Sunday, August 12, 2007

पन्हाळगड-पावनखिंड-विशाळगड पदभ्रमण मोहीम २००७!

भरारी संस्था (मुंबई) दरवर्षी "नरवीर बाजीप्रभु देशपांडे" पुण्यतीथी पावनखिंडीत साजरी करतात. अर्थात ती तिथी वरुन साजरी करत असल्याने तारीख नक्की नसते. तारखे नुसार १२ जुलैला ही पुण्यतीथि येते तर तीथिनुसार "व्यास पौर्णिमा" हीच बाजीप्रभु पुण्यतीथि म्हणता येईल. मुंबई वरुन २६ जुलै २००७ ला निघालो करवीर नगरी म्हणजे कोल्हापुरला-पन्हाळ्याच्या दिशेने. साधारण ४० जण होतो. सगळे नवीन ओळखी करुन घेत गप्पा मारत होते. मुंबई-पुणे महामार्गावर रात्रीच प्रवास माझ्यासाठी नेहमीच मजेचा असतो विशेषत: रात्री घाटतुन ’खोपोली’ गाव बघणे डोळ्यांसाठी सुखद अनुभव असतो. रात्र वाढली तशी हळु हळु निद्रादेवी सगळ्यांच्या डोळ्यावर जाउन बसली. जाग आली ते थेट कोल्हापुरला. ढगांनी अंधुक झालेली वाट मागे टाकत आणि धुक्याने चिंब झालेली झाडे भराभर मागे टाकत गाडी वळणांवर वळणे मागे टाकत धावत होती. पन्हाळ्यावर थंडगार धुक्याने आणि गवतावर पसरलेल्या ओल्या दवाने आमचे "स्वागत" केले. सगळ्या झाडांची पाने एकमेकांना दवाच्या थेंबांचे झेल देत होती.
गडावरच "राजाची झोपडी" नावाच्या हॊल मध्ये आमची सोय केली होती. आवराआवर करुन झकास गरमागरम चहा घेउन आम्ही गड बघायला निघालो. पन्हाळा प्रचंड आहे जवळपास गावच आहे वरती, गडावर पोलीस स्टेशन,कोर्ट,शाळा अश्या प्राथमिक सोयी झाल्या आहेत. शिवाय बरीच हॊटेल्स आहेत.वर पक्षी अभयारण्य देखील आहे. यावरुन गडाचा पसारा कीती मोठठा आहे तुमच्या लक्षात येईल.


तीन दरवाजा, पुचाटी(पिछाडी)बुरुज,,पाण्याची ३ मजली टाकी,,वाघ दरवाजा, सज्जाकोठी असं बरच बघुन आणि ’बशीरभाईं’ कडुन त्याचा इतिहास समजावुन घेत होतो. पन्हाळ्याला १२०० वर्षांचा इतिहास आहे. खरंतर पराशर ऋषीं पासुन पन्हाळ्याला इतिहास आहे. पराशर ऋषींची खडकात खोदलेली गुहा आजही तेथे आहे. पन्नगालय हे त्याचे मुळ नाव. पुर्वी तेथे ’नाग’ लोकांची वस्ती होती. मात्र गड म्हणुन शिलाहार राजांच्या काळात "राजधानी" म्हणुन पन्हाळ्याला मन्यता मिळाली. अशी कथा आहे की पन्हाळ्याचे बांधकाम करताना बुरुजाचे काम करताना तो सारखा ढासळत होता. ज्योतिष्याने ’नरबळी’ द्या असे सांगितले, मात्र नरबळी हा गरोदर स्त्रीचा असावा ही अट घातली. त्यावेळी गंगु तेल्याची गरोदर बायको तयार झाली. तिला भिंतीत चिणल्यावर बुरुज पुर्ण बांधुन झाला. म्हणुनच ’कहां राजा भोज कहां गंगु तेली” अशी म्हण आली असावी.

पन्हाळ्याचे बुरुज खुप मजबुत आहेत.काही ठीकाणी तर ते ८ ते १२ फुट रुंद आहे. पुचाटीच बुरुज हे किल्ल्याचे फार महत्वाचे अंग इथे बर्याच घटना घडल्या त्यातलीच एक घटना म्हणजे भुपाळगडचे कील्लेदार फ़िरंगोजी नरसाळ हे भुपाळगड, मुघलांना मिळालेल्या ’शंभुराजांना’ आणि दिलेरखाना्ला सोपवुन आले तेव्हा जी ३०० माणसांच्या हातापायाची तोडा-तोडी झाली त्याचे जबाबदार म्हणुन फ़िरंगोजी नरसाळ यांना महाराजांनी - "युवराज असतील तरी काय जाहले भांडे(तोफ) का नाही वाजवले?" असा परखड सवाल करुन त्यांना तोफेच्या तोंडी दीले.फ़िरंगोजी नरसाळ्याच्या देहाचे तुकडे पुचाटी खालच्या दरीत पसरले.या शिवाय कोणाचा हात-पाय कलम करायचा असेल तर त्याला इथेच आणत असत. जवळच उकळते तेल असे त्याला शिक्षा दीली कि त्याचा तोडलेल्या अवयवाला उकळत्या तेलात बुडवत म्हणजे तो भाग तेलामुळे ’सील’ होई, माणुस वेदनांनी बेशुध्द होई मात्र रक्तस्रावाने मरत नसे. म्हणतात की बर्याचदा ढोलाच्या आवाजात हे सगळ चाले म्हणजे त्याची विदारक कींकाळी कोणाला ऎकु जात नसे.

३ मजली टाकी किंवा विहीर ही गडावरील पाण्याच्या संचयाचे मुख्य ठीकाण. या ठीकाणी पहारे असत. पाण्यात विष कोणी कालवुन दगा देउ नये म्हणुन ही काळजी घेत असत. थोरल्या छत्रपतींच्या एका आज्ञापत्रात त्यांनी लिहीले आहे -"वर्षभर पुरुन उरेल इतका पाण्याचा साठा प्रत्येक गडावर असावा. "ओहोळांवर विसंबुन न राहता प्रत्येक गडावर टाकी खोदुन घ्या. भांड्याच्या आवाजे ओहोळाचे पाणी आटते,असे न होवो म्हणौन पाण्याची मुबलक व्यवस्था लावुन द्यावी."




वाघ दरवाजा हा रायगडला देखिल ब्राह्मण तलावाला डाव्या हाताला टाकुन थोडं खाली उतरलं की दिसतो मात्र तो दरवाजा ६०० फुट उंची्वर आहे. तो चढुन जाईल तो वाघाच्या काळजाचा म्हणुन तो "वाघ दरवाजा". राजधानीच्या गडाला कीमान २ दारे असावित हा शिवछत्रपतींचा विचार अपल्याला रायगडी दिसतो. मात्र इथला वाघ दरवाजा फ़ार वेगळा विचार करुन बांधला आहे हे शिलाहारकालीन बांधकाम आहे. हा दरवाजा बांधल्या नंतर त्याचे अर्धे द्वार हे दगडाच्या भरावाने बांधुन काढलं आहे. थोडक्यात २ फळ्यांच्या दरवाज्यापैकी फक्त जर एक फळी लावुन घेतली तर कसं दीसेल? तसाच काहीस हा दरवाजा आहे. आता त्याने काय होईल? तर पायर्यांची लांबी पुर्ण असल्याने एकाचवेळी बरेच जण तिथे जमतील मात्र दरावाज्यातुन एका वेळी फार-फार तर २ माणसे जाऊ शकतील. दरवाज्याजवळ जी गर्दी होईल तिच्यावर वरुन मारा करायचा. थोडक्यात हा सापळा आहे.


सज्जाकोठी हा गडाचा सर्वोच्चभाग इथे उभ राहीलं की गडाच्या पायथ्याची गावे फार छान दीसतात त्याच बरोबर जर शांतता असेल तर गावातील माणसांचे बोलणे आपल्याला सहज ऎकु येते. सज्जकोठीच्या गच्चीवर उभे राहीले की गडाच्या परीसरातील अर्धाधिक भाग नजरे खालुन घालता येतो. मुघलांचे खरे रुप पाहुन पश्च्चातदग्ध संभाजी राजे जेव्हा महाराजांकडे परत आले आणि "दुधभात खाउन स्वामींच्या चरणाचे स्मरण करुन राहिन" असे मान्य करुन संभाजी राजे वास्तव्यासाठी याच सज्जाकोठित होते. दीर्घकालीन आजारपणाने रायगडी महाराजांचे निधन झाले तेव्हा देखिल शंभूराजे इथेच होते.त्यांना जेव्हा महाराजांच्या निधना बाबत कळले तेव्हा पुढे महाराजांचे दिवस त्यांनी पन्हाळ्यावरच केले. आणि मग त्यांना अटक करायला अलेल्या दरबारी लोकांना त्यानी जेरबंद केले ते इथेच.शंभूराजांच्या आयुष्यतील नंतरच्या बर्याच घटना पन्हाळा आणि कोल्हापुर परीसरात घडल्या.

हे सगळ समजावुन घेउन आम्ही परत मुक्कामावर आलो. दुपारचं जेवण आणि थोडा आराम करुन परत उरलेला कील्ला बघायला निघालो. मग आम्ही धान्याची कोठारे बघायला निघालो.वातावरण तसे कुंदच होते.


गडावर गंगा-यमुना-सरस्वती अशी ३ कोठारे आहेत. पावसाळा सुरु होण्यापुर्वी आजुबाजुच्या गावातील शेतसारा आणि कराच्या स्वरुपातील धान्य या कोठारांतुन साठवले जाई. मग वर्षभर ते वापरले जाई. "FIFO" system नुसार हे धान्य बाहेर काढले जाई. म्हणजे ते खराब होत नसे. असं म्हणतात की त्या कोठारांना लागलेली ’कीड’ म्हणजे ’शिपाई’ कारण त्या काळच्या शिपायाचे एकावेळचे खाणे म्हणजे १२ ते १५ भाकर्या आणि चटणी/ठेचा होय.

तिथुन आम्ही पावनगडाकडे कूच केले. पावनगड हा पन्हाळ्याचाच एक भाग आहे.मात्र शत्रुला चकवा देण्यासाठी त्याच वापर होतो. जसे राजमाची कींवा पुरंदर यांना जवळ-जवळचे कील्ले आहेत तसच हा प्रकार. त्या दिशेने येणारा शत्रु प्रथम पावनगडावर हल्ला करतो मात्र त्यामुळे पन्हाळ्यावरील सैन्य सावध होऊन गडाचा महत्वाच भाग वाचतो. पावनगडावर काही मंदीरे आहेत. लक्ष्मी मंदीर अजुन सुस्थितीत आहेत. जवळच पराशर ऋषिंची पुरातन गुंफा आहे.


पावनगडावरुन आम्ही चोर दरवाज्याने खाली आलो. दरवाज्याची वाट बरीच निसरडी होती. आणि सध्या खालच्या गावात जाणार पाण्याचा पाईप तिथुनच गेला होता. त्याच्यावरुन एक पाय इकडे एक पाय तिकडे अशी कसरत करत खाली उतरलो.फक्त पाय सटकायचा अवकाश समोरच्या ४-६ जणांना घेउन माणुस थेट ५०-६० फुट खाली. ना काही धरायला काही संधी ना समोरच्याला सावध करायला वेळ. मात्र भरारीच्या ’टीम’ ने सगळ्यांना व्यवस्थित जपुन नेलं. मी नेहमीच ट्रेक करत असलो तरी मला माझ्यापेक्षा बाबांच्या 'SLR camera' ची काळजी होती. उगीच ’माज’ नको म्हणुन चुपचाप आधरासाठी अमितचा हात धरला.घसरणीचा पट्ट संपवुन आम्ही खालच्या जंगलात घुसलो. परत पन्हाळ्याकडे जायला निघालो.



वाट उतरताना मोठ्ठी "इंगळी" वाटेवरच आली. लगेच सगळ्या ७-९ जणांचा घोळका तिच्या भवती जमला. बिचारी गांगरली आणि नांगी वर करुन ’पवित्रा’ घेउन उभी राहीली. मग समीरने तिला ईजा होणार नाही याची काळजी घेउन तिची नांगी काठीने अलगद धरुन ठेवली. मग ५ मिनीटे तिचे पुर्ण निरीक्षण झाल्यावर त्याने काठी बाजुला केली आणि एका क्षणात ती मागच्या दगडाच्या फटीत घुसली. काहीतरी मिळाल्याच आनंद प्रत्येकाच्या चेहर्यावर होता. जे आधीच पुढे निघुन गेले होते त्यांना फोटो वर समाधान मानाव लागलं. मग खाली उतरुन "वीर शिवा काशिद" यांच्या समाधीकडे निघालो. महाराज जेव्हा पन्हाळ्यावरुन सटकले तेव्हा वेळ काढण्यासाठी त्यांनी २ पालख्या केल्या. एकात शिवा काशिद यांना बसवुन ती पालखि वेढ्याला दिसेल अश्या पध्दतीने नेली. अर्थात ते पकडले गेले बराच वेळ काढुन ते जेव्हा पालखिच्या बाहेर आले तेव्हा कोणालाच नक्की माहीत नव्हते की हाच शिवाजी आहे म्हणुन. फाजलखानाने ’अफझल’ स्वारीच्यावेळी महाराजांना बघितले होते. मग ’फाजलखानास’ बोलाविले की "बाबा या माणसानेच तुझ्या बापाचा कोथळा बाहेर काढला होता का?" त्यावर ’ये कंबख्त तो सिवा नहि!’ असे फाजलखानाने सांगताच परत ’दगा दगा’ बोंबलत सिद्दीचे सैन्य महाराजांच्या मागावर पळत सुटले. ओघाने पुढची-मागची गोष्ट येईलच मात्र त्यावेळी "शिवा काशीद" यांना ठार मारण्यात आले.
आपल्या धन्याची सेवा जीव देउनही कशी बजावतात ह्याचे मुर्तीमंत उदाहरण.त्यांच्या समाधीला ’श्रध्दांजली’ वाहुन परत पन्हाळ्याकडे निघालो. संध्याकाळी जेवणं होण्याआधी सगळ्यांची ओळख झाली. दुसर्या दिवशीचा कार्यक्रम सांगुन वाटेत चालताना काय करावे काय करु नये याचे धडे सगळ्यांना देण्यात आले. भरारी बरोबर माझा हा तिसरा पन्हाळ-विशाळ असल्याने मला त्याची बर्यापैकी कल्पना होती. पहीला टप्पा २७-२८ कि.मी चा आहे. तो कर्पेवाडीला संपतो.
रात्री १०:३० ला निजा-निज झाली.खरंतर आमच्यातील ’नचिकेतचा’ दुसर्यादिवशी वाढदिवस होता. त्याला रात्री १२:०१ ला उठवायचे असं ठरलं होतं. पण दिवसभर फिरुन झाल्यावर मग जमिनीला पाठ लागल्यावर काय विचारता? एकदम सकाळीच जाग आली. सगळे झट्पट आवरुन तयार झाले.

या वर्षी हर्षद जोशी आमचा मोहीमप्रमुख होता. त्याच्या हाताने पन्हाळ्यावरील ’नरवीर बाजीप्रभू देशपांड्यांच्या" पुतळ्यास हार अर्पण करुन आमच्या मोहीमेला सुरुवात केली. मग हर्षदने पुढील सुचना देउन आम्हाला राजदिंडीपाशी एकत्र आणले. "पुढचे ३ दिवस फक्त चालायचे आहे, महाराष्ट्रातील कठीण अश्या ट्रेकपैकी हा ट्रेक असुन ज्यांचा हा पहिला ट्रेक आहे त्यांना फार मोठ्ठा अनुभव मिळणार आहे!" असे सांगुन अमितने सगळ्या नवख्यांचा उत्साह वाढवला. शिवरायांचा आणि भवानीमातेचा जय-जयकार करुन आम्ही आमच्या पदभ्रमण मोहीमेची खर्या अर्थाने सुरुवात केली.
राजदींडी वरुन खाली उतरुन आम्ही ’मसईपठाराकडे’ निघालो.

मसईपठार हे एखाद्या मोठ्या बेटाप्रमाणे आहे. एका मागोमाग एक अशी ७ पठारे आहेत. मधल्या पठारावर मसईदेवीचे छोटेसे मंदिर आहे.
बांधकाम नविन असले तरी मंदिर बरेच पुरातन आहे. पुर्वी शेंदुर फासलेला दगड होता.
आता तिथे छोटया मुर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. महाराजांच्या आधी देखिल या मंदिराचा उल्लेख आहे. हा जुना व्यापारी मार्ग असल्याने याच मसईपठाराच्या परीसरात लेणी आढळतात. पुर्वी जिथे व्यापारी प्रवास करताना विश्रांती घेत तिथे त्यांनी कालांतराने लेणी वा मंदीरे बांधली. जसे राजमाची किल्याच्या आसमंतात कर्जतच्या बाजुने वर येताना किंचीत आड्वाटेला पण लक्षात येईल अश्या ठीकाणी देखिल आपल्याला अशीच लेणी दिसतात. तसेच हे मसईचे मंदिर आहे. पुर्वी हे व्यापारी-वाटसरु मसईदेवी वर सगळा भरवसा टाकुन सगळे प्रवास करत. आम्ही देखिल मसईचीदेवीची आरती करुन पुढे निघालो. गप्पाटप्पा करत सगळे मार्ग चालत होते. मसईच्या आजुबाजुला दरीत बरीच भातखाचरं दिसत होती. मसईपठाराच्या ४थ्या पठारावरुन आम्ही खाली उतरलो. २ तास चालणे झाल्यावर आम्हाला कुंभारवाडा लागला. २५-३० घरांची ही वाडी आहे. वाटेत अश्या बर्याच वाड्या लागतात. या वाड्यांमधील लहान-लहान मुले "ओ - २ गोळ्या द्या की!" म्हणत मागे लागतात. गोळ्या दिल्या नाहीत तर मग पैसे द्या म्हणुनही मागे लागतात. मात्र ’भरारीच्या’ टीमने आधीच सांगितले होते "त्यांना गोळ्या-पैसे देऊन त्यांच्या सवयी बिघडवु नका, नाहीतर मागुन येण्यार्या ट्रेकर्सना त्याचा त्रास होतो." बर्याचदा काही ट्रेकर्सच त्यांना गोळ्या-पैसे देतात आणि रस्ता दाखवा असे सांगतात.
ज्यांना हा ट्रेक नवा होता ते "काय होऽ आली का कर्पेवाडी?" असे विचारायचे मग आमच्या सारखे ’वासरात शहाणे’ असलेले ८-१० जण सांगायचो "छे-छे अजुन याच्या तिप्पट चालायचे आहे." मग त्यांचे गळपटणे, मग भरारीवाल्यांनी "अरे काहीही सांगतोय हा, अजुन साधारण एक-सव्वा तास चाललाऽऽत की आलं कर्पेवाडी, आता ३-४ तास चालला आहात अजुन तासभर काही कठिण नाही तुमच्यासाठी" असं म्हणुन त्यांना ’पिन मारणे’ हे प्रकार आमच्यासाठी नविन नसले तरी मजेदार होते.
अशीच वाट तुडवताना कधीतरी मग पोटात कावळे ओरडायला लागतात कींवा उंदीर पकडा-पकडी खेळत आहेत असे वाटायला लागते.तसेच काही वाटायला लागले तेंव्हा मग चला इथे थांबु नको थोड पुढे थांबु असं करत कीलोमीटरभर अंतर तुडवुन एका ओढ्यापाशी सगळे आलो. आणि त्या एका की.मी मध्ये आम्हाला पावसाने गाठले.मसईपठारावर ’लपाछुपी’ खेळणारा पाऊस आता कोसळायला सुरुवात झाली होती. आता थांबेल मग थांबेल असं वाटण्याच्या पलीकडे पाऊस गेल्यावर मुकाट्याने सगळ्यांनी आपापले डबे उघडले. वरुन धो धो कोसळणारा पाऊस जेवण्या आधीच डबा धुतोय की काय असे वाटत होते. आम्ही ५ जण एकाच डब्यात खात होतो. मध्येच डब्यात पडणारे पाणी अचानक थांबले - कारण उन्मेषनी कोणाचीतरी छत्री उचलुन आणली होती. मनसोक्त खाऊन आम्ही आमचे हात आणि डबे त्या खळाळणार्या ओढ्यात धुतले. चला निघुया म्हंटले आणि.....पाऊस थांबला. हे सगळं नविन असलेली माणसे "काय राव हा पाऊस,सगळ्या जेवणाची चव गेली, जेवणावर पाणी पसरवलं" म्हणत होते तर आमच्या सारखे ’भटक्या-विमुक्त जमाती मधील लोकं’ "वा!!! बार्याच दिवसांनी असं छकास जेवायला मिळालं" म्हणत होते.
जेवुन झाल्यावर १० मिनीटे आराम करुन सगळे निघालो.या पवसने वाटेच खेळखंडोबा केला होता.
सगळ्या वाटेवर पोटरीभर चिखल साचला होता. मग मागे रुतलेला एक पाय़ काढायचा आणि आणि पुढच्या चिखलात ठेवायचा हा क्रम करत पुढला अर्धातास काढला. ज्यांचे साधे बुट होते म्हणजे हंटरशूज नव्हते त्यांचा एक बुट चिखलात फसायचा. मग नुसताच पाय बाहेर यायचा. मग शेजार्यापाजार्याच्या खांद्याचा आधार घेउन मग तो बुट बाहेर काढायचा मग त्यातला चिखल ओतायचा, परत बुट घालायचा आणि पुढची वाट सुरु. असं मजल दर मजल करत टप्पे पार करत होतो.
साधारण संध्याकाळी ५ वाजता कर्पेवाडीत पोहोचलो. सगळ्यांसाठी गावातील लोकांची घरे भरारी दरवर्षी घेते.आम्ही पोहोचलो तेव्हा घरातले ’बापे’ शेतावर गेले होते.ते ६:००-६:१५ परत येतात असं म्हंटल्यावर वाट पाहण्याशिवाय काही पर्याय नव्हता.ओल्या-सुक्याची पर्वा न करता तिथेच सगळ्यांनी बसकण मारली.घरे मिळाल्यावर दिवसभरात ज्यांचा ’ग्रुप’ झाला होता ते एकेका खोलीत शिरले. माझ्या बरोबर कीरण दामले, वैभव, अक्षय मुळे आणि पाठक काका होते. मग सगळ्यांचे आवरणे चहा पिणे चालु झाले. बशीरभाईंनी झकास गरमा-गरम वाफाळता चहा करुन ठेवला होता. मग अमितने ’पारले-G चा’ मोठ्ठ्ठ्ठा पुडा फोडला. आधिच भिजुन गार झालेली ’तुकडी’ हवा तेव्हढाच चहा आणि ४-६ बिस्कीटे घेउन आपापल्या ’विश्रांतीस्थलावर’ गेली. मग आता उरलं कोण? मी-अमित-हर्षद-मामा आणि आशिष आता सगळा चहा आणि बिस्किटे आता आमचीच होती. उगीच मऊ होण्यापेक्षा बिस्किटे खाऊन टाकलेली बरी ना?
शहाण्यामुलां सारखी सगळी संपवली!!!!!
रात्री जेवण होई पर्यंत वेळ मोकळाच होता. मग अक्षय बरोबर बर्याच गप्प झाल्या अगदी इतिहासा पासुन ते अगदी MP3-MP4 पर्यंत. जेवणाची वेळ कधी झाली ते कळलच नाही. झकास गरमा-गरम झेवुन सगळे अर्ध्या तासात ’गुडुप’, सकाळी एकदम ६:४५ ल जाग आली.मग आळोखे-पिळोखे देत आपापले ’बाड-बिस्तर’ आवरले. चहा-उपमा घेउन सगळे ’जवान’ तयार. "pack-lunch" मध्ये उपमाच होता. हर्षदने सगळ्यांना एकत्र बोलावले. मग आमचा कर्पेवाडी मधला मुक्काम हलवण्याची वेळ आली. गावाच्या मध्यभागी ४थी पर्यंत शाळा आहे - एका खोलिची. पु.ल. म्हाणतात तसे इथे एक शिक्षकी शाळा आहे. एकटे मास्तर वर्ग ’हाकतात’. तिथेच दरवर्षी गावकरी आम्हाला उतरायला जागा देतात. याचीच परतफेड म्हणा कींवा परतफेडीपेक्षा सामाजिक बांधीलकी म्हणुन "भरारी आणि भरारीशी संबधित व्यक्ती" या शाळेतल्या मुलांसाठी वह्या-पुस्तके, बसण्यासाठी बसकटे, गोष्टीची पुस्तके अशी मदत करतातच करतात. अशीच मदत काही जणांनी मदत पाठवली होती. मग आमच्यात वैद्य नावाचे शारदाश्रमचे माजी मुख्याध्यापक आले होते, त्यांच्या हस्तेच तिथल्या शिक्षकांना मुलांसाठी वह्या-पुस्तके दिली. सगळे आटोपल्यावर उन्मेषने एक खुश खबर दिली - "अप्पा परब पांढरपाण्याला पोहोचले आहेत." आणि आम्ही सगळ्यांनी एकच जल्लोश केला, अप्पा परब - मराठयांच्या इतिहासाचे गाढे अभ्यासक आहेत, शिवाय नाणेतज्ञ आहेत. दरवर्षी ते आमच्या बरोबर असतात मात्र यावेळी त्यांच्या तब्येतीमुळे ते पन्हळ्गडापासुन आमच्या बरोबर नव्हते. नाहीतर हा सत्तरीचा माणुस इतका झपझप चालतो की तरुणांना लाज वाटावी. अप्पा भेटणार या आनंदात आम्ही आमचा तिसरा दिवस सुरु केला.
गावकर्यांचा निरोप घेउन आम्ही निघालो.या दिवशी अगदी रीमझिम पाऊस पडत होता.
मध्ये चालताना माझ्या मोठ्या बहीणीच्या गुडघ्याला बरीच दुखापत झाली. बिचारी लंगडत-लंगडत चालत होती. आमचे सेनापती "श्री श्री हर्षद जोशी" यांची ती पत्नी असल्याने खुद्ददस्तुर सेनापतीच त्यांना आधार देत चालत होते. आता सेनापतींचा ’जनानाच’ जायबंदी झालाय म्हंटल्यावर आमचा वेग कमी झाला.शेवटी मग मी, संघमित्रा, मैथिली-हर्षद, उन्मेष, मामा आणि समीर असे राहीलो.माझ्या बहीणीच्या चालीशी जमवुन घेत आम्हि जात होतो.

अधेमधे वाड्या लागत होत्या. तिथली लहान लहान मुले आम्हाला बघुन लाजुन धावत-धावत त्यांच्या झोपडीत शिरत. तिथल्या वातावरणात काय गुढ होते माहीत नाही पण त्या "टुमदार" झोपडीत राहणर्‍यांचा मला क्षणभर हेवा वाटला. इथल्या लोकांच्या कापळावर एकही आठी मला आढळली नाही. मीठ-भाकरी खाउन सुखी राहणर्या त्या जिवांना अजुन शहरी धावपळीचा स्पर्श झाला नाहीये हे खुप महत्वाचे आहे.अर्थात त्यांच्याही काही समस्या असतीलच, पण त्यावर मात करुन ते जगत आहेत ही समाधान करक बाब आहे असं मला वाटतं.
पांढरपाण्याच्या जवळ पोहोचतानाच माझा देखिल डावा गुडघा "वाजु" लागला. शेवटच्या एका तासात तर मला माझा डावा गुडघा वाकवताच येईना.लंगडत लंगडत आम्ही दोघेही भाऊ-बहीण पांढरपाणी कधी येईल याकडे नजर ठेउन चालत होतो. तिच्या गुढघ्याची तर सुजुन ’पुरी’ बनली होती. शेवटी हर्षद-मैथिलीला जवळच्या डांबरी रस्त्या कडे पिटाळले तिची अवस्था फारच वाईट होती, कीमान त्यांना एखादि गाडी ’लिफ्ट’ देईल तितकेच बरे! असा विचार करुन त्यांना पुढे पाठवले.
शेवटी आम्हाला देखिल खुप पुढे गेल्यावर डांबरी रस्ता लागला. शेवटी पांढरपाण्यात पोहोचलो तेव्हा खाली बसायचे वांदे झाले होते. डावा पाय सरळ ठेउनच सुर्य नमस्कार घालतात तसे वाकुन बसावे लागत होते. बसताना "राम" म्हणायची वेळ येत होती. शेवटी पाठककाकांनी आयोडेक्स लावुन दिले आणि मग क्रेब बॅंडेज बांधुन ’चीप-चा्प’ कोपर्‍यात बसुन राहिलो. मग चा आमचा मुक्काम अप्पांच्याच खोलीत होता. संध्याकाळी अप्पांचे एक व्याख्यान झाले. त्यावेळी अप्पांनी पन्हाळगडाची माहिती दिली, शिवाय सिद्दी जौहरच्या मगरमिठीतुन महाराज कसे निसटले याची साद्यांत कथा सांगितली.

Thursday, August 9, 2007

प्रिय लोकमान्य........!

प्रिय लोकमान्य!

पत्र लिहीण्यास कारण की............
तुम्ही शेंगा खाउन टरफ़ले टाकण्यार्‍या त्या मुलांची नावे त्यावेळी सांगायला पाहिजे होती.
कारण आज त्यांचे वंशज पैसे खातात, आणि पैश्यांना टरफ़ले नसतात म्हणुन कोणाला कळतही नाही.
आणि आम्ही... तुमचे वंशज म्हणावणारे, आजही आम्ही कोणाचे नाव सांगत नाही, इतुकी एक गोष्ट मात्र तुमच्याकडुन आम्ही आवर्जुन घेतली.

आणि हो अजुन एक गोष्ट, तुम्हाला सुपारीचे खांड आवडायचे म्हणे, मी सुद्धा आवडीने सुपारी खातो.
तुमचा ’कित्ता’ नाहि तरी ’अड्कित्ता’ तेव्हढा गिरवला.



तुमचा ’चुकलेला अनुयायी’






- सौरभ वैशंपायन.

Tuesday, June 26, 2007

कृष्णशिष्टाई

अखेर कृष्णशिष्टाई असफ़ल झाली. पांडवांनी मगितलेली पाच गावे दुर्योधनाने नाकारली होती. "सुईच्या अग्रावर मावेल इतकी भूमी सुद्धा पांडवांना मिळणार नाही!" अशी दर्पोक्ती दुर्योधनाने श्रीकृष्णासमोर केली होती. कृष्ण द्रष्टा होता. श्रीकृष्णाला मनापासुन युध्द नको होते त्याला दोन कारणे होती - एक म्हंटजे एकमेकांशी भांडून स्वकीयांच्या रक्तानं मात्रूभुमी लाल होणं त्याला मान्य नव्हतं आणि दुसरं म्हणजे पांडवांची घडी अजुन धड बसली नव्हती. पांडवांचा खजिना, सैन्य आणि अनुभव या तीन गोष्टी कौरवांच्या बाजुपेक्षा जवळपास निम्म्या होत्या. शिवाय युध्द झालच तर पितामह भिष्म, आचार्य द्रोण, कृपाचार्य यांच्या सारखे धुरंधर वीर हस्तिनापूरच्या सिंहासनाला वाचवायला धावणार होते, त्यातच भर म्हणुन यादवांचा शत्रु आणि कंसाचा सासरा असलेल्या जरासंधाची राजकिय हत्या श्रीकृष्ण-युधिष्ठीर-भीम-अर्जुन यांनी केल्यामुळे जरासंधाच्या पक्षातले राजे यादव-पांडव युतीवर डुख धरुन होते, युध्द झालच तर ते सर्व साधनांनिशी ते हस्तिनापुरच्या सैन्यात सामिल झाले असते. अर्थात पांडवांसाठी हे धोक्याचं होत. म्हणुनच युध्द टाळण्यासाठी श्रीकृष्ण - "युध्दाने दोन्ही बाजुंच नुकसान होईल. आपलीच माणसं नाहक मारली जातील, कुरु वंशातील दोन जण समोरा-समोर आले तर हस्तिनापूरच्या सिंहासनाचीच ताकद खच्ची होईल, आणि याचा फ़ायदा आजुबाजुला असलेली राज्ये घेतील." या सर्व गोष्टी आग्रही स्वरात मांडत होता. शिवाय मोठ्या मुश्किलीने यादवांचा उत्तरेच्या राजकारणात जरासंधाच्या हत्येमुळे वाढलेल्या प्रभावाला कदाचित युध्दामुळे शह बसला असता. यादवांचे उत्तरेतिल हितसंबध जपण आणि आधीच आयुष्यभर अनेक कारणांनी पांडवांनी जी दु:ख भोगली होती ती दु:ख त्यांच्या पुढच्या पिढ्यांना भोगावी लागु नयेत असं कृष्णाला वाटणं सहाजिक होतं. त्यासाठी नियतीचं हे विनाशाच्या उतरणीवरचं धावतं चाक थांबवायचा श्रीकृष्ण आटोकाट प्रयत्न करत होता. पण दुर्यो्धनाचा हेका कायम होता आणि पुत्र प्रेमापोटी धृतराष्ट्राची बुध्दी सुध्दा आंधळी झाली होती.
श्रीकृष्णानं खेदानं एक मोठा सुस्कारा सोडला.सभेतल्या प्रत्येकाला विशेषत: पितामह भिष्मांना तो सुस्कारा सगळं काही सांगुन गेला. भिष्म आपल्या प्रतिज्ञेने बांधिल होते. कोणत्याही परिस्थितीत हस्तिनापूरच्या सिंहासनाला सांभाळणे त्यांना भाग होते. त्यांनी स्वत:शीच कळत-नकळत नकारार्थी मान हलवुन, श्रीकृष्णाच्या विचारमग्न चेहर्यावरची नजर हटवुन डावीकडच्या जमिनीवर खिळवली. सभेत एक विचीत्र ताण पसरला. खरंतर हे युध्द भिष्मासारख्या जाणत्यांना नकोय हे त्यावेळी कृष्णाला जाणवल. फ़क्त दुर्योधन, दु:शासन आणि शकुनी यांच्या हट्टामुळे हे सगळ घडतय हे न कळयला तो दुधखुळा नव्हता. कर्णानं मैत्रीखातर आणि पांडवांवरील रागखातर या त्रयीला पाठींबा दिला होता.
श्रीकृष्णाची सावध नजर सभेवरुन फ़िरत होती.तो प्रत्येकाचं मन ओळखण्याचा प्रयत्न करत होता.त्याची फ़िरती नजर विकर्णावर थांबली. किमान विकर्ण काहीतरी बोलेल? द्रौपदी-वस्त्रहरणाच्यावेळी एकटा विकर्ण झाल्या प्रकाराच्या विरुध्द उभा ठाकला होता. पण विकर्ण स्वत: कुठेतरी शुन्यात नजर लावुन बसला होता. विकर्ण एकवेळ दुर्योधनाच्या विरुध्द जाईल पण हस्तिनापूरच्या नाही हे कृष्णाला समजलं.
श्रीकृष्णानं मनाशी काहीतरी ठरवलं. अलगद हाताने उत्तरीय ठीक करुन तो उभा राहीला. हात जोडुन त्याने सभेवरुन एक नजर फ़िरवली, आणि मग धृतराष्ट्रावर नजर खिळवली - "महाराज! आपण परत एकदा विचार करावा असं मला वाटतं! मी पांडवांकडुन आलो असलो तरी आपल्या दोहोंमधील स्नेह हा फ़ार जूना आहे!! घट्ट आहे! मी प्रत्येक क्षणी कुरुंच हीतच इच्छितो! कुरु कुलाची वैभवशाली परंपरा मला माहीत आहे, आणि ती जाणतो म्हणुनच आपल्याला पुन:श्च नम्र विनंती की पांडवांनी केलेली रास्त मागणी आपण स्विकारुन होणारा अनर्थ टाळावा!"
आता उत्तर देण्याची वेळ धृतराष्ट्राची होती. एक जबाबदार राजा असल्याने कृष्णाचा प्रत्येक शब्द त्याला पटत होता. पण पुत्रप्रेमाने त्याच्यामधील नीती-अनीती समजुन घेणरी भावना बोथट केली होती. सत्य परीस्थिती आणि सत्तेची हाव या दोहोत तो फसला होता. धृतराष्ट्र अडचणीत आला होता, काय प्रतिसाद द्यावा हे त्याला समजत नव्हतं. त्याची शांतता सर्व सभेवर एक टांगती तलवार बनली होती. दुर्योधन खरतर श्रीकृष्णाच्या चिकाटीवर संतापला होता. त्याला फ़क्त युध्द हवे होते, आणि हवा होता पांडवांचा विनाश. पांडवांना पाच गावे देणे म्हणजे शत्रुचेच हात बळकट करणे होय हे तो जाणुन होता. आणि कोणता शहाणा राजकारणी ही चुक करेल? तसे बघता राजकारणाच्या दृष्टीने दुर्योधन अगदी बरोबर होता. पण आधीचा इतिहास पांडवांच्या बाजुचा असल्याने दुर्योधनाचा हा निर्णय चुकीचाही होता.
दुर्योधनानं हळुच शकुनीमामाच्या गुढघ्याला निसटता पण जाणवेल असा स्पर्श केला. शकुनी काय ते समजला. उजव्या अनामिकेतील अंगठी डाव्या हाताने नीट करत तो संथ पण बेरकी आवाजात म्हणाला - "क्षमा असावी, मध्येच बोलतो आहे, पण हे यादवकुलभुषणा खरंतर मगाशीच निर्णय दुर्योधनानं स्पष्ट ऎकवला आहे. जर महाराजांना तो मान्य नसता तर त्यांनी मगाशीच तसं निर्देशित केलं असतं नाही का?" धृतराष्ट्राच्या उत्तराची अपेक्षा असलेला कृष्ण अश्या धुमकेतु सारख्या मध्येच उपटलेल्या शकुनीच्या त्या वाक्याने क्षणभर चमकला. पण श्रीकृष्ण असले शब्दांचे खेळ लहानपणापासुन खेळत होता. त्याने सुध्दा भर सभेत शकुनीला सुनावले - "हे गांधार नरेश तसे बघता माझ्या शेवटच्या निवेदनावर महाराजांनी मौन धरलयं, मग त्याचा अर्थ मी मला हवा तसा लावावा का? राजकारणात मौन कधी धरावं हे महाराजांना नक्की माहित असेल! तेव्हा त्यांनीच ते स्पष्ट करावं असं मी पुन: सांगतो!" अंगावर आलेल्या शकुनीला श्रीकृष्णाने परस्पर शिंगावर घेतलं होतं. शकुनी ही व्यक्ती श्रीकृष्णाला कधीच आवडली नव्हती. पण आता शकुनीला इतका अहेर खुप होता.
आलेली वेळ आता टाळणं आता ध्रुतराष्ट्राला शक्य नव्हतं. ध्रुतराष्ट्राने बोलायला सुरुवात केली "वासुदेवा, तुझं म्हणणं मला कळतयं, पण सद्य परीस्थितीत युध्द अटळ दिसतंय. पांडवांनी हस्तिनापूरच्या सिंहासनाला आव्हान दिलय आणि एक क्षत्रिय आणि एक कर्तव्यदक्ष राजा म्हणुन पांडवांच हे आव्हान मी स्विकारायच ठरवलय! तरी पांडवांना जाउन तु समजवावेस कि त्यांनी आपला हट्ट् सोडुन कुरुंच्या सैन्याला बिनशर्त शरण यावे. त्यांना कुठलीही हानी होणार नाही. मात्र राज्याचे तुकडे होणार नाहीत! कुरुकुलाचा इतिहास तु जाणतोसच, कुठल्याही कुरु वंशीयाने आपल्या राज्याला हानीकारक वर्तन केल्याचा दाखला तुला दिसणार नाही! मी परत सांगतो राज्याची वाटणी होणे केवळ अशक्य आहे! तुला तुझं उत्तर मिळालय असं मी समजतो, आणि यापेक्षा स्पष्ट बोलण्याजोगे काही उरलयं असं मला वाटत नाही!"
दुर्योधन-शकुनी-कर्ण आणि दु:शासन यांचा चेहरा खुलला होता. आता त्यांच्या मनासारखं होणार हे नक्की झालं होत. युध्द झालं तर पांडवांचा विनाश नक्की होता आणि पांडव शरण आले तर आमरण कारावास. म्हणजे पांडवांच अस्तित्व दोन्ही बाजूंनीं धोक्यात आलं होतं. आता कुठलीही आर्जव करणं कृष्णाला जमणारं नव्हतं. आणि ते योग्यही झाल नसतं. त्याचा अर्थ पांड्व युध्दाला घाबरतात असा निघाला असता. श्रीकृष्णाला ते मान्य नव्हतं. शेवटचे काही शब्द म्हणुन कृष्णानं बोलायला सुरुवात केली - "अखेर जे होऊ नये, म्हणुन तुमच्याकडे मोठ्या अपेक्षेनं आलो होतो. तेच दुर्दैवाने घडलयं. ठीक आहे, म्हंटजे युध्द निश्चित आहे तर!?! महाराज माफ़ करा, पण तुमच्या एका सकारात्मक निर्णयाने घडणारा इतिहास बदलला असता. आणि पुढच्या पिढ्यांना तुमचा आदर्श मिळला असता, की एका कर्तव्यनिष्ठ राजानं सबलांची शांतता कायम ठेवली आणि फ़ार मोठा रक्तपात टाळला. पण आलेल्या वेळेपुढे आपण काहीच करु शकत नाही हेच खरं!" इतकावेळ गप्प बसलेल्या दु:शासनाला रहावलं नाही, तो आगाउपणे कृष्णाला म्हणाला -"हे यदुवीरा दुतानं फ़क्त निरोप देण्या-घेण्याच काम करावं, त्यातच दुताचा सन्मान असतो. तु कुरुंच्या सिंहासनावर बसलेल्या राजाला नीती शिकवू नये हेच योग्य नव्हे का?" दु:शासनानं आपणहुन मधमाश्यांच्या पोळ्यात हात घातला होता. इतका वेळ नम्रता धारण केलेल्या श्रीकृष्णाच्या कपाळावर एक किंचीत आठी उमटली, श्रीकृष्ण गप्प बसणं शक्यच नव्हतं त्यानं धृतराष्ट्रावरची नजर जराही ढळु न देता, एखाद्या दुर्लक्षित माणसाप्रमाणे दु:शासनाकडे न बघताच त्याचा समाचार घेतला - "मला दूत समजण्याची चुक करु नये, मी पांडवांचा प्रतिनीधी म्हणुन इथं आलोय. आणि कुरुंच्या प्रतिनीधीशी चर्चा करायला आलोय. आणि जो प्रतिनीधी ही नाही किंवा ज्याला युवराज्याभिषेकाचा मुकुटही प्राप्त झाला नाहीये त्याने स्वत:चे आधिकार ओळखले तर जास्त योग्य नव्हे का?" या वाक्यावर संपूर्ण सभा स्तब्ध झाली. धृतराष्ट्राला आपल्या मुलाचा अपमान झालेला आवडला नाही. पण दु:शासनानेच निखार्‍यावर स्वत:हुन पाय ठेवल्याने त्याचे काही चालत नव्हते. दुर्योधन मात्र श्रीकृष्णाला अटक करण्याच्या गोष्टी करु लागला तेव्हा मात्र नाईलाजाने श्रीकृष्णाने त्याचे ’विश्वरुपदर्शन’ दाखवले - "दुर्योधना, सध्या मी तुमच्या ताब्यात नसुन तुम्ही माझ्या ताब्यत आहत. माझ्या हजारो अंगरक्षकांनी हस्तिनापुराचा कबजा केव्हाच केला आहे, ही आगळीक करण्याचा विचारही करु नकोस. शिवाय नगराबाहेर माझी यादवसेना उभी केली आहे." या वाक्यासरशी सगळ्यांच्या पायाखालची जमिनच निसटली. श्रीकृष्णाला आता कोणी काहीही बोलले तर युध्दाची सुरुवात इथुनच होईल अशी परिस्थिती निर्माण झाली. सगळ्यांना शांत करुन ध्रुतराष्ट्राने कृष्णाला मानाची वस्त्रे दिली, निरोपाचे विडे देउन ती सभा विसर्जित जाल्याचं त्यानं जाहिर केलं.

नियती गालात हसत होती, तीनं अजुन एक हलका धक्का कालचक्राला दिला होता.
ते फ़िरु लागले होते.



- © सौरभ वैशंपायन(मुंबई).

एकांत

अशा मौन चंद्रवेळी, कुठे घुमते बासरी?
आले विसरुन घरा, मागे पडली ओसरी. - १

कसे सांगु तुला कान्हा? काय वाटेल या जना?
आपल्या दोहोंचे बोलणे, बघ ऎकते यमुना. - २

असे नको वेड लावु, तुज पुन्हा मी सांगते,
जागे नक्षत्रांची रात्र, रासलीला ही रंगते. - ३

शांत-शामल ती काया, पाहता डोळां आले पाणी,
रूप साजिरे पाहता, न लवते पापणी. - ४

नभी शुक्राची चांदणी, नभी पूर्ण चंद्रकळा,
जणू सावळ्याची रात्र, की रात्रच सावळा? - ५

पुन्हा तेच स्निग्ध स्मित, परी रूपे ही अनंत,
जरी म्हणते नको तरीही, भावतो हा एकांत - ६


-सौरभ वैशंपायन.

लज्जा

तव भालावर तेज रवीचे, नजरेत जराशी मादकता,
आरस्पानी रुप तुझे गं, अधरावर थोडी अधीरता - १

अलगद खुलली तजेल कांती, सुंदर केतकी रंग असा,
बघणे सुध्दा सुखकारक तुज, दवबिंदुचा स्पर्श जसा - २

केस रेशमी सुगंधीतही, गालांवरती खोल खळ्या,
ओठ जणू कि गुलाबपाकळी, हसणे जणु कि कुंदकळ्या - ३

चारुता पसरली सलज्ज वदनी, मीठीत माझ्या रुजलीस का?
सहज चुंबिता गौरतनु तव, लाजेत अशी तु भिजलीस का? - ४


- सौरभ वैशंपायन

Thursday, June 21, 2007

कर्णपर्व!

कर्णानं अलगद मान वळवण्याचा प्रतत्न केला, पण वेदनेची एक असह्य कळ शरीरात उठली. अर्जुनानं सोडलेल्या बाणनं आपलं काम चोख बजावलं होतं. रथाच रुतलेलं चाक वर काढण्यात गुंतलेल्या कर्णाच्या डाव्या खांद्यातुन घुसुन तो बाण मानेतुन बाहेर आला होता. अर्जुनाला थांबायला सांगितल्या नंतर सुध्दा श्रीकृष्णाच्या सांगण्यावरुन त्याने बाण मारला होता. "तेंव्हा कुठे गेला होता तुझा धर्म?" हा एकच प्रश्न कर्णाला त्याही अवस्थेत सतावत होता. "धर्म?मी खरच चुकलो धर्म?" पुन्हा कर्णानं मान हलवली मात्र संपूर्ण शरीरच वेदनांच मोहोळ बनल. कर्णाच्या मांडी पासुन ते कानच्या पाळी पर्यंत कर्णाला अनेक जखमा झाल्या होत्या. अर्जुनानं सोडलेले काही बाण तर इतके भेदक होते की धातुच्या पट्ट्यांचं चिलखतही त्यांनी भेदले होते. आतल्या भागात फ़ाटलेल्या चिलखतानंच जखमा झाल्या होत्या. त्याच्या बाणांनीही काही वेळा अर्जुनाला जखमी केलं होतं पण ते बाण आपण आपल्याच धाकट्या भावावर सोडतो आहे ही वेदना त्या बाणाच्या वेगाला आणि दिशेला बंधक बनवत होती. शिवाय अर्जुनाच्या रथाच सारथ्य करणारा श्रीकृष्ण? त्याला कुठल्याही बाणांचा त्रास होऊ नये याची पुर्ण काळजी कर्ण घेत होता. आज श्रीकृष्णच अर्जुनाच चिलखत बनला होता. ही गोष्ट जितकी कर्णाला माहीत होती तितकीच श्रीकृष्णाला सुध्दा. अर्जुन मात्र बेभान होऊन शरसंधान करत होता. अर्जुनानं मारलेला शेवटचा बाण थोडासा सुडाच्या भावनेनीच मारला होता. प्रत्युंचा कानाच्याही काकणभर मागेच खेचुन मारलेल्या बाणानं कर्णाला लोळवलं होतं.

असह्य आणि वाढत जाणर्‍या वेदना कर्णाला मरणयातना देत होत्या. इंद्राला कवच कुंडले काढुन देताना इतक्याच मरणयातना त्याने भोगल्या होत्या. इंद्राच्या आशिर्वादाने त्याच शरीर वेदनामुक्त झाल, अगदी तजेल कांती मिळाली पण ते शरीर अभेद्य राहीलं नव्हतं चारचौघां प्रमाणे सामान्य झालं होतं. "आज माझी कवच-कुंडल असती तर?" कर्णान विचार केला. "कुठलीही शक्ती माझ्या कवचाचा भेद करु शकली नसती." पण दिलेलं दान हे उजव्या हाताचं डाव्या हाताला कळु नये याची आठवण त्याला झाली. "छे छे मी केलं ते योग्यच होतं!" अगदी देवांचा राजाच भिक्षुक बनुन त्याच्या समोर याचना करत होता. तो कर्णाच्या दानशुर पणाचा परमोच्च क्षण होता. अगदी आपला मृत्यू आपण ओढावुन घेतोय हे माहीत असुन सुध्दा त्यानं मोठ्या मनानं ती कवच-कुंडल इंद्राला दिली. अर्थात त्याला आशिर्वाद म्हणुन सुंदर शरीर आणि देवा-दिकांना हेवा वाटावा अशी वासवी शक्ती मिळाली होती. मात्र घटोत्कच वासवी शक्तीचा बळी ठरला होता. आणि ज्याच्यासाठी ती शक्ती राखुन ठेवली होती त्या अर्जुनाच्या बाणाचा कर्ण बळी ठरला होता.

अजुन एक कळ कर्णाच्या मस्तिष्कापर्यंत गेली आणि कर्णाच्या नकळत त्याची उजवी टाच तिथल्या मरुभुमीवर घासली गेली. पण अश्या मरणयातना कर्णाला नविन नव्हत्या. आजवर त्याने अनेक शारिरीक आणि मानसिक मरणयातना भोगल्या होत्या. खरं तर कुंतीने असहाय्यपणे तो तान्हा निष्पाप जीव गंगेच्या पाण्यात सोडला तेव्हाच कर्ण जगासाठी मेला होता. कोणत्याही चिमुकल्या जीवासाठी त्याची आई हेच जग असतं, पण आईनेच असं तोडुन टाकलं तर? मात्र कर्णाला राधामाता आणि अधीरथानं पुनर्जन्म दिला. पण तोच पुनर्जन्म कर्णाला आयुष्यभर छळत आला.

गुरुकुलात पांडवांकडुन पदोपदी होणारी टवाळी त्याला फ़र मनस्ताप देत असे. आणि गुरुकुलाच्या शेवटच्या दिवशी प्रत्येक गोष्ट अर्जुनाइतकीच, उलट रेसभर उजवीच करुन दाखवल्यानंतरही "सुतपुत्र" म्हणुन झालेली हेटाळणी? इतका क्लेषकारक अनुभव त्याला त्या आधी आला नव्हता. मात्र तीच सुरुवात होती मरणयातनांची. पुढे द्रौपदी स्वयंवरात देखील "मी सुतपुत्राला वरणार नाही!" म्हणुन भर सभेत द्रौपदीनं केलेला अपमान सुध्दा मरणयातना देणारा होता. वास्तविक कर्णानं इतरांना नुसतं पेलणंही अशक्य असलेला तो जडशिळ धनुष्य प्रत्युंचा चढ्वुन तयार देखिल केला होता. पण द्रौपदीचे ते शब्द कानावर पडताच, छतावरच्या फ़िरत्या यंत्रावर बसवलेल्या माश्याच्या दिशेने उगारलेला धनुष्याचा हात उगीच भरुन आल्यागत झाला. त्याच्या डोळ्यांदेखत ब्राह्मण वेशातील अर्जुनानं तो पण जिंकला होता. वास्तविक कर्णाचा तेजोभंग होण्याची ती पहीलीच वेळ नव्हती.अगदी द्रोणांसारख्या ’ज्ञानी’ गुरुंनी सुध्दा त्याला राजपुत्र आणि सुतपुत्र यातला फ़रक पदोपदी जाणवुन दिला होता.

पण द्रौपदीकडुन-एका स्त्री कडुन झालेला अपमान कर्णाच्या जिव्हरी लागला होता. "पण एका अर्थी बरेच झाले ती रुपगर्विता माझी पत्नी बनली नाही. माझ्या वृषालीची जागा ती कधीच घेऊ शकली नसती! "वृषालीची आठवण येताच कर्णाला वेदना कमी झल्यागत वाटली. "वृषाली,वृषकेतु,शोण,अधीरथ बाबा,राधामाता आणि कुंती.कुंती? कुंती? तिची आठवण मला का यावी? मला जिने जन्मत:च पाण्यात सोडुन दिले ती कुंती? युध्दाच्या आदल्या रात्री नातं सांगायला आलेली कुंती? की आयुष्यात अजणपणी झालेल्या चुकीची शिक्षा म्हणुन मला जन्म देणारी एक कुमारी माता? तिच्या वेदना कदाचित तिलाच ठाउक!आयुष्यभर माझी आठवण काढली असेल तिने! आमचं नातं फ़क्त आम्हा तिघांनाच माहीत होतं.कुंतीमातेला, मला आणि श्रीकृष्णाला!"

श्रीकृष्ण! आठवणी सरशी कर्ण त्याही अवस्थेत भारावुन गेला. "माझं आणि कृष्णाचंसुध्दा एक अनामिक नातं होतं. आमचं नातं शब्दांच्या पलिकडच होतं. मी पांडवांच्या पक्षात याव असं त्याला मना पासुन वाटत होतं. पण माझा नाईलाज होता. दुर्योधनाशी मी प्रतारणा करु शकत नव्हतो. मी एका चक्रव्युहात अडकलो होतो. माझी अवस्था मलाच माहीत होती!" त्या विचारांसरशी कर्णाची छाती धपधपु लागली. "एकि कडे नकळत शत्रु झालेले भाऊ आणि दुसरीकडे मित्रपक्षातील भिष्म-द्रोणां सारखे झालेले हीतशत्रु! मी कोणाची बाजु घ्यायला हवी होती? ज्याने आयुष्यभर मला साथ दिली त्या दुर्योधनाकडे एका रात्रीत पाठ फिरवणे योग्य ठरले असते? फक्त जेष्ठ पांडव म्हणुन युधिष्ठीरच्या सिंहासनावर जाउन बसण्याचा अधिकार मला होता? रज:स्वला-एकवस्त्रा द्रौपदीला सभेत फ़रपटत आणल्या नंतर कुत्सित्पणे हसुन माझा सुडाग्नी विझवण्यासाठी "दुर्योधनाच्या मांडीवर बैस!" असे सांगणारा मी, द्रौपदीचा सहावा पती होण्याची माझी लायकी उरली होती?"

आता कर्णाच्या घश्याला कोरड पडली होती. डोळ्यांसमोर अंधार येत होता. आजुबाजुला कण्हणार्‍यांचे आवाज त्याला बेचैन करत होते. कर्णाचा श्वास मंद होत चालला होता. धपधपणार्‍या छातीचा भाता आता हळु-हळु पण लयीत खाली-वर होत होता. मधुनच एखादी दुखरी कळ जीवाची तगमग वाढवत होती. आणि अचानक -"कर्णा!" अशी कातर हाक ऎकु आली - "कृष्ण!श्रीकृष्ण! तोच! त्याचाच आवाज!" आवाजाच्या दिशेने कर्णाने मान वळवण्याचा प्रयत्न केला, पण मानेत घुसलेल्या बाणाने त्याच्या अस्तित्वाची अशी काही जाणिव करुन दिली कि कर्णाच्या उजव्या हाताची मुठ कुरुक्षेत्रातील रेताड जमिनीवर वळली. मुठभर कोमट रेती त्याच्या रक्ताळलेल्या हातात आली. "अंह! पडुन रहा!" - कृष्णानं त्याला सावध केलं. कर्णाच्या डोळ्यांसमोर इतका अंधार येत होता की डोळे उघडणं कठीण होतं. मात्र श्रीकृष्णानं जवळ येउन त्याचा रक्तानं चिकट झालेला हात घट्ट पकडला. त्या मऊ गुबगुबीत पंजाच्या उबदार स्पर्शाने कर्णाला हरवलेली चेतना परत येत्येय असे वाटले. फ़क्त आठवण काढल्या सरशी येणारा श्रीकृष्ण खरोखर देव होता. त्याच्या कपाळावर श्रीकृष्णाने प्रेमाने हात फ़िरवला. उभ्या आयुष्यात इतका आश्वासक स्पर्श याआधी त्याला फ़क्त राधामाता आणि वृषाली या दोघांकडुनच मिळाला होता.

आता कर्णाला स्वछ दिसु लागलं होतं. श्रीकृष्णाच्या पंज्यावर आपल्या डाव्या हाताची थरथरती मुठ कर्णानं शक्य तितकी घट्ट केली. कर्णाच्या उजव्या मुठितुन आता रेती सटकायला सुरुवात झाली होती. मानेत घुसलेल्या बाणामुळे डावीकडे बसलेल्या श्रीकृष्णाकडे त्याला तिरपा कटाक्ष टाकुन बघावं लागत होतं. काहीही घडलं तरी नेहमी स्मितहास्य असलेला श्रीकृष्णाचा चेहरा त्याला आज मलुल वाटत होता. "मला क्षमा कर कर्णा! पण तुझ्यात आणि अर्जुनात मला अर्जुनाची बाजु घ्यावी लागली!आपण दोघेही आपापल्या कर्तव्याने बांधिल होतो! मला सत्याची बाजु घ्यावी लागली!!!" - कातर स्वरात श्रीकृष्णानं त्याची बाजु मांडली. "सत्य? या सत्यानिच माझा आयुष्यभर घात केला! पहीले सत्यानं माझ्याकडे पाठ फ़िरवली आणि शेवटी मी सत्याकडे! फ़क्त आसत्य वदुन मी आचार्य भृगुराज परशुरामांकडुन मी अस्त्रविद्या शिकलो म्हणुन मी आज ब्रह्मास्त्र विसरलो आणि अजाणतेपणी मी आंधळ्या ब्राह्मणाची गाय मारली म्हणुन शापाच्या रुपानं या भुमीत माझ्या रथाचं चाक रुतलं! अजुन कसलं सत्य-असत्य मोजावं? उभ्या आयुष्यात सुतपुत्र म्हणुन मला असत्य संबोधन मिळालं आणि जेंव्हा सत्य समजलं तेंव्हा त्याचा आनंद मानावा अस काही उरलं नव्हतं.

कर्णाच्या मनात विचारांचा कल्लोळ माजला होता. वार्‍यावर उडणार्‍या त्याच्या विस्कटलेल्या केसांप्रमाणे त्याचं मन आंदोलन घेत होतं. त्याला त्याक्षणी कृष्णाशी खुप काही बोलयच होतं पण त्याला धड्पणे काहिच बोलता येत नव्हतं. त्याची जिभ आत खेचली जात होती आणि अस्प्ष्टसा घर्र-घर्र असा आवाज येत होता सुकल्या ओठांवरुन त्याने जीभ फ़िरवण्याचा निष्फ़ळ प्रयत्न केला. पण जीभ ओठांपर्यंत पोहोचलीच नाही. या अस्वस्थतेने त्याला धाप लागली. त्याला शांत करत श्रीकृष्णाने त्याचे शांत-स्निग्ध-मधाळ डोळे कर्णाच्या निळ्या-निळ्या डोळ्यांना भिडवले आणि एका निश्चयी स्वरात त्यानं कर्णाला विचारलं "कर्णा तुझी अखेरची ईच्छा?" प्रत्यक्ष नारायण त्याला त्याची अखेरची ईच्छा विचारत होता. "ईच्छा?" खरतर जिच्या मांडीवर तो पहिल्यांदा रडला असेल त्याच कुंतीमातेच्या मांडीवर डोके ठेवुन त्याला मृत्यु हवा होता, तिच्या कुशीत शिरुन त्याला आयुष्य़भराचे अश्रु तिच्या पदरात रीते करायचे होते. पण मग तो राधामाते वर अन्याय झाला असता. कर्णाला निदान शेवटच्या श्वासांमध्ये कोणावरही अन्याय करयच नव्हता.

कर्ण पडला होता,योगा-योगानं त्याच्या उजव्या हाताला पश्चिमेकडे अस्ताला जाणारा सुर्य होता. कर्णाचा पिता सुर्य. "मी सुर्यपुत्र आहे,मी त्याच्याच तेजाचा एक अंश आहे!" असं कर्णाला ओरडवसं वाट्त होतं. उद्या आपण आपल्या पित्याला पाहु शकणार नाही, त्याला अर्ध्य देउ शकणार नाही हा सल त्याला कष्ट्प्रद वाटत होता. आणि आज सुर्य देखील उगाचच रेंगाळतोय असं वाटत होतं. सुर्यास्त उगिचच लांबला होता. मात्र आपल्या पुत्राच्या अखेरच्या घटकेला तो येउ शकत नव्हता. तो त्याचे कर्म करत होता. जगाचे पालन करण्याचे कर्म. काय चमत्कारीक क्षण होता? जगाचे पालन करणारे दोन नारायण कर्णाच्या डाव्या-उजव्या बाजुस उभे होते. हे भाग्य कर्णाचच होतं आणि ते मृत्यु शिवाय कोणीही हिरवुन घेउ शकत नव्हत. "मृत्यु -अंतिम ईच्छा!" कर्ण परत भानावर आला. अर्धाधिक अस्ताला गेलेल्या सुर्यबिंबा वरुन त्याने आपली नजर हटवुन श्रीकृष्णाकडे वळवली.
कृष्ण त्याच्या उत्तराची अजुन वाट पहात होता."मल..आ....नि...रबिज...भूमी व...र,भूमी वर.....दहन.....क..र!" -कर्णानं फ़ार प्रयत्नां नंतर उत्तर दिलं. तो अजुन काहीतरी पुट्पुटत होता पण पुढचं कृष्णाला नीट ऎकु येत नव्हतं म्हणुन कृष्णानं स्वत:चा उजवा कान शक्य तितका कर्णाच्या ओठांजवळ नेला. त्याला काहीतरी "कुंती....र्जुन......दुरय..ओ..धन." काही असे तुटक आणि अस्पष्ट बोल ऐकु आले. अंदाज बांधुन कृष्णाने मान हलवली - "होय कर्णा मी सांभाळिन सगळं!" असं म्हणुन त्याचा डावा हात आपल्या उजव्या हाताने थोपटला. पुढच्याच क्षणी कर्णानं एक जोरात श्वास घेतला त्याची मान किंचीत वर उचलली गेली आणि जमिनीवर आदळुन कळत-नकळत उजव्या बाजुला कलंडली. कर्णाच्या उजव्या हातातील रेतीसुध्दा निसटुन गेली होती. श्रीकृष्णाच्या हातावरची पकड मात्र अजुनही तितकीच पक्की होती. आता उगिचच रेंगाळतोय असे वाटणारा सुर्य देखिल अस्ताला गेला होता. सर्वत्र हळु-हळु अंधार पसरला होता. श्रीकृष्ण आणि कर्ण दोघांच्या अंधुकश्या आकृत्या मात्र तश्याच होत्या.

कर्ण सगळ्याच्या पलीकडे गेला होता!!
कर्णपर्व संपले होते!!!




- सौरभ वैशंपायन

Saturday, May 19, 2007

पाऊस

पाऊस सरसरुन पडतो,
गंध मातीचा दरवळतो,
भिजवुन धरित्री सारी,
नभ मल्हार रागही गातो. -१

उभी इंद्रधनुची कमान,
मृगाचे स्वागत करतो,
हिरव्या मखमाली संगे,
थेंबांचे तोरण धरतो. -२

दाही दिशा ओलावुन,
वाराही भरारा फ़िरतो,
पडदे मेघांचे साराया,
नभात रवीही झुरतो. -३

क्षितीजांच्या रेषांवरती,
पसरते दुरवर लाली,
उच्छ्वास टाकुनि धरणी,
मग अलगद हसते गाली. -४

त्या ओल्या वळणांवरुनी,
मीही अलगद वळतो,
मग सरते कातरवेळ,
तो मित्रहि अखेर ढळतो. -५

मित्रही ढळला म्हणुनी,
जीव असा हुरहुरतो,
होतात अंधुक क्षितीजे,
नभ धरेत या विरघळतो. -६


- सौरभ वैशंपायन.

Thursday, May 3, 2007

परित्राण




थरथरे भूमी सारी, क्षणी कोसळे आकाश,
लागे सुर्याला ग्रहण झाकोळला प्रकाश. - १

धन्य झाले विजापूर, उभा राहीला अफ़झल,
प्रार्थती शिवास सगळे, पचवावे हलाहल. -२

बुत्शकिन मैं गाझी, घुमला आवाज करडा,
फुटली भवानी घावात, झाला स्वप्नांचा चुरडा. -३

काळीज फाटे जिजाऊचे, दु:खे आक्रंदली धरणी,
जीव जपुन रे कान्हा, दुष्ट कंसाची करणी. -४

छळविला पिता याने,मारीला फसवुनि भ्राता,
फोडल्या लेण्या नी राऊळे कोणी उरला न त्राता. -५

गर्दीस गनीम मिळवा तुला स्वराज्याची आण,
राम तूच कृष्ण तूच करी त्वरे परित्राण. -६

भेट ठरली प्रतापी सरे वेळ सावकाश,
पसरले बाहु असुराचे उलगडे यम-पाश. - ७

हिरण्यासी अधांतरी नरसिंह जैसा फाडे,
तैसा फाटला अफ़झल, उडले रुधिर शिंतोडे. - ८

शांत झाला शिव-नृप, अग्नि अंतरीचा विझे,
आंदोळली पृथ्वी सारी, देई झुगारुन ओझे. -९


- सौरभ वैशंपायन.

१८५७

सज्ज रणांगण,
वाजे पडघम,
सुर्य उगवला,
छेदाया तम - !!धृ!!


वेळे आधीच वाजे डंका,
मंगल अग्नि जाळी लंका,
क्षण एकातच पेटे पाणी,
बराकपुरीची हीच कहाणी - १


वीरांगनेची ऐका कीर्ति,
मांड टाकली घोड्यावरती,
श्वास थांबती नजरा फिरल्या,
हाय,परी वेदनाची उरल्या. - २


लंदन तक चलेगी तेग,
गर्जु लागला बहादुर एक,
पायी श्रुंखला हाती बेडी,
वंशही चिरडी धाड गिधाडी. - ३


’षडरीपू’ पाठी अपुरी सेना,
काल्पी जिंकुनी तृषा शमेना,
फितुरीत ते फसले तात्या,
विझल्या आशा होत्या नव्हत्या. - ४


उठला जो-तो शस्त्रे परजत,
फिरती पाती छकले शत-शत,
वाहु लगल्या शोणित गंगा,
भिडु लागली माती अंगा. - ५


चळ्चळ कापे अरीसेना ऐशी,
लढली दिल्ली लढली झाशी,
गर्जुनी सिंह जागवी जणु वन,
असेच लढले सन सत्तावन. - ६


- सौरभ वैशंपायन.

Wednesday, April 11, 2007

रानवेडा!

कीर्र झाडी गच्च दाट,
अंधारात रातकीडा,
भयाण-भीत जंगलात
फ़िरे एक रानवेडा. - १

माती मऊ साय जणु,
काळा उभा कातळकडा,
शांत-शीत जंगलात,
फ़िरे एक रानवेडा. - २

जाई-जुई पारीजात,
बकुळाचा नाजुक सडा
जंगलात सुगंधाच्या
फ़िरे एक रानवेडा. - ३

मोहरला आंबा कधी,
कधी बहरे केवडा,
मंद-धुंद रानामधे,
फ़िरे एक रानवेडा. - ४

होत अचानक शांत,
कधी खेळवित झाडा,
वा‍र्‍यास अश्या देत साथ,
फ़िरे एक रानवेडा. - ५

निळे सांगते आकाश,
हात पसरुन भिडा,
खुणावणार्‍या क्षीतिजासाठी
फ़िरे एक रानवेडा. - ६

कधी गुलाबी थंडी,
रापला उन्हात बापुडा,
घमघमणार्‍या पावसामध्ये,
फ़िरे एक रानवेडा. - ७

उदास पायवाट कधी,
कधी खळखळे ओढा,
पाय सोडुन पाण्यात,
फ़िरे एक रानवेडा. - ८

घाली बुलबुल साद,
कधी ओरडे कवडा,
वसंताच्या कोकीळासंगे,
फ़िरे एक रानवेडा. - ९

कधी पौर्णिमेचा चंद्र,
पडे चांदण्याचा सडा,
अश्या टिपुर चांदण्यात,
फ़िरे एक रानवेडा. - १०

सौरभ वैशंपायन.