Showing posts with label हिंदूत्व. Show all posts
Showing posts with label हिंदूत्व. Show all posts

Sunday, August 17, 2014

बलसागर भारत होवो!

वास्तविक हा लेख लिहीवा असे वाटण्यास २ गोष्टी कारणीभूत ठरल्या १) ३-४ महीन्यांपूर्वी माझ्या काही मित्रांना भेटलो होतो, गप्पांच्या ओघात  त्यातल्या अंबरीश फडणवीस व निनाद कुलकर्णी यांनी सबव्हर्जन ह्या विषयाला हात घातला होता तेव्हापासून ते फिट्ट डोक्यात बसलाय आणि २) नरेंद्र मोदि काश्मीरचा दुसर्‍यांदा दौरा करुन आले. सीमे पलीकडून सारखा सारखा होणारा गोळीबार लक्षात घेऊन त्यांनी पाकला चार खडे बोल सुनावले होते. मात्र दुसर्‍याच दिवशी पुन्हा पाकने तीच खोडी काढली. लगोलग माझ्या काही मित्रांनी "बघूच मोदि काय करतात?" असा लाडीक बालहट्ट धरला. मग त्यांच्याशी बोलताना खूप काही बाहेर येत होतं ते कुठेतरी एकत्र करावं ह्या उद्देशाने हा पोस्ट!

     ===========================================================



नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान कसे बनले ह्या प्रश्नाचं उत्तर घेण्यासाठी आपल्याला मागे जावं लागेल ..... तब्बल ३० वर्ष मागे. तसं तर लेखांच्या संदर्भांसाठी आपल्याला शेकडो वर्ष मागे जावं लागेल व एक धागा खरोखर तितका मागे जातो देखिल. पण मोदिंच्या पंतप्रधान पदाचे रहस्य मात्र ३ दशके मागे जाते. १९८५ मध्ये निकाल लागलेला "मुहम्मद अहमद खान विरुद्ध शहाबानो खटला." हो! हा तोच खटला आहे जिथुन राजीव गांधीच्या हातातील कॉंग्रेसने; प्रतिगामी मुस्लिमांची वोट बॅंक आपल्या बाजूने वळवायला शहाबानो खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय बदलला. त्यावरुन खूप मोठे गहजब झाले. मुस्लिमांना झुकते माप दिल्याने जनसंघ, विश्व हिंदू परीषद आदि खूप खवळले. मग पारडी समसमान करायला राजीव गांधी सरकारने एक आणखि निर्णय घेतला - "अयोध्येतील वादग्रस्त रामजन्मभूमी सर्वांसाठीच खुली करण्यात येईल!" पुढचा इतिहास बाबरी जमीनदोस्त करणे - मुंबई दंगे - केंद्रात वाजपेयी सरकार वगैरे करत पोहोचतो २००२ गुजरात - गोध्रापाशी. मोदिंना गुजरात दंग्यामुळे कॉंग्रेस व मिडीयाने जमेल तिथे फटकवायला सुरुवात केली. तब्बल १२-१३ वर्षे भारतीय जनता तेच बघत होती. सगळे एकाच मुद्यावरुन ह्या माणसावरती तुटून पडले आहेत पण हा शांत आहे, दुसरीकडे गुजरातमध्ये पहील्याहुन अधिक वेगाने व नजरेत भरेल अशी प्रगती दिसू लागली होती. गुजरातमध्ये जो माणूस जाऊन येई तो तिथल्या बदलाबाबत बोले. आपल्याकडे एक मानसिकता असते रोज रोज शेजारच्या घरातल्या पोराला आई-बाप बडवत असतील तर त्याची आपल्याला आपसूक दया येते. त्यातून ते पोरगं हुशार असून त्याला चापटवत असतील तर आपल्याला आई-बापाचाच राग येतो. तेच नरेंद्र मोदिंच्या बाबतीत झालं.

बरं कॉंग्रेसने १० वर्षात खूप काही भरीव करुन दाखवलं होतं का? तर तसं पण नाही. २००४ मध्ये अशांत समंध असलेल्या  कम्युनिस्टांचा टेकू घेऊन आलेल्या सरकारमुळे अनेक गरजेचे ते निर्णय घेऊ शकले नाही व नंतर २००९ मध्ये तुलनेने भक्कम सरकार आलं तर हजारो कोटींच्या घोटाळ्यांची उड्डाणे सुरु झाली. राष्ट्रकुल घोटाळा, आदर्श घोटाळा, 2G घोटाळा, कोलगेट घोटाळा, गांधी घराण्याचे जावई रॉबर्ट वड्रा आणि DLF च्या व्यवहाराचं गौड बंगाल सगळं जनता बघत होती. त्यातच अण्णा हजारेंच आंदोलन, रामदेवबाबांचं आंदोलन त्या आंदोलनांना चिरडण्यासाठी कॉंग्रेसने उचललेली पाऊले त्यांच्यावरचा जनतेचा रोष वाढवायला मदतच करत होती. त्यातच संपूर्ण देशाला क्लेषकारक असं निर्भया प्रकरण झालं. जनता पुन्हा रस्त्यावरती उतरली. त्यांच्या आंदोलनाला आटोक्यात आणायला सरकारने चक्क वॉटर कॅनन, अश्रुधुराचा वापर केला आणि जनतेचा संयम संपला. आता जनता उघड उघड कॉंग्रेस विरुद्ध बोलू लागली. हे कमी की काय महागाई डायन जनतेचे खिसे साफ करु लागली. सरकारचा जनतेशी शून्य संपर्क, जनतेत पराकोटीचा रोष, महागाई, असुरक्षितता ह्या सगळ्या पार्श्वभूमी वरती नरेंद्र मोदि राष्ट्रिय राजकारणात उतरले व कल्पने पलीकडे यशस्वी झाले. भले भले तथाकथित व स्वयंघोषित विचारवंत जे - "नरेंद्र मोदि हुकूमशहा आहेत!", "नरेंद्र मोदि भारताचे पंतप्रधान कधीच होऊ शकणार नाहीत!", "भारतीय जनता खूनी माणसाला नाकारेल" वगैरे मुक्ताफळे उधळत होती त्यांच्या आजवरच्या सगळ्या अनुभवाला, गणितांना फटकारुन जनतेने एकहाती सत्ता भाजपाला दिली. निवडणूकी आधी मी मी म्हणणारे टिव्ही वरुन गायब झाले.


खुद्द भाजपाला इतके यश मिळेल याची खात्री नव्हती. म्हणून त्यांनी देखिल निवडणूकिच्या आधी अनेक स्थानिक पक्षांची मोळी बांधली. पण गोवा, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश सारख्या ठिकाणी १००% तर महाराष्ट्र, उत्तर प्रदेश वगैरं सारख्या ठिकाणी तब्बल ९०% यश भाजपाच्या - मित्रपक्षांच्या पारड्यात पडले. विरोधक साफ आडवे झाले. त्या दरम्यान विरोधकांवरती मोजता येणार नाही इतके विनोद सोशल नेटवर्किंग साइट्सवरती फिरत होते. दशकानुदशके एकाच घराण्याच्या हातात पक्षाची सूत्रे दिल्याने पक्षांतर्गत लोकशाहीचा "प्रवाह" संपूर्ण आटला व कॉंग्रेसला पटाशीच्या दातांवरती आपटावं लागलं. इतकं असूनही अजूनही कॉंग्रेस गांधी घराण्याच्या दावणीलाच बांधला आहे. व तो जितका काळ गांधी घराण्याला मिठ्या मारुन राहील तितका गाळात रुतत जाईल. कॉंग्रेस संपवायला गांधी घराणेच फार मोठा हातभार लावत आहे. आज कॉंग्रेसकडे सभागृहाचे विरोधी पक्षनेते पद देखिल नाही. काल अंटोनी समीतीने फाऽऽऽऽर मनन चिंतन करुन जो निष्कर्ष काढला तो देखिल केवळ गांधी घराण्याची उरली सुरली इभ्रत राखायलाच काढला गेल्यांचं स्पष्ट दिसतय. गेल्या आठवड्यात सभागृहातील हौदात चक्क राहुल गांधी उतरले बहुदा झोप पूर्ण झाल्याने आळोखे पिळोखे देत ते चुकुन पुढे आले असावेत. लग्गेच टिव्ही वरती राहुल गांधी आक्रामक वगैरे निष्कर्ष काढुन विचारवंत मोकळे झाले. मात्र तेच राहुल गांधी परवा  "जातिय हिंसा विरोधी बिलवरती" योगी आदित्यनाथ कॉंग्रेसच्या आजवरच्या पापाचा पाढा वाचून दाखवत होते तेव्हा टेडि-बेअर गत गपगुमान बसले होते. बहुदा त्यांनी परवा हौदात उतरुन त्यांचा ह्या वर्षातला कोटा पूर्ण केला आहे. विरोधी पक्ष नेतेपद तर नाहीच नाही वरुन उपसभापती पदावरती AIADMK च्या तंबीदुराईंची केलेली निवड कॉंग्रेसचा सभागृहातील आवाज अजूनच क्षीण करुन गेली. परवा देखिल ते विरोधकांना ज्या पद्धतीने थांबवून योगी आदित्यनाथांना बोलायला सांगत होते, मला क्षणभर त्यांच्यात गोअरिंग दिसला, राइशस्टॅगमध्ये हिटलरच्या विरोधात बोलणार्‍यांना गोअरिंगने दुर्लक्षित करत खड्यासारखे बाजूला काढून टाकले त्याची आठवण झाली.


ह्या सगळ्या घटनांची सुरुवात शहाबानो केसपासून कशी हे कदाचित अजून अनेकांना पडलेले कोडे आहे. तर शहाबानो केस ही एखाद्या स्ट्रायकरसारखी ठरली जीने ह्या खेळीला सुरुवात केली. एका धर्माला दुसर्‍याची भीती दाखवा, एका राज्याला दुसर्‍या राज्याशी वाद घालायला लावा, सर्वधर्मसमभावाच्या नावाखाली अल्पसंख्यांकांचे लांगुलचालन करा हे धंदे आजवर कॉंग्रेस करत आली. जनतेला ते दिसतही होतं पण त्यांना पर्याय मिळत नव्हता. मोदिंना पंतप्रधानपदाचे उमेदवार जाहीर करुन भाजपाने ती संधी घेतली व हिंदूंना अचानक आपला तारणहार त्यांच्यात दिसला. मोदिंना बदनाम करायला विरोधकांनी जे अस्त्र सोडलं व अल्पसंख्यांकांचा खूनी म्हणून त्यांची प्रतिमा रंगवली त्याच वेळी त्यांना हे समजलं नाही की आजवरती त्यांनी जाती - धर्माचे जे घाणेरडे राजकारण खेळले त्याचे नवीन अर्थ जनतेच्या मनात रुजले होते. अल्पसंख्यंकांचा शत्रू हा हिंदूंना आपला तारणहार वाटावा ही देशाच्या एकतेला वास्तविक घातक गोष्ट आहे हे मान्य करायलाच हवं, मात्र ती केवळ बागुलबुआ न रहाता प्रत्यक्ष स्थिती झाली आहे हे नाकारता येत नाही. हिंदूंना असं वाटावच का? तर - काश्मीरी पंडित आपल्याच देशात २०-२५ वर्ष विस्थापित रहात आहेत तेव्हा मानवतावादी व सर्वधर्मसमभाव वगैरे बाबत बोलणारे बोलके पोपट मुके होतात हे त्यांनी बघितलं होतं. सैन्यात मुस्लिमांची नेमकी संख्या किती? वगैरे माहीती काढण्याचा UPA सरकारचा हीन प्रयत्न लष्करप्रमुखांनी सार्वजनिक रीत्या हाणून पाडलेला लोकांनी बघितला, आसाम मध्ये बांग्लादेशी घुसखोरांमुळे स्थानिक हिंदू बोडो प्रजातीचे साडे तीन लाख लोकं बेघर होतात पण कॉंग्रेस चुप्प बसली. भिवंडित जागेवरुन वाद होऊन २ पोलिस हवालदार काही माथेफिरु मुस्लिमांचा जमाव ठेचून मारतो आणि कोर्टाचा निर्णय असून सुद्धा सरकारने आजवर तिथे पोलिस स्टेशन उभारले नाही, बर्मा ह्या तिसर्‍याच देशा मध्ये बौद्ध विरुद्ध घुसखोर मुस्लिम अशी दंगल झाली त्याचे पडसाद उठावेत कुठे? तर मुंबईत? पोलिसांच्या गाड्या जाळतात, पोलिस जखमी होतात, महीला कॉन्टेबलचे विनयभंग होतात, दंगेखोर अमर जवान ज्योतीची लाथा घालून तोडफोड करत होते आणि सरकार ढिम्म!!! हे जनता बघत होती.

जनतेला हिंदूंचा तारणहार शोधावा लागला तो कॉंग्रेस व ह्या तथाकथित मानवतावादी पोपटांमुळेच. लगोलग न्यायालयांचा व चौकशी करणार्‍या समितीचा निर्णय आला मोदि गुजरातमध्ये २००२ मध्ये घडलेल्या प्रकारात निर्दोष आहेत आणि मग तर सहिष्णू असलेल्या हिंदू समाजाचा त्यांच्यावरती डोळे झाकुन विश्वास बसला व तो त्यांनी मतांच्या रुपाने मोदिंच्या झोळीत टाकला. तो विश्वास इतका मोठा होता की मुस्लिम वोट बॅंक शिवाय उत्तरप्रदेशातील व त्यामुळे देशातील सत्ता मिळत नाही ह्या समिकरणाला मोदि व शहांनी पार पुसून टाकले. त्यांनी उत्तर प्रदेशात आजवर न घडलेली गोष्ट घडवून आणली. मुस्लिम वोट बॅंकचा आधार न घेता सत्ता हस्तगत केली. त्यालाही आता ३ महीने झाले. दुसरीकडे मुस्लिमांतही मोदिंबाबत मत बदलु लागल्याचे आशादायी चित्र आहे. ह्या ठिकाणी मी आत्ताच एक गंमतीशीर गोष्ट सांगु इच्छितो - २०१९ मध्ये देखिल मुस्लिम वोट बॅंकशिवाय हा करीश्मा नरेंद्र मोदिंनी पुन्हा करुन दाखवला तर २०२४ पासून कॉंग्रेसची पाऊले हळुहळू "हिंदुत्ववादि" होण्याकडे पडू लागतील. मरण्याआधी "हिंदुत्ववादि" कॉंग्रेसला वोट देणे हे माझे स्वप्न आहे. लोकं हे वाचून माझ्यावरती हसतीलही पण हे कठिण असलं तरी अशक्य नाही. राजकारणाची वारांगना कुणाला काय करायला लावेल हे सांगता येत नाही.


 आता सर्वात महत्वाचा विषय मोदिंसमोरील आंतरराष्ट्रिय पातळीवरची आव्हाने कुठकुठली आहेत? आजूबाजूला नजर टाकल्यास जगभर काय सुरु आहे ते आपण बघू शकतोय. जागतिक मंदि, अरब स्प्रिंग, मग युरोपातील मंदी, इराक, इराण, इजिप्त मधले सत्ताबदल, सिरिया मधले मानवी हत्याकांड,  इराक - अफगाणिस्थान मधून टप्याटप्याने अमेरीकन सैन्य मागे घेण्याची केलेली ओबामांची घोषणा, युक्रेनच्या निमित्ताने रशियाची दंडेली, शपथविधीला मोदिंनी SAARC मधील देशांच्या प्रमुखांना बोलावणे,  BRICS परीषदेत घेतलेले आर्थिक निर्णय, काही दिवसांपूर्वी अमेरीकेचे संरक्षण सचिव चक् हॅगेल ह्यांनी दिल्लीमध्ये भारत - अमेरीक - जपान अशी फळी उभारण्याबाबत केलेले वक्तव्य, मोदिंचे भूतान व नेपाळ दौरे, पाकिस्तान मध्ये नवाज शरीफ विरुद्ध इम्रान खानने उठविलेलं रान -  हे सगळं तोडून बघितलं तर वेगवेगळे विषय आहेत मात्र हा कोलाज म्हणून एकत्र बघितलं तर डोकं गरगरायला लागतं.


मोदिंबरोबरच आपल्यासमोर भविष्यात काय मांडून ठेवलय हे जाणून घ्यावं लागेल त्यासाठी आपल्याला आपल्या आजूबाजूला काय घडलं? अथवा घडतय हे बघावं लागेल. अनेकदा आपल्याला न कळत आपण देशाचे नुकसान करत असतो. आपल्याला माहीतही नसतं की आपण आत्ता करतोय त्याचे परीणाम समाजावरती १० वर्षांनी नेमके काय होणार आहेत. ते आपल्याकडून कोणीतरी करुन घेत असतो. "मॅट्रिक्स" बघितलाय? तस्सच. खरोखर सामाजिक पातळीवरती तसं घडत असतं. त्याला SUBVERSION म्हणतात.  युरी बेझमेनोव्ह यांनी सबव्हर्जन बाबत फार सविस्तर सांगितले आहे. एखादा देश, त्याची संस्कृती, धर्म, आर्थिक व्यवहार, सामाजिक जाणीवा, राष्ट्रिय अस्मिता यांना सुरुंग लावून ती उध्वस्त करायची व तिथे आपल्याला हवं ते रुजवायच, उगवायचं, पोसायचं. बरं! तो देश आपले शत्रु राष्ट्रच असायला हवं असा काही नियम नाही! आंतरराष्ट्रिय राजकारणात कोणी कायमचा शत्रू अथवा मित्र नसतो. म्हणूनच आपल्या राष्ट्राचा नागडा स्वार्थ जिथे असेल त्या जगातील कुठल्याही कोपर्‍यात आपल्याला हवं त्या ठिकाणी कळ फिरवायला सुरुवात करायची. त्यात ४ पायर्‍या असतात -
1) Demoralization (१५ ते २० वर्ष)
2. Destabilization (साधारण ५-६ वर्ष)
3. Crisis (५-६ महीने)
4. Normalization

हा विषय इतका मोठा आहे की ह्यावरती एखादं पुस्तक होऊ शकेल. आपण सबव्हर्जनचा शक्य तितका धावता, ढोबळ व सुटसुटीत आढावा घेऊ. ज्यांना ह्या विषयाची उत्सुकता असेल त्यांनी मी दिलेली लिंक व युरी बेझमेनोव्ह ह्या नावाचा गुगल - युट्युबवरती सर्च करुन बघावा.

 1) Demoralization (१५ ते २० वर्ष) - Demoralization चा डिक्शनरी मधला अर्थ  destroying the moral basis for a doctrine or policy असा आहे. पहीली पायरी १५-२० वर्षांची असते. ती अश्याकरीता की बालवाडीत ..... सॉरी फारच "गावंढळ" वाटलं का? ..... तर KG - KG जे म्हणतात ते तिथे लहान मुल सोडलं की पुढल्या २० वर्षात मास्टर्स/डॉक्टर्स/इंजिनिअर्स वगैरे छाप घेऊन शिक्षणाच्या कारखान्यातून ते बाहेर पडतं. ह्याच दरम्यान त्याच्या मनात, डोक्या्त, भावनांमध्ये डोळ्यांसमोर जे घडतं कानांना जे ऐकू येतं ते जाऊन बसतं त्याला आकार यायला लागतो. वैचारीक द्वंद्व सुरु राहतं. ह्या संपूर्ण काळात समजा उदा. त्या व्यक्तीवर १५-२० वर्षात "कम्युनिझम हेच सर्वोत्तम!" हा एकच विचार सतत सतत सतत बिंबवत राहीलो तर ती व्यक्ती वयाच्या ऐन विशी-पंचवीशीतच कट्टर डाव्या विचारांनी भारुन जाईल. मात्र त्याच सोबत समाजातील इतर घटक हाताशी धरावे लागतील. त्यात धर्म, शिक्षण, सामाजिक राहणीमान, पॉवर स्ट्रक्चर, प्रसारमाध्यमे आणि संस्कृती ह्यांना दूषित करावं लागतं. ह्या १५-२० वर्षात "घडणार्‍या" पिढ्यांना "बंडखोर" करावं लागतं. त्या देशापेक्षा बाहेरील तत्वज्ञान (जे सबव्हर्जन घडवून आणणार्‍या देशातील असते) किती महान आहे हे हळूहळू रुजवावं लागतं. त्यांच्या पूर्वजांच्या लहान चूका देखिल कानकोंड होऊन जावं इतक्या मोठ्या करुन दाखवायच्या. धर्माच्या बाबतीत संभ्रम निर्माण करायचे. आपला धर्म काहीतरी चूकिच्या संकल्पना सांगतोय असं सतत नव्या पिढीला वाटत राहीलं पाहिजे. आणि असं वाटण्यासाठी खोट्या धार्मिक संघटना/ धर्मगुरु ऊभे करायचे. ते संभ्रमात असतानाच त्यांच्या समोर चूकीचे आदर्श व नेते ऊभे करायचे. उदा. राज कपूर यांचे चित्रपट बघा. एक कलाकार म्हणून ते निश्चितच फार मोठे होते मात्र जवळपास सगळ्या चित्रपटांचा आशय "लुळी-पांगळी श्रीमंती आणि धट्टिकट्टि गरीबी" असाच आहे. गरीब रहा, श्रीमंत झालात म्हणजे तुम्ही लबाड आहात असंच चिंत्र उभे करणारे सगळे चित्रपट. अथवा चित्रपटातूनच पोलिस, न्यायव्यवस्था कशी भ्रष्ट असते हे बिंबवत रहायचं मात्र त्याच बरोबर खलनायकी चरीत्राच्या व्यक्तींना "हीरो" बनवायचं, व्यवस्था आणि समाजाच कसा "गुन्हेगार" निर्माण करतो हे गरजेहुन खूप जास्त मोठं करुन दाखवायचं. ह्या मिडियाच्या मायाजाला शिवाय खरोखरची न्याय व्यवस्था, अधिकारी व्यवस्था, आरोग्य व्यवस्था, एकाच वेळी देशातील वेगवेगळ्या भागांतील स्थानिक राजकारणांतील वाद चिघळवणे, कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न तयार करणे हे वेगवेगळ्या पातळ्यांवरती एकाचवेळी करत रहाणे. ही पहीली पायरी. म्हणजे स्थानिक लोकांनाच एकत्र करुन पढवायचं, फितवायचं. लाचखोर बनवायचं. राजकारणात बाहेरुन पैसा ओतायचा व आपल्याला हवी ती माणसं निवडून आणायची. त्यांना निवडून देणार स्थानिक जनताच मात्र काम ते दुसर्‍या देशाचे करत असतात ..... त्यांच्याही नकळत.


2. Destabilization (साधारण ५-६ वर्ष)
- ह्यात त्या देशाच्या आर्थिक बाजूला शक्य तितकं अस्थिर करायचं. आधीच्या २० वर्षात परीस्थितीच अशी निर्माण करायची की सरकारला जनतेच्या छोट्यातल्या छोट्या बाबतीत हस्तक्षेप करावा लागेल. ह्याने जनतेतील असंतोषाला एकत्र आणायला मदत होते. कामगार व कंपनी मालकांत बेबनाव तयार करणे. लहान मोठे संप आंदोलने घडवून आणत रहाणे. कामचूकारपणा वाढवणे. कमी श्रमात अथवा मुल्यात प्रत्येक बाबतीत जास्त मोबदला मिळवण्याची मानसिकता (एका वर एक फ्री, अमुक गोष्टीत १०% जास्त वगैरे) तयार करणे.चंगळवादाला शक्य तितकं प्राधान्य देणे, कर्जांचे सढळ हस्ते वाटप करायच्या सोयी उपलब्ध करणे. अश्या बाबी ह्या पायरीत केल्या जातात. पण ह्या लहान लहान गोष्टिं बरोबर दोन जमातीं, भिन्न भाषिकांमधले तणाव वाढवणे, "असंतुलन" तयार करणे. सरकारी बाबूंना लाच खायला घालून आणि आपल्याला हवी ती माणसं सत्तेत आणून त्या राष्ट्राच्या परराष्ट्र व संरक्षण निर्णयांना पोखरणे ह्या यातल्या पायर्‍या आहेत. अफगाणिस्थानचा इतिहास बघितला तर केजीबी ने अफगाणिस्थानमध्ये खल्क व परचम अश्या दोन्ही एकमेकांच्या विरोधात असणार्‍या पक्षांना हाताशी धरुन हेच केलं होतं. ही पायरी पार पाडली की खरी कसोटी सुरु होते.

3. Crisis (५-६ महीने) - मुख्य संघर्ष. जो आपण खल्क X परचम मध्ये बघू शकतो, जो आपण अरब स्प्रिंग मध्ये बघू शकतो, जो सध्या इराकमध्ये सुरु आहे, जो २-३ वर्षांपूर्वी सुदानच्या फाळणीला कारणीभूत ठरला.अशी शेकडो उदाहरणे देता येतील ज्यात अमेरीका व रशियाने आगीत तेल ओतायचे काम केले. ह्यात देशभर प्रचंड तणाव निर्माण होतो आणि एक वेळ अशी येते जिथे "ठिणगी" पडते. देश २ अथवा त्याहून जास्त विभिन्न मानसिकतेत विभागला जातो. ह्यात सरकार विरुद्ध जनता, दोन धर्म, दोन पक्ष, लोकशाही विरुद्ध हुकूमशहा, हुकूमशहा विरुद्ध जनता असे अनेक संघर्ष असू शकतात. अश्यातही दोन्ही बाजूंना मदत करणे चालू ठेवायचे. आपल्या सर्वात जवळील उदाहरण म्हणजे २०११ मधले "जनलोकपाल" आंदोलन. मला इथे हे सर्वप्रथम प्रामाणिकपणे मान्य केले पाहीजे की त्या आंदोलनातून भ्रष्ट्राचाराविरुद्धचा लढा वगैरे ऊभा राहून पूर्ण व्यवस्थेतच प्रचंड क्रांती वगैरे होईल अश्या सुखस्वप्नात मी देखिल होतो. त्यावेळी हे काय चाललय त्याचा विचार करायला देखिल अवधी नव्हता इतक्या वेगाने ते घडत होतं. अथवा अकलेवरती पडदा आपसूक पडला होता की त्याबाबत विचारच करायची इच्छा नव्हती. पण ते फार भयानक व देशाला अराजकाच्या दिशेने फरपटत नेण्याचे काम होते हे आज समजते आहे. आपल्या सुदैवाने ते प्रकरण हाताबाहेर गेलं नाही. म्हणूनच "आप" हा डोक्याला "ताप" आहे. हा पक्ष आपल्या-आपणच जितक्या लवकर विरघळून नामशेष होईल तितकं चांगलं. तर अश्या ठिणग्या पाडणार्‍या संघर्षानंतर येते शेवटची पायरी - Normalization.


4. Normalization - इतका संघर्ष झाला राष्ट्राचे प्राण कंठाशी आले आणि अचानक शेवटची पायरी अशी "नॉर्मल" वगैरे? तर ह्याचाच अर्थ - "लोहा गर्म है। मार दो हतोडा।"  परकीय राष्ट्राचा हस्तक्षेप (उदा- रशियाचा अफगाणिस्थान मध्ये अथवा अमेरीकेचा इराक - लिबिया मध्ये), जनतेतील यादवी (उदा. - सुदान, अथवा  सध्याचे इराक मधले ISIS) अथवा शस्त्रधारी संघटना (जसा भारतात नक्षलवाद आहे) तयार करायच्या. त्यांना शस्त्र, प्रशिक्षण, पैसा यांचा पुरवठा करत रहायचा. हा संघर्ष इतका टीपेला न्यायचा की दोघेही आपापसांत लढून दुर्बळ होत राहीले पाहीजेत मात्र तरीही समोरच्याला धुळीत मिळवायची महत्वाकांक्षा मात्र तितकीच वाढून ती जवळपास पूर्ण होण्याच्या पातळीवरती आली की शेवटची पायरी - Normalization. ह्यात वेळ पडली तर एका गटाची बाजू कशी न्याय्य अथवा तिथल्या जनतेला मदतीची कशी गरज आहे हे जगाला बोंबलून सांगायचे व उघडपणे आपली सारी शस्त्रात्रे घेऊन त्यांच्या बाजूने उतरायचे व टप्याट्प्याने तो देश आपल्या कह्यात आणायचा. की झालं सगळं "नॉर्मल."


तसं बघायला गेलं तर भारत अनेक शतके ह्या ४ टप्यांतून आलटून पालटून जातो आहे. गेली अडिच हजार वर्षे भारताने केवळ आक्रमणच बघितले आहे. नर्मदेच्या वरच्या प्रदेशात खास करुन पंजाब, व गंगा - यमुनेच्या सुपिक व संप्पन्न खोर्‍यातील उत्तर- प्रदेश, दिल्ली, बिहार ह्यांनी हजारो मुंडक्यांच्या राशी देखिल बघितल्या आहेत. भूमीपुत्रांच्या रक्ताचे महापूर बघितले आहेत. हिंदू धर्मावरील शक, कुशाण, मुस्लिम, ख्रिश्चन धर्मांची सतत होणारी रक्तलांछित आक्रमणे सहन केली आहेत. पहीले ही आक्रमणे तलवारींनी होत, मग तराजूंनी झाली. आजच्या युगात हे आक्रमण बौद्धिक व आर्थिक आक्रमण आहे. ब्रेन ड्रेनची समस्या सोबतीला आहेच. म्हणूनच परवा लाल किल्यावरुन पहील्यांदाच पंतप्रधान म्हणून बोलताना मोदिंनी भारतीयांना बाहेर शिका मात्र इथे येऊन उत्पादन करा असे आवाहन केले त्याला फार मोठा अर्थ आहे. त्या आधी भारतरत्न श्री अब्दुल कलाम यांनी असेच भावनिक आवाहन केले होते.

सध्या मोदि सरकार जे करते आहे त्यावर UPA सरकारची सावली असणे फार सहाजिक आहे. सरकार बदलले की पटले नाहीत तरी एका रात्रीत गेल्या सरकारचे सगळे निर्णय विरुद्ध दिशेला नाही नेता येत. कारण आधीची १० वर्षे त्याचा खूप मोठा प्रवास झालेला आहे. त्यामुळे रेल्वेची भाव वाढ असो, जेटलींनी मांडलेले बजेट असो अथवा मोदिंनी काही नवीन केलेल्या घोषणा असोत त्यावरती विरोधक जेव्हा म्हणतात की ही तर आमचीच योजना होती तेव्हा त्या मागची कारणे समजून घ्यायला लागतात. त्यात अनेकदा राष्ट्रिय - आंतरराष्ट्रिय आर्थिक - राजकीय हितसंबध असतात. राष्ट्राचा वेळ - पैसा गुंतलेला असतो. एका रात्रीत ही दुकाने गुंडाळणे कधीच शक्य नसते. मोदि सध्या तरी दिल्लीची साफ सफाई करत आहेत. कॉंग्रेस कार्यकालातले दिल्लीमध्ये १० वर्ष चिकटलेले बहुतांशी सरकारी बाबू म्हणे त्यांनी दिल्लीच्या बाहेर रवाना केले आहेत व त्या जागी नवे अधिकारी बसवले आहेत. त्यांना त्यांच्या निर्णय प्रक्रियेत टांग अडवणारे कोणीच नकोय. भविष्याची तरतूद ते आत्ता करुन ठेवत आहेत. ह्या सगळ्या प्रक्रियेला अजून चार सहा महीने जातील. शहांच्या मार्फत ते पक्षांतर्गत फार मोठे बदल घडवून आणत आहेत. फार सावधपणे व चतुराईने मोदि एक एक आघाडी शांत करत आहेत. त्यामुळे रोज सकाळी उठून काय करत आहेत मोदि? हे विचारण्यात सध्या तरी हशील नाही. मी तरी वैयक्तिक पातळीवरती मोदिंना आधीचे प्रकार निस्तरुन त्यांचे धोरण राबवणे ह्यासाठी ३ वर्षांचा कालवधी दिला आहे.


हे झालं अंतर्गत आघाडीबाबत, आंतरराष्ट्रिय परीस्थिती काय आहे? सद्य स्थितीत अरेबिक देश अजूनही अरब स्प्रिंग मधून सावरले नाहीयेत. त्यांच्या आयुष्यातून "वसंत" केव्हाच निघुन गेलाय, उरल्यात नुसत्या "स्प्रिंग" ज्याने ते देश अस्थिरतेत जगत आहेत. बहुतांशी अरब देशांची परीस्थिती तेलही गेले तुपही गेले हाती राहीले धुपाटणे अशी झालीये. त्यातुनच जिहादिंना पोषक वातावरण तयार झाले आहे. अरब राष्ट्रांतला जिहाद हा pendulum wave इफेक्ट आहे. एका देशाला धक्का दिला की पुढचा आपोआप अस्थिर व्हायला लागतो. अरब स्प्रिंग हा "जिहाद" नसला तरी pendulum wave इफेक्ट होता. जिहादिंचे सध्याचे रणक्षेत्र आहे इराक व सिरीया. एकदा का इराक - सिरिया मध्ये ISIS आले की लिबिया, अफगाण व पाकिस्तान मधल्या तालिबानींना बळ मिळेल. अखेरीस ISIS हे अल-कायदाचेच प्रतिबिंब आहे. जिहादिंची दुसरी दृष्टि जाईल इजिप्तवरती तिथे मुस्लिम ब्रदरहुड ला हाड-हुड करुन हाकलवलंय पण मुस्लिम ब्रदरहुडचं नेटवर्क तगडं आहे. रंकाळा तळ्यातल्या अमरेवेलीप्रमाणे आहे, कितीही साफ करा, उपटून फेका तिथे रान माजणार. मुस्लिम ब्रदरहुडचे धागे भारतात - महाराष्ट्रात पर्यंत पोहोचले आहेत. इंडियन मुजाहीदिन वगैरे मुस्लिम ब्रदरहुडच्या शेंड्याकड्ची नवीन कोवळी पालवी आहे हे कायम लक्षात ठेवायला हवं. तसंही कल्याण मधले चार तरुण इराकमध्ये ISIS ला जाऊन सामिल झाल्याची बातमी आली होती. ही तर नुसती सुरुवात आहे. ISIS च्या अबु-बक्र-अल-बगदादी याने स्वत:ला खलिफा ठरवून जगभरातील मुस्लिमांना खिलाफत जिवंत करण्याची अनेक आवाहने गेल्या २ महीन्यात केली आहेत. मोरक्कोपासून म्यानामारपर्यंत पसरलेल्या मुस्लिमांना त्याने जिहादचे आवाहन केले 

आहे.  ह्यात गंम्मत म्हणजे ह्यांनीच ऐन रमजान महिन्यात इराक - सिरीया सीमे दरम्यान मृत्युचा नंगा नाच करताना शेकडो येझिदी, शिया व कुर्द लोकांचे शिरकाण केले आहे. इराक फुटण्याच्या मार्गाकडे चालु लागला आहे. तो फुटला तर किमान ४ छकले होतील. शिया - सुन्नी - कुर्द, तुर्कमान असे उपगट आहेत. परत कुर्द आणि अरबांत शिया - सुन्नी विभागणी वेगळी. म्हणजे शिया अरब - सुन्नी अरब, शिया कुर्द, सुन्नी कुर्द वगैरे वगैरे. बरं इराक फुटून प्रश्न सुटणार नाहीच. जिहाद वगैरेंच्या कातड्याखाली तेल विहिरींसाठी मारामारी आहे सगळी. आता अमेरीकेला इथल्या तेलाची काही पडली नाहीये आता. अमेरीका फारसं लक्ष घालणार नाही. कुत्ता जाने चमडा जाने! हा सगळा घाणेरडा खेळ सुरु व्हायला कुठेतरी अमेरीकाच जबाबदार आहे हे मात्र नक्की. इराकचे काय होईल ते येत्या २-३ वर्षात दिसेलच मात्र त्यामुळे तेलाच्या किंमती वर खाली होत रहाणार व त्याचा थेट फटका आपल्याला बसतच रहाणार. 

तरी पण क्षणभर समजा की अमेरीकेने मध्ये हस्तक्षेप करुन बगदाद वाचवले तरी ते काय चाटायचे आहे? बगदाद वाचवून इराक शांत ठेवायचे दिवस नाहीयेत. सद्दामच्या पाडावानंतरही अमेरीका ते करु शकली नव्हती आता तर संपूर्ण आनंदि आनंदच आहे. मग जिहादींचा मागणी तसा पुरवठा करणारे लिबिया - इराक - पाक असे ३ जण तयार आहेतच. मागोमाग अमेरीकेने सैन्य काढून घेतल्याने अफगाणिस्थानची भूमी जिहादिंसाठी मोकळी होतेच आहे. इतिहास साक्षी आहे जेव्हा जेव्हा अफगाणिस्थान पडला अथवा चूकिच्या हातात गेला त्याचा थेट फटका भारताला बसला. भले आता भारतीय भूमीतून पाकिस्तान नावाचे राष्ट्र तयार झाले आहे. पण भारत - अफगाणिस्थान संबध तेच राहीले आहेत. आणि म्हणूनच दिल्लीत कुठलेही सरकार येवो अफगाणिस्थानवरती पकड ठेवायचे हर तर्‍हेचे उपाय आपण करतो. पुरंदर - वज्रमाळसारखे आहे हे. पुरंदर वाचवायचा तर लढाई "वज्रमाळसाठी" करावी लागत असे अगदी तसेच.


हे सगळं फार गुंतागुंतीच आहे. धोक्याची सूचना एकच - मोरक्कोपासून सुरु होणारी मुस्लिम देशांची रांग पार इंडोनेशियापर्यंत पसरली आहे त्यात केवळ इस्त्राइल, भारत, नेपाळ व कंबोडिया या बिगर मुस्लिम देशांची पाचर आहे. न जाणो पुढल्या १-२ दशकांत कुणाला खिलाफतीचा उमाळा आलाच व भारतातील काही मुस्लिम संघटनांनी त्या खिलाफतीला पाठिंबा द्यायचे ठरवलेच तर त्यावेळी गांधींनी खिलाफतीला पाठिंबा द्यायचा जो आत्मघातकी निर्णय घेतला तसाच आत्मघातकी निर्णय आजच्या युगातला कोणी गरीबांचा गांधी घेणारच नाही असे नाही. उलट अश्या गोष्टी करायला इथले निधर्मी पोपट तयारच असतात. आझाद मैदानावरती जे काही झाले ते बघता मी मांडतो आहे तो मुद्दा फार गंभीर आहे हे लक्षात घ्या. कसलीच शाश्वती नाही. मला सगळ्याच मुस्लिमांना एकाच पारड्यात मुळीच टाकायचे नाहीत. पण हिंदुंचा विश्वास गेली अनेक शतके धक्के खाऊन डळमळीत झालाय हे वास्तव आहे.  इथे पानिपतावरती मरहट्यांबरोबर राष्ट्र वाचवायला इब्राहीमखान गारदी देखिल असतात हे मान्य करुन देखिल आधी नादिरशहाला व नंतर अब्दालीला जिहादि निमंत्रणांच्या अक्षता पाठवणारे अनेक शाह-वलीउल्लाह आणि नजिब आजूबाजूला दिसायला सुरुवात होते. आणि स्वत:चे मत नसलेले कुंपणावरचे सगळे "अवधचे नवाब" ऐनवेळी अब्दालीला जाऊन मिळतात व त्यानेच मराठ्यांचे पानिपत होते हा इतिहास आहे. हा इतिहास लक्षात घ्यावा इतकीच अपेक्षा.


आता राहीला मोदि पाकिस्तान - चीन विरुद्ध काय करणार? तर प्रत्येक समस्येचे उत्तर "युद्ध" नसते. शपथविधीलाच SAARCच्या प्रमुखांना बोलवून मोदिंनी पहील्याच चेंडूवरती सिक्सर मारला होता. "मी आलोय" हे तर त्यांनी जगजाहीर केलंच पण भारताला आजूबाजूच्यांशी सौदार्हपूर्ण संबध हवेत हे जाहीर केलं. लगोलग भूतान व नेपाळ हे चीनच्या कच्छपी जाऊ लागलेले देश कुरवाळायला सुरुवात केली. नेपाळ दौरा विशेष महत्वाचा होता असं मला वाटते. नेपाळ - भारत खुली सीमा असल्याने नेपाळमधून अनेक दहशतवादी, ISI ची पिलावळ घुसखोरी करत असते. आजवर अनेक खतरनाक अतिरेक्यांना भारत - नेपाळ सीमेवरती अटक झाली आहे हे लक्षात घ्यायला हवं. मोदिंनी एका नेपाळी मुलाला आसरा देऊन त्याला परत त्याच्या कुटुंबाशी भेट घडवून दिली, हे दिसायला लहान असलं तरी ह्याचे sub-conscious पातळीवरती वेगळे परीणाम साधता येतात, नेपाळींचे मन ह्या साध्या घटनेनी पण जिंकता येते. पशुपतीनाथ मंदीराला काही टन चंदन व काही आर्थिक मदतीच्या मोबदल्यात जर भारत नेपाळकडून त्यांनी वापरुन उतु जाणारी वीज बिहार - उत्तर प्रदेशात वळवणे, ISI च्या हालचालींना पायबंद, भारतातील माओवादी नक्षलवाद्यांना होणारी शस्त्रास्त्रांची आवक रोकणे, चीनच्या कह्यातुन नेपाळची सुटका ह्या गोष्टि साध्य करु पहात आहेत. नेपाळमध्ये माओवादी नेता "प्रचंड" एकदा अल्पकाळ का होईना पंतप्रधान बनला होता ही गोष्ट डोळे उघडून बघितली तर खूप काही समजू शकेल की नेपाळची पाऊले कुठे वळत आहेत. व ती आत्ताच ठिक करायची गरज आहे. अजून पाच वर्ष मोदिंनी हे पुढे रेटलं तर SAARCचं अघोषित नेतेपद आपोआप भारताकडे चालुन येईलच. पण भारता भोवती चीन जे असंतुष्ट देशांचे कडे उभारुन भारताला बांधू पाहत आहे त्याला तोडता येईल. येत्या २-३ वर्षात मोदिंनी श्रीलंका, बांगलादेश व अगदि पाकिस्तानचा दौरा केल्यास मला विशेष वाटणार नाही. अर्थात त्यासाठी पाकिस्तान शांत हवा. सध्या इम्रान खानने नवाज शरीफ यांच्या विरुद्ध जे रान पेटवले आहे त्याची परीणीती काल त्याच्या गाडीवरती गोळीबार होण्यापर्यंत पोहोचली आहे तो वाचला असला तरी त्याच्या आंदोलनाला आता अधिकच धार येणार. पाकिस्तानी लष्कर नेहमीच अश्या घटनांची फार आतुरतेने वाट बघत असते. वर्षभरात परत पाकिस्तानात लष्करशहा येणारच नाही ह्याची काही एक शाश्वती नाही. तसे झाल्यास भारत - पाक संबधांचे आयाम पुन्हा कुशी बदलतील.


हे सगळं लिहीण्याचा प्रपंच इतक्या करीताच की दर वेळी काय करत आहेत मोदि? हा प्रश्न उताविळपणे विचारला जाऊ नये. त्यांना थोडा वेळ द्यावा. हिंदू संघटन व बलवान करण्याची ही संधी काळाने फार मोठ्या अंतराने दिली आहे ती वाया जाता कामा नये. सबव्हर्जनचा धडा लक्षात घ्या. भारताला वाचवायला हिंदू धर्म बलशाली व्हायला हवा. इथे नोंद कराविशी वाटते की बलशाली म्हणजे खुनशी अथवा उन्मादित नव्हे. हे बल समर्थ रामदासांनी शिकवलेले, छत्रपती शिवरायांनी मिळवलेले आणि थोरल्या बाजीरावांनी वाढवलेले आणि शिंदे - होळकरांनी जपलेले बल आहे. इतिहास नीट वाचा मराठा साम्राज्याचा भाग असलेली भूमीच आज भारतात आहे बाकीचा "पाकिस्तान" झाला आहे. दुसरी गंमतीची गोष्ट ज्या ठिकाणी मराठा साम्राज्य बलशाली होती त्याच भागात मोदिंना भरघोस मतदान झाले आहे. कश्मीर, बंगाल, दक्षीण भारत ह्या ठिकाणी मराठा साम्राज्य नव्हतेच अथवा तुलनेने क्षीण होते ... मोदिंना ह्या ठिकाणी यश मिळाले नाहिये हे लक्षात घ्या. भले हा योगायोग असेलही पण इतिहासाचे एक चक्र पूर्ण झाले आहे. मोदि हा हिंदूंचा एक "CHANCE" आहेत. तो वाढवायचा की फुकट घालवायचा हे आपल्या विचारांवरती अवलंबून आहे.

 - सौरभ वैशंपायन

Sunday, November 18, 2012

साहेब




रुद्राक्षाची माळ धरलेला ’तो’ हात उगारलेल्या बोटासकट वर झाला की मुंबई सारखं आंतराष्ट्रिय शहर दोन दिवस बंद व्हायचं. साधारण ८-९ वर्षांचा असेन, तेव्हा त्या घटानेचाचा अर्थ समजण्या इतका मोठही नव्हतो, पण मला इतपत स्वच्छ आठवतय की बाबरी पतन झाल्यावरती त्याबाबत जेव्हा सगळे खुसरपुसर करत बोलायचे, किंवा सोयीस्कर मौन घ्यायचे, तेव्हा शिवाजी पार्कवरती फक्त एकच आवाज जाहीरपणे घुमला होता "होय! आम्हीच पाडली बाबरी!". त्यामागचे तत्कालिन राजकिय, सामाजिक, धार्मिक संदर्भ व निवडणूकांतले फायदे तोटे यांच्या निकषांसकट असे जाहिर बोलणे देखिल फार जड होते. पण हेच जाहिरपणे सांगणारा दुसरा कोणी हरीचा लाल निघाला नाही हे देखिल तितकेच खरे.

खोटं कशाला बोला? ’राजकारण’ म्हणजे काय ह्याची बर्‍यापैकि जाणीव होईपर्यंत मी बाळासाहेब ठाकरे यांचा "भक्त" होतो, लहानपणी "सामना" या नावाखालती असलेले "बाळ ठाकरे" हे नाव, त्या भोवतीचं वलय, लोकांना मंत्रमुग्ध करुन टाकणारी भाषणाची शैली हे सगळं माझ्याकरता अप्रुप होतं. पण मग वाढत्या वयानुसार शिंग फुटली शेकडो गोष्टि नव्याने पाहिल्या, वाचल्या, ऐकल्या, समजून घेतल्या तशी राजकिय जाणीवांची व गरजांची क्षितीजं थोडी रुंदावली. आपोआप मी "भक्त" कॅटेगरीतून ’चाहता’ कॅटेगरीत आलो. त्यांची एखादि गोष्ट नाही पटली तर नाहि पटली हे सकारण सांगायचो. पण कॅटेगरी बदलली तरी त्यांच्याबद्दलचा आदर मात्र तोच होता, मी मनापासून चाहता नक्कीच होतो. माणूस दिलखुलास होता. आपली ताकद काय व कशात आहे ह्याची जाणीव असलेला नेता होता. ताकद असल्याने आपसूक एक बेदरकारपणा येतो तो देखिल भरपूर होता. बोलायला लागले कि भाषणं अनेकदा सभ्यपणाची पातळी ओलांडायचं. (त्यातून वाजपेयी - अडवाणी ऐकणार्‍यांना ते बोलणं अब्रह्मण्यम होतं. कदाचित संयुक्त महाराष्ट्रानंतरच्या पिढ्यांना अत्रे फारसे किंवा अजिबातच ऐकायला मिळाले नाहीत म्हणून असेल, पण कधी कधी मला आश्चर्य वाटतं की महाराष्ट्र या भाषेनी दचकायला कधी पासून लागला?) पण अत्रे म्हणाले होते तसंच बाळासाहेबांनी "आयुष्यात सगळं केलं, फक्त ढोंग केलं नाही", (अर्थात राजकारणात याला अपवाद ठेवावा लागतोच.) जे काही आहे ते तोंडावरती. जे बोललो त्याची सगळी जबाबदारी घेऊन. "मला तसं बोलायचं नव्हतं" हे वाक्य नंतरची सारवासारव करावी लागते तेव्हा अनेकजण वापरतात, बाळासाहेबांवरती ही वेळ आल्याचं मला आठवत नाही.


एकच पक्ष, एकच नेता, एकच ठिकाण, एकच दिवस आणि थोडि थोडकी नव्हे तर तब्बल सलग साडेचार दशकं ... लाखो लोकं त्याच ओढीने लाखांच्या संख्येने जमत, जगात दुसरं उदाहरण असेल तर दाखवावं. तुम्ही अनेकांना थोडावेळ, कींवा थोड्यांना बराचवेळ मुर्ख बनवू शकता पण अनेकांना नेहमीच मुर्ख बनवू शकत नाही. त्या माणसात असं काहितरी नक्किच होतं की सामान्य माणूस रस्त्यावरती उतरायचा. त्या सामान्य माणसात पोट भरलेला पांढरपेशा उच्च मध्यम वर्गिय किंवा एकंदरच मध्यमवर्गिय किती हा प्रश्न अलाहिदा, तसा तर तो कुठल्याच पक्षाच्या पाठी नसतो. मुश्किलीने एखादि सभा गाजली तर ठीक होतं पण ४५-४६ वर्ष तुम्ही दारु प्यायला देऊन, पैसे वाटून लाखोंची गर्दि नाहि खेचू शकत हे कुणीही मान्य करेल. साहेबांवरती लोकांच अफाट प्रेम होतं. त्यांना हिंदुहृदयसम्राट वगैरे म्हंटलं की काही सो कॉल्ड उच्च शिक्षित आणि ओपन माइंडेड लोकं कुत्सित हसतात, पण ९३ च्या दंगलीत मुंबई २ दिवसात कुणी शांत केली? ६ दिवस मार खाणारा हिंदू नंतरच्या २ दिवसात कसा उसळला होता? शिवसेना भवनात झालेल्या मिटींग मध्ये "तुम्ही हातात बांगड्या भरल्यात का?" ह्या साहेबांच्या एकाच प्रश्नाचा तो परीणाम होता हे नाकारु शकत नाही हे देखिल तितकच खरं. आजही शिवसैनिक रस्त्यावरती तलवारी घेऊन उभे राहिले आणि आम्हांला सुरक्षित वाटलं, आमच्या घरची माणसं आता नीट घरी येतील याची खात्री पटली हे सांगणारी अनेक माणसं भेटतील. परवा १३ नोव्हेंबरला देखिल "बाळासाहेबांची प्रकृती चिंताजनक आहे" हे ऐकून वडापाव विकणार्‍यापासून ते बड्या धेंडांपर्यंत मातोश्रीवरती रीघ लागली. परत सांगतो दोघांची कारणं वेगळी असतीलही पण त्यामागे "ताकद" होती, मग ती प्रेमाची असेल कींवा राजकिय असेल.

अनेक जण विचारतीलही की काय केलं त्यांनी, की इतका पाठींबा देता? तर याचा अर्थ एकच त्यांना संयुक्त महाराष्ट्राच्या चळवीतले त्यांचे काम माहित नसावे, किंवा संयुक्त महाराष्ट्र स्थापन झाल्यावरती देखिल मराठी माणसाचे गुदमरलेपण ’मार्मिक’ च्या माध्यमातून कसं बाहेर आणलं. त्या मार्मिकच्या फटकार्‍यांनी अनेक जण विव्हळले होते हे त्यांच्या लक्षात नसेल. आज "मराठी" हा मुद्दा घेऊन आज दुसरे देखिल उभे राहिले आहेत पण अजूनही मराठी माणसाला मुंबईत कुणी हक्क दिला, त्याची अस्मिता कोणी जागृत केली? ह्या प्रश्नाचं उत्तर एकच "बाळ ठाकरे". दुसरी गोष्ट - प्रबोधनकारांचा वारसा असेलही पण सेनेत जात बघितली गेली नाही. बाकिच्या पक्षात विशिष्ट जातीचा मुख्यमंत्री बसावा व त्याबदल्यात दुसर्‍या जातीचा उपमुख्यमंत्री बसवून मांडवली करावी, असं शिवसेनेत कधी दिसलं नाही. मुळात शिवसेना - भाजपा सत्तेत आली ती बाळासाहेबांच्या झंझावाती प्रचारामुळे. ९० सालच्या मंडल आयोगाला विरोध करुनही ९५ साली ते निवडून आले ह्यावरुन काय ते समजावं. सत्तेत न रहाता रीमोट कंट्रोल आपल्या हातात ठेवणे फार कमी लोकांना जमते, त्याची सुरुवातही बाळासाहेबांनीच केली म्हणा ना. म्हणजे मुख्यमंत्रीपदापेक्षा शिवसेनाप्रमुखपद मोठं होतं (अर्थात ही चांगली गोष्ट नाही हे माझेही मत आहे पण ती घडून गेलेली गोष्ट आहे जे आज नाकारता येत नाही.), हे बाळासाहेबच करु जाणे. मग ह्याला कोणी हुकूमशाही म्हणेल, कुणी झुंडशाही म्हणेल, कोणी आंधळा अनुययही म्हणेल, कुणाला तो पक्ष फक्त गुंडांचाही वाटतो, पण संपूर्ण मुंबई बंद करुन दाखवायची ताकद शिवसेनेत तेव्हढी होती हे देखिल तितकेच खरे. बरं ज्यांना विरोध व्हायचा त्या विरोधकांना ठाकरी भाषेचे सपकारे बसून देखिल विरोधक कधी दात-ओठ खाऊ बाळासाहेबांवरती तुटून पडले नाहीत उलट राजकारणाबाहेर सगळ्यांशीच त्यांचे संबध चांगलेच राहिले. पवार आणि मी बीअर प्यायला बसतो हे भर सभेत सांगणारे बाळासाहेबच.

शिवसेनेची कार्यपद्धती सगळ्यांहुन वेगळी होती. लहान लहान शाखांतून त्यांनी पक्षाची केलेल्या बांधणीने पक्षाला तळागाळापर्यंत पोहोचवले. अनेक चेहरे नसलेल्या लोकांना त्यांनी नगरसेवक, आमदार, खासदार बनवले. कदाचित लोकांची नस त्यांनी ओळखली होती. घरात उदंड लेकरं असली की वेळ पडल्यास बाहेर घराची पडती बाजू सावरायला त्यात एखादं वांड पोरगं असावं म्हणतात. बाळासाहेबांची "शिवसेना" तशी होती. बाळासाहेबांची शिवसेना अश्या करता कारण साहेब स्वत: सगळं बघत होते तोवर आलबेल होतं. नंतर वयोमानाने किंवा इतर कारणांनी शिवसेनेच्या रोजच्या कामातून त्यांनी लक्ष कमी केलं त्यानंतर शिवसेनेतुन अनेक जण अनेक कारणांनी बाहेर पडले, कुठली कारणं कोण बाहेर पडलं ते इथे लिहित बसण्याचे प्रयोजन व वेळ नाही. खुद्द बाळासाहेबांना अखेर "या चिमण्यांनो परत फिरा रेऽ" म्हणावं लागलं होतं. पण बाहेर पडलेल्या लोकांतही भाषणांत साहेबांवरती पलटवार करण्याची धमक नव्हती. त्यामागे नवीन ’ठाकरी’ टोला येण्याची "भीती" तर होतीच पण बाळासाहेबांना उलट उत्तर देणं हे एकूण महाराष्ट्राच्याच कल्पनेबाहेरचं होतं. मात्र इथे एक कडवट गोष्ट मांडावी लागते आहे की सध्याच्या शिवसेनेचा ’दरारा’ संपलाय, कारण तो असता तर मुळातच CSTची दंगल करण्याची कुणाची छाती झालीच नसती. कींवा आपल्या शेवटच्या दसरा मेळाव्यातील भाषणात साहेबांनाही "म्हातारी उडता नयेची तिजला..." चालीवरती आर्जवे करत "उद्धव - आदित्यला सांभाळा" हे सांगण्याची वेळ आली नसती. आयुष्यभर केवळ आदेश देणार्‍या साहेबांचे, ते काहितरी मागणारं चित्र न बघवणारं होतं इतकं शेवटी मी नमुद करु इच्छितो.


आज तरी दूर दूरपर्यंत बाळासाहेब ठाकरेंच्या इतका भक्कम नेता दिसत नाही. २०१४च्या निवडणूकांचे निकाल काय असतील ते माहीत नाही पण २०१४ च्या निकालांवरती १७ नोव्हेंबर २०१२ चा ठसा असणार आहे हे नक्की.

उद्याच्या महाराष्ट्रात बाळ ठाकरे नाहीत ही एकंदरच अस्वस्थ करणारी बाब आहे. ती राजकिय पातळीवरची जितकी आहे तितकी वैयक्तिक पातळीवरची देखिल आहे. आणि ही माझीच नाही तर करोडो मराठी माणसांची भावना आहे. आजकाल कुत्र्यांच्या छत्र्यांप्रमाणे गल्लीबोळातून भाऊ, भाई, दादा वगैरे उगवत आहेत. अधून मधून एखाद्या नावामागे साहेब देखिल लावले जाते, पण कुठलही नाव न घेता केवळ "साहेब" म्हंटलं की एकच नाव डोळ्यापुढे यायचं आणि येईल.

बाळासाहेबांसारखा माणूस गेल्यावरती राहुन राहुन दासबोधातला मृत्युनिरुपणाचा समास आठवतो -
"मृत्य न म्हणे हा भूपती । मृत्य न म्हणे हा चक्रवती ।
मृत्य न म्हणे हा करामती । कैवाड जाणे ॥ ११॥
मृत्य न म्हणे हा हयपती । मृत्य न म्हणे गजपती ।
मृत्य न म्हणे नरपती । विख्यात राजा ॥ १२॥
मृत्य न म्हणे वरिष्ठ जनीं । मृत्य न म्हणे राजकारणी ।
मृत्य न म्हणे वेतनी । वेतनधर्ता ॥१३॥

कारण आज हे पुन्हा लोकांना सांगावं लागतय असा माणूस गेलाय!

 - सौरभ वैशंपायन.

Tuesday, August 14, 2012

जिन्हे नाज़ है हिंद पर ....





११ ऑगस्ट २०१२ च्या दिवशी मुंबई, आझाद मैदानात जे काही झाले ते बघून कुणाही सामान्य पण विचारी माणसाचा संताप झाल्या शिवाय रहाणार नाही. आसाममध्ये, आजवरच्या केंद्र आणि तिथल्या राज्य सरकारच्या निष्क्रियतेमुळे आणि मतांसाठी मुद्दामहुन दुर्लक्ष केल्याने बांग्लादेशी घुसखोरांचा प्रश्न निर्माण झाला आहे. अश्या प्रश्नांनी स्थानिकांत जो सहाजिक असंतोष धुमसायला सुरुवात होते त्या कारणाने त्याचा भडका गेल्या महिन्यात उडाला ७३ लोकं मरुन, ३ लाख ’स्थानिक’ लोक बेघर होऊन जरा वातावरण कुठे नुकतेच निवळायला लागले आहे.  दुसरीकडे जून महिन्यापासून शांतीदूत बौध्दाची लेकरे रहात असलेल्या म्यानमारमध्येही घुसखोर मुस्लिमांची ससेहोलपट होऊ लागली. म्यानमार सरकारने त्यांना नागरीक म्हणून मान्यता द्यायला ठामपणे नकार दिल्याने त्यात अजून संघर्षाची भर पडली आहे. ह्या दोन घटनांच्या पार्श्वभूमीवरती मुंबईत त्याचा निषेध करायला रझा अकादमीने ’इस्लाम खतरें में’ ची बांग दिली. आणि एक पूर्व नियोजित दंगल घडवली गेली. गंमत म्हणजे यात मोठ्या संखेने जखमी होणारे पोलिसच होते. आजवर कुठल्याही घटनेत पोलिसांचे असे "खेळणे" बनवले नव्हते. मुंबईत घडलेल्या घटनेचे ठळक मुद्दे बघितले तर पुढील गोष्टी दिसतात -
 १) या दंग्यात चक्क पोलिसांनाच मारहाण झाली. "४६" पोलिसांसह ५४ जण जखमी. जखमींत ४ महिला कॉन्स्टेबल्सचा समावेश.
२) पोलिसांच्या गाड्या फोडल्या - उलथवल्या, दंग्यांसाठी खास बनवलेली १  "वज्र" गाडी पेटवली. ३ न्यूज चॅनल्सच्या गाड्या जाळल्या. ३३ बेस्ट बसेस फोडल्या.
३) पोलिसांची ३ शस्त्रे (सर्व्हिस रीव्हॉल्वर्स की रायफल्स ते नीट माहित नाही) व काही काडतुसे लंपास झाल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. पैकी काही काडतूसे "मुंब्र्यात" मिळाल्याची बातमी ’पुढारी’ मध्ये वाचायला मिळाली.
४) महिला पोलिस कॉन्स्टेबलचाच विनयभंग केल्याची तक्रार ’अज्ञात’ दंगेखोरांविरुध्द दाखल केलीये.
५) दंगेखोर "अमर जवान" स्मृतीस्तंभाची नासधूस करतानाची स्पष्ट छायाचित्रे यत्र - तत्र - सर्वत्र दिसत आहेत.


सगळं वाचून काही सरळ साधे प्रश्न पडतात -
१) "रझा अकादमीचा" एकंदर ’इतिहास’ बघता भर रमजान मध्ये, आधीच येणार्‍या गणेशोत्सवाचा आणि स्वातंत्र्यदिनाच्या सुरक्षा व्यवस्थेचा ताण पोलिसांवरती असताना स्वातंत्र्यदिनाच्या ३ दिवस आधी अशी सभा घेण्याची परवानगी का देण्यात आली?
 २) बरेली येथील मौलाना अब्दुल कादिर यांचे प्रक्षोभक भाषण सुरू झाले तेव्हा दक्षिण मुंबई प्रादेशिक विभागाचे अतिरिक्त आयुक्त कृष्णप्रकाश व्यासपीठावर होते. मौलानांच्या प्रक्षोभक भाषणानंतरच हिंसाचाराला सुरुवात झाली, असेही चौकशीत स्पष्ट झाले असले तरी या मौलवीवर पोलिसांनी अद्याप कुठलीही कारवाई का केलेली नाही?
३)  दंगलखोरांकडे दगद, हातोडे, रॉकेल, पेट्रोल कोठून आले?
४) दंगलखोरांना पकडून आणणाऱ्या पोलिसांनाही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून का दम दिला जात होता, हे अनाकलनीय असल्याचे या वेळी हजर असलेल्या एका पोलिसाने चौकशीत सांगितले. एका उपायुक्ताने दंगलखोराला रंगेहाथ पकडले तरी त्याला सोडून देण्यास सांगण्यात आले. विशेष म्हणजे अशा वेळी दंगलखोरांवर पाण्याचा माराही करण्यात आलेला नाही, असेही दिसून येत असल्याचे एका पोलिसाने सांगितले. पोलिसांवर कोणाचा दबाव होता, हे कळू शकलेले नाही. मात्र याची चौकशी गुन्हे अन्वेषण विभागाकडून अजूनही का करण्यात आलेली नाही?
५) मावळ मध्ये पाण्यासाठी - चार्‍यासाठी आंदोलन करणार्‍या निशस्त्र शेतकर्‍यांवरती गोळिबार करुन ३ बळी घेणारे, किंवा अंबडमध्ये वारकर्‍यांना शांत करायला गोळिबार करुन २ वारकर्‍यांचा बळि घेणारे पोलिस दल काय करत होते?
६) शिवसेना - मनसे सारख्या राजकिय किंवा इतर कुठल्याही सामाजिक संस्थांकडून वगैरें बंदचे नुकसान भरुन मागणार्‍या न्यायालय - सरकार कालच्या नुकसानाबाबत 'रझा अकादमी' वरती काय कारवाई करणार???

 हे अतिशय प्राथमिक पातळीवरचे प्रश्न आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवरती खरा प्रश्न एकच - "आपण परत फाळणीकडे वाटचाल करत आहोत का?" खरंतर अश्या नाजूक प्रश्नांकडे धार्मिक चष्म्यातून पहाणे योग्य नाही. पण जगभर जे चालू आहे ते बघता व देशात त्याच्या उमटणार्‍या प्रतिक्रिया बघता आपसूक धार्मिक भिंती उभ्या रहातात. विशेषत: राष्ट्रापेक्षा धर्माला कुणी महत्व देतं तेव्हा. आणि त्याही पुढे मतांसाठी त्यांचीच तळी उचलणार्‍यांचे वागणे बघून नाईलाजाने मलाही माझ्या धर्मावरती अडून रहाणे भाग आहे असे वाटायला लागते. डेन्मार्कमध्ये पैगंबरांचे व्यंगचित्र काढले - पेटव मुंबई, म्यानमारमध्ये मुस्लिमांची ससेहोलपट केली जाळा मुंबई, घुसखोर बांग्लादेशींना धोपटले तर मारा पुण्यातील आसामी आणि मणीपुरी विद्यार्थ्यांना - करा मुंबईत दंगे. काय चाललय? याची टोटलच लागत नाही कधी कधी.

ह्या दंगेखोरांवरती अखेर स्वसंरक्षणार्थ नाईलाजाने पोलिसांनी गोळीबार केला त्यात २ दंगेखोर ठार झाले, त्याचे फोटो फेसबुकवरती "शहिद" म्हणून टाकून काही मुस्लिम तरूण अजून माथी भडकवत आहेत. मी ती लिंक मुद्दाम शेअर केली आहे, अनेकांनी स्वत: त्याखालचे संभाषण वाचले तर सुन्न व्हायला होईल. विचार केला की डोकं भणभणतं. हे किती भयानक आहे? कळत नाही, हे तरूण मुद्दाम करतात कि ते खरेच भरकटले आहेत? आणि काही बोलण्याच्या पलीकडचे आहेत हे संभाषणावरुन समजतं.

 विशेष कौतुक करायचे असेल तर कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, मानवाधिकार, कम्युनिस्ट वगैरे पिलावळीचे करावे लागेल. या घटनेबाबत एक चकार शब्द नाही गेल्या ३-४ दिवसात. आसाममध्ये बांग्लादेशी घुसखोरांमुळे ३ लाख स्थानिक लोकं बेघर झाले, कत्तली - बलात्कार करुन हाकलले गेलेले कश्मीरी पंडित गेली ४ दशके परत काश्मीरमध्ये जाण्याची वाट बघत आहेत या प्रश्नांवरती हे मुग गिळून गप्प. काही विचारलं कि "शांतता पाळा", "अफवांवरती विश्वास ठेवू नका", "कठोर कारवाई करु" इतकिच पोपटपंची. क्रिया शून्य. पण तेच फक्त ’गोध्रा’ म्हणा .... यांव रे यांव... काय कळ उठते बघा. राष्ट्रीय विनोदवीर दिग्विजयसिंह, शबाना आझमी, जावेद अख्तर, तिस्ताबाई, जितेंद्र आव्हाड वगैरे कुठे गायब झालेत ह्या घटनेनंतर ते कळतच नाहीये. आश्चर्य म्हणजे दंगेखोरांनी मिडियाला यथेच्छ थोबडवून सुध्दा मिडीया त्याच रात्री थंड झालाय. नंतर केवळ ठळक बातम्यांत १ सेक्शन नाईलाज म्हणून दिला जातोय. मला आठवतंय राज ठाकरेंचं आंदोलन झालं तर २ दिवस वीट येईपर्यंत तेच तेच दाखवलं होतं. अण्णांच्या आंदोलनामुळे तर सगळी चॅनेल "अण्णा चॅनेल" बनली होती. अरे हो आठवलं - सध्या रामदेव बाबांनी उपोषण सुरु केलय. लोकांचाही भरघोस पाठींबा मिळत आहे. म्हणून त्यांच्या अटकेसाठी बर्‍याच बसेस सरकारला मिळाल्या आहेत, एका स्टेडियमचे अस्थायी कारावासात रुपांतर केले आहे, हजारोंची सुरक्षादले दिल्लीच्या चौका चौकात उभी केली आहेत. भाजपाने पाठींबा दिल्यावरती प्रत्येक न्यूज चॅनल एकच बातमी दाखवत आहेत - "रामदेवके मंच पे भगवा रंग." इतकं बरोब्बर जमवणार्‍या सरकार व मिडियाचं मला राहुन राहुन कौतुक वाटतं. आणि त्याहुनही "विस्मरणशक्ती" दांडगी असलेल्या जनतेचही.

देश शांत रहावा. धार्मिक - जातिय दंगली होऊ नयेत हे प्रत्येकाला वाटतं. इथे काही नागडि सत्य मांडणे गरजेचे आहे, काही प्रॅक्टिकल प्रश्न अतिशय शांत डोक्याने स्वत:ला व इतरांना विचारणे गरजेचे आहे. सर्वप्रथम "अखंड हिंदुस्थानची" स्वप्ने पहाणार्‍यांना एक सांगू इच्छितो स्वप्न कितीही हवेहवेसे, भव्य व सुखावणारे असले तरी शक्य नाहिये. निदान पुढची २ - ३ शतके नक्कीच नाही. त्यामागची राजकिय, आंतरराष्ट्रिय,  सामाजिक, धार्मिक, भौगोलिक, भावनिक, आर्थिक, ऐतिहासिक, वर्तमान कारणे व भविष्यातील याच पातळ्यांवरील सर्व शक्यता लक्षात घेतल्याच पाहिजेत. मला तेजोभंग आणि त्याहुनहि या स्वप्न रंजनात असलेल्यांचा रसभंग वगैरे करण्यात स्वारस्य नाही. मी द्रष्टा देखिल नाही. पण मुळात हे नजिकच्या काळात घडणे अजिबात शक्य नाहीये हे समजायला द्रष्टा असण्याही गरज मला वाटत नाही. नपेक्षा गरमी दाखवलीच तर वरील सर्व कारणे व शक्यता बघता राष्ट्राच्या नशिबी अजून संकटेच लिहीली जातील. मग यावरती उपाय काय? सर्वप्रथम सेक्युलरिझमच्या नावाखाली फालतू लाड करणारे सरकार जनक्षोभ निर्माण करुन हटवणे, ते फालतू लाड कुठल्याही दबावाला बळी न पडता हळू हळू बंद करणे,  मुस्लिम मुलांत मदरश्यांपेक्षा शालेय शिक्षणाचा प्रसार कसा करता येईल याचा बंदोबस्त करणे. आणि महत्वाचं म्हणजे सावरकरांच्या "हींदूंचे सैनिकीकरण, सैन्याचे हींदूकरण!" या नीतीचा अवलंब करणे. भोसला मिलिटरी शांळांप्रमाणे राज्या राज्यातून अजून अनेक शाळा उघडणे. ही महत्वाची पाऊले ठरु शकतात.

जे काही आजूबाजूला घडतय ते फार चिंताजनक आहे, परदेशांतील, परप्रांतातील प्रश्न मुंबईत दंगे करुन सुटणार नाहीयेत हे समजण्याची कींवा समजून घेण्याची इच्छाच समाजात नाहीये. त्याशिवाय आजूबाजूला होणारे बॉम्बस्फोट, भारतभर व मुख्यत्वे बिहार, आसाम, मुंबई, भागातला बांग्लादेशी घुसखोरांचा प्रश्न हा राष्ट्रिय सुरक्षेचा प्रश्न आहे. मुस्लिमांना हे समजावलं पाहीजे कि याकडे धार्मिक प्रश्न म्हणून बघता येणार नाही. तर सरळ सरळ "राष्ट्रीय" प्रश्न म्हणूनच बघावे लागेल. त्यातूनही कुणाला हा धार्मिक प्रश्न वाटतच असेल तर मग त्यांनी सध्या सिरीयात आपल्याच "मुस्लिम" जनतेची "मुस्लिम" पंतप्रधान करत असलेली कत्तल कुठल्या निकषांवर तपासणार? इराक -इराण मध्ये जो विस्तवही जात नाही त्याचे काय? आपल्याच निरपराध "मुस्लिम" जनतेवरती रासायनिक अस्त्रे वापरणारे सद्दाम फासावर लटकले हे उत्तमच नाही का?  सद्दाम - खोमेनी यांपैकी नेमके बरोबर होते? आणि त्यांच्यातील सच्चे व पाक मुसलमान कोण? पाकिस्तानात भारतातून गेलेल्यांना ’मुजाहीर’ का समजतात यांचीही उत्तरे द्यावीत. आणि यांचीही उत्तरे नसतील तर निदान एका प्रश्नाचे उत्तर नक्की द्यावे - "जिन्हे नाज़ है हिंद पर वो कहॉं है?"

Saturday, January 14, 2012

"गुरुदक्षिणा"

कौरव पांडव संगर तांडव द्वापर काली होय अति,
तसे मराठे गिलिचे साचे कलित लढ़ले पनिपति॥


- १४ जानेवारी १७६१, राष्ट्रावरचं संकट मराठ्यांनी आपल्या छातीवर झेललं. मराठे गिलच्यांविरुध्द एकाकि झुंझले. अभिमन्यूप्रमाणे झुंझत झुंजत देह ठेवला. उभ्या भारतातून एक हरीचा लाल मराठयांबरोबर पाय रोवून पानिपतात उभा राहिला नाही. मराठ्यांनी पाय गाडून युध्द केलं. रक्त मांसाचा चिखल झाला. मराठ्यांचा भावी पेशवा मारला गेला. पुण्यातल्या प्रत्येक घरातला एक जण तरी पानिपतावर कापला गेला. "दो मोती गलत, दस-बीस अश्राफात,
रुपयों
की गिनती नही|"
पण माझ्या दृष्टीने पानिपतावरती झालेला पराभव हा खरा पराभव नाही. कारण १८व्या शतकाच्या शेवटि तब्बल १४ वर्ष लाल किल्यावरती "भगवा" फडकत होता हा इतिहास आहे. मराठ्यांनी दिल्लीची वजीरीच नव्हे जर सगळी दिल्लीच पुन्हा मांडिखाली दाबली हा खरा इतिहास आहे. महादजी शिंद्यांनी एकेका रजपुताला सुटा करुन करुन पिदवला हा खरा इतिहास आहे,  "गढ मै गढ चित्तोड गड बाकि सब गढियॉ।" म्हणून लैकिक मिळवलेला किल्ला जवळपास वर्षभर लढल्यावर आणि डोळे पांढरे व्हावेत इतका तिखट प्रतिकार झाल्यावर ’महान’ सम्राट अकबराला मिळाला होता ..... मराठ्यांनी बोल - बोल म्हणता तो १८ दिवसांत जिंकला होता हा खरा इतिहास आहे. नजिबाचा नातू "गुलाम कादिर" याने "अली गोहर" बादशहाला आंधळे केल्याबद्दल व बादशाहाच्या कुलातील स्त्रीयांना भर दरबारात नग्न केल्याची शिक्षा म्हणून मराठ्यांनी त्याला टाचेकडून मानेकडे जिवंत सोलून ठार मारला होता व नंतर दिल्लीच्या लाहोरी दरवाज्याजवळ ३ दिवस टांगून ठेवला होता हा खरा इतिहास आहे. पानिपताला जबाबदार असलेल्या नजीबाची कबर मराठ्यांनी सुरुंग लावून उडवून दिली हा खरा इतिहास आहे..
म्हणूनच म्हणतोय खरा पराभव पानिपतावर नव्हे तर इतिहासाकडे बघण्याच्या दृष्टीकोनात झालाय, पुस्तकांच्या पानांवरती झालाय. दुसर्‍या महायुध्दातील दोस्तांच्या डंकर्कच्या पळपुटेपणाला कौतुकाने माना डोलावून "यशस्वी माघार" म्हणणारे मात्र पानिपतावर देह ठेवून राष्ट्र वाचवणारे पराभूत झाले असं म्हणतात तेव्हा त्यांची किव येते.
आज अडिचशे वर्षानी त्याच्याकडे बघताना केवळ "पराभव" म्हणून न बघता "गुरुदक्षिणा" म्हणून बघा. मराठ्यांनी शिवछत्रपतींना दिलेली "गुरुदक्षिणा". राष्ट्रावरचं संकट आपल्या छातीवर घ्यायची संथा त्या महामानवाने मराठ्यांना दिली होती. त्या संथेची गुरुदक्षिणा म्हणजे "पानिपत".
 - सौरभ वैशंपायन.