Sunday, June 17, 2012

पांढर्‍यावरचे काळे...

मनुष्य आपल्या कर्माने मोठा होतो. अनेकदा त्याचे कार्य हे इतके मोठे असते कि कालपटावरचा त्याचा विस्तार हा मती गुंग करणारा असतो. अशी मती गुंग करणारे कार्य दिसले कि कालांतराने आपसूक त्या भोवती नवनवीन काव्यपिसारे फुलतात, ते चूकहि नसते, मात्र याच कवी कल्पना ह्या इतिहास म्हणून घेतल्या कि गोची होते. मग त्यांना "चमत्कार" येऊन चिकटतात. आणि आपण त्या व्यक्तीला कधी देव्हार्‍याबाहेर येऊच देत नाहि. "देव" या संकल्पनेबाहेर आपण त्यांना बघत नाहि, बघू शकत नाहि. त्यांना "अवतार" ठरवल्याने मग त्यांनी केले ते अवतार कार्य म्हणूनच. त्यावर फालतू प्रश्न विचारायचे नाहित. देवच तो, त्याने काहिहि केले तरी कारण विचारायचे नाहि, कारण नियतीचा संकेत होता. ह्याने आपण समाजाची विचारशक्ती कुंठित करतो. त्यांच्या चांगल्या वाईटाला देवत्वा खाली माफ करुन टाकतो. वास्तविक देवत्वाखाली आपण आपली विचारशक्ती तर झाकतोच पण त्या व्यक्तीच्या कार्याला आपल्या नकळत कमीपणा आणतो असे माझे वैयक्तिक मत आहे. म्हणजे "देव" म्हणून त्याच्या चरणाचेहि तीर्थ घेऊ, पण ते कार्य जर ’देव’ करतोय म्हंटलं कि त्याच्यासाठी सहज साध्य असते पण तेच ’माणूस’ समजून घेतले तर त्याकाळि ते कार्य कसे केले असेल? ह्याचे आश्वर्य वाटून आपले आदर्श जास्त बळकट करता येतात हे कोणीच लक्षात घेत नाहि.

फेसबुकवरती एका ग्रुपवरील चर्चेत मुद्दा श्रीरामावरती चर्चा होत होती एक गट वर म्हणालो तसा "तीर्थ" संप्रदायातील होता तर दुसरा  रामाने चुका कश्या केल्या ह्यांचा घडाघडा पाढा वाचणारा होता. म्हणजे "श्रध्दा" व "बुध्दिवाद" या दोन पांढर्‍यावरील काळ्या शब्दांमध्ये श्रीरामांची ओढाताण सुरु होती. मी काहि मते मांडली त्यावर मुख्यत: श्रध्दावानांनी माझ्यावर हल्ला चढवला (सुदैवाने अहिंसक हल्ला होता, म्हणजे गांधीजींच्या "चामड्याच्या" चपला जितक्या अहिंसक होत्या तितकाच!).


यातला बुध्दिवाद्यांचा प्रश्न मला पटला - "जर दैवी संकेतानुसार जसं ठरलं होतं तसंच कैकयी - मंथरा वागल्या असतील तर त्यांना का दोष द्यावा?"  यावर मग श्रध्दावानांची सहाजिक गोची झाली. मग लोकांना दाखवण्यासाठी देवाने केलेला खेळ वगैरे  - "वत्सा अजाण आणि बाळबोध आहेस अजून!" धाटणीची नेहमीची उत्तरं सुरु झाली. माझ्या विचारानुसार कैकयी ही सामान्य स्त्री खचित नव्हती. मी चुकत नसेन तर जी २ वचने आपण कैकयीने दशरथाला मागितली असे म्हणतो ती वचने तीने भर रणांगणावरती दशरथांचा जीव वाचवून मिळवली होती व नंतर कधीतरी मागेन असे म्हणून पुढे रामचा राज्याभिषेक करायचे जाहिर केले तेव्हा मागितली. याचा अर्थ कैकयी एक लढवय्या स्त्री होती. पुढची गोष्ट दशरथाला शाप होता कि पुत्र वियोगाने तुलाहि मृत्यु येईल. मग पुत्र वियोग २ प्रकारे - एक तर रामाचा मृत्यु किंवा रामाचे दिर्घकाळ दूर रहाणे. शाप वगैरे कथा सत्य मानली तर उलट रामाला दूर पाठवून तीने रामाचा जीवच वाचवला ना? दशरथ व राम असे २ जीव जाण्याऐवजी एकच जीव गेला.



आता श्रीरामाच्या मुख्य कार्याकडे बघू - "रावणवध".  रावणाला हरवणं हि म्हणाल तर नविन, जगावेगळी वा अशक्य गोष्ट अजिबात नव्हती. सहस्रार्जुनाने, वालीने इतकेच कशाला? तर स्त्री राज्यातील स्त्रीयांच्या सैन्यानेहि रावणाला हरवले होते. पण आधी दंडकारण्यात येऊन मोठं सैन्य उभं करणं, ते लंकेपर्यंत घेऊन जाणं आणि रावणासारख्या बलाढ्य राजाला हरवल्यानंतर (मग तो वध असेल किंवा कैद असेल) ते राज्य योग्य हातात देणं. व रावणाचे पाठिराखे परत डोकं वर काढणार नाहि अशी व्यवस्था लावुन आर्यवर्त पुन: निष्कंटक करणं हे मोठं काम होतं. इथे रामरायाने केलेली राजकारणे, राबवलेली धोरणे फार विचार करण्यासारखी आहेत. श्रीराम हा पट्टिचा राजकारणी होता. केवळ मर्यादा पुरुषोत्तम - मर्यादा पुरुषोत्तम करुन आपण श्रीरामाचा "चॉकलेट हिरो" बनवून टाकला आहे. ती आवरणं झटकली कि श्रीरामाच्या कार्याचे विचारहि करु शकणार नाहि इतके विराट स्वरुप आपल्या समोर येते मती गुंग करुन टाकते. आणि हि आवरणं झटाकायला ना श्रध्दा सोडायची गरज आहे ना बुध्दिवादाच्या नावाखाली उभे आडवे छेद देत जाण्याची. फक्त त्या विराट रुपाचे दर्शन झाल्याने मती गुंग झाली कि त्याला "चमत्कार" म्हणून लेबल चिकटवले जाऊ नये आणि मुळ रामकथेत किंवा प्रक्षेप म्हणून मागुन आलेल्या कथांचा चोथा करुन रामाने हिच चूक केली होती तीच चूक केली होती हे हातोडिचे घाव घालून मोकळे व्हावे तसे आरोप करुन मोकळे होऊ नये.

अजून एक, रामायण वाचता - बघताना बिभिषण म्हणजे "बुळ्या", मिळमिळित" असं चित्र उभं रहातं तर तसं नाहिये. बिभीषण उत्तम लढवैय्या होता. रामाच्या सेतुचे लंकेच्या बाजूने रक्षण करण्याची जबाबदारी बिभीषणाने पार पाडली होती. रामाने दक्षिण आर्यवर्तातील रावणाचा हस्तक्षेप मोडून काढायला बिभीषणाला कसे वापरले याचं मला फार कौतुक वाटतं. बिभीषणाची राजकारणाची महत्वकांक्षा रामरायाने अचूक हेरली म्हणजे त्याचे - सुग्रीवाचे हेरखाते किती उत्तम असेल? वरुन ह्याच्याशी मैत्री ठेवली तर दंडकारण्याच्या खालच्या भागात परत शांतता नांदेल ह्याचीहि हमी मिळवली. श्रीराम - श्रीकृष्णांमधली समानता म्हणजे दुसर्‍यांचे राज्य त्यांनी हिसकावून घेतले नाहि. त्या - त्या ठिकाणच्या/वंशजांच्या हाती तो कारभार सोपवला. यात दातृत्व व राजकारण यांचा उत्तम संगम दिसून येतो. त्या महामानवांकडून शिकायच्या त्या या गोष्टि.

पण त्यांच्या महान कार्यांना थेट देवपण दिलं कि ते करतील ते सगळं बरोबर होत जातं. त्या काळि त्यांनी जे निर्णय घेतले ते एक माणूस म्हणून आणि समाजाचा एक घटक म्हणून हे मान्य केलं तर उलट त्यांनी केलेली सत्कार्ये हि हजार पटींनी मोठी होतात. मानव असून इतके अवाढव्य काम कसे केले याचे आदर्श अजून बळकट करता येतात आणि आपण ’आत्ता २०१२ मध्ये ज्यांना "चूका" म्हणतो त्यावर "मानवाने" केलेली चूक व समाजाची त्यावेळची मानसिकता व पालनकर्ता - समाजाचा सर्वात वरच्या फळितला घटक म्हणून श्रीरामांना सीतेचा करावा लागलेला त्याग यांचा सरळ संबध लावता येतो.(मुळात उत्तर रामायण हा ’प्रक्षेप’ आहे हे माझे वैयक्तिक मत आहे. मुळ रामायणात श्रीराम परत आल्यावर "त्यांच्या अनेक पिढ्यांनी पुढे सुखाने राज्य केले" इथे रामायण संपवले आहे.) 

श्रीराम हा भारताचा - हिंदु धर्माचा प्राण आहेत ह्यात अजिबात शंका नाहि. श्रीरामा सारखा आदर्श राजा/माणूस हजार वर्षातून एकदा होत असावा. मी हे सुध्दा सांगतोय कि मला स्वत:ला रामनाम आवडते. घरात लहानपणापासून रामनाम ऐकत मोठा झालोय. आणि इथे श्रध्दा इतकि प्रभावी आहे कि हजारो वर्ष त्या रामनामावरती आशा-श्रध्दा-भक्ती-भावना-वाणी एकवटून त्याची कोटिच्या कोटि आवर्तने होऊन खरोखर त्याला मानसिक आधाराचे किंवा अजून स्पष्टपणे सांगायचे तर कवचाचेच रुप आले आहे. माझाहि रामनावार संपूर्ण विश्वास आहे. संकटांवर मात करण्याची अफाट स्फुर्ती रामनाम देते ते त्यावर गेली हजारो वर्षे भक्ती व वाणीचे जे "संस्कार" होत आहेत त्यामुळे. भक्ताने देवाला मोठं केलं, देवाने भक्ताला सांभाळलं. भक्त आणि त्याचे श्रध्दास्थान एकमेकांना आधार देतात - मोठे होतात हे दाखवण्यासाठी याहुन सुंदर व गोड उदाहरण नाहि. :-)


श्रध्दा आणि बुध्दिवाद या दिसायला विरुध्द असल्या तरी पुरक गोष्टि आहे. श्रध्दा हि डोळसच असावी. आणि बुध्दिवादाला देखिल श्रध्देचे अधिष्ठान असावे. "सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, परंतु तेथे भगवंताचे, अधिष्ठान पाहिजे।" श्रध्दा आणि बुध्दिवाद सहज एकत्र नांदू शकतात सर्वात मोठे उदाहरण - शिवछत्रपती आणि स्वामी विवेकानंद. कुठल्याहि गोष्टिवरती मग अगदि ती चांगलीहि का असेना सहज विश्वास ठेवला कि बुध्दिवादाला टोचणी लागते आणि अडचणीत आणणारे प्रश्न विचारले कि श्रध्दावानांना त्रास होतो. मुळात आपले अध्यात्म हे प्रश्नांमुळेच निर्माण झाले आहे. "स्वकियांशी कसा लढू?" या प्रश्नाने गीता निर्माण झाली. हल्ली प्रश्न विचारला कि श्रध्दावान म्हणवणारे तुटुन पडतात. मुळात श्रध्दा हि ’संयमानेच’ दृढ होत जाते. समोरच्याच्या एका वाक्यावरुन तलवारी परजायला सुरुवात केली धर्म हे वैचारीक डबकं होतं. त्याचं तालिबानीकरण होतं. सुदैवाने हिंदु धर्मात विचारावर कधीच बंधनं नव्हती इथे चार्वाक सुध्दा "हिंदूच" म्हणवले जातात. जगात दुसरा असा कुठलाहि धर्म नसेल कि ज्यात एकमेकांच्या विरोधी जाणारी शेकडो मते असूनहि तो भक्कमपणे उभा आहे. भक्कम तंबू उभा करायचा असेल तर चार वेगवेगळ्या दिशांना जाणार्‍याच दोर्‍या असाव्या लागतात. तंबू माझ्या एकट्य़ामूळे उभा आहे असं तो मधला खांब नाहि म्हणू शकत ना विरुध्द दिशेने जाणार्‍या दोर्‍याहि.

श्रध्दा ठेवताना प्रश्न विचारु नका हे मला पटत नाहि. विवेकानंदांसारखा अध्यात्मिक अधिकारी पुरुष एखाद्या "गुरु" करताना तुमचे समाधान होईतो अखंड प्रश्न विचारा असाच सल्ला देतो. हा खरा बुध्दिवाद आणि या बुध्दिवादाची पुढची पायरी श्रध्दा आहे. असा बुध्दिवाद आणि अशी श्रध्दा असेल तर राष्ट्र प्रगती पथावर जाईल. अन्यथा दुसर्‍याला "हे शरीर नाशिवंत आहे बालका, सोने नाणे यांचा मोह नको!" म्हणत स्वत:चे मोठे श्रीमंती आश्रम उभारणारे, "खास" भक्तांसाठी हवेतून साखळ्या काढणारे किंवा ’संभोगातून समाधीकडे’ नेणारे भोंदू देशाला विनाशाच्या गर्केत नेतील.


मी लिहिलय ते पटणं अथवा न पटणं हे ज्याच्या त्याच्यावर सोपवलं आहे.

मी स्वत:ला बुध्दिवादि समजतो. तर्काला न पटणार्‍या धार्मिक कर्ममकांडांची ची उत्तरे मिळाली नाहि तर मी बेचैन होतो. दुर्दैवाने "श्रध्दा" रुढी यांच्या नावाखाली मोठ्यांकडून ’असंच असतं’ हे कधीच न पटणारं उत्तर मी अनेकदा ऐकलं. आणि त्यातून माझा बुध्दिवाद अजून वाढत गेला. कदाचित माझ्याही काही अजून उत्तर न मिळालेल्या श्रध्दा - अंधश्रध्दा माझ्या नकळत मी जोपासत असेन, त्यांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न चालू आहेच.

लोकं देवाला शब्दश: "घाबरतात". उठसुठ देवाला घाबरणे मला कधीच पटले नाहि. देवाला तुम्हि "माऊली" म्हणता तर घाबरता का? किडुक मिडुक कारणां वरुन देवाचा कोप होतो??? हे लॉजिक मला पटत नाहि. हां आता तुम्हि कोणाचे तळपटाच करायला जात असाल तर देवाने शिक्षा केली नाहि तरच आश्चर्य आहे.

उपवासाच्या दिवशी चालणार नाहित म्हणून औषधे न घेणारी लोकं पाहिली आहेत मी. माझ्या समजण्याच्या पलिकडची गोष्ट आहे हि. अरे मरायला टेकल्यावर कसले उपास? आणि औषधे नाकारायचा अट्टाहास का? देव नाहि सांगत माझ्यासाठी शरीराला त्रास दे म्हणून. अध्यात्माच्या नावाखाली अनेक अनाकलनिय गोष्टि बेमालूम दडपल्या जातात. ते बघून त्रास होतो. अजून एक देवाला नेवैद्य दाखवताना त्याची चव घेतली गेली तरी मला चुकिचे वाटत नाहि. घरात लहान मुलांना भूक लागली असते आणि केवळ पुजा होऊन देवाला नेवैद्य दाखवायचा बाकि आहे म्हणून त्या इवल्याश्या जीवाला थांबवुन ठेवले जाते, हे मला कधीच पटाले नाहि. मला विचाराल तर खुशाल त्या मुलाला जेवू घालावे. मुलत: नेवैद्य हा उपचार फक्त अन्न ग्रहण करण्यापुर्वी देवाची आठवण व चांगली मनस्थिती तयार व्हावी यासाठी असतो.

उदाहरणा दाखल ही माझी वैयक्तीक मते आहेत. अनेकांना ती पटत नाहित. पटवून घ्यावीत हा अट्टाहास नाहि पण ती चूक आहेत असे कोणाला वाटात असेल तर "का?" या प्रश्नाचं सविस्तर आणि पटणारं उत्तर हवय. यालाच मी बुध्दिवाद समजतो.

संयम नसला कि ना बुध्दिवाद कामाला येतो ना श्रध्दा. अन्यथा उरतात ते केवळ "बुध्दिवाद" व "श्रध्दा" असे दोन पाढर्‍यावरचे काळे शब्द!


 - सौरभ वैशंपायन.

Wednesday, June 13, 2012

अतोस्मी लोके वेदे च प्रथित: पुरुषोत्तम:




पुलं जाऊन आज १२ वर्ष झाली. पण मुळात पुलं आपल्यात नाहीयेत हेच खरं वाटत नाही. कारण एकही दिवस असा जात नाही जेव्हा पुलंची किमान एकदा आठवण होत नाही. आणि कुठल्याही चांगल्या वाईट कारणाने पुलंची आठवण होतेच. त्यातून सध्या एकीकडे "अपूर्वाई" वाचणं सुरु आहे. शिवाय त्यांच्या वेगवेगळ्या MP3 ऐकणं असतच अधुन मधून. रोजचं आयुष्य असं पुलंकीत असणं यासारखं सुख नाही.



हा माणूस काहिही लिहू शकायचा. कुठल्याही विषयात, कुठल्याही लेव्हलपर्यंत विनोदी शब्दचित्रापासून ते चटका लावून जाणार्‍या प्रसंगाचे शब्दचित्र सहज उभं करायची ताकद त्यांच्या लेखणीत होती. आणि मुळात वाचणार्‍या व्यक्तीला ते पटायचं. हे फारच कमी लोकांना जमतं. व्यक्ती आणि वल्ली, असा मी असामी, गणगोत, म्हैस यातली खरी आणि काल्पनीक पात्रे वाचताना आपण यांना ’ओळखतो’ ही भावना तयार होते.


महाराष्ट्राला विनोद, उपहास, कोपरखळ्या नवीन नाहीत. पण पुलंच्या विनोदांची आणि एकंदरच विचारांची घडण आणि उंची वेगळी होती. पुलंनी विनोदाने कधी कुणाला ’घायाळ’ केले नाही. सोनाराने कान टोचावेत तसे त्यांचे विनोद असत. आणिबाणी जाहीर झाली तेव्हा शिवाजीपार्कवरील सभेत देखिल त्यांचा तोल सुटला नाही. त्या भाषणात तक्षकाची गोष्ट सांगताना - "...आणि ऋषींनी "तक्षकाय स्वाहा:" म्हंटले पण तक्षकाची आहुती यज्ञात पडेना, कारण तो इंद्राच्या सिंहासनापाठी लपला होता, म्हणून ऋषींनी ’इंद्राय तक्षकाय स्वाहा: अशी आहुती दिली त्या बरोबर ’इंदिराचं’ सिंहासन डळमळू लागलं" असं म्हणून वरुन "लक्ष द्या ... मी "इंद्राच" सिंहासन म्हंटलय बरं का!!" हेही ठेवून दिलं होतं. हे असले शालजोडितले भल्याभल्यांना सरळ करायची ताकद राखून होते. म्हणूनच कदाचित पुलं एकटेच "महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तीमत्व" ठरले.



पुलंच्या साधनेचं बारा वर्षांच एक तप झालय. पूर्वी म्हणे देवाची कठोर साधना केली की अनेक तपांनंतर तो प्रसन्न होत असे. इथे उलटं आहे. "पुरुषोत्तम" केव्हाच प्रसन्न झालाय. त्यांनी इतकं देऊन ठेवलंय - इतकं देऊन ठेवलय की आपल्या इवल्याश्या हातात ते मावत नाही.

अनंत हस्ते पुरुषोत्तमाने देता किती घेशील दो करांने?

 - सौरभ वैशंपायन.

Tuesday, March 27, 2012

उत्तर

गर्भरेशमी वस्त्र त्यावरी,
काठ जरीचे सळसळते,
वेळ एकटि अबोल साजण
चुकार कंकण हळहळते ॥१॥

अबोल साजण अबोल हसता
हुरहुरते पाऊल वळते
मी सांगावे तू ऐकावे
शब्दाविण खूण कळते ॥२॥

अता उरावे अता सरावे
दिव्यातले अत्तर जळते,
मिणमिण मिटते ज्योत लाजरी
 एक क्षण नजर मिळते ॥३॥

हळूच यावे मिठीत घ्यावे,
स्पर्शास बावळे मन चळते
असा दुरावा कसा उरावा?
मिठीतलेही अंतर छळते ॥४॥

रातराणीचा गंध मनावर
तनावरती दव गळते
फुले अवेळिच पारीजात का?
प्रश्नाविण उत्तर मिळते.॥५॥

- सौरभ वैशंपायन.

Saturday, March 17, 2012

बॅटमॅन फॉरएव्हर




आता नुसतं "सचिन तेंडुलकर" हे नाव डोक्यात जरी आलं, तरी ओठांचे कोपरे बाउंड्रिलाईनकडे चेंडू धावावा तसे कानांच्या दिशेने आपसूक धावतात. सचिनचं ज्या गोष्टिशी नाव जोडलं जात (अर्थात चांगल्या अर्थी) त्यातही जादू होत असावी - सगळ्यांना आठवत असेल सचिन याआधी "MRF" च्या ब्रॅन्डनेमची बॅट वापरत असे. त्यावेळी आमच्यात देखिल आपापल्या बॅटला तसाच MRF चा स्टिकर लावायचं खूळ आलं होतं. अर्थात तेव्हा हे समजायचं वय नव्हतं कि बॅटला नुसता स्टिकर लावला कि तेंडुलकर नाही बनता येत, पण या अज्ञानात सुख असल्याने असेल कदाचित, ती MRF ची बॅट हातात घेतली, कि टिम मधला एखाद्या फद्या देखिल सहज १५ - २० रन्स करुन जात असे.

सचिनला किती नामाभिधानं द्यावीत? किती बिरुदं लावावीत? त्याला मास्टर ब्लास्टर म्हंटलं, विक्रमांचा महामेरु म्हणून झालं, शतकांचा अनभि्षिक्त सम्राट जाहीर केलं आणि ते खरही होतं .... सिंहासनासाठी सम्राट नसतो - सम्राटांसाठी सिंहासन असतं. आणि ते तसं नसलं तर सम्राट जिथे बसतो ती जागा आपसूक सिंहासन बनते. सचिनने काही वेगळे केले नाही. पूर्वी अश्वमेध करु पाहणार्‍या बलशाली राजाला चतुरंग सेना घेऊन पृथ्वी पादाक्रांत करत जावी लागायची, आणि इथे या पठ्ठ्यानं फक्तं २२ यार्डच्या त्या पट्टिवरच इतकि दौड केली इतकि दौड केली कि सगळं जग त्या २२ यार्डात सामावलं. आणि बरोबरही आहे, वामनाने सुध्दा तीन पाऊलातच तीन्हि लोकं पादाक्रांत केले होतेच कि ..... सचिन तसाही उंचीने आणि आता कर्तृत्वाने "वामनच" आहे. फरक एकच त्या वामनाने बळी राजाला पाताळात धाडलं, हा बॅट्समनचे "बळि" घेणार्‍यांना प्रेक्षकांत धाडतो.

म्हणाल तर भारतात इतर अनेक खेळाडुही मोठे होते - आहेत, द वॉल असलेला द्रविड होता, पण त्याची बॅटिंग हि अतिसुंदर नववधूप्रमाणे होती. लाजत मुरकत आपलं आरस्पानी सौंदर्य दाखवायची, उगीच आंगचटिला येणार्‍या मवाली चेंडुंशी अंतर राखण्याचा खानदानीपणाही तिच्यात होता. द्रविड भारतीय संघाचा तारणहार नक्किच होता पण द्रविडची "भीती" कधीच वाटली नाही, आणि समजा तो पाच दिवस पीचवर उभा राहून दोन्हि संघांच्या चारही इनिंग एकटाच  खेळून गेला असता तरीही ती वाटली नसती. त्या उलट सेहवाग - दहा वर्षांच्या एखाद्या वांड मुलाला हातात चार फुटी वजनदार दांडके देऊन "हं, ही माळ्यावरची गादी! धोपटून साफ कर बरं!" हे सांगितल्यावर तो ज्या उत्साहाने ते काम करेल त्याच उत्साहाने सेहवाग पीचवरती वावरतो. सेहवाग कुठलाही प्रकार खेळला तरी T-20 चा शोध त्यानेच लावल्यासारखा खेळतो (उदा - वेस्ट इंडिज विरुध्द ODI मध्ये केलेले २१९). पण "सचिन" हा "सचिन" आहे त्याची बॅटिंग ही एखाद्या प्रचंड पडद्यावर सादर होणार्‍या रोमन युध्दकथेवरच्या चित्रपटासारखी असते आणि त्याचे फटके हे अक्षय्य भातातल्या अस्त्रांसारखे असतात. कधी कधी ICC ला सांगावसं वाटतं कि बाबांनो क्रिकेट  ग्राउंडला "स्टेडियम" का म्हणता?? म्हणण्यापेक्षा "रिंग" म्हणा (तसंच बॉक्सिंगच्या "चौरस" बाउटला "रिंग" का म्हणतात हे सुध्दा कोडंच आहे), म्हणजे जेव्हा जेव्हा सचिन खेळायला येईल तेव्हा दरवेळि नव्याने "लॉर्ड ऑफ द रिंग्ज" बघता येईल. कारण कुठल्याही ’गोलात’ उतरला तरी लॉर्ड तोच असतो.

सचिन आज २२ वर्ष खेळतोय, अजून किती खेळेल माहीत नाही (पुढल्या वर्ल्डकपची टिम "सचिन" हे नाव सोडुन बदलली असेल तरी मला आश्चर्य वाटणार नाही .... कधी कधी तर वाटतं विराट कोहलीला सुध्दा सचिनच्या हस्ते लाइफटाईम अचिव्हमेंट अवॉर्ड मिळेल तेव्हाही सचिन क्रिकेट खेळतच असेल). एखाद्या आयुर्वेदिक औषधाचं लिटरभर पाणी उकळून - उकळून त्याचा अर्धाकप काढा करावा तसं सचिन क्रिकेट खेळला आहे. म्हणूनच सचिन हा क्रिकेटचा परीपाक आहे. वर्ल्डकपच्या साखळि सामन्यात सचिन आऊट झाल्यावर साऊथ आफ्रिकेविरुध्द उरलेल्या आठ जणांनी केलेली हाराकिरी पाहून, पोलिओ डोस सारखं सचिनच्या अंगठ्याच २ - २ थेंब तीर्थ त्या प्रत्येकाला पाजावसं वाटलं होतं .... म्हणजे अशी पांगळी झालेली किंवा ऐनवेळि पक्षाघाताचा झटका आल्यागत कोसळलेली बॅटिंग निदान उभी तरी राहिली असती.

 सचिन आजवर इतका खेळला, वन डे मध्ये अठरा हजारहून अधिक धावा कुटल्या, टेस्ट मध्ये पंधरा हजार धावांपेक्षा जास्त केल्या. इतकि किर्ती, मान मरातब, पैसा मेहनतीने कमावले. कधी कधी विचार येतो कि सचिनलाच काय वाटत असेल? कारण त्याच्या प्रत्येक धावेसरशी त्याचा स्वत:चाच आधीचा रेकॉर्ड मोडला जातोय. त्याच्या मागे असलेला पॉन्टिंग जवळपास ४ हजार रन्सनी मागे आहे. आणि इतकं असून पॉन्टिंगचा उद्दामपणाचा अंशही सचिनच्या वागण्यात दिसत नाहि. सचिन फक्त पीच वरती असला कि मुजोर होतो ते सुध्दा फक्त बॅटनेच. सचिन मैदानात डोक्यावर बर्फ ठेवुन वावरताना दिसतो. तो कितीही चिडला तरी त्याच्या हातून गैरवर्तन होत नाही. वर्ल्डकपच्याच विंडिज विरुध्दच्या मॅच मध्ये देखिल अंपायरने नाबाद दिल्यावरही स्वत: खिलाडु वृत्ती दाखवुन, हा शांतपणे पॅव्हिलिअन मध्ये परतला. आज सारखीच तो जेव्हा मोठी खेळि करतो आणि त्यानंतर भारत हरत असेल तर त्याला किती मानसिक त्रास होत असेल?? गेले वर्षभर त्याचे शतक झाले नव्हते तर भल्या भल्यांनी त्याला निवृत्तीचा सल्ला दिला होता. त्यात द्रविडच्या निवृत्तीने तर मिडियाने अजून बोंबाबोंब करायला सुरुवात केली होती. पण जो २ दशकांहुन अधिक वर्ष क्रिकेट खेळतो आहे त्याला त्याच्यात क्रिकेट बाकि आहे कि नाहि हे समजणार नाहि का? बरं आता झालं महाशतक तर म्हणे ऑस्ट्रेलियात काय धाड भरली होती त्याला? बांगलादेश काय टिम आहे का? ... लगोलग बांगलादेशाने "विश्वविजेत्या संघाला" उत्तर दिलंय. "आम्हांला लिंबू-टिंबू समजू नका!" आता बोला, बाकि कोणी केले का मग बांगलादेश विरुध्द शतक?

असो, नेहमीच किरकिर करायला जन्म घेतलेल्यांना खास सल्ला - सचिन इतका पुढे निघून गेलाय कि त्याला स्पर्ष करणं जवळपास अशक्य आहे. तरी एक गोष्ट सांगू इच्छितो कि समजा उद्या क्रिकेटमध्ये एखादा नविनच चमत्कार जन्माला आला आणि त्याने रोज सकाळि उठुन एक सेंच्युरी जरी केली ना, तरी तो "सचिन" नाही हो बनू शकणार. खरच "सचिन" होणं खूप कर्मकठिण आहे. फार फार पूर्वी "ब्रह्मर्षी" होणं जितकं कठिण होतं ना कदाचित तितकच.

सगळ्यांनी सचिनला नावे ठेवली. काही कर्मदरीद्रि लोकांनी शब्दश: नावे ठेवली, आणि आमच्या सारख्या लोकांनी दर शतकानंतर ’घालिन लोटांगण’ म्हणत त्याला नावे बहाल केली पुढेही करत राहुच ..... पण सध्यातरी मला फक्त एकच नाव सुचतंय "द बॅटमॅन".... "बॅटमॅन फॉरएव्हर".

- सौरभ वैशंपायन.

Wednesday, March 14, 2012

Ra.hul

"भिंत" म्हंटल्यावर पहिल्यांदा आठवते ती चीनची भिंत, मग चांगदेव वाघावर बसून भेटायला येत आहेत हे ऐकून ज्ञानोबा माऊलींनी म्हणे ते ज्या भिंतीवरती बसले होते ती भिंतच त्यांच्या दिशेने चालवली होती ती भिंत, आणि जर्मनीचेच नसून जवळपास जगाचे दोन भाग करणारी आणि मग ८९ मध्ये धुळिस मिळालेली "बर्लिन वॉल". अनेक शतकांतून अश्या जग बदलणार्‍या भिंती निर्माण होत असतात. परवाच "धावणारी भिंत" क्रिकेट मधून निवृत्त झाली आणि आणखि एक चमत्कार पुढल्या पिढ्यांसाठी पुस्तकांत नोंद करण्यापुरता उरला.

पानिपतातून कसं जानू भिंताड्या ३ दिवस तग धरुन सदाशिवराव भाऊंच्या पत्नीला वाचवत  ग्वाल्हेरला निसटला? तसंच, ग्राउंडवरती आपल्या टिमने पराभवाकडे रांगायला सुरुवात केली कि आपला राहुल भिंताड्या उभा रहायचा, चक्क २-३ दिवस उभा रहायचा. अ‍ॅडलेड घ्या, कलकत्ता आठवा. किंवा नॉन - स्ट्रायकर एन्ड वर सेहवाग ते श्रीशांत असे १० जण बदलले तरी हा आपला स्ट्राईकवरती गौतम बुध्दाच्या शांततेने उभा राहिला होता ते आठवा. हे म्हणजे आपल्याच अनिलभाईने पाकिस्तानचा बाजार एकहाती उठवला होता त्याला वरताण झालं. एकदिवसीय क्रिकेटमध्येहि दहा हजारहुन अधिक धावा करुन त्याने केवळ तो केवळ कसोटि क्रिकेटमधला खेळाडू नव्हता हे आरामात सिध्द केलं.

राहुल द्रविड हा नको इतक्या सद्‍गृहस्थ धाटणीतला होता. म्हणजे नॅटवेस्ट सीरीज फायनल मध्ये गांगुलीने शर्ट वगैरे फिरवला तसं राहुलला स्वप्नातहि शक्य नव्हतं कारण तो मुळात त्याचा पिंडच नव्हता. संझगिरी एकदा म्हणाले होते कि सौरवच्या जागी राहुल असता तर त्याने खिश्यातून झटकायला म्हणून रुमालहि काढला नसता. पण मुळात द्रविडचे अवतारकार्यच वेगळे होते. म्हणजे वनवासात गेलेल्या राम-सीता-लक्ष्मणाचे कौतुक होते, श्रीरामाच्या पादुका सांभाळलेल्या भरताचे कौतुक होते पण १४ वर्षे आपल्या पतीपासून दूर राहिलेल्या उर्मिलेबद्दल कोणालाच पडली नसते .... अनेकदा तसंच अक्षम्य दुर्लक्ष द्रविडबाबत झालं. पण तो तिथे नसता तर? हा विचार केला कि केवळ द्रविड होता म्हणून पराभव टळला अश्या पोतडिभर मॅचेस सहज काढता येतील. मात्र त्याने कधीच नाराजीचा जाहिर सूर काढला नाहि. तो फक्त खेळत राहिला. त्याला कोणी सचिन - लारा - जयसूर्याच्या पंक्तीला बसवले नाहि, त्याला "स्फोटक" वगैरे कधी कोणी म्हंटले नाहि. अगदि द्रविड आउट झाला म्हणून वैतागून कोणी टिव्ही बंद केल्याचेहि मला आठवत नाहिये. पण इतर कोणी असलं नसलं तरी द्रविड असला कि आशेचा तंतू आपसूक चिवट व्हायचा. मॅच जिंकू, किमान ड्रॉ करु इथवर तरी समाधान मनात आपोआप असायचं. (या ऑस्ट्रेलिया दौर्‍यात राहुल खेळू शकला नसल्याचं कारण बहुदा ऑसीजनी वर्गणी काढून, एखाद्या ७२ घंटे मैं १००% इलाज करणार्‍या बंगालीबाबाला मूठ - करणी वगैरे करायला सांगितलं असावं अशी मला दाट शंका येतेय. नाहितर नेहमीचं ’गिर्‍हाइक’ द्रविड - लक्ष्मण सोडतील?? :-p)

सध्या तरी सचिनचे "महाशतक" हि एक प्रमुख "राष्ट्रिय चिंता" बनली आहे. वास्तविक सचिन ते शतकच काय नंतरहि अजून पाच - पंचवीस शतकं झळकावेल आता मुख्य प्रश्न असा आहे कि द्रविडची जागा कोण घेणार?? एखादि जाहिरात करण्याइतकं का ते सोपं आहे??? कारण राहुलची जागा घेणं म्हणजे फक्त भरमसाठ रन्स करणं नसतं. टिमला गरज असेल तेव्हा नांगर टाकून उभं रहाणं, समोरचा खेळाडू मागहुन येऊन १०० करतो तेव्हाहि आपण ६०-७० वरती शांतपणे खेळत रहायचं, समोर असलेल्या बॅट्समनशी "प्रतिस्पर्धी" म्हणून न खेळता "पार्टनर" म्हणून खेळत रहायचं, अनेकदा नको असलेल्या भूमिका संघासाठी यशस्वीपणे पार पाडणे म्हणजे राहुलची जागा घेणे असा अर्थ होतो. ऐनवेळि विकेटकिपर सारखी प्रचंड कठीण भूमिका पार पाडायची ताकद आताच्या संघात कोणाकडे आहे? राहुलने ती देखिल बजावली. कारण राहुल द्रविडची भूमिका हि भारतीय संघासाठी बहुतांशी द्रौपदि वस्त्रहरणाप्रसंगी श्रीकृष्णाची जी भूमिका होती तीच असायची.


राहुल भोवती प्रसिध्दीचं झगमग करणारं, डोळे दिपवणारं मोठं वलय असं दिसल नाहि. ना त्याच्या भोवती कुठले वाद कधी उभे राहिले. म्हणजे थोडक्यात बापडा क्रिकेटमधला उच्च मध्यमवर्गिय होता म्हणा ना. एखाद्या गोष्टिची - व्यक्तींची योग्य किंमत ती जागच्या जागी असली ना कि नसते, ती गोष्ट किंवा व्यक्ती गेल्यावरती जाणवणारी कमतरता घालमेल अजून वाढवते ..... राहुल तू विश्वास बाळग - आता जेव्हा जेव्हा भारताचा संघ पराभवाकडे रांगायला आणि मग दुडुदुडु धावायला सुरुवात करेल तेव्हा प्रत्येक घरातून हळहळता आवाज येईल "आता पीचवरती द्रविड हवा होता रे!"

 - सौरभ वैशंपायन

Tuesday, February 28, 2012

"The Artist" - घडाघडा बोलणारा ’शब्देविण संवादू’



वरचं चित्र बघुन अनेकांना RK studio च्या लोगोची किंवा सरळ सांगायचं तर "बरसात" च्या पोस्टरची थोडिशी आठवण होईलहि. परवाच उत्कृष्ट दिग्दर्शक आणि अभिनेत्यासह ५ "ऑस्कर" पटकावणर्‍या "द आर्टिस्ट" फिल्म मधला हा फोटो आहे. आणि ते मिळालं नसतं तरच नवल होतं. २०११-१२ साली चक्क "ब्लॅक अ‍ॅन्ड व्हाइट" (मराठीत कृष्ण-धवल) चित्रपट काढायचा हे मोठं धाडस आहे. हां अर्थात १९९३ साली स्पीलबर्गने देखिल "ऑस्कर शिंडलर" या जर्मन बिझनेसमची दुसर्‍या महयुध्दातील सत्यकथा "शिंडलर्स लिस्ट" या चित्रपटात मांडली होती हा चित्रपट देखिल ब्लॅक अ‍ॅन्ड व्हाइट होता आणि पठ्ठ्याने चक्क ७ अ‍ॅकेडमी अवॉर्ड मिळवुन "ऑस्कर शिंडलर्सच्या" लिस्ट मध्ये ७ "ऑस्कर" जमा देखिल करुन दाखवले. पण तो चित्रपट "मुक-चित्रपट" नव्हता. हा द आर्टिस्ट संपूर्ण मुक चित्रपट देखिल आहे. आणि ज्यांनी चार्ली चॅप्लीन किंवा त्या काळचे चित्रपटाचे दृष्य आणि मग संवादांची पाटि अश्या धाटणीचे चित्रपट बघितले असतील त्यांना हा चित्रपट कसा केलाय हे लगेच समजेल.  "मुक- चित्रपट" काढून ५ ऑस्कर खिशात घालण्यावरुन चित्रपट काय उंचीचा आहे हे आपसूक सिध्द झालंच आहे.

हि कथा आहे त्या काळाच्या एका अभिनेत्याची ज्याने मुक - चित्रपटांचा जमाना गाजवला आहे. तो प्रसिध्दिच्या शिखरावर आहे पण तरीहि सर्व सामान्यांशी तो सहजपणे वागतो. चित्रपटाची संपूर्ण कथा सांगत नाहि, परंतु अचानक भेटलेल्या गर्दितल्या एका सर्व सामान्य मुलीला तो तिच्या नृत्यातले कसब बघून आपल्या बरोबर काम करण्याची एक छोटि संधी देतो. त्याच दरम्यान चित्रपट "बोलायला" लागतो पण हा निर्मात्याच्या तोंडावर हसतो आणि हे काय चालणार? म्हणत चालता होतो. त्याच वेळि "ती" मुलगी इतर चित्रपटात लहान लहान रोल करत एक स्टार बनते तर दुसरीकडे आपला हेका सोडायला तयार नसलेला "तो" अगदि आपल्याकडचे सगळे पैसे घालून एक नवा "मुक चित्रपट" बनवतो आणि चित्रपट साफ कोसळुन तो कंगाल बनतो. पुढे शेवट व "ट्वीस्ट" अर्थात "सुखद" आहे. पण तो शेवट बघण्यात खरी मजा आहे. पैसा - नाव नसलं कि कसे सगळे पाठ फिरवतात व त्यानंतर स्वत:चा परिस्थितीशी न जुळवुन घेण्याचा हट्ट व त्याचवेळि काल पावतो जे आपल्याला मुजरे झाडत होते त्यांसाठी आपण "संपलो"  हि घुसमट "जुआन दुजारदाँ" याने जबरदस्त ताकदिने दाखवली आहे. इतकि कि आपली अस्वस्थतेने चुळबुळ सुरु होते. पण त्या घुसमटित ’अगतिकता आणि करारीपणा’ यांच्या एकमेकांवर कुरघोडि करणार्‍या अनेक छटा त्याने फार बोलक्या केल्या आहेत. त्याचा कुत्राहि फारच मिश्किल घेतला आहे. कुत्र्यालाहि एखादं अवॉर्ड द्यावं इतकं मजेदार काम त्याने केलय!

ह्याची स्टोरी लाईन आपल्याकडच्या "द डर्टि पिक्चर" बरोबर जुळते नव्हे जवळपास समांतरच जाते. अर्थात विषयाचा गाभा वेगवेगळा आहे. असो, तर शब्देविण असलेला हा संवादू कदाचित शब्दांसकट देखिल इतका प्रभावीपणे मांडता आला नसताअसं राहून राहून वाटतय. त्यात "जुआन दुजारदाँ" ची वाहवा आहेच पण काहि ठिकाणी दिग्दर्शक (मिशेल आझानाविसीअस) या कसलेल्या अभिनेत्याच्याहि वरणात झालाय. म्हणजे ३-४ प्रसंगात तर दिग्दर्शकच खरा हिरो ठरलाय इतके प्रभावी शॉट्स "मिशेल आझानाविसीअस" यांनी घेतले आहेत. त्यासाठी सलाम!!!

moral of the story - मुक्यानेच भरपूर काहि सांगणारा "द आर्टिस्ट" बघितलाच पाहिजे!

 - सौरभ वैशंपायन.

Saturday, February 25, 2012

My Father When I Was….......................

( I don't remember who was the author of this beautiful article. but i think it was noted from "Chicken soup" series.)


4 years old: My daddy can do anything.

5 years old : My daddy knows a whole lot.

6 years old : My daddy smarter than your dad.

8 years old : My daddy doesn’t know exactly everything.

10 years old : In the olden days when my dad grew up,things were sure different.

12 years old : Oh, Will, naturally, father doesn’t know anything about that. He is too old to remember his childhood.

14 years old : Don’t pay any attention to my father. He is so old fashioned!.

21 years old : Him? My lord, he’s hopelessly out of date.

25 years old : Dad knows a little bit about it but then he hould because he has been around so long.

30 years old : May be we should ask dad what he thinks. After all he’s had lot of experience.

35 years old : I ‘m not doing a single thing until I talk to dad.

40 years old : I wonder how dad would have handled it. He was so wise and had world of experience.

50 years old : I’d given anything if dad were here now, so I could talk this over with him. Too bad I didn’t appreciate how smart he was. I could have learned a lot from him.

Saturday, January 14, 2012

"गुरुदक्षिणा"

कौरव पांडव संगर तांडव द्वापर काली होय अति,
तसे मराठे गिलिचे साचे कलित लढ़ले पनिपति॥


- १४ जानेवारी १७६१, राष्ट्रावरचं संकट मराठ्यांनी आपल्या छातीवर झेललं. मराठे गिलच्यांविरुध्द एकाकि झुंझले. अभिमन्यूप्रमाणे झुंझत झुंजत देह ठेवला. उभ्या भारतातून एक हरीचा लाल मराठयांबरोबर पाय रोवून पानिपतात उभा राहिला नाही. मराठ्यांनी पाय गाडून युध्द केलं. रक्त मांसाचा चिखल झाला. मराठ्यांचा भावी पेशवा मारला गेला. पुण्यातल्या प्रत्येक घरातला एक जण तरी पानिपतावर कापला गेला. "दो मोती गलत, दस-बीस अश्राफात,
रुपयों
की गिनती नही|"
पण माझ्या दृष्टीने पानिपतावरती झालेला पराभव हा खरा पराभव नाही. कारण १८व्या शतकाच्या शेवटि तब्बल १४ वर्ष लाल किल्यावरती "भगवा" फडकत होता हा इतिहास आहे. मराठ्यांनी दिल्लीची वजीरीच नव्हे जर सगळी दिल्लीच पुन्हा मांडिखाली दाबली हा खरा इतिहास आहे. महादजी शिंद्यांनी एकेका रजपुताला सुटा करुन करुन पिदवला हा खरा इतिहास आहे,  "गढ मै गढ चित्तोड गड बाकि सब गढियॉ।" म्हणून लैकिक मिळवलेला किल्ला जवळपास वर्षभर लढल्यावर आणि डोळे पांढरे व्हावेत इतका तिखट प्रतिकार झाल्यावर ’महान’ सम्राट अकबराला मिळाला होता ..... मराठ्यांनी बोल - बोल म्हणता तो १८ दिवसांत जिंकला होता हा खरा इतिहास आहे. नजिबाचा नातू "गुलाम कादिर" याने "अली गोहर" बादशहाला आंधळे केल्याबद्दल व बादशाहाच्या कुलातील स्त्रीयांना भर दरबारात नग्न केल्याची शिक्षा म्हणून मराठ्यांनी त्याला टाचेकडून मानेकडे जिवंत सोलून ठार मारला होता व नंतर दिल्लीच्या लाहोरी दरवाज्याजवळ ३ दिवस टांगून ठेवला होता हा खरा इतिहास आहे. पानिपताला जबाबदार असलेल्या नजीबाची कबर मराठ्यांनी सुरुंग लावून उडवून दिली हा खरा इतिहास आहे..
म्हणूनच म्हणतोय खरा पराभव पानिपतावर नव्हे तर इतिहासाकडे बघण्याच्या दृष्टीकोनात झालाय, पुस्तकांच्या पानांवरती झालाय. दुसर्‍या महायुध्दातील दोस्तांच्या डंकर्कच्या पळपुटेपणाला कौतुकाने माना डोलावून "यशस्वी माघार" म्हणणारे मात्र पानिपतावर देह ठेवून राष्ट्र वाचवणारे पराभूत झाले असं म्हणतात तेव्हा त्यांची किव येते.
आज अडिचशे वर्षानी त्याच्याकडे बघताना केवळ "पराभव" म्हणून न बघता "गुरुदक्षिणा" म्हणून बघा. मराठ्यांनी शिवछत्रपतींना दिलेली "गुरुदक्षिणा". राष्ट्रावरचं संकट आपल्या छातीवर घ्यायची संथा त्या महामानवाने मराठ्यांना दिली होती. त्या संथेची गुरुदक्षिणा म्हणजे "पानिपत".
 - सौरभ वैशंपायन.

Thursday, January 12, 2012

... प्रसंगी अखंडित वाचित जावे॥




माझं सर्वात आवडतं स्वप्न म्हणजे घराची एक भिंतभर एक छान सुटसुटित कपाट आहे आणि ते कपाट भरुन मराठी - हिंदि - इंग्रजी भाषेतील शेकडो विषयांवरची हजारो उत्तमोत्तम पुस्तकं आहेत. हाताशी भरपूर वेळ आणि गरमा गरम कडवट - कडक कॉफिचा वाफाळता कप आहे. मग उठुन सावकाश एक एक पुस्तक न्याहाळत पुढे सरकत एखादं सुंदरसं पुस्तक काढून निवांत वाचत बसलोय. सुऽऽख! अर्थात अजून तरी हे "स्वप्नच" आहे. भिंतभर कपाटहि नाहिये व तितकि पुस्तकही नाहियेत. पण खरच उत्तम पुस्तकं विकत घेणं हि माझ्यासाठी 'गुंतवणूकच' आहे. कधीतरी मॅजेस्टिक किंवा राजहंस प्रकाशनाच्या दुकानात चक्कर मारली, कि, हवी ती आणि हवी तितकि पुस्तकं घेण्यासाठी आपल्याकडे तेव्हढा तगडा बॅंक बॅलन्स सध्यातरी नसल्याचे अपरंपार दु:ख होते. खरंच, मागे एकदा माझ्या मावशीने म्हंटलं तसं पुस्तकांसाठी बॅंकेने कर्ज द्यायला सुरुवात केली पाहिजे, मी लग्गेच अर्ज करुन भरपूर कर्ज काढीन.
पहिल्या पावसानंतर मातीला जो बोलका घमघमाट सुटतो ना? तितकाच मला नव्याकोर्‍या पुस्तकाचा गंध आवडतो. नविन पुस्तक घरात आणलं कि पहिलं काम म्हणजे त्यावरती नाव, विकत घेतल्या दिवसाचा दिनांक टाकणे आणि त्याला प्लॅस्टिकचं कव्हर घालणं. उत्तमोत्तम पुस्तक वाचणं त्यांचा संग्रह करण्या इतकच त्यांना कव्हर्स घालणे हे सुध्दा माझं आवडिचं  काम आहे. म्हणजे आई आपल्या लहान मुलांना कपडे घालते ना? तितकच लडिवाळ काम आहे हे. आणि पुस्तक खराब होऊ नये म्हणून कव्हर घालणं जितकं महत्वाचं असतं ना? तितकच ते पारदर्शक असणं मला गरजेचं वाटतं, पुस्तकाला मुखपृष्ठ - मलपृष्ठ असतात त्यांची मांडणी हि देखिल एक सुंदर कला आहे. पुस्तकाला पारदर्शक कव्हर घातलं नाहि तर त्याची मांडणी करणार्‍या कलाकाराच्या कलेला हेटाळल्यागत - दुर्लक्षित केल्यागत होतं. अनेकदा मी दुसर्‍या कोणाची चांगली पुस्तकं वाचायला आणली असतील तर परत देताना त्याला कव्हर नसेल तर छान कव्हर घालून देतो [बघा... विचार करा,  कोण कोण उत्तम पुस्तकं वाचायला देताय मला? :-D ].

अर्धाधिक लोकं पुस्तक ज्याप्रकारे वापरतात ना? ते बघून डोकं फिरतं. मुख्यत: वाचून झालेली खूण म्हणून जी लोकं पुस्तकाचे कोपरे दुमडतात [काहि महामुर्ख लोकं चक्क "अर्ध" पान दुमडताना मी स्वत: बघितली आहेत .... मेंदूला कमी सुरकुत्या असण्याचे लक्षण आहे हे! x-( ]  ना? ती लोकं अत्यंत बेशिस्त वाटतात मला. मग भले इतर गोष्टित कितीहि हुशार व टापटिप असोत. मुक्या जनावरांना विनाकारण मारणारे आणि पुस्तकांचे कोपरे दुमडणारे एकाच रांगेतले आहेत माझ्यासाठी.  खरंतर २०० पानांपेक्षा जाड असलेल्या पुस्तकाला स्वत:चा बांधणीतल्या  दोरीचा बुकमार्क हवा अस  माझं वैयक्तिक मत आहे.  तरी पुस्तकं म्हंटली कि पुस्तकासाठी मग आपोआप बुकमार्क्स ओघाने आलेच. विकत घेतलेले, भेट म्हणून मिळालेले, घरीच बनवलेले असे बरेचसे बुकमार्क्स आहेत माझ्याकडे. स्टॅम्प जमविण्याबरोबरच बुकमार्क्स देखिल जमवतोय आजकाल.

आजी मला अजूनहि पुस्तकांचा  एक श्लोक नेहमी ऐकवते -

"जलात् रक्षेत्, तैलात रक्षेत्। रक्षेत शिथिलबंधनांत्।
मूर्ख हस्ते न दातव्यम्। एवं वदती पुस्तकम्।"

हा श्लोक ऐकतच मोठा झालो असेन किंवा घरातली इतर माणसे पुस्तके कशी वापरतात ते बघूनहि असेल, पण पुस्तकांना जपायला शिकलो. खरंतर कुठलेहि पुस्तक एका बाजूने दुमडले आणि वाचतोय हे मला आवडत नाहि, पण निदान १०० पानी पुस्तकांपर्यंत हे ठिकहि आहे त्याहुन जाड पुस्तक दुमडलं, किंवा त्याच्या मुखपृष्ठाची - मलपृष्ठाची ’भरतभेट’ घडवून आणली कि टाळकंच सरकतं माझं. डोळ्यांच्या काळजीसाठी  झोपुन वाचणे चूकच आहे, पण कधीतरी बाहेर छान पाउस पडत असतो हवेत मस्त  गारवा आला असतो अश्यावेळी उबदार पांघरूण घेऊन वाचत पडण्याचा स्वाभाविक मोह होतोही. कधीकधी अगदी शेवटची १०-१२ पानं उरली असतात डोळ्यांवर झोपहि असते पण पुस्तक सोडवत नसतं अश्यावेळि लोळत पुस्तक वाचलं जातं. तरीहि   २५०-३०० पानी पुस्तक असेल तर ते झोपून वाचणे टाळतोच. अश्याने त्याची शिलाई उसवते. ती खिळखिळी होतात आणि त्याची पाने ग्रीष्म ऋतुत झडल्यागत होऊन काहि दिवसांत पुस्तक "निष्पर्ण" होण्याची भीती असते.  मग उरलेल्या २ पुठ्यांनी हवा घेत बसावे लागते.

काहि लोकांना खात - खात वाचायची सवय असते. पुस्तक चांगलं असेल तर क्वचित मी सुध्दा ती चूक करतो, पण खाताना पुस्तक असलंच तर ते डाव्या गुडघ्याजवळ ठेवून वाचतो म्हणजे त्यावर काहि सांडायची भीती नसते. तसेच काहि पराकोटिच्या अभ्यासू लोकांना पुस्तकावरतीच "नोट्स" काढायची सवय असते. एकतर पुस्तकावर मला माझं किंवा कोणाचंहि नाव सोडून दुसरा ठिपकाहि आवडत नाहि आणि काहि विद्वान पेनाने चक्क त्या परीच्छेदाच्या वर - खाली आजूबाजूला गिचमिड गिचमिड करत काहितरी लिहुन ठेवतात किंवा फरा - फरा रेषा मारतात. विशेषत: वाचनालयातून आणलेल्या पुस्तकांवर हे अत्याचार हमखास झालेले दिसून येतील. दहावीला - बारावीला देखिल जिथे वर्गात पुस्तकावरती खूणा करुन ठेवा असं शिक्षक सांगत तिथेहि मी पेन्सीलने खूणा केल्या होत्या व खोटं वाटेल पण एक -दोन पुस्तकांवरच्या त्या खूणा परीक्षा झाल्यावरती मी इमाने - एतबारे रबराने खोडल्याचंहि मला आठवतय.

 पुस्तकाला - ग्रंथांना जवळच्या मित्रासारख प्रेमाने किंवा घरातल्या वृध्द माणसासारखं आदराने वागवलं पाहिजे असं मला नेहमी वाटतं. मुक्याने कितीतरी बोलत असतात ती आपल्याशी. लक्ष दिलं नाहीत तर बिचारी निमूट पडून रहातात. त्यांना वेळिच खायला घाला, एकदा तरी बाहेर फिरायला न्या अशी मुक्या पाळीव प्राण्यासाठी करावे लागते तसेही काही नसते. मात्र दोन - चार महिन्यातून एकदा धूळ झटकावी (आता पुस्तकं वापरात असतील तर ती देखिल बसत नाहि), वाळवी लागू नये म्हणून कपाटाच्या कोपर्‍यात चार डांबराच्या गोळ्या सरकवाव्यात इतपत केलं कि झालं. फार अपेक्षा नाहित.

मी काहि इतरांना ग्रंथपालाचा कोर्स करा असं म्हणत नाहिये, (त्यात पुस्तकांची काळजी कशी घ्यावी यावरच पुस्तकं असतात.) पण इतपत जपणूक केलीत तरी हेहि नसे थोडके. असो.... तर .... मी जेव्हा माझं नवीन घर बांधीन ना? तेव्हा एक मोठी भिंत भरुन कपाट तयार करुन घेईन आणि त्यात शेकडो विषयांवरच्या हजारो उत्तमोत्तम पुस्तकांचा संग्रह करीन.  मग एखाद्या दिवशी आराम खुर्चीतच "चचलो"  तरी पुलंच किंवा इतिहासाचं एखादं सुंदरसं पुस्तक माझ्या छातीवर  पालथं ठेवलेलं असेल. फक्त ते श्वासानी वर खाली होत नसेल इतकंच.

 
- सौरभ वैशंपायन

Saturday, December 31, 2011

चिंता करितो विश्वाची




काल संध्याकाळि कॉफि पिताना ऑफिसच्या खिडकितून दिसणारा सूर्यास्त २०११ संपलं याची जाणीव देऊन गेला. दरवर्षी प्रमाणे "आयला ... वर्ष कसं सरलं ते समजलच नाहि" हे गेले आठवडाभर इतरांकडून ऐकणारं वाक्य मीच स्वत:ला ऐकवलं. खरच, दर वर्षी असच वाटत रहातं. व्यक्तीगत आयुष्यात अनेक लहान - मोठ्या घडामोडि घडल्या असतात. आनंदाचे - दु:खाचे क्षण आले असतात. अनेक नविन लोक आयुष्यात आले असतात काहि जवळची माणसं कायमची सोडून गेली असतात. अनेक गोष्टि पहिल्यांदाच केल्या असतात, आणि काहि गोष्टि शेवटच्याहि.

आपण आपल्या व्यक्तीगत आयुष्याचा ताळेबंद मांडतोच. पण आपल्या आजूबाजूला काय घडलं? काय घडतय व काय घडणार आहे? ह्याचा विचार किती स्वस्थपणे करतो? तसं तर प्रत्येक वर्ष आपलं काहीतरी वैशिष्ट्य मागे ठेवून जातं. पण २०११ हे वर्ष जगाच्या इतिहासात खूप बदल घडवण्याची सुरुवात ठरले होते. २०१२ मध्ये त्याचे परिणाम दृश्य स्वरूपात येतील. माझ्या मते १९८९ नंतर सलग इतक्या घडामोडि असलेले क्वचितच कुठले वर्ष असेल. १९८९ मध्ये सोव्हिएत युनियन कोसळले, पाठोपाठ बर्लिनची भिंत कोसळली "ग्लासानोत" व "पेरीस्त्रोइका" चे वारे रशियात वाहू लागले. अमेरिका एकटी 'महासत्ता' उरली. त्याचा माज अमेरिकेला तसाही होताच नंतर तर काही धरबंदच उरला नाही. जगाचे पोलीस हि भूमिका अमेरिका हट्टाने रेटू लागली. अफगाणिस्थानला रशियाचे व्हिएतनाम करायच्या नादात अमेरीकेने जे जिहादि पोसले होते ते मोजून एका दशकाने अमेरीकेवर उलटले. त्यात २००१ साली वर्ल्ड ट्रेड सेंटर खाली आल्यावर अमेरीकेची धुंदि काहिशी उतरली. त्याचे परिणामहि दूरागामी होते. त्याचीच फळे म्हणून अमेरिकेला आपली सेना अफगाणिस्थान - इराक मध्ये उतरवावी लागली. २००३ मध्ये बुश धाकटे यांनी इराक मध्ये उतरवलेले सैन्य गेल्याच पंधरवड्यात बराक ओबामांनी परत बोलावले आणि २०११ चा नाताळ अमेरीकन सैनिक आपापल्या घरी साजरा करतील हे दिलेले आश्वासन पाळले. यामागे अनेक उघड व छुपे हेतु आहेत. पुढच्या वर्षी असलेल्या निवडणुका लक्षात घेऊन ओबामांचे हे काम बघायला हवे. बुश कुलोत्पन्न दिवट्याने इराक  - अफगाणिस्थानात उतरवलेली सेना परत येण्याची चिन्हे दिसेनात. व्हिएतनाममध्ये आपलं काळं झालेलं तोंड अमेरिकन जनता अजून विसरली नसावी, व म्हणून इथेही आपले तळपट होणार ह्या स्वाभाविक भीतीने याच्या विरुध्द सामान्य अमेरिकन माणूस आवाज उठवू लागला. अखेर आधीच्याने केलेल्या चुका ओबामांनी निस्तरायचा पायंडाच पडला. सामान्य अमेरिकन आपल्या पाठीशी उभे करायला ओबामांनी ज्या अनेक गोष्टी केल्या त्यातली एक म्हणजे ह्या दोन ठिकाणाहून सैन्य परत बोलावणे. पण ह्याचे परीणाम भारताला व इस्त्राइलला भोगावे लागणार आहेत. कारण इथुन मोकळे झालेले व डोईजड झालेले जिहादि आता मोकाट बैलांप्रमाणे लेबनॉन व कश्मीरमध्ये उधळायला मोकळे झाले आहेत. 

२०११ या वर्षाची सुरुवातच अरब राष्ट्रांतील अनागोंदिने झाली. "अरब स्प्रिंग" म्हणून जगभर या लाटेचे कौतुक झाले, ते बरोबरहि होते. ट्युनिशियातील एका सामान्य फळविक्रेत्याने आत्मदहन केले, त्याचा वणवा झाला. पश्चिम आफ्रिकेच्या मॉरीटानापासून ते ओमानपर्यंत सामान्य जनतेला साम-दाम-दंड-भेद वापरुन आपल्या दावणीला बांधलेल्या आपापल्या नेत्यांविरुध्द अतिसामान्य माणूस उभा राहिला, त्याने मदांध सिंहासने चिरफाळली. इजिप्तच्या तेहरीर चौकात जमलेली गर्दि बघून जगभरातल्या नेत्यांच्या पायाखालची जमिन सरकली असेल, आपल्याकडे टिम अण्णाचे नवीन नवीन वारे होतेच. चीनने तर अरब उठावांच्या बातम्यांवर काहि काळ बंदि घातली होती. ट्युनिशिया, अल्जेरीया, लिबिया, इजिप्त, जॉर्डन, सिरीया, सौदि अरेबिया, ओमान, पॅलेस्टाइन सगळिकडे जनता रस्त्यावर उतरली. हिरण्याकश्यपूने प्रल्हादाला "कुठे आहे तुझा विष्णू?" म्हणून खांबाला लाथ मारावी आणि त्यातुन नरसिंह बाहेर यावा तसं काहिसं होतं हे. अरब राष्ट्रांत बघता बघता सत्ता पालट झाले. काहि ठिकाणी निवडणूका जाहिर झाल्या. गडाफिसारखा क्रूर हूकूमशहा दयेची याचना करत करत मेला. याच कर्नल गडाफिने एकेकाळि अमेरीकेला बोचकारले होते. "तेल" हे त्याचे शस्त्र होते. आणि अमेरीका त्याचे काहिहि बिघडवू शकली नव्हती. अमेरीकेचा एक शत्रू असा परस्पर मारला गेला. मुळात तो मारला गेला कारण अमेरीकेला तो नको होता. अन्यथा त्याची गरज असती तर अमेरीकेने त्याच्यासाठी काहिहि केले असते, जशी ती सौदि राजघराण्यासाठी करते अगदि तसेच. सौदि अरेबियातहि उठाव झाले पण त्याला फार हवा दिली गेली नाहि. सौदि राज घराण्याने सुध्दा चार - दोन सुविधा जाहिर करुन या बंडखोरीतली हवा तात्पुरती का होईना काढून टाकली.

लिबियात यजमानाच्याच काठीने साप मारला गेला त्यामुळे अमेरीकेला फार तोशिस पडली नाहि. पण २ मे तारीख उजाडली तीच या वर्षातली सर्वात महत्वाची बातमी घेऊन - "अमेरीकेच्या कारवाइत ओसामा बिन लादेन ठार!" बहुदा हि या वर्षातलीच नव्हे तर शतकातली सर्वात महत्वाची बातमी असावी. हे सगळे ऑपरेशन इतके गुप्त होते नेव्ही सीलच्या नेमक्या कुठल्या कमांडोने स्वहस्ते लादेनला पैगंबरवासी बनवले हे बराक ओबामांना देखिल सांगितले नाहि. पाठोपाठ ऑक्टोबर मध्येच अन्वर अल अवलाकि अमेरीकेच्या ड्रोन हल्यात मारला गेला. अल कायदाचे कंबरडेच याने मोडले. सध्या अमेरीका अयमन अल-जवाहिरीच्या मागे आहे. हा मारला गेला तर अल कायदाचा चेहराच पुसला जाईल. अर्थात याचा अर्थ अल कायदा संपली असा होत नाही. न जाणो ह्या मंथनातून कोणी सवाई लादेन उभा न राहिला म्हणजे मिळवले.

ह्या घडामोडित जग बुडले असताना तिथे युरोप व युरोपियन संघ आत्ममग्न मुलांप्रमाणे आपल्याच कोषात गेलाय हे सामान्य लोकांच्या फार उशीरा लक्षात आले. त्याचे झाले असे कि सध्या युरोपातील ग्रीस व इटली या राष्ट्रांची आर्थिक स्थिती अतिशय खराब आहे. खरंतर याची सुरुवात दोन वर्षांपूर्वी स्पेन, पोर्तुगाल, आयर्लंड यांच्यापासून झालीच होती, तद्‌नंतर ग्रीस व आता ऑक्टोबरच्या अखेरीस इटलीची भर पडली. इटली हि कुणी छोटीमोठी आर्थिक सत्ता नव्हे युरोपातली तिसरी मोठी अर्थव्यवस्था आहे आणि त्यांच्यावरच्या २.६ ट्रिलियन डॉलरच्या कर्जाच्या परतफेडिसाठी त्यांनी युरोपियन महासंघाकडे व जागतिक बॅंकेसमोर टोपी उपडि धरली. पण हा काहि ३ पैश्याचा तमाशा नव्हे कि वाजवली रोडच्या बाजूला गिटार आणि येणार्‍या - जाणार्‍याने टाकले २-४ युरो टोपीत. हा पैसा देखिल त्यांना देणार कोठून? मग बुडणारा जसा आजूबाजूला मिळेल त्याचा आधार घेतो तसे ग्रीस - इटली दिसेल तो हात पकडायला तयार आहेत. त्यांना जवळचे त्यातल्या त्यात भक्कम हात म्हणजे फ्रान्स व जर्मनी. पण ह्यांना पैसा - बेल आऊट पॅकेज पुरवावे तर त्याचा दुसरा अर्थ आपल्या तिजोरीला खड्डा पाडून घेणे. व आपल्या तिजोरीतला पैसा हा फ्रेंच - जर्मन नागरीकाचा आहे. अ‍ॅन्जेला मर्केल व सार्कोझी सहाजिकच हातचे रा्खून मदत करत आहेत. त्यांची पाऊले चूक कि बरोबर हे कदाचित येणारी ५ - ७ वर्षेच सांगू शकतील. सध्यातरी ग्रीस - स्पेन - इटली "युरो" चलन सोडायच्या विचारात असावेत आणि ते तसे असले तरी आश्चर्य वाटायला नको. अर्थात "युरो" सोडला तरी युरोपिअन युनियन कोणीहि सोडणार नाहि हे नक्कि. तिथे युरोपचे असे तर ऑगस्ट मध्ये "स्टॅन्डर्ड अ‍ॅन्ड पुअर" ने अमेरीकेचे गुंतवणूकिचे AAA स्टॅन्डर्ड कमी करून ते AA+ वरती आणले आणि मग अमेरीकेसकट जगभरात हि काहि दुखरी कळ उठली कि बास रे बास. एरवी या S&P चे गोडवे गाणारेच या संस्थेवरती आग पाखड करु लागले. भारतीयांसाठी गंमत म्हणजे अमेरीकेला तुमच्या देशातील गुंतवणूक AAA लायकिची नाहि हे सांगणारा बहाद्दर एक भारतीय होता. "देवेन शर्मा" त्यांच नाव. आपल्या बिहारच्या व आता झारखंडच्या धानबाद नामक एका मागासलेल्या भागातून मेहनतीने तिथे पोहचेला पठ्ठा. अर्थात राजा नागडा फिरत असला तरी तो नागडा आहे हे सांगायचं नसतं, ती चूक देवेन शर्मांनी न बिचकता केली. महिनाभरातच त्यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला.

युरोपियन महासंघाचं हे असं तर अमेरीकेतील न्यूयॉर्क मधल्या वॉल स्ट्रीट वरती सप्टेंबर मध्ये हजारो लोक एकमेकांच्या हातात हात गुंफुन उतरले. २००८ मध्ये जी आर्थिक मंदि आली होती त्यानंतर गेल्या २ वर्षात बरीच उलट सुलट चर्चा झाली, व १% लोकं जी आर्थिक ताकद राखून आहेत ते सरकारला त्यांची धोरणे बदलायला भाग पाडतात यावर लोकं आक्षेप घेऊ लागली. संप्पतीचे असमान वाटप, बेरोजगारी, भ्रष्टाचार याविरुध्द आवाज उठवण्यासाठी "ऑक्युपाय वॉल स्ट्रीट" हि संकल्पना निघाली. त्याचे पोस्टरच - एक नृत्यांगना चार्गिंग बुल (अमेरीकन स्टॉक एक्स्चेंजचे चिन्ह) वरती नृत्य करते आहे व खालती "Occupy wall Street, September 17th, BRING TENT" अशीच केली होती. आणि खरच ३ दिवसात हजारो लोक तिथल्या झ्युकोटि पार्क मध्ये जमले. मध्यमवर्गीय लोकांनीच वर्गणी काढून या चळवळीसाठी पैसा उभा केला. वॉल स्ट्रीट भागात लाऊड स्पीकर वरती बंदि असल्याने लोकांनी एक गंमतीदार शक्कल लढवली - "ह्युमन मायक्रोफोन".... म्हणजे जे घोषणा देणारे किंवा भाषण देणारे होते ते एक छोटं वाक्य म्हणून थांबायचे, ते वाक्य जितक्या लोकांनी ऐकलय ती परत तेच वाक्य एकत्र म्हणत, मग त्यांचा आवाज जितक्या लोकांपर्यंत जाइ ती लोकं पुन्हा ते वाक्य म्हणत .... अश्या तर्‍हेने "लिखित नियम" न मोडता उलट अजून मोठ्या आवाजात घोषणांच्या लाटा एका पाठोपाठ एक थडकत राहिल्या. यातली मुख्य घोषणा होती "we are 99%."


ह्या झाल्या मानव निर्मित घटना. २०११ नैसर्गिक आपत्तींनीहि गाजवले. मुख्यत: जपानमध्ये आलेले भूकंप व त्यानंतरची अति विध्वंसक त्सुनामी. हे कमी होतं म्हणून कि काय फुकुशिमा अणूभट्टितून आण्विक किरणांचे मोठ्या प्रमाणावर प्रसारण झाले. मुळात आधीच जपान आर्थिक चणचणीत असताना हि संकट एकामागोमाग एक थडकतच होती. या सगळ्याची भरपाई व्हायला निदान १० वर्षे सहज जातील ती सुध्दा ’स्थिर’ वर्षे हवीत. थायलंड, मेक्सिको या ठिकाणच्या महापुरांनी देखिल जगाच्या व अर्थात त्या देशांच्या आर्थिक बाजूवर मोठा आघात केला आहे. थायलंडच्या महापुराने तर अनेक इलेक्ट्रिक उपकरणे विकणार्‍या कंपन्यांच्या पुरवठ्यावर परीणाम झाला. कारण अनेक मोठ्या कंपन्यांचे उत्पादन करणारे कारखाने थायलंड मध्ये आहेत. साधी हार्डडिस्क घ्या, १० पैकि ८ हार्डडिस्कवरती ’मेड इन थायलंडचाच’ शिक्का असतो. या दिवसात मागणी इतका पुरवठा नसल्याने बाजारातील हार्डडिस्कच्या किंमतीहि लक्षणिय वाढल्या. जग आर्थिक दृष्ट्या असे जवळ आल्याने दुसर्‍या देशांतील कुठल्या आपत्तीने आपल्या सामान्यांच्या खिशाला चाट लागेल ह्याचा विचारहि करता येत नाहि. 

एकूणच गेल्या वर्षातील जगाचा आणि  देशाचा धांडोळा घेतल्यावर दिसणारं चित्र फारसं आशादायक नव्हतं असंच म्हणावं लागेल. इतक्या अस्थिर वर्षात जग तग धरुन रहातय हेच विशेष. आर्थिक संकटांनी अमेरीका, युरोप, जपान, बर्‍याच अंशी भारत देखिल ग्रासले आहेत. भारतात महागाईने गेल्या ६० वर्षातला कहर केला आहे, रुपयाची पत डॉलर समोर ३ महिन्यात घसरली. रेपो रेट कमी करायला RBI तयार नाहि, S&P ने अमेरीके बरोबर अर्थात भारताच्या गुंतवणूकिच्या दर्जाला कमी लेखल्याने परदेशी गुंतवणूकिचे वांदे झाले आहेत, शेअर बाजार त्या गणिताच्या पुस्तकातल्या भिंतीवरच्या पाली सारखा ३ फुट वर २ फुट खाली करतोय (कधी कधी तर उलटा ४ फुट खाली सुध्दा). राष्ट्रकुलदिपक कलमाडि, राष्ट्रसेविका कनिमोळी, ए. राजा वगैरे सुखनैव दिवस ढकलत आहेत. टिम अण्णांची आशा वाटत होती पण लोकांना कंटाळा येईल इतका मारा त्यांनीहि केल्याने जनता पुन्हा थंड झाली आहे. लोकपाल बिल फुटबॉल सारखे इथुन तिथे, ह्याकडून त्याकडे लाथाडले जात आहे. त्यातून ५ राज्यांच्या निवडणूका जाहिर झाल्याने हरीदासाची कथा मुळ पदावर आली आहे. आणि जनता पुन्हा आपणहुन खड्ड्यात उडि मारणार असेहि दिसत आहे.

२०११ हे वर्ष जगभरातच चळवळिंचे वर्ष होते. ह्यातल्या अनेक घटना पुढल्या दशकावर दूरागामी परीणाम करणार आहेत. पुढल्या वर्षात जवळपास २० देशांच्या निवडणूका आहेत. आणि त्यात अमेरीका - रशिया यांची अध्यक्ष - पंतप्रधान यांसारख्या महत्वाच्या पदांच्या निवडणूका आहेत. या निवडणूकांत ओबामांचे पारडे जड असले तरी आर्थिक निकषांवर त्यांची लोकप्रियता कमी झाल्याचे बोलले जात आहे, तश्यातच रीपब्लिकनांनी मीट रुमनींना अध्यक्षपदाचा दावेदार म्हणून उभे केले तर ओबामांना तगडि टक्कर मिळेल. दुसरीकडे रशियात तसेहि राष्ट्राध्यक्ष पुतीन लोकांच्या रोषाला बळि पडले आहेत, पण तरी ते आता पंतप्रधान पदासाठी उभे राहतील असे सध्याचे पंदप्रधान दिमित्रि मेदवेदेव्ह यांनीच जाहिर केले आहे. तुलनेने विरोधकांचा आवाज सध्या तुलनेने कमी असला तरी पुतीन यांना निवडणूक जिंकणे सोपे जाणार नाहि असे दिसत आहे. याच दरम्यान चीन मधल्या कम्युनिस्ट पार्टीच्या अध्यक्ष पदाचीहि निवडणूक होणार आहे. अर्थात हि निवडणूक चीनमध्ये अध्यक्षपदापेक्षा कमी नाहि असेच म्हणावे लागेल. फ्रान्समध्येहि अध्यक्षपदाची निवडणूक आहे. ह्या निवडणूकिवर फ्रान्सचीच नव्हे तर आर्थिक दृष्ट्या घुसमटलेल्या युरोपाचीहि मदार आहे असे म्हणावे लागेल. निकोलस सार्कोझी परत सत्तेवर येण्याची शक्यता मला तरी वाटत नाहि. खेरीज मेक्सिको, झिंब्वावे, व्हेनेझुएला, लिबिया, इजिप्त, इराण, दक्षिण कोरीया, येमेन, केनिया, युक्रेन अश्या जगावर परीणाम करतील अश्या देशांच्याया निवडणूका आहेतच.

तिथे उत्तर कोरीयात जनतेला मारुन मुटकुन "लाडके" म्हणवले जाणारे किम जोंग इल यांनी गेल्या पंधरवड्यात अखेरचा श्वास घेतला तरी लोकांना सुटकेचा निश्वास टाकता आला नाहि. कारण लगोलग त्यांचे धाकटे ’सुपुत्र’ किम जोंग उन गादिचे वारसदार ठरवले गेले आहेत. इतकेच नव्हे तर लगोलग त्यांना सेनेचे सर्वोच्च कमांडर देखिल जाहिर केले आहे, ह्याचा दुसरा अर्थ त्यांनी अपेक्षेपेक्षाहि बरीच लवकर पकड मजबूत केली आहे. असेच चालू राहिले तर हे तरुण रक्त जोशात येऊन दक्षिण कोरीयाची खोड काढणार नाहित याची अजिबात खात्री नाहिये. तसेहि गेल्यावर्षी दक्षिण कोरीयाची एक पाणबुडि उत्तर कोरीयाने बुडवली होती. युध्द सुरु व्हायचेच बाकि राहिले होते, पण तेव्हा पासून ताणले गेलेले संबध अजून सामान्य स्थितीवर आले नाहियेत. आणि येण्याची चिन्हेहि नाहित. उलट आम्हि दु:खात असताना दक्षिण कोरीयात नववर्षाचे स्वागत करणारा तारा दिसल्यास ते दक्षिण कोरीयाला महाग पडेल अशी धमकिहि त्यांनी दिली होती.


उत्तर कोरीयाच्या या धमकिच्या पार्श्वभूमीवरतीच सगळ्या जगाकडे दृष्टिक्षेप टाकल्यास २०१२ मध्ये जलप्रलय होऊन जग बुडण्यापेक्षा जगाच्या विविध भागात अग्निप्रलय होण्याचीच शक्यता जास्त दिसत आहे. आणि ती झालीच तर मध्यपूर्व हेच त्याचे केंद्र असेल. अरब स्प्रिंगसाठी कितीहि टाळ्या वाजवल्या तरी काहि बाजूंवर विचार हा झालाच पाहिजे. झाडून सगळ्याच अरब राष्ट्रात अचानक जाग व चेतना आल्याने प्रचंड अस्वस्थता व अस्थिरताहि आली आहे. आधीच या अरब राष्ट्रांचे एकमेकांत फारसे पटत नाही. तरी जेव्हा एखाद्या देशात क्रांती होते तेव्हा त्याला स्थिरता येण्यासाठी बाजूची राष्ट्रे शांत व भक्कम असावी लागतात पण अरब राष्ट्रांचा अख्खा पट्टाच क्रांतीप्रणव झाल्याने  सगळे चित्र अंधुक आहे व पुढले वर्षभर ते तसेच राहिल अशी चिन्हे आहेत.  लिबियामध्ये कट्टर मुस्लिम विचारधारेची लोकं सत्ता हस्तगत करणार असे वातावरण तयार झाले आहे. तसं झालंच तर लिबिया हा आफ्रिकि देशांतला दुसरा पाकिस्तानच तयार होईल जो आतंकवाद्यांना सुरक्षा देतो व मागणी तसा पुरवठाहि करतो. ट्युनिशियात अल नाहद नावाची कट्टर पंथियांचा पक्ष लोकांचे भरपुर समर्थन प्राप्त करते आहे. मोरक्कोची स्थिती वेगळि नहिये. १९७९ मध्ये इराणमध्ये जी इस्लामिक क्रांती झाली त्याची आठवण काहिंना होईल. शिया पंथिय इराणचा प्रभाव लेबनॉन वरती आहे. इजिप्त मध्येहि मुस्लिमब्रदरहुडचे बागलबच्चे असलेले "फ्रिडम अ‍ॅन्ड जस्टिस" पार्टि व कट्टर पंथिय सलाफी अल-नूर एकत्रित पणे सत्तेकडे कूच करत आहेत. याचा एक अर्थ सत्ता कट्टरपंथियांकडे जाण्याचा धोका आहे असा असला तरी दुसरा अर्थ  - होणारा संघर्ष हा मुक्त विचारधारा व मुस्लिम विचारधारा यांत होणारा नसून दोन मुस्लिम विचारधारांमधला आहे जे जास्त धोकादायक आहे. तसं बघता अरब राष्ट्रांत ३ मुस्लिम विचारधारा आहेत १) कट्टरपंथिय जे लिबियात आहेत, २) मवाळपंथी जे टर्कित दिसतात तर ३) मुस्लिमब्रदरहुड जे मधला मार्ग अवलंबत आहेत.


पुढचा विचार इस्त्राइल - पॅलेस्टाईन भागाचा करावा लागेल. गेल्या २ हजार वर्षाच जगातला क्वचितच असा कुठला भाग असेल तो इतका अस्थिर आहे. पॅलस्टाइन मध्ये हमासचा जोर प्रचंड वाढला आहे. वरुन त्याला सिरीया - इराणचा उघड पाठिंबा मिळाला आहे. दर दोन महिन्यात किमान एकदा तरी तरी इस्त्राइल - पॅलस्टाइन मध्ये युध्दसदृश्य परीस्थिती निर्माण होत आहे. त्याचा विस्फोट कधीहि होऊ शकतो. तो झालाच तर अमेरीकेला इस्त्राइलच्या बाजूने मध्ये पडावे लागेल. यामुळे १९७३पेक्षाहि भिषण परीस्थीती निर्माण होईलच, पण त्याचा परीणाम थेट तेलावर होणार आहे. स्वत:चे अणूतंत्रज्ञान वीज निर्मितीच्या नावावरती वाढवित सुटलेले इराण तर सध्या उघड उघड अमेरीकेला टुक टुक माकड करत खिजवतय. अमेरीकेची हेरगिरी करणारी २ ड्रोन्स खाली पाडल्यावर तर इराणला आयते कोलितच मिळाले आहे. असा जाहिर पोपट झाल्यावर वॉशिंग्टन मधले "ड्रोनाचार्य"  गप्प बसले तरच आश्चर्य होते. त्यांनी इराणवरती थेट सौदि अरेबियाच्या राजदूताची हत्या करण्याचा आरोप लावला. इराणने तो आरोप अर्थात फेटाळला. पण इराणाहि कालागती करण्यात मागे नाहि. कालच म्हणजे ३१ डिसेंबर रोजीच इराणने गल्फच्या आखातात मध्यम पल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली. वरुन "हारमुज चे संपूर्ण आखात आमच्या टप्यात आले आहे!" या शब्दात आपल्या सामर्थ्याची कल्पना जगाला दिली. हि साधी बाब नाहि. या ठिकाणहुन जगभरातील तेलाच्या एकूण २०% वाहतूक होते. आणि आजच म्हणजे नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशीच अमेरीकेने इराणवरील आर्थिक निर्बंध अधिक कडक केल्याचे जाहिर केले आहे, युरोपियन महासंघाने तसेहि इराणवरती १ डिसेंबर रोजी आर्थिक निर्बंध लादले होतेच. नव्या वर्षाची नांदिच अशी झाल्यावर पुढे जगाच्या रंगमंचावर काय काय होणार आहे याचा विचार करणे भाग पडते.

नाहि म्हणायला २०११ मधला जिंकलेला क्रिकेट विश्वचषक हि भारतीयांसाठी सुखद आठवण होती तर २०१२ सालचे ऑलंपिक हि उत्सुकता आहे. अश्या सुखद आठवणी व उत्सुकतांवर जग जगत असते. मी वरती जे लिहिले आहे त्याला काहिजण होकार देतील काहिंना नव्या वर्षाचा केलेला रसभंग वाटेल. पण आपण रोजच्या आयुष्यात या गोष्टिंकडे लक्ष देत नाहि, खरंतर तितका वेळहि नसतो. तरीहि नविन वाटेवर पाऊल ठेवताना "सिंहावलोकन" करावसं वाटलं इतकच.


सगळ्याचा विचार करताना मला राहुन राहुन चार्ल्स डिकन्सच्या "अ टेल ऑफ टू सिटिज्‌" या जगप्रसिध्द कादंबरी मधल्या  एका सुरेख परीच्छेदाची आठवण झाली -
"It was the best of times, it was the worst of times, it was the age of wisdom, it was the age of foolishness, it was the epoch of belief, it was the epoch of incredulity, it was the season of Light, it was the season of Darkness, it was the spring of hope, it was the winter of despair, we had everything before us, we had nothing before us, we were all going direct to heaven, we were all going direct the other way - in short, the period was so far like the present period, that some of its noisiest authorities insisted on its being received, for good or for evil, in the superlative degree of comparison only."


- सौरभ वैशंपायन