडतात. मांसाहार करावा कि नाहि हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. तसेच एखाद्या जातीने मांसाहार करावा किंवा करु नये यावरहि माझे काहि म्हणणे नाहि. मी स्वत: शाकाहारी आहे(खरंतर मी अंड खातो, पण गेल्या वर्षी ट्रेकला मोजुन १ अंड खाल्ल होतं, त्या आधी जवळपास २-३ वर्ष तेहि खाल्ल्याचं मला आठवत नाहि.)


मांसाहार न करण्याची माझी कारणे -

१)फक्त माझ्या जीभेला चांगलं लागतं म्हणुन हाल-हाल करुन एखाद्याचा जीव घेणं मला पटत नाहि.

२)वरील वाक्यावर काहि "विद्वान" म्हणतात मग झाडांना जीव नसतो का? पण त्यात फारसे तथ्य नाहि, कारण झाड(धान्ये,पाला,फळे etc.) परत उगवु शकते. मुठभर गव्हापासुन किलोभर गहु सहज परत मिळु शकतो. किंवा साधी कोथींबिर जरी बाजारातुन आणली आणि एखाद्या भांड्यात पाणी भरुन ठेवली तर हिरवीगार राहु शकते. फाळातल्या बी पासुन शेकडो फळे देणारे नविन झाड उगवु शकते. कोंबडि किंवा बकरीचा एक पाय तोडुन तिला बाजुला ठेवली तर तिथे दुसर पाय़ फ़ुटणार आहे का? किंवा कोंबडिचं पिस खुराड्यात ठेवले तर नविन कोंबडि मिळणार आहे का? म्हणुनच व्हेज अन्नात हिंसा कमी असते. आणि निर्मीती जास्त असते. अगदी काहि रोगांवर देखिल गव्हचे सत्व वापरतात.

३)तुम्ही ज्या क्षणी प्राणी/पक्षी मारता त्या क्षणी "विघटन" सुरु होते. विघटन म्हणजे कुजणे-सडणे. आता विघटन हि फारच नैसर्गीक क्रीया आहे. काहिवेळा तर ’-५’ टेंप्रेचर मध्ये देखिल अतिशय संथ पध्दतीने विघटन चालु असतेच असते. ’-५’ मध्ये जगु शकणारे जंतु असतात. त्यामुळे ते सुगुना चिकन असो किंवा दुर्गुना चिकन असो, स्वच्छ वगैरे असत नाहि. तसे भाजीचे नसते. भाजी जोवर सतत ओली होत नाहि तोवर कुजत नाहि. म्हणजे भाजी जास्त स्वच्छ राहु शकते.

४)मासे कोणी २ दिवस एखाद्या खोलीत उघड्यावर ठेवले आहेत का(वाळवलेले किंवा सुकट/ड म्हणत नाहिये)? किंवा कोणी ठेवेल का? नाहि ना? आम्ही कोबी, मेथी, सीमला मिर्ची ४ दिवस ठेवतो. आणि त्याचा वासहि येत नाहि. कदाचित ती सुकतील पण त्यांच्या वासाने घरात थांबवत नाहिये असं कधी होत नाहि(भाजी "कुजली तर? चा प्रश्न वेगळा आहे, खोलीत ठेवलेली भाजी जर पातळ कपड्याने झाकुन ठेवली(जेणेकरुन स्वच्छ राहिल पण दमट होणार नाहि) तर भाजी ४-५ दिवस सहज टिकते.)

५)मांसाला स्वत:ची अशी फारच कमी चव असते. म्हणजे कोंबडि आणि बदक किंवा बोकड आणि ससा यांच्या मांसात चव वेगळी असेलहि, असायलाहि हवी(नाहितर फायदा काय?) ते चावण्यासाठि देखिल वेगळे कष्ट घ्यावे लागत असतील(मऊ/वातड). पण "बघा कोंबडी कशी तिखट आहे आणि बदक असे आंबट आहे, मात्र अजुन थोडे मोठे झाले असते तर मात्र गोड लागले असत हं!" असे कोणीहि मांसाहारी म्हणु शकत नाहि. व्हेज वाले हे नक्किच म्हणु शकतात.

६)वनस्पतींना खाउन "प्लांट-गुनिया" होत नाहि . काहि वनस्पती विषारी असतात पण त्यांचा वापर आपण भाजीत करतच नाहि. हांऽऽ आता मी धोतर्‍याचेच बी खाणार असं कोणी म्हणालं तर मात्र काहि इलाज नाहि.

७)कढिपत्ता जरी सुकला तरी त्याला १० मिनिटे पाण्यात टाकले कि परत हिरवट होतो, बरं चवहि तीच राहते. मांसाहाराचं असं असतं का?

८)कच्च मांस तुम्ही खाऊ शकता का?(खाऊन दाखवु का? हा मुद्दा नाहिये मी म्हणिन तेव्हा आणि ते खायच मग बड्याचं आणि छोट्याच हा फरक नकोय) पण आम्ही कच्चे कोबी, सिमला मिर्ची, खातो. आजकाल तर चायनीज मध्ये या कच्च्या भाज्यां शिवाय पानहि हलत नाहि.

९)मांसाहारात किती प्रकारच्या चवी देउ शकता? गोड मासे, तुरट कोंबडि आणि कडु बोकड असे कोणी ऐकले अथवा खाल्ले आहे का? नाहि ना? आम्ही मात्र देऊ/खाऊ शकतो.

१०)जेव्हा मांसाहारात variety असते लोकं म्हणतात तेव्हा, शाकाहारात त्याच्या १०० पट जास्त variety आहे हे विसरतात का? इतकिच चव डेव्हलप करायची असेल तर व्हेज पदार्थ जगातल्या सगळ्या चवी देऊ शकतात.
गोड(साखर-गुळ-फळे), आंबट(आमचुर, आमसुल, लिंबु), तिखट(अर्थात मीरची), तुरट(आवळ्याचे लोणचे,/ढेणसे(टॉमेटो सारखा प्रकार)), कडु(कारले,मेथी), जळजळीत(लवंग, काळी मिरी), पांचट(गवार, भोपळा), जळकट(बटाट्याच्या भाजीची खरपुंडि), उग्र(लसुण, कांदा), खरपुस वगैरे वगैरे. या शिवाय - कोबी, कोथिंबीर,शेपुची भाजी या कोणत्या चवीत बसतात हा संशोधनाचा मुद्दा आहे(आणि ते संशोधन दुसर्‍याने करावे, मला भोपळा आणि या तीन गोष्टि अज्जिबात आवडत नाहित!! )
तिखट, जळजळित किंवा जळकट चवी शि्वाय अजुन कोणत्या चवी मांसाहार देऊ शकतो?????



सांगण्याचा मुद्दा इतकाच. आपल्या एखाद्या रविवारची सुट्टि एखाद्या कोंबडिची कायमची सुट्टि तर करत नाहि ना? याचा विचार व्हावा.

Tuesday, July 1, 2008

सप्तर्षि

सरनौबत प्रतापराव गुजरांनी शरण आलेल्या बहलोलखान पठाणाला धर्मवाट दिली. महाराजांना ही बातमी समजताच. त्यांनी टाकोटाक सरनौबतांना पत्र लिहीले - "स्वत:ला सरनौबत म्हणवता? तुम्ही तो केवळ शिपाईगिरीच केली! बहलोल इतुका बहुत वळवळ करीत आहे, त्यांस मारुनी फ़त्ते करणे अन्यथा आम्हांस तोंड न दाखविणे!". तीच चिड मस्तकात घेउन सरनौबत प्रतापराव गुजरांनी नेसरी येथे अवघ्या सहा अंगरक्षकांसहीत बहलोलखान पठाणाच्या फ़ौजेवर हल्ला चढवला आणि अजुन एक खिंड पावन झाली.





काय घडविले? कसे म्हणावे सेनापती सुजाण?
कुणा विचरुनी दिला सोडुनि, खासा बहलोल पठाण? -१

पुनश्च अडवा, धुळीस मिळवा, प्रयत्ने भगिरथ करुनी.
तोवर अमान्य असें अम्हांसी, बघणे तव मुख फ़िरुनी. -२

शब्द नव्हे ते कट्यार फ़िरली, उभी काळजा वरती.
गळुन पडला खलिता खाली, नयनांत आसवे भरती -३

रक्त तापले, श्वासागणिक फ़ुलु लागली छाती.
मांड टाकली घोड्यावरती, उडु लागली माती. -४

सात अश्व चौखुर उधळले, तडीताघातासाठी.
म्यानातुनी जणु वीज घेतली, ढाल घेतली पाठी. -५

पठाण दिसता वेग वाढला, ढळुन गेला तोल.
पतंग येता अग्निवरती, खुशीत ये बहलोल. -६

अरीसेनेसी छेदत सुटले, सात शिवाचे बाण.
छातीवरती घाव झेलले, अखेर सुटले प्राण -७

सप्तदलांचे बिल्वपत्र ते, पायी शिवाच्या पडले.
श्वास रोखुनी धरती सारे, आक्रितची हे घडले. -८

बेभान होउनी लढले-पडले, वीर मराठी सात.
तम छेदूनी उर्ध्व दिशेला, झाले सप्तर्षि नभात. -९


- © सौरभ वैशंपायन(मुंबई).